marathi blog vishwa

Sunday 26 February 2023

हे सावरकर कायमच लक्षात ठेवायला हवेत!

हे सावरकर कायमच लक्षात ठेवायला हवेत! 
- सुधांशु नाईक.
" सहज सुचलेलं " या लेखमालेतील हा आठवा लेख.
 26 फेब्रुवारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन. आपलं अवघे आयुष्य ज्यांनी देशहितासाठी झिजवलं त्यांना सादर प्रणाम. सावरकरांनी अफाट क्रांतिकार्य तर केलंच मात्र तितक्याच नव्हे तर त्यापेक्षा जास्त तळमळीने सामाजिक सुधारणांचा आग्रह धरला. कर्मठ ब्राह्मणांचे गाव असं मानल्या गेलेल्या रत्नागिरीसारख्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्यता मिटवण्यासाठी 1925 नंतर अथक प्रयत्न केले. अनेकांनी टिंगल केली, निंदा केली पण सावरकर शांतपणे आपलं कार्य अधिक जोमाने करत राहिले. लेखक आणि कवी म्हणून सावरकर थोर आहेतच. मात्र समाजासाठी अत्यन्त आवश्यक असे त्यांचं पुस्तक म्हणजे " विज्ञाननिष्ठ निबंध ".

त्याकाळी किर्लोस्कर - मनोहर आदि मासिकातून त्यांनी जे लेखन केलं, जे पुरोगामी विचार मांडले ते आजही आचरणात आणताना आपल्याला झेपतील का असंच वाटतं. मात्र नेहमीच भविष्याचा वेध घेणारे सावरकर त्याचा पाठपुरावा करत राहिले..

 एका ठिकाणी ते स्वतः म्हणतात, " यापुढे क्रांतिकारी सावरकर जरी तुम्ही विसरून गेलात तरी चालेल मात्र सुधारक सावरकर विसरू नका."

क्रांतिकारक सावरकर, विदेशी कपड्यांची पहिली होळी करणारे सावरकर, मदनलाल धिंग्रा- अनंत कान्हेरे- सेनापती बापट आदि वीरांना सदैव मार्गदर्शक असेल सावरकर, सागरा प्राण तळमळला सारख अजरामर काव्य लिहिणारे सावरकर, बोटीतून उडी मारून सुटकेची धडपड करणारे सावरकर, दोन जन्मठेपेची सजा होऊनही अंदमानच्या कारागृहात सुधारणा करू पाहणारे सावरकर... अशी त्यांची विविध रूपं आपल्याला माहिती असतात. मात्र समाज सुधारक सावरकर याकडे आपलं तुलनेने दुर्लक्ष होतं. हे पुस्तक खास " समाज सुधारक सावरकर " यांचं आहे. 
आपला समाज प्रगत व्हावा, भारतीय म्हणून हिंदू म्हणून एकजुटीने उभा राहावा आणि विज्ञानयुगाची कास धरून जगात अग्रगण्य व्हावा ही त्यांची तळमळ. त्यासाठीच 1925 नंतर त्यांनी किर्लोस्कर, मनोहर आदि मासिकातून जे विज्ञाननिष्ठ लेखन केलं ते आजही अनुकरण करावं असंच आहे. मात्र ते इतकं धगधगीत तेजस्वी आहे की आपल्याला पचवणे अजूनही जड जाते.
हिंदुत्वाचा आग्रह धरणारे सावरकर, आपल्या रूढी, अंधश्रद्धा, धर्मभोळेपणा यावर इतका कडाडून आघात करतात की परधार्मिय व्यक्ती देखील इतकं कठोर बोलणार नाही.
गाय हा एक उपयुक्त पशु आहे हे त्यांचं वाक्य " गोपालन हवे, गोपूजन नव्हे" या लेखातलं. तो या पुस्तकातच आहे. गायीचं दूध, शेण, चर्म यांचा अवश्य वापर करावा, त्यासाठीच अधिकाधिक गोपालन करा. त्यानिमित्ताने अनेकांना लाभ होईल मात्र गोपूजनाचा अतिरेक करू नका असं ते सांगतात. गाय असो की आपली यज्ञसंस्था यांच्याकडे उपयुक्तता म्हणून पहा, त्याचं आवडम्बर माजवू नका असं सांगतात.

" दोन शब्दांत दोन संस्कृती " हा त्यांचा लेख तर सदैव सर्वांनी वाचावा असा. अद्ययावत या शब्दाची गरज आणि श्रुतीस्मृतिपुराणोक्त या शब्दाला टाकून देणे याची गरज ते परखडपणे व्यक्त करतात.
विज्ञानाची कास धरली म्हणूनच आज पाश्चिमात्य राष्ट्रे बलवान झाली. आपले ग्रंथ, आधीच्या लोकांनी लावलेले शोध याचं अंधानुकारण न करता त्यांनी त्यावर पुन्हा पुन्हा संशोधन केलं, त्यात योग्य तेवढं घेतलं नको वाटलं ते वगळून नवीन त्यात वाढवलं. त्यामुळे ते अद्ययावत बनले. आपल्याला असं व्हायला हवंय. उत्तम वस्तू, उत्तम यंत्रे, उत्तम बंदूका, उत्तम विमाने, उत्तम बसगाड्या, उत्तम रेल्वे असं विज्ञानाच्या बळावर आपण बनवलं पाहिजे. यंत्रांची कास धरा, जुन्या पोथ्या पुराणांना कवटाळत बसू नका असं पोटतिडिकीने ते सांगत राहिले.

" ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय?" या लेखात धर्मभोळेपणाच्या कल्पनांवर आघात करताना ते म्हणतात, " सामर्थ्य आहे चळवळीचे.. " असं समर्थ रामदास सांगून गेले. मराठ्यांनी ते आचरलं म्हणून 1600 ते 1800 या दोन वर्षात इतिहास बदलला. कारण मराठ्यांनी आपलं सामर्थ्य विकसित केलं. 
त्यापूर्वी अनेक पूजा, अनेक यज्ञ करत असूनही परकीय आक्रमकांनी आपलं आयुष्य मुळासकट उध्वस्त केलं. कोणताही देव तिथं मदतीला आला नाही. त्यामुळे धर्मभोळेपणा टाकून द्या, बळवंत व्हा, जे जे नवीन ते ते आत्मसात करा. जुन्या काळात जे लोक जगले ते त्यांनी त्या काळशी सुसंगत असं सगळं केलं होतं. ते सगळं एका भव्य युगाचा इतिहास म्हणून अवश्य अभ्यासावं मात्र त्याचं अंधानुकारण करू नका. वेद हे कुणा ऋषींना स्फुरले, विविध उपनिषदे, ग्रंथ त्या त्या काळाची निर्मिती होती आता तुम्ही तुमचा इतिहास घडवा असं रोखठोक सांगत राहिले.

अस्पृश्यता निवारण करण्यासाठी सर्व जातीतील लोकांचे सहभोजन करा , रूढी बंदी करत नवीन रूढी निर्माण करा , बेटीबंदी नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह करा, सिंधुबंदी मोडीत काढत जगभर जा, नवं शिकून देश समृद्ध करा असं सांगत राहिले. 
हिंदू समाज खूप सारा निद्रिस्त असतो. सगळं काही देव करेल या विचारात भ्रमित असतो त्याचाच फायदा आजवर मुस्लिम, ख्रिश्चन आक्रमक देशांनी घेतला. यापुढे असं होऊ देऊ नका. एकजुटीने उभे रहा. आपला धर्म आणि आपला देश जगात उच्चस्थानी हवा असेल तर आपल्यात जे जे चुकीचं आहे ते ते काढून टाकायला हवं. विज्ञानाची कास धरून नवं सगळं प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करायला हवं. या भावनेने ते प्रसंगी कठोर आणि परखड बोलत राहिले.

" मनुस्मृतीमध्यें " न स्त्रिस्वातंत्र्यम अर्हति " असं म्हटलं आहे यावर आपण सतत टीका करतो. मात्र त्याच ग्रंथात " यत्र नारयस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता" असंही म्हटलंय. आपण स्त्रियांना अधिक चांगलं वागवलं पाहिजे. त्यांना समाजात समानतेने सर्वत्र कार्यरत व्हायला प्रोत्साहन दिले पाहिजे. जसं परदेशी लोकांच्यात स्त्रियांवरील निर्बंध आता हटवले गेले, अगदी सैन्यातही स्त्रिया लढताहेत ते आपण करायला हवं... " असं सावरकर 1930/40 च्या सुमारास सांगत होते हे पाहून थक्क व्हायला होतं.
खरतर त्यांना आधीच लोकांनी देवत्व दिलं होतं. लोकांना गोड वाटतील अशी भाषणे, लेखन करून ते आयुष्यभर लोकप्रिय राहिले असतेच. मात्र लोकांचा अनुनय करण्यापेक्षा सतत देशहित त्यांच्या नजरेसमोर होतं, त्याला प्राधान्य होतं.  
 तरीही कित्येक वर्षं आपण त्यांचे विचार बाजूला ठेवले. नेहमीच आपल्याकडे सावरकरांची अवहेलना होत राहिली. आज नवीन टेक्नॉलॉजीमध्यें, संरक्षण क्षेत्रात, नौदल, हवाई दलात भारताने जी मुसंडी मारली आहे ते पाहायला सावरकर असते तर त्यांना नक्कीच कृतकृत्य वाटत राहिलं असतं असं वाटतं. सावरकरांच्या सारख्या व्यक्तिमत्वाला नुसते जयजयकार नको असतात ते देशहितासाठी केलेल्या प्रत्यक्ष कृती हव्या असतात. आपण ही आपला देश बलवान व्हावा यासाठी काहीतरी सतत करत राहू हीच त्यांना खरी आदरांजली असेल. 
या तेजस्वी व्यक्तिमत्वाला पुन्हा एकदा सादर प्रणाम.

- सुधांशु नाईक, 9833299791🌿
( छ. शिवाजी महाराज, भगवान श्रीकृष्ण, स्वा. सावरकर,यांच्या विविध पैलूविषयी अधिक माहिती देणारी व्याख्याने मी नेहमीच देत आलोय. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात कुठेही बोलवलं तर अवश्य येईनच. ) 
#सहज #सुचलेलं

Saturday 25 February 2023

रोज सकाळी ऐकत बसावी अशी.. सहेली तोडी

रोज सकाळी ऐकत बसावी अशी सहेली तोडी...
- सुधांशु नाईक
सहज सुचलेलं मालिकेतील हा पुढचा लेख कुमारजी यांनी निर्मिलेल्या सहेली तोडी बद्दल.!

सहेली तोडी. पं कुमार गंधर्व यांनी निर्मिलेल्या राग तोडीच्या एका प्रकाराचे लडीवाळ असं हे नाव.
लक्ष्मी तोडी, बहादुरी तोडी, खट तोडी, गुजरी तोडी, मियाँ की तोडी, बिलासखानी तोडी, लाचारी तोडी असे आधीच तोडी रागाची विविध रूपं. मात्र कुमारजी ज्या अलवार पणे सहेली तोडी पेश करतात. ते फार मधुर, मुलायम आहे.

खालच्या कोमल धैवतावरून रिषभ गंधाराला हलकेच स्पर्श करत जेंव्हा कुमारजी " काs हे रे s जगा..sss " म्हणत षडजावर शान्तपणे स्थिरवतात तेंव्हा मनात प्रसन्नता उचम्बळून येते. अतिशय शान्त, लोभस वातावरण निर्माण करणारी ही बंदिश. तसंच अंतरा घेताना " बतै दे हॊ री... " म्हणत जेंव्हा ते वरचा षडज लावत समेवर येतात तेंव्हा अख्खी मैफलाच जणू समेवर येते. उल्हास, आनंदाची उधळण करत!

कुमारजीच्या कडे पंढरीनाथ कोल्हापुरे तेंव्हा देवासला शिकायला येत. त्यांनी या बंदिशीच्या निर्मितीची छान कथा नोंदवून ठेवलीये. त्याचा सारांश साधारण असा,

आजारपणानंतर कुमारजी आणि पत्नी भानुमती हे आसपास फेरफटका मारायला जात. ग्रामीण जीवन आसपास. तिथं शेतात किंवा रानात कामं करणाऱ्या स्त्रिया माळवी लोकगीते गुणगुणत. कधी कधी पंढरीनाथ देखील जायचे. त्या लोकगीतांची नोटेशन्स केली जात. आणि सृजनशील कुमारजीना मग त्यातूनच एखादा राग सामोरा येई.
सहेली तोडी चे सूर असेच सुचलेले. पण बंदिश म्हणून बोल सुचत नव्हते. दिवसभर भानुमती कुमारांची शुश्रुषा, त्यांची नोकरी, हे असं नोटेशन घेत हिंडणे यामुळे थकून जात. आणि सकाळी लवकर उठवत नसे त्यांना. एके दिवशी जेंव्हा या रागाचे स्वर सापडले, तेंव्हा कुमारजी त्यांच्या कानाशी जाऊन गुणगुणु लागले. त्यांना खरतर झोपायचं होतं. सतत कानावर पडणारी मालवी भाषा. त्या पटकन म्हणून गेल्या, " काहे रे जगावा.. सोने दे रे... "

आणि चकित झालेल्या कुमारजींना मग बंदिशीचा मुखडा मिळाला. अर्धवट झोपेत त्यांच्या उमटलेले हे बोल बंदिशीच्या रूपाने चिरंतन बनले.! एकतालातील या बंदिशीला मग त्यांनी " चंदा सा.. मुख बन डारा.. " असा जोड ही तयार केला. कुमार गायकीचे जे चाहते आहेत त्यांना कधीच ही बंदिश विसरता येणार नाही.
पंढरीनाथ कोल्हापुरे यांनी अजून एक गोष्ट सांगितली. ती ऐकून तर अंगावर काटा आलेला..
ते म्हणाले, जेंव्हा मी देवासहून पुन्हा मुंबईला आलो. देवधर मास्तरांकडे शिकायचो मी तेंव्हा. त्यांनी मग चौकशी केली, कुमारचीं. मी म्हटलं एक नवीन तोडी बनवलाय कुमारांनी. कुमारजी बद्दल त्या दरम्यान ते थोडे नाराजच होते तेंव्हा.
 पण म्हणाले ऐकव बघू.
आणि मला जसं जमेल तसं मी हा सहेली तोडी ऐकवला. तर मास्तरांचे डोळे पाण्याने भरून आले. म्हणाले, इतक्या तोडी आहेत पण बिलासखानी तोडीत जो सलग एकजीनसी आनंद मिळतो तो कुठं मिळत नव्हता. इथं तो कुमारने दिलाय. त्यांनी पुनःपुन्हा काही वेळा ही तोडी माझ्याकडून ऐकून घेतली....

सहेली तोडी ऐकताना खरंच एक शान्तपणा आनंद आपल्याला वेढून टाकतो. स्वरांचं हे लोभस रूप आपलं जगणं समृद्ध करत राहतं...!
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
#सहज #सुचलेलं 

लिंक : https://youtu.be/htyAGXAuw5E

Tuesday 21 February 2023

मंदिरं आणि मी...

' सहजच सुचलेलं..' या लेखमालेतील हा सहावा लेख.
- सुधांशु नाईक.
मंदिरं आणि मी...
मित्रहो, मी तसा सश्रद्ध माणूस असलो तरी सतत किंवा रोज रोज मंदिरात जावं, नित्यनेमाने दर्शन घ्यावं असं अजिबात करत नाही. त्यातही जिथं अतोनात गर्दी असते ती मंदिरं, ते उत्सवी दिवस यावर तर शक्यतो फुलीच.
पण मंदिरं आवडतात मला.. कुणा डोंगर माथ्यावर एकटीच असलेली. एखाद्या नदीकाठी, तळ्याकाठी निवांत बसलेली. फारसं कुणी जिथं नसतं अशी मंदिरे... शक्यतो अशी मंदिरं शंकराचीच असतात. 
तिथं आसपास असतं एखादं पुजारी कुटुंब, नियमाने येणारे चार दोन भक्त, बाहेर घुटमळत असलेलं एखादं कुत्रं वगैरे... आवडतात अशी मंदिरं.
नदी, तळं जे काही असेल तिथं स्वच्छ पाय धुवून आत यावं. उगीचच मोठ्याने घंटानाद न करता हळूच घंटा वाजवावी, घंटेच्या त्या नादाने तिथल्या नीरव शांततेचा भंग न करता त्या शांततेला जणू एक सूर द्यावा इतक्याच मोठ्याने.
आपण आल्याचं फारसं कुणाला पडलेलं नसतं. जो तो आपल्या नादात संथ काही करत असतो. देवाला वंदन करावं.
मग गाभाऱ्यात किंवा मंडपात एखाद्या खांबाला, किंवा भिंतीला टेकून शान्त बसावं. आसपासच्या आवाजावर लक्ष केंद्रित करावं. कधी त्या नदीजवळ कुणी कपडे धूत असतं. त्याचा विशिष्ट आवाज येत असतो. झाडावरील एखादा कोतवाल, सुतार पक्षी, बुलबुल, मैना, रॉबिन, भारद्वाज, सनबर्ड आदि त्यांच्या विशिष्ट स्वरात किलबिलत असतात. अचानक कधी मलाबार व्हिसलिंग थ्रश, हॉर्नबील असंही कुणी बोलत असतं.
त्या सगळ्या परिसराशी आपल्या चित्तवृत्ती मग एकरूप होऊन जातात. मनातले सगळे तरंग शान्त शान्त होत राहतात. आणि मग प्रकर्षाने वाटतं, आता इथं महिम्न स्तोत्र म्हणायला हवं. दूर तिकडं खान्देशात तापी नदीच्या तीरावर प्रकाशा हे गाव.. तिथं ही सुरेखसं पुष्पदंतेश्वर मंदिर आहे. पुष्पदंताने प्राचीन काळी बहुदा तिथं रचलेले.

आणि मग, शान्त सुरात सुरवात करावी,

महिम्नः पारं ते परमविदुषो यद्यसदृशी
स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः

महिम्न ला स्वतःची अशी एक छान लय आहे. मी तसं अजिबात रोज वगैरे न म्हणणारा. पण लहानपणी बाबांचं ऐकून त्यांच्यासोबत म्हणून हे, सौरसूक्त, श्री सूक्त, रुद्र, मन्यू सूक्त आदी काही काही पाठ झालेलं. ते बहुतेकदा नीटसं आठवत राहतं.
महिम्न सम्पले की उठावं. पुजारी आसपास असलाच तर हातावर तीर्थ देतो. ते घेऊन बाहेर पडावं. तसंच मूकपणाने. एका वेगळ्याच शांततेने आपल्याला प्रसन्न केलेलं असतं, ते अनुभवत.
≈≈≈≈
देवळाची आठवण झाली की चिपळूणमधलं बालपण आठवते. पागेवर कृष्णेश्वरच्या देवळाजवळ चितळ्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायचो आम्ही. बालवाडीत असेन मी तेंव्हा. वासुदेव मायदेव, सदा चितळे, मिलिंद तांबे, वरवडेकर आदी आम्ही मित्रमंडळी देवळाच्या आसपास खेळायचो. महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे पागेवर जणू महोत्सवाचे वातावरण. दूरदूर असलेले ग्रामस्थ, चाकरमानीही ठरवून 10,12 दिवसांच्या सुट्ट्या घेऊन आलेले असायचे. मंदिर जुन्या काळच्या हंड्या-झुंबरांनी सजवले जाई. रंगरगोटी होई. रोज छबीन्याचीं मिरवणूक सर्वत्र रात्री असे. त्यासाठी ते विशिष्ट पोशाख, मशाली, छत्रचामरे... वाजत गाजत रात्री पालखी सर्वत्र जाई.
मग मंदिरात भजन आणि त्यावर एका लयीत नाचणे... आम्हा मुलांना या सगळ्याचं फार आकर्षण वाटायचं. महाशिवरात्रीला मग सकाळपासून महारुद्र... अभिषेक असे. संध्याकाळी कीर्तन रंगे.
सगळा उत्सव कळसाला पोचे. नंतर दुसऱ्या तिसऱ्या नाटक असायचं. स्थानिकांनी हौसेने बसवलेलं. 3, 3 महिने तालमी केलेल्या असायच्या. नाटक देखील गाजलेल्या नाटकातून निवडलं जाई. सर्वांना उत्सुकता असायची यंदा कोणतं नाटक.. अमुकतमुक चा रोल कोण करणार वगैरे...
सगळं झालं की मग श्रमपरिहार म्हणून गावजेवण किंवा महाप्रसाद होई. साधासा मेनू असे पण त्याची चव आजही विसरता येत नाही.
उत्सव संपला की परत जाणाऱ्यामध्ये स्त्रियांसोबत पुरुषांच्याही डोळ्यात पाणी दाटून येई. पुढील वर्षी पुन्हा भेटायचे वायदे होत आणि सगळं पुन्हा शान्त होई.
≈≈≈≈
कृष्णेश्वराचं मंदिर जसं माझ्या लहानपणीच्या भावविश्वाचा भाग आहे तसंच पागेवर असलेलं गोपाळकृष्णाचे मंदिर देखील. इतकी प्रसन्न मूर्ती की तो कृष्ण जणू कुणीतरी आपला दोस्तच आहे असं वाटायचं.
दर एकादशीला तिथं कीर्तन असायचं. सहस्त्रबुद्धे नावाच्या आजी टेबलवर पुढ्यात पेटी घेऊन, बसून कीर्तन करायच्या. अगदी शिवाजी महाराजांच्या गोष्टी, पुराणतल्या विविध कथा तिथं उत्तरंगात घेतल्या जात. त्या गोष्टी ऐकण्यासाठी असलेली आतुरता मला आजही जाणवत राहते. आईचा हात धरून आम्ही भावंडे तिथं जायचो. आईला रोजच्या व्यापातून हाच जणू विरंगुळा असे. त्या परिसरातील तिच्या मैत्रिणींना भेटणं, गप्पा, चहापाणी आणि कीर्तन... यासागळ्याला जणू ती आसुसलेली असायची.

आणि आठवणारे तिसरे लाडके मंदिर म्हणजे वाशिष्टी नदीकाठी असलेलं गांधारेश्वर मंदिर. नदीचा खोल डोह, मधूनच सूर मारून मासे टिपणारे खंड्या पक्षी, किलबिल करणारे अन्य पक्षी.... आणि भरून राहिलेली शांतता. कितीदा तिथं जाऊन बसलोय त्याची गणतीच नाही. आणि मग आम्हा चिपळूणकरांची विंध्यवासिनी देवी. आणि डोंगरावर विठलाई. डोंगराच्या कुशीतलं ते मंदिर, समोरची पुष्करणी, मागच्या डोंगरात वाहणारे निर्झर.. बस्स फ़क्त शान्त बसून राहावं.
आणि आवडतात भटकंती करताना विविध गडदुर्गावर पाहिलेली अनेक छोटी मंदिरं. देवींची, शन्कराची, मारुतीची.
2,4 तास चालून तिथं वर पोचावं, टाक्यातील थंडगार पाण्याने तोंड धुवावं. आणि त्या देवापुढं शान्त जरावेळ बसून राहावं. आपल्याच हृदयाचे वाढलेले ठोके आपल्याला ऐकू येत राहतात. हळूहळू शान्त लयबद्ध होत राहतात. तिथं दिवा लावावा, नमस्कार करावा आणि मग गड पाहायला दिवसरात्र हिंडत राहावं.

ही अशीच मंदिरं आवडतात मला.!
≈≈≈≈≈
पुढं काळाच्या ओघात रत्नागिरी, कोल्हापूर, सान्गली, नंदुरबार, कल्याण असं कुठं कुठं गेलो. ट्रेकिंग सुरु असायचंच. जिथं जाऊ तिथं अशा शान्त निसर्गरम्य ठिकाणाची माहिती घेतली जायची. आवर्जून ते पाहिलं जायचं. सांगली जिल्ह्यात, बहे येथील कृष्णा नदी पात्रातलं रामदासानी स्थापलेलं मारुती मंदिर... कुडाळ जवळ वालावल आणि धामापूर चे मंदिर. शान्त पाण्याजवळ पाय पसरून बसलेली ही मंदिरे.. अतिशय भुलावतात.

 लहानपणी वडील ही कुठं कुठं गेले की आम्हाला सोबत न्यायचे. मात्र गर्दीच्या ठिकाणी जाणं मला अजिबात आवडत नसे. कुटुंबासोबत विविध तीर्थक्षेत्रे पाहून झालीयत मात्र खरंच कुठं पुन्हा जावंस वाटत नाही, अपवाद शेगावचा. तिथं कितीही वेळा जायला आवडेलच. आणि आवर्जून सांगायचं तर लहानपणापासून आजवर केलेल्या भटकंतीत सर्वाधिक लक्षात राहिली ती दक्षिणेतील मंदिरं.
बेलूर हळेबिडू, सोमनाथपूर, पश्चिम कर्नाटकच्या शिरसी, सागर परिसरातील बनवासी, एक्केरी इथली मंदिरे, ऐहोळे पट्टदखल, हंपी, चिदंबरम, बृहदीश्वर, मीनाक्षीपूरम, कालडी, तिरुअनांथपुरम,कोची, शृंगेरी, उडूपी आदी अनेक ठिकाणचे ते विस्तीर्ण प्राकार, सर्वत्र सुरेख स्वच्छता, अफाट असं कोरीव कामं मनाला अक्षरशः वेड लावते. हलेबिडू चा नंदी किंवा बनवासी च्या मंदिरासमोरील सुबक कोरीव काम केलेला हत्ती पाहत नुसतं बसून राहावं.
इथं खरंच मंदिरे पाहावीत ती बाहेरून. एकेक इंच जागा कुठं रिकामी नसते. केवढं थक्क करणारे कोरीव काम. मंदिर निरखून झालं की मी शान्त एका कोपऱ्यात बसून राहतो. मनात विचार येत राहतात.
किती शिल्पी जीव ओतून वर्षानुवर्षे ते घडवत बसले असतील. त्यांचा चरितार्थ त्यांनी कसा सांभाळला असेल, कित्येक वर्षं सुरु असलेली ही बांधकामं... किती पिढ्यानी आपलं कौशल्य पुढील पिढीला सोपवलं असेल. सगळं कसं सुबक, आखीव रेखीव. गणित, भूमिती, भूगोल, सायन्स सगळंच कोळून प्यालेली ही मंडळी. मात्र आमच्या अभ्यासक्रमात कधीच यातले काही आम्हाला शिकवलं का गेलं नाही याचीच खंत वाटत रहाते.
≈≈≈≈≈≈≈
दक्षिणेच्या तुलनेत उत्तर भारतातील मंदिरात तुलनेने जास्त अस्वच्छता आहे. दक्षिणेतील मंदिरात जाणवत राहणारा कर्मठपणा उत्तरेकडे जाऊ तसं कमी होत जातो. आणि स्वच्छतादेखील.
अवघ्या उत्तर भारताने, इ.स.700- 800 पासून जवळपास 1200 वर्षं मुस्लिम आक्रमकांची जबरदस्ती अनुभवली. त्याचा परिणाम असेल का? माहिती नाही.
जिथं घर, संसार, राज्ये ही उध्वस्त झाली तिथं मंदिराच्या नशिबी वनवासच जणू. तरीही लोक लढत राहिले, आपला धर्म, मंदिर, ग्रंथ प्राणपणाने जपत राहिले. नर्मदेकाठी असलेली शेकडो मंदिरे, उज्जैन, महेश्वर, खजूराहो तिकडे ओरिसातील जगन्नाथपुरी, कोणार्क, गुजरातमधील हिंदू आणि जैन मंदिरे, राजस्थान, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काशी, प्रयाग हे सगळं अनेक आक्रमणे पचवून पुनःपुन्हा उभी राहिली आहेत.

देशभरातील ही केवळ मंदिरे नव्हती तर कम्युनिकेशन सेंटर्स होती. देवपूजेबरोबरच विविध गायक, वादक, नर्तक यांना कलामंच देणारी स्थाने होती. इथूनच भरतनाट्यम, कथक, ओडीसी, कुचिपूडी आदी नृत्यसोबत धृपद गायकी देखील विकसित होत गेले. इथल्याच प्राकारातून हजारो पुस्तकांची ग्रंथालये होती.. योग्य उपचार करणारे, आयुर्वेद जाणणारे वैद्य ही मंदिराचा आश्रय घ्यायचे. इथल्या मंदिराच्या माध्यमातून जलव्यवस्थापन केले जात होते.

देशावर आधी मुस्लिम आक्रमणे झाली आणि मग इंग्रजांची, पोर्तुगीजांची... त्यांनी आपली ही सोशल सिस्टीमच उध्वस्त करायचे निकराचे प्रयत्न केले. खूप काही डळमळीत झालं तरीही हिंदू समाज पूर्णतः मोडून पडला नाही.
प्राणपणाने, चिवटपणे आपलं सगळं जमेल तितकं जपत राहिला.

आज पुन्हा विविध मंदिराना, प्राचीन वारसा स्थळांना जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न होऊ लागलेत. हे सारं आपण जपायला हवं. ती केवळ मंदिरे नाहीयेत तर हजारो वर्षांचा समृद्ध असा ठेवा आहे. हौस म्हणून मूर्तिशास्त्राचा अभ्यास केलेला. त्यावेळी जाणवलं, काही इंचाच्या, फुटाच्या त्या मूर्तीला घडवताना किती काय काय विचार केला जातो हे उमगले.
मंदिरं हा जसा आपला एक अमूल्य असा वारसा आहे तसाच वारसा आहे देशभर पसरलेली हजारो लेणी, गुंफा यांचाही. हिंदू, जैन आणि बुद्ध धर्मीय लोकांनी अतिशय मनापासून यावर काम केले. तो एका वेगळ्या लेखाचाच विषय. ते ही सारं आपल्याला जपता यायला हवं.
मंदिर असो वा लेणी, मुख्यत: आपल्याला तिथं स्वच्छता राखता यायला हवी. तिथला परिसर, वास्तू, पाण्याची व्यवस्था जशी घडवली गेली तशी जतन करता यायला हवीत. आपण ते करू शकलो तर देवदर्शन केल्यापेक्षा जास्त पुण्य आपल्याला मिळेल आणि एक भव्य वारसा आपण पुढील पिढ्याकडे हस्तान्तरीत करू शकू असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे अवश्य सांगा. आणि जिथं जिथं अशी कामं सुरु आहेत त्याची माहितीही शेयर करत राहुयात.

आता असं वाटतं, शान्त हिंडत राहावं. नर्मदेचा किनारा मला कायमच खुणावत असतो. हिमालय पुकारत असतो. मन म्हणेल तसं हिंडत राहावं. जे जे आपल्याला ठाऊक ते ते लोकांना सांगत राहावं. इथल्या वीरांच्या कहाण्या सांगाव्यात. इतिहासाचा जो अभ्यास केलाय तो सांगावा देशापायी त्यांच्या मनात असलेलं प्रेम अधिक वाढवत राहावं.
देव, देश आणि या मातीपायी असलेली जनांची श्रद्धा वृद्धिंगत करावी. मग विशिष्ट मंदिरापुरते, पंथापुरते न उरता अवघ्या देहाचेच मंदिर होऊन जावे.
स्वतःच नाव विसरून हळूहळू सगळ्यात विलीन होत जावं...! 
- सुधांशु नाईक, 9833299791🌿
#सहज #सुचलेलं
( नोंद : यात वापरलेला गांधारेश्वर मंदिराचं सुरेख क्षणचित्र सुवर्णा भावे जोशी यांनी टिपलेलं आहे. )

Thursday 16 February 2023

मन मनास उमगत नाही... ( उत्तरार्ध )

मन आणि आपली मानसिकता ही सगळीच गुंतागुंतीची गोष्ट. 
मुलं आणि पालक, पती पत्नी , मित्र मैत्रिणी, कुटुंबीय याचबरोबर व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणचे नातेसंबंध आणि हल्लीच्या जमान्यातील लिव्ह इन रिलेशनशिप.... या सगळ्यांत इतक्या प्रकारे माणसं एकमेकांशी वागत असतात की मानवी मनाची अनेकदा घुसमट होते. सगळीच नाती कायमच आनंददायी असतात असं नाही. त्यामुळे जेंव्हा समस्या निर्माण होतात तेंव्हा जनरल ठोकताळे लावून त्या सोडवता येत नाहीत म्हणूनच योग्य प्रकारे समुपदेशन होणं आणि मग आवश्यकतेनुसार मानसोपचार घेणं गरजेचे ठरते.

मन आपलंच. खूप गुंतागुंतीचं. चांगलं वाईट सगळाच विचार करणारं. त्याला आपण वळण देऊ तसं वळणारं. कधीतरी ते असं काही वागू लागत की मग समस्या निर्माण होतात.
आपलंच मन आपल्याला कळणार नाही इतकं विचित्र कसं वागतं हे सगळं म्हणजे खोलवर अभ्यासाचा विषय. त्यातही पुन्हा लहान मुलं, मोठी माणसं त्यांच्याभोवती असलेली परिस्थिती हे सगळं जाणून घेतल्याशिवाय आपण समस्या सोडवू शकत नाही. मात्र हा खूप मोठा व्यापक विषय. तो एका लेखातून मांडणं अवघडच. लवकरच त्यावर सविस्तर लेखमाला लिहायला हवी.
आज आपण मुख्यत: विविध समस्या दिसू लागल्या की काय करायला हवं यावर लक्ष देऊयात.
सिनेमा, नाटकं, टीव्ही सिरीज सारख्या माध्यमातून मानसिक समस्या किंवा विविध वर्तनशैली बाबत अनेक गोष्टींचा आधार घेत कलाकृती घडतात. लोकप्रिय होतात. मात्र मूळ मुद्दा तसाच राहतो. सिगमंड फ्रॉईड, कार्ल युन्ग, ऍडलर, मॅसलॉ, पावलोव्ह या सारख्या अनेकांनी 19 व्या, 20 व्या शतकात यावर संशोधन केलं. त्यानुसार विविध थिएरीज मांडल्या. प्रसंगी एकमेकांचे मुद्दे खोडले. काही संशोधनात त्रुटी जाणवल्या तिथं अधिक संशोधन केलं गेलं.
लहान मुलांच्या वर्तन समस्या, नोकरी करियरच्या टप्प्यावर भेडसावणाऱ्या समस्या, हिंस्त्र वर्तन, न्यूनगंड, अति आत्मविश्वास आदी समस्यानी अनेक जण ग्रासलेले असतात. जीवनात हल्ली जीवघेणी स्पर्धा आणि ताण तणाव हे नित्याचेच. त्याचं योग्य नियोजन करता आलं नाही तर माणसं निराश होतात. मानसिक समस्यानें ग्रस्त होतात किंवा व्यसनाच्या आहारी जातात.

योग्य वेळी त्यांनी जर समुपदेशकाचे सहकार्य घेतले तर त्यांचे प्रश्न लवकर सुटू शकतात. योग्य वेळी आवश्यक असेल तर मानसोपचार सुरु करता येतात. 
समाजामध्ये सर्वाधिक प्रमाणात प्रश्न जाणवतात ते रिलेशनशिप मध्यें. माणसाच्या वाढीच्या विविध टप्प्यावर कामजाणीव विकसित होत जाते. ती योग्य प्रकारे हाताळता आली नाही तर विविध गंभीर प्रश्न उभे राहतात असं फ्रॉईड म्हणतो. याबाबत जेंव्हा संशोधन झालं तेंव्हाच सर्वात जास्त गदारोळ झाला फ्रॉईडमुळे.

मानसिक समस्येबाबत असलेल्या प्रत्येक कृतिमागे कुठं तरी कामप्रेरणा असते असं सांगत फ्रॉईड नें वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्याचा इतरांनी प्रतिवाद ही केला. मात्र लहानपणापासून जी काम प्रेरणा विविध टप्प्यावर आपल्यामध्ये विविध रूपात असते त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब ही झालं.
वयात आलेल्या स्त्री - पुरुषांच्या कामभावना योग्य तऱ्हेने तृप्त झाल्या तर त्या व्यक्ती अधिक तत्परतेने कार्यरत होतात, लहान वयात मुलांना चांगल्या प्रमाणे हाताळले गेले तर त्यांचं भावाविश्व अधिक चांगलं बनते. आसपासच्या वातावरणात जर लोकांच्या लैंगिक संबंधाबाबत विकृत दर्शन झालं तर मुलं तशा विकृतीची शिकार बनू शकतात. लहानपणी होणारे child abuse सारख्या प्रकाराने, नात्यातील लोकांनी किंवा अन्य कुणीही केलेल्या विनयभंग किंवा बलात्कारामुळे 
त्या व्यक्तीचं सम्पूर्ण आयुष्य उध्वस्त होतं. शारीरिक जखमा लवकर भरून काढता येतात पण मनाला झालेली जखम बरी व्हायला योग्य उपचार आणि वेळ द्यावा लागतो...!
प्राचीन कामसूत्र हा ग्रंथ असो, भारतीय लग्न संस्थेचा इतिहास सारख अभ्यासपूर्ण पुस्तक असो किंवा मराठीत डॉ. विठ्ठल प्रभू, डॉ. लीना मोहाडीकर, डॉ. शशांक सामक आदींनी केलेलं लेखन असो किंवा मास्टर्स अँड जॉन्सन सारख्यानी केलेलं संशोधन असो ... यांच्यामुळं लैंगिक जीवन अधिक मोकळेपणाने चर्चेत आले. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, लैंगिक समस्या आणि माणसाचे वर्तन, शरीरिक आणि मानसिक दुर्बलता आणि त्यामुळे घडलेले मानसिक बदल अशा अनेक अंगानी मानसोपचार तज्ञ विचार करू लागले.
लोकांना सुरुवातीला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार घेतोय हे सांगणं अपमानास्पद वाटे. मात्र आता हळूहळू बदल होतोय ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अनेकदा म्हंटल तर कुणीच चूक नसतो पण परिस्थिती त्याला एखादी कृती करायला भाग पाडते. हे लोक समजून घेऊ लागलेत. बदलत्या समाज व्यवस्था प्रत्येक काळात असतातच. त्या नुसार ही नातेसंबंधामध्यें अनेक बदल घडताहेत. लिव्ह इन रिलेशन्स, समलैंगिक संबंध आदि गोष्टी समाज हळूहळू स्वीकारत आहे.
माणसाच्या मनातील प्रश्नांची जितकी लवकर उकल होईल तितकं तें मन अधिक निर्मळ होतं. 
अशी निर्मळ मनं अधिक एकाग्रपणे कार्यरत होतात हेच खरं.
अनेकदा विविध समस्या घेऊन लोक आपल्याकडे येतात. प्रत्येकवेळी त्यांना सल्ला हवाच असतो असं नसतं. तर त्यांना त्यांचं मन मोकळं करायला एक हक्काचा कोपरा हवा असतो. 2 क्षण विसावता यावं म्हणून आधार देणारा खांदा हवा असतो. आपल्याला तसा आधार इतरांना देता यायला हवा. Empathy, compassion म्हणजेच आस्था, करुणा, दया आपण दाखवतोच मात्र अशावेळी लोकांना मैत्रीपूर्ण आधाराची जास्त गरज असते.
प्रसंगी त्यांच्याकडून चूक झालेली असताना देखील आपल्याला त्यांना प्रेमाने, मायेने वागवता आलं पाहिजे. त्यांना त्यांच्या मनाला झालेल्या दुखापतीतून सावरायला मदत करता यायला हवी ज्यायोगे तें पुन्हा आपल्या क्षेत्रात भरारी घेऊ शकतील. आणि नेमकं हेच काम समाजात विविध काउन्सिलर्स, हितचिंतक यांना करायचं असतं.

स्वतःविषयीं बोलू नये असा संकेत आहे. तरीही सांगतो की, मीं तसा इंजिनियर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्षेत्रात कार्यरत माणूस. मात्र सामाजिक कार्याची आवड म्हणून विविध सामाजिक उपक्रमात गेली 25, 30 वर्षं आवड म्हणून कार्यरत आहे. ओरिसा महापूर, कच्छ भूकंप पुनर्वसन, दुर्बल मुलांचं शिक्षण - संगोपन यात सहभाग नोंदवला आहे. तसंच समाजातील स्त्रीला सबला बनवतानाच वेश्यांच्या प्रश्नावरही 30 वर्षापेक्षा जास्त काळ कामं करणारी ' वंचित विकास ' सारखी संस्था, अपंगांच्यासाठी अनेक दशके कार्यरत असलेली " हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड" सारख्या संस्था... या ठिकाणी त्यांच्या कार्यात अल्पसा सहभाग देताना हे जाणवलं की शरीराच्या दुर्बलतेपेक्षा मनाच्या दुर्बलतेवर अधिक काम करण्याची गरज आहे.
त्यातच 2020 ला कोरोनाकाळात सगळं जग ठप्प झालं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग बंद पडले. आर्थिक नुकसानीसोबत शारीरिक त्रास, आसपास सतत दिसणारे मृत्यू, आपल्या घरावर असलेलं मृत्यूचं सावट, घरातच सतत सगळे एकत्र राहिल्याने नातेसंबंधा मध्यें निर्माण झालेले नवे प्रश्न सभोवती खूप प्रमाणात दिसलें. आणि एका आंतरिक प्रेरणेने " जादूची पेटी " हा टेली काउन्सिलिंगचा प्रयोग तेव्हा सुरु केला. ज्यांना आपल्या विविध समस्या कुणाशीही बोलता येत नाहीत त्यांनी अवश्य फोन कॉल किंवा ई-मेल द्वारे संपर्क साधावा असं आवाहन केलं.
सुरुवातीला मलाच वाटलेलं की फारसं कुणी कॉल करणार नाही. मात्र केवळ फेसबुक आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून केलेलं हे आवाहन अनेकांपर्यंत पोचलं. राज्यभरातून शेकडो फोन आले. त्यात जास्त संख्या महिलांची होती. मीं एक परका माणूस त्यात पुरुष, असं असलं तरीही त्यांनी मन मोकळं केलं.
त्यावेळी जाणवलं की या बिचाऱ्या किती किती सोसत आहेत. काही गंभीर समस्या होत्या तिथं त्यांना काही संस्थांशी जोडून दिलं. त्यातून त्यांना मदत मिळाली. कोरोना चीं भीती, मुलांच्या समस्या, पती - पत्नी चं अवघडलेलं नातं, विवाह बाह्य संबंध, वयस्कर मंडळींच्या समस्या असं किती किती समोर येत राहिलं. माझ्या परीने मीं त्यांना फोनवरून बोलून मोफत सहकार्य करत राहिलो. त्यामुळे आता जाणवतंय की समाजात यापुढील काळात जसं ' आर्टिफिशियल इंटिलिजन्स' या गोष्टीला खूप महत्व येणार आहे तसंच किंवा त्याहून जास्त एखाद्या काउन्सिलर ला, मानसोपचारतज्ज्ञला महत्व असणार आहे. ' सांगेन गोष्टी युक्तीच्या चार ' असं म्हणणारा, समोरच्याला त्याच्या अडचणीच्या वेळी हक्काचा आधार असा कृष्ण आपल्याला होता यायला हवं. प्रत्येकाला जेंव्हा एखादा असा कृष्ण लाभतो तेंव्हा त्याच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन शक्य होतं.

शेवटी एकच सांगावंसं वाटतं की तुम्हाला कुणाला एखादी व्यक्ती मानसिक त्रासात आहे असं वाटलं तर त्याला पटकन आधार देऊयात. आज क्षुल्लक गोष्टींसाठी आत्महत्या करणारी सर्व वयोगटातील माणसं पाहून मनाला यातना होतात. मिळालेलं सुंदर आयुष्य हे. तें का नकोस झालं असेल असं वाटतं. आपल्या परीने लोकांना मैत्र देऊयात. त्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलवूया. मन मनास उमगत नाही असं म्हटलं असलं तरी एखाद्यासाठी 'मनापासून सहकार्य करणारा' मित्र बनूया.
- सुधांशु नाईक, 9833299791🌿

( टीप :- ज्यांना कोणत्याही प्रकारचे काउन्सिलिंग हवं असं वाटत आहे तें अवश्य माझ्याशी कधीही सम्पर्क साधू शकतात, यासाठी मीं योग्य ते सहकार्य नक्की करेन.) 

Friday 10 February 2023

मन मनास उमगत नाही...

मन मनास उमगत नाही...
-सुधांशु नाईक.
" सहज सुचलेलं... " या लेखमालेतील हा पाचवा लेख.

मन सगळ्यांनाच असतं, पण असतं कुठं नेमकं? हे काही सांगता येत नाही. मनाची अशी ठोस व्याख्याच नाही. तांत्रिकदृष्टया सांगायचं तर मन म्हणजे जणू एक केमिकल लोचा आपल्या मेंदूतील आणि शरीरात अन्यत्र असणाऱ्या ग्रंथीनी घडवलेला. हा लोचा आपल्याला सुखावतो, दुखावतो, विद्ध करतो, कधी देव बनवतो तर कधी दानव... कधी जगायला उर्मी देतो आणि कधी सगळं संपवून टाकायची आत्यंत्यिक कृती देखील करायला लावतो.

शरीराच्या रोमारोमात भरून राहणारी, बदलत राहणारी संवेदना म्हणजे मन असं आपण समजूया आणि करूया जरा चिंतन या मनाच्या अथांग दुनियेविषयी.

महेश आणि राजेश ही जुळी मुलं शाळेत एकत्र होती. हुशार आणि एकाच घरात एकाच प्रकारे वाढलेली. दोघांवरही तेच मराठी मध्यमवर्गीय  संस्कार. दोघंही एकाच ग्राउंड वर त्याच मुलांच्या संगतीत खेळणारी.
तरीही दोघांच्या वर्तनात मात्र कमालीचा फरक. महेश शान्त, मवाळ, सहसा कुणाला त्रास न देणारा. आपण बरं आपला अभ्यास बरा असं वागणारा. दप्तर, डबा, वॉटरबॅग नीट सांभाळून नेणारा.
त्याच्या बरोबर उलटं राजेश वागायचा. हुशार असूनही होमवर्क कित्येकदा अर्धवट ठेवणारा. बघावं तेंव्हा महेश ला आणि इतरांना त्रास देणारा. सतत दुसऱ्याशी भांडणं, खोड्या काढणे असे उद्योग सुरु. शर्टाची बटणं तुटलेली, चप्पलचा बंद तुटलेला, वस्तू हरवत असणारा. त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या संगोपनात कधी भेदभाव केला नाही. तरी हे असं का? दोघेही हुषार. वर्गात सुरुवातीला पहिला दुसरा नंबर ठरलेला. पण मग हळूहळू आपल्या अवगुणामुळे राजेश सर्वांचा नावडता होत गेला. शेवटी त्यांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागला.
काय कारण असेल यांच्या मानसिकतेतील फरकाचे? असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. हीच नव्हे तर अशी असंख्य गुंतागुंतीची उदाहरणं आपण आसपास पाहत असतो.

एखादा माणूस खूप श्रीमंत असतो तरी मनानं सतत असमाधानी.  तर एखादा साधा गरीब माणूस, आहे त्यात सुखी आनंदी असतो.  कधी खूप प्रतिष्ठा असलेला, खूप उच्च पदावर कार्यरत असलेला डॉ. कलाम यांच्यासारखा माणूस अत्यंत साधेपणाने वागतो, कमीत कमी खर्च स्वतःवर करतो. आणि आपल्या संपत्तीतील वाटा दानही करतो. तर त्याचवेळी एखाद्या सामान्य घरातील माणूस आपला महिन्याचा पगार बारमध्ये एका रात्रीत उधळून देतो. एखाद्या घरात एकवेळच्या जेवणाची भ्रान्त असते तर त्याचवेळी शेजारच्या एखाद्या हॉटेलमध्यें काही लोक प्रचंड प्रमाणात अन्न टाकून मस्तवालपणे निघून जात असतात.
लहानपणापासून उत्तम संस्कार लाभलेली मुलं देखील वाढत्या वयात कधी नशेबाज होतात, गुन्हेगार बनतात तर एखाद्या नाल्याकाठी किंवा खेडेगावात जन्मलेली व्यक्ती उत्तम अधिकारी बनते. हे सगळं असं का घडतं?
सगळ्यासाठी अनेक कारणे देता येतील. मात्र मनोव्यापाराचं विश्व इतकं गुंतागुंतीचे का असा प्रश्न आपल्याला पडतो का? का घडतं असं? जगात करोडो माणसं. प्रत्येकाच्या मनात इतकी गुंतागुंत का असते? मनाला कसं ताब्यात ठेवायचं? मनाला योग्य ते वळण लावून सकारात्मक कृतीकडे कसं वळवायचं? वाईट मार्गी अडकलेलं मन पुन्हा त्यातून बाहेर कसं काढायचं? असे कितीतरी प्रश्न... मन मनास उमगत नाही... असं गाण्यात जे म्हटलं आहे अगदी तशीच प्रचिती येते.

मनाच्या अशा विचाराचा, आपल्या प्राचीन भारतीय परंपरेने खूप मोठया प्रमाणात अभ्यास केला आहे. मनाची एकाग्रता, मनाची ताकद यावर योगशास्त्र, आयुर्वेद, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, आपले चारी वेद, उपनिषदे, भगवतगीता इत्यादी इत्यादी ठिकाणी त्या त्या अनुषंगाने लोकांच्या मानसिकतेचा इतका विचार केला गेलाय त्याचं कौतुक वाटतं.

अगदी 400 वर्षांपूवी समर्थ रामदासानी मनाचे श्लोक रचले. गावोगावी विविध जातीजमातीतील लोकांना सांगितलेलं. त्यांनी ते पाठ केले. त्यातही मनाला कसं ताब्यात ठेवावं हेच तर ते सांगतात.
" अचपळ मन माझे नावरे आवरीता, तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता... " असं आर्तपणे प्रभू रामाला साद घालणाऱ्या समर्थांनी मनाच्या श्लोकात इतक्या साध्या भाषेत लोकांना उपदेश केलाय की अगदी अशिक्षित, भोळ्या माणसाला देखील ते सहज उमगावेत.
जगावं कसं, वागावं कसं हे किती छानपणे ते कळकळीने सांगतात पहा ना,

नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना सर्वदा अंगींकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांस रे नीववावें॥७॥

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी।
मना सज्जना हेच क्रीया धरावी॥
मना चंदनाचेपरी त्वाां झिजावे।
परी अंतरीं सज्जना नीववावे॥८॥

यावर आपण अजून काय बोलायचं?

आपल्या मनाला उत्तम तेच सतत देत राहावं. मनाचं मालिन्य जाऊ दे, मनाला चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवावे, सर्व सुखंदुःख स्थिरबुद्धीने पाहावीत, विकारवश न होता आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, ज्ञानी बनावं यासाठी अनेक ठिकाणी मार्गदर्शक गोष्टी सांगितल्या आहेत.

एका ठिकाणी असं म्हटलंय की,
यस्य कृत्यं न विघ्नन्ति शीतमुष्णं भयं रतिः । 
समृद्धिरसमृद्धिर्वा स वै पण्डित उच्यते ॥
याचा अर्थ असा की, उन्हाळा - हिवाळा, गरिबी - श्रीमंती, प्रेम - तिरस्कार आदि कोणत्याही गोष्टीने विचलित होत नाही आणि स्थिर राहतो तोच ज्ञानी पुरुष असतो.
अगदी असंच काहीसं भगवदगीतेमध्यें 12 व्या अध्यायात सांगितलं आहे,
समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥18॥
तुल्यनिन्दास्तुतिमौनी सन्तुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥19॥

माणसाने मनाला कसं घडवावं, कसं ताब्यात ठेवावं हे सगळंगेली हजारो वर्षे सांगितलंय आपल्याला अनेक ग्रंथामधून . तरीही आपण त्याकडे खरंच लक्ष देतोय का हे आपण स्वतःलाच विचारायला हवे. माणसाची मती स्थिर झाली की तो कुटुंबाची, समाजाची, देशाची उन्नती करू शकतो. सर्व माणसं अशी व्हावीत, तेजस्वी व्हावीत परस्पर सहकार्य करत राहावीत अशी त्या ऋषींची ती भावना.

जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो ||
भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें ||'

अशी मानसिकता बाळगणारे ज्ञानदेव ही त्यातलेच. मात्र तरीही लोकांच्या मनात विविध विकार बलवान होत राहतात. आणि मनाच्या तीव्र आंदोलनात माणसं गरगरत राहतात.

2012 मध्यें माझ्याच एका कवितेत मीं म्हटलं आहे तें सांगायचा मोह इथं आवरत नाहीये,

मन गंभीर, मन उदास
मन एकाकी ... गहिवरलेले..

मन हसरे , मन नाचरे
मन गहिरे ... आसुसलेले..

मन कठीण, मन वाईट
मन ओंगळ ... बरबटलेले..

मन चंचल, मन अस्थिर
मन वासरू ... भरकटलेले..

मन तृप्त, मन शांत
मन आत्मरंगी ..रंगलेले..

अशा मनाला बहिणाबाई देखील " मन वढाय वढाय, जसं उभ्या पिकातलं ढोर ' असं म्हणून जातात. या ढोराला नीट वागावं कसं हे शिकवणं आपल्याच हाती आहे.

मुलांचं संगोपन, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या यासोबतच स्त्री पुरुष संबंध याबाबत देखील मनाच्या गुंतागुंतीचे शेकडो प्रकार आपल्या समोर येतात. मनाच्या विविध समस्या, त्यावरच निराकरण योग्य वेळी झालं नाही तर समस्या अतिशय गंभीर होऊ शकते. म्हणून मनाकडे कधीच दुर्लक्ष करू नये. समुपदेशन, मानसोपचार याबाबत किती परिणामकारक ठरतात आदि गोष्टींबाबत जाणून घेऊया पुढील दुसऱ्या भागात...
-सुधांशु नाईक, कोल्हापूर. 9833299791🌿
( टीप :- ज्यांना कोणत्याही प्रकारचे काउन्सिलिंग हवं असं वाटत आहे तें माझ्याशी फोनवरून अवश्य सम्पर्क साधू शकतात.)