marathi blog vishwa

Thursday 24 October 2013

एक विचार सतावणारा ...

 काही माणसे तशी तुमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग झालेली असतात. अनेकदा त्यांना त्यांचे म्हणून काही वेगळे अस्तित्व आहे हेही समजत नाही. ही माणसे आपल्यासारखीच सामान्य असतात, पण अचानक कधीतरी जाणवते की तरीही त्यांनी स्वतःचा एक अमीट ठसा आपल्या मनावर कायमचा उमटवून ठेवला आहे...

दत्तात्रय शिगवण त्यातलेच एक. लीलाचा नवरा ही त्यांची पहिली ओळख. लीला आणि तिची आई लक्ष्मी घरोघरी भांडी-कपडे धुणी करायच्या. चिपळुणात एका चाळीत आम्ही राहात होतो तिथेच मग लीला आमच्याकडे काम करू लागली तेंव्हा मी दुसरी तिसरीत असेन. तिथून पुढे किमान वीसेक वर्षं ती आमच्याकडे काम करत राहिली. आम्हा दोघा भावंडाना बहिण नाही म्हणून तिची मुलगी अनेक वर्षे आम्हाला राखी बांधत राहिली.
जेंव्हा सुटीत आम्ही आईबरोबर मामाच्या गावाला, नातेवाईकांकडे जात असू तेंव्हा लीला किंवा लक्ष्मी बाबांसाठी स्वैपाक करून नीट झाकून ठेवून जात. घराची किल्लीही त्यांच्याकडेच असायची. कामही इतके नेटके की कुणाला वाटणारही नाही की हे परके आहेत. आम्ही ब्राह्मण व ते इतर जातीतले असे व अन्य कुठले अडथळे या आपुलकीच्या नात्यांमध्ये कधी आलेच नाहीत. सुरुवातीला एक जाणवे की लीला आईबरोबर काम करता करता गप्पा मारत असे. अधून मधून डोळे पुसत राही. आई तिची समजूत काढत असे. घरातलं अन्न कधी मध्ये देत असे. एखादी जुनी साडी, वस्तूही दिली जाई.
जरा मोठा झाल्यावर कळू लागले की लीलाचा नवरा दारू पितो. कधी मध्ये तिला मारतोही. तिला आधी फक्त मुली झालेल्या. आणि मुलगा हवा म्हणून त्याचा त्रास होतोय असंही कळलेले. त्यात तो नवरा लीलाच्या घरी राहतो, म्हणजे घरजावई आहे हे समजले. पण तरीही लीलाचे त्याच्यावर प्रेम आहे याचा उलगडा त्या लहान वयात होत नसे. मुलींसाठी पैसे शिल्लक राहावेत, नुसते दारूत खर्च होऊ नयेत म्हणून आपल्या कामाच्या झालेल्या पैशातली काही रक्कम मग ती बाबांकडे देई. बाबांनी तिच्या नावे पोस्टात बचत खाते उघडून दिलेले. हे तिच्या नवऱ्याला कित्येक वर्षं बहुदा माहित नव्हते. ती नवऱ्याला घेऊन कधी घरी येऊन जाई. आम्ही त्याना तेंव्हापासून “शिगवण” म्हणूनच बोलावू लागलो. खरं तर शिगवण एक चांगला पेंटर. घरं, दुकानं रंगवायची कामे घेत. पण सगळा लहरी कारभार. निम्मा दारूने कब्जात घेतलेला. तरी ते आमचेही घर रंगवायचे काम करू लागले. ती चाळ सोडून आम्ही मग अन्य दुसऱ्या घरांत गेलो, नंतर स्वतःच्या घरात गेलो तिथेही रंगकामाचे कार्य शिगवणच करू लागले.

 
लीलाची तब्येत म्हणजे अगदी तोळामासा. त्यात तिला कायम दम्याचा त्रास. तरीही अगदी हडकुळा असा देह बिचारा प्रामाणिकपणे राबराब राबायचा. पुढे मग तिला दोन मुलगे झाले आणि मग सगळं घर आनंदी झालं. पण ही मुलं वाढवायची तर पैसे तर हवेतच ना. त्यामुळे कष्टाला काही कमी नव्हतीच. म्हातारी लक्ष्मीही राबायची. नंतर लीलाच्या मुलीही मदत करू लागल्या.
आता नक्की आठवत नाही पण बऱ्याच वर्षापूर्वी, बहुदा एका मोठ्या आजारपणानंतर शिगवणांनी दारू सोडली. अगदी चक्क पूर्ण बंद केली..! जणू ते अंतर्बाह्य बदललेच. मग भरपूर कामही मिळू लागले. आमचे घर तर ते रंगवत होतेच पण आमच्या परिचितांपैकी अनेकांची घरे तेच रंगवायचे, इतर मोठी कामे वर्षानुवर्षे करत राहिले. मग जरा त्यांचे घर स्थिरावले.
एकदिवस म्हातारी लक्ष्मी शांतपणे मरून गेली. लीलाचा संसार खऱ्या अर्थी फक्त तिचा राहिला. पुढे मुलं मोठी झाली. कुणी रिक्षा चालवू लागला. कुणी काही बाही कामे करू लागला. घर कमाई थोडी थोडी वाढू लागली. अडी अडचणीला कुणी न कुणी मदत करत होतेच. पण दुर्दैव मात्र लीलाच्या मागे कायमचे हात धुवून लागलेले. दोन्ही मुलींची लग्न झाली. पण एका मुलीच्या लग्नानंतर काही दिवसात जावयाचा अपघाती मृत्यू झाला. ती पुन्हा घरी परतली उध्वस्त होऊन... पुढे मग लीला थकली. तिचे बाहेर काम करणेही बऱ्यापैकी थांबलेच. मात्र शिगवण भरपूर काम करत होते.
मी “पोटासाठी भटकत...” वेगवेगळ्या गावात जात राहिलो, तिथेही ते येत राहिले. घर रंगवत राहिले. आमच्या बरोबर पंक्तीत बसून जेवले. सामान शिफ्टिंग साठी मदत करत राहिले. परदेशात आमच्याकडे आले नाहीत इतकंच. मात्र चिपळुणातील घरात अनेक छोटी मोठी कामे, दुरुस्ती करत राहिले. गावोगावी आमच्या नातलगांकडे, परिचितांकडेही काम करत राहिले. घरी कुणी नसले, आम्ही सगळे भटकंतीला गेलो तरी घराची किल्ली त्यांच्याकडे असे. अधून मधून येऊन जात. साफसफाई करून जात असंत. सगळं कुटुंबच असं विश्वासू...!
वर्षातून कधी मध्ये जेंव्हा घरी जाई तेंव्हा हमखास भेटायला येत. “शेठ, कसे आहात? सगली मंडळी बरी हायेत नां?” असं त्यांच्या नेहमीच्या हसतमुख ष्ट्यायलीत विचारत..! चहा घेत. गप्पा मारत बसून राहात. गणपतीत जेंव्हा मी चिपळुणात येई, तेंव्हा हमखास त्यांच्या घरी जाऊन येत असे. नुकतीच त्यांच्या मुलांची लग्न झालेली. घरात एक लीलाचं आजारपण सोडलं तर सगळं ठीकठाक झालेलं.
 
गेल्या वर्षी बहरीनमध्ये होतो. गणपतीच्या वेळी घरी जाता आले नाही. एक दिवस अचानक खबर मिळाली, “ लीलाचा तरुण मुलगा सकाळी तोंड धुताधुता कोसळला, “हार्ट फेल” आणि गेलासुद्धा..!” फार वाईट वाटले. थकलेल्या, आजारपणाला कंटाळलेल्या लीलाच्या मनाला मुलाचा असा मृत्यू पाहून किती यातना झाल्या असतील? कल्पनाच करवत नाही..! कोणत्याही आईबापासाठी हा सर्वात यातनामय क्षण..! पण करावे काय ?
यंदा घरी गेलो आणि कळाले की शिगवण आजारी आहेत. घशात गाठ झाल्यामुळे दवाखान्याच्या चकरा सुरु आहेत. नीट जेवता येत नाहीये. साधारण कल्पना आली. आम्ही भेटायला गेलो. घरात गणपती असूनही घरावरची उदासकळा लपत नव्हती.
“काय शिगवण, काय झालंय? तब्येत बरी नाही वाटतं?” मी आपलं उगाच वेड पांघरलं.
“जरा घशात गाठ झालीवती. घाणेकराकडे जाऊन काढली. आता त्याची कसलीशी टेस्ट करतायत. रिपोर्ट आल्यावर कळेल. त्यात ही महागाई. गेल्यावर्षी चांगला धडधाकट मुलगा अचानक गेला. आता काय करावं काय कळत नाही. पण सगळं चालवायला तर हवेच ना..बसून कसं चालेल ? त्यात हिचं आजारपण तर तुम्हाला म्हायतीच आहे.”
मला जास्त काय बोलावं कळेचना. सोबत काही रक्कम घेऊनच गेलो होतो. त्यांच्या हातात ठेवली. त्यांचे डोळे भरून आले.
“एक मुलगा गेला म्हणून उदास होणं साहजिक आहे. पण आम्हीही तुम्हाला मुलासारखेच. उपचारात हलगर्जी करू नका. जे लागेल ते सांगा...” यापुढे मला बोलवलं नाही.. भरल्या गळ्याने आणि जड पावलाने पट्कन उठून तिथून निघून आलो. त्यांचे उपचार, केमोथेरपी सगळं सुरु असल्याचं बाबांनी कळवलंय.
 
माणसे आपल्या आपल्या व्यापात गुंतत असतात. पण मन मात्र कुठेतरी अन्यत्र गुंतलेलं असतं. भरपूर काम करत असताना मलाही एकच विचार विलक्षण सतावतोय...
पुढच्या वर्षी भारतात येईन तेंव्हा लीला आणि शिगवण पुन्हा भेटतील??
n   सुधांशु नाईक, क़तार (nsudha19@gmail.com)
 

Sunday 13 October 2013

प्रेम म्हणजे...


लोकं म्हणतात “ माझं तुझ्यावर प्रेम आहे..असं सांगावं लागतं..”

मी मात्र म्हणतो, सगळं विश्वच तर प्रेममय असतं..!

प्रेम म्हणजे भल्या पहाटे आईनं करून दिलेली भाजी भाकरी असतं,

थकून झोपलेल्या मुलाच्या कपाळावरून फिरलेला बापाचा हात असतं...

प्रेम म्हणजे इवल्याश्या बाळाने घेतलेला पापा असतं,

हात चाटताना गायीची ओलसर खरखरीत जीभ असतं...

तिच्या मिठीत घुसमटत जाणे म्हणजेही प्रेम असतं,

कातरवेळी जिवलगाची वाट पहात तेही दारात उभं असतं...

प्रेम म्हणजे कुटुंबाला दोन घास मिळावे म्हणून राबणारा हमाल असतं,

उरलेली अर्धी भाकरी दुसऱ्याला वाढून आपण उपाशी राहात असतं...

प्रेम म्हणजे सांत्वनाचा धीरोदात्त स्पर्श असतं,

खूप दिवसांनी भेटल्यावर गळ्यात पडलेला मित्र असतं...

प्रेम म्हणजे गोधडीत झोपून ऐकलेली आजीची गोष्ट असतं,

तर कधी भल्या पहाटे उठून डोंगरातून केलेली भटकंती असतं..

प्रेम म्हणजे सुनसान एकाकी रस्त्यावर मिळालेली लिफ्ट असतं...

तहानलेल्या पांथस्थाला दिलेलं ओंजळभर पाणी असतं...

प्रेम जसं बहिणीनं बांधलेली राखी असतं

तसं सोनं म्हणून दिलेलं आपट्याचं पान असतं...!
 
 
“शुभ विजयादशमी”

n     सुधांशु नाईक, क़तार (nsudha19@gmail.com)