marathi blog vishwa

Wednesday 23 July 2014

पानी पानी रे....

“मनापासून” या लेखमालेतील हा लेख आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या पाण्यावर..!


गेल्या काही दिवसांपूर्वी कोयना धरणाचा फोटो पाहिला आणि धक्काच बसला. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ज्या सह्याद्रीत पडतो, त्या ऐन सह्याद्रीच्या घाटमाथ्याजवळचे कोयना धरण पावसाची वाट पहात होतं..! निम्म्या महाराष्ट्राला ज्या धरणामुळे एकेकाळी वीज पुरवठा होई आणि सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अनेकांना (आणि कोकणातील चिपळूण तालुक्यातल्या काही भागांना) पाणी मिळून जाई ते धरण ठणठणीत कोरडे पडले होते. याला कारण आपण सगळे..!
 
१९६४-६५ मध्ये धरणात पाणी अडवण्यापूर्वी त्या धरणात बुडून जाणाऱ्या गावातील अनेक गावकऱ्याना तिथून हुसकावले गेले. काही तुटपुंज्या मदतीवर समाधान मानून दूर कुठे कुठे विस्थापिताचे जिणे जगावे लागले. अनेकांना तर आजवर केवळ आश्वासनंच मिळाली आहेत. तरीही आजही कोयना धरण हे केवळ पाणी साठवायचे आणि वीजनिर्मिती करण्यासाठीचे एक साधे धरण असे सामान्य जनता मानत नाही कारण हे धरण महाराष्ट्राचा एक मानबिंदू आहे.

मात्र गेल्या १५-२० वर्षात अधिकाधिक गाळात रुतत गेलेले राजकारण व सत्तेच्या हव्यासात बुडून गेलेल्या माजोरड्या पुढारी व नेते मंडळींच्या वर्तणुकीने राज्याची काय परिस्थिती झाली, हे दर्शवणारे उत्तम उदाहरण म्हणजे आटून गेलेलं कोयना धरण. राज्यातील नेहमीच आटून जाणाऱ्या इतर धरणांमध्ये यंदा कोयना धरणाचा नंबर लागला आणि राज्यकारभाराची शोकांतिका अधिक गडद व गंभीर झाली असं मला वाटतंय.

पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला दुष्काळ काही नवा नाही. गेल्या शेकडो वर्षापासून इथे दुष्काळाची परंपरा आहे. दर ५-१० वर्षांनी कमी पावसाचं एखाददुसरे वर्षं येते आणि आपल्या सगळ्यांचे जीवनमान विस्कटून टाकते. अनेक वर्षांपूर्वी कित्येक पिढ्या दुष्काळामुळे अशाच विस्थपित होत गेल्या. पण मग आपण इतिहासातून काय शिकतोय? काहीच नाही का? मस्त वाहणारे झरे, धबधबे, तुडुंब भरलेलं नदीचं सुंदर रूप, आपल्या शहराचं वैशिष्ट्य असणारा आणि पाण्याने भरलेला एखादा तलाव पाहायला सर्वांना आवडतंच. मात्र हे सर्व असंच कायम राहावं यासाठी आताच आपण सर्वांनी जर प्रयत्न केले नाहीत तर भविष्यातील चित्र फार विदारक असू शकते.


सुदैवानं आपल्याकडे “जल-जागृती” साठी कार्यरत असणारी अनेक प्रामाणिक मंडळी आहेत. पण “पावरबाज” नेत्यांच्या वैयक्तिक हव्यासापायी आणि दडपशाहीमुळे  संपूर्ण महाराष्ट्रात “जलसंधारण” नावाखाली जो नंगानाच गेली १०-२० वर्षे सुरु आहे, त्यातच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सर्वत्र पाण्याचा जो अतिवापर चालवला आहे त्यांचेच परिणाम आता आपण भोगू लागलो आहोत हे एक उघड व कटू सत्य आहे.

आजही आपल्या राज्यातील  हिरवे बाजार, राळेगणसिद्धी, दहिवडीच्या परिसरातील लोधवडे सोलापूर जवळील अंकोली अशा अनेक गावातून अत्यंत कमी खर्चात “पाणीबचतीचे” प्रयोग यशस्वी होत आहेत. जमिनीखालील पाणी टिकवले जात आहे. मुख्य म्हणजे ही गावे कमी पावसाच्या प्रदेशातील आहेत. अथक प्रयत्नातून पाण्याच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण बनली आहेत. “पाणी वाचावण्यासाठीची शिस्त” लोकांनी अंगी बाणवली आहे. तसेच लातूर, औसा भागातील घरणी, तावरजा या नद्यांचे लोकसहभागातून आणि “आर्ट ऑफ लिविंग”च्या मदतीने पुनरुज्जीवन करण्यात आले. “जल तज्ञ राजेंद्रसिंहजी” यांच्या सहकार्याने माणदेशातील माणगंगा, येरळा आदि नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र या सगळ्यातून समाजाचा भरपूर सहभाग आहे असे दिसत नाही.
कुण्या अभिनेता-अभिनेत्रीच्या तथाकथित संबंधाविषयी भरभरून चर्चा करणारी सर्वसामान्य माणसे अशा चांगल्या प्रयत्नांविषयी बऱ्याचदा अनभिज्ञ असतात. त्यासाठी मदत करणं तर दूरच पण त्या कामांची प्रसिद्धीसुद्धा करताना सापडत नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे.

कंत्राटदारांना भरभक्कम सवलती देऊन धरणांचे अनेक मोठे प्रकल्प राज्यात उभे राहिले खरे. मात्र या प्रकल्पांनी खरंच आपल्याला पाणी दिले का हा एक वादाचा मुद्दाच आहे. कित्येक धरणांचे उपलब्ध पाणी आज प्राधान्याने विशिष्ट उद्योगांना आधी दिले जाते आणि मग शेतकऱ्याना..! हे अशा देशात घडते आहे जिथे देशांचे अर्थकारण ७०% शेतीवर अवलंबून आहे.

मुळात अनेक धरणे चुकीच्या जागी बांधली गेली. अनेक धरणांनी, उद्योगांनी जंगले नष्ट केली. निसर्गाचा समतोल बिघडवला. याचा अर्थ धरण असूच नये असा नव्हे. लहान-मोठी धरणे ही आवश्यक आहेतच पण त्याचे काम विक्रमी वेळेत आणि समाजहित डोळ्यासमोर ठेवूनच केलं तरच..! जर समाजातील प्रत्येकाने पाण्याच्या बचतीसाठी, जमिनीतील पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर आणि तरच पुढच्या पिढीत पाण्यासाठी युद्ध आणि भांडणे होणार नाहीत.

चाळीत नळावर होणारी भांडणे आणि दोन तालुके, राज्ये अथवा देशांनी एकमेकांशी केलेली भांडणे यांचं मूळ तत्व एकच असतं. ते म्हणजे, “दुसऱ्याला पाणी मिळाले नाही तरी चालेल पण फक्त मला आणि मला पाणी मिळालेच पाहिजे. मी पाण्याची कितीही उधळपट्टी केली तरी मला हवे तेवढे आणि हवे तेंव्हा पाणी मिळालेच पाहिजे”. यामुळेच पाण्यासाठी सगळेच दहशतवादी बनून जातात. आपला एखादा शेजारी घरात पाईपला चोरून मोटर लावून पाण्याचा अधिक वाटा मिळवतो. तर एखादा देश/ राज्य नदीचं पात्र बदलतो, त्यावर मोठी धरणे बांधून पुढे जाणारे पाणी कमी करतो. आपल्याला पाणी मिळत नाही म्हणून अशा कारणांचा आपल्याला फार काळ आधार घेता येणार नाही कारण त्यापलीकडे जाऊन आपण बरेच काही निश्चित करू शकतो.

अगदी सामान्य शहरी माणसांचा विचार केला तरी पुढील काही उपाय महत्वाचे ठरू शकतील;

१.      आपल्या घरातील, सोसायटीतील पाण्याची उधळपट्टी बंद करणे. पाण्याच्या मीटरचा वापर करून ठरविक लिटरचा रोज पुरवठा करणे.

२.      ड्रेनेज मधून वाया जाणाऱ्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा toilet साठी वापर करणे.

३.      फ्लश tank चे सेटिंग कमीत कमी पाण्यासाठी असावे. ज्यायोगे बेसिन, संडासात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी टाकले जाणार नाही.

४.      घरात आलेल्या नळावरील आपले परावलंबित्व दूर करायला हवे. त्यामुळे आपल्या हातून पाण्याची उधळपट्टी होणार नाही.

५.      आपल्या परिसरात जेवढी जास्त झाडे लावता येतील तशी लावावीत. सर्वांनी सामाईक पणे त्यांची जोपासना करावी. झाडांमध्ये केवळ शोभेची खुरटी झाडे लावू नयेत. तर आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या वेगाने जमिनीची धूप होणार नाही इतके झाडांचे आच्छादन पृथ्वीवर असले पाहिजे.

६.      अति कॉंक्रीटच्या मागे लागून घर, सोसायटीच्या परिसरातील जमीन नष्ट करु नये. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जमिनीचे, मातीचे असणे फार आवश्यक आहे. अन्यथा खाली पडलेले सर्व पाणी ड्रेनेज मध्ये जास्त जाते आणि निरुपयोगी बनते.

७.      आपल्या आजूबाजूचे रस्ते, मैदाने, टेकड्या, डोंगर यांच्यावर जेवढी जास्त झाडे लावता व वाढवता येतील तेवढे जास्त चांगले. डोंगरउतारावर चर खणून पाणी आणि मातीचे वाया जाणे थांबवले पाहिजे. जमिनीची धूप थांबवली पाहिजे.

८.      आपल्या परिसरातील विहिरी, लहान-मोठे तलाव, तळी, नदी, ओढे, नाले यांची नियमित स्वच्छता केली पाहिजे. त्यातला गाळ काढला पाहिजे. अनेकदा विहिरी व तलावात गाळ साचल्याने त्याखाली झरे बुजून जातात. आणि जलसाठा मृतवत होतो. पूर्वी गावातले सगळे पावसाळ्यापूर्वी एकत्र येऊन गाव-तळ्यातील गाळ काढत असंत. गावाच्या नदीची, घाटाची स्वच्छता करायचे. आता आपण एकतर फक्त सरकारवर विसंबून राहतो किंवा  सरकार काही करत नाही म्हणून तावातावाने भांडत राहतो...! हे चित्र बदलले पाहिजे.

९.      नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया होणे अत्यावश्यक बनले आहे. सर्व नद्यांची स्वच्छ पाण्याची क्षमता आता सांडपाण्यामुळे जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे त्याची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी. प्रत्येक घरात, सोसायटीत “सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा” असणे आता बंधनकारक करायला हवे. तसेच दरवर्षी यंत्रणेच्या कार्यक्षमतेची तपासणी झाली पाहिजे.

१०.  आपल्या गावातील नदी, तलाव यामध्ये प्रदूषणामुळे जलपर्णी वाढते. ती वेळोवेळी काढून टाकली पाहिजे.

११.  आपल्या परिसरातील नद्या, ओढे यांना जोडून आपण “लहान नदीजोड” निश्चितच करू शकतो. त्याचा खर्च कमी असेल आणि त्यामुळे जास्त भूभाग पाण्याखाली येऊ शकेल. याकामी सर्व नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे. ज्याला शक्य आहे त्याने आर्थिक आणि ज्याला शक्य आहे त्याने श्रमदानाची मदत करावी.

१२.  जिथे जिथे पाणी गळती, पाणी चोरी होत आहे त्याविरुद्ध पक्ष, संघटना आदि गोष्टी बाजूला ठेवून एकजुटीने विरोध केला पाहिजे. या अनधिकृत गोष्टींना आळा घातला पाहिजे

१३.   आपल्या राज्यात पोपटराव पवार, जलतज्ञ अरुण देशपांडे, अण्णा हजारे यांच्यासारखे शेकडो निरलस आणि पाणी बचतीसाठीचे मार्गदर्शन करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांना सन्मानाने वागवून त्यांचे सल्ले अंमलात आणले पाहिजेत.

१४.  ऐतिहासिक जुन्या विहिरी, तलाव यांना बुजवून नष्ट न करता त्यातील गाळ काढून झरे पुन्हा जिवंत करायला हवेत.

१५.  जिथे जिथे बोअर (कुपनलिका) मारून पाणी मिळवले जाते. तिथे जास्तीत जास्त खोल बोअर मारण्यावर सगळ्यांचा भर असतो. पण यामुळे भूगर्भातील पाणीसाठा मात्र झपाट्याने कमी होतो. कालांतराने संपून जातो. त्यामुळे जिथे बोअर मारायचे असतील, तिथं पाण्याचे पुनर्भरण होण्यासाठी उपाय केले पाहिजेत.
याचबरोबर शेतकरी बंधूनी कमीत कमी पाणी लागेल अशा पद्धतीने पीकपद्धत विकसित करायला हवी. ठिबक सिंचन सारख्या योजना वापरायला हव्यात. ऊसशेतीत वाया जाणारे जास्तीचे पाणी कमी करायला हवे. जेंव्हा सर्व बाजूने असे चौफेर प्रयत्न होतील तेंव्हा आपल्याला पुढच्या काही वर्षात पुरेसे पाणी वापरायला मिळू शकेल.
तसेच मीडियामधून जास्त प्रमाणात जन-जागृती झाली पाहिजे. पाऊस पडत नाही म्हणून “उदास शेतकऱ्यांचे” फुटेज दाखवणारे थोर च्यानलवाले, जरा पाउस झाला की लगेच धबधब्यात भिजत गोंधळ घालणाऱ्या तरुणाईची चित्रे दाखवून लागतात. त्यांनी किमान हे पाऊस-पाणी कसे साठवावे याविषयी अधिकाधिक कार्यक्रम दाखवणे गरजेचे आहे.

शेवटी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार. हे काही आकाशातून पडलेले नाही. तुमच्या-आमच्यातील माणसे आपणच तिथे बसवली आहेत. मात्र आपल्या परिसरात जेंव्हा ते चुकीची कामे करतात तेंव्हा त्यांच्या दडपशाहीला न जुमानता आपण सर्वांनी एकजुटीने त्यांना विरोध केला पाहिजे. जेंव्हा एखाद्या गावाजवळ एखादे चुकीचे धरण बांधले जात असते, तेंव्हा विरोध हा व्हायला हवा पण तो विज्ञानावर, तंत्रज्ञानावर आधारित असावा. त्या कामाला चुकीच्या पद्धतीने न करता चांगल्या पद्धतीने कसे करता येईल हे सांगणारा विरोध हवा. तात्पुरत्या किंवा फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जे लोक विरोध करतात त्यांनाही दूर ठेवून चांगल्या सरकारी कार्याला आपणही मदत करायला हवी. देश आणि धर्मासाठी सामान्यतः बलिदान करावेच लागते. कधी ते आयुष्याच्या रुपात, कधी आर्थिक रुपात तर कधी आपली जमीन देऊनसुद्धा करावे लागते. आपण ते केले पाहिजे.


 “धोंडी धोंडी पाणी दे”, “पानी पानी रे..” असं केविलवाणेपणाने आक्रोश वेळ आपल्यावर पुनःपुन्हा येऊ नये म्हणून आपण सगळे असे सकारात्मक विचाराने आणि एकजुटीने कामाला लागूया. मग निसर्गसुद्धा आपल्याला निश्चित साथ देईल आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपल्याला काही आश्वासक असं मागे ठेवता येईल हे नक्की..!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)