marathi blog vishwa

Friday 19 June 2020

पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे!

इतिहासाच्या पोतडीतून ही लेखमाला जगावेगळं या फेसबुक पेजवरुन प्रसिध्द होत आहे. त्यातील 13 जून 2020 रोजी प्रसिध्द झालेला हा भाग तिसरा!
प्रत्येक राजासाठी काही सहकारी हे फार मोलाचे असतात. काही प्रसंगात ते असं काही काम करून जातात की केवळ राजाच नव्हे तर आपण सारे त्यांचं ऋण आयुष्यभर विसरू शकत नाही. शिवकाळातील असं एक पहाडासारखे व्यक्तिमत्व म्हणजे कान्होजी जेधे..! जाणून घेऊया त्यांच्याबाबत...
पहाडासारखे बळवंत कान्होजी जेधे !
कान्होजी जेधे. भोर जवळील हिरडस मावळातील कारीचे. एखाद्या भक्कम दुर्गाप्रमाणे असलेला  हा बुलंद माणूस. त्यांची जन्मकथाही अद्भुत. असं सांगतात की जेधे घराण्यात मोठी भाऊबंदकी. त्यातून कान्होजी पोटात असताना जेध्यांच्या वाड्यात मोठी धुमश्चक्री उडाली. त्यात कान्होजींचे वडील वगैरे लोकांची हत्या झाली. भिवजी आणि सोनजी जेध्यांनी भावासह इतरांना कापून काढले. पोटुशी असलेली कान्होजींची आई अनुसयाबाई  त्यातून वाचली. मात्र कान्होजींच्या जन्मानंतर भिवजी आणि सोनजी पुन्हा त्यांच्या जीवावर उठले. अनुसयाबाई आणि मुलाची काळजी घेणाऱ्या देवजी महाला यानं हुषारीनं त्यांना वाड्याबाहेर काढले. त्या दोघांच्या ऐवजी एक दाई आणि तिचं मूल बळी पडलं.
देवजी मग लहानगा कान्होजी आणि त्याच्या आईला घेऊन थेट अनुसयाबाईच्या माहेरी मांढरगावात आला. तिथलं मांढरे यांचं घर हेही भिवजी/ सोनजी यांच्या दहशतीने घाबरलेले. त्यांनी आसरा द्यायला नकार दिला. मग देवजी या मायलेकरांची काळजी घेत मोसे खोऱ्यातील धनगर वाड्यात राहू लागला. तिथं मग त्याची सरदार  बाजी पासलकर यांच्याशी ओळख झाली. बाजींचं सगळ्या परिसरात एक सज्जन आणि  बलवान सरदार म्हणून नाव होतं. त्यांनी सगळी कथा ऐकून घेतली आणि या सर्वांना प्रेमाने आश्रय दिला. कान्होजीला तलवारबाजी, घोडेस्वारी आदि सगळं शिक्षण दिलं. बाजींना मुलगा नव्हता त्यामुळे आपल्या मुलावर करावं तसे प्रेम त्यांनी कान्होजीवर केले. इतकंच नव्हे तर त्यांना आपला जावई करून घेतलं. 

कान्होजी मोठे झाल्यावर मग बाजींनी कान्होजीना त्याच्या काकांच्या दहशतीचा इतिहास सांगितला. आणि बाजी पासलकर यांनी कान्होजीना घेऊन सैन्याच्या तुकडीसह कारी गावात हल्ला केला. कान्होजीनी आपल्या दुष्ट काकांना देहदंड दिला आणि पुन्हा कारीचे वतनदार बनले. १६३५ पर्यंत ते आदिलशाही सरदार रणदुल्लाखान यांच्याकडे चाकरी करत होते. 
शहाजीराजे जेंव्हा निजामशाही खांद्यावर घेऊन लढत होते तेंव्हा त्यांना जेरबंद करायला १६३६ मध्ये प्रत्यक्ष शाहजहान बादशहा आणि आदिलशाह यांनी संयुक्त मोहीम काढली. माहुलीच्या बळकट दुर्गाजवळ मोठी लढाई झाली. अखेर शहाजीराजे पराभूत झाले. तहानुसार त्यांना सह्याद्री सोडून आदिलशाही चाकरीत कर्नाटकात जावे लागले. यावेळी रणदुल्लाखान यांच्या चाकरीत असलेले कान्होजी जेधे आणि दादोजीपंत लोहोकरे हे त्यांचे कारभारी शहाजीराजांच्या पदरी दाखल झाले.

कान्होजीना पाच बायका होत्या; सावित्रीबाई, येसूबाई, चंदुबाई, कृष्णाबाई आणि रखमाबाई अशा नावाच्या. त्यांच्यापासूनची पाच मुलेही होती, बाजी, चांद्जी, शिवजी, नाईकजी आणि मताजी या नावाची. बाजी जेधे हा मुलगा बाजी पासलकर यांच्यासोबत शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या दिवसात सहभागी होता. फात्तेखानासोबत महाराजांची जी पहिली लढाई झाली तेंव्हा पुरंदर जवळ खळद- बेलसर च्या लढाईत मराठ्यांचं निशाण वाचवत बाजींनी पराक्रम गाजवलेला. तेंव्हा महाराजांनी त्यांना “सर्जेराव” हा किताब बहाल केलेला. फत्तेखानाच्या पराभवानंतर त्याचा पाठलाग करत जाताना झालेल्या युद्धात बाजी पासलकर हे स्वराज्याचे पहिले सेनापती धारातीर्थी पडले. यावेळी शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैद केले होते. वजीर मुस्तफाखान, अफझलखान आणि बाजी घोरपडे या शिवरायांच्या नातेवाईकाने शहाजीराजांना कैद करून जिंजी येथे ठेवले होते. तिथेच कान्होजी आणि दादोजीपंत लोहोकरे हे देखील कैदेत होते.

फत्तेखानाचा शिवाजीराजांनी या पहिल्याच मोठ्या लढाईत संपूर्ण पराभव केला तर त्याचवेळी त्यांचे भाऊ संभाजीराजे यांनी बंगळूरच्या लढाईत फर्राद्खान याचा पराभव केला. मग मोगली बादशहाचा मुलगा मुराद याच्यामार्फत शिवरायांनी राजकारणाचा डाव टाकला. आदिलशाहीवर दबाव टाकून वडिलांची सुखरूप सुटका करवून घेतली. यानंतर शहाजीराजांनी  कान्होजी जेधे व लोहोकरे यांना १६४९ नंतर पुण्याला पाठवले. ते आल्यामुळे शिवरायांची ताकद वाढली. जेधे यांचे मावळात खोपडे आणि बांदल यांच्याशी हाडवैर होते. मावळातील बरेचसे सरदार असेच आपापसात लढत होते. एकमेकांचे जीव घेत होते. त्या सर्वाना एकत्र करायला सुरुवात झाली ती शिवकाळात..! 

जेधे, बांदल, पासलकर, शिळीमकर, कोंढाळकर, ढमाले, कोंडे देशमुख, मालुसरे, कंक आदि अनेक घराणी स्वराज्याच्या कार्यात सहभागी झाली. तरीही जे शिवरायांशी दुष्मनी बाळगून होते त्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या वीरांना शेवटी नमवले गेले. जावळीपासून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा मुलुख स्वराज्यात आला. पुरंदर, लोहगड, तुंग, तिकोना, रायगड, राजमाची, प्रबळगड, सरसगड, सिंहगड आदि बलवान दुर्ग स्वराज्यात दाखल झाले.या सर्व धामधुमीत सरसेनापती माणकोजी दहातोंडे, नेताजी पालकर यांच्यासह शिवरायांचा मुख्य आधार होते ते कान्होजी जेधे..! पाहता पाहता नव्याने बांधलेली राजधानी राजगड आणि शेजारचा  तोरणा उर्फ प्रचंडगड हे गड स्वराच्याच्या गाभ्यातील प्रमुख आणि भक्कम ठिकाण बनले. प्रतापगड सारखा नवा दुर्ग बांधून तयार झाला. आणि आता एका मोठ्या युद्धाची नांदी दिसू लागली. शिवाजीराजांचे हे वाढते बळ आदिलशहाला दिसत होते. आता तर जावळीचे खोरे ही गेले. मग शिवरायांना नेस्तनाबूत करायला मोठ्या सरदाराची नेमणूक झाली. तो होता अफझलखान. वाईचा आणि जावळीच्या सुभ्यावर त्याचा अंमल होता. 
जून १६५९ मध्ये आदिलशहाने  कान्होजींसह मावळातील अनेक वतनदार मंडळींना खलिते पाठवले. त्यात असे लिहिले होते की;
“ शिवाजीने निजामशाही कोकणातील मुसलमानांना त्रास देऊन, लुट करून तिथले आणि आदिलशाही मुलुखातील कित्येक किल्ले हस्तगत केले आहेत. यास्तव शिवाजीच्या पारिपत्यासाठी अफझलखान महमंदशाही यास सुभेदारी देऊन नामजद केले आहे. तरी तुम्ही खानाचे रजामंदीत व हुकुमात राहून शिवाजीचा पराभव करून निर्मूळ फडशा पाडावा. शिवाजीच्या पदरच्या लोकांस ठार मारावे आणि आदिलशाही दौलतीचे कल्याण चिंतावे. तसे न केल्यास परिणाम चांगला होणार नाही...
या फर्मानापुर्वीही कान्होजीना चाकरीबाबतचे फर्मान आले होतेच. मात्र ह्या फर्मानातील भाषा जरबेची होती. असे फर्मान मिळताच मावळातील वतनदार मंडळींच्यात खळबळ उडाली. खंडोजी खोपडे, सुलतानजी जगदाळे आदि मंडळी खानच्या फौजेत दाखल झाली. कान्होजींच्या पुढे मोठा पेच निर्माण झाला. ते त्वरेने उठले, आपल्या पाचही मुलांना सोबत घेऊन थेट राजगडावर आले.

आदिलशाही फर्मान त्यांनी महाराजांना दाखवले. महाराजांना कान्होजींची परीक्षा पहायची असावी.. महाराज उद्गारले, “ नाईक, तुम्हीही आता विचार करा. अन्य वतनदारही खानाला सामील होत आहेत. तुम्ही आमच्यासोबत राहिलात तर तुमचे वतन जाणार आणि तुमच्या जिवालाही धोका.. तुम्ही देखील इतरांसारखे आदिलशाही सैन्यात जा. आम्ही तुमची मनःस्थिती समजू शकतो..”

महाराज असे बोलले आणि एखाद्या धिप्पाड पर्वतासारखे असणारे कान्होजी गदगदले. पुढे येत महाराजांना म्हणाले; “ महाराज, गेली तेवीस वर्षं शहाजीराजांशी इमान ठेवले. त्यांच्या सांगण्यावरून गेली ८-९ वर्ष तुमची सोबत केली. आता आम्ही व आमचे पुत्र स्वराज्यासाठी खस्त होऊ पण हरामखोरी करणार नाही... वतनाचा लोभ आम्हास नाही.. हे पहा आम्ही आमच्या वतनावर पाणी सोडले...” असं सांगत त्यांनी जवळचा पाण्याचा तांब्या उचलला आणि आपल्या हातावरून पाणी महाराजांच्या पावलांवर सोडले.

महाराज थक्क झाले. पट्कन बैठकीवरून उठले. कान्होजीना आलिंगन देत उद्गारले, “ नाईक, तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहिलात. आता आम्हाला शंभर हत्तींचे बळ आले. आपण गनिमाचे पारिपत्य करू. तुम्ही मावळच्या सर्व देशमुखांना एका जागी बैसोन सर्व मनसुबा सांगावा. त्यांना जोडून घ्यावे. तसेच पुढची धामधूम पाहता तुमचा कुटुंब कबिला कारीहून घाटाखाली तळेगाव ढमढेरेकडे हलवावा.” आणि कान्होजी निघाले. 

मावळातील समस्त देशमुखास एकत्र केले. सर्वाना मनसुबा सांगितला. ही आपली मोठी लढाई. आता अफझलखानाचे निर्दालन केले की हे आपले राज्य. आपले स्वराज्य. आता कुणा बादशहासाठी मरायचे नाही. लढायचे नाही. आपल्या राज्यासाठी लढायचे. मी माझ्या वतनावर पाणी सोडून आलो. आता जे करायचे ते मऱ्हाट राज्यासाठीच..!

कान्होजींची जरब मोठी.. त्यांच्याप्रती सर्वाना आदर ही तितकाच. पाहता पाहता सगळा मावळ प्रांत कान्होजीनी एक केला. अफजलखान वाईला आला. आणि मग मुत्सद्दी महाराजांनी गोपीनाथकाका बोकील यांच्यामार्फत  खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी ओढून आणले आणि शेवटी खानाचा वध केला. कोयनेच्या तीरावर जावळीच्या खोऱ्यातील पार, कुंभरोशी, मेटतळे आदि गावांजवळ भीषण युध्द झाले. मराठ्यांच्या फौजेने खानच्या फौजेची दाणादाण उडवली. हजारो हशम मरण पावले. कित्येक जखमी झाले. कित्येकांनी मराठ्यांची चाकरी पत्करली. प्रचंड लूट मिळाली. त्यापुढील १५ दिवसात कोल्हापूरपर्यंतचा आदिलशाही मुलुख स्वराज्यात आला... सहा महिन्यांपासून जावळीच्या खोऱ्यात धुमसत असलेली मोहीम फत्ते झाली..!
महाराजांनी मग सर्वांच्या कौतुकासाठी दरबार भरवला. जीवा महाले, संभाजी कावजी, शिळीमकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक आदि अनेकांचे सत्कार केले.  गोपीनाथ काका बोकील आणि कान्होजी यांचं योगदान सर्वात मोठं होतं. गोपीनाथ काकांचा सन्मान केला.त्यांनी मग कान्होजीना बोलावले. आणि तलवारीच्या मानाचे पहिले पान त्यांना दिले.
 शाहीर अज्ञानदास पोवाड्यात म्हणून सांगून गेले..

अंगद हनुमंत रघुनाथाला / तैसे जेधे बांदल शिवाजीला...

जेधे आणि बांदल खरे तर एकमेकांचे मोठे वैरी होते. स्वराज्याच्या कामात मात्र शिवाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले. इतकंच नव्हे तर पावनखिंडीच्या लढाईत जेंव्हा बाजीप्रभूसह बांदलांची एक मोठी तुकडी संपूर्ण खर्ची पडली तेंव्हा कान्होजीनी मोठ्या मनाने तलवारीचा आपला पहिला मान बांदलांना देऊन टाकला. असे दिलदार शूर होते कान्होजी..! शाहिस्तेखानाची स्वारी स्वराज्यात दाखल झालेली. त्यावेळी कान्होजी थकले होते. कारी-आंबवडे येथे आपल्या वाड्यात होते. आपल्या प्रकृतीची खबर महाराजांना पाठवून कान्होजी पत्रात लिहितात, “ माझी सर्व मुले आणि देशमुखीचे वतन आपले पायांवर ठेवले आहे.आपण त्यांचा सांभाळ करावा. आणि १६६० मध्ये कान्होजींचे निधन झाले. महाराजांना वाईट वाटले त्यांच्यावर असलेले एक वडिलकीचे छत्र कायमचे हरपले..!
कान्होजीन्सारखी माणसे होती म्हणूनच  स्वराज्य उभे राहिले. साल्हेरपासून जिंजी तंजावर पर्यत ते  वाढत गेले..! कान्होजीन्सारख्या हजारो लाखो लोकांनी कोणत्याही फायद्याची अपेक्षा न करता प्रसंगी जीवावर उदार होत झुंज दिली त्यामुळेच हे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांच्या नंतरही २७ वर्षे बादशाहाशी झुंजत राहिले. या साऱ्या वीरांचे  स्मरण आपण नित्य जपलं पाहिजे. भोर परिसरातील कारी-आंबवडे येथे जाऊन कान्होजींच्या समाधीच, वाड्याचे दर्शन घेऊन तिथं अवश्य नतमस्तक होऊ या..!

सुधांशु नाईक, कोल्हापूर
९८३३२९९७९१
nsudha19@gmail.com

संदर्भ – 
शिवकालीन पत्र-सार संग्रह आणि जेधे शकावली
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख
राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे

जलदुर्ग खांदेरी व इंग्रजांची शरणागती

इतिहासाच्या पोतडीतून लेखमालेतील हा भाग दुसरा. जगावेगळं या फेसबुक पेजवर 06 जून 2020 रोजी प्रसिध्द झालेला.
नुकतंच ज्येष्ठ त्रयोदशीला, ६ जूनला शिवराजाभिषेक दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने शिवकालातील इतिहासाला उजाळा मिळाला आहे. शिवरायांच्या शेवटच्या काही वर्षात कोकण आणि पश्चिम किनाऱ्यावरील त्यांच्या हालचालीने, एका विशिष्ट युद्धाने प्रत्यक्ष इंग्रजांना कसं हताश केलं याविषयी आज जाणून घेऊया...

जलदुर्ग खांदेरी आणि इंग्रजांची शरणागती....

१६६०-६५ च्या काळात एक महत्वाची घटना घडली आणि पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात असलेलं मुंबई बेट इंग्रजांना देऊन टाकलं. बेट भारताचे आणि व्यवहार करणारे हे त्रयस्थ. अर्थात याविरुध्द कुणी फार काही प्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याचं इतिहासात दिसत नाही. मात्र संभाव्य धोके लक्षात घेऊन १६५६ मध्ये ज्याची स्थापना झाली ते मराठा आरमार आता प्रबळ झालेलं. इंग्रज, फ्रेंच आणि डच वखारीना मराठा सत्तेचे परवाने घेऊन व्यवहार करणं बंधनकारक ठरलं. शिवाजी महाराजांनी या परकीय सत्तांवर कठोर अंकुश निर्माण केला फक्त जंजिराच्या सिद्दीला पूर्ण नमवणे त्यांना अजून जमत नव्हतं. दरवेळी काहीतरी अडचण येई आणि सिद्दी तावडीतून सुटे. कधी तो मुंबईत इंग्रजांच्या आश्रयाला जाई तर कधी बादशाहाकडे मदत मागे.
जंजिरा ते मुंबई या सागरी मार्गात मग पाचर ठोकायचे राजांनी ठरवले. मुंबईच्या दक्षिणेला साधारण पंधरा सागरी मैलांवर खांदेरी आणि उंदेरी ही बेटे आहेत. थळ या गावाच्या किनाऱ्यापासून दीड मैलावर उंदेरी बेट आणि तिथून पुढे दीड मैलांवर अधिक मोठे असे खांदेरी बेट. ऐन समुद्रात... जंजिराआणि मुंबई यांच्या मधोमध...! १६७० मध्ये एकदा मराठ्यांनी येऊन या बेटांची पाहणी केलेली. तिथे गोड्या पाण्याचे झरे शोधले. बांधकाम सुरु करायचा प्रयत्न केला. पण अन्य रणधुमाळीत पुढे ते काम राहून गेले. मात्र दक्षिण दिग्विजयानंतर १६७८ च्या दरम्यान शिवाजी महाराजानी याकडे बारकाईने लक्ष दिले. आणि खांदेरी-उंदेरी बेटांकडे मोर्चा वळवला. या बेटांना इंग्रज “हेनरी – केनरी बेटे” असं म्हणत. या बेटांवर मराठ्यांनी ताबा मिळवला की मुंबईतून होणाऱ्या इंग्रजांच्या सर्व हालचालीवर नियंत्रण मिळवणे  सहज शक्य होणार होते..! 

ऑगस्ट १६७९ मध्ये सुमारे ४०० जणांच्या शिबंदीसह माणसे रवाना झाली. चौलच्या उत्पन्नातील १ लाख रुपये राजांनी जलदुर्गाच्या उभारणीसाठी मंजूर केले. प्रत्यक्ष बेटावर १५० माणसे आणि केवळ ४ तोफा घेऊन राजांचे  विश्वासू सुभेदार मायनाक भंडारी दाखल झाले. त्यांनी योग्य जागी तोफा लावल्या आणि मोठ्या धडाक्यात थेट बांधकाम सुरु केले.
मग इंग्रजांनी आपल्या सुरत येथील प्रमुखाला लिहिले की, “ शिवाजीराजांच्या माणसानी हेनरी-केनरी बेटांवर किल्ला बांधायची सिद्धता केली आहे. या ठिकाणी अशा लोभी आणि समर्थ राजाला इतके महत्वाचे स्थळ विरोधाशिवाय हस्तगत करू देणे हे राजकीयदृष्ट्या हीनपणाचे ठरेल. त्याचे आरमार आपल्यापेक्षा निकृष्ट आहे. त्याची गलबते अगदीच क्षुल्लक असून आपले एक गलबत त्यांच्या १०० गलबतासाठी भारी ठरेल.  तरी मुंबई बेटाचे दळवळण बंद  करणे आदि त्याचा उद्देश असू शकतो. एकदा त्याला किल्ला बांधू दिला तर नंतर हे स्थळ त्याच्या हातून घेणे मुश्कील आहे.”

त्यानंतर सुरतकर इंग्रजांनी फारसं लक्ष दिले नाही आणि मुंबईकर इंग्रजांनी मग नौदलाची एक तुकडी कॅ. मिचीनसोबत खांदेरीवर पाठवली. त्यांनी मायनाकला बोलवून सुनावले की हे बेट इंग्रजांचे आहे आणि मराठ्यांनी ताबडतोब सगळं समान घेऊन बेट सोडून जावे. मायनाकनेही तितक्याच ताठपणे सुनावले की महाराजांनी हुकुम दिल्याविना आम्ही बेट सोडणार नाही.
मग इंग्रजांच्या लक्षात आले की आता युद्धाला पर्याय नाही.
रिव्हेंज, हंटर या युध्दनौकांसह काही सैन्य घेऊन कॅ. ह्युजेस ४ सप्टेंबरला खान्देरीजवळ पोचला. तोवर मराठ्यांनी जवळपास ४-५ फुटांपर्यंत तटबंदीचे काम केलेलं. मोक्याच्या जागी तोफा. मुळात खांदेरी शेजारी खडकाळ जागा. इंग्रजांच्या मोठ्या युद्धनौका अगदी जवळ पोचू शकेनात. जवळच्या नागाव च्या खाडीचे पात्रही उथळ. तिथे इंग्रजी युद्धनौका, गलबते आत भरतीच्या पाण्यासह जाऊ शकत होत्या मात्र नंतर त्या गाळात रुतण्याची शक्यता... त्यामुळे तिथे ही त्यांना जाता येईना. तर मराठ्यांच्या लहान होड्या सहज सर्वत्र संचार करत होत्या. खांदेरीवर पिण्याचे गोडे पाणी होते. थळच्या किनाऱ्यावर ही होते... मात्र इंग्रजांना पिण्याचे पाणी आणायला देखील मुंबईला जावे लागे. त्यात ११ सप्टेंबरला मराठा आरमार प्रमुख दौलतखान मदतीला आला. मराठ्यांनी खान्देरीवरून आणि आपल्या गलबतातून प्रभावी मारा करत इंग्रजी नौदलाला रोखले. गोळीबारीत इंग्रजांचा एक कॅप्टन ही मारला गेला. कॅ. थोर्प चे ते गलबत मराठ्यांनी पकडून किनाऱ्यावर आणले. अन्य इंग्रज सैनिक ही मारले गेले.

नागावच्या खाडीत मराठा आरमाराचे एक प्रमुख केंद्र होते. इथे नौकाबांधणी, दुरुस्ती आदि कामे होत. या परिसरातील उथळ समुद्र किनारे, उथळ खाडी पात्रे याचा बारकाईने विचार करून सपाट तळ असलेल्या विशिष्ट प्रकारच्या नौका, गलबते, गुराबा मराठा आरमारात बांधल्या गेल्या होत्या. आणि याचाच मोठा फायदा होत होता तर असे न केल्यानं इंग्रजांची भली मोठी गलबते, युध्दनौका निरुपयोगी ठरू लागल्या.

जवळपास दीड दोन महिनेही धुमश्चक्री सुरु राहिली. मोजकी रसद, अन्न-धान्याचा अपुरा साठा, अवघ्या ४ तोफा आणि सुमारे १५०/२००  माणसे यांच्या साथीनं मायनाक भंडारी निष्ठेने झुंजत होते. एका बाजूला इंग्रजांच्या युध्दनौकांचा यशस्वी प्रतिकार करत होते आणि दुसरीकडे जलदुर्गच्या बांधकामात जराही हलगर्जी न करता वेगाने कार्यरत होते. 
१८ ऑक्टोबरला सकाळी मराठ्यांचे ४०-५० गुराबांचे व गलबतांचे आरमार नागावच्या खाडीतून बाहेर पडले. त्यांचा वेग इतका होता की इंग्रजांना सज्ज व्हायला वेळच मिळाला नाही. मराठ्यांनी अर्धचंद्राकार व्यूह तयार करून डव्ह आणि रिवेंज याना घेरले. एकच गदारोळ झाला. शेवटी डव्ह  ने शरणागती पत्करली. मराठ्यांनी तिला ओढून खांदेरीच्या किनारी नेली. त्यावरील तोफा आणून किल्ल्यात ठेवल्या. मग इंग्रजांनी आपल्या तुकडीला अधिक कुमक देण्यासाठी फोर्चुन ही नौका अन्य काही शिबाडे, मचवे दिले. 

इंग्रजी युद्धनौका या शिडांच्या होत्या. या काळात वाऱ्याची दिशा, वेग हे काहीच त्यांना सहाय्यक ठरत नसल्याने त्या युद्धनौका बरेचदा नुसत्याच समुद्रात उभ्या राहिल्या. तर कुठूनही कुठेही कधीही जाऊ शकणाऱ्या मराठी नौकांनी इंग्रजांना त्रस्त करून सोडले. नोव्हेंबर मध्ये सिद्दी कासम काही गलबते घेऊन इंग्रजांच्या मदतीला आला. मात्र इंग्रज आणि सिद्दी यांचा मराठ्यांनी खान्देरीवरून चांगलाच समाचार घेतला. त्याच बरोबर कॅ. केज्विन आणि सिद्दी याच्यातही तोफांच्या मारागिरीवरून मतभेद झाले.
एव्हाना इंग्रजांची अधिक कोंडी करण्यासाठी महाराजांनी पनवेल जवळ सैन्य गोळा करायला सुरुवात केली. लवकरच शिवाजी मुंबईवर चाल करून येणार अशा बातम्या थेट सुरत पर्यंत गेल्या. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याने मग ३ नोव्हेंबर ला मुंबईकरांना या मोहिमेवरील खर्च खूप वाढल्याची आणि पदरी यश येत नसल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या पत्रातून लिहिले की, ”शिवाजीराजांशी तहाची बोलणी चातुर्याने करावीत. चौलच्या सुभेदारामार्फत तहाची बोलणी करावी. शिवाजीचे लोक बेटाला सहज मदत करू शकतात, बेटावर किल्ल्याचे बांधकाम करू शकतात आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला दोन गलबते दिली मात्र तुम्हाला यश येत नाही. आता चिडून शिवाजी खुद्द मुंबईवर हल्ला करेल, तेंव्हा मुंबईचे चांगले रक्षण कसे करावे याचा विचार करावा.. इत्यादी..इत्यादी.. 

तरीही मुंबईकर इंग्रज झुंजत राहिले.

सुरतकर इंग्रजांनी मात्र सतत तिकडून मुंबईकर इंग्रजांना सुनावणे सुरु केले. ३१ डिसेंबर ला शेवटी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेला कळवले की, “खांदेरी प्रकरणी कंपनीला विनाकारण खूप खर्च झाला. आम्हाला काही यश आले नाही. मराठ्यांच्या चपळ होड्या सहज कुठेही जाऊ शकतात, कुठूनही हल्ला करू शकतात मात्र आमच्या युद्धनौका अगदीच निरुपयोगी ठरल्या आहेत. सध्या शिवाजीशी तह करण्याची खटपट सारखी सुरु आहे..”

नवीन वर्ष सुरु झाले तोवर आता खान्देरीत जवळपास ८-९ फूट उंचीची तटबंदी बांधून तयार झाली. खांदेरी बेटावरील आपला अधिकार पक्का करीत इंग्रज-मराठे यांच्यातील तह झाला. चौलचा सुभेदार आणि अण्णाजी पंडित यांना महाराजांनी या तहाचे सर्वाधिकार दिले होते. तर इंग्रजांकडून नारायण शेणवी याने दुभाष्याचे काम, पत्रव्यवहार पार पाडला. शेवटी नाक मुठीत धरून इंग्रज शरण आले आणि ३० जानेवारीला आपले आरमार परत घेऊन मुंबईला निघून गेले. मुंबई आणि जंजिरा यावर वाचक ठेवणारा नवा दुर्ग तयार झाला होता. याचे श्रेय मायनाक भंडारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला... मराठा आरमाराच्या जलद हालचालींना! 
किनारपट्टीवरील या अशा जलदुर्गांमुळे शिवाजी महाराजांनी कोकण सुरक्षित केले. तसेच पुढे कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमामुळे  इंग्रजांना किनाऱ्यावरील दुर्ग फारसे जिंकता आले नाहीत. मात्र नंतर त्यांनी जेंव्हा खांदेरी जिंकून घेतली तेंव्हा या दुर्गावर दीपगृहाची निर्मिती केली. मुंबईसारख्या महत्वाच्या शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना खांदेरीवर ताबा असणे आवश्यक वाटले होते. 

मंडळी, मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर देखील कित्येक दशके आपल्याला मात्र सुरक्षेचे हे धोरण समजलेच नाही. गेल्या काही वर्षात मात्र शासनाने, नौदलाने, तटरक्षक दलाने या सर्वांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे.  थळच्या किनाऱ्यावरून आजही खांदेरीला जाता येते. तुम्ही अवश्य जा. खांदेरी जलदुर्ग पहा, तिथली तटबंदी, बुरुज, तिथलं दीपगृह पहा... 

जगात अद्वितीय मानल्या गेलेल्या इंग्रजांच्या नौदलाचा तुटपुंज्या साधनांसह वीर मायनाक भंडारी यांनी कसा यशस्वी प्रतिकार केला. लढता-लढता एक जलदुर्ग कसा निर्माण केला हे समजून घ्या. मायनाक भंडारी यांचं शौर्य आणि छत्रपती शिवाजीराजांची दूरदृष्टी याला मुजरा करताना त्या युद्धभूमीवरील माती आपल्या भाळावर अभिमानाने लावून घ्या...!

सुधांशु नाईक, कोल्हापूर (९८३३२९९७९१)
nsudha19@gmail.com

संदर्भ:
मराठ्यांचे आरमार – डॉ. गजानन मेहेंदळे 
वेध महामानवाचा – डॉ. श्रीनिवास सामंत
शिवकालीन पत्र-सार संग्रह
शककर्ते शिवराय – विजयराव देशमुख

ब्रह्मेंद्रस्वामी !

इतिहासाच्या पोतडीतून...ही नवी लेखमाला ' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहायला सुरुवात केली आहे. त्यातील 31 मे 2020 चा हा लेख.
इतिहासाच्या पोतडीत अनेक गोष्टी दडलेल्या असतात. कित्येक गोष्टी आपल्याला नीट माहिती नसतात. कित्येक गोष्टीच्या दंतकथा बनतात. तर कित्येक गोष्टी आपल्याला सदैव प्रेरणादायी ठरतात. इतिहासात विविध घटना आणि व्यक्ती यांना फार महत्व आहे. कधी त्यांच्यामुळे काही चांगलं घडलं तर कधी वाईट देखील. आपल्या इतिहासातील काही गोष्टीविषयीची ही लेखमाला.. फक्त जगावेगळं या फेसबुक पेज वर...

भाग 1  : ब्रह्मेंद्रस्वामी
 
बाळाजी विश्वनाथ यांच्या निधनानंतर सातारा दरबारात मोठे राजकारण घडले. कोवळ्या  बाजीरावाला पेशवा करण्यासाठी सगळ्यात जास्त विरोध  हा श्रीपतराव पंतप्रतिनिधी, सुमंत आनंदराव चिमणाजी दामोदर यांचा. त्या विरोधाचे मूळ स्वरूप “देशस्थ विरुद्ध चित्पावन ब्राह्मण” हेच होते. शाहू महाराजांना या साऱ्याचा अंदाज आला. आणि त्यांनी ब्रह्मेंद्रस्वामी यांच्याशी सल्लामसलत करून “बाजीराव बल्लाळ” यांचेच नाव पुढील पेशवा म्हणून घोषित केले. अंबाजीपंत पुरंदरे, पिलाजी जाधवराव, उदाजी पवार आदि विचारशील मातबर यामुळे आनंदले.बाजीरावांचे नाव जाहीर करण्यापूर्वी शाहू महाराजांनी धावडशी येथे जाऊन ब्रह्मेंद्रस्वामी यांच्याशी विचारविमर्श केला. संपूर्ण पेशवे घराणे आणि सातारकर छत्रपती त्यांना आपला गुरु मानत होते. 

ब्रह्मेंद्रस्वामी या व्यक्तिमत्वाचे एक वेगळेच गारुड त्याकाळी सर्वांच्यावर होते. ऐतिहासिक साधनांचा अभ्यास केला की एक वेगळंच व्यक्तिमत्व समोर येतं. प्रसंगी पेशव्यांना देखील आर्थिक मदत कर्जरूपाने देऊ शकणाऱ्या त्यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊ या. सुमारे १६५० च्या सुमारास मराठवाड्यात जालन्याजवळ असलेल्या दुधड गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे नाव विष्णू असे होते. वयाच्या १२-१३ व्या वर्षी त्यांचे आई वडील वारले. त्यानंतर त्यांनी राजूर या गावी गणेश उपासना केली. ते मग वाराणसीला गेले. तिथे श्री ज्ञानेन्द्र सरस्वती यांच्या हाताखाली विद्याभ्यास केला. त्यांनीच विष्णूला “ ब्रह्मेंद्रस्वामी” हे नवे नाव दिले. तिथून मग ते देशाटनाला निघाले. भारतभर फिरून ते कृष्णातीरी आले. इथे रामदासस्वामी यांच्याप्रमाणे आपला आश्रम असावा अशी त्यांची इच्छा होती. मात्र तेंव्हा औरंगजेब बादशहा ससैन्य महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होता. सर्वत्र वातावरण अस्थिर भासले म्हणून स्वामींनी घनदाट रानातील चिपळूणजवळ असलेल्या परशुराम क्षेत्री राहायचे निश्चित केले. जवळच असलेल्या धामणी / धामणदेवी गावात त्यांचे वास्तव्य होते. राजाराम महाराजांच्या काळात बापुजी व संताजी भोसले यांना सिद्दीच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी स्वामींनी मदत केली. त्यामुळे महाराजांनी त्यांना धामणी हा गाव इनाम दिला.

सुमारे १६९८ नंतर ते उघडपणे परशुराम येथे राहू लागले. तिथल्या मंदिराची वाताहत झाली होती. ते स्वामींना पाहवेना. त्यांनी मंदिर जीर्णोद्धार करण्यसाठी “भार्गव फंड व पतपेढी” सुरु केली. सर्वसामान्य लोकांसोबतच कान्होजी आंग्रे, सिद्दी आदि त्यांचे भक्त बनले. याच कालखंडात बाळाजी विश्वनाथ हेही कधीतरी त्यांच्या संपर्कात आले आणि त्यांचे भक्त बनले. इतकेच नव्हे तर सातारला राजगादी निर्माण करणे, स्वराज्याच्या विविध कामासाठी अर्थसहाय्य मिळवणे यासाठी बाळाजी विश्वनाथ यांना स्वामींनी मदत केलीच. त्यांच्या पश्चातही स्वराज्याला मदत करत राहिले. त्यामुळेच मराठ्यांची कोल्हापूरकर छत्रपती, सातारकर छत्रपती ही दोन्ही घराणी सुरुवातीला त्यांना नेहमीच आदराने वागवत असे जुन्या कागदपत्रांवरून दिसते.नंतरच्या कालखंडात ते सातारकर छत्रपतींच्या जास्त जवळचे बनले.
या सर्वांच्या मदतीच्या जोरावर स्वामींनी परशुराम क्षेत्राचा जीर्णोद्धार केला. तिथे पर्शुरामासोबतच गणपती, मारुती, दत्त, रेणुका यांची लहान मंदिरे उभी केली. लोकांच्या राहण्यासाठी विश्रामगृह उभे केले. बागा फुलवल्या. दीपमाळा बांधल्या. त्यांच्या कार्याला लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. त्यातून बरेच धन गोळा झाले. ज्याचा विनियोग स्वामींनी लोक कल्याणकारी कामांसाठी केला. गावोगावी मंदिरांचे जीर्णोद्धार केले. नद्यांना घाट बांधले. इतकंच नव्हे तर खंबाटकी घाट दुरुस्त करायला, तिथे वाटसरूंना उपयोगी पडावे म्हणून पाण्याचे टाके खोदवले. पुण्याजवळील यवत येथे डोंगरावर असलेल्या भुलेश्वरच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. अनेक ठिकाणी उत्तम बागांची निर्मिती केली. 

या सर्व कामांसाठी किती खर्च केला, स्वामींनी कधी कधी व कुणाला कर्जे दिली याचे हिशोबसुद्धा अभ्यासू मंडळींसाठी उपलब्ध आहेत. शाहू छत्रपतींच्या पदरी असलेल्या अनेक सरदारांची त्यांच्याकडे नेहमीच फुलझाडे, फळझाडे यांची मागणी असायची. कित्येकदा स्वामी त्यानाही विशिष्ट ठिकाणाहून ठराविक झाडे आणायला सांगत असंत. असे असले तरी ब्रह्मेंद्रस्वामी पूर्णतः संन्यासी मनोवृत्तीचे नव्हते. त्यांना राजकारणात रस होता. या देशात पुन्हा हिंदुसत्ता नांदावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यासाठी पहिल्या बाजीरावांना त्यांनी कायम मानसिक पाठबळ दिले आणि प्रसंगी आर्थिक मदत केली. 

त्यांचे वागणे राजस होते. स्वामींच्या उत्तम आवडीनिवडी होत्या. उत्तम फळे, फुले, अत्तरं, चांगली वस्त्रं आपल्याजवळ असावीत असं त्यांना वाटायचं. जवळ जमवलेल्या धनातून ते सावकारी करायचे. प्रत्यक्ष पेशवे कुटुंबियांना देखील त्यांनी अनेकदा रोख रकमे द्वारे कर्ज दिली होती. त्याच्या परतफेडीसाठी त्यांनी तगादाही लावला होता.असे असले तरी एक समाजकल्याणकारी सत्पुरुष म्हणून सर्वजण नेहमीच त्यांना आदराने वागवत. कोकणसह घाटावरील अनेकजण त्यांचे भक्त होते. शाहू राजांनी पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्यासह ज्या मसलती केल्या, कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या मातबर सरदारांना आपल्या बाजूला वळवले त्यात ब्रह्मेंद्रस्वामी नक्कीच सहभागी होते. त्यामुळे परशुरामाच्या उत्सवावेळी पेशवे, आंग्रे आणि जंजिरेकर सिद्दी अशा तिघांचीही उपस्थिती असायची. 
ब्रह्मेंद्रस्वामी, परशुराम क्षेत्र आणि सिद्दी यांच्याशी संबंधित असे हत्ती प्रकरण इतिहासात फार  प्रसिध्द आहे. 

सिद्दीच्या हत्तीचे प्रकरण व परशुराम क्षेत्राचा विध्वंस: 
त्याचे झाले असे की, जंजिरेकर सिद्दीचा एक भाऊ होता. त्याचं नाव होतं सिद्दी सात. तो चिपळूणजवळ गोवळकोट येथे असायचा. दूर कर्नाटकात सावनूर प्रांताचा नवाब त्याचा मित्र. त्याने एकदा सिद्दी सातला हत्ती भेट दिला. आता एवढ्या दूरवरून तो हत्ती कसा आणायचा? मग सिद्दी सातला स्वामी आठवले. स्वामी नेहमी देशाटनाला जायचे. तसे ते निघालेले. मग त्यांनाच सिद्दीने तो हत्ती घेऊन येण्याची विनंती केली. तसेच वाटेत त्रास होऊ नये म्हणून कोल्हापूरकर संभाजीराजे आणि विशालगड येथील प्रतिनिधी यांची दस्तके घेऊन दिली. वाटेत कान्होजी आंग्रे यांचाही प्रांत लागतो. मात्र कान्होजी हे स्वामींचे शिष्य असल्याने त्यांच्याकडून काही त्रास होणार नाही याची खात्री असल्याने आंग्रे यांची दस्तके घेतली नाहीत. स्वामी कर्नाटकातून परत येताना कोकणात पोचले. त्यांच्या प्रवासात हत्ती पुढे व त्यामागून एका मुक्कामाच्या अंतराने स्वामी येत. चिपळूणच्या अलीकडे माखजनच्या चौकीवर हत्ती येताच, आंग्रे यांच्या चौकीदारांनी त्याला पुढे जाण्यापासून अडवलं. हे सिद्दी सातला कळताच त्याने हत्ती सोडवून आणायला काही लोकं पाठवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे सिद्दी सात प्रचंड संतापला. त्याला वाटले की स्वामींनीच मुद्दाम हे नाटक केले व हत्ती आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे त्याने चिडून जाऊन परशुराम क्षेत्रावर हल्ला केला. स्वामींचे धन लुटले. शिष्यांना मारहाण केली आणि सगळे काही उध्वस्त केले. 
दरम्यानच्या काळात हत्ती अडवल्याचे कळल्यावर स्वामींनी कान्होजीना सांगून हत्ती मुक्त केला व सिद्दी सातकडे पाठवून दिला...मात्र यापूर्वीच परशुराम क्षेत्र उध्वस्त झालेलं. हे पाहून स्वामी अतिशय संतापले. एकूणच १७२७-२८ मध्ये या झालेल्या प्रकाराने ते व्यथित झाले आणि कोकण सोडून सातारा प्रांती दाखल झाले. मात्र त्यांनी सिद्दी सातचे कायमचे पारिपत्य होईल यासाठी पुढील आयुष्यात त्यांनी पेशव्यांना, छत्रपती शाहू महाराजांना गुप्त मदत केली. त्यांचा सतत आग्रह असायचा की सिद्धीचे कोकणातील वर्चस्व छत्रपतींनी मोडून काढावे. मग शाहू महाराजांनी काढलेल्या मोठ्या मोहिमेत सिद्दी सात कायमचा संपला.

शाहू राजांनी दिलेल्या धावडशी या गावी त्यांचे पूर्वी अधूनमधून वास्तव्य असायचे. तिथेच ते उत्तरायुष्यात राहत होते. मात्र ते फक्त पूजाअर्चा, उपासना यातच मग्न राहिले नाहीत तर लोकांच्या कल्याणासाठी विविध कामे स्वतःहून करत राहिले. परिसरातील मंदिरे, विहिरी, नद्यांवरील पूल, घाटरस्ता, बिरमाडे, आनेवाडी, मर्ढे, धावडशी, माळशिरस, मेरुलिंग डोंगर, निर्माण केलेल्या बागा, आमराया या साऱ्या कामांसाठी ब्रह्मेंद्रस्वामी नेहमीच आघाडीवर राहिले. ते काम इतके मोठे होते की मराठा रियासतकार सरदेसाई तर त्यांना “त्या काळातले सार्वजनिक बांधकाम खाते ( पी डब्ल्यू डी) असं म्हणायचे...!

रसाळगडच्या किल्लेदाराला ,स्वामींनी व्याघ्रजीन, मृगजीन पाठवून देण्यासाठी लिहिलेली पत्रे, विविध सरदारांना, पेशव्यांना वेळोवेळी लिहिलेली पत्रे पेशवेदफ्तरात पाहायला मिळतात. घोडेस्वारीची  आवड असल्याने उतारवयात ७०-७५ व्या वर्षी सुद्धा ते घोड्यावरून कोकण, पुणे आदि प्रवास करत होते हे कागदपत्रांतून वाचल्यावर त्यांच्या बलदंड प्रकृतीबद्दल, नियमित व्यायाम व अल्पोपहार याविषयी कौतुक वाट रहाते. पहिल्या बाजीरावांच्यावर त्यांचे मनापासून प्रेम होते. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न एक प्रामाणिक पेशवा म्हणून बाजीराव पूर्ण करतील याची त्यांना आशा होती. बाजीरावांच्या प्रत्येक मोहिमेची, हालचालींची ते खबरबात ठेवत असंत. त्यामुळे १७४० मध्ये जेंव्हा बाजीरावांचा मोहिमेत अचानक आजारपणामुळे देहांत झाला त्याने ब्रह्मेंद्रस्वामी विमनस्क झाले. त्यांना शोकावेग अनावर झाला. आधीच वृध्द झालेले स्वामी उदासीन बनले. आणि शेवटी १७४५ मध्ये स्वामींचे निधन झाले. लोककल्याणकारी कामे करणारा, राजसंन्यासी स्वर्गस्थ झाला. शाहू महाराज, पेशवे, त्यांचे अनेक सरदार यांच्या उपस्थितीत धावडशी येथे अंतिम संस्कार झाले. तिथेच शाहू महाराजांनी मोठे परशुराम मंदिर व समाधी मंदिर उभे केले. 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झालेल्या राजकारणात मराठ्यांची सत्ता पुन्हा जोमाने वाढावी, त्यांना लोकधार मिळावा यासाठी कष्टालेल्या, पुढे मोठी राजवट बनलेल्या साम्राज्याच्या सुरुवातीच्या काळातील बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि ब्रह्मेंद्रस्वामी ही दोन महत्त्वाची व्यक्तिमत्वे होती. त्यांनी केलेल्या कार्याचा पुढे बाजीराव पेशवे यांना कायम आधार लाभला यात शंका नाही. तुम्ही जेंव्हा कधी सातारा-पुणे परिसरात प्रवास कराल तेंव्हा जरासा वेळ काढून साताऱ्याजवळच्या धावडशी ला अवश्य जा. तिथलं मोठं तळे, पाणीव्यवस्था आणि परशुराम मंदिर अवश्य पहाच.

सुधांशु नाईक
nsudha19@gmail.com

संदर्भ ग्रंथ :
पेशवे दफ्तर – रियासतकार सरदेसाई.
पुण्याचे पेशवे – अ रा. कुलकर्णी
पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
श्री ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर – कै. प्र ल सासवडकर यांनी लिहिलेलं चरित्र.
पेशवे – श्रीराम साठे

Wednesday 3 June 2020

वेगळ्या कथा क्र.०३- भग्न


मंडळी, सुरुवातीलाच एक सूचना:-  साहित्यात जे विविध रस आहेत त्यातील रौद्र आणि करुण रसाचा वापर असलेली ही ताजी कथा. या कथेतील पात्रे काल्पनिक असली तरी कथेतील भूगोल आणि आक्रमकांचा संहारक इतिहास हा विविध सत्य घटनांशी साधर्म्य असणाराच आहे. ज्यांना रौद्र रस रुचत नाही त्यांनी कथा वाचू नये.

पारगाव. उर्वशी  नदीच्या तीरावर वसलेलं एक चिमुकलं टुमदार गाव. पंधराव्या- सोळाव्या शतकातला तो महाराष्ट्र. सर्वत्र धर्मांध आक्रमकांचा नंगानाच सुरु झालेला. मात्र त्याची झळ अजून इथवर आलेली नव्हती. गाव शांत सुखात होतं. शेजारी वाहणारी बारमाही नदी गावाला सुबत्ता देत होती. आसपासच्या शेतात पिकं डोलत होती. गावचे पाटील होते रामराव. गावाची नीट काळजी घेत होते.
गावात एक प्राचीन मंदिर होतं विघ्नेश्वराचं. अगदी यादवकालीन हेमाडपंती बांधकाम. ११ व्या शतकातलं. गावाच्या मागे डोंगरावर एक दुर्ग. त्याचं नाव चंद्रदुर्ग. पंचक्रोशीच रक्षण करणारा. तिथे जेंव्हा यादवकालीन शिलेदाराने आपलं स्वामित्व मिळवलं त्या युद्धापूर्वी त्यानं विघ्न दूर करायला पूजाविधी केले ते याच मंदिरात. मग विजय मिळाल्यावर इथल्या जुन्या लहानग्या मंदिराचा जीर्णोद्धार करत मोठं मंदिर उभं केलं. काही वर्षं खपून शिल्पकारांनी तिथं उत्तम शिल्पं घडवली. सुरेख असा नंदी मंडप उभा केला. तेंव्हा जे पुजारी त्याच्यासोबत आले ते इथेच स्थिरावले. या मंदिराची पिढ्यानपिढ्या पूजा-अर्चा करायचा आदेश त्याना मिळालेला. त्याच वंशातले होते सदाशिवपंत. उंचापुरा बांधा, गव्हाळ वर्ण, चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज आणि प्रेमळ सात्विक स्वभाव. यामुळे सर्व गावकऱ्यांना त्यांचा आधार वाटे. 
१३ व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली आणि विध्वंसाचं एक तांडव च महाराष्ट्रभर सुरु झालं. खिलजी घराणं, तुघलक घराणं यांच्यापाठोपाठ आले ते बहामनी घराणं. अल्लाउद्दिन हसन यानं १३४७ मध्ये कर्नाटकातील कलबुर्गा येथे बहामनी राज्याची स्थापना केली. त्या गावाचं नाव ही बदलून हसनाबाद असं केलं. त्यानंतर मग पहिला मुहम्मद, घियासुद्दिन, शिहाबुद्दिन अहमद, मह्मुद्शाह आदि एकापेक्षा एक सुलतान इथं तांडव करू लागले. प्रत्यक्ष हसन गंगू बहामनी हा देखील पूर्वीचा हिंदू ब्राह्मण होता असे म्हणतात.
या सर्वानीच इथल्या प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. इथली मंदिरे फोडली. गावागावातील हजारो हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान व्हायला भाग पडले.  ज्या लोकांनी धर्म बदलायला नकार दिला त्याना हाल हाल करून मारलं गेलं. त्यांच्या डोळ्यासमोर घरातील स्त्रीवर राक्षसी अत्याचार केले गेले. मंदिरात गायी कापल्या गेल्या. मंदिरातील मूर्ती विध्वसंल्या गेल्या. मंदिरात नेऊन स्त्रियांची विटंबना केली गेली. लहान मुलं, मुली, स्त्रिया, तरुण यांना गुलाम बनवलं गेलं. कित्येक पुरुषांचे खच्चीकरण करून त्यांची नेमणूक सुलतानांच्या जनानखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून केली गेली. त्याच पुरुषाच्या पत्नीची  तिथे सुल्तानाकडून, त्यांच्या सरदारांनी विटंबना होऊ लागली. कित्येक लहान मुलांच्या आई-बापासमोर क्रूर हत्या केल्या गेल्या. आणि अवघा महाराष्ट्र या हिस्त्र राक्षसामुळे भीतीने घाबरून गेला. 
पंढरपूर, सोलापूर,मंगळवेढा,कऱ्हाड, मिरज, तुळजापूर,अंबेजोगाई, जेजुरी आदि असंख्य गावातील मोठ मोठी मंदिरे फोडली गेली. अगदी पुण्यातही केदारेश्वर आणि नारायणेश्वर ही दोन प्रसिद्ध मंदिरे फोडून तिथे मशिदी उभ्या केल्या गेल्या. त्याही स्वतःला पीर...साधू समजणाऱ्या मुस्लीम व्यक्तींकडून.
महत्वाची शहरे अशी उध्वस्त होत असताना कित्येक लहान गावात मात्र अजूनही तशी शांतता होती. मात्र जुलमी आक्रमकांची आपल्यावर कधीतरी नजर वळणार या भीतीनेच खेडी, गावं भीतीने जणू गारठूनच गेली होती. 
या सगळ्या अस्वस्थतेत सदाशिवपंत मात्र गावकऱ्याना धीर द्यायचे. जवळच्या चंद्रदुर्ग वरही आता कुणी उरलं नव्हतं. ओसाड पडलेला तो. रामराव पाटलांच्या मदतीनं पंतानी तिथं जवळपासच्या २-३ गावातल्या युवकांना एकत्र केलं. रामरावांना त्या युवकांचे नेतृत्व करायला भाग पाडलं. तिथं तलवारबाजी, भालाफेक, धनुष्य बाण आदि शस्त्रांचे प्रशिक्षण सुरु केले. स्वतः पंत उत्तम घोडेस्वारी करायचे. मात्र त्याना युद्धाचा अनुभव नव्हता. त्यामुळे काही तरबेज व्यक्तींना गावात आणून त्यांच्यामार्फतही  प्रशिक्षण सुरु झाले.
त्या सगळ्यांच्या जेवणाची वगैरे व्यवस्था करण्याकडे पंतांचे लक्ष असे. पंतांच्या पत्नी अंबिकाबाई याही सात्विक. पंतांचा मुलगा श्रीधर हा देखील त्या युवकांच्या सोबत रोज सकाळी दुर्गावर जायचा. त्याची पत्नी भल्या पहाटे सासू सासऱ्यासह घरासह मंदिराच्या सेवेत असायची. संपूर्ण आवार स्वच्छ करणे, सडा रांगोळी घालणे, नदीवरून पाणी भरून आणणे, मंदिरातील पूजेसाठी फुले गोळा करणे, नैवेद्य यात दोघींचा कसा वेळ जाई हे कळत नसे. गावातील अनेक जण त्यांना विविध कामात मदत करत. सदाशिवपंत भल्या पहाटे शेतावर जाऊन येत. तिथल्या रयताच्या कुटुंबाला सूचना देत. येताना गाईचं दूध घरी घेऊन येत. मग नदीवर जाऊन अंघोळ.. घरातील देवपूजा आणि मग मंदिरातील. 
ते अत्यंत देखणी साग्रसंगीत  पूजा करायचे. उत्तम पुष्प सजावट करायचे. रोजचा त्यांचा लघुरुद्र कधीच चुकला नाही. आणि त्यांनी पूजेच्या वेळी येईल त्या गावकऱ्याशी कधी भेदभाव केला नाही. आरती, महाप्रसाद यात सर्वाना सामावून घेतलं.
पूजा अर्चा  नैवेद्य होईपर्यंत दुपार होई. जेवल्यानंतर मग जराशी विश्रांती. संध्याकाळी मग मंदिरात कीर्तन, प्रवचन रंगे. राम-कृष्णापासून अनेक देवता, संत सज्जनांच्या कथा रंगत. प्रत्येक युगात अन्याय, अधर्माचा निःपात करायला परमेश्वर कसा धावून आला हे सांगत. आज जे आपल्या देशात अराजक सुरु आहे त्याचाही विनाश करायला लवकर देवाधिदेव महादेव धावून येतील असा विश्वास व्यक्त करायचे. गोर-गरीब जनतेला धीर द्यायचे. रात्री मग देवळात भजनाचा कल्लोळ असे. भक्तिरसात आसमंत रंगून जाई.
मात्र हे सारं करताना पंतांच्या मनात सदैव भीती असे. आसपासच्या प्रदेशात घडणाऱ्या कहाण्या त्यांच्या कानावर येत. कुणी प्रवासी, कुणी व्यापारी उत्तरेकडून येई. कधी कुणी गोसावी कधी कुणी संन्यासी येई. तो जे काही सांगे ते ऐकून त्यांच्या मनाचा थरकाप उडे. अयोध्या, सोमनाथ, मथुरा, वाराणसी, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि आता महाराष्ट्रातील गावं, मंदीर कशी उध्वस्त होतायत हे ऐकून त्यांच्या एकाच वेळी प्रचंड राग आणि भीती दाटून येई. मग गाभाऱ्यातील विघ्नेश्वराला ते कळवळून साकडं घालत.

“देवा विघ्नेश्वरा, तूच तर जगाचा नियंता. मग का अशी सर्वांची परीक्षा पाहतोस. प्रसंगी कोट्यवधी दुष्टांचा कुरुक्षेत्री संहार करणारा, अनेक असुरांपासून पृथ्वीला मुक्त करणारा तू विश्वेश्वर...तूच महादेव...तूच विष्णू...का असा अंत पाहतोस.. लवकर ये आणि या त्रासातून आम्हा सर्वाना मुक्त कर. आजवर कधीच ऐकले, पहिले नाहीत असे अत्याचार हे यावनी सरदार आणि त्यांचे बादशहा करताहेत. याना कठोर सजा दे..परमेश्वरा...कठोर सजा दे...”
मात्र हे घडत नव्हतं. कुठं कुठं ज्यांनी प्रतिकार केला त्यांचा अनन्वित छळ केला गेला. आणि ते पाहून भ्यालेली जनता सगळं काही मूकपणे सोसत राहिली.
चंद्रदुर्गावर युवक एकत्र येऊन काही युध्द सराव करताहेत ही बातमी मग कर्णोपकर्णी शिरवळच्या ठाणेदारापर्यंत गेली. काही जणांनी अधून मधून येणाऱ्या वसुलीच्या तुकडीला प्रतिकार करायला सुरुवात केली. ही शेतजमीन आमची, इथे कष्ट आम्ही करतो तर तुम्हाला इतक्या वसुलीचा अधिकार कुणी दिला असं युवक आणि रामराव पाटील यांनी एकदा त्या तुकडीच्या प्रमुखाला सुनावलं. २५-२६  जणांची तुकडी घेऊन आलेले ते या गोष्टीनं एकदम भडकले.
“देखो पाटील, आजतक जैसे चुपचाप तुम अनाज देते थे वैसा करो..वरना इसका अंजाम बहुत बुरा होगा.” अशी धमकी देत वसुलीची तुकडी निघून गेली. जाताना वाटेत २-३ घरं पाडली. जाळली आणि घरातल्या दोन स्त्रियांना जबरदस्तीने घोड्यावर लादून पळवून घेऊन गेले.
गावात एकच गोंधळ माजला. मंदिरासमोरील भव्य पटांगणात रात्री सभा भरली. यापूर्वीच्या पिढीने काही अत्याचार सोसले होते. ते जेष्ठ लगेच एकत्र आले. एक जण  म्हणाला, “सुभेदार खिरातखान हा अत्यंत जुलमी क्रूर. त्याच्यासारखेच त्याचे सहकारी आणि हाताखालचे अधिकारी. त्यांच्या नादी लागू नका... अवघं गाव ते सहज चिरडून टाकतील...
दुसरा म्हातारा म्हणाला, “ बरोबर आहे.. नका या फंदात पडू. अजून त्यांचं आपल्या गावाकडे फारसं लक्ष नाही. ते इतर प्रांतात धुमाकूळ घालतायत. तोवर तेंव्हा तुम्ही त्याला शरण जा. क्षमा मागा. जे मागेल ते द्या पण वैर पत्करू नका....गाव जपा..”
मात्र गावातील तरुण आता भडकले होते. रामराव पाटील, सदाशिवपंत हेही चिडले होते. त्यांनी ठरवलं प्रसंगी जीव गेला तरी चालेल पण आता अन्यायाचा प्रतिकार करायचा. सुभेदार जर प्रेमाने काही मागू लागला तर अवश्य मदत करू... मात्र जर जोर-जबरदस्ती करू लागला तर लढायचं. मरेतोवर लढायचं. युवकांनी लगेच दुर्ग गाठला. गावातील अनेक वृद्ध, स्त्रिया याना दुर्गावरील वाड्यात नेऊन ठेवलं. गाव निम्मा रिकामा केला. त्यांना नक्की कळले की आता आपल्यावर हल्ला होणार.. स्वतः पाटीलही कुटुंब कबिला घेऊन दुर्गावर गेले. गावात उरली अगदी मोजकी माणसे. जी शेतावरील झोपडीत गेली. तर सदाशिवपंत आणि त्यांचं कुटुंब मंदिराखालील तळघरात जाऊन लपलं.
या गावात काय घडलं याची खबर सुभेदार खिरातखानाला मिळाली. एक टीचभर गाव. तिथली मोजकी माणसं. त्यांची ही मस्ती... त्याला उमगलं. हे बंड आहे. हे ठेचायालाच हवं. नाहीतर उद्या हेच लोण इतर गावात पोचेल. या गावाला असा धडा शिकवू आता की पुन्हा अवघ्या सुभ्यात कुणी मान वर करून बोलताही कामा नये...! 
काही दिवसातच प्रत्यक्ष सुभेदार खिरातखान त्याच्या सैन्याची एक तुकडी घेऊन भल्या दुपारी दौडत आला. त्याच्या सोबत त्याच्या इतकाच दुष्ट असा दाउदखान होता. आल्या आल्याच त्यांनी वेशीपासून दिसेल ते घर जाळायला सुरुवात केली. लगेच त्यांच्या लक्षात आलं की गावातील बहुतांश लोक गायब आहेत. अचानक एक माणूस शेतातून येताना दिसला...
त्याला पकडून आणलं सैनिकाने.. सुभेदार किंचाळला, “ बोल कहा गये सब लोग.” 
भीतीनं घाबरलेला तो म्हणाला.. “किला..किलेपर...” दुसऱ्या क्षणी सुभेदाराची तलवार हवेत चमकली आणि त्या माणसाचं मुंडके हवेत उडालं.
दाऊदखान.. तुम थोडे सैनिक लेके जाओ किलेपर..सबको कत्ल कर दो.. मै यहां कोई है तो देख लुंगा.... सुभेदार किंचाळला.
दाऊदखान दौडत गेला. तर गावातील विविध घरांची नासधूस करू लागले उरलेले सैनिक. खिरातखान पाटलांच्या वाड्यासमोर थांबला. 
दुर्गावरील त्या लहानशा गावकऱ्यांचा विरोध मोडून काढायला अगदी कमी वेळ लागला. दुर्गावर जणू रक्ताचा सडा पडला. सगळे युवक मारले गेले. रामराव पाटील आणि त्याचं कुटुंब, इतर म्हातारे कोतारे, बायका मुलं याना कैद करून सोबत  घेऊन दाऊदखानाची तुकडी लवकरच पुन्हा गावात आली.
तोवर गावातील बहुतांश घरांचा विध्वंस झाला होता. घरातील गाडगी-मडकी बाहेर फेकली गेलेली. सगळीकडे आगी लावलेल्या.आणि सगळे सैनिक मंदिराला भिडले होते...
दाऊदखान, खिरातखान आणि सगळे सैनिक आता मंदिरासमोर आले. तिथल्या मैदानात सर्व कैद्यांना उभं केलं गेलं. एव्हाना एका सैनिकाला मंदिरातील तळघरात जाणारी वाट सापडली. मग सगळे घुसलेच तिथं.
आत मध्ये असलेल्या पंतांच्या कुटुंबाला मारत-झोडत, फरफटत मैदानात आणलं गेलं. इथं होता विजय स्तंभ. आधीच्या विजयाची स्मृती जपणारा. ज्या मैदानात देवाची पालखी निघायची..जिथं लग्न-समारंभ साजरे व्हायचे तिथं...मारहाण सुरु झाली. रक्ताचा सडा पडू लागला.. पंतांची बायको, सून, पाटलांची बायको, मुलगी, सून आणि काही अन्य देखण्या स्त्रिया याना खिरातखान आणि दाऊदखानने आपापसात वाटून घेतलं. त्यांची रवानगी आता जनानखान्यात होणार होती. उरलेल्या सगळ्या कैद्यान्मधून ८ वर्षापेक्षा मोठ्या मुली, स्त्रिया...अगदी वृद्ध स्त्रियांना देखील बाजूला काढलं गेलं. लहान मुलांना बाजूला काढलं गेलं.
“इज्जत लुट लो सबकी.. इनपे इतना जुलूम करो की बाकी सब गाववालो को ये सुनकर ही डर पैदा हो...
खिरातखान ओरडला..
स्त्रियांवर अत्याचार सुरु होणार हे कळताच पंत,  पंतांचा मुलगा, पाटील त्वेषानं धावून गेले. एका सैनिकाच्या एकाच घावात पंतांचा मुलाचं मस्तक उडालं. 
“ पकडो इन दोनो को.. इन्हो ने सबको भडकाया है ..” एक सैनिक ओरडला.
पंत आणि पाटील या दोघांना मग मैदानच्या मध्यभागी असलेल्या विजय स्तंभाला बांधलं गेलं. 
खिरातखान हातात चाबूक घेऊन पुढे झाला. दोघांच्या अंगावर चाबकाचे फटकारे फुटू लागले. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरी त्यांच्या तोंडातून अक्षर येईना. मग त्यांच्या स्त्रियांवर ही अत्याचार सुरु झाले.
ज्या मंदिरात देवाला अनन्य भावाने शरण येत पूजेला नैवेद्य घेऊन स्त्रिया येत होत्या, त्याच मंदिराच्या आवारात त्यांची अब्रू लुटली गेली. एकेका स्त्रीवर किती बलात्कार झाले याची गणतीच नाही. इतक्याने ही त्या दुष्टांचं समाधान झालं नाही. मग..मग. . त्यांचे अवयव कापले गेले. त्या स्त्रियांना मारल्यावर विकृत सैनिकांनी मग मंदिरातील अप्सरांची शिल्प विटाळली. कुणाचे स्तन कापून टाकले कुणाचे हात. कुणाचा चेहरा विद्रूप केला तर कुणाचे पाय कापले. मंदिरासमोरील नंदी, अन्य देवतांची शिल्प तोडली-फोडली, खांब तोडले.. जे जे उध्वस्त करता येईल ते ते केलं गेलं... !
स्वतः खिरातखान गाभाऱ्यात शिरला. महादेवाच्या पिंडीवर घाव घातले. एका वृद्धाचे डोके पिंडीवर ठेऊन फोडले.
कर्कशपणे तो ओरडला, “भगवान हो ना तुम.. देख मैने क्या किया.. तुम्हारे सब लोगोको खत्म कर दिया. है हिम्मत तो सामने आ. तुझे भी खत्म कर दुंगा.”.
कुणी आणलेल्या गायी मंदिरात सर्वत्र कापल्या गेल्या. ज्या मंदिरात सकाळी प्रसन्न अशी सडा-रांगोळी होत असे तिथे सैनिकांनी लघुशंका केली.. रक्त, मुत्र, प्रेतं या सगळ्याच्या घाणेरड्या वासानं परिसर भरला. 
पंत आणि पाटील अर्धमेल्या अवस्थेत हा विध्वंस पाहत होते...
पंतांचा आता संताप संताप झाला. ते मोठ्यानं आक्रो9शात ओरडू लागले;
“हे विघ्नेश्वरा...किती नीच लोक आहेत हे. कसं तू यानं जन्माला घातलंस, का जन्म दिलास याना? ज्या निष्पाप गावकऱ्यांनी आयुष्यभर तुझी भक्ती केली त्यांना काय दिलंस तू? का त्यांच्या नशिबी अशा यातना? कुठे गेला तुझा धर्म? देवा, तूच म्हनालेलास ना.. जेंव्हा जेंव्हा अधर्म होईल तेंव्हा मी जन्म घेईन...मग कुठे लपलायस तू?? की तुझीही ताकद संपली?? देवपण संपलं का या जगातलं ? इतक्या अधम, विकृत माणसांना शिक्षा द्यायला आता देव कधीच येणार नाही पाटील... देव मेला.. देव संपलाय या जगातून..
पण पण...या निष्पाप लोकांवर ज्यांनी अत्याचार केले  ते तर ही पापं नक्कीच फेडतील. याच मातीतून एखाद्या सामान्य घरातून एखादा माणूस असा जन्म घेईल की तो या सर्वांचा निःपात करेल. आज जसे आपण भीतीने थरकापत आहोत तसेच एकदिवस हे क्रूर बादशहा, हे विकृत सरदार घाबरतील. त्यांना ठार मारून मगच हा महाराष्ट्र शांत होईल. या क्रूर बादशाहांच्या कबरी याच मातीत असतील..या सर्व निष्पाप लोकांचा  शाप आहे यांना. 
आणि हे विघ्नेश्वरा..तुलाही शाप आहे.. हा जो विध्वंस तू थंडपणे पाहत राहिलास, ज्या तुझ्या मंदिरात इतके विकृत कृत्य केले गेले ते मंदिर यापुढे कायम भग्न राहील...कितीही वेळा कुणीही हे मंदिर पुन्हा बांधू लागलं तरी ते पूर्ण होणार नाही. जोवर या धरतीवरून दुष्टांचा नायनाट होणार नाही तोवर इथं मंदिर पुन्हा उभं राहणार नाही... हा शाप आहे माझा..आमचा सर्वांचा...”
आरडाओरडा करणाऱ्या पंताना पाहून खिरातखान पुढे आला..
“अबे बम्मन.. क्यू चिल्ला रहा है ..” असं म्हणत त्यानं हातातील तलवार जोरात फिरवली. एकाच घावत पाटील आणि पंत शांत झाले. अवघ्या परिसरात मग केवळ एक भीषण शांतता भरून राहिली. 
सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१ )
( आजही याच नदीकाठी नव्हे तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशीच शेकडो प्राचीन मंदिरे भग्नतेचा शाप घेऊन उदासीनपणे उभी आहेत. कधीतरी कुणीतरी पुन्हा या परिसरात चैतन्य आणेल याची वाट पाहतायत. आज गावोगावी शेकडो नवी मंदिरे, पुतळे उभे राहिले मात्र अनेक भग्न मंदिरांचे प्राक्तन आजवर बदललेले नाही, त्यांची काळजी घ्यावी असं फारसं कुणाला वाटत नाही याची खंत वाटते. त्यांच्या कहाण्या, त्यांचे चित्कार, त्यांचे उसासे, त्यांचे अश्रू आणि त्या मंदिरात सांडलेल्या रक्ताचा नकोसा वास मला आजही घायाळ करत राहतो. जगणं नकोसं करत राहतो, जगणं नकोसं करत राहतो....!)