marathi blog vishwa

Saturday 29 November 2014

मुक्त निवांतपणाचा मस्त अनुभव !


नुकतंच जुन्नर जवळच्या " पराशर कृषी पर्यटन केंद्र" या ठिकाणी मुक्कामाला जाण्याचा योग आला. गेल्या ४-५ महिन्यातील अत्यंत व्यस्त दिनक्रमामुळे “मनापासून” या माझ्या लेखमालेतही काहीच लिहिले नव्हते. म्हणून या वेळी जरा वेगळंच लिहितोय, या कृषी पर्यटन केंद्राविषयी...

 
आपलं आयुष्य किती आणि आपण ते कसं जगतोय याचा विचार करायला सुद्धा हल्ली आपल्याला वेळ नसतो..! सतत आपण आपले गडबडीत. कामाची गडबड. कमवायची गडबड. कमवलेलं दुप्पट करायची गडबड आणि खर्च करायची सुद्धा गडबडच. रोज सकाळी उठून आपण कामाला लागतो. प्रत्येकाची कामं वेगळी. मात्र प्रत्येकाची गडबड तर इतकी की अनेकांना सकाळचा नाश्ता (घरात असो किंवा ऑफिसात) किंवा दुपारचे जेवण चांगलं होतं का वाईट हेसुद्धा ठाऊक नसतं. बरेच वेळा तर एका हाताने काही काम करता करता हातातलं sandwitch किंवा अन्य काही खाल्लं जातं. ज्या पोटासाठी आपण राबतो, त्या पोटाला नीट खायला मिळतंय की नाही हेच पाहायला जिथे आपल्याला वेळ नाही तिथे जगण्याच्या इतर गरजांची गोष्ट न बोलणंच बरं. तीच गोष्ट मोकळ्या वातावरणाची आणि जागेची. खर म्हणजे मोकळं आवार, घरातील भरपूर मोकळी जागा ही कमीच झालीय कारण ती हल्ली आपल्याला परवडत नाही. मात्र असलेलं घर आज शेकडो वस्तूंनी भरणे यालाच लोक प्रतिष्ठा / स्टेटस् समजू लागलेत. त्यामुळे मुक्त रिकामपण हरवत चाललंय.

माणसाला मुक्त रिकामपणाची आणि निवांतपणाचीही गरज आहे हे हजारों लोकांना खरंच वाटणार नाही. पण रोजच्या धावपळीच्या जगण्यातून मानसिक शांतता मिळवायला, जगण्याच्या लढाईसाठी पुन्हा नवा उत्साह मिळवायला असं निवांतपण खरंच गरजेचं आहे.

असं निवांतपण अनुभवण्यासाठी अनेक ठिकाणं आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यातीलच एक उत्तम ठिकाण म्हणजे पराशर कृषी पर्यटन केंद्र (Agritourism). मनोज व नम्रता हाडवळे यांनी Hachiko tourism अंतर्गत उभारलेली ही मस्त अशी जागा.जुन्नर मावळातील आळेफाटा हे एक मुख्य गाव. कल्याण- नगर व पुणे- नाशिक हे दोन महामार्ग इथे एकमेकाला छेडून जातात. त्यामुळे सततची वर्दळ. मोठी बाजारपेठ. याचं आळेफाट्यापासून पुढे नगर कडे निघायचं. जरा पुढे ४-५ कि.मी.वर एक छोटंसं गाव. राजुरी. या गावाच्या बाहेर एका मस्त मोकळ्या जागी हे कृषी पर्यटन केंद्र आहे.

 
आम्ही मित्र-मंडळींनी जेंव्हा या ठिकाणी जायचं ठरवलं तेंव्हा माझ्या छोट्या मुलींना सांगितलं होतं की शेताजवळच्या हॉटेल मध्ये राहायला जायचंय. त्यामुळे जेंव्हा आम्ही रात्री ८-९ वाजता तिथे पोचलो, तर गाव शांत. मस्त झोपायच्या तयारीत. गावाबाहेर च्या “पराशर” मध्ये आलो, तर मुली पट्कन म्हणाल्या, “ अरे, हे काय बाबा, तू तर आम्हाला झोपडीत घेऊन आलायस की..! इथे सगळ्या झोपड्या दिसतायत, हॉटेल असं असतंय का?”


तेवढ्यात मनोज व नम्रता यांनी फुलांचे हार घालून पाहुण्यांचं स्वागत केलं. या स्वागताने मुलींसकट सगळे आनंदले. मग प्रत्येकाला आपापल्या खोल्या दाखवल्या. झापाच्या / तट्ट्याच्या भिंती, दरवाजे, खिडक्या, लाकडाचे पलंग, मातीच्या सारवलेल्या जमिनी हे मुलांना सोडाच पण शहरातील मोठ्या माणसांना तरी हल्ली कुठे माहीत असतं? हल्ली आपल्या घरात सगळ्या कृत्रिम वस्तूच तर असतात. त्यामुळे ते वेगळेपण, त्या नैसर्गिक गोष्टी हे सगळ्यांना आवडलंच.
रात्रीचं जेवणसुद्धा साधं घरगुती. तेही डायनिंग टेबलवर नव्हे.  मस्त अशा छोट्या बैठकांवर बसून जेवायचं. समोर ताटात चुलीवर शिजवलेले गरम गरम पदार्थ. असं जेवण हे ओव्हन मध्ये गरम केलेल्या पदार्थापेक्षा छानच लागतं ही जाणीव आवश्यक होतीच..!

मी नेहमी डोंगर- दऱ्यामध्ये हिंडत राहणारा माणूस. मला निसर्गाच्या जितकं जवळ राहता येईल तितकं जास्त आवडतं. त्यामुळे माझ्यासाठी हे सर्व फार नवीन नसलं तरी माझ्या मुली, मित्र-मंडळी, माझ्या सोबत भटकंतीला येणारे या सगळ्यांनी असं वातावरण अनुभवावं असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे मी नेहमी अशा ठिकाणांच्या शोधात असतोच. “पराशर कृषी पर्यटन केंद्र” यासाठी अगदी समर्पक असं ठिकाण आहे.

मोकळं माळरान, किंचित दूरवर असणाऱ्या डोंगर रांगा, पलीकडे काही अंतरावरील शेतं, आसमंतात भरून राहिलेलं पहाटेचं प्रसन्नपण, पक्ष्यांचा किलबिलाट. आजूबाजूला प्राजक्त, जास्वंद, मदनबाण अशी फुलं उमलेली. पहाटेचं दव मातीवर, गवतावर पडल्यानं येणारा व हवेत भरून राहिलेला मंद गंध. आपल्या खोलीबाहेर पडून बाहेरच हे वातावरण, ती मुक्त आणि स्वच्छ हवा भोगताना शरीराचा रोमरोम ताजातवाना न झाला तरच नवल.

गवती चहाची पात वापरून केलेला चहा त्या आनंदात अजूनच भर टाकतो. जेंव्हा तुम्ही कधी इथे जाल, तेंव्हा अशा प्रसन्न सकाळी जवळच्या एका छोट्याशा जंगलात सकाळचा फेर फटका मारायला मुळीच विसरू नका, अर्थात, मनोज तुम्हाला तिथे घेऊन जाईलच म्हणा..!

गावापासून ५-६ कि.मी.वर निलगिरीचे जंगल आहे. इतरही अनेक वृक्ष आहेत पण वन-विभागाने खास तिथे निलगिरीचे वृक्ष लावून नवं जंगल बनवलंय. बांध घालून एका छोट्या नदीचं पाणी अडवलंय. त्या लहानशा धरणामुळे आजूबाजूच्या शेतीला अगदी मार्चपर्यंत पाणी मिळू शकतं.

 सकाळी सकाळी जेंव्हा आपण तिथे फिरायला जातो, तेंव्हा आसमंतात निलगिरीचा मंद गंध जाणवतो. शांत स्तब्ध असं त्या जलाशयाचं पाणी नकळत आपल्या मनालाही शांत शांत करून जातं. त्या पाण्यातील बाजूच्या झाडांची प्रतिबिंब पहात तुम्ही कितीही वेळ तिथं बसू शकता. आजूबाजूला मोर दिसतात. त्यांचा केकारव, इतर पक्ष्यांचा किलबिलाट, सकाळची लोभस प्रसन्न सूर्यकिरणे हे सगळं सगळं मनामनात झिरपत जाते.
रोजच्या दगदगीच्या आयुष्यामुळे निर्माण झालेल्या मानसिक व शारिरीक थकवा मग कधी कमी होऊ लागतो ते कळतच नाही. फक्त त्यासाठी हा निसर्ग उघड्या डोळ्यांनी-मुक्त मनांनी अनुभवायला हवा. स्वतःचं आभासी वेगळेपण विसरून निसर्गाचं खरं वेगळेपण पाहायला हवं.

 सकाळच्या त्या रपेटीने मनोवृत्ती उल्हसित झालेल्या असतात आणि पोटातून भुकेची जाणीवही.
आपण “पराशर” मध्ये परततो, तर तिथं गरमागरम नाश्ता तयारच असतो. थालीपीठ, पोहे असं अस्सल मराठमोळं काहीतरी समोर येतं. सगळे अगदी जाम तुटून पडतात. मनसोक्त नाश्ता कसा करायचा असतो, हे पुन्हा उमगतं. मग आपण “किती दिवसापूर्वी असं मस्त हादडलं होतं” हेच आठवू लागतो..!

 
नाश्ता, आंघोळ इ. उरकून तुम्ही जेव्हा तयार झाल्यावर दिवसभरासाठी विविध पर्याय (मराठीत सांगायचं तर “ऑप्शन” हो..) आहेत. तुम्हाला पाहिजे तर बाजूच्या छोट्या मचाणावर तुम्ही नुसतेच निवांत बसून राहू शकता. काही वाचायचे असेल तर इथे ऑफिसमध्ये छोटे ग्रंथालयपण आहे.

आणि बाहेर आजूबाजूच्या परिसरात भटकंती करायची असेल तर अनेक पर्याय खुले आहेत.
त्यातले एक रम्य व अद्भुत ठिकाण म्हणजे सुमारे ११ कि.मी.वरील गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल किंवा शिला सेतू. नगर रोडवर बेल्हे गावाच्या पुढे “अणे घाटात” डाव्या बाजूच्या लहानशा दरीत हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

आपला सह्याद्री हा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलाय वगैरे आपण भूगोलाच्या पुस्तकात कधीतरी वाचलेलं असतं. मात्र पर्वत बनताना ते वेगवेगळ्या थरांनी (layers) बनलेले असतात. बसाल्ट खडक, मुरूम किंवा जांभा दगड, चुनखडीचे खडक असे जमिनीतील खडकांचे विविध प्रकार आहेत.

 गुळंचवाडीजवळील या ठिकाणी हे आपल्याला लगेच पाहायला मिळते. या ठिकाणी डोंगराच्या कुशीतून एक मोठा झरा किंवा छोटीशी नदी वाहत येते. उतारामुळे इथे वेगवान झरा, धबधबा तयार होतो. मात्र हजारो वर्षापूर्वी इथे दगडावरून उडी मारून खाली उतरायच्या ऐवजी पाण्याच्या या लहानशा पण वेगवान प्रवाहाने तिथे बोगदा तयार केला. बोगद्यातील ठिसूळ खडक पोखरून पाणी पुढे निघाले आणि दुसरीकडून बाहेर पडले. वरचा घट्ट कठीण खडक तसाच तिथे राहिला आणि एक नैसर्गिक सेतू किंवा पूल तयार झाला ! सुमारे २१ मी. रुंदीचा हा पूल आहे. या पुलाखाली तसेच पुलाच्या वरील बाजूसही आपल्याला सहज जाता येते.
संपूर्ण जगात अशाच अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच काही जागा आहेत. त्यापैकी एक जागा इथे या गुळंचवाडीजवळची !! म्हणून हे निसर्गाचं देणं आपण पाहिलं पाहिजे, त्यामागचे विज्ञान मुलांना समजावून दिले पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांसाठी त्याचे जतन केले पाहिजे.

घाटाच्या रस्त्यावरून खाली १० मिनिटात जाता येते. झाडीतून दरीत उतरत जाणारी पायऱ्यांची छोटीशी वाट आहे. दरीत देवीचं छोटेसे देखणे मंदिर आहे. बाजूला वाहणारा झरा व हा दगडी सेतू आहे.
या ठिकाणी छान वेळ घालवून जेंव्हा परत आपण “पराशर” कडे जाऊ लागतो तेंव्हा वाटेतील बेल्हे गाव पाहायला हरकत नाही. पंचक्रोशीतील हे एक मुख्य खेडेगाव आहे. इथे मोठा बाजार भरतो. बैलांचा बाजार असतो. खेड्यातलं वातावरण, बाजारहाट पहायची इच्छा असेल तर आपण इथे फेरफटका मारू शकतो.
या शिवाय जुन्नर परिसरात शिवरायांचे जन्मस्थान शिवनेरी, चावंड, जीवधन असे प्राचीन दुर्ग, लेण्याद्री व ओझरचा अष्टविनायक, पळशीचा पेशवेकालीन वाडा  तसेच नदीकाठील मंदिरे, वडगाव दर्या चे लवणस्तंभ, निघोजचे रांजणखळगे, खगोल विज्ञानासाठी उपयुक्त ठरलेल्या खोडद जवळच्या अजस्त्र दुर्बीणी , नारायणगड असं खूप काही पाहण्यासारखं आहे. मात्र त्यासाठी किमान 3-४ दिवस इथं राहायलाच हवं.
 
“पराशर” मध्ये दुपारी परतला की मस्त सुग्रास जेवण तयार असते. एक मुद्दाम सांगायला हवे की इथे मांसाहार, मद्यपान चालत नाही. अस्सल ग्रामीण चवीचं शाकाहारी जेवण मात्र त्याची कमतरता भासून देत नाही. हिरव्या/ लाल मिरचीचा ठेचा, लोणचं, चटण्या, आमटी-भात, भाजी, चपाती/भाकरी याबरोबर “जुन्नर भागातील स्पेशल अशी मासवडी” रस्श्यासोबत खायची मजा काही और आहे. आणि असं तुडुंब जेवल्यावर तास-दोन तास झकास ताणून झोपायला हवंच ना...!

 जेंव्हा मोठी माणसे खाऊन मस्त घोरत पडलेली असतात तेंव्हा मुले मात्र छान दंगा-धुडगूस करू शकतात.
इथे कृत्रिम अशी कोणतीही खेळणी नाहीत. आजकाल शहरात बिचाऱ्या मुलांना अशा खेळण्यांशिवाय काही पर्याय नसतो. मात्र मुलांना त्या खेळण्यापेक्षा निसर्गात मनसोक्त हुंदडायला आवडते हे अनेकांच्या लक्षात येते ते “पराशर” सारख्या विविध ठिकाणी आल्यावरच..!

इथं मुलं गवतात खेळतात, मातीत खेळतात आणि झाडं-पानं-फुलांच्यात रंगून जातात. इथे असलेल्या छोट्या नावाच्या कुत्र्याशीही ती खेळू शकतात. लाकडाच्या लहानशा पुलावरून इकडे तिकडे धाऊ शकतात.शहरात कधी बुजल्यासारखी वावरणारी मुलं इथं मोकळी मोकळी होतात.

संध्याकाळी हवं तर tractor मधून आजुबाजुच्या शेतावर जाता येतं. विविध मोसमाप्रमाणे कुठे, कुठे नांगरणीसुरु असते, तर कुठे पेरणी. कुठे धान्य तयार होऊन खळ्यावर पडलेलं असतं. शेतीच्या विविध अवजारांची माहिती घेता येते. ग्रामीण भागात गेल्या अनेक पिढ्यांनी कोणत्याही लौकिक शिक्षणाशिवाय जोपासलेलं “इंजिनिअरींग” पाहता व अनुभवता येते. जगायला आवश्यक अशी त्यांची “वास्तववादी योजना” समजून घेता येते. चालताना मध्येच नीट बनवलेली शेत-तळी दिसतात. कुणाच्या शेतात काकड्या, कुणाच्या शेतात द्राक्षं, कुणाच्या शेतात डाळिंबाची लागवड केलेली असते. आपल्या मुलांना या वस्तू कशा निर्माण होतात हे दाखवता येतं. त्यांनाही एखादी काकडी झाडावरून तोडून विकत घ्यायला मजा वाटते. इथे परिसरात  दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने गावठी व जर्सी गाईंचे / म्हशींचे गोठे आहेत. गाईचे दूध काढणे मुलांना इथं जरूर पाहता येतं. आज काही एकरावर पसरलेलं “पराशर कृषी पर्यटन केंद्र” हे या अशा आजूबाजूच्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा उपयोगी ठरलंय. इथे येणाऱ्या पाहुण्यांनी केलेल्या खरेदीतून त्यांनाही काही उत्पन्न मिळू लागलंय.

इकडे तिकडे असं हुंदडत, नवं काही पहात असताना संध्याकाळ होते. आकाशातील रंग क्षणा-क्षणाला बदलतात. सूर्यास्ताची रमणीय गंभीरता शांतपणे पाहताना भान हरपून जातं. मग जाणवतं की शहरातील आपल्या वातानुकुलीत ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करताना आपण कितीतरी महिन्यात अशी शांत संध्याकाळ पाहिलीच नाहीये..!

रात्री “पराशर” मध्ये प्रत्येकाला आपले कलागुण दाखवायची संधी मिळते. कुणी गावं, कुणी नकला कराव्यात, कुणी नाचून दाखवावं. जे आवडतं ते मुक्तपणे करावं. गावातील स्थानिक कलाकार सुद्धा इथे सामील होतात. संबळ वाजू लागते. “आई भवानीच्या” नावानं गोंधळ रंगू लागतो...! एक मुक्तपणे जगलेला दिवस पाहता पाहता संपलेला असतो.

अन्न-वस्त्र-निवारा या गरजानंतर, रात्रीच्या वेळी लुकलुकणाऱ्या लाखो ताऱ्यांचं निरभ्र आकाश, प्रदूषण-मुक्त हवा, मस्त वाहणारा गार वारा, वेलीवर भरभरून फुललेली जाई किंवा रातराणी आणि आपल्या जिवलगाची सोबत...! जगायला खरं म्हणजे आणि काय हवं असतं?

आता थोडंस हे पर्यटन केंद्र उभं करणाऱ्या मनोज-नम्रताविषयी. कायमस्वरूपी नोकरीत रुजू असलेला मनोज काहीतरी वेगळंच जगण्याच्या इच्छेने अस्वस्थ होतो. एकेदिवशी घरच्यांसमोर आपला निर्णय सांगतो आणि त्याचे आईवडील, भाऊ सर्वतोपरी मदत करायला सरसावतात. घर आणि घरातील दागिने मदतीला धावुन येतात आणि “hachiko tourism” चे कृषी पर्यटन केंद्र बनवण्याच्या इच्छेने प्रयत्न सुरु होतो..बघता बघता यशस्वी होतो.. इथल्या प्रत्येक गोष्टीला  “ग्रामीण टच” देण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

त्याला व त्याच्या पत्नीला- नम्रताला छायाचित्रण (फोटोग्राफी)ची आवड आहे. उत्तम पुस्तकं वाचायची आवड आहे. नम्रता छान चित्रंही काढते. एकमेकांना अनुरूप असं हे तरुण जोडपं आहे. त्यांच्या या ठिकाणी कामाला असणाऱ्या ताई-दादा यांच्याकडे त्यांचं लक्ष आहे. त्यांच्या कुटुंबांची काळजी घेण्याइतकं मोठं मन दोघांच्याकडे आहे.

आमच्याशी बोलताना मनोज म्हणाला, “वडिलांनी कायम वेगळे जगायची प्रेरणा दिली. आत्मविश्वास दिला. इतर लोकं एखादी गोष्ट करतात म्हणून करण्यापेक्षा तुम्हाला जे मनापासून करायला आवडेल ते करा. वडिलांच्या अशा पाठिंब्याने आम्हा भावंडाना रस्ता सापडला. भाऊ मंगेश हाडवळे हा चित्रपट -दिग्दर्शक बनला. “टिंग्या [लेखक, दिग्दर्शक, संवाद], देख इंडियन सर्कस [हिंदी चित्रपट अजुन प्रदर्शित व्हायचाय-,लेखक, दिग्दर्शक] टपाल [निर्माता, लेखक] हे त्याने केलेले चित्रपट लोकांना खूप आवडलेत.
तसंच माझंही. त्यामुळे जेंव्हा नोकरी सोडायची ठरवलं तेंव्हा जास्त त्रास नाही झाला. पुढचे कित्येक दिवस प्रचंड मेहनत केली. एकेकाळी अगदी आळेफाट्यावरून ट्रक भरून कांदे नेऊन केरळात विकलेत. पण ठरवलेलं करायचं अशी जिद्द होती. आता लग्नानंतर नम्रताची पण साथ मिळालीय. ती तर पुण्यातलं शहरी सुखासीन जगणं सोडून इथं माझ्याबरोबर राहतीय. दोघे मिळून आलेल्या लोकांना जास्त आनंद मिळावा म्हणून काही नं काही करत राहतो.” 
प्रत्येकाला खरं तर असं काही वेगळं करायचं असतंच. पण आजूबाजूची परिस्थिती, स्वतःचा आत्मविश्वास आणि आपल्या भोवतीचा “कोष” तोडायची तयारी नसते. आपल्या comfort zone मधून बाहेर पडायची भीती वाटत असते. मात्र मनोजसारखे तरुण जेंव्हा असे कोष तोडायची ताकद दाखवतात तेंव्हा तीच त्यांच्या यशाची खरंतर पहिली पायरी असते.

Hachiko (ह्याचिको) हे एका जपानी कुत्र्याचे नाव. कृषी विभागातील प्राध्यापक असलेल्या आपल्या धन्याला - रोज शिबुया या रेल्वे स्टेशन वर घ्यायला येणारा हा कुत्रा. एक दिवस तो प्राध्यापक मरून जातो आणि स्टेशनवर येऊ शकत नाही. मात्र तरीही पुढची नऊ वर्षे हा इमानी कुत्रा धन्याची इथे रोज ठरलेल्या वेळी वाट पहात उभा राहतो. शेवटी १९३५ मध्ये मरून जातो. “इमानीपणा” चे प्रतीक बनलेल्या या कुत्र्याची कहाणी जपानमध्येच नव्हे तर जगभर लोकप्रिय आहे. 
जपान मध्ये त्याचं स्मारकसुद्धा उभं आहे.


रिचर्ड गेरे या सुप्रसिद्ध अभिनेत्याने या कहाणीवरील गाजलेल्या चित्रपटात कामही केले आहे. “Hachiko tourism” च्या माध्यमातून याच इमानीपणाने “कृषी पर्यटन” क्षेत्रात काम करण्याची मनोजची दृढ धारणा आहे. आणि त्यासाठी तो कायम प्रयत्नशील आहेच.

“पराशर कृषी पर्यटन” केंद्रामधील किमान २-३ दिवसाचं वास्तव्य तुम्हाला जगण्याचं खरं सुख अनुभवायला नक्कीच शिकवतं. इथे तुमच्या किमान गरजा भागवण्यासाठी सर्व आहे. मात्र टीव्ही, अद्ययावत चकचकीत यंत्र नाहीत. किंबहुना ती नाहीत म्हणूनच “पराशर” सुंदर आहे. आजवर देश-विदेशातील अनेकांनी इथे येऊन इथल्या नैसर्गिक राहणीमानाचा मुक्त अनुभव घेतलाय. तुम्हीही इथे जरूर भेट द्या. शक्यतो मोबाईल बंद ठेऊन आलात तर उत्तमच. नपेक्षा त्याला तुमचं इथलं वास्तव्य डिस्टर्ब करू देऊ नका.

 आम्ही जेंव्हा परत निघालो तेंव्हा, माझ्या मुली नम्रताला बिलगल्या. “बाबा, हे कुठे झोपडीत घेऊन आलायस आम्हाला?” असं म्हणणाऱ्या या मुली तिसऱ्या दिवशी तिला सोडून आमच्या बरोबर यायला जराही तयार नव्हत्या.

हीच इथल्या मोकळ्या वातावरणाची गंमत आहे. हे मोकळेपण, हे निवांतपण तुमचा थकवा तर दूर करतंच पण पुढच्या दैनंदिन लढाईसाठी तुम्हाला उर्जा देऊन जातं. म्हणूनच माझी खात्री आहे की माझ्या चिमुरड्या मुलींप्रमाणे इथून निघताना तुमचाही पाय जड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बाहेर पडत असतांनाच पुन्हा कधी यायचं याचा प्लान तुमच्या डोक्यात नक्कीच तयार होऊ लागेल...!!

- सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
 
संपर्कासाठी पत्ता :-
मनोज हाडवळे, पराशर कृषी पर्यटन केंद्र, राजुरी.
कल्याण-नगर हायवे, ता- जुन्नर
संपर्क : +91 9970 515 438,+91 9028 844 222, +91-7038 890 500