marathi blog vishwa

Thursday 31 August 2023

नरहरी सोनार हरीचा दास...

 #सुधा_म्हणे: नरहरी सोनार हरीचा दास..

31 ऑगस्ट 23

विजयनगरच्या साम्राज्यातून संत भानुदास यांनी विठ्ठलाला पंढरपुरी आणले आणि या महाराष्ट्रदेशी भक्तिरसाची जणू गंगा वाहू लागली. कटीवर हात ठेऊन विटेवर उभ्या विठ्ठलाने अनेकांना भुरळ घातली. आपलेसे केले. त्या काळी आपल्या धर्मात विविध भेदाभेद होते. जात-पात-लिंग-धर्म-प्रांत आदि भेद तर होतेच पण त्याचबरोबर आपले उपास्य दैवत कोणते आहे त्यावरून विविध पंथदेखील आपापसात झगडत होते. मी ज्या देवाची भक्ती करतो तोच मोठा देव, तोच सर्वात शक्तिमान अशा मानसिकतेत हजारो जण होते. “सर्व देव नमस्कारम् केशवं प्रतिगच्छती..” असे जरी शंकराचार्यापासून अनेकांनी सांगितले तरी लोकांच्या मनात आजही ते पुरते रुजलेले नाही असे जाणवते.

पंढरपूर मधले नरहरी सोनार असेच एक व्यक्तिमत्व. आपल्या कौशल्यामुळे पंढरपुरात नावलौकिक मिळवलेले नरहरी सोनार कट्टर शिवभक्त होते. शंकराची पूजा केल्याविना त्यांचा जणू दिवस सुरूच होत नसे. कितीही जणांनी सांगितले तरी त्यांनी विठ्ठलमंदिरात जाणे, दर्शन घेणे नेहमीच टाळले.

सर्वाना माहिती असलेली एक कथा त्यांच्याबद्दल सांगितली जाते. एका विठ्ठलभक्ताने त्यांना देवाच्या कमरेसाठी एक सोनसाखळी बनवायला सांगितले. मी काय विठ्ठल मूर्ती पाहणार नाही त्यामुळे तुम्ही मला माप आणून द्या मी त्यानुसार बनवून देतो असे त्यांनी सांगितले. आणि मग गंमत घडली. त्यांनी बनवलेली साखळी घेऊन तो भक्त विठ्ठलमूर्तीकडे गेला मात्र ती साखळी सैल होऊ लागली. तो परत माघारी आला. त्यांच्याकडून पुन्हा दुरुस्त करून घेतली. पुन्हा तसेच. 

शेवटी नरहरी सोनार म्हणाले, मी येऊन माप तपासून पाहतो. मात्र मूर्तीचे मला दर्शन होता कामा नये. मग डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना विठ्ठलमूर्तीजवळ नेण्यात आले. ते जेंव्हा हाताने मोजमाप घेऊ लागले तेंव्हा त्यांना त्या मूर्तीवर व्याघ्रचर्म आदि जाणवू लागले. “ही तर माझ्या महादेवांची मूर्ती..” असे म्हणून त्यांनी डोळ्यावरील पट्टी दूर केली तर समोर विठोबा दिसू लागला. पुन्हा त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली. माप घेऊ लागले तर पुन्हा तसेच घडले. आणि मग त्यांचे डोळे उघडले. शिव-विष्णू आदि सगळे जण एकच. हे जे दिव्य परमेश्वर रूप आहे ते सर्व सगुण रूपांच्या पलीकडे अचल – अविचल आहे याचा साक्षात्कार झाला. आणि त्यांनी पुढील आयुष्य मग विठ्ठलाच्या चरणी समर्पित केले. 

“नरहरी सोनार हरीचा दास.. असे म्हणत ते विठ्ठलभक्तीमध्ये दंग होऊन गेले. एका सुरेख अभंगात ते म्हणतात,   

देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार ॥ १ ॥
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोनें ॥ २ ॥
त्रिगुणाची करुनी मूस । आंत ओतिला ब्रह्मरस ॥ ३ ॥
जीव शिव करुनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी ॥ ४ ॥
विवेक हातवडा घेऊन । कामक्रोध केला चूर्ण ॥ ५ ॥
मनबुद्धीची कातरी । रामनाम सोनें चोरी ॥ ६ ॥
ज्ञान ताजवा घेउन हातीं । दोन्ही अक्षरें जोखिती ॥ ७ ॥
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी ॥ ८ ॥
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस ॥ ९ ॥

परमेश्वर अन्य कुठे नसतो. आपल्या कामात आपण एकाग्र होऊन गेलो की तो तिथेही दिसतो हेच खरे. निष्काम भावनेने आपले कार्य करणाऱ्या नरहरी सोनार यांना विठ्ठालाने पोटाशी धरले नसते तरच नवल होते. त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले. मायाळू विठोबाने त्यांना आपलेसे केले.!

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)



Wednesday 30 August 2023

चोखा म्हणे ऐसी कनवाळू माऊली…

 #सुधा_म्हणे: चोखा म्हणे ऐसी कनवाळू माऊली…

30 ऑगस्ट 23

आयुष्यात जेंव्हा आपण खूप काही सोसतो तेंव्हा एकतर स्वभावात एक कडवटपणा येतो किंवा आपण पूर्णत: समाजाशी फटकून वागतो. कधी स्वतःला एका कोषात बंद करून घेतो किंवा सतत जमदग्नीचा अवतार धारण करून लोकांवर चिडचिड करत बसतो. अशी वागणारी माणसे मग त्यांच्या अशा वर्तणूकीचे समर्थन देत बसतात. अन्य कुणाच्या चुकीमुळे त्यांना काहीतरी सोसावे लागले हे जितके खरे असते तितकेच त्यांच्या आयुष्यात चांगले वाईट क्षण येणे हे त्यांचे प्राक्तनदेखील असते. असे समजून घेऊन जे स्तुति-निंदा-मान-अपमान शांतपणे सोसतात तेच खरे संत. गीतेमध्ये 12व्या अध्यायात स्थिरबुद्धी व्यक्तीची लक्षणे सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडी एक श्लोक आहे;

 “समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः। 

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गाविवर्जितः॥ 

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌। 

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः॥

ज्याना हे सर्व तोंडपाठ असते त्यातील फारच थोड्या व्यक्तींनी हे अंगी बाणवलेले असते. तथापि वेद, संस्कृत ग्रंथ या संगळ्यापासून ज्याना वंचित ठेवले गेले त्या चोखोबासारख्या संतांच्या रक्तात हे तत्वज्ञान आधीच उतरले होते. 

आयुष्यात अत्यंत मानहानी, कष्ट, वंचना असे सगळे सहन करावे लागून देखील चोखोबा शांत, सात्विक राहिले. प्रसंगी अत्यंत चिडण्याचा त्यांना हक्क होता इतका त्रास त्यांनी आणि कुटुंबियानी सोसला. तरीही ते आणि त्यांचे कुटुंब देवभक्तीमध्ये रमून जाताना सगळा त्रास विसरले. त्यांची एखादी रचना अशी समोर येते की चोखोबांचे प्रेमळ दर्शन होत रहाते. या रचनेत किती मायेने ते लिहीत आहेत;

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥
काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥
वर्ण अभिमान न धरी कांही चाड । भक्तिसुख गोड तयालागीं ॥३॥
चोखा म्हणे ऐसी कनवाळु माउली । कृपेची साउली दीनां करी ॥४॥

पंढरीला लोक दर्शनाच्या ओढीने जातात हे तर सर्वाना ठाऊक. इथं मात्र भक्तांच्या भेटीसाठी लोभावलेला विठ्ठल तिष्ठत उभा आहे ही कल्पनाच किती सुंदर..! जर भक्त नसते तर देवाला कोण विचारणार अशीच अवस्था झाली असती. वर्ण – जाती भेद न मानता भक्तीसुखाला आसावलेला हा विठ्ठल फार सुंदर दिसतो त्यांच्या नजरेला..! लोकांच्या भाबड्या भक्तीमध्ये गुंतलेला, सर्वांवर कृपाछत्र धरणारी ही विठूमाऊली इतकी कनवाळू आहे असे फार मायेने ते सांगत राहतात. ज्यावेळी सतत दुःख, अवहेलना सोसावी लागते आहे, मनात खदखद आहे, त्यावेळीही ते देवाला बोल लावत नाहीत.

“विठ्ठल खूप कनवाळू आहे, भावाचा भुकेला आहे.. समतत्व मानणारा आहे..” हे सारे ऐकायला फार गोड आहे. मात्र सुखात राहणाऱ्या इतर कुणीही असे सांगणे वेगळे आणि ज्या व्यक्तीला दिवसातील बहुतांश वेळ लोकांच्या कडून त्रास सोसावा लागे त्यांनी सांगणे वेगळे. उदंड काही सोसूनदेखील आपल्या चित्ती समाधान बाळगणारे, सर्वांप्रती प्रेमभावना बाळगणारे चोखोबा म्हणूनच अपार वंदनीय होऊन जातात.

-सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
 


Tuesday 29 August 2023

आम्हा न कळे ज्ञान..

 #सुधा_म्हणे: आम्हा न कळे ज्ञान..

29 ऑगस्ट 23

चोखोबा तत्कालीन समाजाच्या उतरंडीमध्ये अगदी खालच्या पायरीवर होते तरी त्यांचे जगणे, त्यांचे विचार, त्यांच्या आचरणातील सात्विकता ही थोर होती. उच्च दर्जाची होती. अगदी मोजक्या भाषेत, अत्यंत समर्पक असे शब्द वापरुन त्यांनी त्यांच्या मनातील कोलाहल व्यक्त केला ते पाहता त्यांच्या विचारशील, क्षमाशील मनाला वंदन करावेसे वाटते. त्यांच्या रचना पाहता हेही लक्षात येते की त्यांनी बारकाईने कित्येक गोष्टींचा अभ्यास केला आहे. “अभ्यासोनी प्रकटावे..” ही समर्थांची उक्ती इथे प्रत्ययास येते. तत्कालीन समाजात वेद, उपनिषदे, शास्त्रे, योगविद्या, तपाचरण, अनेक प्रकारच्या देवतांच्या उपासना, व्रते अशा विविध गोष्टींचे अनुकरण केले जात होते. त्यामुळे अशा गोष्टींचा अभ्यास करणारी मंडळी विद्वान म्हणून नावाजली जात होती. गौरवली जात होती.

 

त्यामुळेच चोखोबा म्हणतात,

आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन । न कळेची दान व्रत तप ॥३॥

चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

त्या काळी अनेक विद्वान होते, देवभक्त होते. पुजारी किंवा पुरोहित होते. मात्र कित्येक मंडळी केवळ अभ्यासू असली तरी त्यांच्यात माणूसपणाचा अभाव होता हेही इतिहास पाहताना दिसून येते. उदंड अभ्यास केल्याने माणसातले काठिन्य भंगले पाहिजे, त्यांच्या चित्तवृत्ती उदार, क्षमाशील व्हायला हव्यात. मात्र या ऐवजी असे लोक माणसा-माणसात दुरावा निर्माण करतात. शास्त्राचे दाखले देत समाजात भीती निर्माण करतात. पुरोहित किंवा पुजारी वर्गातदेखील तेंव्हा विविध जाती होत्या, त्यांच्याकडून देखील दडपशाही केली जात असे. निव्वळ हीन जातीतील असल्यामुळे चोखोबाना देखील जिवंत असेतोवर विठ्ठल दर्शन घेताच आले नाही. विठ्ठालाचे नामस्मरण करत आपल्या कामात गुंतलेले असताना भिंत कोसळून त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांची वेदना, असहाय्य आक्रोश केवळ त्यांच्या अजरामर शब्दातून ठिबकत राहिला.

हा अभंग म्हणजे अशा पुरोहित वर्गावर त्यांनी केलेली उपरोधिक टीका आहे. कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करता येत नाही. मला तर वेद वगैरे काहीच कळत नाही. तरीही देवाला माझा भोळा भाव समजतो, मी प्रेमाने मारलेली हाक त्याला ऐकू जाते. त्यामुळे देव जात पात न पाहता सर्वांवर समदृष्टीने कृपा करतो. तो आपल्याला अप्राप्य नाही. आपण त्याचे नाव घेत राहणे पुरेसे आहे असे सांगत चोखोबा जणू या पुरोहित वर्गविरुद्ध बंडाचा मूक आणि निग्रही झेंडा उभरतात असे वाटते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Monday 28 August 2023

चोखा म्हणे मज नवल वाटते...

 #सुधा_म्हणे:चोखा म्हणे मज नवल वाटते...

28 ऑगस्ट 23

समाजातील भेदाभेद यामुळे आपल्याकडे लाखों लोकानी दुःख, दारिद्र्य, वंचना अपमान भोगले. चोखोबा त्यातलेच एक होते. अत्यंत विचारशील, तत्वनिष्ठ असलेल्या चोखोबांच्या जातीमुळे सर्वत्र त्यांना विटाळ मानले गेले. जातीने महार असलेले चोखोबा, त्यांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा आणि मेहुणा बंका महार या सगळ्यांच्या भक्ती रचना उपलब्ध आहेत. ज्यावेळी ज्ञानेश्वरांनी पंढरपूरमध्ये सर्व जाती जमातीच्या लोकाना सामावून घेत एक प्रकारची आध्यात्मिक समरसता निर्माण करायचा यशस्वी प्रयत्न केला तेंव्हा त्यात नामदेव,जनाबाई, यांच्यासोबत चोखोबा देखील होतेच. 

नामदेवांच्याकडून त्यांना गुरुपदेश मिळाला असे मानले जाते. असे असले तरी त्यांच्या यातना, कष्ट अपार होते. समाजात शूद्र, अतिशूद्र म्हणून हिणवले जाई. तथाकथित उच्च-नीच विचारांच्या बेड्या सतत काचत राहत. एकीकडे म्हणायचे की सगळी ईश्वराची लेकरे आणि दुसरीकडे मात्र जात-धर्म, पंथ, वंश आदि गोष्टींसाठी भेदभाव करत राहायचे. माणसे माणसाशी माणसासारखे वागत नाहीत याची अनेक उदाहरणे आपण आसपास कायम पहात आलो. चोखोबा त्यातील एक ठसठशीत उदाहरण होते. 

त्यांना जे सोसावे लागत होते त्याविरुद्ध आवाज उठवणे देखील अशक्य अशी त्यात काळातील ती भयाण परिस्थिती. मात्र अत्यंत संयमित भाषेत जेंव्हा ते म्हणतात,

पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥

तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥

आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥

चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

तेंव्हा खाडकन कुणीतरी एक चपराक लगावली आहे असे भासते. माणसे माणसाशी वागताना किती प्रकारचे भेद पाळतात. स्त्री पुरुषात भेद केला जातोच. पण स्त्री-स्त्री मध्ये देखील निपुत्रिक, विटाळशी, विधवा अशा स्त्रियांना आजदेखील अनेक ठिकाणी अपमानास्पद वागवले जाते मग 800 वर्षांपूर्वी काय अवस्था असेल याचा विचारदेखील करवत नाही. 

सगळ्यांचा जन्मच मुळी विटाळामधून होतो, सगळ्यांची शरीरे एकसारखी मग हा भेदाभेद का? असे पोटतिडिकेने विचारलेल्या प्रश्नामुळे आपलाच जीव घुसमटून जातो. एका सज्जन माणसाला जे भोगावे लागले त्याची खंत वाटत राहते.

-सुधांशु नाईक( nsudha19@gmail.com)



Sunday 27 August 2023

देखणे गळतेश्वर मंदिर!

#सुधा_म्हणे : देखणं गळतेश्वर मंदिर
गुजरात मध्यें गेल्यावर महत्वाची सर्व सुप्रसिद्ध ठिकाणं सगळे पाहतातच. मात्र त्या पलीकडे अनेक सुंदर ठिकाणं आहेत ती पाहणं मनोरम आहे. मही या मोठ्या नदीसोबत गलती या छोट्या नदीचा जिथं संगम होतो त्या संगमावर निर्मिलेलं गळतेश्वर मंदिर हे असंच देखणं मंदिर. वडोदरापासून सुमारे 80 किमीवर असलेलं हे मंदिर किमान 1100 वर्षं जुने आहे.
शक्यतो या भागातील मंदिरे ही गुजराती चालुक्य किंवा परमार पद्धतीने बांधलेली असली तरी हे मंदिर मात्र मालवाच्या भूमिज शैलीत आहे असं मानतात. तांबूस पिवळ्या दगडात अष्टभुजांवर केलेली मंदिराची उभारणी अत्यंत देखणी आहे. मंदिराचे गर्भगृह आतून चौकोनी तर समोरचा नृत्य मंडप सुबक अष्टकोनी आहे.
 या अष्टकोनी मंडपाला 40 सुरेख खांबानी तोलून धरले आहे. अध्यात्मिक साधनेसाठी या मंदिराला विशेष महत्व असल्याचे मानले जाते. या मंदिराची उभारणी मोढेरा येथील सूर्य मंदिराशी मिळती जुळती असल्याचे भासते.
मंदिराच्या भिंतीवर केलेले नाजूक कोरीव काम, गंधर्वाच्या देखण्या मूर्ती, शिवशंकराच्या आयुष्यातील काही प्रसंग, अश्वारूढ सुंदरी, नर्तिका, चामुंडा आदि अनेक कोरीव शिल्पांची अतिशय नासधूस करण्यात आली आहे.
 लहान लहान हत्तीची शिल्पे तर इतकी देखणी आहेत कीं बघत राहावेसे वाटते. त्याचीही पूर्वी मोडतोड करण्यात आली आहे. तरीही दिसणारे शिल्पकाम इतकं सुंदर आहे कीं याची तोडमोड करणाऱ्या त्या दुष्ट मनोवृत्तीच्या आक्रमकांविषयी अतिशय संताप वाटत राहतो.
या मंदिराचे छत पूर्वी पूर्ण कोसळले होते. आता ASI मार्फत त्याची नव्याने उभारणी करण्यात आली आहे.
मंदिराच्या शेजारूनहणारे मही नदीचे खळाळते विस्तीर्ण पात्र सर्वांनाच आकर्षित करणारे आहे. या निसर्गरम्य ठिकाणी आल्यावर अवघ्या चिंता, काळजी काही क्षण तरी मिटल्याचे नक्कीच अनुभवायला मिळते.
- सुधांशु नाईक (9833299791)🌿
कसे जाल : वडोदरा -सावली रोड - सावली गांव - डेसर - डावीकडे गळतेश्वर फाट्याने मंदिराकडे. ( एकूण अंतर सुमारे 80 किमी.)

Saturday 26 August 2023

विठू माझा लेकुरवाळा...

#सुधा_म्हणे: विठू माझा लेकुरवाळा..

25  ऑगस्ट 23

13 व्या शतकातील तो काळ फार सुंदर होता जेंव्हा पंढरीत संतांचा मेळा रंगला. चंद्रभागेचे वाळवंट हरी कीर्तनी दंग झाले. निवृत्ती-ज्ञानेश्वर-सोपान- मुक्ताई यांच्या जोडीला नामदेव, गोरा कुंभार, चोखोबा आदि संत सज्जन एकत्र आले. “रामकृष्ण हरी.. पांडुरंग हरी..” चा जयघोष निनादत राहिला. तहानभूक विसरून भजन कीर्तनात सगळे रममाण होऊन गेले. यातच जनाबाई पण होत्या. नामदेवाघरी राबणारी ही मोलकरीण इतराना जणू वेडी वाटायची. आपल्याशीच काय बोलत बसते, विठू माझ्यासोबत जेवतो, कामे करतो, सोबत राहतो, इथेच झोपतो असे काही काही बोलत राहते.. ही तर वेडीच असे लोकाना वाटले तरी सगळ्या संतांना मात्र तिच्या वेडाचे वेगळेपण उमजले होते. त्यामुळे आपला घरधनी नामदेव या सगळ्या संताच्या सोबत भजन कीर्तनात असताना जनाबाई पण कामे आवरून तिथे जात. त्यांनी हाती असलेली कामे कधीच टाळली नाहीत. सगळ्या संतांचे हे पंढरीत येणे त्यांना जणू पर्वणी वाटे. आणि म्हणूनच एके ठिकाणी त्या म्हणून जातात, “मुखी हरिनाम नेत्र पैलतीरी, जनी नामयाची रंगली कीर्तनी..”!

या सगळ्या संतांच्या सोबतीने वावरताना माझ्या विठ्ठलाला किती छान वाटते आहे असेही त्यांना वाटते. भक्तांच्या गोतावळ्यात हा सखा अगदी आनंदी झाला आहे. आपल्याला जसा आनंद मिळतोय तसेच विठ्ठल देखील सुखावतो आहे हे सांगताना त्या म्हणतात,

विठु माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा

निवृत्ती हा खांद्यावरी,  सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर,  मागे मुक्ताई सुंदर
गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी
संत बंका कडेवरी, नामा करांगुळी धरी
जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा..

किती मोजके शब्द. संपूर्ण अभंग म्हणजे एकत्र गुंफलेली फक्त नावे आहेत. मात्र त्यातून स्त्रवणारे वात्सल्य अभूतपूर्व आहे. जनाबाईंच्या डोळ्याना दिसलेले हे रुपडे फार फार मायाळू आणि लोभस असे आहे.

आपल्याही डोळ्यासमोर लगेच साकार होऊन जाते. हा विठ्ठल मंदिरात गाभाऱ्यात बसलेला, अंगभर दागिने, भरजरी कपडे घातलेला असा नाहीये. घरात एखाद्या आजोबांभोवती लहान मुले जमलेली असावीत, कुणी त्यांच्या मिशा ओढाव्यात, कुणी आजोबांच्या छातीवरील सुरकुत्या मोजत बसावे, कुणी त्या आजोबांकडे “गोष्ट सांगा ना..” असा आग्रह धरावा, कुणी गोळ्या बिस्किटं मागवीत आणि मायेने आजोबांनी त्या नातवंडांच्या मागण्या पूर्ण करत राहावे.. हा विठ्ठल अगदी तसा भासतो आहे. भक्ताना खांद्यावर, कडेवर घेणारा हा लेकुरवाळा विठ्ठल मग फार फार आपलासा वाटू लागतो. त्याला गळामिठी घालायला मन अगदी आतुर आतुर होऊन जाते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Friday 25 August 2023

दळिता कांडिता तुज गाईन अनंता...

 #सुधा_म्हणे: दळिता कांडिता तुज गाईन अनंता..

25 ऑगस्ट 23

नामदेवांच्या घरी राबणारी एक साधी बाई म्हणजे जनाबाई असे सर्वसामान्यांना त्याकाळी वाटत असे. तिची विठ्ठलासोबतची सख्यभक्ती सर्वाना थोडीच उमजणार होती ? त्यांनी तर तिला वेडी ठरवले होते.

आपण दिवसभर कित्येक कामे करत असतो. प्रत्येकवेळी त्यात आपला अहम आडवा येतो. हे मी करतोय, ते मीच करू शकतो, मी असा, मी तसा इत्यादि.. आणि मग अहंकार आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनामध्ये आपण गुरफटून जातो. जनाबाईंच्या जगण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आयुष्यातून हा अहंकार कायमच दूर होता. आपल्या नशिबी असलेले ते जगणे, त्यातली सुखे दुःखे सगळे काही त्या विठ्ठलाचे असे मनाशी ठाम ठरलेले होते. त्यानुसार त्यांचे राहणे, वागणे असे. 

धान्य निवडणे, दळणे, घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, शेण गोळा करून गोवऱ्या तयार करणे अशी त्या बाईसाठी जी जी कामे होती ते सारे करताना मुखी विठ्ठलाचे नाव असायचे. आई बाप, बंधु सगळे काही त्या सख्या पांडुरंगामध्ये सामावून गेले होते. दुसरे कुणी त्यांना आता नकोच होते. केवढी ही एकरूपता..! म्हणूनच जेंव्हा जनाबाई असे म्हणतात,

दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखी हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

एक अशी कथा सांगितली जाते की जनाबाईंची वाढती लोकप्रियता एकदा संत कबीर यांच्या कानी पडली. ते शोध घेत पंढरपुरी पोचले. वेशीजवळ त्यांनी पाहिले की दोन बायका कडाडून भांडत आहेत. शेणाच्या गोवऱ्यातील ढिगामधल्या आपल्या वाट्याच्या गोवऱ्या किती यावर त्यांचे भांडण सुरू होते. त्यांनी त्यांच्याकडे जनाबाईची चौकशी केली. तेंव्हा त्यातील एक बाई म्हणाली, “मीच जनाबाई.. बोला महाराज काय काम तुमचे? इथे ही बाई उगीच माझ्याशी भांडते आहे, मी तिच्या गोवऱ्या चोरल्या म्हणते आहे, आणि माझ्याच गोवऱ्या तिने घेतल्या आहेत. त्याचा निवाडा करा आता तुम्ही.” कबिराना क्षणभर वाटले की मी बहुदा चुकीची माहिती ऐकली हिच्याविषयी. ही तर एक सर्वसामान्य भांडकुदळ स्त्री दिसते आहे. मग ते म्हणाले, “ शेणाच्या गोवऱ्या या शेणाच्या. तुम्ही दोघीनी किती बनवल्या हे मी कसे सांगणार ?”

मग पटकन जनाबाई उद्गारल्या, “महाराज, जरा त्या गोवऱ्या कानाला लावून पहा. ज्यामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज ऐकू येईल त्या माझ्या..!” आणि क्षणात कबिरांच्या लक्षात आले की त्यांचे विचार किती चुकीचे होते. या बाईचे अवघे आयुष्यच विठ्ठलमय होऊन गेले आहे. जळी स्थळी, काष्ठी, खाता पिता, जेवता झोपता तिला आपला सखा दिसतो आहे. जनाबाई पूर्णपणे केवळ विठ्ठलरूप होऊन गेली आहे. ज्यावेळी जगण्याच्या प्रत्येक क्षणी आपल्याला समोर आपले प्रेयस दिसत राहते ते खरे प्रेम. एखाद्याला पूर्ण समर्पित होण्याचे असे उदाहरण दुर्मिळच. अशा समर्पणासमोर आपण फक्त नतमस्तक होऊन जातो.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Thursday 24 August 2023

जनी म्हणे बा गोपाळा...

 #सुधा_म्हणे: जनी म्हणे बा गोपाळा.. करी दुबळीचा सोहळा..

24 ऑगस्ट 23

महाराष्ट्रातील यादवांची राजसत्ता 13/14 व्या शतकात उद्ध्वस्त झाली आणि इथले समाजजीवन एका भयानक वादळात आक्रंदत राहिले. देव, देश, धर्म सगळीकडेच भयाण परिस्थिती. कुणाकडे पाहून जगायचे, कसे जगायचे किती सोसायचे अशी अवस्था काही प्रमाणात सुसह्य केली ती संतांनी.

अशा संतांमध्ये सर्व जाती-जमातीतले, सर्व स्तरातील लोक होते. त्यातच एक होत्या जनाबाई. “मी पाणी भरायला निघाले, विठोबा सोबत आला.., मी गोवऱ्या थापायला निघाले, विठोबाने मदत करायला सुरुवात केली..” असे आपल्या रोजच्या सगळ्याच कृतीमध्ये जनाबाईला विठोबा दिसत असे. जेंव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत एकरूप होतो तेंव्हा रोजच्या जगण्यातील प्रत्येक क्षण त्याच्यासोबत घालवावा असे वाटते. जनाबाईंचे अभंग याच सख्यभक्तीचे उत्तम उदाहरण बनून जातात. विटेवर उभा असलेला समचरण असा विठ्ठल जनाबाईचा सखा झाला. दास्यभक्ती, सख्यभक्तीचे सुरेख दर्शन म्हणजे जनाबाईंचे अभंग.

आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्‌ठला ॥१॥

हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
विठ्‌ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरुन घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे त्यांचे मूळ गाव. त्यांच्या वडिलांनी लहानपणी नामदेव शिंपी यांच्याकडे कामे करण्यासाठी तिची पाठवणी केली आणि नामदेवांच्या घरील विठ्ठलभक्ती जनाबाईंच्या तनामनात उतरली. सकाळी उठल्यापासून घरी-दारी राबणाऱ्या जनाबाईंच्या ओठी अखंड विठ्ठलनाम होते. आपल्याला विठ्ठलाशिवाय कुणी नाही या भावनेने त्या जगल्या. विठ्ठल त्यांच्यासाठी सर्वकाही होता. लहानमोठी कामे करणे असो की स्वतःची वेणी घालणे असो, केलेली प्रत्येक कृती त्या विठ्ठलाला समर्पित करत होत्या. तो सहचर आहे या भावनेने, वात्सल्याने आपल्या रचनेतून सांगत राहिल्या. जेंव्हा हवासा सहचर सोबत असतो तेंव्हा आयुष्यातील दिवस शांत सुंदर होऊन जातो. म्हणूनच त्यांच्या अभंगाला एकत्र सहजीवन असताना लाभणाऱ्या त्या शांतीचा स्पर्श आहे असे मला वाटते. सगळे त्रास सोसायची ताकद हे सहजीवन देते. 

जनाबाईंचे सहजीवन विठ्ठलासोबत आहे. आपल्या घरासाठी, संसारासाठी राबणाऱ्या स्त्रीला केवळ प्रेमाचा सहवास हवा असतो, आपल्या कामात अल्प का असेना सहभाग देणारा साथीदार हवा असतो. विठ्ठलासारखा दिव्य सखा लाभल्यावर जनाबाईंचे आयुष्य धन्य होऊन गेले. अवघे दुबळेपण सरले नसते तरच नवल होते.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Wednesday 23 August 2023

विमोह त्यागुनी कर्मफलांचा..

#सुधा_म्हणे: विमोह त्यागुनी कर्मफलांचा..

23 ऑगस्ट 23

कृष्ण. बाळलीलामध्ये रमलेला किंवा राधेसोबत प्रेमरंगी रंगलेला किंवा मग थेट भगवान, ईश्वराचा अवतार म्हणून भक्तिरसाने भिजलेला असाच आजवर जास्त चित्रित केला गेला आहे. गीतेमधील कृष्ण सांगताना देखील आपण त्याला ईश्वर म्हणून दाखवतो. कृष्णाचे कर्तव्यकठोर, स्ट्राटेजिस्ट आणि मोटिवेशनल स्पीकर असे रूप मात्र खूप कमी लोकानी आपल्या साहित्यातून चित्रित केले आहे. कर्तव्य करताना कृष्णदेखील कायम कर्तव्यकठोर असाच वागला आहे. एकीकडे राधेच्या, गोपीच्या, रुक्मिणी-सत्यभामेच्या प्रेमात हळुवार झालेला कृष्ण प्रसंगी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी इतका कठोर बनतो की तोच हा आहे का असा प्रश्न पडावा. त्यातही तो नुसते उपदेश सांगत बसत नाही तर “आधी केले आणि मग सांगितले..” असे वागणारा आहे.

कृष्णाने स्वतः जिथे काहीतरी प्रत्यक्ष घडवून दाखवले अशी पराक्रमाची कित्येक उदाहरणे आहेतच. कंस, नरकासुर, कालयवन, पूतना, कालियामर्दन, शिशुपाल वध आदि ठिकाणी तो leading by example या मॅनेजमेंटच्या तत्वाप्रमाणे वागून एक आदर्श इतरांसमोर ठेवतो. मात्र म्हणून प्रत्येक वेळी सगळ्या लढाया तो स्वतः लढत नाही. जिथे राजकारणाची गरज आहे, अन्य कुणामार्फत कार्य घडवून आणायचे आहे तिथे त्यानुसार मदत घेतो. कौरव पांडव युद्ध तर केवळ कृष्ण आणि द्रौपदीमुळेच घडले असं सांगितले तर चूक ठरणार नाही. दुर्योधनाला, दुःशासनाला मारणे ही खरेतर कृष्णासाठी क्षुल्लक गोष्ट होती. पण त्याने तसे केलेले नाही.

शिष्टाईसाठी गेलेला कृष्ण अत्यंत धूर्तपणे हे युद्ध घडेल अशा पद्धतीने काम करतो. एकदा युद्ध नक्की झाल्यावर स्वतः तटस्थ राहून केवळ सारथ्य करायचे ठरवतो. हे सगळे युद्ध पांडवांकडून घडवून घेतो. आणि म्हणूनच कवीश्वर यांच्या गीतातील कृष्ण जेव्हा;

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था,

कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था..

असे म्हणतो तेंव्हा त्यातील प्रत्येक शब्दाला शस्त्रांची धार आलेली असते.

मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेले हे गीत म्हणजे कर्तृत्ववान आणि उत्तम मार्गदर्शक असलेल्या कृष्णाच्या आयुष्याचे जणू सार आहे. हे संपूर्ण गीत उत्तम आहेच मात्र या पुढील ओळी मला सर्वात जास्त भावतात. रंगहीन मी या विश्वाच्या, रंगाने रंगलो
कौरवांत मी पांडवांत मी, अणुरेणूत भरलो
मीच घडवितो मीच मोडितो, उमज आता परमार्था..

“न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चार..” असे वारंवार बजावणारा कृष्ण विचारांचा एकदम पक्का आहे. ही तुझी लढाई आहे, तुलाच लढायची आहे असे सांगतानाच आपण सगळ्यात असूनही संगळ्याच्या पलीकडे असल्याचे दर्शवत राहतो. त्याच्यासाठी हे विश्वच रंगहीन आहे. प्रेम, वात्सल्य, मित्रता, स्नेह, शत्रुत्व अशा सगळ्या रंगात रंगून गेलेल्या कृष्णाचे हेच खरे रूप. आपले आयुष्य कसे असायला हवे याचा तो वास्तूपाठच देतो.

आपल्याला असे भासते की कृष्ण त्या गोकुळातील मित्रांच्यात रमलाय, यशोदेच्या – कुंतीच्या वात्सल्यात आनंदलाय, राधेच्या प्रेमात रंगलाय, पांडवांचा सखा आणि हितचिंतक बनलाय, द्रौपदीच्या स्नेहधाग्यात गुंतलाय, विदुराच्या सात्विक भक्तीत बांधला गेलाय.. पण तरीही तो कायम सगळ्यापार उभा आहे असे मला जाणवते. सगळ्या गोष्टी भोगणारा तरीही कशातही अडकून न पडलेला कृष्ण. इतकेच नव्हे तर एक मोठे यादवकुल त्याने निर्माण केले. पण प्रभासतीर्थी जेंव्हा सगळे मद्यधुंद होऊन आपापसात मारामारी करून एकमेकांचा जीव घेत होते तेंव्हा तो शांतपणे त्यातून बाजूला होता. आपल्याच कुळाचा विनाश तटस्थपणे पाहत राहणारा एक स्थितप्रज्ञ !

घरात आणलेली एखादी वस्तू जुनी झाल्यावर सुद्धा लोकाना त्यागता येत नाही. नैवेद्याच्या लहानशा वाटीपासून घर- गाडी सारख्या मोठ्या वस्तूमध्ये मन गुंतवून बसलेली आपण माणसे. नात्याच्या अनेक गुंतागुंती माहिती असूनही विविध नात्यांच्यात स्वतःला आनंदाने गुंतवून घेणारी आपण माणसे. त्यामुळेच कृष्णाचे हे सगळ्यात असूनही सगळ्यातून अलिप्त असणे उमगायला अवघड आहे. चिकट अशा फणसाच्या गऱ्यात सहजपणे आठळी बसलेली असते. सगळ्यात असूनही त्या फणसाच्या आठळीच्या अंगाला काहीच चिकटलेले नसते. कृष्ण असाच आहे. आजचा क्षण मुक्तपणे साजरा करणारा, आणि प्रसंगी सगळ्यातून क्षणात बाहेर पडून जगाकडे पाठ फिरवून कठोरपणे दूर एकाकी राहणारा..!

कर्तव्य कठोर आयुष्य जगणारा कृष्ण जेंव्हा  मीच घडवितो, मीच मोडितो..” असे म्हणत ओठाशी बासरी धरून वेगळीच धून वाजवत आकाशापेक्षा मोठा होत जातो, तेंव्हा त्याचं ते रूप पाहून आपण थक्क होऊन जातो. त्याची वेगवेगळी रुपे आपल्याला खुणावतात. आवडत राहतात. तो मात्र सगळ्यात असूनही तिथून केव्हाच दूर निघून गेलेला असतो.

-सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Tuesday 22 August 2023

नको देवराया अंत आता पाहू...

#सुधा_म्हणे: नको देवराया अंत आता पाहू..

22 ऑगस्ट 23

संत कान्होपात्रा हे नुसतं नाव जरी उच्चारले तरी कारुण्य मनभर दाटून येते. किती हृदयद्रावक आहे तिची कहाणी. पंढरपूर जवळच्या मंगळवेढे गावातील एका श्रीमंत गणिकेची ही देखणी मुलगी. हाताखाली अनेक नोकर चाकर असलेली ही मुलगी लाडात वाढली. त्या पेशानुसार नाच गाणे शिकली. अत्यंत देखण्या कान्होपात्रेची ख्याती हळूहळू सर्वत्र पसरू लागली. गावातील मुखिया सदाशिव मालगुजर हा तिचा बाप असे तिच्या आईने सांगितलेले. मात्र त्यालाच ती हवीशी वाटू लागली. तिने माझ्याकडे यावे, समोर नाच गाणे करावे असे तो वारंवार तिच्या आईला सांगू लागला. दोघीनी जेंव्हा त्याला नकार दिला त्यानंतर मग त्याने अनंत प्रकारे त्रास दिला. त्यांची अवस्था बिकट झाली. उदरनिर्वाह नीट चालेना. शेवटी आईने, मनाविरुद्ध तिला त्याच्याकडे पाठवायचे कबूल केले. ही गोष्ट कळताच कान्होपात्राने तिथून पलायन केले. ती पंढरपूर मध्ये जाऊन राहिली.

              (चित्रकार- वासुदेव कामत)

पंढरपुरी आल्यावर इथल्या संत सज्जनांमध्ये ती भजन कीर्तन आदि भक्तीरंगात रंगून गेली. पेशाने गणिका असली तरी कान्होपात्रा मात्र देवभक्तीत रमलेली असे. तरीही तिच्या सौंदर्याची सर्वत्र खूप चर्चा होऊ लागली. पाहता पाहता तिच्याविषयीची माहिती बादशहाला कळली. पंधराव्या शतकात त्या प्रांतात बिदरच्या बादशहाची सत्ता होती. त्याला तिचा मोह पडला. त्याने बोलावणे पाठवले. तिने नकार दिला. शेवटी तिला पकडायला सैनिकांची तुकडी आली. ज्याच्या प्रेमात, ज्याच्या भक्तीसाठी आपण सगळे सोसतो आहोत तो विठोबा अजूनही मला उराशी धरत नाही म्हणून मग कान्होपात्रा आक्रंदन करू लागते,

नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सवर्था जाऊ पाहे 

हरीणीचे पाडस व्याघ्रे धरियेले , मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी,धावे हो जननी विठाबाई

मोकलुनी आस, जाहले उदास, घेई कान्होपात्रेस हृदयास 

नको देवराया अंत आता पाहू ,प्राण हा सवर्था जाऊ पाहे ..

हरिणीच्या पाडसाला धरून जेंव्हा वाघ त्याच्या नरडीचा घोंट घेऊ पाहतो त्यावेळी त्याला जी मरणप्राय वेदना होईल तसे दुःख मी झेलत आहे. तुझ्याशिवाय आता माझे कुणीच नाही त्यामुळे आता मला अधिक अंत पाहू नको, मला तुझ्यात मिसळून जाऊ दे असं सांगत कान्होपात्रा विठोबाच्या चरणी आपले प्राण अर्पण करते. स्त्रीचे आयुष्यच किती वेगळे. सतत कुणाच्या तरी वासनामय नजरा, स्पर्श झेलत राहणारे. तिच्याकडे कित्येक युगे  समाज भोगवस्तू म्हणून पाहत राहिला. कान्होपात्रा सारखी स्त्री, पेशाने गणिका असली म्हणून काय झाले, तिला तिचा अधिकारच नव्हता. मात्र तरीही कान्होपात्रा झुकत नाही. समोरच्या बलवान बादशहाची मागणी जर तिने मान्य केली असती तर कदाचित तिला राजमहालात राहण्याचे सुख मिळाले असते. पण ती योगिनी होती. तिला फक्त विठ्ठलाच्या सहवासातील सुख मोलाचे वाटत होते. भौतिक सुखाच्या कल्पनांच्या ती पार निघून गेली होती. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रमून राहण्यासाठी लागेल तेवढे दुःख भोगायची तिची तयारी होती. ज्या देहाला विठोबाचे मानले आहे त्या देहाला विटाळण्यापेक्षा म्हणूनच ती मरण सुखकर मानते.

हृदयनाथ मंगेशकर यांच्या भावविभोर आवाजात हे आर्त गीत ऐकताना मन भरून येते. खरतर हे स्त्रीचे आक्रंदन. भैरवीच्या सुरात हृदयनाथ ते असे काही आपल्याला ऐकवतात की मन वेदनेने भरून येते. असहाय्य तरीही स्वाभिमानी कान्होपात्रेची ही हृदय हेलवणारी कारुण्यमय गाथा ऐकताना डोळे कधी वाहू लागतात ते खरंच कळत नाही.

- सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)



Monday 21 August 2023

विश्वाचे आर्त ...

#सुधा_म्हणे: विश्वाचे आर्त

21 ऑगस्ट 23

निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार भावंडे आणि त्यांचे जगणे ही मराठी माणसासाठी अलौकिक अशी गोष्ट. आज हे चौघेदेखील आपल्यासाठी देवस्वरूप बनले असले तरी त्यांना एकेकाळी अपार दुःख भोगावे लागले. परंपरा, रूढी, रीती रिवाज, चाकोरी यांच्यामुळे त्यांना तत्कालीन समाजाने त्रास दिला. दैवी सामर्थ्य असूनदेखील त्यांनी त्या परंपरांचा मान राखत शुद्धीपत्र मिळवून आळंदीमधील ब्रहवृंदाला दिले. एकेकाळी ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्याविषयी अजिबात कटुता त्यांनी बाळगली नाही. ज्या आळंदीमध्ये भर दुपारी या चिमुकल्याना अनवाणी पायाने भिक्षा मागावी लागली तिथेच पुन्हा परतून आल्यावर त्यांनी कुणाचाही द्वेष केला नाही, बदल्याची भावना उरी बाळगली नाही. आणि स्वतःही केवळ आळंदीमध्ये बसून राहिले नाहीत. भागवत धर्माची, विठ्ठलभक्तीची पताका फडकवताना, ईश्वरभक्तीचा संदेश देत ते नामदेवाना सोबत घेऊन पार पंजाबपर्यन्त जाऊन आले. त्यांच्यासाठी हा माझ्या गावचा, हा राज्याचा असा भेद उरलाच नव्हता.

संतांचे हृदयच असे विशाल असते. सर्वांप्रती तिथे असते केवळ माया. ज्ञानेश्वरांच्या जगण्यातच विश्वाप्रती लोभस जिव्हाळा दिसतो. धर्म, जात,प्रांत, लिंग आदि भेदांच्या पलीकडे गेलेले ते एक महायोगी होते. म्हणूनच आपल्या देहापलीकडे जात ते जेंव्हा विश्वाचा विचार करतात तेंव्हा ते केवळ पोकळ असे शब्द उरत नाहीत. या विश्वातील सर्वांचे भले व्हावे ही जाणीव मनात प्रकटणे हेच योगी असल्याचे लक्षण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लोकांच्या कल्याणासाठी त्यांचे मन प्रत्येक क्षण गुंतलेले असते आणि असेच मन मग म्हणू शकते,

विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले ।

अवघेचि जालें देह ब्रम्ह ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।

नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

 बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।

हृदयीं नटावला ब्रम्हाकारें ॥३॥

ईश्वरी प्रेमाचा, निरपेक्ष प्रेमाचा अनुभव आला की मनातील क्रोध, द्वेष, मत्सर आदि हीण भावना लोप पावतात. उत्कट प्रेमाची अनुभूती लाभली की सगळे काही सुंदर भासू लागते. त्याचा सहवास मिळाला की मग इतर सगळ्या गोष्टीमधील आसक्ती मावळून जाते. प्रेम या शब्दाला ज्ञानोबा इथे वालभ असा समानार्थी शब्द वापरतात. आवडत्या गोष्टीवरच्या प्रेमाने एकदा हृदय भारून गेले की अवघ्या विश्वातील प्रत्येक गोष्ट अलौकिक अशा तेजाने भारल्यासारखी, आकाशासारखी भव्य आणि आनंददायी वाटते. कोणतीच गोष्ट वाईट, क्षुद्र भासत नाही. सगळे जगणेच मग त्याच्याशी एकरूप झालेले! सुखाच्या अतीव लाटांवर उचंबळत राहणारे होऊन जाते.

त्याचे सख्य मिळणे ही दुर्लभ गोष्ट साध्य झाली की मग जन्म सार्थक झाला असे वाटते. तृप्तीच्या या क्षणी मन निर्मळ, निराकार होऊन जाते. अन्य काही नकोसे वाटू लागते. जगण्याचे प्रयोजन संपले की उरते फक्त मुक्तीची ओढ. शांत शांत आयुष्य सर्वांच्या सुखाची प्रार्थना करत दिव्याची ज्योत सावकाश शांतवावी तसे संपून जाते.  ती ब्रह्माकार झालेली मुक्ती, ते जगणे मग वंदनीय होऊन जाते.

- सुधांशु नाईक(nsudha19@gmail.com)