marathi blog vishwa

Thursday 3 March 2016

शिवरायांचं वेगळेपण

या नव्या लेखमालेच्या सुरुवातीला “शिवरायांचं वेगळेपण” हा लेख लिहावा असे मनात आले. 

मुख्य कारण म्हणजे इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी यांच्या व्यतिरिक्त सर्व सामान्य माणसाला शिवरायांचा इतिहास तसा पूर्ण माहित नाही. यासाठी खूप ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे व तो करण्यासाठी सामान्य लोकांकडे पुरेसा वेळ नसल्याने लगेच माहीत होणारही नाही. मात्र काही महत्वाचे मुद्दे जर आपण सांगितले तर त्यांना यात अधिक रस निर्माण होईल व ते अधिक अभ्यास करतील असे मला वाटते.

रोजच्या जगण्यात व विविध ग्रंथ वाचताना माझ्यासारख्या साध्या माणसाला “शिवराय कसे दिसले, त्यांच्यापासून आपण कशी प्रेरणा घेऊ शकू असे वाटले” ते सांगणे मला महत्वाचे वाटते. हाच या लेखमालेचा उद्देश. अर्थात सगळेच मुद्दे या किंवा अशा एका लहान लेखात लिहिणे शक्य नाही, तरी  जितके जास्त मुद्दे पुढील लेखांमधून नक्की सांगता येतील तेवढे सांगण्याचा मी प्रयत्न करेन..
1

महाराजांच्या आयुष्यातील तेजस्वी अशा ५-६ घटना वगळता लोकांना अधिक इतिहास माहित नाही हे निखळ सत्य आहे. शिव-छत्रपतींचे आयुष्य हा चमत्कार नसून तीअद्वितीय अशीएक management होती. आणि आपल्या आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी, कुठे ना कुठे अशी management करावी लागतेच. तेंव्हा महाराजांच्या आयुष्यातील सर्व सामान्यांच्या दृष्टीने अपरिचित असा भाग जाणून घेणे, शिवरायांचं वेगळेपण समजून घेणे  म्हणूनच अत्यावश्यक ठरते. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ऐकल्या की सामान्यतः असे समजले जाते की प्रत्येक छोटी मोठी गोष्ट राजांनीच केली आहे. पण प्रत्यक्षात असे नसते. राजांचे शेकडो सहकारी, अष्ट प्रधान, सुभेदार, कारकून, समाजातील हजारो लहानथोर मंडळी अशा अनेकांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे, त्यांच्या स्वामीनिष्ठेमुळे स्वराज्य निर्मितीचे हे अत्यंत कष्टप्रद कार्य घडून आले होते..! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शिवराय, शंभूराजे व राजाराम महाराज अशा तीन छत्रपतींच्या निधनानंतर सुद्धा हे स्वराज्य राखण्यासाठी सामान्य जनता प्राणपणाने लढली. हे बहुदा इतिहासातील एकमेव उदाहरण असावे. त्यामुळे “शिवरायांचं वेगळेपण” यातील काही मुद्दे पाहताना सर्वात महत्वाचा भाग हीच माणसे ठरतात..
१.      प्राणार्पण करणारी माणसे -
राजांनी आयुष्यभर लढाया आणि घोडदौड केलीच. पण त्याच बरोबर आपल्या मुलुखातील प्रजेच्या सुखी जीवनासाठी शेती व बलुतेदारी व्यवसायांना उत्तेजन दिले. त्यामुळे लोहार, सुतार, शिकलगार यासारख्यांना आणि सर्वसाधारण शेतकऱ्याला काम मिळाले. ज्यांच्याकडे जमिनी, बी-बियाणे, अवजारे इ.ची कमी होती, त्यांना त्या त्या गोष्टी सरकारी खर्चाने देण्यात आल्या. ते कर्ज पुढे त्यांच्या कमाईतून जरी वसूल करण्यात आले तरी प्रत्येकाकडे शिल्लक उरेल याची काळजी घेतली गेली. सतत त्रासदायक ठरणारी आक्रमणे व  शत्रूशी सामना करायला राजांचे सैन्य पाठीशी असायचे. त्यामुळे प्रजेचे मानसिक ताण-तणाव कमी झाले जीवनाची शाश्वती निर्माण झाली. त्याच बरोबर अशा राजाला आपापल्या परीने मदत करायची भावना विकसित झाली. लोकं त्यांना जे जे देता येईल ते दान देऊ लागले. कधी ते धान्याचे दान होते तर कधी प्राणांचे..!
जेंव्हा एखादे नेतृत्व तयार होते तेंव्हा त्याच्या मागे अनुयायी येतातच..पण त्यातील फारच थोडे प्रत्यक्ष बलिदानासाठी तयार होतात. शिवबाराजांच्या अलौकिक नेतृत्वाचे सर्वाधिक वेगळेपण म्हणजे कोणत्याही मोबदल्याविना त्यांच्यासाठी प्राणार्पण करायला सिद्ध झालेली, समाजातील सर्व जातीजामातीतून पुढे आलेली हजारो सर्वसामान्य माणसे..! अर्थात प्रत्येक जण काही फक्त लढाईसाठी सहभाग देऊन गेला म्हणून स्वराज्य उभे राहिले नाही, तर इथला प्रत्येक शेतकरी जसा महत्वाचा तसेच सूर्याजी काकडे, रामजी पांगेरे, गोदाजी जगताप, शिवा काशीद, जीवा महाले, कोंडाजी फर्जंद या सारखे शूर मावळे जसे महत्वाचे तसेच त्यांना चांगली शस्त्रे मिळावीत म्हणून दिवसरात्र राबणारे अनामिक लोहार, शिकलगार सुद्धा महत्वाचे..! “यशस्वी सारा पद्धत” अंमलात आणणारे अण्णाजी दत्तो महत्वाचे तसेच ठिकठिकाणी कारभार पाहणारे सुभेदार, घाटपांडे, जकातदार, आणि मदत वाटप करणारे कारकून हे ही महत्वाचे. कोणत्याही मोहिमेपूर्वी सर्व रस्ते, वस्त्या, शत्रूची हालचाल याची बित्तंबातमी आणणारे गुप्तहेर व विविध गावातून त्यांना जमेल ती मदत करणारी माणसेही महत्वाची होती. आणि अर्थातच स्वतःच्या सैन्याची काळजी घेत वेगाने मार्गक्रमण करून शत्रूवर झडप घालणारे, त्यांना नामोहरम करणारे मोरोपंत, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, आनंदराव, मायनाक भंडारी इ. सेनानीही महत्वाचे होते.
राज्यकारभार करताना सल्लागार मंडळाची भूमिका मोलाची असते त्यामुळे महाराजांशी विचार विनिमय करून त्यांना योग्य सल्ला देणारे गोमाजी काका, माणकोजी दहातोंडे, सोनोपंत डबीर, कृष्णाजी पानसंबळ, बाजी पासलकर, कान्होजी जेधे असे ज्येष्ठ मुत्सद्दी आणि ठरलेली भूमिका नीट पार पाडणारे गोपीनाथ बोकील, त्र्यंबकपंत, रघुनाथ पंत इ. वकीलही तेवढेच महत्वाचे. स्वराज्य हे असे सर्वांच्या कष्टातून आणि बलिदानातून निर्माण झाले याची जाणीव प्रत्यक्ष शिवरायांना होती. म्हणूनच सिंहासनावर बसण्यापूर्वी महाराज प्रथम बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी, सूर्यराव काकडे, प्रतापराव गुजर इत्यादी प्राणार्पण केलेल्या सहकाऱ्यांचे स्मरण करतात. जशी राजांना ही जाणीव होती तशीच आपण सर्व शिव-भक्तांना असायला हवी आणि म्हणूनच शिवरायांचा जयघोष करतानाच या हजारो अनामिक वीरांच्या बलिदानाची, त्यांनी खर्चिलेल्या घामाची आणि रक्ताची जाणीव ठेवून त्यांच्यासाठीही एक पणती लावायला हवी.
२.      नीतिवंत राजा –
मध्ययुगातील शिवकालीन कालखंड पाहिला म्हणजे असे लक्षात येते की, बहुतेक राजे महाराजे, बादशहा, सरदार, वतनदार हे सर्व ख्यालीखुशालीत मग्न. प्रत्येकाला फक्त आपल्या सुख सोयींचीच काळजी आहे. त्यासाठी सामान्य रयत मात्र रोज छळ सहन करत आहे. त्यांचे धान्य शेत, घर आणि सर्वात दुखःदायक म्हणजे स्त्रीची अब्रूही रोज लुटली जात आहे. कोणी वाली उरला नाही, ज्याकडे दाद मागावी असे शासन राहिले नाही ही तेंव्हाची परिस्थिती. शिवरायांनी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर कुणी त्यांना कदाचित वाईट म्हटले नसते कारण सगळे भोग भोगण्यासाठीच सत्ता व अधिकार त्याकाळी राबवले जात. मात्र शिवरायांनी असे वागणे जीवनभर नाकारले हे त्यांचे मोठेपण. संपूर्ण शिवचरित्रात ते ठळकपणे प्रकर्षाने उठून दिसते. एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे राहणे, योगी किंवा विरागी वृत्तीने जगणे हे राजांचं वेगळेपण.
कोणत्याही राजाने केवळ सुशील व चारित्र्यवान असणे म्हणजे नीतिवंत राजा नव्हे. प्राचीन काळापासून आपल्या देशात अनेक “नीती” प्रसिद्ध आहेत. शुक्रनीती, विदुर नीती, कृष्ण नीती, कौटिल्य नीती, अर्थनीती, राजनीती धर्मनीती इ.“नीती” ग्रंथांचा अभ्यास करून त्याप्रमाणे स्वतःचे व आपल्या प्रजेचे वर्तन घडवणे ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. शिवाजी राजांनी आपल्या वर्तणुकीतून ती घडवून दाखवली. राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो आणि संपूर्ण प्रजेचे त्याने पुत्रवत पालनपोषण केले पाहिजे हे राजांचं मुख्य कर्तव्य. त्यासाठी त्यांनी प्रसंगी जीव धोक्यात घातला पाहिजे, प्रसंगी प्रजेला मायेने क्षमा केली पाहिजे, प्रजेचे जीवन धोक्यात आणणाऱ्या व प्रजेला त्रासदायक ठरणाऱ्या लोकांचा, वृत्तींचा कठोरपणे बिमोड केला पाहिजे अशा शेकडो गोष्टी राजनीती सांगते. शिवरायांनी हे सर्व करून दाखवले. मात्र याकामी त्यांना सर्वाधिक संघर्ष करावा लागला तो स्वकीयांशी. गावोगावचे पाटील, देशमुख, सुभेदार, वतनदार या लोकांना साम दाम, दंड वापरून राजांनी वठणीवर आणले. आणि हे करत असताना प्रत्येक नीतीवरचे आपले प्रभुत्व दाखवून दिले. महत्वाची गोष्ट म्हणजे राजांना स्वतः अनेक नातेवाईकांशी संघर्ष करावा लागला. प्रसंगी लढावे लागले. तरी शिवराय कधी डगमगले नाहीत. स्वराज्याच्या मार्गात आडवा येणारा माणूस, जो स्वकीय असो वा परकीय, त्यांनी त्याचा बिमोड केला. आपले उद्दिष्ट साध्य केले.

धर्म नीती हा नेहमीच राज्यकारभारातील एक नाजूक भाग असतो. गेल्या हजारो वर्षांत भारतात अनेक धर्म- पंथ, संप्रदाय राजीखुषीने किंवा जबरदस्तीने रुजले. त्यांचं समाजाशी एक भावनिक नातं निर्माण झालेलं असते. राजालाही अनेकदा धार्मिक गोष्टीत हस्तक्षेप करणे शक्य होत नाही. मात्र राजांनी ते प्रेमाने करून दाखवले.
आपल्याच समस्यांमध्ये गुंतलेल्या हिंदू धर्मात परकीय आक्रमणामुळे अधिकच औदासिन्य आलेले होते. रुढींची बंधनं अधिक घट्ट होऊ लागलेली. अशा वेळी जबरदस्तीने “मुसलमान” बनवल्या गेलेल्या बजाजी निंबाळकर यांचे, आणि उत्तरार्धात नेताजी पालकर यांचे पुन्हा धर्मांतर करून घेतले गेले. ही एक फार मोठी क्रांतिकारक घटना होती. त्यासाठी राजांना नक्कीच अनेक प्रकारचा वाद-विवाद, मनस्ताप, प्रस्थापित मठाधीशांचा रोष सहन करावे लागले असतील. पण नेहमीप्रमाणे राजांनी इथे प्रेमाचा “गनिमी कावा” वापरून सर्वांची मने जिंकून घेतली आणि जे पाहिजे तेच घडवून आणले.
शिवाजीराजांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर शत्रूकडून होणारी देवळे, धार्मिक ग्रंथ यांची विटंबना कमी झाली. कारण असे वागणाऱ्या शत्रूला राजांच्या प्रखर हल्ल्याला सामोरं जावे लागे. स्वतः राजांनी आपल्या कोणत्याही स्वारीत प्रार्थना स्थळे, धर्मग्रंथ, स्त्रिया, लहान मुले, वृध्द, फकीर, मौलवी, साधू-संत यांना उपद्रव दिला नाही. त्यामुळे त्यांच्या नीतिमत्तेचा वचक शत्रूवरही निर्माण झाला.
राजांनी त्यांच्या दक्षिण स्वारीच्या वेळी, तामिळनाडू मध्ये, विटंबना झालेल्या, मशीद बनलेल्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. तिथे पुन्हा कार्तिक दीपोत्सव सुरु केला. तसेच श्रीशैलच्या मंदिरासमोर गोपूर उभे करणे, जवळच्या पाताळगंगेच्या तीरी घाट बांधणे, गोव्यातील सप्तकोटेश्वरच्या जागी पोर्तुगीजांनी बांधलेले चर्च पाडून तिथे पुन्हा मंदिराचा जीर्णोद्धार करणे, स्वराज्यातील अनेक मंदिरे, मठ, तीर्थक्षेत्रे यांना आर्थिक मदत  व संरक्षण देणे असे कितीतरी कार्य केले. या सर्व धर्मकार्यात हयगय होणार नाही तसेच कुणी विनाकारण लुडबूड करणार नाही याचीही दक्षता घेतली.
प्रतापगड वर भवानी मंदिर बांधून झाल्यावर समाजातील इतर वर्गालाही पूजेत, मिरवणुकीत सहभागी करून बंधुत्वाचा, सामाजिक समतेचा नवा पायंडा घालून दिला. सैन्यातील विविध जाती-जमातीच्या सर्व सैनिकांमध्ये बंधुभाव राखला. एकजुटीचा आदर्श निर्माण केला.

ज्या वेळी शत्रूशी तह करणे गरजेचे ठरले तेंव्हा सामनीतीचा वापर करून राजांनी शांतता प्रस्थापित केली. त्या काळात आपले सैन्यबळ, अश्वदल वाढवण्यावर भर दिला. तसेच किल्ल्यांची डागडुजी, शस्त्रनिर्मिती, वाहतूक व्यवस्था, शेती आणि व्यापारवृद्धी याकडे जास्त लक्ष दिले. युद्धापूर्वी आणि युद्धजन्य परिस्थितीतही यामुळे रसद पुरवठा सुरळीत होऊन राजांना त्याचा जास्त फायदा झाला.

राजकारणात भेदनीतीचे चे महत्व अनन्यसाधारण आहे. शत्रूच्या सैन्यात दुफळी निर्माण करणे, त्यांच्या मानसिकतेवर आघात करणे यामुळे साध्य होते. राजांनी आपल्या हेरखात्याचा सुयोग्य वापर करून शत्रुसैन्यात अनेकदा खळबळ उडवून दिली. शत्रूला कायम गाफील ठेवले. मोगली कागद पत्रातून असे अनेकदा लिहिलेले आहे की “सिवा त्याला जिथे आणि जेंव्हा पोचायचे तेंव्हा जातोच..मात्र आमच्या सैन्याला हात चोळत बसण्याव्यतिरिक्त काही करता येत नाही.”

दूतनीती किंवा आजच्या भाषेतील वकिली तर राजांनी फार चातुर्याने वापरली. सोनोपंत, त्र्यंबकपंत, रघुनाथ पंत, गोपीनाथ बोकील, रामचंद्र पंत अशा अनेकांच्या बुद्धीचा वापर करून राजांनी उदंड राजकारणे केली. यातला प्रत्येक जण बुद्धिमान होता. पण प्रत्येक वेळी समोरचा शत्रू आणि गरज ओळखून राजे आपला दूत /वकील बदलत. प्रत्येकाची क्षमता जाणून त्याप्रमाणे वापर करून दूतांना यशस्वी दूत बनवले. अफझलखानाचा पराभव करण्यात सगळ्यात जास्त महत्वाचे ठरले म्हणून राजांनी “गोपीनाथकाका बोकील ” खास सत्कार करवून आणला. तर आपल्या मातुश्री जिजाऊ यांच्या सोबतीनेच वृद्ध सोनोपन्तांचीही सुवर्णतुला घडवून आणली. सैन्यातील बलिदान दिलेल्या शूर शिपायांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांचा उदरनिर्वाहाची चिंता करत त्यासाठी वार्षिक तनखा नेमून दिला. आपल्या सेवकांनाही मानाने वागवणारा, त्यांची काळजी घेणारा असा राजा बहुदा दुसरा नाहीच..!
म्हणूनच कदाचित समर्थ रामदास त्यांची स्तुती करताना त्यांना “पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा” असे म्हणून जातात..!

३.      शत्रूंशी राजांचे वर्तन –
शिवराय आणि त्यांचे सहकारी प्रत्येक शत्रूला वेगवेगळ्या प्रकारे सामोरे गेले. लढाई पूर्वी त्यांनी प्रत्येकाच्या स्वभावाचा, लष्करी ताकदीचा स्वतंत्र अभ्यास केला. त्यानुसार आपले धोरण ठरवले. आणि ते काटेकोरपणे अंमलात आणले. भारतावर आक्रमण करून स्वतःची सत्ता प्रस्थापित करू पाहणारे मोगल साम्राज्य आणि तत्कालीन बादशहा औरंगजेब हाच आपला मुख्य शत्रू आहे हे राजांनी सर्वात आधीच ओळखले होते. राजांच्या सुरवातीच्या हालचाली अभ्यासल्या की हे लगेच लक्षात येते.
आजकाल काही मंडळी औरंगझेब व शिवाजी महाराज यांचे संबंध चांगले असल्याचे दाखवू पाहत आहेत याची खरी काही गरज नाही. कारण राजांनी आयुष्यभर विशिष्ट जाती व धर्माला कधीही टार्गेट केले नाही. “तुम्ही तुमच्या राज्यात,देशात सुखाने नांदा आणि आम्हालाही सुखाने जगू द्या” अशा सरळमार्गी विचारातून राजांचा लढा सुरु होता. कधी तो आदिलशाही विरुद्ध होता, कधी पोर्तुगिजांबरोबर, कधी इंग्रजांशी तर कधी प्रत्यक्ष रक्ताच्या नात्यातील माणसांशी सुद्धा..! हे सर्व करत असतानाही त्यांचे मोगलांकडे बारीक लक्ष होते म्हणूनच त्यांनी आपले सर्व बळ औरंगझेबाविरुद्द होणाऱ्या युद्धासाठी एकवटायला सुरुवात केली होती. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे पुढचा इतिहासच बदलून गेला...!
सुरुवातीच्या काळात जेंव्हा औरंगझेब विजापुरशी युध्द करत होता तेंव्हा त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी राजांनी नगर, जुन्नर, भिवंडी, कल्याण अशा प्रांतांवर स्वाऱ्या केल्या. तिथून जास्तीत जास्त संपत्ती मिळावी म्हणून लुटालूट केली. लगेच पुन्हा औरंगझेबाकडे खलिते धाडून क्षमायाचना केली, त्याचवेळी ताब्यात घेतलेला सगळा मुलूख मात्र स्वराज्यातच राहील याची दक्षता घेतली. यातून त्यांनी आदिलशाही व मोगल दोघानाही नेमका संदेश दिला.
आदिलशाहीच्या प्रदेशात सर्वात प्रथम शिवबाराजानी उठाव केला. तिथला प्रांत, गड किल्ले ताब्यात घ्यायला सुरुवात केली. एक प्रकारे ही बंडखोरी होती कारण राजे व त्यांचे वडील हे आदिलशाहीचे वतनदार होते. त्यामुळे या बंडाळीचा बिमोड करण्यासाठी शत्रू सैन्य येणार हे निश्चितच होते. राजांचे वेगळेपण हे की त्यांनी या सगळ्याचा आधीच अंदाज घेऊन राजगड, पुरंदर, प्रतापगड, जावळीचे खोरे, पन्हाळगड अशी संभाव्य रणमैदाने सिद्ध केली. लढाई किंवा युध्द हे आधी सेनानीच्या मनात सुरु होते, त्याप्रकारे व्यूहरचना सिद्ध होते आणि जर ती रचना योग्य असेल तरच त्याचा परिणाम प्रत्यक्ष युद्धभूमीवर दिसून येतो.तसेच शक्यतो रणभूमी ही नेहमी स्वराज्याच्या गाभ्यापासून दूर ठेवण्याची दक्षता घेतली. प्रत्येक युद्धापूर्वी राजांनी व त्यांच्या सल्लागारांनी मनोमन युद्धाचे आराखडे, भूगोल या गोष्टी पक्क्या केल्या, त्याप्रमाणे हालचाली केल्या म्हणूनच प्रत्यक्ष युद्धात ते प्रचंड यशस्वी ठरले. हा चमत्कार नव्हता तर अचूक प्रयत्नांना, नियोजनाला मिळालेली ती यशाची पावतीच होती..!
प्रत्येक युद्धात महाराजांनी वेगवेगळी नीती वापरली तीही समोरच्या माणसाचा अभ्यास करूनच..! म्हणूनच कपटी व क्रूर अफझलखानाशी राजे “कपट नीती” वापरतात तर शाहिस्तेखानला अचानक हल्ल्याची “धक्कातंत्र नीती” वापरून त्याचा पूर्ण मानसिक पराभव घडवून आणतात. बहादुरखानासारख्या पराक्रमी परंतु बावळट शत्रूला खेळवत ठेऊन आपली विजयपताका फडकत ठेवतात. दिलेरखानाशी अत्यंत सावधपणे वागतानाच मिर्झाराजांसारख्या पराक्रमी, बुद्धिमान आणि वचनाला पक्क्या अशा दिग्गजालाही प्रेमाने वश करून आपला कार्यभाग साधून घेतात..!
मोगलांबरोबरच इंग्रज, पोर्तुगीज फ्रेंच आणि डच या त्याकाळातील परकीय सत्तांशी राजांनी जे वर्तन केले आहे त्याचा अभ्यास केला तर आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण कधीच चुकणार नाही. मात्र आम्ही या परकीयांना जवळ करून राजांच्या इतिहासाला मात्र अडगळीत टाकले आहे आणि त्याचे परिणाम वर्षानुवर्षे भोगत आहोत.
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत, दक्षिणेतील शाह्यांचे ऐक्य घडवून आणण्याचा जो प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला तो थक्क करणारा आहे. प्रत्यक्ष शत्रूच्या गोटातून स्वतःचा पुत्र लढत असताना राजे कुठेही ढासळलेले, खचलेले दिसत नाहीत. उलट जोमाने राजकारण आणि युद्धकारण करताना दिसतात. आयुष्यभर ज्यांच्याशी शत्रुत्व पत्करले त्या आदिलशाहीला वाचवायला धावत जातात. हे सर्व फार बारकाईने अभ्यासले पाहिजे. ज्यातून आपल्याला सतत मार्गदर्शन व स्फूर्ती मिळत राहील.
४.      अफवांचा व हेरांचा वापर :-
राजांनी शत्रूला कायम गाफील व भयग्रस्त ठेवण्यासाठी विविध कल्पना वापरल्या. त्यातील एक गोष्ट म्हणजे अफवा. अफवांचा परिणामकारक वापर करून राजांनी कौटिल्य नीतीची चुणूक अनेक वेळा दाखवली. “राजे भिंतीतूनही येऊ शकतात, चार पुरुष उंच उडी मारतात, अचानक अदृश्य होऊ शकतात, कोणत्याही प्राण्याचे वा माणसाचे रूप घेऊ शकतात, राजांना दैवी शक्तीचे वरदान आहे, राजांना काळी जादू अवगत आहेत ” अशा अनेक अफवा राजांच्या गुप्तहेरांनी यशस्वी पाने शत्रूच्या गोटात रुजवल्या होत्या. त्यामुळे शिवाजीराजांच्या विषयी सामान्य शत्रुसैनिकाचे विचार नेहमीच गोंधळलेले राहिले.
तसेच राजांनी हेरांचा जबरदस्त उपयोग करून घेतला. आपल्या समाजातील प्रत्येक जातीतील कितीतरी माणसे त्यांच्या हेरखात्यात होती. शत्रू प्रदेशातील समाजाच्या सर्व थरातील बातम्या मिळवणे त्यामुळे साध्य झाले. शिवरायांच्या हेरखात्याचे मोठेपण इतके उत्तुंग की, हजारो हेरांमधील  बहिर्जी नाईक व त्यांच्या दोन-चार सहकाऱ्याशिवाय एकाचंही नाव कुणाला ठाऊक नाही..! केवढी ही गुप्तता व सावधपण!
प्रत्येक मोहिमा, किंवा शत्रूच्या हालचालींवर इतके बारीक लक्ष ठेवल्यामुळेच विविध रणनीतीत ते यशस्वी ठरले. म्हणूनच आग्र्याच्या त्या मुक्कामात राजांविषयी सर्व मोगली सरदारात भीतीची भावनाच जास्त प्रबळ होती. आणि याचाच पुरेपूर फायदा राजांनी उठवला नसता तरच नवल होतं. आजच्या इ-बिझनेसच्या जमान्यातही ही गोष्ट अनेकांना जमत नाही.
५.      परिणामकारक संदेशवहन आणि दळणवळण:-
आजच्या भाषेत सांगायचं तर effective communication आणि timely movements. शिवकालीन भूगोल आणि वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास केला तर कुणाच्याही लक्षात येईल की एका ठिकाणाहून दुसरीकडे त्वरेने पोहोचणे फार अवघड होते. जंगले, वाटेतील नद्या, शत्रूचा प्रदेश, अवघड डोंगर दऱ्या या सगळ्यातून मार्ग काढत इच्छित स्थळी वेळेवर पोचणे हे एक दिव्यच होते. तरीही शिवकाळात आणि नंतरही मराठी सैन्याच्या हालचाली या अतिवेगवान व अचूक राहिल्या. शत्रूला कळण्यापूर्वी सैन्य सगळ्या संकटावर मत करून तिथे पोचलेले असायचे. नद्या ओलांडण्यासाठी नावा, धान्य, दारुगोळा, शस्त्रास्त्रे पुरवणारी तुकडीही वेळेवर मदत देऊन पसारही होत असे. कोणताही मोबाईल अथवा फोन उपलब्ध नसलातरी विविध तुकड्यांमध्ये अचूक संदेश पाठवले जात असंत. शत्रूच्या हालचालींचा वेध घेत सेनापतीला अचूक माहिती मिळत असे. ज्यामुळे ऐनवेळी युद्धभूमी बदलणे, शत्रूची ताकद जास्त असल्यास पसार होणे अथवा जास्त कठीण जागी शत्रूला घेऊन जाणे हे निर्णय घेता येत त्यामुळे युद्ध जास्त परिणामकारक ठरे.
एका किल्ल्यावरून दिलेला संदेश हा साधारणतः २५ चौ. मैलांपर्यंत दिसू शकतो याचा फायदा उठवत किल्ल्यांवरून आगीचे लोळ दाखवणे, धूर करून दाखवणे, मशालींच्या सहाय्याने विशिष्ट संदेश देणे, तोफ डागणे आदि संकेतांचा प्रभावी वापर करून संदेशवहन होत असे.
राजांच्या संदेशवहनाचे यश इतके होते की शाहिस्तेखान, अफझलखान, मिर्झा राजा जयसिंग अशा शत्रू सरदारांच्या हालचाली त्यांना दर तासाला कळत होत्या. त्याही राजगडासारख्या दुर्गम ठिकाणी बसून..!
तसेच प्रसंगी राजे आपल्या एखाद्या सरदाराला विशिष्ट सूचना पाठवून काही वेगवान हालचाली घडवून आणत. त्याचबरोबर हेही सांगायला हवे की जेंव्हा राजे स्वतः एखाद्या मोहिमेवर असंत तेंव्हाही हेरखात्यांच्या बातम्या राजगडावर येत. एखादी महत्वाची बातमी मग राजांना सांगितली जाई. त्याचं उदाहरण आहेच. जेंव्हा राजे आदिलशाही वजीर खवासखान याच्याविरुद्ध कुडाळ मोहिमेत होते तेंव्हा राजगडावर बातमी कळली की मुधोळहून राजांचा दूरचा नातेवाईक बाजी घोरपडे खावासखानाला सामील व्हायला निघणार आहे. तेंव्हा जिजाबाई यांनी त्वरित निरोप पाठवला की “बाजीचे पारिपत्य करून येणे”. राजांनी त्वरीत त्याची अमलबजावणी केली व बाजीचा मुधोळ मध्ये शिरून वध केला व शहजीराजेना त्याने कैद केले होते त्याचा बदला घेतला. तुम्ही जरा नकाशा काढून पहाच की राजगड कुठे आहे, कुडाळ कुठे आहे, मुधोळ कुठे आहे. जायला यायला लागणारा वेळ मोजा मग लक्षात येईल की किती वेगाने व अचूकपणे हे घडत होते. म्हणून त्याचं फार कौतुक वाटते.

तुलनाच करायची म्हटली तर आजच्या प्रभावी तंत्रज्ञानाच्या जमान्यात, जेंव्हा फोन, उपग्रह अशा गोष्टी हाताशी असूनही आपल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना एखादी गोष्ट मीडियातून बातमी प्रसिध्द झाल्यावर कळते आणि त्यावर कारवाई अनेक महिन्यानंतर होते. शेजारी देश घुसखोरी करतो त्याची कोणतीही कल्पना नसलेले आपले नेते पार्ट्या, क्रिकेट यात मश्गुल असतात...!



६.      भौगोलिक परिस्थितीचा सुयोग्य वापर – पाठीशी उभ्या असलेल्या सह्याद्री सारख्या पर्वतरांगांचा शिवरायांनी जो वापर करून घेतलाय त्याला तोड नाही. पश्चिमेचा सागर किनारा, मधली ४०- किमी रुंदींची चिंचोळी कोकणपट्टी, पुढे असलेल्या १०-२० किमी रुंदीच्या पर्वतरांगा, त्यांचे पसरत गेलेले बालाघाट, महादेव डोंगर सारखे फाटे, नद्यांची खोरी हा सगळा भाग जाणूनबुजून स्वराज्याचा गाभा राहिला व ठेवला गेला. या परिसरातील घाटरस्ते, दुर्गम वाटा, चोरवाटा, सागर किनारे, जंगले, बाजारपेठ, खाडीकाठ या सगळ्यावर कठोर नियंत्रण ठेवले गेले. ते नियंत्रण मिळवता यावे म्हणून आधीपासून असलेले दुर्ग ताब्यात घेण्यात आले. तिथे आधी दुर्ग नसल्यास नवे दुर्ग मुद्दाम बांधून घेतले गेले. लहान मोठ्या लष्करी छावण्या विविध ठिकाणी अशा विखरून ठेवण्यात आल्या की त्यांना परिणामकारक व त्वरित हालचाल करता यावी. या सगळ्या नियोजनात तिथल्या स्थानिक माणसांचा हुशारीने वापर करून घेण्यात आला. हे एवढं नियोजन तितकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी माणसे जमावणे तितकं सोपे नाही. त्यामुळे स्वराज्यात कोणालाही थेट पदे न देता त्यांना अंगभूत गुण विकसित करण्याची संधी देण्यात आली. त्यांच्या कार्यक्षमतेकडे पाहूनच पदे दिली गेली व सर्व परिसरावर नियंत्रण मिळवले.
***********
वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांव्यातिरिक्त शिवरायांचे आरमार, युद्धनिती, व्यापार व शेती अशाप्रकारचे कितीतरी मुद्दे थोडक्यात उरकण्यासारखे नाहीत. त्यामुळे शिवरायांच्या आयुष्यातील विविध पैलूंचा वेध आपण या संपूर्ण लेखमालेतून घेतच राहूया. तेंव्हा मंडळी, माझा पुढचा लेख येईपर्यंत तुमच्या कपाटात असलेलं शिव-चरित्र पुन्हा नव्यानं वाचायला घ्या. तुमच्या प्रतिक्रियाही न चुकता सांगायला विसरू नका. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या, मला कळवा ही विनंती...!
-                    -  सुधांशु नाईक, 3-3-२०१६ ( nsudha19@gmail.com