marathi blog vishwa

Tuesday, 8 December 2015

नवी स्वप्नं व नव्या दिशा !

२०१५ हे वर्ष सुरु झालं तेंव्हा असं वाटलं होतं की हे वर्ष लवकर संपणारच नाही. संपू नयेच. डोंगराएवढी कामं समोर होती. समोर असलेल्या अडचणी पाहता ही सारी कामं खरंच हातावेगळी करता येतील का असं एक मन विचारत होतं तरीही त्यातून जमेल तसं मनापासून” हे सदर माझ्या ब्लॉगवर लिहित गेलो आणि आता बहुदा हा या वर्षातला शेवटचा लेख...उर्वरित दिवसांत काही लिहायला जमलं तर छानच, अन्यथा पुढच्या वर्षी नवं काही....

चहुबाजूनी अनिश्चितता, क्लायन्ट्सच्या वाढत्या व नवनवीन अपेक्षा, उद्दिष्ट पूर्ततेसाठी स्वतः आखलेली धोरणे यामुळे जानेवारी २०१५ मध्ये आम्ही सर्वजण अक्षरशः “युद्ध सदृश” परिस्थितीचा अनुभव घेत होतो. साधारण मे अखेरपर्यंत हीच परिस्थिती होती. सोबतच्या व हाताखालच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा व स्वतःचा धीर सुटू न देणे, घाई गडबडीत संपूर्ण टीमकडून नव्या काही चुका होऊ न देणे, सतत चर्चा करून क्लायन्ट्सच्या मंडळींचं मन वळवणे यात आम्ही सर्व गळयाइतके बुडलो होतो. २० मे नंतर मग चित्र हळूहळू पालटू लागले. ज्या गोष्टी क़तार मध्ये कधीच कुणी केल्या नव्हत्या ते आम्ही करू लागलो. यशस्वीपणे एकेक टप्पे पूर्ण होऊ लागले. आणि मग मला भारतात पुन्हा परतायचे वेध लागले.
२०१२ मध्ये हे नक्की ठरलं होतंच की शक्यतो २०१६ ची सुरुवात पुन्हा आपल्या देशात करायची. पण कशी, कधी व कुठे याचं चित्र स्पष्ट नव्हतं.

पाहता पाहता घडामोडी जुळून आल्या. गेली ७-८ वर्षं ज्यांच्या सोबत होतो त्या L&T सारख्या कंपनीतील सर्व स्नेह्यांना सोडून येणं जड गेलंच पण सर्वांनी समजून घेतलं. मला माझ्या स्वप्नांसाठी काही वेळ मोकळं सोडलं. त्यातच माझे मित्रवर्य पी.डी. उर्फ प्रमोदजी देशपांडे यांचं मार्गदर्शन मिळालं आणि गेल्या महिन्यात थेट भारतात दाखल झालोच.

एक नक्की ठरवलं होतं की Engineering चं field पुनश्च जरा बाजूला ठेवून इतर तितक्याच आवडीच्या क्षेत्रात काही करू पाहायचं. बरोबर १५ वर्षापूर्वी हे केलं होतंच. कुठलीही पदवी न घेता वृत्तपत्र संपादन क्षेत्रात काही वर्षं आनंदानं घालवली होती. यावेळी आता ठरवलंय की मनुष्य कौशल्यविकास, पर्यटन, व्यवस्थापन व बालशिक्षण प्रशिक्षण, अपारंपरिक उर्जा यापैकी किमान एक-दोन क्षेत्रात आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्राशी संबंधित काही करायचंय. अनेक मित्र मंडळी सोबत / साथ करायला आहेतच. घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून किमान दोन-तीन वर्ष स्वतःची चाचणी घ्यायचीय.

त्याचबरोबर लेखन तर चालू राहणार आहेच. मुख्यतः “शिव-चरित्र व सध्याची युवा पिढी, आणि त्या अनुषंगाने सध्या भारताचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील वाढते महत्व” याबाबत व्याख्यानाचे काही विषय प्रत्यक्षात उतरावयाचे आहेत. पश्चिम घाटातील धोक्यात येणारं पर्यावरण, जलसंवर्धन यासाठी काय करता येईल, आपल्या देशातील नवशिक्षित पिढी आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या दृष्टीने कशी कार्यक्षम होईल याबाबत मनातलं काही सुहृदांशी, नवं काही शिकू पाहणाऱ्या मंडळींसोबत शेअर करायचं आहे. त्याबाबत काम करायची इच्छा आहे. अडचणी येणारच आहेत पण सोबत्यांच्या साथीनं त्यांचं निराकरण करू शकू असा विश्वास वाटतोय. याचबरोबर मुख्य म्हणजे गेली काही वर्षे दुरावलेली डोंगरयात्रा पुन्हा सुरु करायची आहेच...!

म्हणून मग कोल्हापुरात दाखल झालो आणि आल्या-आल्या थेट दुसऱ्याच दिवशी भल्या पहाटे ज्योतिबा डोंगरावर चालत निघालो.

पहाटेची वेळ. आजूबाजूला फुललेल्या प्राजक्त व सोनचाफ्याचा दरवळ घराच्या परिसरात. तो उरात भरून पुढे निघालो. सोबत्याबरोबर पंचगंगा नदी ओलांडून पलीकडे गेलो. उसाच्या शेतातून येणारा गारवा अंगावर हवीहवीशी शिरशिरी उमटवून गेला. संपूर्ण शहर जेंव्हा धुक्याची किंचित दुलई पांघरून अजून गाढ झोपेत होतं तेंव्हा नदीपलीकडे लहानग्या गावात मात्र जाग होती. कुणी गोठ्यात गाई-म्हशीन्सोबत होतं, कुणी माऊली अंगण सारवून रांगोळी रेखाटत होती. कुणी शेताकडे निघाले होते. कुठे चुली पेटल्या होत्या. कुठे कुणी शेकोटी पेटवून बसला होता. तो शेण-गोठ्याचा, सडा-सारवणं केलेल्याचा, पेटलेल्या चुलीतील धुराचा, कुठल्या तरी पाना-फुलांचा येणारा वास आसमंतात होताच. त्यातच दूर कुठूनतरी गुऱ्हाळातून आलेला गोडूस वासही दरवळत मिसळला होता. किती वर्षं झाली हे सगळं असं उरात भरून घेऊन...! ही आपली माती, हा आपला निसर्ग हेच आपलं जीवन, आता यापासून पुन्हा दुरावायचं नाही असं वाटून गेलं.
डोंगर चढायची सवय मोडलेली. दम लागत होताच. अधूनमधून क्षणभर थांबत, चौफेर पहात गेलो सहज चढून.

वाटेत जुन्या काळात लोकांनी निगुतीनं खोदलेली तळी, विहिरी पहिल्या. यावर्षी तसं दुष्काळी वातावरण असूनही त्या पाण्यानं तुडूंबलेल्या. मात्र तरीही त्यांची पुरेशी निगा राखली जात नाहीये हे दिसत होतंच. जे आपल्या आधीच्या पिढ्यांना शेकडो वर्षापूर्वी जमलं ते आम्हाला का जमू नये असा प्रश्न पडला. मग लक्षात आले की बहुदा आपण आपला परीघ संकोचून घेतल्यामुळे हे घडत असावं. आजकाल कमी होणाऱ्या संवादामुळे हे घडत असावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन चार दशकात “जे काही करायचं ते सरकारने करावं” असा जो सार्वत्रिक समज निर्माण झालाय त्यामुळेही हे घडत असावं.

अचानक आठवलं की या वर्षी दरमहा जे ब्लॉग लेखन केलंय त्यात दोन-तीन लेख पाण्यावर आहेतच. मी तर देशापासून / राज्यापासून दूर राहून लिहित होतो. जे कदाचित अनेकांनी वाचलंसुद्धा नसेल. पण तसंच इथंही अनेक विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार या विषयावर लिहित होतेच ना. तरीही दुर्दैवाने आपण जल-संधारण यासाठी खूप कमी काम करतोय हे मात्र खरंच. आता “जल-शिवार” योजनेमुळे सरकारी खात्यात जरा हालचाल दिसतेय आणि कामसुद्धा सुरु झालेय ही आनंदाची बाब म्हणायला हवी. पण एकूण सर्व-सामान्य जनता जोपर्यंत हिरीरीने अशा समाजासाठी अत्यावश्यक गोष्टींसाठी स्वतःचा खारीचा वाटा उचलणार नाही तोपर्यंत बदल कसा होणार? हाती असलेल्या “सोशल मिडिया”चा आज कार्यकर्ते प्रभावी वापर करताहेत, ती चळवळ अधिक खोलवर न्यायला हवी. त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड द्यायला हवी. तरच चित्र बदलता येईल.यासाठी सुद्धा काही करायचं आहे.

“मी एकटा काय करणार, मी एकट्याने केलेल्या किरकोळ कामांमुळे असा काय बदल होणार, मी सांगितलेलं ऐकलं तरी जाईल का ?” असा मी विचार करू लागलो किंवा दुसरा एखादा माणूस हेच प्रश्न मला विचारू लागला तर कदाचित कशाचीच सुरुवात होणार नाही. किंबहुना प्रत्येकाची सदसदविवेकबुद्धी जेंव्हा त्याला काही करायला उद्युक्त करते तेंव्हा स्वतःच्या व दुसऱ्याच्या मनातील हे असेच प्रश्न आपले मानसिक खच्चीकरण करतात. त्यांच्या जाळ्यात न सापडता जे पुढे जातात त्यांना आपोआप सोबती मिळून जातात. एकमेकांचे हात पकडून पुढे जातानाच कार्य उभं राहते. नवा दिवस दिसू लागतो.

त्यामुळे आता जास्त विचार करत बसणारच नाहीये. नव्या-दिशा व नव्या स्वप्नांचा ध्यास घेणार आहे. जसं जमेल तसं नियोजन करून कामाला सुरुवात करणार आहे. चुकत-माकत का असेना पण पुढे जाणार आहे.  
जेंव्हा अगदीच गरज भासेल तेंव्हा तुम्ही सर्व मित्र पाठीशी उभे राहाल अशी आशा उराशी बाळगतो...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)