marathi blog vishwa

Tuesday, 1 January 2013

जगूया माणूस म्हणून...

वेगवान आयुष्य जगताना अचानक ..सामोरं येतं एक अथांग असीम रितेपण,
सगळ्या जाणीवा, अपेक्षा अन भावनांना गिळून टाकताना
प्रश्नचिन्ह उभं करतं अस्तित्वावर..सगळे बुरखे टराटरा फाडून...

जाणवतं मग फोलपण प्रत्येक गोष्टीतलं ..आणि वाटतं भयंकर आश्चर्य
इथवर आलोच कसे कसे आपण चालून ....

हे रितेपण च मग जातं शिकवून ..नव्या संकल्पना ..नव्या योजना...
आणि उसळतो एक तेजाचा प्रवाह..मनाच्या खोल तळातून...
एक नवी जाणीव घेवून...

कधी कृष्ण कधी बुद्ध ..अनेक पांथस्थ .. असेच निघाले..मानवतेच्या वाटेवरून..
नव्या युगाची निर्मिती करताना
गेले तेजोमय होऊन...

तेजाचा एकतरी किरण उगवावा ..आपल्याही मनाच्या क्षितिजावरून
एकतरी झोपडीतला अंधार मग टाकावा उधळून...
           
अपेक्षा हीच नव्या वर्षाकडे..
नव्या उमेदीने जगूया माणूस म्हणून...
                                 - सुधांशु नाईक , बहारीन ..०१/०१/२०१३