marathi blog vishwa

Tuesday 19 December 2017

‘थांग’च्या निमित्ताने...


# KIFF- कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये “थांग” (QUEST) हा अमोल पालेकर दिग्दर्शित चित्रपट दाखवला गेला. खरंतर हा २००६ ला बनलेला चित्रपट. हा विषय आता जुना झालाय. गेल्या दहा वर्षात जगात प्रचंड उलथापालथ झालीय. पण खरंच मानवी नातेसंबंध, ज्यांना विकृती मानलं गेलं असे संबंध आणि एकूण समाजातील परस्परांविषयीचा समंजसपणा याविषयी आजही अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. किंबहुना अधिक तीव्रतेने यापुढे आणि समोर येणार आहेत. 
लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या नव्या गोष्टी या दशकात वेगाने पुढे आल्या आहेत. त्यापेक्षाही वेगळंच जग भविष्यात असणार आहे. त्यांना सामोरे जायला आपण सारे तयार आहोत का असं प्रश्न मला पडला. त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर मनात अतिशय खळबळ माजली. आपलेच विचार पुन्हा तपासून पाहावेत असं वाटून गेलं. त्या खळबळीतून मग लिहायला घेतलं. 

हा चित्रपट मुळातच प्रौढांसाठीचा आहे, तेंव्हा लेखात त्या अनुषंगाने लिहिणं अपरिहार्य आहे. ज्यांना असलं काही वाचायची इच्छा नाही त्यांनी, तसेच संस्कृतीरक्षक मंडळीनीही हा लेख न वाचता टाकून दिला तर हरकत नाही. मात्र जर वाचला तर नंतर तुमचं मत जरूर मांडा, ते कुणाला आवडतं का नाही त्याचा विचार करत बसू नका. आपले विचार व्यक्त करता येणे हे महत्वाचं... 



थांग. संध्या गोखले यांनी लिहिलेल्या कथेवर आधारलेला. संध्याबाई आणि अमोल पालेकर या दांपत्याने २००६ मध्ये निर्माण केलेला हा चित्रपट. समलिंगी संबंध ही गोष्ट २००० पर्यंत उघडपणे चर्चिली न जाणारी. त्यानंतर आता होमो, लेस्बिअन हे सारं सर्वांनाच ठाऊक झालंय. त्यापुढील पायरी म्हणजे उभयलिंगी संबंध. जे या चित्रपटातून समोर येतात. खरंतर हा दहा वर्षापूर्वीचा चित्रपट नवं काही देतो असं आज म्हणता येत नाही. फक्त समाजातील विविध प्रश्नांवर नव्याने विचार करायला उद्युक्त मात्र करतो.

चित्रपटाची कथा थोडक्यात अशी;
ती आणि तो एक सुखी कुटुंब. सई आणि आदित्य. दोघेही मोठ्या पदावर काम करतायत. त्याचे वडील विचारी आहेत. तिची आई समजूतदार आहे. लग्नाला ११-१२ वर्षं झालीयेत. ७-८ वर्षांचा गुणी मुलगा आहे. ही पार्श्वभूमी. सिनेमाच्या सुरुवातीलाच घडलेला प्रसंग तिला धक्का देऊन जातो.
ती एकदिवस अचानक लवकर घरी येते. बेडरूममध्ये पहाते तर तिचा नवरा आणि त्या दोघांचा जुना, घनिष्ठ मित्र –उदय हे “लैंगिक संबंधा”त गुंतलेले.
ती नखशिखांत हादरते. ती वकील आहे. जग पाहिलंय तिनं. तरीही गेली दोन-अडीच वर्षं हे संबंध सुरु आहेत हे कळल्यावर जो जबरदस्त धक्का बसतो त्यामुळे अतिशय त्रागा करत राहते.
तिच्या नवऱ्याची अवस्थाही नाजूक. आपला मित्र गे आहे हे त्याला पूर्वी माहिती होतं. त्याने आयुष्यात प्रचंड दुःखं भोगली आहेत हेही माहिती असतं. हे तिघेही एकत्र कार्यक्रम करायचे. मात्र उदयचा पूर्वीचा पार्टनर परदेशी कायमचा निघून गेल्यावर आपण त्याच्या जागी कसे जाऊन पोचलो हे त्यालाही कळत नाही. एकाच वेळी आदित्यचं बायकोवर अतिशय प्रेम आहे आणि उदयवर देखील... तो कुणालाच तोडू शकत नाहीये... जोपर्यंत हे माहिती नव्हतं तोपर्यंत तो निश्चिंत होता आणि आता दोघांकडूनही नाकारलं जाणे त्याला झेपणारं नाहीये. तिला त्याचं हतबल होऊन जाणे समजते.
त्याला नेमकं कुणाबरोबर राहायचं आहे याचा निर्णय शांतपणे घेता यावा म्हणून ती त्याला मुक्त करते. आपल्यामुळे आपल्याच जिवलग मित्राचा संसार तुटतोय हे कळून तो मित्रही त्याला सोडून निघून जातो आणि आदित्यची फार हालत होते. समाजातील त्याच्यासोबत काम करणारी माणसेही त्याला फार वाईट वागवतात. त्याचा बॉससुद्धा त्याला घाणेरडे कृत्य करायला लावतो. मग तो देश सोडून दुसरीकडे जाऊन काम करू पाहतो.
या दरम्यान एक छोटी कथा घडते..एका एड्सग्रस्त माणसाच्या मुलाला त्याच्या शाळेनं बाहेर हाकलायचं ठरवलेलं असतं. त्या केसमध्ये सई लढते. अशा माणसाला उलट मदतीची गरज आहे, उपेक्षेची नव्हे हे ठामपणे सांगते. मुलाला न्याय मिळवून देते. मग तिलाप्रश्न पडतो की तिच्या आयुष्यात तिचं कृत्य चुकलं का? तिनं आदित्यला आधार दिला असता तर? त्याला मानसिक गोंधळातून बाहेर पडायला मदत केली असती तर... 
 याचवेळी परदेशी एकटा पडलेला तो- आदित्य तुटतो. आत्महत्येचा प्रयत्न करतो. त्याचे वडील त्याला त्यातून वाचवतात. तीही मदतीला पुन्हा धावून येते. त्यांचा मित्र उदय, आता एड्सग्रस्त संस्था स्थापन करून एक सकारात्मक काम करत असतो. सई त्याचा शोध घेते. त्याला भेटते. सगळं घडलेलं सांगते. आणि आपण दोघांनी उध्वस्त होऊ पाहणारे आदित्यचे आयुष्य सावरायला हवं असं सूचित करते.
शक्यतो या विषयावरील चित्रपट शोकात्म बनलेले असताना हा चित्रपट सकारात्मक शेवट सूचित करतो. प्रेक्षकांना पुढे काय घडलं, घडावं याबद्दल विचार करायला सोडून देतो....

मृणाल कुलकर्णी ही अफाट अभिनेत्री आहे, हे ती पुन्हा सईच्या भूमिकेतून सिद्ध करतेच. सोबतचे सर्व नामवंत कलाकार आपल्या पदरी पडलेली भूमिका पार पाडून दाखवतात. खरं तर सचिन खेडेकर, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी यांना फारसं कामच नाहीये. लेखिकेने त्यांना तुलनेनं किरकोळ रोल दिलेत. त्यांच्याऐवजी दुसरं कुणीही चाललं असतं असं वाटण्याइतपत. अपवाद विजया मेहता यांची भूमिका. विजयाबाईनी तिच्या आईची लहानशी भूमिका सुरेख उभी केलीय. त्यांना पहिल्यांदा जेंव्हा “हे” कळते तेंव्हा त्या अतिशय अस्वस्थ होतात. मनातील खळबळ चेहेऱ्यावर न दाखवायचा प्रयत्न करतात. चालत खिडकीपाशी जातात. म्हणतात, “ हिच्या वडिलांना एकदा मी विचारलेलं त्यांच्या बाहेरच्या नात्यांविषयी. ते ताड्कन म्हणालेले की खलाशाची प्रत्येक बंदरात एक बायको असतेच. कुणाकुणाचे हिशोब ठेवायचे...??” विजयाबाई हे सांगताना आणि आपल्यापेक्षा काहीतरी भयंकर पोरीच्या नशिबी आलंय हे कळल्यावर जो अभिनय करतात तो केवळ अद्वितीय...!’


सिनेमा तसा तुकड्यातुकड्यातून पुढे सरकत जातो. अनेकदा स्वतः काही भाष्य न करता प्रेक्षकांना विचार करायला मोकळं सोडतो. त्यामुळे सर्वांनाच तो भावत नाही. पटत नाही. सध्या अशा विषयावर चित्रपट आणला की प्रसिद्धी व पैसा मिळतो असंही वाटू शकते कित्येकांना. मात्र या चित्रपटाला दिलेली treetment पैसा मिळवण्यासाठी आहे असं मला वाटत नाही. सिनेमा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे विचार करा असंच सांगतो. आज विचार मांडणे, मतभेद समजून घेणे आणि समोरच्याला स्वीकारणे हे सारं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. २००६ मध्ये बनलेला सिनेमा आज मर्यादित वाटतो, कुचकामी मात्र वाटत नाही. तो पाहताना आज बदललेल्या अनेक गोष्टी मला विचारप्रवृत्त करून गेल्या....
आता पाहू या...
मला काय वाटतं ?
स्त्री-पुरुष संबंध, कुटुंब व्यवस्था, नात्यातल्या गुंतागुंती, मानवाचं विविध प्रसंगी असणारं वर्तन हे सारं मानसशास्त्राशी संबंधित. मला मानसशास्त्र या विषयाचं फार आकर्षण. त्यामुळे सहजच खूप वाचत गेलो. या लेखातील विषयापुरतेच बोलायचे तर “ भारतीय विवाह संस्थेचा इतिहास” या इतिहासाचार्य राजवाडे यांच्या संशोधनात्मक अफलातून पुस्तकापासून, abnormal psychology विषयावरील पुस्तकांपर्यंत विविध लोकांचं लेखन यानिमित्त वाचत गेलोय. शशांक सामक, शांता साठे, राजेंद्र बर्वे, आनंद नाडकर्णी या मंडळींनी या क्षेत्रात महाराष्ट्रात उदंड काम केलं आहे. तरीही हा विषय आपल्याला पुरता आकळला आहे का हा प्रश्नच आहे. २००२ ते २००५ आम्ही “तरुण भारत” कोल्हापूरच्या “स्त्रीविषयक पुरवणी” च्या माध्यमातून विविध लेख, मेळावे, व्याख्यानं आदि स्त्री-जागृतीसाठीचे उपक्रम करत होतो. तेंव्हापासून आजपर्यंत परिस्थिती फार बदललीय असं मात्र वाटत नाही.
नुकतंच २०१६ मध्ये लोकसत्ता पुरवणीत “स्त्री- आणि पुरुष” अनेक प्रसंगी वेगवेगळे का वागतात, लैंगिक संबंध आणि वर्तन  आदिविषयी २०१६ मध्ये डॉ. शशांक सामक यांनी लिहिलेली “ कामस्वास्थ” ही लेखमाला विशेष लक्षात राहिलेली. ती सर्वांनी पुनःपुन्हा वाचायला हवी. खरंतर या नाजूक विषयावर भारतीय प्राचीन संस्कृतीतील ग्रंथानइतक्या मोकळेपणाने अन्य कुणी यावर गेल्या काही शतकांपर्यंत लिहिलं नव्हतं. १९ व्या शतकात पाश्चात्य संशोधक पुढे सरसावले. सिग्मंत फ़्रोइड, जॉन्सन आदिनी मग उदंड काम केलं. आपण आजचे भारतीय मात्र या विषयाबद्दल अजूनही बरेच अनभिज्ञ आहोत, आपापले पूर्वग्रह जपणारे आहोत. “सेक्स” हा शब्दसुद्धा सहजपणे उच्चारणं आपल्याला जमत नाही. त्यापुढील गोष्टी तर दूर की बात.
---
मी जंगलात हिंडणारा. प्राणी-पक्षांच्यावर प्रेम करणारा. त्यामुळे प्राणी, पक्षी यांचं कामजीवनही सहज पाहिलेलं. त्यामुळे मग प्राणी-माणूस यांच्यातील तुलनाही केली. प्राणी कधी बलात्कार करत नाहीत असं ठासून यापूर्वी बोललो देखील होतो. ते खरं असलं तरी म्हणून माणूस असं का वागतो याचं उत्तर मात्र मिळत नाही.
आजकाल पूर्वीपेक्षा माणसे मोकळी देखील झाली आहेत. किमान लहान ग्रुपमधून चर्चा करू लागली आहेत. त्यात तंत्रज्ञान प्रगत झालंय. अनेक गोष्टी एका क्लिकवर आता आपल्याला दिसतात. त्या योग्य असतात की अयोग्य हा भाग वेगळा. मात्र त्या आपल्या मनावर परिणाम करणाऱ्या जरूर असतात. हे सर्व टाळता न येणारं आहे. मग आपलं मन कसं ताब्यात ठेवायचं हा भाग महत्वाचा बनू लागतो. प्राण्यांचा मेंदू आणि आपला मेंदू यात हा फरक असावा. मादी मिळावी म्हणून नर परस्परांत भांडतात. प्रसंगी जीव देखील घेतात. मात्र मादीवर शक्यतो बलात्कार करत नाहीत. (बलात्कार प्राण्यांच्यातही क्वचित घडतात, त्याची कारणंही वेगळी असतात.).
प्राणी मादीशी अनैसर्गिक संबंध ठेवत नाहीत. विकृतपणे कामेच्छा भागवून घेत नाहीत. पैसा, प्रतिष्ठा असे लोभ त्यांना नसतात. त्यामुळे हुंडाबळी, ऑनर किलिंग सारखे प्रकार करत नाहीत. त्याचवेळी अनेकदा माघार घेतलेला नर पुन्हा त्या दोघांच्या समागमात अडसर आणत नाही. तो कट-कारस्थान करून मादीला बळकावत नाही. तिला तिच्या मर्जीने जाऊ देतो.
मात्र माणूस असं वागत नाही. का वागत नाही? फक्त सेक्स नव्हे तर अन्य गोष्टीबाबतही माणूस अनेकदा अनाकलनीय वर्तन करतो. त्यावेळी तो पद, प्रतिष्ठा, परंपरा, कुटुंब असा कोणताही विचार करत नाही. कधी ती बाई असते तर कधी पुरुष. हे असं का घडतं हे शोधू गेलं की समोर येतात मेंदूतील केमिकल लोचे. विविध ग्रंथीतून स्त्रवणारी संप्रेरके आपल्याला असं काही करायला भाग पाडतात. सामान्यतः आपण “आपल्या दृष्टीने वाईट वागलेल्या” माणसाला शिव्याशाप देतो. ओरडतो, मारतो, संबंध तोडून टाकतो. वर म्हणतोही हा किती नरपशू आहे..!! पण पशू असे नसतात हे कळतच नाही.
अगदी आदिवासी समाजात देखील अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा आहेत. मात्र बहुतेकदा तिथे समलैंगिकता का दिसून येत नाही? हाही प्रश्न मला अस्वस्थ करतो. (माझ्या वाचनात आदिवासींच्या जीवनात असं काही असल्याचे आढळलेले नाही.)
मात्र कैदी, सैनिक अशा लोकांमध्ये समलिंगी संबंध घडल्याचे अनेकदा वाचायला पूर्वी मिळाले आहे. थोडक्यात जिथे नेहमीसारख्या स्त्री-पुरुष संबंधांची शक्यता नाही तिथे असं घडणं समजून घेता येतं. मात्र कामभावना तृप्तीचे सगळे नेहमीचे मार्ग उपलब्ध असताना माणूस (स्त्री आणि पुरुषही) का असं वेगळंच वागतो हा प्रश्न पडतो मला. तसा तो अनेकांना बहुदा पडत असावा. म्हणूनच या सगळ्याच्या मुळाशी जाणारे संशोधन अनेक वर्षं सुरु आहे पण तरीही सर्वमान्य असे कोणतेही ठोकताळे बांधता आले नाहीत.
या सिनेमातील सिच्युएशन विचारात घेतली तर, सुखी कुटुंब आहे. अगदी त्यांचे शारीरिक संबंध देखील सुखाचे आहेत तरीही त्या माणसाला एका पुरुषाचं आकर्षण का वाटतं ?? हा मूळ प्रश्न आहे. तो अस्वस्थ करणारा आहे. विवाहित स्त्रीला परपुरुषाचे किंवा पुरुषाला अन्य स्त्रीचे आकर्षण वाटणे, त्यांचे संबंध असणे ही गोष्ट एकेकाळी सहज स्वीकारली गेलेली. नंतर त्यावर बंदी आणली गेली. विविध नियमात लैंगिकता बांधली गेली. तर आता कुठे लोक हल्ली कुचकुचत का होईना जोडीदाराचे असे संबंध स्वीकारू लागलेत. शहरांपेक्षा गावागावातून पतीच्या बाहेरख्यालीपणाचा असा स्वीकार (acceptance) जास्त सहजपणे झालेला दिसतो. तसं स्त्रीच्या बाबत मात्र घडत नाही. तिलाच बदफैली ठरवायची समाज घाई करतो.
प्रश्न शिक्षेचा नाही, स्वीकार किंवा अस्वीकार करण्याचा नाही तर ते आकर्षण मुळात का वाटतं हा आहे. याचा धांडोळा घेतला तर मेंदूतील केमिकल लोचे, नर-मादीच्या आदिम भावना सामोऱ्या येतात.
समोर स्त्री पाहिली की तिच्या विशिष्ट अवयवांकडे पुरुषांचं सर्वप्रथम लक्ष जाणं हे स्वाभाविकच असतं कारण त्याच्या मेंदूची रचनाच तशी असते. स्त्री मात्र असा विचार नेहमीच करत नाही. समोर आलेल्या पुरुषातील अन्य क्वालिटी ती पहाते. पुरुषांचं प्रथम वर्तन जरी एकवेळ मान्य केलं तरी दिसेल ती स्त्री आपल्यासोबत बेडवर आलीच पाहिजे हा अनेकांना वाटणारा विचार आणि त्यासाठी घडणारी बलात्कारासारखी कृती हा मात्र अत्यंत चुकीचा मार्ग आहे. तिथे समस्या आहे.
तो विचार मेंदूत कसा येऊन बसला याचा मागोवा घेतला तर मग आपण संगोपन, संस्कार, आजूबाजूची परिस्थिती आदि मुद्द्यांकडे येऊन पोचतो. घरातले, शेजारचे लोक एखाद्या परस्त्रीकडे कोणत्या नजरेने पाहतात हे जेंव्हा लहान मूल / युवक  आजूबाजूला पहात असतो तेंव्हा ते तसा विचार करायला प्रवृत्त होऊ शकतात. तसेच सर्व काही ठीक असताना नंतरच्या आयुष्यात त्याच्या लैंगिक जाणीवा सकारण-अकारण दडपल्या गेल्या असतील तर तो विकृत विचाराला प्रवृत्त होऊ शकतो. मुळात स्त्रीवर लैंगिक अत्याचार करणं हा तिच्यावर अधिकार गाजवण्याचा एक भाग असतो. तसं पाहायला गेलं तर पुरुष हा लैंगिक संबंधाबाबत परावलंबी आहे. स्त्री त्याला सहज प्रतिसाद देईल असं टेक्निकली होत नाही. त्याने तिचा अनुनय करणे, तिला फुलवत नेणे अपेक्षित असते. मात्र वर्षानुवर्षे झालेल्या संस्कारामुळे स्त्रीचा अनुनय करणं त्याला मानहानीकारक वाटतं. “मी म्हणतो तसं आणि तेच तू केलं पाहिजे” या पुरुषप्रधान मानसिकतेमुळे सगळीच गोची होऊन जाते. आणि म्हणून मुलींना स्व-संरक्षण, लैंगिक शिक्षण देण्यापेक्षा मुलांना “स्त्री सोबत कसं वागले पाहिजे?” याचं शिक्षण देण्याची आता गरज आहे.
सामान्य स्त्री-पुरुष संबंधातच इतक्या समस्या आहेत की त्यावेगळया गोष्टींबाबत बोलणं मग बाजूला पडते नेहमी.
मुळात विवाहित स्त्री आणि पुरुषातील संबंध हीसुद्धा आपल्यासाठी फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. विविध सर्वेक्षणांचे निष्कर्ष, महिला दक्षता समिती, स्त्री सहायक संघटना यांच्यासमोर इतक्या घृणास्पद गोष्टी येतात की आपली तर मतीच गुंग होऊन जाते. मध्यंतरी एक घटना अशीच घडलेली की, एका पतीने रागाच्या भरात एक झाडू पत्नीच्या गुप्तांगात घातला. ती त्यातून शेवटी मेलीच. काय सोसलं असेल तिनं? पण तरीही तिनं सुरुवातीला तक्रार दाखल केली नाही. हे ऐकलं की मन थरकापून उठतं.
कित्येकदा लग्नाच्या बायका देखील त्यांच्या इच्छेविरुद्ध नवऱ्याकडूनच भोगल्या जातात. त्यांनी याविरुध्द ब्र उच्चारला की जवळच्या, वयाने ज्येष्ठ बायका देखील त्यांना “नवरा आहे बाई...सगळं सगळं सहन करायचं..” असं सांगून गप्प करतात...! मुळात सेक्स आणि त्यातून मिळणारं समाधान ही मेंदूत घडणारी घटना आहे, आपली इंद्रिये ही केवळ एक टूल / साधन आहेत हेच लोकांना कळत नाही. म्हणूनच मग विविध तेलांच्या जाहिराती, जास्त वेळ संबंध ठेवता यावीत म्हणून संप्रेरके असं काही न काही बाजारात येत जातं. खपवलं जातं. दोन माणसांची मने जुळली की शरीर जुळणं ही सहज घडलेली प्रक्रिया असायला हवी हेच लोकांना उमगत नाही. त्या जुळण्यासाठी कोणतंही बंधन असता कामा नये हे जितकं खरं तितकंच विकत घेऊन किंवा जबरदस्तीने संबंध घडता कामा नये हे देखील खरं. लग्न करून दिलं की आपली जबाबदारी संपली असं मानणारी आपली संस्कृती जितकी याबाबत वरवर पहाते तितकंच स्त्री म्हणजे एक भोगवस्तू हेही पुनःपुन्हा ठासून सांगत राहते.
त्यामुळे समलैंगिक संबंध हा त्यानंतरचा भाग मग अधिकच गुंतागुंतीचा बनतो.
समलैंगिकता किंवा अन्य प्रकार हे विकृती मानावेत का याविषयी बरंच चर्चा-चर्वण समाजात होत आहे. “ह्या घाणेरड्या विषयावर बोलता तरी कसं हो??” इथपासून विषय टाळण्याकडे झुकणारा समाज आता चर्चा, संमेलन, मोर्चे, चित्रपट, पुस्तकं या द्वारे किमान व्यक्त होऊ पाहतोय, बोललेलं ऐकायचा प्रयत्न करतोय  हे एक चांगलं लक्षण म्हणायला हवं का?. मुळात जगभरातील सर्व जाती-धर्माच्या, परंपरेच्या लोकांमध्ये सामान्य स्त्री-पुरुष संबंधाव्यातिरिक्त अन्य संबंध असतात / होते  हे आता जगमान्य आहे. ते तसे असावेत का? हा संघर्षाचा मुद्दा आहे.

मुंबईच्या ट्रेन मध्ये लहान मुलांना कुरवाळणारी, अन्य पुरुषांच्याच अंगचटीला जाणारी काही सामान्य माणसं मी पाहिलेली. एकाला तर लोकानी पकडून पोलिसाकडे दिलं. सगळे शिव्या देत असताना पोलिसांनी त्याला स्टेशनवर खूप मारलेलं. कुठल्यातरी ऑफिसमधला तो साधा कारकून असावा. कसं असेल त्याचं खाजगी जीवन? त्याच्या नैसर्गिक कामभावनांची तो का घरी तृप्ती करू शकला नसेल? मग वेश्यागमन करण्याऐवजी असे विकृत चाळे का गुपचूप करत असेल? असे प्रश्न मनात निर्माण झालेले. ते कुणाला विचारायचं धाडस तेंव्हा नव्हतं. आताही अशा गोष्टीवर कुणाशी आपण चर्चा करू शकतो?? असेच  अन्य काही जण पाहिलेले. त्यात अविवाहित होते पण नीट संसार असणारेदेखील होते. अविवाहित माणसाची, पौगंडावस्थेतील मुलांची कुचंबणा एकवेळ समजून घेता येईल. पण विवाहित माणूस असं कसं वागू शकतो हे पाहून धक्का बसलेला तेंव्हा.
आता जाणवतंय की अनेक गोष्टी खरंच आपल्या हातात नसतात. आपला मेंदू एखाद्या क्षणी फार वेगळा वागू शकतो याची आपल्याला कल्पना असायला हवी. ती आपण केलेली नसते. आपल्या मेंदूनं कसं वागावं याचं कितीही शिक्षण आपण दिलं तरी काही आडाखे बांधणे इतकंच आपण करू शकतो. जेंव्हा घटना समोर येते तेंव्हा आकांडतांडव करणं, मारहाण करणं अशी जी प्रतिक्रिया दिली जाते ती चुकीची असते. अशा प्रसंगी आवश्यक असतं समुपदेशन. अत्यंत तज्ञ व्यक्तीने शांतपणे केलेलं. ते मात्र आपण करत नाही. अनेकदा हे प्रसंग भल्यामोठ्या पहाडासारखे समोर उभे ठाकतात आणि आपली मतीच गुंग होऊन जाते. आपण त्यात अधिक कोलमडत जातो.
मुळात चूक काय आणि बरोबर काय हे नेहमी आपण आपल्या सोयीने ठरवत असतो असं मला वाटतं. कधी ती वैयक्तिक सोय असते, कधी कौटुंबिक तर कधी सामाजिक. मात्र “त्या” व्यक्तीला काय वाटतं याचकडे आपण दुर्लक्ष करतो. खरंतर तिचं मत हे प्राधान्यक्रमात असलं पाहिजे. एखाद्या मुलीला एखाद्या घरी नांदायचं नाहीये तरी तिला तिथेच जबरदस्तीने ठेवणं हे जितकं अनावश्यक आहे तितकंच एखाद्या मुलीला तिच्या मित्रासोबतची मैत्री जपू देणं, अगदी शरीरसंबंध ठेऊ देणं आवश्यक आहे. त्या मुलीला जे वाटतं ते तिला करता यायला हवं. ते चूक आहे का बरोबर हे तिला आज नाही तर उद्या उमगेल. तेंव्हा तिचे निर्णय तिला घेऊ देत. मात्र आपण असं करत नाही.
लहान वयापासून सतत आपण मुलांना “हे कर/ हे करू नको..” असंच शिकवत जातो. तिथून चुकांची मालिका सुरु होते. अगदी लग्नानंतर एकत्र राहणाऱ्या जोडप्यातील किती नवरे स्त्रीच्या संमतीनंतर समागम करतात? त्या समागमानंतर कितीजण स्त्रीला “सुख” मिळालं का याचा विचार करतात. तिच्याशी हळुवार संवाद साधतात?? मला वाटतं काही मोजकीच माणसं असं करत असतील. आपली वासना भागली की बास अशीच आपली पुरुषी मानसिकता. शेकडो वर्षांपासूनची.
एका बाईला देखील माणूस म्हणून जाणीवा आहेत याचाच आजदेखील आपण विचार करणार नसू तर आपण प्रगत झालो असं कसं म्हणायचं? हातात मोबाईल आले, हाय क्वालिटीच्या पोर्न फिल्म पाहता येऊ लागल्या, अनेक नवनवीन साधनं वापरता यायला लागली म्हणजे प्रगती समजायची का? याच लेखात वर म्हटलं तसं, आपण पुन्हा एकदा लैंगिक संबंध हे “विशिष्ट अवयवांपुरते” असतात हेच तर गृहीत धरतोय की मग. मेंदूतली सुखद संवेदना कुठं राहिली मग?? परस्परपूरक सुखद संबंधांचा कधी विचार करणार आपण? त्यात पुन्हा अनेक चुकीच्या गोष्टी सतत मीडियातून पाहून “स्त्रीला असंच वाटत असणार”, “हे असं केलं की तिला चालतं” वगैरे चुकीचे ठोकताळे वर्षानुवर्षे आपण उराशी धरून बसलोयच. हे कधी बदलणार?
आपण प्रगत न होता उलट मागास होत तर नाही ना चाललोय? अशी भीती मग वाटू लागते.
मुळात स्त्री चूक की बरोबर, भिन्नलिंगी आकर्षण हेच उत्तम असं ठोक विचार यापुढे करून चालणार नाहीये. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकाची समस्या / वर्तन वेगळंच असू शकतं हे आता समजून घ्यायला हवं. त्या व्यक्तीला निरोगी जगता यायला हवं, त्याच्या वर्तनातून समाजाला त्रास होणार नसेल तर त्याला जसं वाटेल तसं जगता यायला हवं हे महत्वाचे आहे.
आज जगातल्या केवळ ८६ देशात समलैंगिकता आणि अन्य गोष्टी स्वीकारल्या गेल्या नाहीयेत. त्यात आपण आहोतच. मात्र उर्वरित जग केंव्हाच पुढच्या नियोजनाला लागलंय. मुक्त वातावरणामुळे लोक आता किमान व्यक्त होऊ शकतील. ते स्वातंत्र्य त्यांना आणि महिलांना गेल्या हजार वर्षात नव्हतंच. विविध आरोग्य सुविधा, समुपदेशन सुविधा, दडपणरहित जीवन अशा साठी काम करू लागलेत. सध्याची कुटुंबव्यवस्था हा भाग तर हळूहळू सर्वत्र इतिहासजमाच होत राहील असं वाटतं. त्याऐवजी विविध लहान कम्युनिटीज तयार होतील. आपल्याला जिथं सुखी, सुरक्षित वाटतं तिथं एकत्र येण्याची मानसिकता वाढेल. जात-धर्म-पंथ-प्रांत आदि वर आधारित कम्युनिटीज तिथं असतीलच पण एक-पालकत्व निभावणारे, लिव-इन-रिलेशनशिप वाले, समलैंगिक, उभयलिंगी, अखंड ब्रह्मचारी राहणारे अशा विविध ग्रुपमधून समाज पुढे सरकत राहील. माणूस नव्या वाटा शोधत राहील. कधी चुकेल कधी पुढे जाईल.
हा सगळा काळ ताण-तणावाचाच असणार आहे. त्यामुळेच मानसशास्त्रातील विविध शाखांवर नवे संशोधन करावे लागेल. नवे परिणाम समोर आले तर त्यानुसार बदल करून घ्यावे लागतील. अभ्यासपूर्ण समुपदेशन अल्प खर्चात उपलब्ध करून द्यावं लागेल. त्यामुळे वर्तनसमस्यांकडे वैज्ञानिकदृष्ट्या पाहता येईल.
भारतीय जीवनशैलीतील त्रुटींमुळे अर्थातच त्रास भोगण्यात पुन्हा महिलाच केंद्रस्थानी येऊ शकतात. त्यासाठी तसेच भिन्न वर्तनशैलीमुळे स्त्रीचे शोषण होऊ नये यासाठी जास्त काम करावे लागणार आहे.
तुम्ही होमो आहात, लेस्बो आहात की बाय सेक्सुअल हा भाग तुमच्या बेडरूमपुरता उरला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा, कुणाचही शोषण करून भागवत नसाल तर ते समाजानेही स्वीकारायला हवं.  तुमच्या आवडीनिवडीचा समाज चालत राहण्यावर परिणाम होता कामा नये हे स्वीकारायला हवं. एकेकाळी अनेकजण जे स्वतःला कोसत असतील, आपण विकृत आहोत असं समजत असतील, त्यांचे गुण बाजूला ठेवून जर जीवन व्यतित केलं असेल तर त्यांना आता मोकळेपणाने समोर येता येईल. आपली करियरची स्वप्नं पूर्ण करायला धडपडता येईल.
काहीच चूक नसतं आणि काहीच बरोबर नसतं. प्राप्त परिस्थितीनुसार अनेक गोष्टी बदलत राहतात. भूक, झोप, भय, मैथुन, लोभ, मोह, मत्सर ह्या भावना आपल्यासोबत जन्मजात असतातच. त्यांचा अतिरेक वाईट असतो. हे जसं आपल्याला आता कळू लागलंय तसंच कामप्रेरणा हीही मनुष्यागणीक वेगवेगळी असणार याचा स्वीकार करायला हवा. जबरदस्तीने संबंध न ठेवता आपापली भूक कुणी भागवत असेल तर त्याला अटकाव करणे, त्याचा निषेध करणे, त्याला वाळीत टाकणे हे आपण करू नये असं मला वाटतं.
आपण कितीही मुखवटे घेतले तरी त्याला “ती” हवी आणि तिला “तो” हवा हेच वैश्विक सत्य आहे. ९० टक्के माणसं परस्परांशी एकनिष्ठ राहतीलही. त्यांनी राहावं देखील. त्याचा आनंद आहेच. त्यांनी परस्परांना समजून घेत उत्तम सहजीवनाची मजा जरूर लुटावी. मात्र जर एखादा किंवा एखादी वेगळी वागत असेल तर अशी ती उरलेली मंडळी संपवून टाकली पाहिजेत असं बाकीच्यांना वाटता कामा नये. त्यांना त्यांची स्पेस मिळायला हवी.
 त्याला अपेक्षित असणारी “ती” जर त्याला “मित्राच्यात” सापडत असेल, किंवा तिला हवं असलेलं सुख “त्याच्याकडून” मिळत नसेल, आणि म्हणून त्यांनी आपापले मार्ग स्वीकारले तर त्यांना रोखणारा मी कोण हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. स्वतःला नैतिक पोलीस समजत राहू नये असं मला वाटतं.

“ जो जे वांछील तो ते लाहो...” असं जगता आले तर विश्व सुखी होईल. विशिष्ट बंधनं यापुढे कुणावरही लादली जाता कामा नयेत. मात्र त्याचवेळी प्रत्येक नागरिकाला स्वतःचे मन जपणे अत्यावश्यक ठरेल. आणि इथे पुन्हा आपल्या प्राचीन परंपरेतील “मुक्तता” मदतीला येईल. “अचपळ मन माझे, नावरे आवरीता...” असं म्हणणारे समर्थ रामदास आणि त्यांच्यासारखे विविध गुरुजन मानसशास्त्राच्या अंगाने पुन्हा नव्याने अभ्यासावे लागतील. विविध उपायांद्वारे आपल्या मनावर आपणच अंकुश ठेऊ शकलो तर आणि तरच समाज म्हणून मानवाची प्रगती होऊ शकेल. त्यातून कदाचित अशी नाती हळूहळू कमी देखील होत जातील किंवा वाढतीलही. नेमकं सांगता येत नाही. मात्र कोणतही नातं हे मुक्त असावं पण शोषण करणारं नसावं. नुसती मुक्त व्यवस्था हेही उत्तम समाजाचं प्रतिक असू शकत नाही तर “शोषणमुक्त” व्यवस्था हे समाजाचं वैशिष्ट्य बनायला हवं.
निकोप आणि शोषणमुक्त लैंगिक संबंध हा आणि हा त्याचा बेस ठरणार आहे. शतकानुशतके/ वर्षानुवर्षे आपल्या मनात / समाजात दडपून ठेवलेलं वर उफाळून येताना काहीजणांना त्याचा चटका नक्कीच बसेल. ती ज्वाला कुणाच्या घरातून उठेल हेही सांगता येणार नाही. मात्र ती उठली तर आपण कसं वागायला हवं हे प्रत्येकाला आता ठरवावं लागेल. भविष्यात आपल्या घरात, शेजारीपाजारी, परिचितांच्या घरात सर्वमान्य नसणारं काही नक्कीच घडू शकतं. त्याची धग आपल्यालाही लागू शकते. मात्र एखाद्याचं कोंडलेलं विश्व मुक्त होतं असेल तर ती धग सोसायला हवी. मला असं वाटतं...
तुम्हाला??
-सुधांशु नाईक, कोल्हापूर. ( ९८३३२९९७९१).

Wednesday 30 August 2017

सह्याद्रीतील अनोखी प्रयोगभूमी

🍂
भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच  मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

कोयना ते चिपळूण हा घाटमाथा ते पायथ्यापर्यंतचा प्रवास डोळ्यांना नेहमीच अवर्णनीय सुख देत रहातो. त्यात पावसाळ्यातले दिवस म्हणजे सगळीकडे घनदाट हिरवाई. एक कुंभार्ली घाटाची वाट व किरकोळ रस्ते सोडले तर सारं काही झाडी झुडुपात दडून गेलेलं असतं.

घाटाची दहाबारा वळणं ओलांडत खाली उतरलं की हवेतला गच्च दमटपणा लगेच जाणवू लागतोच.
घाट संपवून खाली उतरल्यानंतर जरा गाडी बाजूला थांबवून मागे पाहिलं की दिसते सह्याद्रीची उभी कातळभिंत. माथ्यावरचा जंगली जयगड धुक्यातून मधूनच डोकावतो. काही विशिष्ट ठिकाणाहून जर धुकं नसेल वासोटा, नागेश्वर, चकदेव आदि गिरीशिखरं अधूनमधून दर्शन देतात.

या सगळ्या पर्वतरांगा, त्यांच्या खालपर्यंत उतरलेल्या सोंडा व त्यातल्या द-याखो-यात इथली खरी स्थानिक प्रजा अनेक दशकं रहातेय. तीही लहानसहान झोपडी किंवा झापांतून.

ते आहेत गवळी- धनगर आणि कातकरी.

प्राचीन काळी कधीतरी घाटवाटांच्या संरक्षणासाठी, व्यापारी तांड्याना मदत करताना ही मंडळी इथं स्थिरावली. कोणत्याही शहरी सुविधांचा फारसा लाभ यांच्या अनेक पिढ्यांना फारसा कधीच लाभला नाही. इथं मुलं जन्माला येत राहिली, गुरंढोरं व वन्य प्राण्यांच्या साथीनं जगत मरत राहिली. क्वचित कुणी शिक्षणाची वाट चालू लागला तर दारिद्र्यानं त्याची पाऊलं रोखली.


इथल्या मुलांचं शिक्षण हाच मुख्य विषय डोक्यात ठेवून मग " श्रमिक सहयोग" या संघटनेचं काम सुरु झालं. राष्ट्र सेवादलाचे संस्कार रक्तात भिनवलेली ही मंडळी. सानेगुरुजी, एस एम जोशी, ना. ग. गोरे, प्रधान सर आदि मंडळींचं शिक्षणविषयक तत्वज्ञान " साधना"तून व अन्य प्रकारे तनामनात झिरपलेलं होतंच. त्याला आता अनुभवाची जोड मिळू लागली.

भारतातलं सामाजिक व भौगोलिक वैविध्य इतकं आहे की एका ठिकाणी यशस्वी झालेला प्रयोग दुसरीकडे राबवता येईलच याची शाश्वती नाही व राबवलाच तर यशस्वी होईल याची खात्री नाही. हे अन्य कार्यकर्त्यांप्रमाणेच याही मंडळींना ठाऊक होतं. त्यामुळे आपल्या अडचणींवर आपणच उपाय शोधत पुढे जायचं तत्व अनुसरुन कामाला सुरुवात झाली. त्यातूनच एक नवी प्रयोगभूमी लवकरच निर्माण होणार होती..!

संस्थेच्या उभारणीत सुमारे तीस वर्षांपूर्वी सहभागी असलेल्या राजन इंदुलकर यांच्याशी बोलताना मग हा सारा इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहू लागतो.

आजही कोळकेवाडी, ओमळी, अडरे, अनारी, तिवरे, कळकवणे, धामणंद, चोरवणे या सा-या पट्ट्यात वाहतुकीची मर्यादित साधनं उपलब्ध आहेत मग 30 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी.

जिथं रोजचं तेल मीठ आणायलाही कित्येक मैल चालून जावं लागे, कुणाच्या घरी, शेतात दिवसभर  गड्यासारखं राबावं लागे तेव्हा कुठे दोन चार दिवस पोट भरेल इतके तांदूळ मिळत. रानातलंच काहीतरी शिजवून खायचं याचीही पोटाला सवय झालेली.

रोज जगणं व पोट भरणं हेच इतकं संघर्षपूर्ण होतं की शिक्षणबिक्षण यासाठी वेळ कुठून आणायचा?
त्यातही जवळच्या गावात जास्तीत जास्त चौथीपर्यंतची शाळा. तिथंही विविध अडचणी.

 त्यातही ते चारभिंतीतलं शिक्षण या रानोरानी हिंडणा-या कातक-यांसाठी अगदीच निरुपयोगी होतं. झाडांवरचा मध कसा काढायचा, फळं कशी काढायची, घर शाकारणी कशी करायची, गाईगुरांना रोग होऊ नये म्हणून काय करायचं, लहानसहान आजारावर कोणतं अौषध द्यायचं याचं कोणतंही शिक्षण त्या शाळेत मिळत नव्हतं.

या सा-यांसाठी मग श्रमिक सहयोग कष्ट करु लागलं. अनेक धनगरवाडे, वस्त्यांमधे कुणीतरी एखादा शिक्षक पोचू लागला. कधी काही डोंगर चालत ओलांडावे लागायचे तर कधी अनगड डोंगरधारेवरुन खडा चढ चढून जावं लागे. इतके श्रम करुन तिथं पोचावं तर मुलं बापासोबत डोंगरात काही कामाला गेलेली असायची.

1992 ते 2004 या काळात तरीही संस्थेनं एकदोन नव्हे तर तब्बल 26 शाळा आडवाटेवर विविध ठिकाणी चालवल्या. मुलांना शिकवतांनाच तिथलं जीवन, त्यांचं राहणीमान, भाषा, जगण्यासाठीचे आडाखे याची नोंद घेण्यात आली.
या कामात सर दोराबजी ट्रस्ट, इंडो जर्मन सोशल सर्व्हिस सोसायटी, सेव्ह द चिल्ड्रन कॅनडा आदि संस्थांचंही सहकार्य मिळालं.

या सगळ्या मदतीतून सह्याद्रीच्या उभ्या कड्याच्या पायथ्याशी व कोळकेवाडी जलाशयाच्या पिछाडीस ( कोयनेचं पाणी वीज निर्मितीनंतर डोंगराच्या पोटातून याच जलाशयात येतं. पुन्हा त्यावर वीजनिर्मिती होते व मग ते वाशिष्ठी नदीत सोडलं जातं.) सुमारे 17 एकर जागा ताब्यात आली.


आणि इथे सुरु झालं एक प्रामाणिक कार्य. तीच ही प्रयोगभूमी.

राजन इंदुलकर, मंगेश मोहिते व त्यांचे सहकारी गेली 10-12 वर्षे इथं एक आगळीवेगळी निवासी शाळा चालवत आहेत. कातकरी, गवळी-धनगर आदि वनवासी मंडळींची सुमारे 30 - 40 मुलं सध्या इथं रहाताहेत.

सकाळी त्यांचा दिवस नेहमीप्रमाणे सुरु होतो. शालेय शिक्षण व विविध खेळ खेळतानाच त्यांना जंगलांची जोपासना कशी करायची, शेती कशी करायची, पाणी जपून कसं वापरायचं आदि जीवनावश्यक गोष्टींचंही शिक्षण मिळतं. जगण्यासाठीची कौशल्यं विकसित करायचं शिक्षण मिळवतानाच संगीत, गायन, चित्रकला आदि छंदांचंही शिक्षण मिळतं. मुलं मस्त आनंदात शिकत रहातात.

या प्रकल्पाच्या सुरुवातीला कोल्हापूरच्या शिक्षणतज्ज्ञ लीलाताई पाटील यांनी अर्थसहाय्य दिलं. मुलांच्या गरजा ओळखून आवश्यक तशी इमारत उभी राहिली. रत्नागिरी, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतूनही काही ना काही मदत मिळत गेली. त्यातून संस्थेचं काम सुरु राहिलंय.

यापुढेही इथं बरंच काही घडवायची या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र विविध साधनं, त्यासाठीचे पैसे हे सारं कमी पडतंय.
शेकडो हातांच्या मदतीची त्यांना गरज आहेच. जेव्हा मुंबई पुण्यात एकेका मुलाच्या शिक्षणासाठी वर्षाला दीड दोन लाख रुपये सहज खर्च केले जातात, त्याचवेळी प्रयोगभूमीतील निवासी शिक्षणव्यवस्थेत 30-40 मुलांचा दरमहाचा खर्च सुमारे 70 हजारांपर्यंत जातोच. केवळ लोकांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प कार्यरत आहे व यापुढेही कार्यरत राहिला हवा.

इथल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, त्यांना काही स्वयंरोजगार करता यावा यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. आपला घरसंसार सांभाळून, चैन व मौजेच्या सर्व मोहांना बाजूला करत जी मंडळी इथं निरंतर राबताहेत त्यांना मनोमन सलाम करावासा वाटतो.

त्यांचं काम पुढे जोमाने वाढावं व या दुर्गम आदिवासी मुलांनाही सुखाचे चार क्षण मिळावेत म्हणून शहरांतील अनेकांनी या संस्थेला भेट द्यायलाच हवी. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यानंतर मग जमेल तशी मदतही करायला हवी. तीच एक उत्तम देवपूजा व तेच अतिशय पवित्र असं काम ठरेल हे निश्चित.

आज देशविकासाचं आवाहन सर्व स्तरांवरुन होत असताना गावोगावी,  दुर्गम ठिकाणी राहणा-या, साध्यासुध्या  सोयींपासूनही वंचित असलेल्या  आपल्या अशा  देशबांधवांना मदत केली तर हीच सगळ्यात मोठी देव, देश अन् धर्मसेवा ठरेल असं मला वाटतं. तुम्हांला ?

- सुधांशु नाईक ( nsudha19@gmail.com) 🌿

सर्व वाचकांनी जरुर भेट द्यावी म्हणून संस्थेचा पत्ता, कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर पुढे देत आहे.

संस्थेचा पत्ता :-
प्रयोगभूमी, कोळकेवाडी, कोयना प्रकल्पाच्या  चौथ्या टप्प्याजवळ, ता. चिपळूण.

श्रमिक सहयोग कार्यालय:-
मु. पो. सती चिंचघरी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी. - 415604.

फोन - 02355- 256004, 256027

मोबाईल - 9423047620.

ईमेल - shramik2@rediffmail.com

( नोंद - संस्थेला देणगी दिल्यास कलम 80 G अंतर्गत आयकर सवलत उपलब्ध आहे. )

Friday 25 August 2017

🍁

आज रजनीताईंचा वाढदिवस. तोही पंच्याहत्तरीचा. एक खास दिवस. त्या मात्र गेले वीस दिवस सतत झुंजताहेत, तेही थेट मृत्यूसोबत.

झुंजणं, झगडणं हा तर त्यांचा जणू स्थायीभावच बनलेला. करणार तरी काय? १५ आॅगस्टला जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा कोकणातल्या तुरळ या एका लहानशा गावात एक चार वर्षांची चिमुरडी आजाराशी झुंजत होती. त्या पोलियोनं, तापानं तिला जन्मभर पुरेल असं अधूपण दिलं अन् त्याचबरोबर झुंजत रहायची एक अजोड ताकद.

तेव्हापासून गेली सत्तर वर्षं ती चिमुरडी झुंजतेच आहे..! नुकताच मृत्यूही थक्क होऊन मग लांबूनच दर्शन घेऊन परतलाय जणू.

सत्तर वर्षांपूर्वी महानगरातही अपंग व्यक्तींचं जिणं भीषण होतं, तिथं लहान लहान गावांतल्या परिस्थितीबद्दल काय बोलायचं? वाढत्या वयाबरोबर या मुलीनं कायकाय अन् कसं सोसलं असेल याची कल्पनादेखील अंगावर काटा आणते अन् डोळ्यात पाणी.

एखाद्या जिवलगाला सहज सोबत मिरवावं तसं मग रजनीताईंनी हे पांगळेपण सोबत मिरवलं. कधीच त्याचा बाऊ केला नाही व त्याचा वापर करत कुणाची दया, करुणाही मिळवली नाही.

स्नेहल रजनीताईंना दैवानं तीन महत्वाच्या गोष्टी मात्र दिल्या. कुशाग्र बुध्दी, धैर्य अन् कंठातला सुंदर कोमल सूर. केवळ अन् केवळ या तीन गोष्टींच्या जोरावर मग त्या जग जिंकत निघाल्या.


शिक्षण तर पूर्ण केलंच पण गाण्याचं शास्त्रीय शिक्षणही आत्मसात केलं. आज आपण किधीही प्रगतीच्या गप्पा मारल्या तरी आजही अपंग व्यक्तीची कुचेष्टा समाजात होतेच किंवा उगाच केविलवाण्या नजरांना सामोरं जावं लागतं त्यांना.

रजनीताई काखेत कुबडी घेऊन या दोन्हीविरुध्द कणखरपणे उभ्या राहिल्या.

आपल्या काॅलेजच्या दिवसांविषयी सांगताना एकदा म्हणालेल्या, " तुम्हाला सांगते सुधांशु, अख्खं काॅलेज, म्हणजे मुलं व शिक्षक सगळे घाबरायचे मला. काय बिशाद कुणी वेडंवाकडं वागेल. मी सरसावून तयारच असे. मीच नाही तर अन्य कुणाशीही कुणी वावगं वागलेलं मी कधीच सहन केलं नाही." नेहमी कोमल सूर गाणारा त्यांचा गळा तीव्र सुरांचं खास सौंदर्यही सहज दाखवून जायचा मग.

त्यांचा स्वभाव तर एकदम रोखठोक. 'एक घाव दोन तुकडे'वाला. वागण्या-बोलण्यातलं व्यंग त्यांना चटकन् समजतं, अन् मग थेट मुळावरच घाव. " उध्दटासी व्हावे उध्दट" असं आचरण असलं तरी त्यांच्याइतकी माया करणं फारच कमी लोकांना जमतं.

गेली काही वर्षे तर त्या अंथरुणालाच खिळून. तरीही शेकडो परिचितांचे वाढदिवस वगैरे सगळं त्यांना मुखोद्गत. त्या त्या दिवशी त्या व्यक्तीचं कौतुक होणारच. विविध माणसांच्या आवडीनिवडी ही त्यांनी अचूक टिपून ठेवलेल्या. त्यानुसार घरी डबा पोचणारच. पूर्वी स्वैपाकघरात स्वत: पदर खोचून निगुतीनं सारं करायच्या. हल्ली ते जमत नसलं तरी कोणत्या रांगेत कोणत्या डब्यात काय ठेवलंय हे बेडवरून सहज सांगू शकतात त्या.

खाणं अन् गाणं यावर मनापासून प्रेम.
मध्यंतरी एकदा अचानक त्यांच्याकडे गेलो. जाताना गरमागरम बटाटेवडे नेलेले. त्यादिवशी काहीतरी बिनसलेलं त्याचं.
वड्याचा पहिला घासही गिळता येईना. तिखट लागलं. अन् डोळ्यात पाणी आलं त्यांच्या.
वैतागून म्हणाल्या, " सुधांशु, सगळं सगळं नकोसं झालंय आज मला. मगाशी तर अनिताला म्हणत होते की मला पलिकडे रंकाळ्याकडे घेऊन चल. जीवच देते आता..."

गंमतीनं मी म्हटलं," ताई, अहो, जीव द्यायचाय ना, मग रंकाळा कशाला? वास मारतोय हल्ली पाण्याला. तुम्हाला चांगल्या निसर्गरम्य ठिकाणी नेतो आम्ही, तिथं हवंतर करा विचार मग..."

" तुम्ही गंमत करत माझा मूड चेंज करायचा प्रयत्न करताय हे कळतंय मला. पण नकोसं झालंय सगळं आता. मला खूप फिरायला आवडायचं तर माझं फिरणं बंद केलं देवानं. मला तिखट, चमचमीत खायला आवडायचं तर तेही आता खाता येत नाही. सतत तोंड आलेलं असतंय. गाणं म्हणायला आवडायचं तर आता गातानाही दम लागतोय हो. " सांग ह्या कोजागिरीच्या चांदण्याला.." ही ओळ म्हणतानाही आता दमतेय मी. कसं जगू हो या सुरांशिवाय???"

त्या मुक्तपणे रडत राहिल्या काही क्षण. आम्ही शांतपणे त्यांना मोकळं होऊ देत राहिलो.... काय करणार होतो आम्ही?

त्यांनी मात्र आयुष्यात इतरांच्या अडचणींवेळी नेहमीच धावून जात मदत केली. त्या व त्यांची मैत्रीण नसीमादीदी हुरजूक यांनी " अपंगांच्या मदतीसाठी व स्वावलंबी बनण्यासाठी संस्थेचं" स्वप्न पाहिलं. अनंत अडचणींवर मात करत उभं राहिलेल्या " हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड" या संस्थेचा आज वटवृक्ष झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेकांना नाजूक क्षणी मदत मिळत गेली व स्वत:चं अपंगत्व जमिनीत गाडून अनेक गुणवंत आज समाजात धीराने काम करु लागले.


या सगळ्या कामात रजनीताईंना कधीही कौतुकानं मिरवताना आम्ही पाहिलं नाही. आज किरकोळ कामं करुन पदव्या-पुरस्कार पदरात पाडून घेणारी मंडळी पाहिली की त्यांचं मोठेपण अजून भव्य वाटू लागतं. गायिका रजनी करकरे-देशपांडे व समाजसेविका रजनीताई या दोन्ही आघाड्यांवर त्या डौलानं कार्यरत राहिल्या. अनेकांना स्फूर्ती देत राहिल्या.

त्यांचं सर्वात मोलाचं काम कुठलं असेल तर अपंगाची लग्न जुळवणं. अपंगत्वाचे शेकडो प्रकार आहेत. मात्र याचा अर्थ असा नव्हे की त्यांचं सहजीवन असूच नये. दैवजात मिळालेलं एकटेपण भोगणं ही फार कठीण व वेदनादायी गोष्ट असते याचा प्रखर अनुभव असलेल्या रजनीताईंनी अनेक अपंगांचे, संस्थेच्या कार्यकर्त्यांचे संसार उभे करुन दिले. त्यापूर्वी त्यांना स्पष्ट व अत्यावश्यक सर्व समजावून देत उत्तम समुपदेशन केलं. त्याचं ऋण विसरणं अशक्यच.

तीच त-हा गाण्याची. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी घडवताना त्यांच्याकडून कठोर मेहनत करुन घेतली त्यांनी. सर्वपरिचित कोसंबी बंधूंसारख्या अनेकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन भविष्यातील वाटचालीसाठी बळ देणारंच होतं.

इतरांचं सहजीवन फुलवणा-या, सुरांत रमलेल्या रजनीताईंचं भाग्य तरीही थोर म्हणायला हवं म्हणून पी. डी. देशपांडेंसारखा पती त्यांना लाभला. वयानं १६-१७ वर्षं लहान पीडींना लग्न करताना प्रखर विरोध सहन करावा लागला पण प्रेम जिंकलं शेवटी. संगीत, साहित्य, समाजकार्य अशा तिन्हीत रमणारा साथीदार व मित्रवर्ग यासह दिवस फार आनंदाचे होते !
म्हणतातच ना, " काव्यशास्त्रविनोदेन कालौ गच्छति धीमताम्" अन् म्हणूनच दिवस नव्हे वर्षं कशी गेली तेही कळलं नाही.

ते हल्ली हल्ली त्यांना जाणवू लागलं अंथरुणाला खिळल्यावर. तरीही काहीतरी करायची उर्मी असायचीय.

जानेवारीतलीच गोष्ट. माझी आई व सासरे कॅन्सरमुळे मृत्यूशय्येला खिळलेले. पहिलं कोण जाणार अशी जणू शर्यतच होती घरात. आमची धावपळ सुरु होती व अचानक पीडींना घेऊन रजनीताई दत्त म्हणून दारात उभ्या.

मी म्हटलं पीडींना, " अहो, त्यांची तब्येत बरी नाही, कशाला त्रास देत घेऊन आला त्यांना?"

ताडकन् म्हणाल्या, " त्यांनी मला नव्हे, मी आणलंय त्यांना. आज सकाळी उठल्यावर ठरवलेलं आज यायचंच. इथं तुमच्यावर पहाडावर संकट अन् मी घरात कशी बसून राहून हो?"

मग दोघांशीही बोलत बसल्या.
सास-यांनी खोल गेलेल्या आवाजात विचारलं, काही गाउन दाखवायला जमेल का?"

मग त्यांच्या आग्रहाखातर गळा साथ देत नसूनही गाणी म्हटली.  डोळ्यात पाणीच उभं राहिलं सर्वांच्या.

डोळे टिपत ताई म्हणाल्या," तुम्ही काहीतरी मागितलं व मी देऊ शकले.. फार बरं वाटलं बघा. नाहीतर मी काय देणार होते तुम्हाला...!"

त्यानंतर दहा दिवसांच्या दोघेही गेलेच. पण त्या ३-४ महिन्यात जवळपास रोज त्या फोनवरुन चौकशी करत होत्या. कुणाबरोबर तरी सूप, सार असं काहीबाही करुन पाठवत होत्या!

आज ७५ वा वाढदिवस त्यांचा. गेले वीस दिवस सर्वांच्या तोंडचं पाणी पळालेलं. झुंज देत त्या ICU मधून तर बाहेर आल्या आहेत व हळूहळू प्रकृती सुधारतेय. त्यातच योगायोगानं आज गणेशचतुर्थी.
भारावलेल्या मनानं व भरुन आलेल्या डोळ्यांनी इतकीच प्रार्थना करतो की
त्यांना सुखात ठेव. बाकी काही नको, बाकी काहीच नको.
- सुधांशु नाईक ( 9833299791) 🌿

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Sunday 2 July 2017

विलक्षण स्वरानंद देणारं संवादिनी वादन

संकेश्वर इथल्या संगीत महोत्सवात पं रामभाऊ विजापुरे यांचे पट्टशिष्य सुधांशु कुलकर्णी यांच्या संवादिनीवादनाने एक विलक्षण स्वरानंदात रसिकांना भान विसरायला लावले.

वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पुण्यतिथी, दादा नाईक स्मृतिदिन आणि रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने २४ जूनच्या संध्याकाळी संकेश्वर येथे कलांजली व अॅकेडमी आॅफ म्युझिक तर्फे संगीत महोत्सव साजरा झाला, त्यात त्यांनी पुत्र सारंग कुलकर्णीसोबत सहवादन केले.
या महोत्सवाचे यंदा ४४ वे वर्ष होते. इतकी वर्षं हा महोत्सव संकेश्वरमध्ये सुंदरप्रकारे आयोजित करत रहाणे यासाठी दादा नाईक कुटुंबिय व कलांजली परिवाराचे कौतुक करायला हवे.
कालच्या मैफलीची सुरुवात सुधांशु व रोहिणी कुलकर्णी यांची शिष्या सुलक्षणा मल्ल्या हिच्या ख्यालगायनाने झाली. राग भीमपलास सारखा प्रचंड मोठा कॅनव्हास असणारा राग तिने संयमाने सादर केला. " अब तो बडी देर.." ही पारंपरिक चीज विलंबितात सादर करताना गमगरेसा, गमपमगम गमगरेसा, गमपनीसांसां आदि आलापातून भीमपलास रागाचं सौंदर्य ठळकपणे मांडलं. त्यानंतर एक उत्तम तराणा तिने सादर केला. या तराण्याची मांडणी सारंग कुलकर्णी यांनी केली होती. तिच्या गायनाला अंगद देसाई यांनी सुरेख तबलासाथ तर सारंग यांनी हार्मोनियम संगत केली.
त्यानंतरच्या सत्रात अंगद देसाई यांच्या एकल तबलावादनाने सर्व रसिकांना भरभरुन आनंद दिला. कायदा, रेला, चक्रधार यांची पेशकश करताना उस्ताद निजामुद्दिन खाॅं यांनी बनवलेले बोल त्यांनी सुबकपणे सादर केले. तबलावादन करताना आदळाआपट न करता सहजपणे व सौंदर्य खुलवत तबला कसा वाजवता येतो याचा जणू त्यांनी वस्तुपाठच सादर केला. त्यांना सारंग कुलकर्णी यांनी समर्पक लेहेरा साथ दिली.
यानंतरच्या सत्रात अॅकेडमी आॅफ म्युझिक,बेळगांव यांच्या विद्यार्थीवर्गाने भक्तीगीतं, नाट्यगीतं व भावगीतांची लहानशी प्रसन्न मैफल सादर केली.

आजच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना स्टेज मिळवून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांना नेटके सादरीकरण करायला प्रोत्साहन देणे याबद्दल सुधांशु व रोहिणी कुलकर्णी यांचे मनापासून कौतुक करायला हवे.

खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, ऋतु हिरवा, तू तर चाफेकळी, नाही पुण्याची मोजणी, अंग अंग तव अनंग, सांज ये गोकुळी, सजणा पुन्हा स्मरशील ना आदि गीतांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. रसिकांच्या आग्रहाखातर " कमले कमलिनी" हे महालक्ष्मीचं कानडी भजनही सादर करण्यात आले.
संगीत महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात सुधांशु कुलकर्णी व पुत्र सारंग कुलकर्णी यांनी संवादिनी सहवादन पेश करुन मैफल एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली.
राग मारुबिहागची " रसिया हो न जा" ही खास पारंपरिक चीज त्यांनी अशी काही मांडली की रसिक श्रोते त्या स्वरानंदात भान हरपून गेले. शांतपणे प्रत्येक स्वरावर होणारा ठेहराव, सहज येणारी मींड, बोलआलापांनी सजलेली लयबध्द मांडणी अतीव आनंद देऊन गेली. रामभाऊ विजापुरे मास्तरांचे संवादिनीवादन ही एक आगळीवेगळी गोष्ट. ती नजाकत, ते देखणेपण फार कमी ठिकाणी पहायला मिळते. त्यांचे शिष्य सुधांशु व पुढील पिढीचा प्रतिनिधी सारंग कुलकर्णी तो वारसा समर्थपणे पुढे नेताहेत हे पाहून आनंद वाटतो.

वाद्यसंगीताच्या मैफिलीत तबलासाथ कशी असावी हे पुन्हा एकदा अंगद देसाई यांनी दाखवून दिले. मैफल संपवताना रामभाऊंची खासियत असलेले " दे हाता शरणागता.." हे नाट्यपद सादर करुन या संगीत महोत्सवाची सांगता झाली. अशा सुरेल मैफिली आपल्या आयुष्यात सुखाचे अविस्मरणीय क्षण निर्माण करतात याबद्दल आयोजक व कलावंतांचे आपण ऋणी आहोत अशी भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला समस्त नाईक कुटुंबिय, विलास कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, अनंत घोटगाळकर, पीडी देशपांडे, सुचित्रा मोर्डेकर तसेच खास सोलापूरहून आलेले सिध्दराम म्हेत्रे आदि मान्यवर रसिक उपस्थित होते.
- सुधांशु नाईक ( 9833299791)
🌿🌿🌿🌿

Tuesday 20 June 2017

हिरण्यकेशीच्या तीरावर रुजलेली मराठी शाळा..



आज महाराष्ट्रात देखील मराठी शाळा चालवणे अवघड झाले असताना, सीमाभागात संकेश्वर येथे एक मराठी शाळा गेली काही वर्षे सुरु आहे. ती शाळा सुरु राहावी यासाठी संस्थेमार्फत जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून त्यांचे मनापासून कौतुक करावसं वाटतं. गरीब मुलांसाठी शिक्षण मिळावे, मुलांसोबत मुलींनीही शिकावे यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. त्यांचं काम पाहायला तुम्ही नक्की जायला हवं, त्यांच्या कामात आपला खारीचा वाटा उचलायला हवा...

संकेश्वर. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील एक बहुपरिचित गाव. गावाची जीवनदायिनी हिरण्यकेशी नदीकाठी शंकराचार्यांचा प्राचीन मठ आणि गावाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असा ऐतिहासिक वल्लभगड यांनी गावाचं प्राचीनत्व अधोरेखित केलेलं. संकेश्वरी मिरचीचा ठसका चुकून काहीजणांनी अनुभवला नसलाच तरी हे नाव नक्कीच माहितीचं.

एकेकाळी मराठी बोलणारं, शिकणारं गाव राज्यनिर्मितीत कर्नाटकात गेलं तरी मराठी माणसांचे ऋणानुबंध टिकून राहिले. आणि त्यातूनच होणारे मराठी शाळेसाठीचे प्रयत्नही. सध्या महाराष्ट्रातही जेंव्हा मराठी शाळा झपाट्याने सर्वत्र बंद पडत चालल्याहेत तेंव्हा महाराष्ट्राबाहेर मराठी शाळा सुरु करणे, ती कार्यरत ठेवणे ही किती कठीण गोष्ट आहे याची सर्वानाच कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच संकेश्वरमध्ये हिरण्यकेशी नदीच्या तीरावर रुजलेल्या एका मराठी शाळेचं जिवंत राहणं ही कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट ठरते. हे कष्टप्रद काम साकारलंय “हिरण्यकेशी शिक्षण मंडळ” या संस्थेने. गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या पदाधिकारी मंडळींशी संपर्क आला आणि त्यांची तळमळ, मुलांनी मराठी शिकावं यासाठीचे सतत सुरु असलेले प्रयत्न या सगळ्याने भारावून गेलो.

२००३ मध्ये या संस्थेची स्थापना झाली, २००५ पासून गेली १२ बर्षे “विद्यानिकेतन” ही शाळा अनंत अडचणीवर मात करत अखंड सुरु आहे. संकेश्वर मधील जोशी कुटुंबीयांनी त्यांचा राहता “जोशी वाडा” संस्थेच्या शाळेसाठी दिला यामुळेच जागेची मोठी अडचण दूर झाली आणि शाळा सुरु राहू शकली. आज फक्त लोकांच्या सहकार्याच्या जोरावर हे विद्यादान सुरु आहे. मुलांच्या सहली, विविध उपक्रम यासाठी उत्तम संकल्पना इथे राबवल्या जातात. मुलांच्या शिक्षणासोबत कला-कौशल्यविकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे जाणीवपूर्वक शिक्षक प्रयत्न करतात

इथल्या शिक्षकांनी त्यांची कौटुंबिक परिस्थिती, वैयक्तिक अडचणी या सर्वांवर मात करत शाळेच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे तेही कमी पगाराची नोकरी असून! जेंव्हा आपण लहानशी मदत करून मोठ्या गप्पा मारतो तेंव्हा कोणत्याही प्रकारे स्वतःच्या कामाविषयी, त्यागाविषयी न बोलणारे इथले शिक्षक व कर्मचारी आपल्याला अंतर्मुख करतात.


संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी हे स्वतः मेक्यानिकल इंजिनीअर आहेत आणि तरीही अन्यत्र मिळणारी भल्या मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता आपल्या परिसरातील मुलांच्या शिक्षण विकासासाठी गावात राहून धडपडताहेत. त्यांना त्यांच्या कार्यात उच्चविद्याविभूषित पत्नी अरुणाताई यांनीही मोलाचा हातभार लावला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी अरुणाताईचं एक खास नातं आहे. 
या दोघांबरोबरच अन्य संचालक मंडळ, शिक्षक हे सारेच एकदिलाने वाटचाल करत आहेत. आज शाळेचं स्वरूप लहान आहे मात्र जर आर्थिक पाठबळ मिळालं तर यांच्या स्वप्नातील अनेक उपक्रमांना इथे मूर्तरूप मिळू शकेल. मुलांसाठी अनेक सोयीसुविधा मिळू शकतील आणि मुख्य म्हणजे एक मराठी शाळा सीमाभागात पाय रोवून अजून पुढची कित्येक वर्षं सुरु राहील. 

इथे येणारी कित्येक मुलं जवळच्या गावातून एसटीने येतात. अगदी पहिलीची सुद्धा..! पुण्या-मुंबईपासून सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आदि अनेक शहरात हल्ली शाळेच्या बस येतात, मुलांची ने-आण करतात. तरीही आई-बाप, त्यांची मुलं येण्याच्या/ जाण्याच्या वेळी घामाघूम झालेले असतात. अशावेळी या शाळेत सहज येणारी मुलं, त्यांनी बस स्थानकापासून शाळेपर्यंत रस्त्याच्या कडेने केलेली शांत व शिस्तबद्ध पायपीट, एकमेकाला सांभाळून एकत्र येणं हे सारं  पाहून या शाळेतून त्यांना कसं शिक्षण मिळतंय याचाच धडा पाहायला मिळतो. 


बहुतांश मुलं ही गरीब घरातील आहेत. काहीजणांना फी देखील पूर्ण भरता येत नाही. शाळेसाठी धडपडणारे शिक्षक व कर्मचार्यांना पगार वेळेवर मिळावा म्हणून करावी लागणारी धावपळ, त्यातच कर्नाटक प्रशासनाच्या विविध अटी, गरजा यांची पूर्तता करण्याचे टेन्शन. हे सगळं सांभाळून ही शाळा चालवणे आणि मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत आहे. केवळ आणि केवळ “मुलांनी मराठीतून उत्तम शिक्षण घ्यावे” याच उद्देशाने संचालक हे कार्य करताहेत ते पाहून त्यांना सलाम करावासा वाटतो.

आज अनेकांनी अनेक प्रकारे संस्थेला मदत करायची गरज आहे. ही संस्था आयकर विभागाद्वारे 80-G अंतर्गत नोंदली गेली आहे त्यामुळे जर आर्थिक मदत केली तर तुम्हाला आयकरात सूट मिळू शकते. आज संस्थेला दर महिन्याच्या खर्चाबरोबरच अनेक गोष्टींची कमतरता आहे, आर्थिक मदत हवीच आहे, तरीही इथे शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. प्रसंगी संचालक स्वतःच्या खिशातून संस्थेसाठी पैसा खर्च करतात पण मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी सर्व काही उपलब्ध करून देतात. शाळेच्या माध्यमातून दुर्गम भागातील मुलांसाठी ते कार्यरत आहेतच मात्र त्यांच्यासाठी मित्रत्वाचा हात पुढे करणं हे आपलंसुद्धा कर्तव्य नाही का?

मित्रहो, म्हणूनच यापुढे जेंव्हा तुम्ही कोल्हापूरहून पुढे बेळगाव किंवा बंगळूरच्या दिशेने जाल तेंव्हा एक-दोन तास वेळ काढून नक्की या शाळेला भेट द्या. तिथल्या मुलांशी-शिक्षकांशी संवाद साधा, संचालकांना भेटा. ते लढत आहेतच, फक्त कुसुमाग्रज म्हणाले तसं पाठीवर तुमचा आश्वासक हात ठेवून लढ म्हणा.. त्यांच्या कार्यात जमेल तशी मदत करून आपलाही खारीचा वाटा द्या एवढंच हक्काचं मागणं..!

-            -  सुधांशु नाईक. (९८३३२९९७९१, nsudha19@gmail.com) 
    कोल्हापूर.
------------------------
संस्थेशी संपर्क करण्यासाठी पत्ता;
गिरीश कुलकर्णी,संस्थापक, हिरण्यकेशी शिक्षण मंडळ, गांधी चौक, संकेश्वर.
मोबाईल:- +91 9448989945 / +91 861-8298673
---------------------------------