marathi blog vishwa

Tuesday 20 June 2017

हिरण्यकेशीच्या तीरावर रुजलेली मराठी शाळा..



आज महाराष्ट्रात देखील मराठी शाळा चालवणे अवघड झाले असताना, सीमाभागात संकेश्वर येथे एक मराठी शाळा गेली काही वर्षे सुरु आहे. ती शाळा सुरु राहावी यासाठी संस्थेमार्फत जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून त्यांचे मनापासून कौतुक करावसं वाटतं. गरीब मुलांसाठी शिक्षण मिळावे, मुलांसोबत मुलींनीही शिकावे यासाठी संस्था सतत प्रयत्नशील आहे. त्यांचं काम पाहायला तुम्ही नक्की जायला हवं, त्यांच्या कामात आपला खारीचा वाटा उचलायला हवा...

संकेश्वर. महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील एक बहुपरिचित गाव. गावाची जीवनदायिनी हिरण्यकेशी नदीकाठी शंकराचार्यांचा प्राचीन मठ आणि गावाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असा ऐतिहासिक वल्लभगड यांनी गावाचं प्राचीनत्व अधोरेखित केलेलं. संकेश्वरी मिरचीचा ठसका चुकून काहीजणांनी अनुभवला नसलाच तरी हे नाव नक्कीच माहितीचं.

एकेकाळी मराठी बोलणारं, शिकणारं गाव राज्यनिर्मितीत कर्नाटकात गेलं तरी मराठी माणसांचे ऋणानुबंध टिकून राहिले. आणि त्यातूनच होणारे मराठी शाळेसाठीचे प्रयत्नही. सध्या महाराष्ट्रातही जेंव्हा मराठी शाळा झपाट्याने सर्वत्र बंद पडत चालल्याहेत तेंव्हा महाराष्ट्राबाहेर मराठी शाळा सुरु करणे, ती कार्यरत ठेवणे ही किती कठीण गोष्ट आहे याची सर्वानाच कल्पना येऊ शकेल. त्यामुळेच संकेश्वरमध्ये हिरण्यकेशी नदीच्या तीरावर रुजलेल्या एका मराठी शाळेचं जिवंत राहणं ही कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट ठरते. हे कष्टप्रद काम साकारलंय “हिरण्यकेशी शिक्षण मंडळ” या संस्थेने. गेल्या काही महिन्यांपासून संस्थेच्या पदाधिकारी मंडळींशी संपर्क आला आणि त्यांची तळमळ, मुलांनी मराठी शिकावं यासाठीचे सतत सुरु असलेले प्रयत्न या सगळ्याने भारावून गेलो.

२००३ मध्ये या संस्थेची स्थापना झाली, २००५ पासून गेली १२ बर्षे “विद्यानिकेतन” ही शाळा अनंत अडचणीवर मात करत अखंड सुरु आहे. संकेश्वर मधील जोशी कुटुंबीयांनी त्यांचा राहता “जोशी वाडा” संस्थेच्या शाळेसाठी दिला यामुळेच जागेची मोठी अडचण दूर झाली आणि शाळा सुरु राहू शकली. आज फक्त लोकांच्या सहकार्याच्या जोरावर हे विद्यादान सुरु आहे. मुलांच्या सहली, विविध उपक्रम यासाठी उत्तम संकल्पना इथे राबवल्या जातात. मुलांच्या शिक्षणासोबत कला-कौशल्यविकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी इथे जाणीवपूर्वक शिक्षक प्रयत्न करतात

इथल्या शिक्षकांनी त्यांची कौटुंबिक परिस्थिती, वैयक्तिक अडचणी या सर्वांवर मात करत शाळेच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे तेही कमी पगाराची नोकरी असून! जेंव्हा आपण लहानशी मदत करून मोठ्या गप्पा मारतो तेंव्हा कोणत्याही प्रकारे स्वतःच्या कामाविषयी, त्यागाविषयी न बोलणारे इथले शिक्षक व कर्मचारी आपल्याला अंतर्मुख करतात.


संस्थेचे संस्थापक गिरीश कुलकर्णी हे स्वतः मेक्यानिकल इंजिनीअर आहेत आणि तरीही अन्यत्र मिळणारी भल्या मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता आपल्या परिसरातील मुलांच्या शिक्षण विकासासाठी गावात राहून धडपडताहेत. त्यांना त्यांच्या कार्यात उच्चविद्याविभूषित पत्नी अरुणाताई यांनीही मोलाचा हातभार लावला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी अरुणाताईचं एक खास नातं आहे. 
या दोघांबरोबरच अन्य संचालक मंडळ, शिक्षक हे सारेच एकदिलाने वाटचाल करत आहेत. आज शाळेचं स्वरूप लहान आहे मात्र जर आर्थिक पाठबळ मिळालं तर यांच्या स्वप्नातील अनेक उपक्रमांना इथे मूर्तरूप मिळू शकेल. मुलांसाठी अनेक सोयीसुविधा मिळू शकतील आणि मुख्य म्हणजे एक मराठी शाळा सीमाभागात पाय रोवून अजून पुढची कित्येक वर्षं सुरु राहील. 

इथे येणारी कित्येक मुलं जवळच्या गावातून एसटीने येतात. अगदी पहिलीची सुद्धा..! पुण्या-मुंबईपासून सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर आदि अनेक शहरात हल्ली शाळेच्या बस येतात, मुलांची ने-आण करतात. तरीही आई-बाप, त्यांची मुलं येण्याच्या/ जाण्याच्या वेळी घामाघूम झालेले असतात. अशावेळी या शाळेत सहज येणारी मुलं, त्यांनी बस स्थानकापासून शाळेपर्यंत रस्त्याच्या कडेने केलेली शांत व शिस्तबद्ध पायपीट, एकमेकाला सांभाळून एकत्र येणं हे सारं  पाहून या शाळेतून त्यांना कसं शिक्षण मिळतंय याचाच धडा पाहायला मिळतो. 


बहुतांश मुलं ही गरीब घरातील आहेत. काहीजणांना फी देखील पूर्ण भरता येत नाही. शाळेसाठी धडपडणारे शिक्षक व कर्मचार्यांना पगार वेळेवर मिळावा म्हणून करावी लागणारी धावपळ, त्यातच कर्नाटक प्रशासनाच्या विविध अटी, गरजा यांची पूर्तता करण्याचे टेन्शन. हे सगळं सांभाळून ही शाळा चालवणे आणि मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवणे म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत आहे. केवळ आणि केवळ “मुलांनी मराठीतून उत्तम शिक्षण घ्यावे” याच उद्देशाने संचालक हे कार्य करताहेत ते पाहून त्यांना सलाम करावासा वाटतो.

आज अनेकांनी अनेक प्रकारे संस्थेला मदत करायची गरज आहे. ही संस्था आयकर विभागाद्वारे 80-G अंतर्गत नोंदली गेली आहे त्यामुळे जर आर्थिक मदत केली तर तुम्हाला आयकरात सूट मिळू शकते. आज संस्थेला दर महिन्याच्या खर्चाबरोबरच अनेक गोष्टींची कमतरता आहे, आर्थिक मदत हवीच आहे, तरीही इथे शिक्षणाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. प्रसंगी संचालक स्वतःच्या खिशातून संस्थेसाठी पैसा खर्च करतात पण मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी सर्व काही उपलब्ध करून देतात. शाळेच्या माध्यमातून दुर्गम भागातील मुलांसाठी ते कार्यरत आहेतच मात्र त्यांच्यासाठी मित्रत्वाचा हात पुढे करणं हे आपलंसुद्धा कर्तव्य नाही का?

मित्रहो, म्हणूनच यापुढे जेंव्हा तुम्ही कोल्हापूरहून पुढे बेळगाव किंवा बंगळूरच्या दिशेने जाल तेंव्हा एक-दोन तास वेळ काढून नक्की या शाळेला भेट द्या. तिथल्या मुलांशी-शिक्षकांशी संवाद साधा, संचालकांना भेटा. ते लढत आहेतच, फक्त कुसुमाग्रज म्हणाले तसं पाठीवर तुमचा आश्वासक हात ठेवून लढ म्हणा.. त्यांच्या कार्यात जमेल तशी मदत करून आपलाही खारीचा वाटा द्या एवढंच हक्काचं मागणं..!

-            -  सुधांशु नाईक. (९८३३२९९७९१, nsudha19@gmail.com) 
    कोल्हापूर.
------------------------
संस्थेशी संपर्क करण्यासाठी पत्ता;
गिरीश कुलकर्णी,संस्थापक, हिरण्यकेशी शिक्षण मंडळ, गांधी चौक, संकेश्वर.
मोबाईल:- +91 9448989945 / +91 861-8298673
---------------------------------