marathi blog vishwa

Saturday 17 December 2022

डॉक्टर...डॉक्टर

आपल्या जन्मापासून सदैव अधूनमधून आपली कायमच साथ करणारी व्यक्ती किंवा पेशा म्हणजे डॉक्टरांचा. " सहज सुचलेलं.." या लेखमालेतील हा पुढील चौथा लेख डॉक्टरांविषयी....

डॉक्टर म्हटलं की पहिल्यांदा आठवतात ते लहानपणी चिपळूणला आमच्या घरी येणारे बेल्लारीकर डॉक्टर. ते मूळचे मांजरी - चिकोडी या परिसरातले. आमचंही आजोबांचं मूळ गाव ते त्यामुळं बाबांचं आणि त्यांचं जरा जास्त सख्य झालं असावं.
त्यांची तेव्हा " यझदी "  मोटरसायकल होती. जावा, यझदी यांचं फायरिंग दुरून ही ऐकू येत असे. तीच त्यांची ठळक ओळख.
पागेवर त्यांच्या दवाखान्यात आम्ही सगळे जात असू. चितळ्यांच्या घरात राहताना, त्यांच्या चार ही मुली म्हणजे ज्योतीताई, स्वातीताई, सुजाताताई आणि गीताताई यापैकी कुणीतरी आम्हाला घेऊन जाई. त्यातही गंमत अशी असायची की स्वातीताई आणि मी बरेचदा एकदम आजारी पडायचो. हवा बदलली की लगेच ताप, सर्दी व्हायचीच आम्हाला. मग दोघेच कित्येकदा डॉक्टरकडे जायचो.
बेल्लारीकर डॉ. मग आम्हाला चेक करून एक इंजेक्शन द्यायचे आणि वर सल्फाच्या वगैरे गोळ्या. पांढरी गोळी दिवसातून 2 वेळा, लाल गोळी एकदा असं काही सांगून पुडीतून देत. हिशोब वहीत लिहून ठेवायचे. मग महिन्यातून कधीतरी बाबा ते चुकते करायचे.
बेल्लारीकर अत्यंत ऋजु स्वभावाचे. त्यामुळं सगळ्यांशी त्यांचं छान जमायचं. कुणाचं आजारपण सिरीयस वाटलं तरी लगेच दुसरीकडे ताबडतोब न्यायला सांगायचे.
बाबांना अंगावर अचानक उठणारे पित्त, आईच आजारपण असं काही असलं की ते घरीच येत. मग घरी स्टोव्हवर पाण्याचं आधण ठेवायचं. पाणी उकळलं की त्या पातेल्यात इंजेक्शनची ती स्टीलची सिरिंज, सुया बुडवायचे. मग चिमट्याने ते बाहेर काढायचं. मग औषध त्या सिरिंजमध्यें घेणं हे सगळं आम्ही अगदी निरखून बघत बसायचो.
आता ते आपल्यात नाहीत पण फॅमिली डॉक्टर कसे हवेत असं कुणी विचारलं की नेहमी डोळ्यासमोर त्यांची मूर्ती येते.

आईच्या आजारपणात तेंव्हा लहानपणी कधी आम्ही होमिओपॅथी डॉक्टर कडेदेखील जाऊन आलेलो. आईला सोबत म्हणून शाळेची वेळ पाहून, मी किंवा धाकटा भाऊ तिच्यासोबत जात असू.
पुढं चिपळूणजवळच्या निवळी या गावातील वृद्ध आगवेकर वैद्य यांचा परिचय झाला आणि त्यांची आयुर्वेदिक औषधं घरी येऊ लागली. तेही स्वतः अनेकदा घरी येत. आम्ही कुणी किंवा इतर शेजारी पाजारी यांना औषधं देत. आयुर्वेद रसशाळा, अर्कशाळा, धुतपापेश्वर  आदि आयुर्वेदिक कम्पन्यांची नावं त्यामुळं माहितीची झाली. चिपळूणला असलेलं श्रीराम औषधी भांडार हे तर घराजवळ होतच.

रत्नागिरी जिल्ह्यातील दाताचे पाहिले डॉक्टर सुरेश जोशी हे तर माझा बालमित्र निहारचे वडीलच. त्यामुळे त्यांच्या घरी मुक्त प्रवेश असायचा. तर दुसरे नावाजलेले भडभडे डॉक्टर. त्यांचा मुलगा हर्षद हा लहान भाऊ सुशांतच्या वर्गात. त्यामुळं त्यांच्याकडे ही घरच्यासारखा वावर असे.

डॉक्टर ही जमात पेशन्टला लुटते असं आम्हाला कधीही वाटलं नाही त्याचं कारण ही सर्व आसपास पाहिलेली मंडळी. प्रसंगी स्वतःकडील फुकट औषधं देणारी. गोर गरिबाकडे पैसे नसले तर खात्यावर मांडून ठेवणारी, "सावकास दे नंतर" असं सांगून आधी उपचार करणारी. गरीब मंडळी पण प्रामाणिकपणे 3,4 महिन्यांनी आवर्जून ते पैसे परत देत.

पुढं कामासाठी, नोकरीसाठी कोल्हापूर, कल्याण, सांगली, आखाती देश असं कुठं कुठं हिंडलो तिथंही डॉक्टर्सचे चांगलेच अनुभव मिळाले.

कोल्हापूर मधील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉ पत्की. अनेकांना जणू ते देवासारखे भासतात. पत्नीसाठी आणि नंतर जुळ्या मुली असल्याने तिच्या गरोदरपणातील अनेक अडचणी त्यांनी अत्यंत धीर देऊन सहज सोडवल्या. वर दूरच्या नात्याची आठवण करून देत पैसे घ्यायला नकार. शेवटी आमच्या हट्टखातर पैसे घेतले तेही डिस्काउंट करून.
कोल्हापूरमधील ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ  गुणे यांच्यामुळं तर आमच्या लहान मुलींचे विविध प्रश्न मार्गी लागले. आज त्या मोठया झाल्याहेत. पण साधं सर्दी खोकला झाला तरी त्यांना गुणे काकांचं औषधच हवं असतं.

सासरे आणि आईचे कॅन्सरचं दुखणं सुरु असताना डॉ. कुणाल चव्हाण, डॉ. गणपुले, डॉ. पुजारी, डॉ. औरंगाबादकर, डॉ. नवरे, डॉ. दामोदरे आदिनी जी मदत केलीये त्याचं ऋणच आहे आमच्यावर. आमच्या स्नेही आणि हेल्पर्स ऑफ दि हॅंडीकॅप्ड संस्थेच्या रजनीताई, अनघा पुरोहित यांच्या आजारपणात आधार हॉस्पिटलच्या डॉ. अजित कुलकर्णी, डॉ. केणी आदिनी अवघड परिस्थिती असताना अथक प्रयत्न केले ते कसं विसरता येईल?

साहित्य - संगीतादि विविध कलांच्या समान आवडीमुळे मित्र बनलेले भूलतज्ञ डॉ. भिंगार्डे, डॉ. भाई देशपांडे, डॉ. रसिका देशपांडे, डॉ. भिर्डी, डॉ. अनघा व अद्वैत आफळे हे दंतवैद्यक दांपत्य हे तर अगदी घरचेच झालेत.
यांच्याशिवायही आजवर जे जे डॉक्टर भेटले त्यात कधीच कुणी असं भेटलं नाही की त्यांच्यामुळे वाटावं हे आपल्याला लुटतायत.

समाजात डॉक्टरवर हल्ले, त्यांच्याकडून रुग्णांची पिळवणूक आदि बातम्या ऐकल्या की मन खिन्न होतं. काही बेईमान डॉक्टर्स आहेतही समाजात, मात्र त्यासाठी समस्त डॉक्टर्स मंडळींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नव्हेच.

एखाद्या रुग्णाला बरं वाटण्यासाठी डॉक्टरचं योग्य निदान जितकं आवश्यक तितकंच रुग्णाने,सर्व त्रास नीट सांगणं, काही न लपवणं, त्याला दिलेला सल्ला फॉलो करणं देखील अत्यावश्यक.
डॉक्टर हा पेशा सेवेचाच. त्यामुळं ही माणसं दिवसाचे 24 तास अगदी on toes असतात. प्रसंगी जेवण, झोप विसरून एखाद्याचा जीव वाचवायला धावून जातात. अनेकदा आपण त्यांना साधं थँक्स म्हणायचं देखील विसरून जातो  मात्र जेंव्हा त्यांना कधी अपयश येते तेंव्हा त्यांनाही वेदना होतातच हेही विसरून जातो. अशा डॉक्टरला समजून घेण्यात लोक कमी पडतात. त्यांच्या दवाखान्याची तोडफोड करून त्यांना अधिक दुःख देतात.

कित्येक डॉक्टर स्वतःच्या ऍडमिशन पासून दवाखाना उघडेपर्यंत लाखो रुपये खर्च करतात. प्रसंगी कर्ज काढतात. त्यांना त्याकडे व्यवसाय म्हणून पाहावं लागणार हे नक्कीच. मात्र लोक सहजपणे कॉमेंट करतात की " हे काय पैशाच्या मागे लागलेत.यांना धडा शिकवायला हवा.. "हे चुकीचं आहे. असं घडायला नको.

काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टर हे या पेशाकडे अधिकाधिक सेवा म्हणून पाहतात असं वाटतं. जे काही तात्कालिक फायदा पाहतात त्यांनाही आपली वर्तणूक सुधारायची सद्बुद्धी मिळू दे.

आज नवनवीन तंत्रज्ञान आलंय, औषधं देखील महाग झालीयेत  अशावेळी सगळंच सांभाळणे ही तारेवरची कसरत असते रुग्णासाठी आणि डॉक्टर्स साठी देखील.
त्यामुळं सर्वांनीच एकमेकांना समजून घेणं आवश्यक बनले आहे.
गेल्या 2 वर्षात आपण पाहिलंय की एखादा आजार किती हाहाकार माजवू शकतो ते. त्यामुळं आपल्यासोबत चांगला डॉक्टर असणं हे फार आवश्यक झालंय. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना प्रत्यक्षात जास्तीत जास्त प्रमाणात असायलाच हवीय.

निरोगी समाज असणं हे सर्वांच्या भल्यासाठीच. मात्र ती केवळ डॉक्टरची जबाबदारी असू शकत नाही. आपण आपलीही जीवनशैली बदलायला हवीय. आपण निरोप घेताना एरवी म्हणतो तसं, " पुन्हा भेटूया " असं डॉक्टर्सना म्हणावं लागू नये असं सर्वाना खरंतर वाटतंच. मात्र उत्तम डॉक्टर आपला फॅमिली फ्रेंड व्हावा आणि त्याला भेटताना आनंदच व्हायला हवा. आगामी वर्षात हे नातं अजून छान होऊ दे, दृढ होऊ दे आणि मानवाला कमीत कमी आजारांचा सामना करावा लागू दे हीच प्रार्थना!
- सुधांशु नाईक, सध्या कोल्हापूर. 9833299791🌿
(विनंती - ब्लॉगवर जर anonymous म्हणून कॉमेंट करत असाल तर, कृपया कमेंट च्या खाली आपलं नाव अवश्य लिहा, म्हणजे कुणी कमेंट केलीये हे कळेल आणि त्याला योग्य प्रतिसाद देता येईल. माझा नंबर दिला आहेच. तुमच्या कॉल आणि मेसेजेसला नक्कीच उत्तरं देईन.) 

Sunday 20 November 2022

भूक

"सहजच सुचलेलं..."  या लेखमालेतील हा पुढचा लेख आपल्या सर्वांच्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या भुकेबाबत....
3. भूक
- सुधांशु नाईक 
गेल्या काही आठवड्यात भुकेबाबत 2,3 गोष्टी जाहीरपणे जागतिक मीडियातून समोर आल्या. एक म्हणजे केनिया मध्ये यंदा अत्यंत दुष्काळ असून कित्येक प्राणी अन्नपाण्यावाचून तडफडून मरत आहेत. त्याचबरोबर युक्रेन मधील युद्धामुळे धान्यउद्पादनावर मोठया प्रमाणात परिणाम होणार असून आगामी काळात भूकबळी वाढण्याबाबत चिंता व्यक्त केली गेली.

आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या भुकेबाबतचं हे चिंतन....

पोटासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन
मी राजाच्या सदनि अथवा घोर रानी शिरेन....

असं खरेशास्त्री अनेक वर्षांपूर्वी म्हणून गेलेत. त्या भुकेचा अनुभव मात्र सर्वच प्राणीमात्रासाठी जीवघेणा असतो. जर वीतभर पोटात भूक नसती तर जगणं किती सहजसोपं झालं असतं असं अनेक तत्वचिंतक सांगून जातात तर तुम्ही तुमच्या भुकेवर नियंत्रण ठेवलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहील असं आहारतज्ज्ञ सांगतात.
भुकेवर कंट्रोल किंवा नियंत्रण ठेवणं इतकं सोपं आहे का हो? मुळात ज्यांना मुबलक प्रमाणात अन्न उपलब्ध आहे त्यांच्यापेक्षा ज्यांना दोन वेळ पोटभर अन्न मिळतच नाही त्यांची संख्या जगात जास्त असावी.
अफ्रिका काय आणि भारत काय सगळीकडेच लोकांचे भुकेले चेहेरे आपल्याला उदास करत राहतात. शहरापासून मेळघाट सारख्या दुर्गम भागापर्यंत भुकेचं भीषण रूप दिसत राहतं
आफ्रिकेत कामं करत असताना तर ही भूक ठाई ठाई दिसत राहिली.

कित्येक देशात आजही लोकांना एकवेळचं अन्न उपलब्ध नाहीये. साईटवर जाताना अनेकदा माणसांच्या, मुलांच्या लहान मोठया झुंडी गाडीमागे धावत येत. बिस्किटे, फळं, चॉकलेट असं जे काही देऊ त्यासाठी जीव टाकत.
या सगळ्यांना एकवेळचं खाणं देखील आपण रोज देऊ शकत नाही या जाणीवेने मन खट्टू होऊन जाई.
अनेक मुलं, स्त्रिया आसपासच्या दुकानातून काही न काही घेऊन बाहेर विकायला गाड्यांभोवती धावत असतात. दिवसभरात जितकं विकतात त्यावर त्यांना तुटपुंजे कमिशन मिळतं. सिग्नलला तर ती सगळी असतातच पण ट्रॅफिकमध्यें ही गाड्यांच्या आजूबाजूला धावत असतात. कुणी बिस्किटे, टिशू पेपर, पेन, वही, कोल्ड्रिंक असं काही विकलं जावं म्हणून उन्हातून धावत असतं. रोज सगळ्यांकडून सगळं कसं आपण विकत घेऊ शकणार? गाडीच्या काचेवर टकटक करून लक्ष वेधून घेणारे त्यांचे दीनवाणे चेहरे पाहून गलबलून येतं. त्यांच्यापासून चेहरा लपवायचे आपण प्रयत्न करत बसतो आणि मनोमन वेदना भरून येतें.

आफ्रिकेत फिरताना या लहान विक्रेत्यांमध्ये  वेगळ्या मुलीही असतात. देह विकू पाहणाऱ्या. 1 वेळचं जेवण मिळावं इतक्या माफक अपेक्षेने जेंव्हा मुली, स्त्रिया देह विकू जातात तेंव्हा आपण माणूस म्हणून कशाला जन्माला आलो असं वाटू लागतं.
दिवसाला 50,100 रु मिळावेत, स्वतःची आणि सोबत अन्य कुणी नातेवाईक असलाच तर त्यांचीही 2 वेळच्या अन्नाची सोय व्हावी, भूक भागावी म्हणून कुणाचीही शय्यासोबत करणाऱ्या मुली जगभरात दिसत राहतात. काळ्या, गोऱ्या, सावळ्या, उंच, बुटक्या... सगळ्यांच्या आयुष्यात केवळ अक्राळ विक्राळ भूक उरलेली असते. पोटाची भूक तर त्यांना त्रास देत असतेच पण इतर आधाशीपणे तुटून पडणाऱ्या लोकांच्या वासनेची भूक देखील त्यांना कित्येकदा उपाशीपोटी भागवावी लागते.

वर्ल्ड फूड ऑरगॅनायझेशन पासून गावोगावी असणाऱ्या लहान मोठया सामाजिक संस्थांपर्यंत कित्येक जण भुकेलेल्याना अन्न मिळावं म्हणून धडपडत आहेत मात्र त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. खरं म्हणजे " भुकेलेल्याना अन्न आणि तहानलेल्याना पाणी द्यावं " असं सांगणारी आपली प्राचीन संस्कृती. मात्र हल्लीच्या
काळात " मी आणि माझ्यापुरतं " हीच वृत्ती इतकी वाढलीये की काही अपवाद वगळता बहुसंख्य आपण जणू निगरगट्ट बनून गेलोय.

आसपास भुकेने कळवळणारे जीव आपल्याला कुठंच हल्ली भिडत नाहीत का?

आपण कुठं कुठं फिरायला जातो, कामानिमित्त दिवसभर हिंडत राहतो. प्रचंड भूक लागते तेंव्हा जे मिळेल ते खाऊन टाकतो. वडापाव, सॅन्डविच, इडली, पोहे, चिकन 65, व्रॅप सॅन्डविच, नूडल्स असं ज्या त्या वेळी लोकांना मिळावं म्हणून गावोगावी हजारो लहान मोठी हॉटेल्स, टपऱ्या असतात. शेकडो लोक त्यातूनच राबत असतात. मात्र एखाद्यादिवशी काहीच मिळालं नाही तर आपल्या पोटात अक्षरशः आग पडते. कधी घरी जातो आणि काही खातो असं होऊन जातं. एखाद्या दिवशी देखील आपल्याला भूक सहन होत नाही मग ही लाखो माणसं रोजचे उपवास कसं निभावून नेत असतील हा विचार प्रचंड अस्वस्थ करतो.
कॅमेरून ची राजधानी याऊंदे. तिथल्या आमच्या ऑफिस मध्यें हेल्पर म्हणून काम करत असलेल्या ज्युलीयसला विचारलं, काय बाबा आज तब्येत बरी नाही का? असा का गप्प गप्प बसलायस..?
तर आधी त्यानं उत्तरं द्यायला टाळाटाळ केली.
मग म्हणाला, " सर, 2 दिवस जेवणच नाहीये घरात कुणाला... "
मी म्हटलं, " का, तुझा पगार तर मिळालाय, काय केलं त्याचं? "
" घराचं भाडं, फोन, पाणी आणि वीज बिल यासोबत या महिन्यात मुलांच्या शाळेची फी भरली. एका मित्राचा वाढदिवस म्हणून बापानं उरलेल्या पैसे त्यावर खर्च केले. आता सगळे घरात बसलोय. इतर कुणी कामं करत नाहीत. "
त्याला मी आणि इतर सहकाऱ्यांनी वैयक्तिक काही मदत केली. घरी सगळ्यांना पुढच्या 8 दिवसाचं जेवण मिळेल याची सोय करून दिली. मात्र पुढं काय हा प्रश्न होताच.
इथं आफ्रिकेत एका प्रकर्षाने जाणवलं की लोकांना फक्त आजमध्ये जगतात. फ़क्त आजचाच विचार करतात. आले पैसे हाताशी की लगेच खर्च करून मोकळे. अगदी रोजकमाई करणारी मंडळी देखील हाती पैसे आले की हातात बियरचे कॅन आणि जेवणासाठी पदार्थ घेऊन ती कमाई संपवून टाकतात. शहरांत श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी तर ठळकपणे जाणवणारी.

आसपासच्या खेड्यात मात्र जरा लोक स्वयंपूर्ण असल्याचे आढळते. मातीची किंवा लाकडी घरं, आसपास केळी, प्लम, पपया, आंब्याची झाडें असतात. बटाटा, कसावा सुरणासारख्या अन्य काही कंदाची लागवड केलेली असते. कित्येकदा तर जवळच्या बाजारापर्यंत कित्येकदा किलोमीटर लोक चालत जातात. कच्च्या केळ्याचे वेफर्स, फळं विकून जे काही मिळेल त्यावर गुजराण.
हे सगळं पोटासाठी. त्यातही मुख्यत: घरची बाईच जास्त कामं करते. मुलं जन्माला घालण्यापुरता पुरुष. अनेकदा असं दिसतं की आपापल्या मुलांना या बायकाच वाढवतात. आमच्या गेस्टहाऊस वर कुक म्हणून काम करणारी लौवेट ही तिशीची बाई. इथं आधी मैत्री, प्रेम होते. मुलं होतात. मग चार पैसे गाठीशी जमले, खर्च करू शकतोय अशी परिस्थिती आलीच तर मग चर्च मध्यें जाऊन लग्न.
वयाच्या 17 व्या वर्षी पहिली मुलगी. मग अजून 2 मुलं. नंतर तो दुसऱ्या गावी निघून गेलाय. तिथं दुसरीसोबत पुन्हा तिची मुलं..

इथं ही मग त्या मुलांना वाढवते. दुपारपर्यंत आमच्याकडे कामं करते. दुपारनंतर बाजारच्या रस्त्यावर लहानसा फूड स्टॉल चालवते. कित्येक दिवस उपाशी घालवल्यावर मग तिनं स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. आज आपल्या मुलांसोबत बहीण आणि तिच्या 2 मुलांच्या पोटाची भूक भागवतेय, त्यांच्या शिक्षणाचा खर्च निभावून नेतेय. " सर, पोटात अन्न नसताना मुलं कशी कळवळायची, पाणी पिऊन सगळेच झोपायचो तेंव्हा फार वाईट वाटायचं. आपण मुलं जन्माला का घातलीय असं अपराधी वाटायचं. अनेक ठिकाणी कामं मागितली. कुणी काम देईना. मग रस्त्यावर वस्तू विकून पैसे गोळा केले. लहानसा फूड स्टॉल सुरु केला. रात्री 4 घास जेवून जेंव्हा मुलं तृप्त झोपतात तेंव्हा फार समाधान वाटतं. But life is very difficult sir... Better to die than living Without food... " असं तिचं वाक्य मनात बाणासारखं घुसतं.

तरीही लायबेरिया, कॉंगो, गिनी, आयवरी कोस्ट अशा देशांपेक्षा कॅमेरून खूपच बरं म्हणायला हवं. इथं किमान प्रत्येकजण पोटासाठी काही धडपड करताना दिसतो. रस्त्यांवर भिकारीदेखील कमी दिसतात. मात्र इतर काही देशांत भुकेने व्याकुळलेले जथेच्या जथे दिसतात. मोजकी लोक कामं करतात, कित्येक जण ईश्वरावर हवाला ठेऊन दिवस ढकलतात कुणी भीक मागतं तर कुणी चोऱ्यामाऱ्या करतं. भुकेल्या लोकांना अन्नाची आशा दाखवून राजरोस लुबाडणारे किंवा संभावितपणे सभ्यतेच्या बुरख्याआडून त्यांना गंडवून जाणारेही मग दिसत राहतात. सगळं कसं जंगलातल्या आयुष्यासारखं. रोजच्या घासभर अन्नासाठी सगळी यातायात...!
माणसांची ही अवस्था तर मुक्या प्राण्यांच्या वेदनेविषयी सगळं बोलायच्या पलीकडे.

जगभर सगळीकडेच अशा कहाण्या. असे किस्से. किती आणि कुणाला सांगायचं? 2,4 उपाशी माणसांच्या पोटात रोज किमान एकवेळचं अन्न जात राहावं इतकंच आपण करू शकतो. करत राहूया.
- सुधांशु नाईक,9833299791 🌿

Sunday 6 November 2022

चाळीतले दिवस

" सहजच लिहिलेलं.. " या नव्या लेखमालेतील हा दुसरा लेख.
चाळीतले दिवस
- सुधांशु नाईक.
बटाट्याच्या चाळीपासून संभूसांच्या चाळीपर्यंत अनेक चाळी साहित्यक्षेत्रात आपला अमिट ठसा उमटवून गेल्याहेत. सगळ्या चाळीतून कमी अधिक प्रमाणात तेच ते असं सगळं असतंच.
सार्वजनिक संडास, डुगडुगता जिना, तिथला अंधार, भांडणारे आणि तरीही जीवाला जीव देणारे शेजारी, धान्य - पदार्थ यांची देवाण घेवाण इत्यादी सगळं.
प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र घर ही कितीही हवीहवीशी गोष्ट असली तरी तिथवर पोचेपर्यंत अनेकांना अशा चाळीत राहावं लागलेलं असतं. माझ्यासह अनेकांच्या जीवनात आलेल्या चाळीतील त्या दिवसांना विसरणं अशक्यच...
( हे रेखाचित्र गुगलवरून साभार. निलेश यांनी एकेकाळी लोकसत्तासाठी केलेलं हे स्केच उत्तमच. आमची चाळ काहीशी अशी दिसायची.)

वयाच्या 7,8 व्या वर्षी पहिल्यांदा चाळीत गेलो ते अजूनही आठवतं. आम्ही त्यापूर्वी चिपळूणला पागेवर चितळ्यांच्या घरी राहायचो. ते घर सोडून गावातच पंचायत समिती समोरच्या पाटकरांच्या चाळीत प्रथम जाताना सावंतांच्या रिक्षामधून गेलेलो. मोजकं सामान,आई बाबा आणि माझ्यासह लहानगा भाऊ. आजोबा सोबत होते की नाही हे नक्की आठवत नाहीये.

तिथं घराच्या भिंती मातीच्या होत्या. नुसतं पोपडे उडालेल्याच नव्हे तर खड्डे पडलेल्या. आई बाबा त्या भिंती दुरुस्त करायचे. कुणीतरी मदतीला आलेलं असायचे. मग रंगकाम. इतकंच नव्हे तर त्यावेळी स्क्रॅप मध्ये मिळणारे तेलाचे रिकामे डबे आणून त्याची पिंपं किंवा 2,3 डबे जोडून मोठे डबे बनवले जात. त्यात मग धान्य साठवलं जाई. वर्षादोनवर्षातून त्या डब्याना रंग लावणे, भिंतीना रंग लावणे हीही कामं घरी बाबा करायचे. त्या डब्याना रंग देण्याच्या कामी मग मी, चाळीतले अन्य 2,3 दादा लोक मदत करायचे.
पुढं जरा परिस्थिती सुधारल्यावर घरकाम करणाऱ्या लीलाबाईचे मिस्टर रंगकामाला येऊ लागले. ते अगदी पुढची जवळपास 30,35 वर्षं कायमचे झाले. अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत.

पाटकर चाळ आणि शेजारची कामत चाळ असं मिळून 8,10 जणांची ती घरं. आमचे घरमालक पाटकर ही तिथंच राहायचे.
त्यांच्याकडे सागर हे रोजचं स्थानिक वृत्तपत्र यायचं आणि मग टेपरेकॉर्डरही आणला होता. याचं तेंव्हा खूप अप्रूप वाटे. मी 3 री चौथीत असेन. त्यावेळी काका पुलंच्या कथाकथनाच्या कॅसेट लावून ऐकत बसायचे. म्हैस, रावसाहेब, अंतू बरवा, पानवाला, हरितात्या, चितळे मास्तर हे तेंव्हा पहिल्यांदा कळले. आणि रोज रोज ऐकून ते सगळं पाठ ही झालेलं.
पलीकडच्या घरात केळकर काका राहायचे. अक्ख्या चाळीत तेंव्हा फ़क्त त्यांच्याकडेच " महाराष्ट्र टाइम्स " यायचा. लायब्ररी मधील पुस्तकं असायची. लहान असलो तरी त्यांनी कधी वावगं वागवलं नाही. वाचायला पेपर , पुस्तकं मागितली तर कधी नाही म्हटलं नाही. मी वाचत बसलेलो असताना कित्येकदा मात्र म्हणायचे, " जरा पायावर पाय दे रे. तू छान पाय दाबतोस. " मी उभं राहून त्यांच्या पायावर पाय देत रगडून देई. आणि पुन्हा पुस्तक उघडून वाचत बसे. त्यांच्याकडेच पॅनासॉनिक चा टू इन वन होता. संध्याकाळी ते घरासमोर कट्ट्यावर बसून 7 च्या बातम्या, इंग्रजी बातम्या, जुनी गाणी वगैरे ऐकत बसायचे. . आम्ही मुलं आसपास खेळताना लक्ष त्यांच्या रेडिओकडे असायचंच.
मात्र पुस्तकं किंवा सर्वात जास्त वाचन त्या काळात झालं ते चाळीतच राहणाऱ्या परांजपे काकांच्या घरी. परांजपे मॅडम आमच्याच शाळेत शिकवायच्या. अत्यंत कडक असा त्यांचा लौकिक. मात्र आमच्या तुकडीवर त्या कधीच नव्हत्या. शाळेत इतर मुलं मॅडम ना घाबरत असताना आम्ही चाळीतली मुलं मात्र त्यांना कधी फारसं घाबरलो नव्हतो. काका तर अतिशय शान्त आणि प्रेमळ व्यक्तिमत्व. मोठी लेक उत्तरा ताई ही अभ्यासू. आम्हा सगळ्यांना चाळीत तिच्यावरून सांगितलं जाई.. " बघ, ती उत्तरा कशी अभ्यास करत असते. किती शांत आहे. नाहीतर तुम्ही, सतत उनाडक्या आणि खेळ.. " असं आम्हाला घरी ऐकवलं जाई.

त्यांच्या घरी दोन्ही मुलांसाठी किशोर, इंद्रजाल कॉमिक्स, चांदोबा आदि मुलांसाठीची मासिके येत. एका कोपऱ्यात एका पत्र्याच्या खुर्चीत तासंतास बसून मी ते सगळं वाचून काढी. मधूनच कधी परांजपे काका किंवा मॅडम चकली, लाडू असं काही खायला देत. मात्र सगळं लक्ष पुस्तकातच असायचे. अनेकदा तो लाडू तसाच बाजूला असायचा. मग मॅडम म्हणायच्या, अरे पुस्तक कुठं पळून जात नाहीयेत. आधी खा आणि मग बस वाचत...

परांजपे काकांचा रवि आणि केळकरांचा मिलिंदा हे आमचे 'दोन दादा ' तिथले.
क्रिकेट, कबड्डी, भोज्या, लपाछपी खेळणे, पावसाळ्यात चाळीसमोर मोकळ्या उतरत्या जागेत वाहणाऱ्या लहान पाण्याच्या प्रवाहावर धरणे बांधणे, डिसेक्शन बॉक्स वापरून - बेडूक पकडून त्याची ऑपरेशन्स करणं, घरात रस्ते आखणे, त्यावरून पुठ्ठयाच्या बनवलेल्या गाड्या चालवत बसणे या सगळ्या खेळात त्यांची दादागिरी. ती दोघं जे म्हणतील ते सगळं आम्ही चिल्ली पिल्ली करायचो. नाहीतर दोघं बुकलायचे आम्हाला.
त्यांच्या शेजारच्या घरातील बिऱ्हाड मात्र कायम बदलत असायची. अरविंदेकर, पोलिसातले चोडणकर, सी ए शशिकांत काळे, " चिपळूण नागरी पतसंस्था" च्या माध्यमातून ज्यांनी भलं मोठं विश्व उभं केलंय ते चव्हाण काका, कात व्यापारातील मोठं नाव असलेले शिर्के काका हे सगळे इथं चाळीत काही काळ राहिलेले.

पाध्ये काका आणि वहिनी हे ही चाळीतलं अत्यंत प्रेमळ असं कुटुंब.
सकाळी, संध्याकाळी तंबाखूची मिश्री लावणाऱ्या पाध्ये काकांना गंमतीजमती करत राहायची, विनोदी बोलत, हसतमुख राहायची सवय. सतत एकतर ते सायकल वगैरे स्वच्छ करत बसलेले असायचे किंवा जुन्या नाटकातील पद गात असायचे. पेटीवर देखील त्यांचा हात सराईतपणे फिरायचा.

आमच्या शेजारच्या घरात देखील बीडीओ जाधव बाई, आणि आईला घाबरून राहत असलेली त्यांची मुलगी जयुताई, त्यांच्या आगे मागे आलेलं सहस्त्रबुद्धे कुटुंब, आमच्या वरच्या मजल्यावर रहाणाऱ्या भुते आजी, वणकुद्रे काका ही सगळीच माणसं मायाळू होती. आयुष्यात पहिलं आम्लेट भुते आजीनी खायला घातलेलं. त्या आम्लेट ला " अंड्याची पोळी " असं म्हणायच्या हेही उगीच लक्षात राहिलंय.

कधी कुणाच्यात भांडणे झालेलं फारसं आठवत नाही. मात्र केळकर वहिनी मिलिंददादावर रागवायच्या. त्यानं काहीतरी उपदव्याप केलेला असायचा किंवा भांडण. पण त्याला मारताना - ओरडताना त्यांनाच फिट यायची. सगळे त्यांच्याभोवती जमायचे. मिलिंद दादा मग जोरजोरात धावत सुटे. गावभर कुठंतरी धावत जाऊन तासाभरात परत येई. त्यावेळी मात्र त्याला कुणी ओरडत नसत. हे आम्हाला त्यावेळी फार वेगळं वाटायचं. आमच्या घरी बाबा ओरडायचे, मारायचेही.  मात्र शिक्षा म्हणजे जास्त करून घराबाहेर उभं करणं असे. रात्री 9 वाजेपर्यंत वगैरे मी बाहेर उभा असायचा. आमचं दार बंद असायचं. जयुताई, पाटकर वहिनी असं कुणीतरी मला गुपचूप घरात नेऊन खायला देत. लहान मुलाला असं कुणी उपाशी बाहेर ठेवतं काय असं म्हणून बाबांवर नाराजी दाखवत. मात्र बाबांसमोर सगळे चुपचाप. मला परत घरात आत घेईपर्यंत जयुताई माझ्यासोबत बसून राही.
चाळीत परांजपे काका, पाध्ये काका, पाटकर काका
असे सर्वजण बऱ्यापैकी प्रेमळ. त्यामुळे आमच्याच बाबांचा सर्वाना धाक वाटे.
त्यावेळी संध्याकाळी सगळ्या पोरांना गोळा करून त्यांना पाढे शिकवणे, विविध स्तोत्रे शिकवणे ही कामं बाबांची. त्यामुळे सगळी मुलं बाबांना थोडी घाबरूनच. गणपतीमध्यें रस्त्यावर पडद्यावरील सिनेमा दाखवले जात. मुख्यत: अमिताभ चे आणि मराठी सिनेमे असायचे. त्या सिनेमाला जायला ही आमच्या घरून परवानगी नसे. एखाद्या खास सिनेमाला जायचं असलं तरी कुणाला तरी आमच्यासाठी बाबांकडं येऊन विनवण्या कराव्या लागायच्या. मग जाता येई.

सगळ्यांच्या घरी साधी जेवणं असायची. त्यातही मुलं कधीही कुणाच्याही घरी जेवून येत. रविवारी काहीतरी वेगळं असायचं. मग तो वेगळा पदार्थ  एकमेकांना दिला जाई. मात्र ठराविक कुटुंबातच ही देवाण घेवाण होई.

चाळ आणि परिसर तसा स्वच्छ नीटनेटका असायचा.
पावसाळ्यानंतर परिसराची साफसफाई, सार्वजनिक संडासाची सर्वांकडून केली जाणारी नियमित सफाई, रोज अंगण झाडणं हे सगळं आपापल्या पद्धतीने आपापसात वाटलं जाई.
या अनेक कामात आम्हा मुलांचा सहभाग असायचाच.

मागच्या बाजूला अर्धवट मुजवलेली विहीर होती. तिथं कचरा टाकला जाई. कुणीतरी त्या विहिरीत जीव दिलाय, त्यांचं भूत आहे अशी कहाणी अधूनमधून कानी पडायची. मात्र दिवसा आणि रात्रीदेखील तिथं आसपास हिंडताना, खेळताना आम्हा मुलांना कधी भीती वाटली नाही.

घरोघरी दूधवाले अर्धा /एक लिटर दूध देत असत. त्यातच सगळ्यांचं भागायचं. प्रसंगी डेअरीच्या दुधाच्या बाटल्या आणायचं कामही आम्हा मुलांवर असायचं. मुलं आणि मुली असा फारसा भेदही आम्हाला कधी जाणवला नाही तिथं. आम्हा मुलांसोबतच पाध्ये, शिर्के यांच्या मुली सहज कबड्डी, क्रिकेट, लगोरी, भोज्या, डबा ऐसपैस असं सगळं खेळत असायच्या.

सणाच्या दिवसात काही फारसं वेगळं  नसायचं. दिवाळी, गणपती आणि होळी हेच मुख्यत: जरा विशेष दिवस. कुणाकडे पाहुणे आले तर तेही सर्वांच्या परिचयाचे असायचे.
सुख - दुःख सगळंच एका विशिष्ट शांतपणे अनुभवणे सुरु असायचं.

ऐन दिवाळीच्या दिवशी पहाटे पाटकर काकांचा झालेला अपघाती मृत्यू  मात्र आजदेखील आम्ही कुणी विसरू शकलो नाही. तेंव्हा मी 6वीत असेन आणि त्यांचा मुलगा व भाऊ चौथीत. त्यांच्यावर काय आभाळ तेंव्हा कोसळल असेल ते पुरतं उमगलं नव्हतं. आता जाणवते. त्यातूनही पाटकर वहिनी तेंव्हा खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुलाचं शिक्षण वगैरे सगळं एकटीने निभाऊन नेलं. आज जेंव्हा हे सगळं आठवतं तेंव्हा जाणवते की कोणताही बडेजाव न करता, किती नेटाने ही माणसं तेंव्हा जगत होती. लहानसहान गोष्टी देखील उपलब्ध नसताना किती शान्त सुखात जगत होती.

नंतर आमच्याही घरी लहानसा रेडिओ आला. रोज सकाळी आई रेडिओवरील गाणी ऐकत कामं करायची. मुंबई आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या " घनू वाजे घुणघुणा.. अमृताहूनी गोड... उठी उठी गोपाला.. " आदि स्वरांमुळे झोपेतून सकाळी जागे होताना वाटलेलं प्रसन्नपण आजही आठवतं. शाळेत जाताना 11 वाजता कानावर पडलेली, ती रेडिओवरच्या कामगार सभेतील गाणी आठवतात.

बाबांना प्राण्यांचं वेड. चाळीत सुरुवातीला फ़क्त आमच्या घरात मांजरे असायची. कुत्रे असायचे. मांजर आणि कुत्रा एकत्र बसलेलं पाहून अनेकांना आश्चर्य वाटायचं.
त्याहीपेक्षा बाबा त्यांच्याशी जे बोलायचे ते चाळीत जाम फेमस झालेलं. पिंकी डोनाल्ड, सुंदर, चंपाकली, खरबी अशी  मांजरांची विविध नावं तर ज्यूली, राणी, वाघ्या, राजू, मोती असे कुत्रे. ही सगळी बाबांच्या आसपास असायची. बाबा आम्हा मुलांशी बोलायचे त्यापेक्षा कितीतरी पट जास्त ते सतत या मंडळींशी बोलायचे..

" सुंदर, गाढवा कुठं उंडगून आलायस.. बघ ते अंग कसं मळलंय.. थांब, अंगावर उडया मारू नको.. देतो देतो दूध.. जरा धीर धर.. " असं काही बोक्याशी बोलणं असायचं.
" राणू बाई.., ये गं.. काय झालं तुला.. अशी का रुसून बसलीये. इथं जवळ ये बघू.. " असं काहीसं ऐकू गेल्यावर एकदा शेजारच्या वहिनी तर चक्क बघायला आलेल्या.. अहो नाईक काका, कोण आलंय, कुणाशी बोलताय.. वहिनी कुठंयत..? " मग जेंव्हा कळलं की हे असं बोक्याशी, भाटीशी, कुत्र्यांशी बोलत असतात तेंव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला...!

आम्ही गावी वगैरे गेल्यावर सगळं शांत असे. शेजारी कुणीतरी या मांजराना, कुत्र्याला खायला देत. ही मंडळी इतकी गुणी होती की आमच्याच घरात नव्हे तर इतरांच्या घरात देखील कधी चोरून दूध पिणं वगैरे प्रकार त्यांनी कधी केले नाहीत.

बाबा आले की पहिलं त्यांच्याशी बोलणं सुरु होई.. मग सगळ्यांना कळे की मंडळी आली गावाहून.  माणसांशी बोलणं त्यानंतर असायचं.

चार चाकी गाडी कुणाकडे ही नव्हती. शिर्के काकांचा काताची मालवाहतूक करणारा ट्रक म्हणजे काहीतरी भव्य दिव्य वाटायचं आम्हाला. बाबांकडे दर गुरुवारी  पुरुषानाना भागवत आणि चितळे अण्णा येत ते पुरुषानानांच्या दणकट आम्बासेडर गाडीतून.  सगळे स्वामी समर्थांच्या मठात जाऊन येत आणि त्यांनतर काहीतरी खास नाश्ता. तिघांच्या घरी आळीपाळीने असं काही खास नाश्त्याला बने. आम्ही त्याची वाट पाहत असायचो.
एक वेगळंच जिव्हाळ्याचं विश्व होतं ते.

काळाच्या ओघात बहुतेक सगळ्यांनी अन्य ठिकाणी आपापली घरं बांधली. रवी, पाध्येकाका, परांजपे मॅडम, माझी आई हेही आता देवाघरी... बाकीची ज्येष्ठ मंडळी पैलतीरी नजर लावून बसलीयत.

आम्ही या पिढीतले सारेही कुठंकुठं विखुरलं गेलोय. मात्र अजून ही बालपण म्हटलं की तिथल्या, त्या चाळीतल्याच असंख्य लहान मोठया गोष्टी आठवत राहतात. "836, पाटकर चाळ" हा पत्तादेखील अजूनही उगीच लक्षात राहिलाय.

खेळ, वाचन, रेडिओवरील जुनी गाणी, ते कामगार सभेसारखे कार्यक्रम, टेपरेकॉर्डरवर प्रथम ऐकलेले पु. ल., एकमेकांना सुखात, दुःखात सहज सहभागी करून घेणं, कोणतेही मोठे समारंभ, दिखावा न करता देखील एकमेकांचं मन जपणं आदि गोष्टीनी त्या वाढत्या वयात नवीन काही दिलं. जे त्यावेळी कळलं नव्हतं, मात्र नंतर जाणवत राहिलं.. अगदी आजपर्यन्त. सगळ्यांच्याच आयुष्यात अशा चाळी, असे शेजारी, असे दिवस कदाचित आले असतीलच. त्या जगण्यानं दिलेले संस्कार, त्या जाणीवा वेगळ्याच.
नकळत झालेल्या त्या संस्कारांनी आयुष्य किती समृद्ध झालं याची मोजदाद कशी करायची?
- सुधांशु नाईक, 9833299791
मुक्काम - सध्या कॅमेरून 🌿

Wednesday 26 October 2022

नदी

सहजच लिहिलेलं ..!
बरेच दिवस लेखनातून ब्रेक घेतलेला. यंदा या दीपावलीच्या आनंदक्षणातून ही एक नवीन लेखमाला.  आठवड्यातून किमान एक लेख द्यायचा प्रयत्न नक्कीच. अनेक विषय डोक्यात असतात. अनेक गोष्टी रोज जगताना दिसत राहतात. अनेक स्मरणं मनात जागा अडवून बसलेली असतात. त्यातलंच काहीतरी तुमच्यासाठी...

1. नदी
- सुधांशु नाईक.
नदी प्रथम कधी पाहिली किंवा लक्षात आली असं स्वतःलाच विचारलं. मेंदू मग आठवणींच्या बासनात शोधाशोध करू लागला. 2 आठवणी सापडल्या.
बहुदा 2 वर्षांचा असेन मी. का कसं ते आठवत नाही पण नृसिंहवाडी च्या मंदिराजवळचा घाट आठवतो. दुपारचं ऊन आठवतं,आणि मला धरून पाण्यात बुडवणारे काका आठवतात....!
ते माझे मोठे काका. ज्यांना आम्ही ' रांचींचे काका म्हणत असू, (त्यावेळी ते रांचीला नोकरीनिमित्त होते म्हणून असावं ) त्यांनी मला असं घट्ट धरून पाण्यात बुचकळायचा चंग बांधलेला. वरचं ऊन, पायाला लागलेलं थंडगार लालसर पाणी आणि रडून गोंधळ घालत असलेला मीं. काकांनी 2,4 वेळा समजावून मग शेवटी दणकण मला पाण्यात बुचकळलं.. नाका तोंडात पाणी गेलं.. जीव एकीकडे घुसमटला आणि दुसऱ्या क्षणी खूप खूप गार वाटलं. आजही अंगावर एक छान शिरशिरी उमटते हे आठवलं की.!

दुसरी आठवण ही पुन्हा एका दत्त क्षेत्राशीच संबंधित.
वय बहुदा 3,4 वर्षांचं

आमचे बाबा 1,2 वर्षातून कुठं तरी ट्रिप काढायचे. सोलापूर, उदगीर असं कुठंतरी आम्ही हिंडत असताना गाणगापूर ला पोचलेलो. कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो असू. प्रचंड उकडत होतं. मला उकाडा अजिबात सहन होत नाही. रडून ओरडून मीं बहुदा सगळ्यांना वैताग आणला असावा.. भीमा आणि अमरजा नदयांच्या संगमाजवळ गेल्यावर बाबांनी अक्षरशः त्या गुडघाभर पाण्यात मला फेकलं. पाण्यात पडताक्षणी अंगभर जो गारवा पसरला त्याचं सुख केवळ शब्दातीत. बहुदा त्याच दौऱ्यात नांदेड च्या गुरुद्वाराजवळ पाहिलेला विशाल गोदातीर देखील अस्पष्ट आठवतोय.

कित्येक देवस्थाने, अनेक डोंगर दऱ्या, दुर्ग असं सगळं गेल्या अनेक वर्षात पाहिलं. अगदी गंगा, यमुना, नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, भीमा, शरावती अशा किती नद्या पाहिल्या. त्यात डुंबलो. एक गोष्ट खरी की, कुठेही गेलो तरी आजही माझं पाण्यासाठी आसुसलेलं मन नदीच्या पात्राची वाट पाहत असतं.

माझ्या आयुष्यातील पाहिली 25 वर्षं चिपळूण रत्नागिरी परिसरातील. त्यामुळे शिव नदी, वाशिष्टी, गड नदी, शास्त्री, बाव नदी या नद्या नेहमीच दिसणाऱ्या. त्यात मनसोक्त पोहणं घडलंय. दरवर्षी पावसाळ्यात शिव नदीचं आणि वाशिष्टीचं पाणी गावात शिरणं हे तर घडायचंच. विविध चाळीत वगैरे असलेली तेंव्हाची आमची घरं किंवा नंतर झरीवरच स्वतःच घर हे कायम पुरापासून लांब असलं तरी पूर पाहायला जाण्यातलं अप्रूप खूप आठवतं.
लहानपणी पाणी प्रचंड आवडायचं. प्रवासात बसमधून जाताना सगळं लक्ष विविध नद्या कधी दिसतात याकडेच जास्त असायचं. कोयना, कृष्णा, पंचगंगा, हिरण्यकेशी, दूधगंगा, वेदगंगा या नद्या दरवर्षी सुट्टीत भेटायच्या. संकेश्वर जवळचा मामा, चिकोडीचे काका, सांगलीची मावशी, बिद्री बोरवड्याची किंवा गोकाक ची आत्या यांच्याकडे जाताना. प्रसंगी पाण्यात उतरणे ही व्हायचं.
मात्र पोहायला शिकलो त्याचं श्रेय चिपळूणचे आमचे तेंव्हाचे घरमालक सुरेश केतकर काका यांनाच.

बाबा, काका, इतर आते मामे भावंड उत्तम पोहणारी असली तरी पोहण्याची सुरुवात 6वी 7वीत असताना झाली.
दरवर्षी उन्हाळ्यात केतकर काका त्यांच्या मुलांसह  आम्हा दोघा भावांनाही गाडीतून घेऊन जात. सकाळी 6 वाजता वाशिष्टीचं पाणी गार असायचं. बाहेर उकडत असलं तरी पाण्यात शिरलं की मस्त वाटायचं. कसं ते माहीती नाही पण मी लगेच तरंगु लागलो होतो आणि पटकन पोहणं जमून गेलं.
तिथून मग जिथं जिथं गेलो तिथं नदीत पोहणं व्हायचंच.
मस्कत ला असताना, आमच्या बहावान कम्पनीच्या बाजूलाच एका वादीचे ( नदीला अरबी मध्यें वादी म्हणतात ) विशाल पण कोरडं पात्र आणि शेजारी ग्रँड मॉस्क. ऑफिस संपल्यावर तिथं शांत बसून राहणं बरं वाटायचं. या रिकाम्या पात्रात पाणी असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं.

2007 मध्ये ' गोनू ' नावाचं चक्रीवादळ तिथं येऊन धडकलं. त्या वादीमधून अफाट पाणी वाहून गेलं. 2 मजली ऑफिसचा खालचा मजला पूर्ण पुराच्या पाण्यात होता. सगळ्यांचे पासपोर्ट, महत्वाची कागदपत्रे सगळं नष्ट झालेलं. शहरात शेकडो कार वाहून गेल्या. अनेकांच्या घरात वेगाने पाणी घुसलं... आम्ही कित्येक दिवस सगळं मदतकार्य करत होतो. नदीच्या पुराची ही अजून एका आठवण कायमची होऊन गेली.

चिपळूणला अगदी 1980-81 पासून पूर पाहिलेले आठवतात. मात्र इतकी हानी होऊ शकते ते प्रथम कळलं 1988-89 च्या आसपास अंबा नदीचा महापूर , 2005 चा कोल्हापूर - सांगलीतील आणि 2007 मस्कत मधल्या त्या महापुरानंतर. जेंव्हा जांभूळपाड्यात अंबा नदीच्या पाण्याने धुमाकूळ घातला होता. तिथला पूर, मदतकार्य आणि रा. स्व. संघाने केलेली निरपेक्ष मदत याबाबत तेंव्हा व्हिडीओ पाहिलेला. मात्र जोवर आपण अनुभव घेत नाही तोवर बहुदा अक्कल येत नसावी आपल्याला. त्या आपत्तीमधलं गंभीरपण जाणवत नाही.
पुढं 2019 च्या कोल्हापूर मध्ये पंचगंगेच्या महापुरात तर आमचंच खूप नुकसान झालं. त्या परिस्थितीत देखील ज्यांचं सर्वस्व बुडाले अशा तीनशे - साडे तीनशे कुटुंबाना आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून काही मदत करू शकलो याचं समाधान वाटतं. खूप नुकसान झालं मात्र नदीविषयीचं आकर्षण कमी झालं नाही.

2020 मध्ये लायबेरिया आणि मग कॅमेरून या आफ्रिकन देशात आता असताना इथल्या नद्या ही पाहून झाल्या. इथली विशाल पात्रे, त्यांच्या आसपास ची अस्पर्श घनदाट जंगले हे सगळं मनाला स्तिमीत करून सोडतं.
विमानातून येताजाता जेंव्हा कॉंगो, नाईल ( ब्ल्यू आणि व्हाईट नाईल ही ) या नद्याची अति विशाल पात्रे पाहिली तेंव्हा नतमस्तक होऊन गेलो. या अशा नद्यांच्या तीरावर अनेक वस्त्या उभ्या राहिल्या असतील, कालौघात नष्ट झाल्या असतील... काही अवशेष फ़क्त इथं तिथं...
आता अमेझॉन पाहायची खूप इच्छा आहे.

संस्कारामुळे नदीला आपण माई, आई मानतो. पण खरंच आपण तसं मानतो काय हा प्रश्न स्वतःलाच अस्वस्थ करतो. आजकाल कोणत्याही गावोगावी गेलं की गटारगंगा बनलेली नदी दिसते. आपण माणूस बनून या नदीचा जीव घेतल्याची भावना विषणण करते.

जिकडे पाहावे तिकडे कारखान्यानी सोडलेलं दूषित पाणी, गावोगावच्या गटारातलं सांडपाणी खुलेआम नदीला बरबाद करत असतं आणि आपण फ़क्त स्वतःच्या तत्कालीन सुखात रममाण आहोत हेच जाणवतं.
रोज ज्या रस्त्यावरून ये जा करतो तिथलं नदीचे कळकट, उध्वस्त रूप सतत आक्रोशून विचारत राहतं, " तुम्हा लोकांना सतत पाणी दिलं, प्यायला दिलं, स्वच्छतेला दिलं...मग का रे आमचं पात्र असं नासवलत?"
अत्यंत अपराधी वाटतं. आपण जगायलाच नालायक आहोत असंच ठामपणे वाटत राहतं.

अनेक नद्या, नदीकिनारे पाहिले मात्र नर्मदा कुठंतरी मनात रुजून बसलीये. असं वाटतं की, शान्त संध्याकाळी वाहत्या नर्मदेकाठी बसावं.कसलीच मागणी नको नं कसलंच देणं नको, बस्स फ़क्त त्या चराचराचा एक क्षुद्र कण होऊन जावं कोणतीही ओळख मागं नं ठेवता...!
- सुधांशु नाईक (व्हाट्सअप नं - 9833299791)🌿