marathi blog vishwa

Wednesday 17 April 2024

तुजवीण रामा मज कंठवेना…

मना सज्जना: तुजवीण रामा मज कंठवेना…

रामनवमी, १७/०४/२४

सुधांशु नाईक  

आज रामनवमी आणि समर्थ रामदास यांचीसुद्धा जयंती. आपण ज्याला सर्वाधिक जवळचा, जीवीचा जिवलग मानतो, प्रत्येक क्षण आपण ज्याचा निदिध्यास घेतो, त्याचा आणि आपला जन्मक्षण सारखाच असणे ही किती अलौकिक आणि भाग्याची गोष्ट. हे भाग्य समर्थांच्या वाट्याला आले. तरी आयुष्यभराची दगदग टळली नाही. त्या रामरायाचे पिसे लागले आणि मग समर्थांच्या पायाला चक्र लाभले. 

घर सोडून पळून गेलेल्या त्या लहान मुलाने मग अखंड पायपीट केली. एकीकडे “तन-मन-धन माझें राघवा रूप तुझें...” असे मानणारे समर्थ, लोकांना आपलेसे करणारे समर्थ गावोगावी जोडलेल्या नाती-गोती-माया-जिव्हाळा यांच्या बेड्याना  नक्कीच उमजून असणार. विरागी विरक्त संन्यासी मनोवृत्तीच्या मनाला हे सारे बंध नाजूक पण कठोर हातानी अलगद दूर करणे किती कष्टदायक..!

समर्थ हे सारे अनुभवत पुढे जात होते. जिथे जिथे लोकसंग्रह करायचा आहे, लोकांचा समूह बनवायचा आहे, ते घडवून त्यांना नि:स्वार्थी, निस्पृह बनवून पुन्हा त्यातून बाहेर पडत होते. “दास डोंगरी राहतो...यात्रा देवाची पाहतो...” अशा तटस्थभावाने पुढे जात राहिले. तरीही मैत्रीचे, जिव्हाळ्याचे, गावोगावी भेटणाऱ्या मायाळू माऊल्यांचे वात्सल्यबंध निश्चयाने दूर करताना त्यानाही किती यातना झाल्या असतील. ते स्वतःच हे सारे मोजक्या शब्दात अतीव परिमाणकारकरित्या सांगताना म्हणतात,

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥
घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा । म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥

या सगळ्यातून जाताना त्यांच्या मनातील लोककल्याणाचा विचार कधीही दुर्लक्षित राहिला नाही. जनजागरण, भ्रमंती, बलोपासनेचे धडे, देशभर विविध मठांची निर्मिती हे सारे कार्य जोमाने सुरु असताना मनात मात्र सदैव रामरायाला भेटण्याची, जगातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा बळावलेली होतीच. नियतीने हाती सोपवलेले कार्य पूर्ण होण्यासाठी एखाद्याला जगणे क्रमप्राप्त होते तेंव्हा तळमळणारे मन मग मोक्ष आणि मुक्तीच्या अपेक्षेने आक्रंदन करत म्हणू लागते;

आम्हां अनाथांसि तूं एक दाता । संसारचिंता चुकवीं समर्था ॥
दासा मनीं आठव वीसरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥

आयुष्य रामरायाला समर्पित केलेल्या रामदासांना सुद्धा जेंव्हा रामाचा विरह सोसवेनासा होतो तिथे आपल्यासारख्या बापुड्यानी काय करायचे? रामाची आणि रामदासांची आठवण आली की हमखास करुणाष्टके आठवतातच आणि भावविभोर मन हेलावून जाते.

-सुधांशु नाईक(९८३३१२९९७९१)🌿

Saturday 30 March 2024

केल्याने होत आहे रे...

मना सज्जना... भाग २५ : केल्याने होत आहे रे...

-सुधांशु नाईक

शनिवार, ३०/०३/२४

“मना सज्जना..” या तीन महिने सुरु असलेल्या लेखमालेचा उद्देश हाच होता की मनाला अधिकाधिक सक्षम करता येणे, आपल्यातील न्यून जाणून घेऊन त्यावर तोडगा काढायला उद्युक्त होणे, आपल्यातील सुप्त गुण ओळखणे, आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी काही कृती करायला सुरुवात करणे ज्यायोगे सर्वांच्या आयुष्यात चार क्षण आनंदाचे असू शकतात. आयुष्यात चांगले दिवस येण्यासाठी वाईट क्षण अनुभवणे, त्यावर तोडगा काढून पुढे जाणे क्रमप्राप्त असते म्हणूनच  गेल्या काही भागात आपण चिंता, स्वार्थ, भय, क्रोध आदि गोष्टीबाबत विचार केला. आयुष्यात या सर्व गोष्टी आपल्या कृतीच्या, प्रगतीच्या आड येत असतात. त्याचबरोबर आर्थिक सहाय्य, फसवणूक, नैसर्गिक आपत्ती आदि अडचणींमुळे आपण निश्चित केलेले ध्येय गाठण्यात आपल्याला अनेकदा अपयश येते. कधी आपलेच निर्णय चुकल्याची जाणीव होते. कोणतीही चूक ही अजिबात वाईट नसते अशा अर्थाचे एक वचन आहे, त्याचा अर्थ हाच की झालेली चूक, पदरी पडलेले अपयश हे तुम्हाला उलट ज्ञान देऊन जाते. काय करायचे नाही हे आपल्या मनाला ठाम ठरवता आले की मग काय करायला हवे यावर लक्ष केंद्रित करता येते.

ज्या ज्या थोर माणसांची चरित्रे आपण वाचलेली असतात, किंवा काही मोठ्या व्यक्तींचे आयुष्य घडताना पाहिलेले असते त्यांना देखील या सगळ्या अडचणी भेडसावत होत्याच. तरीही मोठ्या जिद्दीने, चिकाटीने ते पुढे पुढे वाटचाल करत राहिले. मोठ्यांच्या चरित्रातून हेच तर आपल्याला शिकता येते. कित्येक वेळा असे घडते की आपण अमुक केले तर असे होईल, ही अडचण येईल, ते जमणार नाही असे म्हणून कृती करण्यापूर्वी सुरुवातीलाच माघार घेतो. तर कित्येकदा हाती एखादे काम घेतल्यावर लगेचच धरसोड करत ते काम टाकून देतो. इथे आपली प्रगल्भता न दिसता केवळ आरंभशूरता दिसते. 

त्यामुळे या सगळ्याविषयी सारासार विचार करून मग पाऊल उचलणे आवश्यक ठरते. केवळ गप्पा मारल्याने, मोठमोठ्या बढाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती घडणे महत्वाचे. त्यातही योग्य ती कृती घडणे अधिक महत्वाचे. म्हणूनच समर्थ म्हणतात की,

केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।

यत्न्य तो देव जाणावा । अंतरी धरता बरे ।।

जेंव्हा विचारपूर्वक आपण कृती करू जातो तेंव्हा मन आत्मविश्वासाने भरून जाते. छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे, पहिले बाजीराव पेशवे यांची चरित्रे अभ्यासली की असे दिसते की हजारो अडचणी त्यांच्या समोर होत्या. मात्र ध्येयनिश्चिती केल्यानंतर, वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या तरीही त्यांनी आपले लक्ष कधीच विचलित होऊ दिले नाही. कठोपनिषदात म्हटल्यानुसार “उत्तिष्ठ...जागृत: प्राप्य वरान्निबोधत...” हेच महत्वाचे. पोकळ गप्पांमध्ये न रमता समाज कृतीशील होणे हे फलदायी आहे यात शंकाच नाही.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

गेले तीन महिने या लेखमालेद्वारे मनाविषयीचे हे लेख लिहिले. आता गुढीपाडव्यापासून अजून काहीतरी वेगळे लिहायचा प्रयत्न असेल. ही लेखमाला तुम्हाला कशी वाटली, मन याविषयी तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आवर्जून सांगावे ही विनंती.

Friday 29 March 2024

चिंता

मना सज्जना भाग २४ : चिंता

-सुधांशु नाईक

शुक्रवार २९/०३/२४

चिंता, काळजी या भावना आपल्याला कधी आणि कशा येऊन चिकटतात हे आपल्यालाच कळत नाही. जन्माला आल्यापासून सतत कसली ना कसली चिंता आपली पाठ सोडत नाही. दोन वेळचे जेवण, झोप, शिक्षण, नोकरी, घर संसार, दुखणी खुपणी, इतरांची आजारपणे, रोजच्या जगण्यातील स्पर्धा अशा अनेक गोष्टींच्या मुळे आपण वारंवार चिंतीत होत राहतो. माणसाने चिंतामुक्त राहावे असे कितीही आपण सांगितले तरी प्रत्यक्षात ते घडत मात्र नाही. 

आधी स्वतःच्या आयुष्याबद्दल आपण चिंता करत राहतो आणि जसे संसारी होऊन जातो तसे मग मुलं, आपला जोडीदार, आईबाप, आपल्यावर असलेली नोकरी-व्यवसायातील जबाबदारी या सगळ्याचे ओझे घेत जगतो. तुलनेने आपलं आयुष्य तसे बरेच सरधोपट असले तरी ज्यांना रोजच्या आयुष्यात जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो त्यांना या चिंता अक्षरशः जाळत राहतात. पण चिंता करून काही फरक पडतो का? ज्या कृती करणे क्रमप्राप्त असते ते तर आपल्याला करावेच लागते. भूतकाळात काय घडले याच्या विचाराने किंवा भविष्यात काय घडणार या काळजीने चिंताक्रांत होऊन बसणे हा मूर्खपणा आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात,

मना मानवी व्यर्थ चिंता वहाते

अकस्मात होणार होऊनि जाते...

जे घडणार आहे ते घडणारच. मात्र आपण चिंता करत बसल्याने हातात असणारा वर्तमानकाळ देखील वाया घालवतो याकडे समर्थ किंवा अन्य संत, विचारवंत वारंवार लक्ष वेधताना दिसतात. उद्याचा विचार करून, येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यानुसार आपल्या कृतीत सुधारणा करून कामाला लागणे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे होते. नुसतेच चिंता करत हातावर हात धरून बसणे यात पुरुषार्थ नाही तर आल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी झडझडून कामाला लागणे त्यांना अपेक्षित होते.

समर्थ असोत किंवा आजच्या काळातील मानसशास्त्रज्ञ, हे सारे जण नेहमीच सांगतात की अति विचार करत न बसता पहिले पाऊल उचला. आधी आज, आत्ता कार्यरत व्हा. एकदा मार्गक्रमण सुरु केले की आपोआप पुढे वाटा सापडत जातातच. भूतकाळातील चुकांवर काम करावे आणि भविष्यात चुका होऊ नयेत, हाती घेतलेले काम तडीस जावे यासाठी अधिकाधिक बारकाईने नियोजन करणे म्हणूनच गरजेचे ठरते. अचूक यत्न केले तर आपल्या कृती अधिकाधिक सफाईदार होतात. आपोआप मग आत्मविश्वास वाढतो. कामाचे डोंगर उपसायला बळ मिळते. जेंव्हा आपण असे वागू लागतो तेंव्हा चिंतामुक्त होण्यासाठीची ती सुरुवात असते हेच खरे.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)

Friday 22 March 2024

स्वार्थ

मना सज्जना...भाग २३ : स्वार्थ

-    सुधांशु नाईक 

   शुक्रवार २२/०३/२४

   लहानपणापासून आपण शिकतो की दुसऱ्याचा विचार करावा, इतरांना त्रास देऊ नये आणि तरीही आपण प्रत्यक्षात जगात वावरताना खूप स्वार्थीपणे वावरत राहतो. तहान, भूक अशा आदिम नैसर्गिक जाणिवांच्या बाबत आपले स्वार्थीपण एकवेळ समजू शकते मात्र त्या व्यतिरिक्त अनेक लहान मोठ्या गोष्टींबाबत आपण स्वार्थी होताना दिसतो. एखाद्या घरात सगळे कुटुंबीय जेवायला एकत्र बसलेले असतात. समोरचे पदार्थ संपता संपता लक्षात येते की एखादी भाकरी शिल्लक आहे. मग आई किंवा बाबा ती भाकरी स्वतः न घेता मुलांना देऊ पाहतात. त्याचवेळी दोन मुलातील एखादे मूल मात्र ती भाकरी फक्त स्वतःलाच हवी यासाठी चपळाईने ती भाकरी घेऊन टाकते. नि:स्वार्थी आणि स्वार्थी वृत्ती दोन्हीचे एकाचवेळी आपल्याला दर्शन घडते. 

   हे तर खूपच क्षुल्लक उदाहरण आहे. अनेक घरात पैसा, प्रॉपर्टी, घर किंवा अन्य स्थावर मालमत्ता यासाठी सख्खे जवळचे नातेवाईक सुद्धा एकमेकांच्या जीवावर उठतात हे आपण प्रत्यक्षात अनेकदा पाहतो. मुळात कष्ट न करता स्वतःला सगळे काही मिळावे, इतरांपेक्षा जास्त मिळावे यासाठी अनेकजण हपापलेपणा दाखवतात. हा हव्यास, ही स्वार्थबुद्धी मग आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरते.  कित्येक कर्तबगार व्यक्ती केवळ स्वार्थी वृत्तीपायी विविध समस्यांमध्ये अडकून जातात. इतिहास पाहू गेले तर पृथ्वीराज चौहान पासून छत्रपती शंभूराजांच्या पर्यंत अनेक थोर माणसांना जवळच्या व्यक्तींच्या स्वार्थी वृत्तीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले, प्रसंगी जीव गमावण्याची वेळ आली.

म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे,

अति स्वार्थबुद्धी नुरे पाप साचे 

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे,

न होता मनासारिखे दु:ख मोठे || 

एखादी चांगली व्यक्ती स्वार्थी मनोवृत्तीमुळे संपून जाते. ही प्रसंगी कुटुंबाची हानी असतेच पण समाजाची, देशाचीही यामुळे हानी होतेच. 

हे सगळे घडू नये म्हणून लहानपणापासून मुलांवर नि:स्वार्थी वृत्तीचे संस्कार व्हायला हवेत. मी, माझे यातून बाहेर पडून व्यक्तीने आपले, आपल्या परिवाराचे, देशाचे भले होईल याचा विचार करायला हवा. दुसऱ्याला ज्यामुळे आनंद होतो अशी कृती करता आली, असे देणे आपल्याला देता आले तर त्यासारखे दुसरे समाधान नाही हेच खरे. सर्वांच्या मनातील स्वार्थी वृत्ती हळूहळू लोप पावून नि:स्वार्थी वृत्तीचा सर्वत्र उदय होईल  ही भ्रामक कल्पना किंवा पोकळ आशावाद आहे हे खरे. मात्र अधिकाधिक लोकांच्या मनात निस्वार्थी वृत्ती जागवण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणे सहज शक्य आहे असे मला वाटते.

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)🌿