marathi blog vishwa

Sunday, 13 December 2020

लायबेरियातून# 3 - रोजचा दिवस नवा...

लायबेरियातून... लायबेरिया या अटलांटिकच्या किना-यावरील देशात येऊन तीन आठवडे झालेदेखील. माझ्या अनुभवात्मक लेखनाचा हा पुढचा भाग इथल्या राहणीमानाविषयीचाच.
- सुधांशु नाईक
आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे इथली बहुसंख्य माणसं रोजचा दिवस नवा असल्याच्या विचारानं जगतात. जसं जंगलातले प्राणी भविष्यासाठी  खूप मोठी तरतूद करत नाहीत. शक्यतो आजच्यापुरती किंवा जास्तीत जास्त पुढच्या 3,4 दिवसांपुरतीच बेगमी करुन ठेवतात ना तसं वाटतं मला यांचं आयुष्य पाहून. 
मुळात रोज सकाळी उठणे, आपापली आंघोळ वगैरे प्रातर्विधी आवरणे यातही फारशी घाईगडबड दिसत नाही. बहुतेक घरांतून भरपूर माणसं असतात. अनेक घरांघरांतून एका पुरुषासोबत 2 किंवा जास्त बायका व त्यांची मुलं असा सगळा गोतावळा एकत्र नांदत असतो. घरातील मुख्य स्त्रियांसोबत मुलीही कामं करताना दिसतात. अगदी लहान भावंडाना आंघोळ घालण्यापासून स्वैपाक किंवा रस्त्यावर काही वस्तूंची विक्री यात मुलींचा सहभाग जाणवतो. फोटोतील ही मुलगीच पहा ना, आंघोळ नको म्हणून रडणा-या लहानग्या भावाला किती समजूत घालून छान आंघोळ घालतेय ते...
अशी दृश्यं लहानपणी किंवा माझ्या अनेक भागातल्या, गडकोटांच्या भटकंतीत पाहिलीयत. धनगरवाडे, आदिवासी पाडे यांच्याजवळ किंवा ग्रामीण भारतात अशी दृश्यं खूपदा दिसतातच.
पण परदेशी भूमीवर जेव्हा असं पहायला मिळतं तेव्हा एक माणूसपणाची नाळ चटकन् जुळून येते. इथूनतिथून माणूस कसा एकसारखा हे जाणवतं. मग भाषा, प्रांत, रंग, धर्म हे लहानमोठे भेद जाणवेनासे होतात. मनाला खूप बरं वाटत रहातं !
 तसंही एकंदरीत लायबेरियात बालकामगारांचं प्रमाण खूप असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर इथं बालवेश्यांचं प्रमाणही खूप जास्त असल्याचं युनो च्या काही रिपोर्टमधून पूर्वी नोंदलं गेलेलं. सध्या बालवेश्या, बलात्कार व बालकामगार या तीन गंभीर समस्यांविषयी इथं ब-याच प्रमाणात प्रबोधन सुरु असल्याचं दिसतं. अमिताभच्या पिंक या सिनेमात जसं " नो मिन्स नो.." यावर भर देत कथानक रचलं गेलं होतं तसंच " नो मिन्स नो... स्टाॅप रेप" अशा प्रकारची पोस्टर्स ब-याच वस्तीत लावल्याचं पहायला मिळतं. 
 पुरुष एकतर चांगल्या प्रकारची नोकरी- उद्योग करणारा, रस्त्यांवर काही सटरफटर वस्तू विकणारा किंवा पूर्ण घरात बसणारा अशा दोन तीन प्रकारात दिसतोय. घर सांभाळण्यासोबत काही ना काही वस्तूंची विक्री करताना बहुतेक ठिकाणी मात्र बायकाच जास्त दिसतात. 
 
दिवसभर बहुसंख्य स्त्रीपुरुष हे घरासमोर निवांत बसलेले आढळतात. अनेकांनी घराच्या पडवीतच शेड वगैरे तात्पुरतं काहीतरी उभं केलंय. तिथं काही खाणं किंवा बियरसाठी बसायची व्यवस्था केलेली असते. झोपडीवजा हाॅटेल असं त्याला म्हणू शकतो आपण. बहुतेक पुरुष मंडळी तिथं बसून गप्पा मारताना आढळतात. त्यातही सध्या सर्वत्र चर्चा निवडणुकांची आहे.  
या आठवड्यात इथं निवडणुका पार पडल्या. त्याचा निकाल येत्या 3-4 दिवसात अपेक्षित आहे. मात्र निवडणुका मुख्यत: भ्रष्टाचाराला विरोध, स्थानिकांना विविध ठिकाणी प्राधान्य, दोन देशांचं नागरिकत्व ( जसं भारत व अमेरिकेचे नागरिक असणा-या व्यक्तीला आपल्याकडे विरोध केला जात होता. तर काहींचा अशा दुहेरी नागरिकत्वाला पाठिंबा होता तसंच) आदि गोष्टींवर मुख्यत: चर्चा पहायला मिळाली. 
आपापल्या पक्षांपेक्षा निवडून आलेल्या सिनेटर्सनी देशाचा आधी विचार करावा व विविध सोयीसुविधा निर्माण कराव्यात याकडे बहुतेकांचा कल दिसला त्यामुळे यंदा सत्तांतर होईल असा कित्येकांचा अंदाज आहे.

इथं साधारणत: एप्रिल ते ऑक्टोबर/ नोव्हेंबर या काळात धुंवाधार पाऊस पडत असतो. तर इतर काळात तुलनेनं कोरडं हवामान असतं. मात्र या कोरड्या ऋतूतही बरेचदा अचानक ढग दाटून येतात व तास दोन तास पावसाची एखादी मुसळधार सर येऊन जाते. 
इथली माती बहुतेक ठिकाणी कोकणासारखीच मुरमाड आहे, त्यामुळे पाणी लगेच वाहून जातं. निंबासारखी जी जरा दूरवरची राज्यं आहेत तिथं डोंगर आहेत, नद्या तिकडून वाहत येतात. 
एका मासिकातील हे पर्वताचं प्रकाशचित्र.
मात्र खाडीकाठ व समुद्रकिनारा सर्वत्र असल्यानं अनेक ठिकाणी पाणथळीचे, दलदलीचे भूभागही आहेत. बरेचठिकाणी 25,30 फूट खोदलं की पाणी लागतं. त्यामुळे अनेक घराघराजवळच्या ठिकाणी लहान लहान विहिरी दिसतात. आपल्याकडे जसं लहान गावात 3,4 ठिकाणी बोअरचे हातपंप असतात तसे हातपंप अनेक वस्तीत आहेत. ज्यांची आर्थिक बाजू जरा भक्कम आहे तिथं मोटर बसवून पाणी घरात आणलं आहे. मात्र बहुसंख्य ठिकाणी नळपाणी योजना अस्तित्वातच नाही. 
लायबेरियामध्ये जवळपास 15, 16 वेगवेगळ्या जमातींचे प्रदेश आहेत. गिओ, मानो, पेले, बासा, वाय, क्रू, मॅन्डिगो, किस्सी, बेले, मान्डे, क्र्यान आदि वंशाचे लोक आहेत. त्यांच्या स्वत:च्या भाषा आहेत. त्या भाषांनाही या वंशांची किंवा जमातीची नावं आहेत. या इतक्या भाषा एका लहानशा देशात अजूनही बोलल्या जातात याचं आनंदाश्चर्य वाटतं. या विविध भाषा वापरात असल्या तरी मुख्यत: इंग्रजी हीच व्यवहारातील भाषा आहे. तसेच अमेरिकन डाॅलर हेच मुख्य चलन. लायबेरियन डाॅलरच्या जीर्ण नोटाही भरपूर प्रमाणात वापरात आहेतच. बाजारात तुम्ही अमेरिकन डाॅलर देऊन त्या बदल्यात सहजासहजी लायबेरियन डाॅलर कुणाकडूनही घेऊ शकता. शाॅपिंग मार्केट मध्येही डाॅलर दिल्यास उरलेले पैसे लायबेरियन डाॅलरच्या करन्सीत परत दिले जातात. साधारण 1 अमेरिकी डाॅलरचा भाव 150 ते 160 लायबेरियन डाॅलर इतका आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण, सत्तांतराची शक्यता या सगळ्यामुळे आम्ही मंडळी कुठं फारसं बाहेर पडत नाही. आमच्या साईटस् वरील कामापुरत्या फे-या सोडल्या तर ऑफिस ते गेस्टहाऊस असं सुरु आहे. 
जेव्हा संधी मिळेल तेव्हा शहरापासून दूरच्या जंगली भागात जाण्याची इच्छा मात्र तोवर मनातच दडपून ठेवावी लागणार आहे...!
- सुधांशु नाईक ( nsudha19@gmail.com)🌿 

Sunday, 6 December 2020

लायबेरियातून#२ लोकजीवन

लायबेरियात येऊन आता जवळपास तीन आठवडे झालेत. इथलं लोकजीवन, राहणीमान, प्रथा, परंपरा हे अजून समजून घ्यायचंय. मात्र सध्या जे वरवरचं चित्र जे दिसतंय त्याविषयीकाही लेख लिहीन. त्यातील हा पहिला लहान लेख... - सुधांशु नाईक🌿
याआधी म्हटल्याप्रमाणे इथला सत्तर टक्के समाज हा गरिबीत ढकलला गेला तो 90 च्या दशकांपासून सुरु झालेल्या यादवी युध्दांमुळे. भरपूर लोकसंख्या अन् बराचसा आळशीपणा यामुळे मग देशात अधिकच अराजक वाढत राहिलं. लोक अनेकदा नुसतेच निवांत बसून राहिलेले दिसतात.
मुख्य शहराचा काही भाग वगळता सर्वत्र लहान लहान घरं, पत्र्याच्या शेडस्, कमकुवत अशा कच्च्या पण काॅन्क्रिटच्या इमारती दिसतात. बहुतेक ठिकाणी वीज नाहीच. एकेकाळी इथं शांतता व आहे त्यात सुखानं रहाता येईल इतकी समृध्दी होती यावर चटकन् विश्वास बसत नाही.
खरंतर आफ्रिकेतील खूप जुनी लोकशाही व्यवस्था असलेल्या या देशात सगळं ब-यापैकी आलबेल होतं एकेकाळी. अमेरिकतील गुलामगिरीतून मुक्त केलेले लोक इथं आणले गेले. इथल्या स्थानिकांसह वसवले गेले. त्यातून ब-याच ठिणग्या पडत राहिल्या. मात्र हळूहळू ते जवळपास 50- 100 वर्षात सगळे एकजीव झाले असं वाटत असताना हे यादवी युध्द सुरु झालं. विमानतळापासून अनेक इमारतींचा विध्वंस झाला. लाखो लोकांनी जीव गमावला. लायबेरियातील यादवीबाबत विविध रिपोर्टस् इंटरनेटवर पहाता येतात. मुख्यत: वर्चस्ववाद व भ्रष्टाचार या दोन गोष्टींचा परिणाम म्हणून हे युध्द घडलं असावं असा बरेच जणांचा कयास आहे.
जवळपास वीसेक वर्ष होरपळल्यानंतर देश पुन्हा उभा राहू पहातोय. इतर देशांनी टाकून दिलेल्या गाड्या, कपडे यांपासून चोरुन आणलेल्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींनी लोकल मार्केट भरलेलं असतं. मुनरोविया पोर्ट हे एक महत्वाचं बंदर असल्यानं इथं बराच प्रकारची मालवहातूक होत असते. प्राचीन काळीदेखील हे एक महत्वाचे महत्व होते असा उल्लेख इतिहासात सापडतो. 


लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी जगभरातून काही ना काही प्रमाणात मदतीचा ओघ सुरु आहे. घरातले व रस्त्यावरचे दिवे, चांगली सांडपाणीनियंत्रण व्यवस्था, रस्तेबांधणी आदि क्षेत्रात हळूहळू काम सुरु आहे. आरोग्यसुविधांबाबत बराचसा आनंद असला तरी काही वर्षापूर्वी याच प्रदेशातून इबोला व्हायरसचा स्फोट झालेला. त्यातही हजारो माणसं मेली. त्यामुळे तेव्हापासून इथं सामाजिक संसर्गाबाबत काहीशी जागरुकता आहे. ब-याच सुपरमार्केट, ऑफिसेसच्या बाहेर "पायानं पॅडल मारायचं व वरच्या मोठ्या बकेटमधून साबणयुक्त पाणी घेऊन हात धुण्याची" एक छान अशी लहानशी यंत्रणा इथं कोरोनापूर्वीच कार्यरत केलीये लोकांनी.
प्रत्येक ठिकाणी हे वरच्या फोटोत दिसतंय तसं साधं यंत्र सगळीकडे असतं जे खरंच परिणामकारक आहे. यामुळेच कदाचित कोरोनासाथीत या देशात फारसा प्राॅब्लेम झाला नाहीये. सध्या इथं 90 टक्के लोक मास्कही वापरत नाहीत तरी पेशंटस् सापडत नाहीयेत याच कारण बहुदा अशी सावधगिरी असावी.

सध्या इथं निवडणुकांचा माहौल आहे. त्यामुळे वीकेंड ला रस्त्यांवरुन भरपूर रॅलीज् निघतात. 3,4 मोठ्या पक्षांचे समर्थक गाणी म्हणत, बॅन्ड लावून किंवा कार- जीपवर मोठे स्पीकर लावून प्रचारासाठी फिरतात. 
हे पहा रॅलीज् चे काही फोटो
रविवारच्या चर्चभेटीला बहुसंख्य गर्दी असते. त्यानंतर प्रचारसभा घेतल्या जातात. लोकांना टीशर्टस्, जेवण दिलं जातं. व काही रोख रक्कमही दिली जाते असं काहीजण खासगीत सांगतात. 
भारतातील निवडणुकीत जसं तात्कालिन प्रलोभनं दाखवून लोकांना भुलवलं जातं तसंच इथंही पहायला मिळतं. रॅली काढायला पैसे, स्पीकर्स लावून वापरायला गाडी, नवे टीशर्टस्, दोन वेळच्या जेवणाची व दारुची सोय यांच्या सहाय्यानं हजारो गरीब लोकांना तात्पुरते पैसे मिळतात. आजचा दिवस छान गेला याच समाधानात ते नाचतात- गातात- दारु पितात. मात्र दीर्घकालीन व समाजहिताच्या योजनांची तशी तुलनेनं चर्चा कमीच पहायला मिळाली. काही महत्वाच्या रस्त्यांवर सत्ताधारी पक्षानं अतिशय वेगानं पथदिवे( street lights) बसवायला चक्क मिलिटरीच्या टीममधील इंजिनियर- मजूर व सामान्य सैनिकांनाही कामाला लावलंय. त्यामुळे काही महत्वाच्या रस्त्यांवर प्रकाश पडलाय.
 गरीबी व त्यामुळे काही लोकांकडून वाढणारा भ्रष्टाचार अस्तित्वात असला तरी त्यामुळे होणारी भांडणं, गुन्हेगारी व हिंसाचार हे अजूनतरी मला फारसं पहायला मिळालं नाहीये.
रात्रीबेरात्री एकटादुकटा माणूस गाठून लुटमारीच्या घटना मात्र घडत असतात. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने 
पुढच्या 8 दिवसात नेमकं काय होतं याकडे सावधपणे पाहिलं जातंय. 
येत्या 8 डिसेंबरला मतदान असल्यानं सर्वत्र सावधानता बाळगली जात आहे. रात्री किंवा वीकेंडला मारामारी, हिंसाचाराची शक्यता असल्यानं आम्हालाही याकाळात एकट्यानं बाहेर हिंडू नये अशी सूचना देण्यात आली आहे. लोक निकालाचं कसं स्वागत करतात व त्ययानंतर काय बदल घडतात हे पहायची उत्सुकता आहे! 
- सुधांशु नाईक, मुनरोविया, लायबेरिया
( nsudha19@gmail.com) 🌿

Sunday, 29 November 2020

लायबेरियातून #१ - ट्रॅफिक व बाजारहाट

नमस्कार मंडळी, 18 नोवेहेंबरला उत्तर पश्चिम आफ्रेकतील लायबेरिया या देशात दाखल झालोय. 1848 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून लायबेरिया हा आफ्रिकेतील  पहिला लोकशाही व्यवस्था असलेला देश होता. 1944-45 मध्ये दुस-या महायुध्दात जर्मनीविरुध्द लढाईत मदत केल्यामुळे अमेरिकेनं बरीच मदत केलेली. मुळात इथले अनेक जण हे अमेरिकेतील गुलामीतून मुक्तता झाल्यानं इथं आणून रुजवले गेलेले.
जवळपास 100 वर्षं सगळं सुशेगाद असताना 1980 पासून सुमारे 10,15 वर्षं इथं मोठं यादवी युध्द होत राहिलं. त्यामुळे देश अत्यंत गरीबीत ढकलला गेला. 2005 नंतर हळूहळू पुन्हा सुधारणा होताहेत. 
" Light up Monrovia" हा आमचाही प्रोजेक्ट असाच. देशभरातील 25 टक्के लोकांना नियमित वीजपुरवठा होतो. बाकी सगळे जनरेटर वर अवलंबून. त्यामुळे नियमित वीजपुरवठा, वीजवितरण या क्षेत्रातील कामासाठी युरोपियन युनियन, वर्ल्ड बॅन्क यांच्या मदतीनं हा प्रोजेक्ट उभा होत आहे. त्यासाठी प्रत्यक्ष काम करायला आम्ही...! मुनरोविया या राजधानीच्या गावात हे काम सुरु आहे. तसेच आसपासच्या काही गावातही.
इथं रोजचं काम करताना सर्वात मोठा अडथळा वाटतो तो ट्रॅफिकचा. या टोकापासून त्या टोकापर्यंत एकच रस्ता. बाकी लहान लहान गल्ल्या. सकाळपासून रस्त्याच्या या किंवा त्या बाजूला ट्रॅफिक जाम झालेलं असतंच. माणसं तासनतास निवांत गाडीत बसून रहातात. उगीच कर्णकर्कश हाॅर्नबाजी न करता! 
हे पहा काही फोटोज् 
ट्रॅफिक जॅम झालं की लहानसहान छत्र्या उभारुन रस्त्याच्या कडेला काही न काही विकत उभे राहिलेले लोक मग डोक्यावर टोपल्या, हातात पिशव्या घेऊन गाड्यांभोवती हिंडत रहातात.
 कॅडबरी, पेप्सी, हेडफोन्स, फळं, बियरचे कॅन्स, केक, कुकीज्, पेन, स्टेशनरी असं काहीही सगळं आजूबाजूला दिसत रहातं.
इथं मोजकी शाॅपिंग सेंटर्स आहेत आपल्या डी मार्ट सारखी. दुबईत ज्या च्योईतराम यांची लहान स्टोअर्स आहेत, त्यांचं इथेही एक स्टोअर आहे. तिथं डाळ, तांदूळ, मसाले, हल्दीरामची प्राॅडक्ट्स वगैरे भारतीय काहीतरी मिळत राहतं. बाकी अन्यत्र सर्व लोकल वस्तू. 

मुळात लायबेरियात बहुसंख्य लोक रस्त्यावरच बाजारहाट करतात. आम्हालाही आमच्या मेस साठी भाजी आणायला एका लोकल मार्केटला जावं लागतं. एका रस्त्यावर आजूबाजूला लोक भाजी घेऊन बसलेले असतात. साधारण 200 ते 300 लायबेरियन डाॅलरला 1 पौंड भाजी मिळते. 

ही दृश्यं त्या भाजीवाल्या रस्त्यावरची..
वांगी, कोबी, ढबू मिरची, वालाच्या शेंगा, भेंडीची लहानशी अशी वेगळी जात, भोपळा, काकडी, दुधी भोपळा, पडवळ, टोमॅटो, मिरची इतक्या भाज्या मिळतात. कोथिंबीर व पुदिना फारच महाग आहे.
या मार्केटपर्यंत जायलाच जवळपास दीड तास जातो. इतकं ट्रॅफिक असतं. जर ट्रॅफिक नसेल तर 25 मिनिटं लागतात त्या विशिष्ट रस्त्यावर जायला. अन्यत्र लहान सहान दुकानातूनही भाज्या मिळतात. पण त्या इथल्यापेक्षा जवळपास दुप्पट महाग.

रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये जास्त करुन विविध प्रकारच्या कार्स आहेत. युरोप, अमेरिका, अरबी देशांतून 3,4 वर्षं वापरलेल्या/ स्क्रॅप केलेल्या कार्स मग विकल्या जातात. त्या कुठूनतरी इथं पोचतात. तुलनेनं खूप स्वस्तात विकल्या जातात. त्यामुळे टोयोटा, निसान, स्कोडा, किया मोटर्स, फाॅक्सवॅगन सारख्या मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या गाड्या रस्त्यावर जीगा अडवून उभ्या असतात. त्याशिवाय जुनाट व्हॅन, पिकअप यांच्यातून शेयर बसच्या स्टाईलनं माणसं जातच असतात. इथं रिक्षाही आहेत बरं का..
इथल्या लोकांसाठी भारत सरकारनं टाटांच्या मदतीने जवळपास 50 बस लायबेरियाला दान केल्याहेत. त्यामुळेही लायबेरियात जी काही बस वाहतूक दिसते ती याच बसच्या माध्यमांतून.
गर्दी, ट्रॅफिक असलं तरी इथली माणसं अकांडतांडव करताना दिसत नाहीत. मिळेल तशी वाट काढत पुढे जायचे प्रयत्न करताना दिसतात. नाहीच वाट मिळाली तर शांतपणे गाडी बसून रहातात. पहातापहाता कुणीतरी एकजण ट
गाडीतल्या सीडीप्लेयरवर गाणी लावतो. मग पटापट माणसं खाली उतरतात. त्या गर्दीत पाच- दहा मिनिटं झकास नाचतात.. पुन्हा गाडी सुरु करुन पुढे जाऊ लागतात.
वन्यप्राणी जसे आजचा दिवस आनंदानं जगायचा, मिळेल ते खायचं, नाहीतर नुसतं निवांत बसून रहायचं असं वागतात ना... तस्संच वाटतं मला या मंडळींना पाहून.. गेल्या दिवसांचं दु:ख नाही अन् उद्याच्या चिंतेनं डोकं धरुन बसणं नाही. आजचा दिवस आपला, तो छान घालवूया ही यांची विचारसरणी पहायला छान वाटते. उत्तम समुद्रकिनारा आहे, आंबा, नारळ, फणस यांपासून विविध जंगली झाडं असलेला हिरवागार निसर्ग आहे अन् सोबतीला दारिद्र्यही! सगळं जणू एकमेकात पूर्ण मिसळून गेलंय. या लोकांना आवडणा-या रंगीबिरंगी कपड्यांसारखं!
- सुधांशु नाईक, मुक्काम मुनरोविया, लायबेरिया🌿
( nsudha19@gmail.com)

Sunday, 22 November 2020

मी...आता लिहीन थेट आफ्रिकेतल्या लायबेरियातून...

सुप्रभात मित्रहो...थेट लायबेरियातून.. इथं आता सकाळचे 10.30 झालेत. आम्ही आहोत GMT+0 या टाईमझोनवर, म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेच्या 5.30 तास मागे...!

19 नोव्हेंबरला उत्तर-पश्चिम आफ्रिकेतील एका टोकावर असलेल्या या देशात मी दाखल झालोय. Light up Monrovia या प्रोजेक्टअंतर्गत पाॅवर सबस्टेशन्स, ट्रान्मिशन लाईन्स, घराघरात वीज पुरवण्यासाठीची वितरण व्यवस्था याबाबत इथे काम सुरु आहे. एका भारतीय कंपनीचा प्रोजेक्ट हेड म्हणून इथं दाखल झालोय. मी येण्यापूर्वीच या वर्षभरात इथं काम सुरु झालंय. कोविडसंकटामुळे माझं येणं लांबलेलं.
अत्यंत गरीब अशा या देशात अनेकांच्या घरात आजही वीज नाही. रस्त्यांची अवस्थाही फारशी ठीक नाही. काही बडी मंडळी सोडल्यास 70 टक्के जनता गरीब आहे... 
त्यांच्यासाठी युरोपियन युनियन, वर्ल्ड बॅन्कमार्फत काही मदत योजनांचा एक भाग म्हणून हा प्रोजेक्ट राबवला जात आहे.

आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे मोदी सरकारच्या काळात या 2- 5 वर्षांत इथं ब-यापैकी मदत देण्यात आली आहे. टाटांच्या सहकार्यानं भारत सरकार ने तब्बल 50 प्रवासी बस इथं लोकांना प्रदान केल्या आहेत. तसेच अन्य विविध प्रकारे या देशाला मदतीचे प्रयत्न सुरु आहेत.
इथं काम करणं नक्कीच आव्हानात्मक आहे अन् त्याचवेळी आनंददायीदेखील!
भरपूर झाडं आहेत. त्यात आंबा, काजू, फणस, नारळ, केळी, अननस आदि परिचित झाडंही खूप आहेत सर्वत्र. या देशात भरपूर रबर व पाम यांची लागवड केली गेलीये. 

प्रगत जगाशी यासारख्या अन्य देशांना जोडून घेण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत त्यातीलच हा आमचाही एक  प्रोजेक्ट....

कामं सांभाळून इथल्या गंमतीजमती मी माझ्या ब्लाॅगमधून यापुढे जमेल तसं लिहायचा प्रयत्न करेन. भेटत राहू इथं..!
- सुधांशु नाईक, मुनरोविया, लायबेरिया. 🌿 
(फोटोत लायबेरियाच्या विमानतळाची नवी लहान इमारत, तसेच पूर्वीची साधी सुधी अशी जुनी इमारतही. आमच्या आॅफिसच्या मागे जरा दूरवर दिसणारा अटलांटिक महासागराचा किनारा. मीही अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, लाल समुद्र यानंतर प्रथमच हा अटलांटिक सागर पहातोय.)

Sunday, 15 November 2020

पुस्तक परिचय # वेध महामानवाचा:- डाॅ. श्रीनिवास सामंत

पुस्तक परिचय या लेखमालेतील  पुढील ग्रंथाविषयी अनेकांशी यापूर्वी गप्पांमध्ये, माझ्या शिवचरित्रावरील व्याख्यानातून सांगितले आहे, आज लिहितो. 
- सुधांशु नाईक
छत्रपती शिवाजी महाराज हा मराठी माणसाचा अत्यंत आवडता विषय. आजवर विविध शिवचरित्रे, शिवरायांच्या कार्याचा मागोवा घेणारी विविध पुस्तके, कथा- कादंब-या सर्वांनी वाचल्या असतीलच. मात्र ज्या विविध युध्दांतील पराक्रमांमुळे शिवरायांना देवत्व मिळालंय त्या युध्दांविषयी तसेच एकंदर शिवरायांची कार्यपध्दती, राजकारण, अर्थकारण याचा समग्र व वेगळ्या पध्दतीनं आढावा घेणारं माझे दोन अत्यंत आवडतं असे ग्रंथ म्हणजे विजयराव देशमुख यांनी लिहिलेलं शककर्ते शिवराय अन् दुसरा अधिक महत्वाचा ग्रंथ म्हणजे वेध महामानवाचा... आज या विषयी...
ग्रंथ : वेध महामानवाचा
लेखक : डाॅ. श्रीनिवास सामंत
प्रकाशन : देशमुख आणि कंपनी
प्रथमावृत्ती 1996, 1998. 
( सध्या कितवी आवृत्ती बाजारात आहे हे माहिती नाही.)
माझ्याकडील द्वितीय आवृत्तीचे मूल्य : 500 रु.

डाॅ. श्रीनिवास सामंत हे मुंबई विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक. तसेच भारत व फ्रान्सच्या एका संयुक्त संशोधनप्रकल्पातही कार्यरत. सतत सह्याद्रीत भटकंती करायचे वेड. त्यातूनच इथला भूगोल व इतिहासाची सांगड घालत त्यांनी हा ग्रंथ सिध्द केलाय.
सह्याद्रीत शिवचरित्रातील महत्वाच्या घटना घडल्या त्यांबाबत चरित्रमय लेखन झालं. मात्र विविध युध्दांत प्रसंगानुरुप स्वीकारलेली युध्दनीती, इथल्या भूगोलाचा केलेला सुयोग्य वापर, त्यानुसार आखलेली रणनीती, या सगळ्याबाबत या ग्रंथापूर्वी खूपच कमी असं लेखन झालं होतं. 'वेध महामानवाचा' या ग्रंथामुळे मात्र या सर्व कालखंडातील घटनांचा युध्दनीतीच्या अनषंगानं सखोल असा इतिहास व त्यावरील विवेचन हे सारं प्राप्त झालं. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे सामंत सरांनी या ग्रंथात बनवून समाविष्ट केलेले उत्तम असे विविध नकाशे.

 या नकाशांसाठी तरी प्रत्येकानं हा ग्रंथ जरुर पहायला हवा.
साधं एकच प्रतापगडच्या युध्दाचं उदाहरण घेऊ. अफजलखान विजापूर निघाल्यापासून कुठल्या मार्गे आला, प्रतापगडचं भौगोलिक महत्व काय, या परिसरात सैन्याची जमवाजमव कुठे व कशी केली गेली हे सर्व नकाशांचा आधार देऊन इतकं सुरेख पध्दतीनं मांडण्यात आलंय की आपल्याला जणू वाटतं हा सगळा प्रसंग आपण समोर प्रत्यक्ष पाहत आहोत.
सामंत सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते नुसता इतिहास व भूगोल मांडत नाहीत तर राजनीती, युध्दनीती कशी असावी याबाबत चाणक्यानी प्राचीन काळी लिहिलेल्या ' अर्थनीती' या ग्रंथातील संदर्भ देत हे सारं शिवाजीमहाराजांनीही किती योग्य प्रकारे हाताळलं हे साधार दाखवून देतात. एक माणूस म्हणून शून्यातून सुरुवात करताना शिवराय अन् त्यांच्या सर्व सहका-यांनी विविध नीतींचा अभ्यास करुन प्रसंगानुरुप त्यांचा कसा सुयोग्य वापर केला हे दाखवून देतात. शिवचरित्रातील बहुतेक सर्व लढाया त्यांनी या ग्रंथात कव्हर केल्या आहेतच मात्र ते करताना शिवरायांचं दैवतीकरण न करता एक बुध्दिमान राजा व त्यांचे हुषार सहकारी राजनीती, युध्दनीतीचा अभ्यास करुन त्यात किती पारंगत झाले व कसे यशस्वी झाले हे दर्शवत राहतात.
गेली 20 वर्षं शिवचरित्रावर व्याख्यानं देताना, स्लाईड शोज् दाखवताना मला व अन्य अनेक अभ्यासकांना या ग्रंथाचा फार उपयोग झाला आहे. इतकंच नव्हे तर हा ग्रंथ तुम्ही कशा प्रकारे इतिहासाकडे पाहिलं पाहिजे हेच जणू दाखवून देतो. आपणा भारतीयांना महामानवांचं दैवतीकरण करायची फार वाईट खोड आहे. त्या महामानवांचे विचाऱ, आचार, जगण्याची वृत्ती, सज्जनांचं पालन व दुर्जनांचं निर्दालन करायची त्यांची धमक हे सारं आपल्यात यावं यासाठी प्रयत्न करायचे नसतात हे कटू सत्य जाणवते. 

आपली मजल कुठवर तर या महामानवांची मंदिरं बांधून त्यांची पूजा करणे, रस्ते, चौक, शहरांना त्यांची नावं देणे इथवरच. या देशात राम-कृष्णापासून चाणक्य, चंद्रगुप्त, सम्राट हर्ष, विक्रमादित्य, सातवाहन, चालुक्य आदि अनेक मोठी माणसं होऊन गेली मात्र त्यांच्यापासून दुर्दैवानं आपण काही फारसं शिकलो नाही असं खेदानं सांगावंसं वाटतं. छत्रपती शिवरायांसारखा एक तेजस्वी पुरुष याच पंक्तीतला. या माणसांच्या मोठेपणाचा अापण अभ्यास करायला हवा अन् त्यांच्याप्रमाणे आचरण केलं तरच त्यांचं नाव घेण्याची आपली लायकी आहे असं म्हणता येईल.
वेध महामानव हा शिवरायांवरचा जसा ग्रंथ आहे तसेच अभ्यासात्मक ग्रंथ इतरांविषयी लिहिले गेले पाहिजेत तर समाजाला एक दृष्टी मिळू शकेल. शिवरायांच्या जगण्याविषयी, विचारांविषयी जाणून घ्यायची इच्छा असणा-यांना या ग्रंथाला कधीच टाळता येणार नाही असे मला वाटते. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासायला हवा हे पुन:पुन्हा मला सांगावेसे वाटते.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

पुस्तक परिचय # युध्द जीवांचे :- गिरीश कुबेर

पुस्तक परिचय या उपक्रमांतर्गत ज्या पुस्तकाविषयी आवर्जून लिहावंसं वाटतंय ते पुढचं पुस्तक आहे युध्द जीवांचे.
 " माणसाच्या प्रगतीचा इतिहास हा माणसं मारायच्या नवनवीन साधनांच्या प्रगतीचा इतिहास आहे" अशा परखड ओळीनं यातलं दुसरं प्रकरण सुरु होतं. कडवट अशा सत्याची पानोपानी प्रचिती देणारं हे पुस्तक. सध्या कोरोना विषाणूच्या हाहाकारानं आपण सगळेच विविध प्रकारे त्रस्त झालो आहोत. हे चायनानं निर्माण केलेलं बायो वाॅर असंही काहीजण म्हणतायत.  मात्र गेली जवळपास 100 वर्षे सर्व बलशाली देशांकडून जगभर विषाणू/ जीवाणू निर्माण करुन बायो वाॅर खेळलं जात आहे, दुर्दैवानं ते आपल्याला ठाऊक नाही. या भयानक जीवघेण्या प्रक्रिया अन् त्याचे भीषण परिणाम मांडणारं पुस्तक आहे हे.

पुस्तक : युध्द जीवांचे
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशन : राजहंस
मूल्य : 275 रु. फक्त.

जागतिक राजकारण अन् अर्थकारण याबाबत ब-याचदा आपण मराठी वाचक काहीप्रमाणात अनभिज्ञ असतो कारण त्याबाबतची अनेक विदेशी पुस्तके, अनेक परदेशी वृत्तपत्रे, शोधपत्रकारिता याबाबत आपला तुलनेनं कमी अभ्यास असतो. त्यात हा देश आपला, तो परका वगैरे ठोकताळेही सर्वांचे असतातच. हे आपल्याच बाबतीत नव्हे तर अनेकांच्या बाबतीत जगभर घडतं. त्यामुळेच जागतिक इतिहासावर खळबळजनक असं काही वाचलं की ' डोळे उघडल्याची' भावना होते. जगभरच्या विविध पुस्तकांचा वगैरे जो संदर्भ गिरीश कुबेर यांनी पुस्तकाच्या शेवटी जोडला आहे ते पाहून अशा वाचनाची जशी त्यांना गोडी लागलीये तशीच सर्वसामान्याना गोडी लागावी असे वाटते. 
जागतिक राजकारण अन् अर्थकारण हा गिरीश कुबेर यांचा हातखंडा विषय. त्यांचं परदेशी संदर्भग्रंथांचं वाचनही भरपूर आहे. त्यातून मिळत असलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी मराठी वाचकांना नेहमीच दिल्या आहेत. 'तेल नावाचा इतिहास", " एका तेलियाने", " अधर्मयुध्द" ही त्यांची या पुस्तकाच्या पूर्वीची पुस्तकंही सर्वांनी आवर्जून वाचावीत अशीच.
युध्द जीवांचे हे पुस्तक म्हणजे  जागतिक राजकारणात, अर्थकारणात आपल्या फायद्यासाठी जी युध्दं घडवली गेली, अनेक विषाणू प्रयोगशाळेत कसे निर्माण केले, त्यांचा क्रूरपणे लोकांवर कसा वापर केला गेला त्याचाच विदारक इतिहास आहे.

आपल्याला हिटलरने केलेला ज्यूंचा नरसंहार माहिती असतो मात्र ब्रिटनने केलेला, जपाननं चीनमध्ये केलेला, अमेरिकेनं व्हिएतनाम वगैरे देशात केलेला, आखाती देशातील क्रूर बादशहांनी केलेला अघोरी नरसंहार ठाऊकच नसतो. या नरसंहाराला जैविक वा रासायनिक अस्त्रांची जोड दिली गेली त्यामुळे त्याची भयानकता अधिक वाढली आहे.

कुबेर एका ठिकाणी म्हणतात , " जपानचा विषय निघाला की दोन प्रतिक्रिया हमखास येतात एक म्हणजे किती सोसलंय या देशानं अन् दुसरं म्हणजे इतकं होऊनही तो देश कसा फिनिक्स पक्षा सारखा उभा राहिलाय वगैरे. मात्र गेल्या शतकात जपाननं जे उद्योग केलेत ते सहृदयी सोडाच पण कोणताच साधाहृदयी माणूसही करु शकणार नाही. माणसाच्या क्रौर्याला मर्यादा असतात या विधानाच व्यत्यास म्हणजे जपान...!" 
काय केलं होतं जपाननं ते बारकाईनं या पुस्तकात वाचायला मिळतंच. फक्त एक उल्लेख सांगतो. 
चीनमधल्या एका प्रांतात युनिट 731 ची स्थापना झाली. जपानच्या ताब्यातील चिनी कैद्यांवर इथं प्रयोग केले जात. पटकी, काॅलरा, टायफाॅईड, प्लेग असे विविध रोगांचे विषाणू त्यांच्या शरीरात सोडले जात व हे विषाणू नक्की आत काय करतात  हे पहाण्यासाठी जिवंतपणीच कैद्यांची शरीर फाडली जात. जवळपास 300 किलो प्लेग, 900 कि टायफाॅईड अशा प्रकारे हजारो किलोंची औषधं बाॅम्बमध्ये भरुन जपाननं तयार केली. मग काही चिनी गावांवर विमानातून बाॅम्बफेक व्हायची. लोकांना दिसायचं तर काही नाही पण काही दिवसानंतर कुत्री, कोंबड्या, गुरं व माणसं विशिष्ट साथीच्या रोगानं मरायची. हिटलरनं ज्यूंचा जो विनाश केला त्याच्या कितीतरी पट अधिक विनाश जपाननं घडवला. हे इतकं भयानक होतं की हिटलरसुध्दा दयाळू वाटण्याची शक्यता आहे.

जपान प्रमाणेच वागलेत अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, चीन, रशिया अन् आखाती देश.
ब्रिटन हा देश नेहमीच मानवतावाद, सर्वोत्तम लोकशाहीवादी असल्याचे ढिंढोरे पिटत आलाय. ज्या चर्चिल यांचा युध्दकालीन नेतृत्वाबद्दल उदोउदो होतो त्या चर्चिल यांनीही जैविक अस्त्रांच्या वापराला अनुमती दिली होती. इतकंच नव्हे तर मध्यपूर्व किंवा आशियातील असंस्कृत अशा लोकांच्या विरोधात ही रसायनास्त्रं वापरायला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी 1920 मध्ये एका लष्करी अधिका-याला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.
जगभरचं राजकारण अर्थकारण ज्यांच्या ताब्यात एकवटलंय त्या रशिया व अमेरिका या देशांमध्ये अधिकाधिक हानीकारक जैव/ रसायनास्त्र आपल्याकडे असावीत यासाठी प्रचंड चढाओढ निर्माण झाली होती. आजही आहे. 

जेव्हा प्रचंड प्रमाणात निर्माण केल्या गेलेल्या रसायनास्त्रांवर टीका केली गेली तेव्हा मग काही प्रमाणात काही गोष्टी नष्ट केल्याचं दाखवण्यात आलं. म्हणजे काय तर चक्क समुद्रात टाकली गेली ही अस्त्रं. प्रचंड विनाशकारी प्रदूषण निर्माण करत. समुद्रात टाकला गेलेला कचरा म्हणजे 375 टन अश्रूधूर, 190 टन लेविसाईट, लाखभर फाॅस्जेन बाॅम्ब, 4 लाख पौंडापेक्षा जास्त किरणोत्सारी कचरा...इत्यादी. त्यातही ही फक्त अमेरिकेची यादी. 2006 मध्ये अमेरिकन संरक्षण खात्यानंच सांगितलं की हा कचरा साफ करायचा असेल तर किमान 3400 कोटी डाॅलर्स खर्च करावे लागतील... अर्थातच हे बजेट बजेटच राहिलं आहे. सूज्ञास अधिक सांगणे न लगे.
आजही घातक जैविक व रासायनिक अस्त्रं बनवण्याचं काम अनेक देशांतून जोरात सुरु आहे. आगामी युध्दं ही विषाणू व जीवाणूंच्या जोरावर लढली जातील असा बहुतेक सर्व संरक्षण तज्ज्ञ मंडळींना वाटते.
त्यामुळे विविध देशांत यावरील संशोधन व निर्मितीला वेग आला आहे.
आर्थिक फायद्याची गणितं घालून हे घातक तंत्रज्ञान आता जगभरच्या अनेक लहानमोठ्या आतंकी देशांच्या हाती पोचलं आहे. 

यापुढचा काळ कसा असणार हे कोरोना साथीनं आपल्याला उमगलं आहेच. मात्र यातून सर्वांनी शहाणं होण्याची गरज आहे. जगभर वाढत असलेली स्वार्थी वृत्ती, सत्ताकांक्षा, हपापलेपण, लोभी वृत्ती पहाता पुढचे दिवस अधिकाधिक जैविक युध्दांचे असण्याचीच शक्यता. ते युध्द कसं असं शकतं यांचं रुप या पुस्तकातून नक्कीच विदारकपणे समोर येतं. 

भविष्यात असं काही घडूच नये अन् माणसामाणसात द्वेषापेक्षा प्रेमाची भावना वाढावी, सर्वांनी माणूस म्हणून माणसाची व अवघ्या सृष्टीची काळजी घ्यावी या प्रार्थनेशिवाय आपल्या हाती मात्र काहीच उरत नाही.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿

पुस्तक परिचय # विश्वस्त :- वसंत वसंत लिमये

मित्रहो, पुस्तक परिचय या उपक्रमात कृष्णा दिवटे यांच्यामुळे सामील झालो. सलग आठवडाभर एका पुस्तकाचा परिचय, त्याविषयीचं मनोगत लिहायची ही साखळी. त्यातला आजचा हा पुस्तक परिचय. 

आजचं पुस्तक खूप खास असं. हे पुस्तक म्हणजे एक महाकादंबरी आहे एका अवलियानं लिहिलेली. त्या अवलिया वल्लीचं नाव आहे वसंत वसंत लिमये. नावापासून आजवरच्या आयुष्यापर्यंत ज्यांचं सारंच जगणं वेगळेपण दर्शवणारं अन् विलक्षण असं आहे. या ग्रेट व्यक्तीची ओळख झाली, त्यांनी मला आपला मित्र मानलं, त्यांच्या मुलाखती घ्यायची संधी मिळाली, त्यांच्यासोबत जरासा प्रवास करता आला हा माझा भाग्ययोग आहे!
- सुधांशु नाईक
वसंत लिमये यांना त्यांचे बहुतेक स्नेही अन् अगदी मुलंसुध्दा बाळ्या या नावानंच हाक मारतात. आपण बाळासाहेब म्हणूया. 

तर मंडळी, हे बाळासाहेब आयआयटीतून इंजिनियर झाले. घरात विद्वान व विविध भाषांवर प्रभुत्व असणारे वडील. त्यामुळे वाचन वगैरे कलांची ओढ होतीच. काॅलेजशिक्षणादरम्यान गिर्यारोहणाचा छंद लागला. थेट मग आजवर कुणीही जे धाडस केलं नव्हतं ते यांच्या टीमनं केलं... हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा सर केला. पुढील आयुष्यात कांचनजंगा सारख्या शिखरांच्या प्रथम मोहिमा. शिक्षणासाठी वगैरे घेतलेलं कर्ज फेडायला मग नोकरीला सौदी अरेबियात. तिथून पुरेसं कमवल्यावर मग साहसी पलायन. तिथून युरोपात. गिर्यारोहणातच करियर करायचं हे ठरवून काही तंत्रशिक्षण. पर्वतरोहणाचं व्यसन जडलेल्या समव्यसनी मित्रांसह मग संस्थेची स्थापना. अनेक मोहिमा. पुढे सह्याद्रीतील ताम्हिणी घाटाजवळ गरुडमाची या अडव्हेंचर व मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर ची स्थापना. ( इथेच विराट कोहली व टीमला प्रशिक्षक अनिल कुंबळे घेऊन आल्याची बातमी व फोटोज् कदाचित तुम्ही पाहिले असतील.)
हे सर्व सांभाळून हा माणूस सह्याद्री व हिमालयात भटकंती करत राहतो व त्यासोबत उत्तम असं लेखनही!
हा परिचय वाचून जशी छाती दडपली जाते तसंच त्यांच्या महाकादंबरीचा आवाका पाहूनही! आज ज्या महाकादंबरीविषयी मी थोडसं बोलणार ती कादंबरी आहे विश्वस्त.
पुस्तक : विश्वस्त
प्रकाशन : राजहंस तिसरी आवृत्ती : 2018
मूल्य : 500 रु.
विश्वस्त ही कादंबरी म्हणजे गेल्या चार हजार वर्षातील इतिहासाचा फेरफटका आहे अन् सोबत आहे एका खजिन्याच्या शोधाची अद्भुतरम्य अशी थरारकथा. कल्पनेतील विश्वाला इतिहास व वास्तवाशी जोडत ही कादंबरी सुरुवातीपासूनच असे रंग भरत जाते की वाचणारा आजच्या रोजच्या जगण्याचं भान विसरतोच. खजिन्याविषयीच्या लहानमोठ्या शोधकथा, गूढकथा वाचणं वेगळं अन् सुमारे चार हजार वर्षातील घटनांचा ताळमेळ घालत एक भली मोठी विस्मयकारक कथा मांडणं वेगळं. यात बाळासाहेब अगदी यशस्वी झाले आहेत.  मुरलीधर खैरनार यांची सुरतेच्या लुटीतील खजिन्याविषयीची शोध ही कादंबरीही अशीच वाचकांना खिळवून ठेवणारी होती पण तिचा आवाका खूप लहान होता. विश्वस्त ची सुरुवातच मुळी होते ती भगवान कृष्णाच्या शेवटच्या दिवसांपासून..
द्वारकेत यादवी माजलीये. सगळे भाऊ भाऊ एकमेकांवर तुटून पडलेत. आपल्या संपूर्ण कुलाचा विनाश होणार हे भविष्य माहिती असलेला भगवान कृष्ण उध्दव या त्याच्या जिवलगासह मात्र शांतपणे अावराआवर करत आहे. स्थितप्रज्ञ आहे. 

त्याला सगळ्यात मोठी चिंता आहे ती द्वारकेतील अफाट मोठ्या खजिन्याची. हा खजिना यापुढील भविष्यात योग्य हाती पडावा व त्याचा जनकल्याणासाठी वापर व्हावा ही त्याची तळमळ आहे त्यातूनच मग एक योजना तयार होते खजिना गुप्त जागी पाठवायची अन् सोबत संदेश देणारा ताम्रपट.
कादंबरीतील कृष्णाच्या तोंडची ही वाक्यं फार समर्पक आहेत. तो  म्हणतो, " सारे पाश निखळून पडत असताना कसलीछ आसक्ती उरली नाही. दीर्घ आयुष्यात घडून गेलेल्या घटनांचा विषाद आहे वैफल्य आहे पण पश्चात्ताप नाही. स्वत:चे कर्म ओळखून कर्तव्यभावनेनं मी सारं करत आलो. अपार माया, प्रेम, वैभव प्राप्त झाले पण कोठल्याही मोहाला बळी न पडता मी अस्पर्श, अनासक्त राहिलो. आयुष्याची अखेर जवळ आली आहे, मिळवलेले सारे वैभव भविष्याच्या हाती हवाली करत असताना ते निर्मोही, सत्पात्री वारसदाराच्या हाती पडावे ही प्रबळ इच्छा आहे. त्याचा विनियोग जनकल्यार्थ व्हावा अशी भविष्याकडून अपेक्षा आहे. तोदेखील एक मोह आहे हे कळतंय पण आयुष्याच्या अंतिम क्षणी मात्र तो मोह सुटत नाहीये...." हे वाचूनच आपण सरसावून बसतो..

कृष्णानं उध्दवाला आपला विश्वस्त नेमून योग्य वारदारांपर्यंत ही ठेव पोचवण्याचे ठरवले. द्वारकेतील खजिना अनेक मोठ्या बोटीतून त्या वादळी रात्री रवाना झाला. एवढं प्रचंड वादळ की या बोटी मुक्कामी पोचतील की नाही हेही काळालाच ठाऊक. तसेच काही निवडलेले यादव वीर गांधार देशापलीकडे जाण्यास सिध्द झाले. उध्दव ही द्वारकाधीशानं सांगितल्यानुसार बद्रीनाथला जाऊन उध्दवनारायण संप्रदाय स्थापन करायला निघाला. या खजिन्याचा उत्तराधिकारी नेमण्याची जबाबदारी त्याच्यावरच होती यापुढे!

चार हजार वर्षांपूर्वी घडलेलं ज्यांना अजिबात माहिती नव्हतं अशा पाच मित्रांचं टोळकं 2013 मध्ये ट्रेकिंगसाठी नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरच्या परिसरात दुर्गभांडार या गडावर निघालेलं असतं. मॅक उर्फ मकरंद, शॅबी उर्फ शब्बीर, प्रसाद, अनिरुध्द व ज्योअॅन ही पाचही जण फेसबुकमुळे एकमेकांच्या संपर्कात आली व दोस्त बनली. आपल्या टीमचं सहज असं नामकरण त्यांनी केलं जेएफके( just for kicks) 
दुर्गभांडार गडावरच्या मुक्कामात त्यांना एक ब्राम्ही लिपीतला ताम्रपट सापडतो अन् इतिहासाचा शोध घेण्यात रस असणारी ही मंडळी एका वेगळ्याच मोहिमेचा भाग बनतात किंबहुना त्यांच्याकडूनच नकळत मोहिम सुरु झालेली असते खजिन्याचा शोध घेण्याची! ताम्रपट तर सापडला पण त्याचं वाचन कसं करायचं हे त्यांना माहिती नसतं. 
ब-याच प्रयत्नांती ताम्रपटावरील श्लोकांचा उलगडा त्यांना होतो अन् कळतं की हा ताम्रपट चाणक्याचा काळातील आहे.

 मात्र त्यात द्वारकाधीश, उध्दवनारायण संप्रदाय, खजिना, विश्वस्त व योग्य वारसदाराची निवड आदि उल्लेख आहेत. निर्मोही, सत्पात्र साधक व्यक्तीला द्वारकेची संपत्ती लोककल्याणार्थ मिळेल अन् अन् चाणक्य हेही सांगतोय की या वैभवाचा एक अंश जनकल्याणासाठी वापरायला मिळाल्याबद्दल विष्णुगुप्त त्या जनार्दनाला प्रणाम करत आहे.
जेएफके टीम हे वाचून थक्क होते. अन् सुरु होते द्वारकेच्या खजिन्याची शोधमोहिम!
मुंबई, गुजरात, खंबायतचं आखात, युरोप, ओमान अशा विविध देशात पुढे कोणत्या थरारक घटना घडत रहातात हे वाचायलाच हवं. 

उध्दवनारायण संप्रदायातील एक भाग असा अवधूत संप्रदायाचा गट मुख्य विचारधारेशी फारकत घेऊन असतो. त्यांचाही खजिन्यावर डोळा असतो. तर खंबायतच्या आखातातील तेलसाठ्यांचा शोध घेत त्यावर मालकी हक्क प्रस्थापित करण्यात एका विदेशी कंपनीला रस असतो. जेएफके टीमचा या सर्वांशी पंगा पडत रहातो. या सर्वांतून त्यांची खजिना शोधमोहिम सुरु असते. देशातील 'वाघा' सारखा धडाडीचा नेता, एका प्रचंड मोठ्या संघटनेचे सदस्य/ पदाधिकारी अशा सर्वांसोबत जेएफके टीम भेटत/ भिडत राहते. या शोधमोहिमेत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो अन् त्यांच्या मदतीसाठीही काही हात पुढे येतात. 

द्वारकेचा तो खजिना त्यांना सापडतो का, त्यांना आपला जीव वाचवता येतो का, त्या खजिन्याचा सध्याचा वारसदार कोणाला ठरवलं जातं या व अशा थक्क करणा-या रहस्यभेदासाठी ही कादंबरी तुम्ही वाचायलाच हवी.

सुमारे चार हजार वर्षांच्या इतिहासात कृष्ण असतोच, मग चाणक्य येतो, मग गझनीचा महमूद येतो मग विविध मोहिमा, इ.स. 2010 नंतरचं भारतातील बदलतं राजकारण, उध्दवनारायण संप्रदाय, देशातील एक मोठी संघटना असा विस्तृत पट उलगडून दाखवत असताना वसंत लिमये आपल्याला खिळवून ठेवतात. गिर्यारोहणात जसं प्रत्येक पावलात 'पुढे काय?' ही उत्सुकता वाटत रहाते तशीच उत्सुकता कादंबरीचं प्रत्येक पान उलटताना वाटत रहाते. आपण इतक्या वर्षांचा कालखंड कधी चालत रहातो हेच कळत नाही. 

परवाच मी लिहिलेलं की इंग्रजी साहित्यात जसा मोठा कॅनव्हास घेऊन कादंबरी रंगवली जाते तसं मराचीत क्वचितच पहायला मिळतं. वसंत लिमये उर्फ आमच्या बाळासाहेबांची ही कादंबरी अनेक थरारक इंग्रजी कादंब-यांच्या अगदी तोडीस तोड ठरली आहे यात शंकाच नाही. त्यातही वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हा प्रचंड मोठा पट उलगडताना त्यांचं काळाचं भान सुटत नाही. कृष्णाचा कालखंड, चाणक्य, मेहमूद अन् सद्यस्थिती यातले सूक्ष्म भेद ते काळजीपूर्वक जपतात व कुठेही संदर्भांची- भाषेची सरमिसळ करत नाहीत हे लेखक म्हणून त्यांचं मोठं यश आहे असं मला वाटतं. 

कादंबरीची भाषाही सहज सोपी व आजच्या तरुणाईला सहज आवडेल अशीच. त्यामुळे हल्लीची पिढी वाचत नाही वगैरे जर कुणाला म्हणावंसं वाटत असेल ( मुळात हल्लीची पिढीही खूप वाचतेच अन् विविध साधांच्या आधारे वाचते  असं माझं मत आहेच) तर ही कादंबरी त्या व्यक्तीनं नक्की तरुण मुलामुलींना वाचायला द्यावी, त्यांना आवडेलच असे मला वाटते.

वसंत वसंत लिमये यांच्याशी मैत्र जुळलं म्हणून मी असं म्हणत नाही तर एक वाचक म्हणून हे असं उत्कंठावर्धक रसरशीत साहित्य अधिकाधिक  निर्माण व्हावं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं ज्यायोगे लोकांचं वाचनवेडही अधिकाधिक वाढत राहील असं मला वाटतं. जाताजाता एक गोष्ट मात्र नमूद कराविशी वाटते की थोडसं अधिक कठोर संपादन करुन जर कादंबरीची 50/ 60 पानं कमी करता आली तर कादंबरी अधिक क्रिस्प वाटेल व रहस्य उलगडलेलं वाचण्याची उत्कंठा अधिक तीव्र होईल असं मला वाटतं जे मी आधी बाळासाहेबांना बोललो आहेच.

सध्या बाळासाहेब नव्या काही कामात गुंतले आहेत व अशीच एक अजून भन्नाट कादंबरी लवकरच आपल्याला वाचायला मिळणार आहे ही आशा मोठी सुखद आहे.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

पुस्तक परिचय # द फाॅक्स :- फ्रेडरिक फोर्सिथ

नमस्कार. पुस्तकपरिचय या सिरीजमध्ये आज एका प्रख्यात विदेशी लेखकाच्या उत्कंठावर्धक कादंबरीचा परिचय करुन द्यावासा वाटत आहे. ही कादंबरी आहे,
 द फाॅक्स. त्याविषयी आजचा हा लेख.
- सुधांशु नाईक

विदेशी साहित्य ही खरंच एक प्रचंड मोठी अशी जादूची गुहा आहे. मी मुख्यत: फिक्शन मध्ये रमणारा साधा माणूस आहे. उगीच जड, गूढ, वैचारिक असलं काही वाचायचं मला जमत नाही. 'सेल्फ हेल्प'टाईप पुस्तकंही तुलनेनं कमीच वाचतो. फिक्शन या सेक्शनंध्ये जे दादा लेखक आहेत त्यात आर्थर हिली, सिडने शेल्डन, आयर्विन वॅलेस, राॅबिन कुक, राॅबर्ट लुडलोम, जेफ्री आर्चर, डॅन ब्राऊन आदि सर्व आवडत्या लेखकांसोबत अजून एक लेखक मला आवडतो तो म्हणजे फ्रेडरिक फोर्सिथ. या सर्वांचं लेखन भले फिक्शन असलं तरी वास्तवाच्या इतकं हातात हात घालून जातं की काय खरं व काय खोटं हेच समजत नाही. हीच तर लेखकाची ताकद. त्यातही अनेक लहानलहान तपशील नोंदवत, त्यांचा आधार घेत या मंडळींचं लेखन असं काही फुलत जातं की हातातलं पुस्तक ठेवूच नये असं अनेकदा वाटतं.
फ्रेडरिक फोर्सिथ हा एक फार दादा लेखक आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दाचं वजन, कोणता शब्द कुठे, कसा व कधी वापरायचा याचं भान भलतंच सुरेख. ब्रिटनच्या एअरफोर्समध्ये पायलट म्हणून काम केलेला, गुप्तहेर म्हणून ब्रिटनसाठी काम केलेला, जगभर भ्रमंती केलेला, राजकीय, शासकीय, गुप्तवार्ता विभाग, युध्दभूमी इ.. इ.. असंख्य गोष्टींचा अभ्यास केलेला हा लेखक जेव्हा काहीतरी समोर देतो तेव्हा ते फार सर्वंकष अनुभव देणारं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे.

द फाॅक्स ही त्यांची वयाच्या 80 व्या वर्षात लिहिलेली ताजी कादंबरी.  2018 मध्ये आलेली. त्यांच्या गाजलेल्या द डे आॅफ द जॅकल, ओडिसी फाईल्स, अफगाण, अॅव्हेंजर, फिस्ट आॅफ गाॅड आदि कादंब-यांइतकी मला सशक्त वाटली नाही तरीही आजच्या काळातील नवोदित लेखकांपेक्षा कितीतरी पट सुरेख आहे. मुळात द फाॅक्स चा विषय हा आजचा आहे व या लेखकानं अभ्यासाअंती जो थरार निर्माण केलाय तो अनुभवणं फार रोमांचकारी आहे.

मित्रहो, आपण सध्याचं युग हे डिजीटल युग आहे असं मानतो. पण म्हणजे काय हे आपल्याला तसं वरवरच माहिती.
फेसबुक, व्हाटसअप, इंन्स्टा, गुगल, इमेल चा वापर, तसंच काही प्रमाणात आॅनलाईन आर्थिक व्यवहार म्हणजे डिजीटल युग असाच आपला समज. मात्र असं नाहीये. तर आपल्या सर्व आॅनलाईन व्यवहारांवर कुठूनतरी कुणीतरी लक्ष ठेवणे, आपला सगळा डेटा आपल्या नकळत जमवणे/ पहाणे/ वापरणे हेच मुख्यत: या डिजिटल युगाचं काम. आपल्याला अनेकदा वाटतं की फेसबुक/ व्हाटसअप/ इन्स्टा आदि सर्व फुकट आहे. पण तसं नसतं.
 त्याची पुरेपूर किंमत आपल्या नकळत वसूल केली जाते. 
मी ही पोस्ट किंवा अन्य काही फेसबुकवर प्रकाशित करताना, किंवा ते प्रसिध्द झाल्याझाल्या माझे डिटेल्स कुठेतरी अज्ञात ठिकाणी कुणीतरी चेक करेल व ते कुणाच्या उपयोगाचे आहेत का याची जुळणी करुन बिनबोभाट नकळत ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवेल..कधी पैसे घेऊन तर कधी तसंच.
मग पुस्तक विक्रेत्यांच्या जाहिराती मला दिसू लागतील वगैरे वगैरे. किंवा मी धोकादायक वाटलो तर माझ्यावर पाळत ठेवली जाईल किंवा प्रसंगी संपवलं जाईल. हे सगळं घडणं शक्य आहे...

हे झालं वैयक्तिक बाबतीत. मात्र हेच जेव्हा जागतिक पातळीवर राजकीय- आर्थिक- सत्तांकाक्षा याबाबत घडतं तेव्हा त्याला वेगळंच गांभीर्य येतं.
तोच आहे या कादंबरीचा विषय.

तर वळूया या कादंबरीकडे..

अमेरिकेत ते 9/11 घडतं व तिथून सुरु होतो हा नेटसॅव्ही प्रवास. त्यानंतर अमेरिकन संगणकीय व्यवस्थेत बरेच बदल घडले.. ब-याच नव्या सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्या. मात्र तरीही कुणीतरी शिरुन हेरगिरी केली. तसा निरोपच दिला चक्क संरक्षण खात्याला की तुमचा सर्व डेटा मी हॅक केलाय मात्र त्याचा दुरुपयोग करणार नाही. तुमची सिस्टीम फुलप्रूफ आहे असं समजू नका हे सांगण्यासाठीच हॅक केलंय. तो मेसेज मिळताच प्रचंड गदारोळ उडाला...! 
शोध घेतला गेलाच लगेच. स्पेशल कमांडो फोर्स, गुप्तहेर वगैरे मग त्या व्यक्तीचा खातमा करायला पोचले ब्रिटनमध्ये एका गावात.. एका घरात... त्या काॅम्प्युटरजवळ जिथून सिस्टिम हॅक केलेली. तो काॅम्प्युटरवाला हाता एक ब्रिटिश. त्यातही तो होता केवळ 18 वर्षाचा मुलगा अन् आॅटिस्टिक..!

थक्क होऊन सारे पहात रहातात. त्यांचा विश्वासच बसत नाही की, ज्याला चार पावलं धड चालताही येत नाही तो हे कसं काय करु शकतो?? त्यानंही माहिती चोरुन विकलेली नसते तर फक्त " तुमची सिस्टिम फुलप्रूफ नाही.." हा निरोप द्यायला हॅकिंग केलेलं असतं. हे तो परत सांगतोही..

मग चक्र फिरु लागतात. आणि त्याच मुलाचा वापर करायची योजना तयार होते. तो मुलगा मग शत्रू न बनता ब्रिटन- अमेरिकेचा मित्र बनतो.  रशिया, इराण, चीन, उ. कोरिया इ. देशात घडणा-या गुप्त व अणुबाॅम्ब वगैरे विषयक कामांची माहिती गोळा करायला हे नवं हत्यार या देशांना मिळतं. 
 आणि मग संगणकीय माध्यमातून त्या देशात सुरु असणा-या घातक संशोधनाला उध्वस्त करण्याची मोहीम राबवली जाते. हा सारा थरार मुळातून वाचण्याजोगा आहे. या प्रत्येक देशातले लहानसहान तपशील मांडत फोर्सिथ आपल्याला गुंगवून ठेवतो.
त्या राष्ट्रांनाही कळतं की यांच्याकडे काहीतरी आहे. मग तेही शोधमोहिम सुरु करतात.
त्यांच्या फुलप्रूफ सिस्टिममध्ये केवळ हाच एक मुलगा घुसु शकत असतो हे कळल्यावर ही राष्ट्रे त्याला संपवायचे प्रयत्न करतात. त्याच्यावरील हल्ल्याचे प्रत्येक प्रयत्न असफल ठरतात कारण त्याच्या संरक्षणाला सिध्द असलेला एक 70 वर्षीय ब्रिटीश अधिकारी.  डोळ्यात तेल घालून त्याच्या पाठीशी उभा राहिलेला हा ब्रिटिश अधिकारी कसा या सा-याला तोंड देतो ते मुळात वाचायलाच हवं! 18 वर्षाचा आॅटिस्टिक मुलगा व हा अधिकारी यांच्यात म्हटलं तर फारसा संवादही होऊ शकत नाही पण तरीही ते कसे बचाव करायचा प्रयत्न करतात, शेवटी हा मुलगा वाचतो की मरतो हे सगळं वाचताना आपण थक्क होत रहातो.

ब्रिटन, अमेरिका, इस्त्रायल, रशिया, इराण, उ कोरिया आदि विविध ठिकाणी काहीतरी घडत रहातं अन् फोर्सिथ ते प्रचंड परिणामकारकतेने थंडपणे मांडत रहातो..बॅन्केचे व्यवहार, त्या उच्चस्थानावरील मंडळींचं स्वार्थीपण आदि सगळं वाचताना हातातून कादंबरी ठेववत नाही.. पानापानामागून पानं उलटत रहातात. कादंबरी संपल्यावर इतकंच कळतं... आपल्या हाती काहीच उरलं नाहीये. आपण सगळेच फक्त वापरले जात आहोत..केवळ कुण्याच्यातरी फायद्यासाठी...! 

यापुढील युध्दं, हेरगिरी, हल्ले- प्रतिहल्ले हे सारं असंच घडत रहाणार आहे फक्त वेगळ्या माध्यमातून. ही माध्यमं संगणकीय असतील किंवा अन्य काही. अन् ज्याची या सा-यासाठी सिध्दता आहे तोच पुरुन उरेल. बळी तो कान पिळी ही म्हण पुन्हा पुन्हा सार्थ ठरणार आहे! आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संज्ञा परवलीचा शब्द ठरु लागलीये. ज्याच्याकडे हे तंत्रज्ञान आहे व इतरांवर मात करायची ताकद आहे तो सर्वांना खेळवत रहाणार आहे हे नक्की.

कादंबरीचा शेवटही जरा अकल्पित... पण कादंबरी संपल्यावर एक वेगळा धक्कादायक अनुभव नेहमीप्रमाणे फोर्सिथ देऊन जातो. जो कित्येक दिवस मनावर रेंगाळत रहातो. 
या अशा कादंब-या, त्यांचा तो विस्तृत पट, शेकडो माणसं, वेगवेगळे देश हे सारं हे लेखक ज्या समर्थपणे मांडतात ते पाहून आपल्या मराठीतही असं काही साहित्य अधिकाधिक प्रमाणात  निर्माण व्हावं असं वाटतं.

- सुधांशु नाईक ( 9833299791)
कोल्हापूर. 🌿

पुस्तक परिचय # नदीष्ट :- मनोज बोरगांवकर

✍🏼

कोल्हापूरच्या कृष्णा दिवटे सरांनी पुस्तकप्रेमी समूहाच्या ' पुस्तक परिचय' या उपक्रमात सहभागी होऊन मी वाचलेल्या पुस्तकांविषयी रोज एक लेख लिहावा, एकेका पुस्तकाविषयी आठवडाभर मनोगत मांडावं असं सुचवलं. या उपक्रमात आजवर अनेक दिग्गजांनी आपल्या आवडत्या पुस्तकांविषयी लिहिल्याचे समजले. त्यांच्या तुलनेत वयानं, अनुभवानं, वाचनानं मी खूपच लहान माणूस आहे. तसंच आजवर या उपक्रमात कोणती पुस्तकं येऊन गेली हे ही मला माहिती नाही. मात्र पुस्तकं ही माझी सुहृद आहेत. लहानपणी तिस-या चौथ्या वर्षी प्रथम पुस्तक हाती आलं अन् अन् मी वाचत सुटलो. अगदी माझाही जणू सखाराम गटणे झालाय... तो आजवर तसाच आहे. पुस्तक हाती मिळालं की मी तहानभूक विसरुन जातो त्यामुळे पुस्तकांविषयी लिहिणं म्हणजे जिवलगाविषयी लिहिणं. किती न् काय लिहू असंच होऊन जातं मला... 
त्यामुळे या उपक्रमात आधी ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांना सादर प्रणाम करुन, अधिक काही न बोलता मला आवडलेल्या पुस्तकांविषयी लिहिण्याची सुरुवात करतो. ही पुस्तकं तुम्ही वाचली असतीलच, नसल्याच तुम्हाला ही पुस्तकं वाचाविशी वाटू देत ही अपेक्षा.

आजचं पुस्तक आहे एका नदीवेड्या माणसाविषयीचं.

पुस्तकाचं नाव : नदीष्ट. 
लेखक : मनोज बोरगांवकर
प्रकाशन : ग्रंथाली.
 मूल्य : रु 200 फक्त.

नदीष्ट या पुस्तकाविषयी गेले वर्षभर सोशल मिडियात वाचत होतो. 2019 व 2020 या दोन वर्षात तब्बल तीन आवृत्त्या प्रकाशित झालेलं हे पुस्तक लवकरच वाचायची उत्सुकता होती अन् ते हाती आल्यावर लगोलग वाचून पूर्ण केलं.
नदीष्ट हे मुळात केवळ एक आत्मकथन किंवा कादंबरी किंवा ललितलेखन या प्रकारचं नाहीये किंबहुना हे असे सर्वच प्रकार यात थोडेफार समाविष्ट आहेत असं म्हणता येईल.
ही कहाणी आहे एका नदीसोबतच वसणा-या परिसंस्थेची. त्यात माणसं आहेत, प्राणी आहेत, आटत गेलेली किंवा पुरानं उफाणलेली नदी आहे. या पुस्तकात नायकाव्यतिरिक्त भेटणारी माणसंही वेगळी आहेत. त्यांचं त्यांच्या परीघातलं जे जगणं आहे ते फारसं पांढरपेशा समाजाला माहिती नसलेलं असं आहे. त्यांच्याही आयुष्यात नदीला काहीतरी स्थान असतं. ते कसं असतं हे या पुस्तकात पहायला मिळतं.

मुळात यातील नायकाप्रमाणे मीही एक नदीवेडा माणूस. चिपळूणला बालपणी आमच्या घरमालक अशा सुरेशकाकांनी नदीवर सोबत नेलं अन् तिथून माझ्यात नदीवेड भिनलं. भर उन्हात, भर पावसात नदीत तासनतास डुंबत बसलोय. चिपळूणच्या वाशिष्ठीसह अनेक नद्यांत मनसोक्त पोहलोय. मी काही पट्टीचा पोहणारा नव्हे. मात्र नदीत पोहत, उलटं पडून तरंगत आकाश निरखत रहायला मला आवडतं. नदीकाठ, माणसं, गाईगुरं, पक्षी पहात बसायला आवडतं. त्यामुळे लेखक मंगेश बोरगांवकर यांच्याशी मला माझी नाळ जुळल्यासारखी वाटली अन् एकहाती पुस्तक वाचून पूर्ण झालेलं.

मुळात पुस्तकाचा प्रथमपुरुषी नायक हा नदीवेडा आहे. त्याच्या भावजीवनात, रोजच्या जगण्यात नदीला फार वरचं स्थान आहे. रोजचं जेवणखाणं, नोकरी-व्यवसाय करणं, घरच्या जबाबदा-या हे जसं सगळं आपल्यासाठी अटळ, अपरिहार्य असतं तसंच नदीपासून दूर न रहाणं हे या नायकासाठी अपरिहार्य बनलेलं आहे.

गावात असणा-या नदीसोबत त्याचे भावबंध जुळलेत. पहाटेची नदी, दुपारची नदी, संध्याकाळची नदी, रात्रीची नदी कशी वेगवेगळी भासते याबाबत त्याचे खास अनुभव आहेत. प्रत्येक ऋतूत न चुकता नदीवरची त्याची  फेरी शक्यतो कधी चुकत नाही.  नदीचं विस्तीर्ण पात्र पोहून पैलतीर गाठण्यातला निरागस आनंद, त्यातला पौरुषार्थ नायकाला सदैव भुलावणारा आहे. यातील जी मजा आहे ती पट्टीच्या पोहणा-यालाच समजू शकते. पाण्याचे प्रवाह कसे बदलत असतात, पाण्याचं तपमान कसं बदलत असतं, कोणत्या तीरावर काय असतं अशा अनेक बारीक सारीक गोष्टी रोजच्या सरावानं माहीती होतात. त्याची सवय लागते. नदीसह त्या पर्यावरणाशी एक वेगळे बंध निर्माण होतात.

रोज नदीत पोहायला जाताना गर्दी टाळून जायचं म्हणून नायक वेगवेगळ्या युक्त्या करताना दिसतो. अन् मग जरा आडबाजूला जाता येता त्याला वेगळी माणसं दिसू लागतात. 
एखादी सकिनाबी, सगुणासारखा एखादा हिजडा, स्वत:च्याच चुकीपायी परिस्थितीनं प्रचंड पोळलेला भिकारी बनलेला भिकाजी, घाटावर गुरं चरायला नेणारा, मासे पकडणारा अशा लोकांशी नायकाचं काही वेगळंच मैत्र निर्माण होत रहातं.

त्यातही समाजातील या जवळपास सर्वात खालच्या थरातील व्यक्तींसोबत वावरताना त्याला पांढरपेशा भिडस्तपणाचं ओझं जे जाणवत रहातं ते आपल्यालाही अस्वस्थ करतं. ' लोक काय म्हणतील?' ही जाणीव जशी लाखो लोकांना त्रास देते तशीच नायकालाही...! 
या सगळ्यातून नदी वहात राहते. नायकाचं जीवन वहात रहाते. ज्यांना आयुष्यानं पदरी प्रचंड दु:ख दिलं ती माणसं ज्या धीरानं ते दु:ख उचलत जगत राहतात ते पाहताना विलक्षण रितं वाटत रहातं. 

एखाद्या नदीच्या पात्रात पोहण्याची मलाही फार आवड. पाणी त्यातही नदी वा तलावाचं, मलाही अतिशय प्रिय. त्या पाण्यात निवांत पाठीवर पडून तरंगत राहताना, वर दिसणारं निळंनिळं आभाळ, ढगांचे पुंजके पहाताना मनातले तरंग शांत शांत होत जातात. मला त्या तरंगण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. कितीही विचार मनात असले तरी पाण्यात उतरल्यावर खूप शांत वाटतं. वाहणारी ती नदी ज्या मायेनं कवेत घेते ती अनुभूती शब्दातीत असते. त्यामुळे लेखकाच्या अनुभवांशी माझी नाळ जुळत रहाते. 

आज खूप वेगळ्या प्रकारचं अन् सशक्त लेखन विविध माध्यमातून होत आहे. हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. ज्यांना नदीविषयी आत्मीयता आहे त्यांनी अवश्य वाचायला हवं असं मला वाटतं.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर🌿

पुस्तक परिचय # करुणाष्टक :- व्यंकटेश माडगूळकर

पुस्तक परिचय या लेखमालेतील हे पुस्तक एका सुप्रसिध्द कलावंताचं. मराठी साहित्यक्षेत्रात ज्यांनी आपला अमीट असा वेगळा ठसा उमटवलाय त्या व्यंकटेश माडगूळकर यांचं. मला अतिशय भावणारा हा लेखक. ग्रामीण जीवन, कलाक्षेत्र, परदेश, वन्यजीवन आदिंबाबत समर्थपणे अन् सहजसोप्या भाषेत लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य. 
त्यांच्या अनेक गाजलेल्या पुस्तकांसोबतच एक हळवं, स्वानुभवाचं पुस्तक आहे करुणाष्टक. बहुतांश रसिकांनी माडगूळकरांची विविध पुस्तके वाचलेली असतात करुणाष्टक मात्र कित्येकांनी वाचलेलं नसतं. का ते माहीत नाही. ज्यांनी वाचलंय त्यांच्या काळजात नक्की या पुस्तकानं घर केलं असेलच. पूर्वी हे पुस्तक मॅजेस्टिकनं प्रकाशित केलेलं. आता मेहतांनी त्याची नवी आवृत्ती आणलीये. त्याविषयी...

“करुणाष्टक - व्याकूळ करणारा अस्वस्थ अनुभव...!”
 - सुधांशु नाईक

करुणाष्टक म्हटलं की मराठी माणसाला समर्थ रामदासस्वामी यांची करुणाष्टके आठवतात. “ तुजवीण रामा मज कंठवेना...” अशा शब्दांतून ओसंडणारी त्यातली आर्तता मनाला भिडलेली असते. तीच भावना हे पुस्तक वाचतानाही मन भरून राहते.

करुणाष्टक हे अवघ्या १५७ पानांचं लहानसं पुस्तक. अगदी पहिल्या २-३ पानांपासूनच थेट काळजाला भिडतं. 

“करुणाष्टक” ची नायिका आहे या थोर भावंडांची आई. दारिद्र्याने हे कुटुंब देशोधडीला लागलं, त्याचीच ही कहाणी.
मराठीत आईवरच्या कविता खूप आहेत पण आईवरची पुस्तकं कमीच आहेत. त्यातलं हे एक महत्वाचं.
चार भावंडं, आई-बाप आणि आजी असं हे कुटुंब घर सोडून निघतं तिथूनच कहाणी सुरु होते. जिथं अनेक वर्षे वावरलो ते सारं असं सोडून जाताना होणारी उलघाल वाचक म्हणून आपल्यालाही अस्वस्थ करु लागते. ती आजी तर प्रथमच गाव ओलांडून दूर देशी निघालेली. ती भयंकर अस्वस्थ आहे. त्यात ते मिरजेच्या रेल्वे स्टेशनवर येतात. तिथं ते रूळ ओलांडताना सगळ्यांचीच तारांबळ उडते. आपल्याला रेल्वे चिरडून तर जाणार नाही ना असं जे अजाण बालकांना वाटतं, अगदी तसं या खेडुतांना वाटतं. शेवटी रूळ ओलांडताना आजी पडतेच. मग कसेबसे तिला उचलून बाजूला आणतात. तिचं ते भेदरलेपण, तुटलेपण मांडताना माडगूळकर म्हणतात, “ या प्रसंगानंतर मुळे उघडी पडलेल्या वेलीसारखी आजी सुकत सुकत गेली...” आणि अंगावर काटा येतो..!!

व्यंकटेश माडगूळकर हे उत्तम चित्रकार. प्राणी,पक्षी, वनस्पती अशा निसर्गात रममाण झालेले. उत्तम निरीक्षण शक्ती तर त्यांच्याकडे होतीच पण पाहिलेलं सारं नेमक्या व मोजक्या शब्दांत मांडायचं त्यांचं कसबही अफाट होतं. अनेक छोट्या छोट्या गोष्टी नोंदवत ते शब्दांतून जणू चित्र तयार करत जातात. नवं गाव, माणसं, त्यांचं वागणं, त्या सगळ्याशी एक हाती झुंजत आई कशी अफाट कष्टत रहायची याचं चित्र मांडत राहतात.  नव्या गावात पाण्याचे फार हाल असायचे. इथल्या ओढ्यात खड्डे करून लहान झऱ्यातून पाणी काढावं लागे. मग घरापर्यंतच्या चढावरून ते पाणी आणून घरी भरावे लागे. 
याबाबत एक प्रसंग ते सांगतात, “ या पाणी भरण्याचा आईने धसकाच घेतलेला. कधीही मध्यरात्री जग येताच ती ओढ्यावर जायला निघायची. घरात घड्याळ नव्हतंच. आभाळ पाहून अंदाज घ्यायचा, दिशा उजळल्याहेत, डोळ्यांना थोडं दिसतंय असं बघून बाहेर पडायचं. मात्र कधी हा अंदाज साफ चुकायचा. किट्ट काळोखात फक्त बेडक्यांचे आवाज येत. बिचारी आई एकटीच झऱ्याशी बसून पाणी भरायची. जड घागरी घेऊन धापा टाकत घरी यायची. बऱ्याच वेळानं पहाटवारे सुटायचे आणि मग हिच्या लक्षात यायचं की आपण तीन वाजायच्या सुमारासच ओढ्यावर जाऊन आलो...”हे सारं वाचताना आपण त्यात कधी गुंतत जातो ते कळतच नाही. 

एका प्रसंगात ते वडील, ज्यांना ते दादा म्हणत त्यांच्याविषयी ते फार आत्मीयतेने लिहितात. ते म्हणतात,“ इथं आल्यावर दादांना दम्याचा जास्त त्रास होऊ लागला. तरीही ते दूरवरच्या एका विहिरीवरून पाणी आणायचे. ती चव त्यांना आवडायची. मग एकदा मी पाणी आणायचं व त्यांना चकित करायचं ठरवलं....” असं म्हणत ते तो प्रसंग रंगवू लागतात. होतं काय तर रहाटावरून दोर सोडून घागर भारून घेताना लहानग्या व्यंकटेशाची चड्डी अचानक विहिरीत पडते, मग ती आणायला तो  पाण्यात उडी मारतो. मात्र वर परत कसं यायचं हे कळत नाही. शेवटी घरात आल्यावर घागर जागेवर नाही हे पाहून घाबरे घुबरे दादा विहिरीकडे येतात, त्यांना वर काढतात....
माडगूळकर हा खूप साधासा प्रसंग अशा काही खुमारीने रंगवत सांगतात की आपण तो प्रसंग जणू पाहू लागतो. आणि शेवटी ते म्हणतात, “ पुढे असा गर्तेत पडण्याचा उद्योग मी आयुष्यात आणखी काही वेळा केला, पण  दादा तेंव्हा मरून गेले होते... आणि आई सतत दूर होती.मला कुणीही शेंदून वर घेतलं नाही...”

अचानक असं वाक्य समोर येतं की वाचता वाचता आपणही ब्रेक लागल्यासारखे थांबतो. विचार करू लागतो. काळजात काहीतरी खूप टोचत रहातं.

कालांतराने शिक्षणासाठी दूर जाऊन राहिलेला मोठा भाऊ लेखक / कवी म्हणून मान्यताप्राप्त ठरला, तरी घराचं दारिद्र्य काही लवकर उणावले नव्हते. किंबहुना तो दहावी नापास होऊन प्रथम जेंव्हा घरी आला आणि आई कशी कडाडली ते सांगत म्हणतात, “ तुम्हाला कशी परिस्थितीची जाणीव नाही रे? जेंव्हा तेंव्हा गोष्टींची पुस्तकं नाकाला लावून बसतोस लाज कशी वाटत नाही? तुमच्यासाठी किती हाडाची काडे करतो आम्ही? अपेशी तोंड दाखवायला आलासच का? त्यापेक्षा तिकडं राहिला असतास, माधुकरी मागून जेवला असतास, रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करून पास होऊन माझ्यापुढे आला असतास तर तुझा अभिमान वाटला असता...!”...

 आणि भाऊ घराबाहेर पडला तो काही बनूनच मग पुन्हा समोर आला...!

पुढे ४२ च्या लढ्यात व्यंकटेश माडगूळकर सहभागी झालेले. त्यामुळे पुन्हा घरदार सोडून भटकत राहिले. त्यांची आई  कायमच चिंता करत राही. आपली मुलं काहीबाही करू लागली आहेत हे पाहून साठीनंतर पुन्हा त्यांचे आईबाप मूळ गावी परतले. तिथेच जुन्या पडक्या वाड्यात राहिले. शिक्षकी पेशा असलेला भाऊ त्यांचं पाहू लागला. मात्र तिथं राहायचं सुख नशिबी नव्हतंच. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि लगेच नंतर गांधीजींची हत्या झाली. गावचं घर जाळले गेले. पुन्हा हे सगळे मोठ्या भावाकडे जाऊन राहिले. मात्र वडिलांची जगण्यावरची वासनाच उडाली. भावाने गावातले घर जमेल तसं पुन्हा पत्रे घालून उभं केलं मात्र शेवटी वडील गेलेच. 
तिथून पुढची तीस वर्षांची वाट आई मग एकटीनेच चालत राहिली. तिची आठ मुलं म्हणजे जणू वेगवेगळ्या समस्या होत्या. कोडी होती. ती आपापल्या परीने सोडवत राहिली. तिचा जावई अकाली गेला. दोन्ही मुली अपघातात गेल्या. एक अन्य  मुलगा जो शिकून मोठा झाला त्याला मोठ्या राजकारणामुळे बदनाम केलं गेलं. त्याची निंदा-नालस्ती झाली. कर्तृत्ववान म्हणून नावाजलेला, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला थोरला मुलगाही मोठ्या आजाराने ग्रासला गेला. आईच्या डोळ्यातली झोप यामुळे कशी उडालेली हे वाचताना आपणही ती वेदना जगू लागतो.

अचानक आयुष्याच्या शेवटच्या दिवसात “आदर्श माता” म्हणून तिचा जाहीर मोठा सत्कार समारंभ ठरतो. आजवर कुणी तिचा कधी वाढदिवसही साजरा केलेला नसतो. साठी, पंचाहत्तरी वगैरे काही साजरं झालेलं नसते. अशा वेळी हा सत्कार म्हणजे तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो...

मात्र ......

 नियती या आईला तो एक सत्कारसुद्धा, त्याचा अपार आनंदही भोगू देत नाही. सोबत भल्या मोठ्या दु:खाचं दान देते.  हे वाचताना आपणही उरी तुटत राहतो...!
आपल्या आईच्या जीवनाविषयी लिहिताना माडगूळकर म्हणतात, “ तिचा प्रवास हा परिस्थितीच्या वाळवंटातून केलेला जीवन प्रवास होता. डोक्यावर आग ओकणारा सूर्य आहे. अचानक आडवे येत मार्ग खुंटवणारी वाळूची टेकाडे आहेत. धुळीची वादळे आहेत. तहान तहान आहे. जराशी हिरवळ आणि पाणी ही आहे... पुष्कळ काहीबाही आहे...”

या थोर कुटुंबाची प्रसिध्दी, नावलौकिक आपण पाहिलाय. मात्र सगळ्याला पुरून उरलेलं जे कारुण्य आहे ते मला अंतर्बाह्य व्याकूळ करून टाकतं. डोळ्यांना ओलं व्हायला तेवढं निमित्त पुरेसे असतं...!! 
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿

पुस्तक परिचय # मृण्मयी

पुस्तक परिचय या मालिकेत हा परिचयात्मक लेख माझ्या  एका अतिशय आवडत पुस्तकाविषयी...
गोनिदांची निखालस, निर्मळ आणि भावोत्कट “ मृण्मयी ”
 - सुधांशु नाईक.
गो. नी. दाण्डेकर. मराठी सारस्वतातलं एक अग्रगण्य नाव. उदंड भ्रमंती केलेल्या गोनीदांनी महाराष्ट्र अक्षरशः पायी फिरून पालथा घातलेला. वेगवेगळ्या भागातलं लोकजीवन, भाषा, निसर्ग, राहणीमान हे सारं उत्कटतेने न्याहाळलं. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास, एकनाथ यांच्यासह अनेक संतांचं लेखन भक्तिभावाने मुखोद्गत केलं. इथला भूगोल, इतिहास, बोलीभाषा आणि अध्यात्मिक परंपरा त्यांच्यात मुरत गेल्या. हे सारं त्यांच्या नसानसात भिनलं आणि त्यांच्या लेखणीवाटे निर्माण झालेल्या प्रत्येक साहित्यकृतीतून तरल, मुलायमपणे झरत राहिलं आनंदाचे मळे फुलवत. एखादा झरा जसा आसपासच्या हिरवाईचा रंग आणि रूप सोबत घेऊन लोकांना मोहवत राहतो तसं मग त्यांचं लेखन साहित्यप्रेमींना सतत आनंद देत राहिलं. 
अनेक बोलीभाषांवर समर्थ प्रभुत्व असलेला हा एक थोर साहित्यिक. त्यामुळे विविध प्रांतातल्या बोलीभाषा त्यातील सामर्थ्य, गोडवा आणि लहेजा घेऊन येतात त्या त्यांच्याच साहित्यात. परत प्रत्येक कादंबरीतला प्रांत वेगळा. तिथली भाषा वेगळी. 
वऱ्हाडी, वैदर्भी, कोकणी, खानदेशी, मावळी, आदिवासी अशा अनेक बोलीभाषांचा सुयोग्य वापर गोनीदांच्याच साहित्यात अतिशय ताकदीने सामोरा येतो. 
 “शितू”, पडघवली”, “कुणा एकाची भ्रमणगाथा”, “माचीवरला बुधा”, “पवनाकाठचा धोंडी”, “ तुका आकाशाएवढा”, “दास डोंगरी राहतो”, “ मोगरा फुलला”, “जैत रे जैत”, “आम्ही भगीरथाचे पुत्र”, “ तांबडफुटी”, “ पूर्णामायची लेकरं” अशा त्यांच्या कादंबऱ्यानी रसिकांना वेड लावलं. त्यांनी उभ्या केलेल्या कादंबरीमय शिवकालानं लोकांना तत्कालीन समाजजीवनाचं प्रत्ययकारी दर्शन घडवलं. विपुल लेखन केलेल्या गोनिदांची स्वतःची अत्यंत आवडती कादंबरी होती “मृण्मयी”.

आज त्याच मृण्मयीबद्दल!

पुस्तक – मृण्मयी 
लेखक गो. नी. दाण्डेकर 
प्रथम आवृत्ती- सप्टेंबर १९७०. मॅजेस्टिक प्रकाशन.
(सध्या गोनिदांच्या कन्या वीणा देव यांनी मृण्मयी प्रकाशनाअंतर्गत गोनिंदांची यासह विविध पुस्तकं पुनर्प्रकाशित केली आहेत)

असं म्हणावंसं वाटतं की ही जणू गोनीदांच्या हृदयात वास करून राहिलेल्या त्यांच्या स्त्रीरुपाचीच कथा. या भवतालावर उदंड प्रेम करणारी ती निसर्गप्रेमी आहे. ती राधा आहे, ती मीरा आहे आणि तीच ज्ञानेश्वरांची विराणी देखील आहे. तिचं सुंदरतेवरचं प्रेम फार फार हळवं आहे. हळव्या मनोवृत्तीच्या लोकांचं जगणं वेगळंच असतं. त्यांची आव्हानही वेगळीच असतात. त्या आव्हानांना भिडण्याची त्यांची ताकदही वेगळीच असते. आपल्याला थक्क करणारी. हे असं बरंच काही एका संथ प्रवासातून हळुवार सामोरं येत राहतं या कादंबरीतून. 
प्रस्तावनेत गोनीदा मृण्मयीच्या तोंडून म्हणतात, “तात्यांची मी अतिशय ऋणी आहे. धरतीवर निरातिशय प्रेम करणं त्यांनी शिकवलं. ओंजळ भरभरून काव्य दिलं. मज दुबळीला ज्ञानोबा-तुकोबांच्या हाती दिलं. विरागिनी मीरेच्या ओटीत घातलं. जनीच्या चंदनी वेदनांचा परिचय करून दिला. हे पदरी नसतं तर कशाच्या आश्रयानं उभी राहू शकल्ये असत्ये मी? तात्यांची शब्दकळा मजपाशी नाही. तरीही जमेल तसं लिहायचा प्रयत्न करत्ये. मृण्मयी हे नाव तात्यांनी योजलं होतं. ते मी बदललं नाही. करंगळीनं पाण्यावर काढलेलं हे रेखाचित्र आहे...!”

कादंबरी सुरु होते दाभोळ खाडीच्या निसर्गरम्य परिसरातून. ते वर्णनच आपल्याला वेढून टाकतं. 
गोनीदा लिहितात, “ दो बाजूंच्या डोंगरातून वाहणाऱ्या पर्ह्याच्या दोन्ही बाजवांवर हिरव्या कच्च बागांची दाटी. माडांचे झुम्बाडे स्वस्थपणे डुलत असलेले. आकाशात उंच बसलेल्या देवावर धरती जणू चवऱ्या वारत्ये आहे.! या बागांतून अलगद डोकी वर काढणारी कौलारू घरं. क्वचित कुण्या घरांतून वर उठणारा धूर. हेलकावे खात, विरळ होत आकाशी विरून जाणारा. पहात बसावंसं वाटे. दृष्टी ढळवू नये, पापणी मिटू नये. त्याच्यात हरपून जावं...”
हे सगळं असं शांतपणे शब्द न शब्द वाचत, तो मनात हळूवार मुरवत, त्या चित्रमय वर्णनाचा आनंद घेत गोनीदांचे साहित्य वाचावे लागते तरच त्यातली गोडी कळते. आपलं विश्व भरून टाकते. ५ मिनिटात उरकलेल्या जेवणासारखं हे उरकता येत नाही. उरकू नयेच.

मृण्मयीचे वडील पोटासाठी भटकत मग हे निसर्गरम्य कोकण सोडून कुठं कुठं जातात. शेवटी विदर्भात स्थिर होतात. त्यांच्या मनातलं जपलेलं कोकण मग मुलीच्या मनात पाझरते. तिला जणू आपला मुलगाच मानून ते खूप काही शिकवत राहतात. त्यांच्याकडच्या पुस्तकातून जग दाखवत राहतात. लहानगी मनू लहानपणी मोठी होत जाते. समजूतदार होते. जीवघेण्या उन्हाच्या कहारात एकदा शेवटी तिचं पितृछत्र हरपतं. कोकणात पुन्हा जायची, तिथलं घर पुन्हा नांदते करायची त्या बागा पुन्हा निगुतीनं फळत्या-फुलत्या करायची त्यांची इच्छा अपुरीच राहते. आणि तीच इच्छा पूर्ण करायचं स्वप्न मृण्मयी उराशी बाळगते. मग सुरु होतो एक वेगळा प्रवास. 

अति कठीण असा.

ज्या मोठ्या घराच्या आश्रयाने ते कुटुंब राहत असतं तिथं दुपारच्या पोळ्या करायचं काम तिच्या आईला करायची वेळ आली तर मनूने तिथल्या बायकांना दुपारी ज्ञानेश्वरी वाचून दाखवावी असं ठरलं. त्यातून त्यांना काही पैसे मिळायची सोय झाली. जेंव्हा इतर मुलं शाळेत शिकत असतात तेंव्हा मनावर दगड ठेऊन घर सांभाळताना लहानग्या मनूला वाटेत अनेक माणसे भेटत राहतात. त्यांचे राग-लोभ सारं काही सोसत ती पुढं जात राहते.
आणि मग ठाई ठाई तिचे वडील- तात्या तिला आठवत राहतात. गोनीदांनी लिहिलेला असंच एक उत्कट  प्रसंग. मनू तिच्या दुर्गा या मैत्रिणीशी बोलताना म्हणतेय; 
“ अर्धमुर्ध आकाश मेघांनी भरलेलं. पलीकडे लांबवर पाऊस उतरला होता. तिकडून वारा सुटला होता. मऊ मृद्गंध चहू दिशांनी भरून उरला होता. किती घेऊ न किती नको. अचानक तात्यांचं स्मरण झालं. कितीदा हा मृद्गंध माझ्या मनात भरवत ते रानांतून भटकले होते. त्यांनी माझ्यासाठी फार केलं होतं दुर्गे. एकदा ते बाहेरगावी गेलेले. तिथून परतत असताना गारांचा पाऊस सुरु झाला. मला गारा आवडत. मग तात्यांनी धोतरात ओचा भरून गारा गोळ्या केल्या. एकेक अशी मोठाल्या बोराएवढी गार. आणि मग धावत, धापा टाकत घरी परतलेले.. मला गारा खाऊ घालण्यासाठी...”
हे असे अनेक अलवार कोमल संवाद अक्षरशः पुस्तकभर विखुरले आहेत. मनाला खोलवर स्पर्शून जाणारे.

गरिबाला अब्रू नसते असं म्हणत एकेकाळी. लहानग्या मनूलाही काय काय सोसावं लागलं. केवळ कोकणात जायला मिळणार म्हणून अत्यंत वाईट अशा मुलाशी, मालकीणबाईनी जुळवलेली तिची सोयरिक ती स्वीकारते आणि लग्न करून कोकणात जाते. नवऱ्याचे- सासूचे अत्याचार मन घट्ट करून सोसत राहते. लहानशा बागेत काम करत, त्या माडा-पोफळीत, केळीच्या बागेत स्वतःच्या वेदना विसरू पहाते. वाईट चालीच्या नवऱ्याला शेवटी शासन होतं आणि उघडी पडलेली मनू अधिकच मनानं घट्ट होते. ज्ञानेश्वरीचे संस्कार जणू जगू लागते. जे काही शेवटी ती करते ते केवळ अविश्वसनीय असंच. मीरेसारखं...! तो शेवट शेवटचा प्रसंग अंगावर काटा आणतो. आपण दिङमूढ होऊन राहतो! 

पुस्तकाच्या मलपृष्ठावर जे मनोगत गोनीदांनी लिहिलंय ते इथं सांगायला हवंच. त्याविना सारं काही उणे आहे.

ते लिहितात, “ मृण्मयी हे केवळ मात्र शब्दकृत्य नव्हतं, तो एक अध्यात्मिक अनुभव होता. अश्या तश्या कुणाचा नव्हे, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. तिच्या इथं जो येई त्यांना इच्छाभोजन मिळे. एक दिवस एक तरणा देखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं मीरेकडे इच्छाभोजन म्हणून तिचं शरीर मागितलं. 
इवलं हासून ती म्हणाली, “ बस? हेच मागितलंत? ते तरी कुठं माझं उरलंय ? ते तर हरीनिर्माल्य आहे. हे माझे सखे-सहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्षच घ्या. विस्कटून टाका. इथंच अंथरूण मागवत्ये..”
या मृण्मयीनं- मनुनं ही जोश्याला असंच काहीसं म्हंटलं, “ हा तर  आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी तिळमात्र सत्ता नाही याच्यावर. घ्या, विस्कटून टाका.. जे कराल ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत, राताम्ब्यांची पालवी हलत असो....

हे ज्याला कळलं त्याला मृण्मयी कळली. तो यत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पाने उलटायचा ग्रंथ नव्हे...”

आपण मृण्मयीचे शेवटचे पान उलटतो.. पुस्तक संपतं. तरी मनभर उठलेलं काहूर भावविभोर करून टाकतं. आपण आपले उरत नाही. पुढचे अनेक दिवस मृण्मयी मनात किणकिणत राहते.. मंदिरातील नाजूक घंटेसारखी. निर्मळ भावनांनी वेढत राहते...!
सुधांशु नाईक, कोल्हापूर  ( ९८३३२९९७९१) 🌿

Thursday, 29 October 2020

जादूची पेटी :- किस्सा 10 वा. शिक्षण व युवा पिढी

#जादूचीपेटी # भाग 11 :- हा समारोपाचा भाग 
शिक्षण व युवा पिढी याबाबत.
नमस्कार मित्रहो, या सिरीजची दोन अडीच महिन्यापूर्वी सुरुवात केली ती दोन उद्देशाने. एक म्हणजे विविध लोकांना समुपदेशनाची गरज आहे हे जाणवलं. तर दुसरा उद्देश म्हणजे कोरोना संकटानं गांगरलेल्या लोकांना योग्य माहिती मिळावी, ज्यायोगे त्यांना शारिरीक व  मानसिक स्वास्थ टिकवता यावं यासाठी माझी एक लहानशी मदत. 

या दोन महिन्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे लोकांशी बोललो. त्यात युवा पिढीपेक्षाही जेष्ठ नागरिक व महिलांचा अधिक सहभाग होता. युवापिढीच्या मुख्य समस्या या रोजगाराशी संबंधित होत्या तर इतरांच्या समस्या दैनंदिन जीवनातील अशा. या समुपदेशनाचा मुख्य उद्देश हा घाबरलेल्या, अडचणी कुणासोबत शेयर करु न शकणा-या लोकांना मनमोकळ्या संवादाची एक संधी देणे इतकाच होता. अनेकदा केवळ मनातलं बोलता आलं नाही म्हणून पुढे मोठे प्रश्न निर्माण होतात. ते घडू नयेत यासाठी मोफत समुपदेशनाचं हे उचललेलं एक लहानसं पाऊल होतं.
ज्यांना मदत झाली त्यांनी प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवरुनही नंतर कृतज्ञता/ आभार व्यक्त केले. ज्या केसेस खरंच गंभीर होत्या त्यांना वैद्यकीय सल्ल्यासाठी, मदतीसाठी संपर्क करुन दिला. माझ्या परीने जे जे जमलं ते केलं.
एक यातीलच केस होती विक्रमची. (नाव बदललं आहे) 
विक्रम 23 वर्षाचा एक मुलगा. शिक्षणाच्या जाळ्यात अडकलेला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विक्रमला मनापासून खेळाची व जंगल भटकंतीची आवड. फुटबाॅल, पोहणं अन् क्रिकेटमध्ये रस. मात्र आईची इच्छा त्यानं डाॅक्टर / इंजिनियर बनावं. आमच्यासारखं तडजोडी करत जगू नकोस हे सतत कानीकपाळी ओरडलं जाई. त्याला खेळायलाच पाठवलं जात नसे. गडकिल्ले किंवा जंगल भ्रमंतीला मात्र अधून मधून पाठवलं जाई त्याला. इच्छा नसूनही त्याला 10/ 12 वी ला विविध क्लासेस लावले गेले. त्याला कधीच 75 टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडले नाहीत. खरंतर उत्तम ग्रहणशक्तीचा ( Grasping power) हा मुलगा. जंगलात गेला की विविध झाडांची, पाना/ फुलांची/ फुलपाखरांची माहिती देणारा. मात्र त्याचं मन त्या शिक्षणात रमत नव्हतं.

12 वी नंतर हट्टानं त्याला Electronics and telecommunication साठी इंजिनियरिंगला घातलं गेलं. कुठूनतरी कर्ज काढून पैसे जमा करत होते आईबाबा. नंतर मग त्यावरुन त्याला बोललं जाई. " बघ, ऐपत नसताना प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन कर्ज काढलंय. तुझ्या शिक्षणासाठी.. जरा चांगले दिवे लावा.." मग विक्रम अधिक कसनुसा होई. पहिल्या दोन्ही वर्षी नापास होत, एटीकेटी घेत तो पुढं रडतखडत होता. अन् मग मात्र सगळं हाताबाहेर गेलं. मित्रांच्या संगतीनं त्याला दारुचं व्यसन लागलं. भांडणं, रडारड, मारणं हे घरात मग नित्याचं बनलं.
एकदिवशी त्यानं घर सोडून पळून जायचा प्रयत्न केला. एका दूरच्या गावी गावठी दारु पिऊन स्टॅन्डवर झोपलेल्या त्याला आईबाबा पोलिसांच्या मदतीनं घरी घेऊन आले. आई व तो दोघांचंही मानसिक संतुलन बिघडलेलं. हे घडेतोवर यंदाच्या वर्षी काॅलेजेस ही बंद झाली. 

खूप काही लोक त्यांच्याशी बोलले. त्यांचे नातेवाईक, डाॅक्टर्स, व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे स्नेही वगैरे वगैरे. सगळ्यांचं मत होतं की त्याला हव्या त्या क्षेत्रात शिकू दे. या गोष्टीला आई बाप तयार नव्हते. आपला निर्णय बदलायला लागणे ही गोष्ट अपमानास्पद वाटत होती त्यांना. 

मग बोललो त्यांच्याशी. मूल आपलंच. त्यानं छान जगावं, आनंदी रहावं हीच तर आपली अपेक्षा असते. मग का त्याच्यावर करियरचा आॅप्शन लादायचा? चांगले सल्ले देणं मान्य परंतु मुलांच्या आयुष्यात किती गुंतायचं हे आपल्याला कळतच नाही अजून. खरंच परदेशातील व्यवस्था यामानानं जरा बरी. प्रत्येक मुलाला जे आवडतं ते करायचं स्वातंत्र्य मिळतं. अर्थात आपल्याकडे " चांगल्या पगाराची नोकरी किंवा भरपूर पैसे मिळवून देणारा व्यवसाय" यालाच सर्वत्र उगीच प्रतिष्ठा मिळते व त्यामुळे अनेक वेगळे पर्याय निवडायला मुलं बावरतात. 

आर्थिक स्थैर्य हवं म्हणून आम्ही सांगतोय ही पालकांची बाजू जितकी बरोबर तितकंच ज्यामध्ये मन रमत नाही ते का करु ही मुलांचीही बाजू बरोबरच. मात्र आपल्या मुलांनी त्यांना आवडत्या क्षेत्रात आनंदी रहावं याकडे पालकांचा कटाक्ष हवा असं मला वाटतं. मी विक्रमच्या आईबाबांना म्हटलं की आज इंजिनियर झालेलीही हजारो मुलं बेकार आहेत. त्याचवेळी वनस्पतीशास्त्र वनस्पतींचे औषधी गुणधर्म याबाबत संशोधन करणा-या क्षेत्रात मुलांची कमतरता आहे. आज आयुर्वेदिक क्षेत्रात उत्पादन करणा-या विविध कंपन्यांना देखील या क्षेत्रातली मंडळी हवी आहेत. तुमच्या मुलाला जर या क्षेत्रात आवड असेल तर का नाही करु देत ते? तसंच 10वीत असतानाच विविध कलचाचणी (aptitude test) चे पर्याय हल्ली उपलब्ध आहेत. ते तुम्ही का तपासले नाहीत असं विचारल्यावर दोघे गप्प बसले. शेवटी त्यांना पटलं की आपल्याकडून उगीचच फार दडपण आणलं गेलं. विक्रमला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात शिक्षण घ्यायला त्यांनी आता तयारी दर्शवलीये. फक्त त्यानं दारुच्या व्यसनापासून दूर रहावं ही त्यांची अपेक्षा. 
मात्र या सगळ्यात त्याच्या तरुणपणातील 2,4 वर्षं वाया गेली. इतर व आपल्यापेक्षा वयानं लहान मुलांसोबत वेगळ्या काॅलेजमध्ये जाऊन शिकताना त्यालाही विविध तणावांचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी तो तयार झालाय हीच मोठी गोष्ट. व्यसनमुक्ती क्षेत्रातले त्यांचे परिचित व्यसन सोडवायला मदत नक्की करतील मात्र जी मोलाची 4 वर्षं वाया गेली त्याचं मलाच वाईट वाटलं. 

आपल्या मुलांसाठी आपण दिवसरात्र मेहनत करतो मात्र अनेकांनी हजारो वेळा सांगूनही घरातून मुलांवर स्वप्नं लादणं काही कमी होत नाही. पालकांचा अहंकार, त्यांच्या मनातील प्रतिष्ठेच्या तकलादू कल्पना व त्यामुळे मुलांवर होणारी जबरदस्ती यामुळे अनेक चांगले संशोधक, कलाकार, खेळाडू यांना कदाचित आपण मुकलो असू.
यंदाच्या वर्षात जगभरातील सर्वच क्षेत्रात प्रचंड उलथापालथ झालीये. जे काही आगळं वेगळं असेल, सदैव लोकांच्या उपयोगी पडेल त्या क्षेत्रातच नोकरी/ धंदा चालू राहील. तसेच पूर्वीच्या तुलनेनं शेकडो नवीन क्षेत्रात संधी उपलब्ध होताहेत. तिथं आव्हानंही असणारच. त्यामुळे मुलांना विविध पर्याय समोर ठेवायला जरुर हवेत. त्यातील फायदे तोटेही आपण समजावून सांगायला हवेत. मात्र त्यानंतर त्यांना निर्णय स्वातंत्र्य ही द्यायला हवं. चुकेल तिथं अवश्य कान पकडावा मात्र सतत टीका- टोमणे व अपमानास्पद बोलून मुलांची मन:स्थिती कमजोर नको करायला.

हीच मुलं यापुढं देशाचं भवितव्य असतील,  त्यांना छान जगायला प्रोत्साहन द्यायला हवं असं मला वाटतं. आपल्या आसपासच्या मुलांसाठी आपणही प्रयत्न करुया!
####
आजही ज्यांना विविध कारणांमुळे मानसिक तणाव जाणवत असेल त्यांनी मन मोकळं करायला बोलतं व्हावं आणि  #जादूचीपेटी या मोफत उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी 9833299791 या नंबरवर किंवा nsudha19@gmail.com या ईमेलवर अवश्य संपर्क साधावा ही विनंती. 
यापुढे या सिरीजमधील लेख / केस स्टडीज् मी लिहिणार नाही,  मात्र ज्यांना खरंच मनमोकळं बोलायचंय ते कधीही संपर्क साधू शकतात.

अनेकांनी या उपक्रमाबद्दल फोन करुन अभिप्राय दिले त्यांचे मनापासून आभार. केवळ माझ्या शब्दांतून काही लोकांना माझा आधार वाटला, त्यांच्या समस्या सोडवण्यात खारीचा वाटा देता आला यातच मला समाधान आहे. भेटत राहूया. 
- सुधांशु नाईक, कोल्हापूर( 9833299791)🌿

Sunday, 18 October 2020

जादूची पेटी: किस्सा क्र 09- वैवाहिक जीवनातील समस्या

कोरोनाकाळात "जादूची पेटी" हा उपक्रम सुरु होऊन कित्येक दिवस झाले. या काळात अनेकांशी बोललो. कोरोनाची भीती व उपचार याव्यतिरिक्त जे काॅल्स येत होते त्यात सर्वाधिक समस्या ह्या महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संबधित होत्या. सर्वात जास्त गुंतागुंतीचे प्रश्न हे घरातील महिलेबाबत आहेत अन् सुशिक्षित व कमी शिक्षित अशा दोन्ही प्रकारच्या घरात हे घडलं आहे, घडत आहे. आजचा हा लेख घटस्फोटासाठी धडपडणा-या महिलांबाबत अन् घरातील समस्यांबाबत....
- सुधांशु नाईक

#जादूचीपेटी #09 #वैवाहिकजीवन
भारतीय समाजात लग्न ही एक सहज साधी गोष्ट नसतेच मुळी. दोन वयात आलेल्या स्त्रीपुरुषांनी वैवाहिक जीवनातील आनंद लुटायला, नव्या पिढीची निर्मिती करायला एकत्र यावे इतकं साधं नसतंच मुळी हे. म्हणूनच तर चांगल्या व वाईट अशा दोन्ही अर्थानं असं म्हटलं जातं की, " भारतीय घरात लग्न हे दोन व्यक्तींचं नसून दोन कुटुंबांचं असतं." याचे फायदे तोटे भरपूर आहेत अन् ते मुख्यत: व्यक्तीसाक्षेप आहेत.
 म्हणजे एखाद्या कुटुंबात एकत्र कुटुंब पध्दती असल्याने घरातील अडचणी एकमेकाच्या सहकार्यानं सोडवल्या जातात. तर दुस-या ठिकाणी एकत्र कुटुंब हेच भांडणाचं कारण बनलेलं.

या काही आठवड्यात मी किमान 15, 20 अशा महिलांशी बोललो की ज्या  घटस्फोटित / घटस्फोटाचा अर्ज केलेल्या / घरात त्रास होतोय म्हणून माहेरी आलेल्या अशा आहेत. 

प्रत्येकीची दुर्दैवी कर्मकहाणी वेगळीच. बहुतांश बाबतीत नव-याचं व्यसन, घरात मारहाण करणं, शारिरीक मानसिक त्रास, लैंगिक संबंधातील दु:खद अनुभव असं काही आहेच. प्रत्येक बाबतीत पुरुष चुकीचा आहे किंवा सासरचेच चुकीचे आहेत असंही नाही. मात्र शेवटी संसार तुटला तर त्याचा त्रास त्या स्त्रीलाच जास्त होतो हे मात्र खरं व दुर्दैवी. 

एका केसमध्ये त्या ताईंचा पती दारुच्या व्यसनात बुडालाय. लग्नाला केवळ 2 वर्ष झालीयत. ह्या व्यसनाबाबत घरच्यांना कल्पना असूनही सासर बड्या घरचं आहे व हळूहळू होईल दारु पिणं कमी अशी समजूत घालत लग्न करुन दिलं गेलं. प्रसंगी तिनं नव-याचं मन राखायला त्याला 2,4 दा कंपनी दिली. मनातून प्रचंड घाण वाटत असताना दारुचे घोट घेतले. नंतर त्याची लैंगिक भूक, विकृत चाळे हेही सहन केले. पण सगळंच असह्य झाल्यावर ती माहेरी परत आली. नशिबानं मूल झालं नाहीये. तर माहेरी स्वत:चा भाऊ- वहिनी व आईबाबांकडून तिला रोज ऐकून घ्यावं लागतंय. त्यातच तुझे मित्र भरपूर... तुझंच कुणाशी तरी लफडं आहे म्हणून तूच पळून आलीयस असा संशयही प्रत्यक्ष आईबापानं घेतला. घटस्फोटाची केस कोर्टात 3,4 वर्षं आहे व कासवगतीनं काम सुरु आहे. या कोरोना काळात सगळेच घरात त्यामुळे सततचे टोमणे ऐकून तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता. तिकडे नवरा तसा इकडे आपली माहेरची माणसं अशी... काय करु? जीवच देते या विचारांकडे ती वळत होती सतत.. सुदैवानं तिची मावशी, एका मैत्रिणीच्या कुटुंबानं तिला धीर दिलाय. ती सध्या मावशीकडे जाऊन राहिलीये व एका महिला संघटनेमार्फत तिच्याशी संवाद सुरु झालाय. 
गेल्या काही आठवड्यात तिचं समुपदेशन तर केलंच पण खटला लवकर निकाली निघेल यासाठी त्या संघटनेमार्फतचे प्रयत्न त्यांच्या शहरात सुरु झालेत. तसेच तिला काॅम्प्युटर आॅपरेटरच्या एका लहानशा नोकरीचीही संधी मिळाली आहे. काहीशी स्थिती सुधारत आहे सध्या.

दुस-या घटनेत घरात नवरा बायकोची भांडणं तशी नाहीयेत. दोघेही नोकरी करतात. दुर्दैवानं या कोरोनाकाळात नव-याची नोकरी गेली तर आयटीत काम करणारी ती वर्क फ्राॅम होम करत होती. आॅफिस जवळच असल्यानं काहीवेळा तिथं जात होती. मग घराकडे कसं तुझं दुर्लक्ष होतंय, तू स्वत:ला मोठी समजतीयस, तुझं आॅफिसात कुणाशी तरी अफेयर आहे असे आरोप करत तिला त्रास सुरु झाला. तिचे मोबाईल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष चेक करणं, तिच्यावर पाळत ठेवणं इथपासून प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत मजल गेली. अनेकदा तिनं सांगितलं की तुला नोकरी मिळेल रे, निराश होऊ नकोस. जरा धीर धर.. तर त्याचे विपरीत अर्थ काढले गेले. तिच्यावर जबरदस्तीनं शारिरीक संबंध लादून स्वत:चं वर्चस्व सिध्द करायचे प्रयत्न केले गेले. 
सासू सास-यांनी 2-4 दा मुलाला समजवायचा प्रयत्न केला मग घाबरुन त्यांनी एका बेडरुममध्ये स्वत:ला अडकवून घेतलं. तुझं तू पहा बाई... नको राहूस हवं तर असं सांगितल्यावर ती अधिकच खचली.

 तिची एटीएम कार्डस् ताब्यात घेणं, मोबाईल मधील व्हाटसअप फेसबुक आदि अॅप जबरदस्तीनं डिलीट करणं, रोज मुद्दाम घरात वेगवेगळे पदार्थ करायला लावणं, तिची कामं थांबवून घरकाम करायला लावणं, दिवसा वा रात्री शारिरीक संबंध लादणं हे सारं सुरु होतं.  सुशिक्षित अशा त्या घरात हे असह्य झाल्यावर शेवटी तिनं घर सोडलं. आता घटस्फोटाची केस दाखल झालीय अन् तिच्या पोटात 5 महिन्याचा गर्भ आहे. मात्र ती जिद्दीनं लढतीये पण तिचे आईबाबा खूप मानसिक तणावात होते. त्यांना सतत ही भीती की आम्हाला काही झालं तर या एकुलत्या एका मुलीचं कसं होईल? पण तिचे काकाकाकू, चुलतभाऊ हे सारे तिच्या पाठीशी आहेत हाच दिलासा. तिच्या आईवडिलांशीच जास्त बोलावं लागलं. त्यांनाच धीर द्यावा लागला...

 एकूणच या लाॅकडाऊनच्या काळात घरातील अत्याचारांमध्ये वाढ झालीये हे जे वृत्तपत्रांतून, मिडीयातून सांगितलं जात होतं त्याचं हे केवळ एक टोक आहे.

तिस-या केसमध्ये घरातल्या त्या स्त्रीला सगळे समजून घेत होते. फेब्रुवारीत तिचं लग्न झालेलं अन् मार्चपासून लाॅकडाऊन. तिला घरकामाची काही सवय नव्हती माहेरी अन् इथं सगळ्या कामाचा बोजा पडला. सासू किचनमध्ये मदत करायची पण केरवारे, फरशी पुसणे, भांडी घासणे, स्वैपाकात नवनवीन पदार्थांची मागणी हे काही तिला जमेना. मग त्यावरुन नवरा बायकोची धुसफूस. नव-यानं तिला मदत करायचा प्रयत्न केला की सासू भडकायची. 4 खोल्यांचं तर घर... त्यात स्वैपाक तर निम्मा मीच करतेय... ही फक्त पोळ्या करते व काही सॅलड वगैरे. एवढीही कामं करायला नवरा कशाला हवा. त्याला करु दे ना त्याच्या आॅफिसचं काम.

अवघ्या सहा महिन्यात नव्या संसाराची नवलाई उरली नाही. रोजच्या वादावादीनंतर मग हिच्याकडून लैंगिक संबंधात असहकार असतो. नवरा त्यामुळेही वैतागलाय. बायको म्हणून हिला आणलं पण ना हिचा घराला फायदा ना मला वैयक्तिक... हे वाक्य ऐकायला कटू वाटलं पण त्यात तथ्यही होतंच. आता घरी कामवाल्या मावशी येताहेत गेल्या महिन्यात. पण त्यांचं नवरा बायकोचं नातं ताणलं गेलंय. त्यांच्यात शारिरीक जवळिकीचा प्रसंग आला की ती जणू गोठून जाते. तो भडकत राहतो. 

लग्नाचं मुख्य कारण हे खरंतर निरामय कामजीवन असतं. त्यामुळे शरीर व मनावर चांगले परिणाम होतात. हार्मोनल बॅलन्स नीट राहतो वगैरे गोष्टी त्यांना कुणी समजावून सांगितल्या नाहीयेत. त्यांचं ते महत्वाचं नातं खरंतर या सहा महिन्यात छान सहवासातून फुलायला हवं होतं मात्र यांच्यात तेच उरलं नाहीये. शेवटी त्यांना आता आधी गायनाॅकाॅलाॅजिस्टसोबत बोलायला सांगितलंय. स्पष्टपणे आपले प्रश्न / अडचणी सांगा हे सुचवलंय. तसंच प्रसंगी अधिकृत मानसोपचार तज्ञांकडून काहीदिवस थेरपीची गरज लागल्यास ती करावी हे सुचवलं.
या दोघांनाच नव्हे समाजातील शेकडो युवक युवतींना आजही या नाजूक गोष्टीबद्दल पुरेशी माहिती नाहीये हे दुर्दैवी वास्तव. पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पना, स्त्रिया- स्त्रियांमधील किंवा पुरुषांमधील अवास्तव गप्पा/ फुशारक्या/ टोमणे यामुळे अनेक नवविवाहितांना नेमकं काही कळत नाही. अनेकजण चुकत चुकत शिकतात तर बहुसंख्य वेळा स्त्री सोशिकपणे जे घडेल ते सोसत बसते. कित्येकदा आततायी स्त्री मुळे पुरुषांचीही कुचंबणा होते. अनेक मनोविकार तज्ज्ञांचा असा निष्कर्ष आहे की कित्येकदा एखाद्या मानसिक आरोग्य समस्येच्या मुळाशी बिघडलेलं कामजीवन असू शकतं.

प्रत्येकानं संकटकाळात खरंतर एकमेकाला आधार, प्रेम द्यायला हवं. मात्र त्याऐवजी नाती तुटेपर्यंत ताणली जातात. पशू करत नाहीत असं वागणं माणसांकडून घडतं. हे वेदनादायी आहे. कुणीही अन्याय वा अत्याचार सोसू नयेत ही माझी नेहमीची भूमिका आहे. 
आजही जिथं कुठे कुणाला काही मानसिक, भावनिक  समस्या भेडसावत असतील तर त्यांनी आपल्या या #जादूचीपेटी उपक्रमाचा लाभ घ्यावा व 9833299791 या नंबरवर काॅल करुन मनमोकळा संवाद साधावा. ह्या काॅलिंगसाठी कोणतीही फी नाही तसेच तुमची सिक्रेटस् कुणालाही सांगितली जाणार नाहीत याची खात्री देतो. ज्यांना बोलायला संकोच वाटतो त्यांनी nsudha19@gmail.com यावर इमेल पाठवावा.

#जादूचीपेटी या उपक्रमातील काही मोजके प्रश्न या सिरीजमधून मी मांडत गेलो. यानंतरचा भाग हा शेवटचा भाग असेल. त्यानंतरही संवाद, समुपदेशन सुरु राहील व ज्यांना गरज आहे ते नक्की काॅल करु शकतात.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Monday, 5 October 2020

जादूची पेटी : किस्सा 8 ऑनलाईन औषधोपचार

#जादूचीपेटी #08
मंडळी, जादूचीपेटी या उपक्रमांतर्गत ज्यांना मनातली काही सलणारी गोष्ट, आपल्या मनावर ज्यामुळे ताण येतोय ती व्यथा, भीती मनमोकळेपणे सांगा असे आवाहन केले त्यानुसार जे विविध काॅल्स येत होते त्यात ही एक जरा वेगळी गोष्ट. ( नावं बदलली आहेत.) 
ही एका जोडप्याची कथा. रविंद्र आणि दीक्षा यांची. शहरात रहाणा-या, नोकरी करणा-या या दोघांना दुसरीत जाणारा मुलगा आहे आणि मूळ गावी रहाणारे सासू सासरे, जे अधूनमधून येऊन रहातात. यंदाही ते मुलाकडे आले अन् लाॅकडाऊनमध्ये अडकले. तसं सर्वांचं एकमेकांशी छान पटतं पण सगळ्यांनी कोरोनाची प्रचंड भीती घेतली. घरात दोन ज्येष्ठ नागरिक. मग त्यांना जराही सोसायटीत फिरु दिलं जाईना. 
सुरुवातीचे 2 महिने सर्वांनीच सगळे नियम पाळले मग मात्र हळूहळू सगळे सोसायटीत फिरु लागले पण या दोघांना मात्र घरातून सोडेनात.

सर्वात मोठा प्रश्न यांचा तो कोरोनापेक्षाही औषधोपचारांबाबतचा होता. नेहमीप्रमाणे रविंद्रच्या वडिलांनी त्यांच्या बीपी व शुगरच्या गोळ्या डाॅक्टरांकडून विचारुन घेतलेल्या. पण आता रविंद्रने सांगितलं की या गोळ्या घेऊ नका. मी गुगलवर या गोळ्यांची माहिती घेतलीये यामुळे तुम्हाला अमुकअमुक साईड इफेक्ट होईल. तुम्ही मी सांगतो त्या दुस-या गोळ्या घ्या. मी आॅनलाईन मागवतो. त्याचे बाबा म्हणाले, अरे बाबा गेली 5,7 वर्षं याच गोळ्या घेतोय मी. मला काही त्रास नाही तू माझ्या गोळ्या बदलू नको. शेजारच्या मेडिकलवाल्याला सांगितलं की तो घरपोच देतोच.
बाबांनी स्पष्ट सांगितल्यामुळे रविंद्रचा नाईलाज झाला पण त्यावरुन 3,4 दिवस धुसफूस झालीच. रविंद्र व दीक्षाची हीच सवय. काहीही हवं म्हटलं की आधी गुगलबाबाला शरण जायचं. गुगल जे सांगेल त्यानुसार अॅक्शन घ्यायची. लाॅकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात वाफ घ्या, काढे घ्या वगैरे जे सांगितलं जात होतं तेव्हापासून आजवर गेल्या 5 , 6 महिन्यात यांनी किमान 18,19 प्रकारचे काढे ट्राय केलेत. 
नवीन काही नेटवर वाचायला मिळालं की जुनं बाजूला टाकायचं व नवीन सुरु करायचं. त्यांच्या मुलाला मधेच 2 दिवस डिसेन्ट्री सुरु झाली. यांनी गुगल सर्च करुनच काही औषधं ठरवली. पुढचे 4,5 दिवस जेव्हा त्याला फारसा फरक पडेना मग शेवटी शेजारच्या डाॅक्टरकडे गेले. तेही बाबांनी हट्टानं पाठवलं म्हणून. 2 दिवसात लगेच मग फरक पडला.
त्यानंतर जर आपल्याला कोरोना झालाच तर काय करायचं यासाठी त्यांनी अॅझिटॅब पासून सगळी औषधं घरात आणवून ठेवली. कोरोनाची लागण झाल्यास रक्तवाहिनीत गुठळ्या होतात, त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या मोकळ्या हव्यात, रक्त पातळ हवं असं आॅनलाईन कुठंतरी वाचल्यामुळे, कुणालाही न विचारता हे दोघे  कारण नसताना इकोस्प्रीन सारखी गोळी गेले 5 महिने घेतायत. तरीही एक  दिवस शेवटी रविंद्रला ताप आलाच. मग त्याचा मला काॅल आला. मला ताप आलाय हा कोरोनाच असेल का? मी गुगलवर सगळं चेक केलंय लगेच औषधं सुरु करु का?

मी म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे अशी आपल्या मनानं कोणतीही औषधं घेणं चूक आहे. एकतर त्वरीत तुमच्या डाॅक्टरांसोबत बोला आणि दुसरं म्हणजे स्वॅब टेस्ट करुन घ्या. किमान तुमच्या मनातील शंका तरी दूर होईल. पाॅझिटिव्ह असलाच तर मग डाॅक्टर सांगतील त्यानुसारच औषधं घ्या. आपल्याकडे असं म्हणतात की अर्धवट ज्ञान हे नेहमीच जास्त धोकादायक असतं तेव्हा कृपया स्वत:वर किंवा इतरांवर प्रयोग करु नका. 
तसेच गुगलसह विविध नेटवरील प्लॅटफाॅर्म्स हे मागेल ती माहिती देण्यापुरतेच असतात. त्या प्रत्येक माहितीसह ते फूटनोट देतात की तज्ज्ञांच्या सल्ल्यानिसार औषधं घ्यावीत. त्यांना ते पटलं व त्यांनी स्वॅब टेस्ट केली जी सुदैवानं निगेटिव्ह आली. 

आज या रविंद्रसारखीच हजारो माणसं आहेत की जी गुगलवर अवलंबून काहीतरी करतायत असं सोबतच्या बातमीचं कात्रणही सांगतंय.
मंडळी, आपल्या आसपास आपली माणसं असताना असं आॅनलाईन गोष्टीवर पूर्णत:  विसंबून राहू नये असं मला वाटतं. एखाद्या गोष्टीबाबत जरुर नेटवरुन माहिती घेऊया मात्र औषधोपचार सारख्या महत्वाच्या गोष्टींबाबत नुसतंच गुगल वगैरेवर आॅनलाईन पाहून थेट उपचार करणं  हे धोकादायक ठरु शकतं.
तुम्हाला कोणत्याही गोष्टीमुळे मानसिक ताण जाणवत असेल तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी या मोफत उपक्रमाचा लाभ घ्या. 9833299791 या नंबरवर काॅल करा. मनमोकळं बोला, मनावरचा ताण हलका करायला आम्ही नक्की प्रयत्न करु!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(9833299791)🌿

Sunday, 4 October 2020

जादूची पेटी : किस्सा 7 ज्येष्ठ व्यक्तींच्या अशाही कथा

#जादूचीपेटी या उपक्रमांतून गेले तीन आठवडे विविध लोकांशी बोलतो आहे. अनेकांच्या खरंच गंभीर समस्या ऐकताना मलाच शब्द सुचेनासे होतात. मग जमेल त्या मार्गानं त्यांना इतरांशी जोडून द्यायचे प्रयत्न करतो. ज्यांच्या समस्या या मुख्यत: मानसिक दडपणाच्या आहेत, कोरोनाच्या भीतीबाबत आहेत त्यांना माझ्या शब्दांचा दिलासा देत रहातो.
ज्या समस्या मलाही अंतर्मुख करतात त्यात ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात आहेत.  9833299791 या नंबरवर ते काॅल करतायत, संवाद साधतायत. ज्येष्ठ नागरिकांबाबत दोन गोष्टी गेल्यावेळी सांगितलेल्या, आजही दोन अगदी परस्परविरोधी किस्से..

#जादूचीपेटी #ज्येष्ठनागरिक #07

यातली एक गोष्ट तर माझ्या परिचयातील व्यक्तीबाबतची. माझा एक स्नेही व त्यांची पत्नी ( त्यांची नावं अनिकेत व अश्विनी आहेत असं समजूया) माझ्याशी बोलत होते त्यांच्या वडिलांविषयी. 
अनिकेत एमआयडीसीतील एका नामवंत कंपनीत मॅनेजर आहे तर अश्विनी एका मोबाईल कंपनीच्या आॅफिसात पार्ट टाईम 5,6 तास काम करते. घरी त्याचे वडील एकटेच व या दोघांचा 7वीतला मुलगा. असं मर्यादित कुटुंब. मात्र सततच्या भांडणांनी तणावात धुमसतय घर. कारण अनिकेतचे बाबा. त्यांनी एका कंपनीत पुण्यात अनेक वर्ष अॅडमिन आॅफिसरची नोकरी केलेली. मग रिटायर्ड झाल्यावर सगळे कोल्हापुरात दाखल झालेले. अनिकेतनं स्वत:च्या कर्तृत्वावर आपलं स्थान मिळवलेलं. वडिलांचा फारसा सपोर्ट नाही. त्यात त्यांना दारुचं व्यसन. त्यावरुन घरी आई व वडिलांची भांडणं सतत त्यांनं पाहिलेली. तो कायम दारुपासून दूरच राहिला त्यामुळे. 
अनिकेत सांगत होता, " 7 वर्षांपूर्वी हार्टफेलनं अचानक आई गेली अन् मग वडिलांना जणू मोकळं रान मिळालंय रे. रोज पितात. संध्याकाळी एकतर कुणा मित्राकडे जाऊन बसतात किंवा घरीच हाॅलमध्ये मोठमोठ्यानं टीव्हीवर गाणी लावायची व एकटंच पीत बसायचं. मुलाचा अभ्यास असतो, हिची काही कामं असतात, फोन सुरु असतात, कुणी येत जात असतं याचं कसलं भान नाही त्यांना. वर वेगवेगळ्या हाॅटेलमधून मनाला येईल ते मागवायचे. ते तसंच टेबलवर कसंही पडलेलं असतं. त्यांच्या खोलीत जाऊन काय ते करा असं ही एकदा म्हणाली तर अंगावरच आले. हे माझंही घर आहे मी हाॅलमध्येच बसणार, बघू कोण मला हलवतो ते.. अशी भाषा.."

अश्विनी मग सरसावली.." त्यांचं तोंड पाहिलं तरी माझ्या डोक्यात तिडीक जाते. मी आॅफिसला निघाले की यांचं तोंड सुरु होतं.. निघाली हिराॅईन हिंडायला. कुठं जाते काय करते देव जाणे. तो सकाळी 9 ला गेला रात्री 8 ला येतो. हिची मजा..
कितीवेळा सांगितलं अहो काहीही काय बोलता. मी कुठं जाते, काय करते हे पहा येऊन एकदा. सकाळी 10 ला अंकितचा क्लास असतो, त्याला सोडते मीच..त्याचा डबा मीच करते.. मग 11 ला शाळेत मीच सोडते.. 5 वाजता परत त्याला आणायचं. पटकन् खायला देऊन ज्युदोच्या क्लासला सोडते. मग घरी येतो दोघेही सोबत. मग घरचं स्वैपाक पाणी. यांचं जेवण बनवून ठेवलेलं असतं. पण अनेकदा ते तसंच व यांनी शेजारच्या हाॅटेलमधून काही मागवून ठेवलेलं असतं. अर्धवट उरलेलं अन्न धड फ्रीजमधे ठेवत नाहीत. निम्मं सांडलेलं, निम्मं खराब... घरभर पसारा... नकोच वाटतं मला घरी यायला खरंतर.. वर यांची बडबड. सतत केवळ मला टोमणे मारत असतात. खरंतर 10 वर्षांपूर्वी यांचं मोठं आजारपण झालेलं. तेव्हा सगळी सेवा, अगदी शी शू काढण्यापासून मी केलेली. पण आता त्यांना कसली जाणीवच नाही. सतत मला टोमणे मारुन काय मिळतं त्यांना देव जाणे. वर इतरांसमोर, नातेवाईकांसमोर माझी विनाकारण बदनामी सुरु असते ती वेगळीच.  मी शक्यतो कधीच त्यांना काहीच बोलायला जात नाही. आमचे नातेवाईक कधी कुणी आलेच घरी तर जाताना म्हणतात, अगं तू छान आहेस की आम्हाला वेगळंच वाटलेलं..."
आता या लाॅकडाऊनमध्ये तर दिवसभर त्यांची घरातली बडबड, चिडचिड ऐकून दोघांनाही प्रचंड त्रास झालाय. एका बाजूला मुलाशी गोड बोलणारे हे वडील सून व नातवाशी मात्र फटकून वागतात. सतत बोलायला निमित् शोधतात. काही कारणानं जर अनिकेत अश्विनीवर ओरडला तर लहान मुलासारखे खूष होतात. त्यांचं भांडणं व्हावं हीच जणू इच्छा... यामुळे अश्विनीची मनस्थिती बिघडलीये. दोघांच्यातलं नवरा बायकोचं नातं, शरीरसंबंध यातही अंतर पडत चाललंय. कशातून आनंद मिळत नाही अशी गत. तिनं मध्यंतरी तर काही दिवस डाॅक्टरांकडून होमियोपॅथीची ट्रीटमेंटही घेतलेली..

हे सगळं  सांगतानाही त्या दोघांना कसंतरी होत होतं. त्यांच्या घरी काहीतरी सुरु असतं इतकंच आम्हाला माहिती. पण हे हाताबाहेर जाणं योग्य नव्हतं. खरंतर इतका छान संसार आहे मस्त मजेत रहावं, प्रेमानं चांगलं बोलावं तर ते या काकांना का करायचं नाही याला उत्तर नाही. घराबाहेर सर्वांशी छान वागणारे काका घरात मात्र वाईट वागताहेत. त्यांना या उतारवयात एकटं सोडणं, कुठेतरी वृध्दाश्रमात ठेवणं या दोघांना नको वाटतं म्हणून तेही सहन करतायत अन् आपल्या चांगल्या दिवसांची माती करुन घेतायत. काकांच्या मित्रामार्फत, नात्यातील काही ज्येष्ठ व्यक्तींमार्फत काकांना समजुतीच्या चार गोष्टी सांगायचे प्रयत्न करुनही झालेत पण पालथ्या घड्यावर पाणी. आता शेवटी कधीतरी जास्त काही बोलले तर मी तरी कायमचं घर सोडून दुसरीकडे राहीन नाहीतर त्यांनी वृध्दाश्रमात जाऊन राहावं. माझा संसार विस्कटू नये त्यांनी ही अश्विनीची अपेक्षा योग्यच आहे. सध्यातरी सगळं धुमसतंय. दोघेही सहन करतायत पण ही मंडळी अशी एकत्र न  रहाणं हाच जणू यावरचा कटू उपाय आहे. हे सगळं नकोसं वाटतं पण नाईलाज झालाय...

तर दुसरी गोष्ट यापेक्षा जरा वेगळी आहे रामचंद्र जोशीकाका-काकूंची. तेच परवा बोलत बसलेले. जोशीकाका म्हणजे एकदम नीटनेटका माणूस. पापभीरु माणूस. रस्त्यात पायात किडामुंगी आली तरी त्यावर पाय न देता बाजूनं जाणारा. ते व त्यांची बायको आपल्या आपल्यात छान रमलेले. पहाटे उठून फिरणं, मग घरातील केरवारे, रो हाऊस समोरच्या मोकळ्या जागेतील लहानशी बाग नीट करणे हे सगळं होईपर्यंत मुलगा सून झोपलेलेच असतात. मुलाचा एक चांगला व्यवसाय आहे तर सून घरीच बसून त्यांची अकौंटस वगैरेची कामं पहाते. प्रसंगी आॅफिसातही जात येत असते. दोन्ही मुलांपैकी 1 काॅलेजला तर दुसरा शाळेत. त्यांच्या स्कूलबसेस वगैरे सगळंही आजी- आजोबांनीच जास्त माहिती. सुनेचा व त्यांचा जणू 36 चा आकडा आहे. 
घरात सकाळी किचनमध्ये काम करताना चुकून हातातून एखादं भांडं सांडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं तांडव करते सून. घरातील 1 वस्तूही इकडे तिकडे उचलून ठेवलेली तिला पसंत नसते. स्वैपाकाला येणा-या बाईला आम्ही काहीही फर्माईश केलेली तिला चालत नाही. कधी काही खावंसं वाटलं तरी सांगायला मन संकोचतं. त्यात लाॅकडाऊनमुळे 5 महिने घरी बायका येत नव्हत्या. काही किचनमध्ये करु गेलं तरी हिची धुसफूस चालू. तरी बरं हिला आम्ही आॅर्डरी सोडत नाही. 
आमच्या लेकाला तर ताटाखालचं मांजर करुन ठेवलंय. घरात वयात येणारी मुलं आहेत पण यांचं जे सुरु असतं ते पाहून आम्हालाच कानकोंडं होतं. तिच्या सौंदर्यापुढं त्याच्यातला पुरुष पार नामोहरम झालाय पहा. तिच्याशिवाय राहायला नको म्हणून तो तिच्या शब्दाला अवाक्षरही विरोध करत नाही. उलट आम्हालाच म्हणतो, नशीब समजा तुम्हाला इतरांसारखं वृध्दाश्रमात रहावं लागत नाही हे... ना आमच्या औषधांकडे त्यांचं लक्ष, ना आमच्या आवडीनिवडींकडे. स्वत: उठून किचनमध्ये काही करु गेलं तर तेही नकोसं तिला.
काकू म्हणाल्या, ' यांना भजी फार आवडतात हो. मध्ये एकदा मीच सगळ्यांसाठी भजी करते म्हटलं तर अंगावरच आली. कोरोनाच्या या दिवसांमध्ये तेलकट खाऊ नका असं डाॅक्टर बोंबलतायत, तुम्हा वयस्कर लोकांना तेवढंही समजत नाही का हल्ली. भजी नाही खाल्ली 2 महिने तर मराल काय? असं म्हणाली ही... यांच्या तर डोळ्यात पाणीच आलं. म्हणाले, मी मेलो तरी चालेल पण परत भजीचं नाव काढणार नाही. या वयात अशा अपेक्षा तरी किती उरल्याहेत पण त्या क्षुल्लक गोष्टींसाठी मनं मारत जगण्यापेक्षा या कोरोनानं मरण तरी पदरी द्यावं.. कुणाला आपण नकोसे झालो असलो तर तिथं राहू नये हेच खरं...

काकांना व काकूंना मी वेगळं काय सांगणार होतो.? जमेल तितकं दुर्लक्ष करा, नका मनाला लावून घेऊ इतकच सांगू शकत होतो. लाॅकडाऊन मुळे ते कुठेही घराबाहेर किंवा नातेवाईकांकडे परगावी जाऊ शकले नव्हते. आॅक्टोबर नंतर कुठेतरी 2,3 महिने हिंडून या. तुम्हालाही तुमची स्पेस मिळेल व त्यांच्यापासून दूर राहिल्याचं समाधान...इतकच बोललो.

माणसं एकमेकांच्या जवळ असूनही द्वेष, मत्सर, इगो, ईर्षा हे सगळं का मनाशी धरुन बसतात हेच उमगत नाही. प्रेमानं आनंदानं रहावं, जे काही आपल्याकडे आहे ते छान सर्वांनी शेयर करावं, या संकटकाळात भांडणं शक्यतो टाळून आनंदानं वागून एकमेकाला धीर, दिलासा व आधार द्यावा असं का वाटत नसेल या माणसांना? असा प्रश्न मलाच पडतोय. 
मात्र जरा मनमोकळं बोलल्यानं या मंडळींना जरा बरं वाटलं. माझ्याकडून मी इतकंच तर सध्या करु शकत होतो...यापेक्षा जास्त काही करता येत नाही ही खंत मात्र जरुर वाटते.

तुम्हालाही तुमच्या मनातली व्यथा, ताण तणाव कुणाशी बोलता येत नसतील तर अवश्य आपल्या #जादूचीपेटी उपक्रमांतर्गत मला 9833299791 या नंबरवर काॅल करा किंवा nsudha19@gmail.com यावर पत्र लिहा. तुमच्या मनातील चिंतेची जळमटं दूर करायचे जरासे प्रयत्न करुया.

आनंदी जगूया, इतरांना आनंद देऊया.
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿