marathi blog vishwa

Friday 29 March 2013

शिवबाराजे, तुम्ही इथे का जन्मलात?

राजमान्य राजेश्री, छत्रपती शिवबाराजे यांसी विनम्र प्रणाम.
आपणास इये महाराष्ट्र देशी “शिवजयंतीच्या दिवशी” जन्मून कित्येक वर्षे उलटून गेली आहेत. आता निश्चित कोणत्या “शिवजयंतीला” ते तुमचे तुम्ही बघून घ्यावे ही विनंती. पण आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की या देशी आपणासारखा अद्वितीय राजा होणे याउपरी शक्य नाही. म्हणूनच आम्ही सर्व जण तुमच्यासारखे आदर्श होण्यासाठी प्रयत्नही करत नाही. उलट तुम्हाला फक्त देव्हाऱ्यात बसविण्यात धन्यता मानतो, तुमची शेकडो वेळा पूजा करतो, तुमच्या नावे असंख्य गर्जना करतो..! दिसले पाहिजे ना आमचे शिव-प्रेम ?
 
तुम्हाला कदाचित कल्पना नसावी राजे, पण तुम्ही या महाराष्ट्रात हेलीकॉप्टरने जरी भटकंती केली (कारण आमचे सध्याचे सर्व राजे-महाराजे असंच करतात..!) तरी तुम्हाला महाराष्ट्राची “श्रीमंती” पाहून थक्क व्हावे लागेल. अहो, तुमच्या पुणे परिसरातील जनतेला एकेकाळी पोटभर खायला मिळत नसे, प्यायला पाणी मिळत नसे म्हणून तुम्ही बंधारे बांधायला मदत केली होती. शेतकऱ्यांना सवलती दिल्या होत्या.. हा उलटा न्याय झाला नव्हे का?? शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी राजांसाठी कवडीमोलाने द्यायच्या असतात आणि तिथे राजांनी अलिशान नगरे उभी करायची असतात हेच चांगले धोरण..! तुम्ही ते अवलंबले नाही तरी आम्ही –तुमच्या विचारांचे वारसदार हे धोरण प्रामाणिकपणे राबवत आहोत. हल्ली या परिसरात करोडो रुपये खर्चून एक नव्हे अनेक लहान मोठ्या नगऱ्या उभ्या राहिल्या आहेत, अजून होणार आहेत आणि नद्यांचे पाणी तिथे बारमाही वाहत असते.. कमोड मध्ये, स्विमिंग पूल मध्ये वापरायला पाणी हवे म्हणून..! शेतकऱ्याला कशाला लागते हो पाणी..?
राजे, तुम्ही सांगून-सवरून शत्रूच्या प्रांतात लुटालूट करायचात. आणि तो पैसा मात्र गडकोट मजबुतीसाठी वापरायचात. आजच्या भाषेत सांगायचे तर हा वेडेपणा झाला.. तुम्ही तो पैसा अशा कित्येक “सुवर्ण नगरी” बनवायला वापरायला हवा होतात. मात्र जे तुम्हाला जमले नाही ते करून दाखवण्याचे साहस आणि हिम्मत या देशीच्या थोर्थोर महाराजांकडे आहे हे तुम्हाला आता निश्चित पाहता येईल. आणि लुटालूट करण्याचा तुमचा “आदर्श” तर आम्ही जीवापाड जपलाय..! आता, बरेचदा आपल्याच लोकांची लुटालूट होते ती फक्त नजरचुकीने..!
आम्हाला इतिहास संशोधकांनी असे सांगितले होते की, झाडे लावण्यासाठी तुम्ही लोकांना म्हणे मदत करायचात. जो झाडे तोडेल त्याला शिक्षा करायचात. असे कसे हो तुम्ही जगावेगळे? झाडे ही जन्माला येतात तीच मुळी तोडून चुलीत घालण्यासाठी..! आपले आयुष्य मनुष्यासाठीच आहे हे त्यांना ठाऊकच असते. मग मनुष्याने असा उलटा विचार का करावा ? झाडे तोडून मुलुख साफ- स्वच्छ केला की कसा दाढी केलेल्या माणसासारखा तुळतुळीत गोंडस दिसतो हे आम्हालाच कळले ना..! अशा तुळतुळीत मुलखातून मग १००-२०० च्या वेगाने अलिशान परदेशी बनावटीच्या मोटारी पळवत नेण्यातील मजा तुम्हाला कशी कळायची राजे?? तुम्ही आपले उगाच जंगलातून घोडदौड करून विनाकारण थकून जात होतात, या भूमीसाठी रक्ताचे पाणी करावे लागते असे विचार करत..! हल्लीचे आमचे राजे स्वतःच्या रक्ताचे पाणी कधीच होऊ देत नाहीत कारण त्यांच्याकडे बिस्लेरीचे क्रेट असतात, बीयरचे टीन असतात. आणि त्यांचे कर्म पाहून / सहन करून दुसऱ्यांचे रक्त मात्र पाणी व्हायचे देखील विसरून जाते..!
 
गड-किल्ले म्हटले की मात्र आम्हाला तुमची न विसरता आठवण येते. आम्ही जातोदेखील गडांवर...! गाडी वरपर्यंत पोचावी म्हणून सर्वत्र रस्ते पोचले पाहिजेत असे एक फर्मान आम्ही नुकतेच सोडणार आहोत.. मात्र गडावर गेले की दिसतात अनेक रिकाम्या दगडी भिंती आणि तटबंद्या. आणि आम्हाला आश्चर्यच वाटते की, तुम्ही तिथे कोनशिला बसवायला कसे विसरलात? कोणतीही इमारत उभी राहण्यापूर्वी त्याचे भूमिपूजन कुणी केले, निधी कुणी दिला वगैरे मजकूर आणि प्रमुख मंत्री कोण उपस्थित होते हे सर्व तिथे न लिहिले तर तो आमच्या कायद्यान्वये गुन्हा आहे राजे..!! आणि तुम्ही आपले नुसते किल्ले उभे करून गायब झालात? आमचे पोलीस उगाच तुम्हाविरुद्ध खटला-बिटला दाखल करतील याचा मग आम्हीच विचार केला आणि म्हणून त्या दगडांवर आमची नावे कोरून, लिहून ठेवली..! बघा तुम्हाला पोलिसांच्या तावडीतून सोडवले की नाही??
तसेच प्रत्येक किल्ला आम्ही आता कुणालातरी आंदण देण्याच्या विचारात आहोत. एवढी जमीन रिकामी पडून राहिलेली बघवत नाही हो डोळ्यांनी..! तिथे छान रिसोर्ट झाले पाहिजे, दारू पासून सर्व सुखे तिथे हात जोडून उभी राहिली पाहिजेत असा आमचा मनसुबा आहे. एकदम स्वर्ग बनवून टाकायचा तिथे..! अगदी अप्सरांची पण सोय बाकी ठेवायची नाही असे ठाम ठरवले आहे..! आमचे मंत्री, राजे महाराजे या देशासाठी राबून फार दमतात हो..! त्यांना जरा विरंगुळा नको का...! तसेच जनतेतील प्रेमी जीवांना प्रेम करायला (हो राजे, प्रेम ही अशी सार्वजनिक ठिकाणी करण्याचीच गोष्ट आहे..!) एकतर आता शहरातून जागा शिल्लक नाहीत, त्यात तिथे जरा कुणी निवांत एकमेकाला खेटून बसले की पोलिसी दट्ट्या पाठीत बसतो..मग जायचे कुठे ? तुम्ही गड बांधून आमची ही सोय केल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत..!!
तुमचे गड आणि परिसर आम्ही आपल्या ताब्यात घेऊन टाकलेत, तिथले जीवन बदलून टाकले, जिथे अजून बदल झाला नाही तिथेही बदल घडवूनच आणणार..! हे ऐकून उदास कशाला होताय राजे..?? तुमच्या साठीच तर त्या अरबी समुद्रात आम्ही ८०० कोटींचे स्मारक बांधतोय ना? आठशे कोटी म्हणजे आठवर ७ शून्य का ८ हो राजे? बघा, कल्पनेनेच आम्हाला गरगरायला होतेय..!
एवढे आम्ही करतोय तरी तुम्ही आपले उदासच..! चला आता तुम्हाला महाराष्ट्रातील गावागावात नेतो..बघा प्रत्येक गावात किमान एकतरी चौक किंवा एकतरी रस्ता किंवा हॉटेल याला तुमचे नाव आहे की नाही? प्रत्येक ठिकाणी तुमचा किमान एक तरी पुतळा आहे की नाही?तरी तुम्ही म्हणताय लोकं विसरले म्हणून..! किती पुतळे दिसले मोजा बघू? किमान हजारभर तरी असतीलच...
“आता या देशात उरलेले कावळे आणि कबुतरे त्यामुळे खूष झाली असतील..!” राजे हताशपणे उद्गारले..
“राजे, असे बोलू नका, तुम्ही विशिष्ट पार्टीच्या भावनांना धक्का पोचवल्याबद्दल अब्रू नुकसानीची नोटीस येईल तुम्हाला..” कशाला उगाच पंगा घेताय राजे.. आपली प्रसिद्धी होते यात समाधान मानावे माणसाने..!
राजे, नाहीतरी हल्ली कोण तुमची रोज आठवण काढतंय इथं ? तुमचे विचार तर आम्ही केंव्हाच विसरून गेलोय.. कारण “इतिहासात न रमता भविष्याचा विचार करा” असेच आम्हाला शाळेपासून शिकवतात..त्यातूनही इतिहास शिकवताना तुमच्या शत्रूंचा इतिहास जास्त शिकवतात..! मग सांगा तुम्ही मोठे का ते?
अजून एक महत्वाचे विचारायचे होते.. त्या रामदासांना तुम्ही मान सन्मान दिलात तो का म्हणून? तुमचे एवढे कार्यक्षम हेरखाते.. सुरतेतील घरा-घराची तुम्हाला माहिती दिली त्यांनी, पण रामदास स्वामी हे शत्रूचे हेर होते याचीही जराही खबर त्यांना मिळाली नाही असे कसे? तुमच्या हेरखात्याच्या कार्यक्षमतेवर विश्वास कसा ठेवलात तुम्ही? “रामदास हे शत्रूचे हेर होते” असे आम्हास सध्याच्या काही थोरथोर नवीन इतिहास संशोधकांनी ठामपणे सांगितले आहे..एक तर ते ब्राह्मण, त्यात शत्रूचे हेर, तरीही तुम्ही त्यांना कसे जवळचा माणूस मानले याचे समस्त मराठी माणसास उत्तर द्यावे अन्यथा विधानसभेत तुम्हाला बोलावले जाऊ शकते हे ध्यानात ठेवावे ही विनंती. तिथे हल्ली काहीही होऊ शकते..!
तुम्हाला इतके वाईट वाटतेय म्हणून म्हणतो राजे, तुम्ही उगाच या महाराष्ट्र देशी जन्म घेतला.. अहो इथे सगळे राजेच आहेत. त्यामुळे एखादा पुतळा, एखादा नामफलक एवढीच राजांची या देशात किंमत...! हल्ली तर शाळा-कॉलेजला मंडळी आपले नाव आधीच देऊन टाकतात.. मेल्यानंतरचे कुणी सांगितलंय ? तरी तुमचे नशीब बरे म्हणून तब्बल ८०० कोटींचे स्मारक तुमच्या नावे होणार.! कधी ते फक्त विचारू नका...! आणि त्या किल्ल्यांचे प्रेम आता कमी करा, आधीच त्या इंग्रजांनी बरेचसे तोडून टाकले उरले सुरले आम्ही “स्वच्छ” करू ..लवकरच..!
काय म्हणता राजे, तुम्हाला या देशाच्या सुरक्षेची काळजी वाटते? मुळीच काळजी करू नका. शत्रूने जर आमच्यावर हल्ला केला की आम्ही अमेरिकेकडे किंवा युनोकडे कठोर शब्दात निषेध व्यक्त करू. अगदीच गरज पडली की अमेरिकन बनावटीची शस्त्रे वापरू, उगाच कशाला वेळ फुकट घालवायचा स्वतःचे शस्त्र निर्मितीचे कारखाने काढून? नाही, म्हणजे आम्हीपण सगळे तंत्रज्ञान बनवतो, पण एकेक गोष्टीची परवानगी घ्यायची म्हणजे शंभर कागदावर शंभर जणांच्या सह्या घ्यायला हव्यात, त्यानंतरही लगेच अनुदान मिळेल याची शाश्वती नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मग परदेशी कंपन्यांना कमिशन कसे मिळणार??
 
तुमचे वागणे, बोलणे, राजकारण, युद्धकारण हे जरा जगावेगळेच आहे. या सगळ्याचा देश-परदेशातील काही लोकं अभ्यास करतात ती बहुदा वेडी आहेत म्हणून..! असले फुकटे उद्योग करून पैसे थोडेच मिळतात? मात्र तरीही काहीजण नेटाने अभ्यास करताहेत.. पुढल्या वर्षी तुम्ही शिवजयंतीला भेटाल तेंव्हा आमच्या किंवा पक्षाच्या सोयीसाठी तुमचा बराच इतिहास देखील आम्ही बदललेला असेल आणि तोही इंग्रजीतून लिहिलेला असेल.. कारण हल्ली आमची पिढी “इंग्रजी माध्यमातून” शिकते. त्यांना कसा वाचता येईल? तुम्हीही इंग्रजी शिकावे हे उत्तम.
तुमच्यावर जीवापाड प्रेम केल्यामुळेच जरा कटू वाटले तरी असे बोलतोय, याचा राग मानू नका.. पण खरंच सांगतो, तुम्ही अमेरिकेत किंवा युरोपात नक्की जन्म घ्यायला हवा होता. मग तुमचे गड किल्लेच काय तर तुम्ही वापरून टाकून दिलेली फाटकी चप्पल सुद्धा सोन्यासारखी जपली असती त्या लोकांनी ..!
वाढदिवस मजेत साजरा व्हावा हीच तुम्हाला शुभेच्छा मात्र पुढचा जन्म स्वीडन किंवा स्वित्झर्लंड इ. देशांमध्ये घ्यायला विसरू नका ही कळकळीची विनंती ....!
-सुधांशु नाईक, बहरीन. (nsudha19@gmail.com)

Friday 22 March 2013

तुका म्हणे मना, पाहिजे अंकुश...!

"सुचेल तसं " लेखमालेतील हा पुढचा लेख..!
इंद्र हा एकेकाळी आर्यांचा राजा होता. आणि प्राचीन भारतावर (तेंव्हा इथे "भारत" हे नाव नव्हते) स्वाऱ्या करणाऱ्यात तो आघाडीवर असे. असे इतिहास सांगतो. नंतर त्याला देवत्व दिले गेले असावे. मात्र भारतीय साहित्यात पुराण काळापासून इंद्र ह्या देवांच्या राजाचेउल्लेख आहेत. आणि देवांचा राजा असूनही त्याचे चित्रण मात्र अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे केले आहे. इंद्र हा नेहमी विविध विकाराने ग्रस्त (काम, मत्सर, लोभ इ.), तसेच त्याच्या ताफ्यात असणाऱ्या अप्सरा वेळोवेळी वापरून घेणे ह्याचेही अनेक उल्लेख आहेत.
परवा सहज मनात विचार आला, एकूणच सामान्य माणसाप्रमाणे वागणारा इंद्र देवांचा राजा का मानला गेला ? मग असं वाटायला लागले की तो देवांचा राजा ही एक कल्पना असावी. "इंद्रियांचा राजा तो इंद्र " असे समीकरण मांडले तर मात्र बरीच कोडी पटापट सुटू लागतात.
मानवी मन हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या मधेच अडकलेले असते. हे खरे तर गुणच.. पण अतिरेकाने षडरिपू बनतात. मग प्रत्येक रिपुसाठी विशिष्ट इंद्रिये आणि त्यांना "योग्य" वेळी कार्यरत करणारी ती भावना म्हणजेच त्या "इंद्राची खेळी"..! असे अपेक्षित असेल का त्यावेळच्या ऋषी-मुनींना ज्यांनी इंद्र ही संकल्पना निर्माण केली?
एकदा इंद्र ही व्यक्तिरेखा तयार झाल्यावर मग त्याच्या शेकडो कहाण्या रचल्या गेल्या...सर्वांचा मतितार्थ एकच होता, कुणी जास्त साधक बनू लागला की इंद्राचे खेळ सुरु होतात आणि षडरीपुंच्या तावडीत बिचारा साधक पुन्हा गुरफटून जातो..! अर्थातच साधनेच्या, समाजकार्याच्या मार्गावरील व्यक्तीसाठीच हा जास्त मोठा धोका असतो कारण तो अर्धा पल्ला पार करून आलेला असतो...आणि पुढच्या पाऊलावर अडखळलेला असतो..!
या षडरिपूतून बाहेर पाडण्यासाठी अभ्यास करायचा, साधना करायची ती शिवतत्वाची..! आपले व आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे चांगल्या मार्गाने पालनपोषण करून टप्प्याटप्प्याने संसारातून मुक्त होत शिवतत्वाकडे वाटचाल करणे हाच जीवनक्रम. आणि मग इथेच हे इंद्र महाराज आपले काम चोख करू लागतात...आपल्याला शिव-तत्वापासून दूर ठेवण्यासाठी..!
थोडक्यात काय तर इंद्र म्हणजे आपणच तर नव्हे..?
मगाशी मी काम क्रोधादिकांचा गुण म्हणून उल्लेख केलाय.कारण त्या गोष्टी सर्वसामान्य आयुष्यासाठी आवश्यकच आहेत..अर्थात विशिष्ट प्रमाणात..! ज्या क्षणी त्याचा अतिरेक होऊ लागतो तेंव्हा मनातले शिवतत्व क्षीण होऊन मनातील सैतान जागा होऊ लागतो..छोट्या मुलाचेच उदाहरण घ्या ना. त्याला कायम कशाचा तरी "मोह" होत असतो, त्याला पाहिजे त्या वेळी एखादी गोष्ट मिळत नाही मग त्याच्यातील "क्रोध" वाढतो, कधी त्याचे खेळणे दुसऱ्याने घेतले कि"मत्सर" वाढतो. "मद" आणि "काम" ह्या थोड्या नंतरच्या आयुष्यातील गोष्टी.
जी माणसे लहानपणापासून खरोखरच चांगली असतात त्यांच्या बाबतील या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात म्हणून आपल्याकडील वस्तूबाबत ते कधीच Possessive नसतात. ह्या सहा गुणांचा अतिरेक झाला कि ते षडरिपू बनतात हे अशा मंडळीना माहित असते आणि म्हणून आपल्यातील शिव तत्व वाढवत नेत ते संतत्व आणि त्यानंतर देवत्वाला पोचतात. या लोकांना स्वर्गसुखाची अपेक्षा नसते कारण स्वर्ग सुख म्हणजे काय तर पुन्हा आपल्या इंद्रियांना तृप्त करणारे ठिकाण...! वेगळे काही नव्हे..! म्हणूनच यांना अपेक्षा असते ती मोक्षाची, मुक्तीची..!
मुक्ती म्हणजे कायतर संपूर्ण जीवन समाजासाठी सत्कारणी लावून खऱ्या अर्थाने अजरामर होणे...! आपल्याला मिळालेलं आयुष्य हे उगाच नाही तर आपण ह्या सृष्टीचा उत्कर्ष आणि समाजाची उन्नती करण्यासाठी मिळालेलं आहे याची जाणीव कायम मनात ठेवणे, सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी काही काही कार्य करणे म्हणजेच मुक्ती. तोच खरा माणूसधर्म.
 
काही मंडळी ह्या मार्गावर मोठ्या वेगाने चालून येतात मग अचानक कुठेतरी गडबड होते आणि त्यांच्या मनातील तो "इंद्र" विजयी होतो मग एखादा चांगला पोचलेला विश्वामित्र, दुर्वास किंवा पराशर यांसारखा ऋषी, जसा ह्या षडरिपूच्या जाळ्यात अडकून पडतो तसे देशोदेशीचे अनेक थोर थोर राजे महाराजेही. सगळे मग स्वतःची खरी प्रगती खुंटवून घेतात. अर्थात असे होणे यात अपमानास्पद किंवा वाईट काहीच नाही. मात्र तीच चूक पुन्हा पुन्हा होत राहिली तर मात्र तो चक्रव्यूह भेदणे कठीण होऊन बसते. 
म्हणूनच या "इंद्राला "डोईजड होऊ न देण्यासाठी साधना करायची..आणि साधने साठी एकांत वगैरेपेक्षा मनाशी संवाद जास्त आवश्यक आहे. असं आपलं योगविज्ञान सांगते. अगदी सोप्या भाषेत आणि तेही तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचे तर;
तुका म्हणे होय मनासी संवाद..I आपुलासी वाद आपणासी...II
मन वढाय म्हणणारी बहिणाई असो की मानस शास्त्राचा पाया असा "सांख्ययोग" निर्माण करणारे कपिल मुनी असोत, प्रत्येकाला हे ठामपणे उमगले होतेच. म्हणूनच "योगशास्त्राचा " महामेरू असे पतंजलीऋषी देखील मनावर कंट्रोल प्रस्थापित करण्यासाठी वारंवार विविध सूचना करत राहतात..!व्यास मुनींच्या महाभारतातील आपल्या सगळ्यांचा लाडका कृष्ण गीतेमध्ये हेच दोन्ही योग पुन्हा आपल्या मनावर ठसवतो. सगळ्यांचे म्हणणे एकच..."इंद्रियांवर विजय मिळवा.." 
 
या सगळ्यांना हे उमगले होते..मग आपल्याला ते का समजत नाही. किंबहुना कळते पण वळत नाही अशीच अवस्था..! मग तुमचे लक्ष विचलित करणे त्या इंद्रालासोपेच जाणार ना?? तेंव्हा असे होऊ नये म्हणून काय करावे ..यावर एका ओळीत भाष्य करणारे पुन्हा ते तुकारामच आठवतात;
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश I नित्य नवा दिस जागृतीचा II
आज "तुकाराम गाथा" आम्ही आमच्या रक्तात भिनवायाची गरज असताना लोक एकमेकाचे रक्त काढण्याची भाषा करत आहेत. जमीन पिकवायच्या ऐवजी जमिनी विकताहेत. पाणी आणि वने तर आता औषधापुरतीच उरताहेत. देव्हाऱ्यात बसवलेले तुकोबाच आज जिथे सर्वकाही हताशपणे पहात आहेत तिथे म्या पामराने या उपरी काय लिहावे ???
- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)