marathi blog vishwa

Wednesday 20 April 2016

शिष्य शिवराय – गुरु शिवराय...!

गंमत वाटली का शीर्षक वाचून? पण नुसते हे शीर्षक नव्हे तर ते शिवरायांच्या जीवनातले दोन महत्वाचे पैलू आहेत असे मला वाटते. एक शिष्य म्हणून व एक गुरु म्हणून शिवराय कसे होते हे पाहणे नितांत आनंदमय आहे. “वेध छत्रपतींच्या तेजस्वी जीवनाचा” या लेखमालेतील हा पुढचा लेख शिवरायांचं मला भावलेली ही रूपे दाखवणारा....



शिष्य शिवराय
 आदर्श विद्यार्थी कसा असावा याची अनेक उदाहरणे आहेत. शिवराय त्यातलेच एक. आदर्श विद्यार्थ्याचं प्रमुख लक्षण म्हणजे बारीक निरीक्षण व उत्तम आकलन शक्ती. ती शिवरायांच्याकडे बहुत होती. विविध कागदपत्रातील उल्लेख पाहता शिवबा लहानपणी मातीचे किल्ले बांधून लढाईचे खेळ खेळत. त्यांना विविध गोष्टींचे शिक्षण मिळावे यासाठी लोक नेमलेले होते.
त्यांच्या जन्मावेळची व त्यापूर्वी ५० वर्षातील परिस्थिती फार भयानक होती. आदिलशाही, निजामशाही व मोगलांच्या आपापसातील लढाया, खून, अत्याचार, विश्वासघात आदींनी भरलेली. शहाजीराजे सुद्धा यात होरपळत असताना लहानगा शिवबा नक्कीच ते पाहत होता. त्यात सोबत जिजाऊसारखी थोर माता. जिजाबाई त्यांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगत असे उल्लेख आहेतच. पण माझ्यामते त्याचवेळी त्या शिवबाना सद्यस्थिती बाबतसुद्धा नक्कीच सांगत असाव्यात. अगदी पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य, सम्राट अशोक, सम्राट हर्ष आदि थोर व्यक्तींसोबत सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, विजयनगर अशा मोठ्या राजघराण्यांचा उदयास्त सुद्धा शिवरायांनी गोष्टीरूपात तरी नक्कीच ऐकला असावाच.
हे सगळं ऐकताना त्यांच्या मनात शेकडो प्रश्न निर्माण झाले असतील. त्याचं निराकरण माता जिजाऊ, दादोजी कोंडदेव, सोनोपंत डबीर, कान्होजी जेधे नाईक, शिवापूरचे कोंडे देशमुख, माणकोजी दहातोंडे, बाजी पासलकर व ज्यांची नावं इतिहासात नोंदली गेली नसतील असे अनेक लहान थोर यांच्याकडून होत होते. विविध भाषा, न्यायव्यवस्था, शेतीव्यवस्था, दंड व्यवस्था, पाण्याचं नियोजन, अश्व परीक्षा, भूगोल यासाठी दादोजी कोंडदेव, कान्होजी व बाजी पासलकर यांच्यासोबत शिवरायांनी केलेली बारा मावळातील भ्रमंती नक्कीच उपयुक्त ठरली. हे तिघेही सोबत असलेल्या शिवरायांना जमेल ते सारं मनापासून शिकवत. त्यावरही पुन्हा जिजाऊंचे सर्व गोष्टींवर बारीक लक्ष असायचे. पुणे प्रांतातील मुक्काम लहानग्या चौकस शिवबाला रोज नवे अनुभव देत होता.
सदरेवरील ठराविक मान्यवर व्यक्तींकडूनच फक्त शिवबांचे शिक्षण होत असे नव्हे तर भालाईत, तलवारबाज, नेमबाज, घोडेस्वार, कुस्तीवीर, शेतकरी, लोहार, सुतार, अवघड वाटा चढून येणारे धनगर, तलाव-विहिरी बांधणारे, लाल-महालाचे बांधकाम करणारे अशा अनेक लोकांच्या कामातून शिवबा नवं काही शिकत गेले. आणि पुढे मग याच विविध लोकांचा सुयोग्य उपयोग स्वराज्यासाठी करून घेतला गेला.

इतकंच नव्हे तर त्यावेळी सुरु असलेली राजकारणे, लढाया, आधी झालेल्या लढाया, त्यातले डावपेच, पडद्यामागची युद्धनीती हे सगळं सोबतच्या जाणत्यांकडून शिवरायांना नक्कीच समजले असणार. शाई टिपणारा कागद जसं पट्कन सारे काही टिपतो तसं शिवबा सारं काही आत्मसात करत होते.
वाढत्या वयात शिवरायांचा रोज किमान ५-६ तास तरी शारीरिक कसरती, तलवारबाजी, घोडेस्वारीचा सराव होत असावा असे त्यांचा नंतरचा फिटनेस पाहून वाटते. लहानवयात लष्करी व राज्यव्यवहारातील सारे काही नेटकेपणाने शिकण्यासाठी उत्तम अशी “विद्यार्थी वृत्ती” अंगी असणे आवश्यक असते. कारण गुरु कितीही चांगला असला तरी शिष्याने काहीच शिकायचा प्रयत्न केला नाही तर तो घडू शकत नाही. म्हणूनच शिवराय हे नक्कीच उत्तम शिष्य होते असे आवर्जून सांगावेसे वाटते.
शिवराय हे स्वतः जेंव्हा शिकत होते तेंव्हाच ते हळूहळू गुरुजीपण सुद्धा अंगी बाणवू लागले हेही इतिहासातून दिसते. शिवबा एका नामवंत जहागीरदार व शूर सरदार शहाजीराजांचे चिरंजीव. पण केवळ म्हणून मराठी लोकांनी त्यांचे सारे काही ऐकले असते असे म्हणणे योग्य ठरणार नाही. पुणे महाली जी घडी बसवली गेली, दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, जेधे, बांदल आदि लोकांचे आपापसातील संबंध, मायेने किंवा दरारा दाखवून वठणीवर आणलेले देशमुख / पाटील किंवा सुभेदार या सगळ्यामुळे हे जहागीरदार वेगळे दिसतात असा संदेश सर्वत्र गेला. त्यामुळे आदर वाढला असला तरी बाल-शिवबा जे सांगतील ते सर्व ऐकतील अशी परिस्थिती नव्हती.
त्यामुळे प्रेमाने चुचकारत, प्रसंगी कठोरपणे वागत शिवबा लोकांना गोळा करत होते. प्रत्यक्ष आपल्या मोहिते मामांना सुप्याच्या गढीत जाऊन जेरबंद करून आणायचे धाडस जसं शिवबांनी दाखवलं तसेच कुठे एखाद्या गावात लग्नात पाहिलेल्या जीवा महालेला जवळ करायचे धाडस ही..!
जात पात मानली जात नाही, प्रत्यक्ष काम पहिले जातेय याची जेंव्हा लोकांना खात्री पटू लागली तेंव्हा माणसे शिवबांच्या भोवती गोळा होऊ लागली. आजकाल सुद्धा आपण पाहतो की विविध पद्धतीने माणसे गोळा करणे सोपे असते पण त्यांना निश्चित ध्येयाने प्रेरित करणे, योग्य दिशा दाखवणे व यशस्वी होण्यासाठी त्यांची तयारी करून घेणे यासाठी नेत्याने वठवलेली शिक्षकाची भूमिका फार मोलाची ठरते.
गुरु शिवराय
याबाबत लिहिण्यापूर्वी मला एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, की इतिहासातील अनेक गोष्टींबाबत नेहमी आपण म्हणतो की शिवबानी हे काम केले, शिवबांनी ते काम केले. मात्र त्यासाठी अन्य लोकांचेही कष्ट, योजना, कार्यवाही मोलाची असते.
प्रमुख नेता, दुय्यम नेता, त्याचे सहायक नेते, गटप्रमुख अशा सर्व पातळ्यांवर काम करताना विविध अडचणी येत असतात. पण मुख्य नेत्याने “ line of action and principles ” जर नीटपणे स्पष्ट केली असतील तर खालच्या पातळीवरील नेते मूळ उद्दिष्टं तशीच ठेवून काम करून दाखवतात. त्यामुळे आपल्या मनातील योजना का व कशा अंमलात आणायच्या हे प्रमुख नेत्याने अत्यंत बारकाईने स्पष्ट करणे व त्यासाठी तितकेच सूक्ष्म मार्गदर्शन करणे आवश्यक असते. ही शिक्षकाचीच भूमिका. ती शिवराय अगदी मरेपर्यंत मनापासून पार पडताना दिसतात..!
सुरुवात अगदी तोरणा जिंकायच्या वेळेपासूनच करू. कुणी कुठे एकत्र यायचे, काय करायचे, आपत्कालीन आराखडा काय असावा याचे उत्तम नियोजन शिवबांनी करून दिले होते. बाळाजी, चिमणाजी, तानाजी, येसाजी वगैरे सौन्गड्याकडून त्यांच्या तालमी झाल्या असतील. बाजी पासलकर सारख्या ज्येष्ठ वीराने त्यात सुधारणा सुचवल्या असतील. त्या नंतर काटेकोर शिस्तीत कारवाई करण्यात आली. कुठेही नवखेपणा नव्हता. उत्तम नियोजनाची व लोकांना नेमके शिकवायची शिवरायांची हीच वृत्ती अधिक ठळकपणे मोहवून टाकते ती पुरंदर परिसरातील फत्तेखानाविरुद्धच्या पहिल्या लढाईत, जेंव्हा शिवराय स्वतः रणमैदानात होते व नेमक्या चाली रचत होते, यशस्वी होत होते.
मात्र शिक्षण देण्याची सुरुवात त्यापूर्वीच झाली असावी. आपल्या परिसराचा भूगोल सर्वांच्याकडून पाठ करून घेणे, घाटवाटा, चोर वाटा, लपण्याच्या जागा, लढायांच्या साठी मोक्याच्या जागा सर्वांच्या मनावर बिंबवल्या असतील. त्यानंतर लढाईसाठी लागणारी शस्त्रे तयार करायला शिकलगार, लोहार आदि मंडळीना विशिष्ट सूचना केल्या असतील. आपल्या परिसरात कोणती शस्त्रे परिणामकारक आहेत, कोणते कपडे वापरावेत, कोणत्या पद्धतीने प्रवास करावा इ. अनेक गोष्टी त्या सुरुवातीच्या दिवसात शिवबा व त्यांच्या सोबत्यांनी इतरांना शिकवल्या असतील.
एखादे राज्य उभे करायचे म्हणजे फक्त लढाया करणे नव्हे. एखादी लढाई जिंकून तो प्रांत ताब्यात आल्यावर त्याची नीट व्यवस्था करणे हे शिव धनुष्य असते. एकतर तो शत्रूचा प्रांत असतो, किंवा आपलाच पण शत्रूच्या ताब्यात राहिलेला प्रांत असतो. त्यामुळे तिथले लोक पुन्हा लगेच आपल्याला सहकार्य करतील अशी अशा नसते. त्यामुळे त्या लोकांना आपल्याकडे वळवून आणावे लागते. त्यासाठी आधी त्यांच्या भल्यासाठी काही योजना सुरु कराव्या लागतात. शत्रूने केलेल्या अत्याचारामुळे ढासळलेली त्यांची मनोवस्था पुन्हा उत्साही कशी होईल याची काळजी घ्यावी लागते.
हे सगळं शिकवणारा राजा असेल, त्यावर कडक लक्ष ठेवणारा राजा असेल तर मग हाताखालचे अधिकारी तत्परतेने काम करतात. एकूणच स्वराज्याची व्यवस्था पाहता शिवरायांनी सर्वाना योग्य ते शिक्षण मिळण्याची पुरेपूर व्यवस्था केली असावी असे वाटते.
शेती, बाजारपेठेतील व्यापार, मालाची आयात-निर्यात, धार्मिक बाबी, मठ- मंदिर इ. ची नियमित मदत, करवसुली, गडांची बांधकामे, गडाची दुरुस्ती, लष्करी सामग्रीची साठवण, विविध गडावर रसद पुरवठा करायची यंत्रणा, गुप्तहेर खाते, शिपाई भरती, युद्धाचे सराव, गुप्तता, परकीय सत्तांसोबतचे राजनैतिक संबंध, दूत किंवा वकिलांकडून करावयाचे राजकारण अशा शेकडो गोष्टी शिवरायांच्या या नव्या स्वराज्यासाठी लागणार होत्या. आणि त्यासाठी नक्कीच विविध जाणकार शिवरायांनी नेमले असतील. त्यांच्या मार्फत स्वतः व इतरांना चांगले प्रशिक्षण घेतले असेल. झालेल्या चुकांतून पुन्हा नव्या सुधारणा घडवल्या असतील हे नक्की.
जेंव्हा एक राजा स्वतः शिकत असतो, दुसऱ्यांना शिकवत असतो, ध्येय-निश्चिती करून त्यासाठी वाटचाल करू पाहतो तेंव्हा यशाची शक्यता नक्कीच वाढलेली असते हेच शिवचरित्रातून सतत पाहायला मिळते.
जेंव्हा आपण शिवचरित्रावर मनन-चिंतन करतो तेंव्हा हे असं खूप काही जाणवू लागते. दुर्दैवाने सगळ्यासाठी लगेच पुरावे नाही सापडणार पण मानसशास्त्रीय परिभाषेचा आधार घेत आपण हे असे घडले असावे असे नक्की म्हणू शकतो. शिवराय नियमित सर्वाना शिकवत असावेत याचे उत्तम पुरावे म्हणजे त्यांनी पाठवलेली काही पत्रे. बाळाजी आवजी चिटणीस, निलप्रभू अशा मंडळींच्या हातून लिहून घेतलेल्या अशा काही पत्रात इतक्या बारीक बारीक सूचना केलेल्या आहेत की हा राजा किती बारीक विचार करतोय हे पाहून मन थक्क होते.
एक पत्र आहे सिंधुदुर्ग बांधकाम चालू असतानाचे. त्यात असे म्हटलं आहे की, “ आम्ही उत्तम प्रतीची चुनखडी व अन्य साहित्य पाठवूच. पण त्यात भेसळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. बांधकामची वाळू सुद्धा नीट धुवून घ्यावी कामगारांना रोजमुरा नीट व न चुकता द्यावा. इंग्रजांशी होणाऱ्या व्यवहारात दक्ष असावे. टोपीकर इंग्रज ही मोठीचतुर जात. डोळ्यातले काजळ कधी काढून नेतील कळणार नाही. परत येऊन त्याचाही रोजमुरा मागतील. सावध असावे.....”
तर दुसरे सुप्रसिध्द पत्र साल्हेरीच्या युद्धापूर्वी रामनगर प्रांतात स्वारीवर असलेल्या मोरोपंताना लिहिलेले. त्यात राजे म्हणतात की, “ तुम्ही त्वरेने वर घाटी जाऊन प्रतापरावास मिळणे. दिलेर्खानासारखा गनीम मोठा. तेंव्हा त्याचे उभयता मिळून पारिपत्य करणे.” हे पत्र मिळताच जव्हार प्रांतात असलेले मोरोपंत प्रतापराव गुजर यांच्याकडे दौडले. समोर सुमारे लाखभर शत्रुसैन्य असतानाही दोघांनी मिळून एक अद्वितीय युद्धाचा डाव रचला. मोगल सैन्याला चतुराईने फसवत एक प्रचंड मोठे युद्ध सहज जिंकून दिले.

तर राजांचे तिसरे महत्वाचे पत्र हे चिपळूण जवळ दलवटणे येथील छावणी प्रमुखाला लिहिलेलं. राज्याभिषेकापूर्वी काही आठवडे लिहिलेल्या या पत्रात राजे कुटुंबप्रमुख या नात्याने किती बारकाईने सर्वांची काळजी करत होते ते दिसते. त्या मोठ्या पत्रात लिहिलेल्या गोष्टींचा सारांश असा की, “ जिथे छावणी आहे त्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ यांना त्रास देऊ नये. लागतील त्या वस्तू विकत घ्याव्यात, फुकट किंवा जबरीने घेऊ नयेत. गोदामाचा कारकून नेमून दिल्याप्रमाणे धान्य, चारा देईल. तो सर्वांनी व्यवस्थित पुरवावा. त्याच्यावर दबाब टाकू नये. दाणा-वैरण नीट जपावी, त्याला आग लागू नये म्हणून खबरदारी घ्यावी. पावसापूर्वी सर्व बेगमी करून ठेवावी. सर्व गोष्टींची खबरबात ठेवावी...इ.”

जेंव्हा इतक्या बारकाईने राज्य चालवले जात असते. चांगल्या गोष्टीना शाबासकी मिळते, वाईट गोष्टीना त्वरीत दंड मिळतो तेंव्हाच लोकांचे प्रेम राजाला मिळू लागते. शिवराय हे आदर्श राजे होते याचे मुख्य कारण ते स्वतः उत्तम शिष्य व गुरु होते असे मला वाटते...!

-          - सुधांशु नाईक. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)