marathi blog vishwa

Thursday, 11 February 2016

गोनीदांच्या छायेत...

गेल्या वर्षी “मनापासून” ही लेखमाला सुरु होती, त्या लेखमालेतील हा शेवटचा लेख गुरुतुल्य गोनिदांवर. गो. नी. दाण्डेकरांच्या नावामागे “कै.” असं मला लिहवत नाही, कारण फक्त माझ्याच नव्हे तर अनेक साहित्य व दुर्गप्रेमींच्या मनात निरंतर राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे “गोनीदा”.. २०१५-१६ हे गोनीदांच्या जन्म-शताब्दीचे वर्ष. त्यामुळे लिहायचं ठरवलं होतंच.


तसेच इथून पुढे वर्षभर “वेध छत्रपतींच्या तेजस्वी जीवनाचा” ही लेखमाला लिहिणार आहे. माझ्यासारख्या लहान माणसाला तो दिव्यपुरुष कसा दिसला तेच लिहायचा यथामती प्रयत्न करणार आहे. ते लिहिण्यापूर्वी जणू गुरूला केलेलं हे वंदन समजून गोड मानून घ्या....

गोपाल नीलकंठ दाण्डेकर. हजारो जणांचे अप्पा. मला पहिले भेटले ते “उडोनी हंस चालला” या पुस्तकात. माझं वय ६-७ वर्षाचं. मे महिन्याची सुट्टी. इकडेतिकडे उचकपाचक करताना बाबांच्या पुस्तकं भरलेल्या ट्रंकेतून हे पुस्तक हाती लागलं. मग एका कोपऱ्यात ठाण मांडले. त्या कोपऱ्यात बसून भान हरपून गेलेला तो मी, मला अजून आठवतोय.
नळराजा व दमयंतीची ती कहाणी. अत्यंत सर्वगुणसंपन्न असा तो नळराजा. त्याचा तो दुष्ट मनोवृत्तीचा बंधू पुष्कर. नळराजाचं औदार्य, त्याचं शौर्य, त्याची अश्व-परीक्षा, त्याची औषधोपचारातील निपुणता, द्यूत खेळण्यात तरबेज. हे सारं असूनही त्या नळदमयंतीनं नंतर भोगलेली दुःख हे सगळं सगळं खरं वाटलेलं. ते पुस्तक अधाशासारखं कितीक वेळा वाचलं नंतर. कायम लक्षात राहिली ती त्यातली मधुर भाषा. ते उत्कट संवाद. तेच तर वैशिट्य होते गोनीदांच्या भाषेचे. विषय कोणताही निवडावा पण तो भावोत्कट असावा. मग त्याच्याशी संबंधित सर्व संदर्भ एकत्र करावेत. आणि त्या सगळ्या फुलांची एक सुरेख माला देखण्या शब्दात ओवली तर जे काही समोर येईल ते म्हणजे गोनीदांचं लेखन.


त्या पहिल्या पुस्तकानंतर अक्षरशः “गोपाल नीलकंठ दाण्डेकर” हे नाव ज्या पुस्तकावर दिसेल तेच वाचत सुटलो. सुदैवाने बाबांच्या संग्रहात त्यांची बया दर उघड, हर हर महादेव, दर्याभवानी व कुणा एकाची भ्रमणगाथा ही अन्य चार व अप्पांचे परममित्र बाबासाहेब पुरंदरे याचं “राजा शिवछत्रपती” ही पुस्तकं होती. नंतर पुढच्या ४-५ वर्षात या पुस्तकांची मग अनेक पारायणं झाली.
पुढे शाळेच्या किंवा आमच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातील ( चिपळूणकरांनी “लोटिस्मा” असं प्रेमानं दिलेलं नाव) गोनीदांच्या कादंबऱ्याचा फडशा पाडला. शितू, पडघवली, तांबडफुटी, मृण्मयी यात दिसणारं कोकण आजूबाजूला होतंच. पण त्याच्याकडे पहायची दृष्टी मिळाली ती गोनीदांच्या कृपेने.
त्याशिवाय महाराष्ट्र दर्शन, दुर्गभ्रमणगाथा, माचीवरला बुधा या पुस्तकांनी भूगोल पाहायला व निरखायला शिकवलं. प्रत्येक पान, फूल, फांदी यासह सर्व पंचमहाभूतातील देखणेपण निरखायला शिकवलं. त्यावर प्रेम करायला शिकवलं.
जैत रे जैत, पवनाकाठचा धोंडी, पूर्णामायची लेकरं यात दिसलेली नवी बोलीभाषा मनाला अतीव आनंद देऊन गेली. प्रत्येक बोलीभाषेतील विशिष्ट शब्द, क्रियापदे, म्हणी, वाक्प्रचार यांकडे लक्ष वेधले ते त्यांनीच. ते जर झाले नसते तर कदाचित या बोली भाषा कधीच लावण्यवती वाटल्या नसत्या.
त्या लहान कळत्या-नकळत्या वयात भाषेचे जे संस्कार मनावर उमटलेत ते अमीट आहेत.

अर्थात गोनीदांच्या पुस्तकांनी नुसतं वाचन नव्हे तर या देशातील इतिहासावर, मातीवर, इथल्या माणसांवर, इथल्या दगडधोंड्यांवर, नदी-समुद्रकिनाऱ्यावर, डोंगर-दऱ्यांवर प्रेम करायला शिकवलं.
“दुर्गभ्रमणगाथा” व “स्मरणगाथा” ही दोन पुस्तकं माझ्या नेहमीच जवळ असतात. जेंव्हा देशापासून दूर कुठेतरी राहत होतो, तेंव्हा त्या “दुर्गभ्रमणगाथेनं” भासमान भ्रमंती (virtual travel) घडवून आणली. थकलेल्या मनाला किती उभारी दिली ते शब्दात सांगणे अशक्य. त्यांच्या आयुष्याविषयी त्यांनीच विपुल लिहिलं आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही लिहित नाही. माझ्यासारख्याला ते कसे दिसले हे सांगणं जास्त योग्य होईल.

निसर्ग पाहावा तो गोनीदांच्या नजरेनंच. ज्ञानोबांनी म्हटल्याप्रमाणे “करतळी आवळा ठेवून चौबाजूने निरखावा” तसं गोनीदा ते ठिकाण पाहत. एखादा दुर्ग, त्याभोवतीची नद्या-ओढ्यांची पात्रे, त्यातील रंगीत खडे-दगड, उंच आकाशावेरी गेलेले सुळके, झाडाची एखादी फांदी, एखाद्या जंगलातील सुहृदाची झोपडी, तिथलं साधं राहणं, हे सगळं त्यांच्या बारीक नजरेनं टिपून घेत. त्याचा लेखन व छायाचित्रणातून मुक्त आस्वाद घेत. मात्र तिथेच थांबत नसत. तर ते सारं दुसऱ्याला दाखवायला उत्सुक होत. आणि मग त्यांच्या मागून तशीच उत्सुक मंडळी पुन्हा त्या वाटेने चालू लागत.
कुणीही कधी न चढलेला रायगडच्या वाघ दरवाजाजवळील कडा चढून येणे असो, रानात सापडलेली “ज्योतवंती” ही वनस्पती असो, किंवा आनंदवनात सुरु झालेलं बाबा आमट्यांचं कार्य असो, हे सारं महाराष्ट्रासमोर त्यांनीच प्रथम आणले. तेही पुन्हा त्याचे कोणतेही श्रेय न घेता..!
 “जे जे उत्तम, उदात्त, सुंदर” त्याची लगबगीने जाऊन अनुभूती घेणे व ते रसिकांशी शेअर करणे यासाठीचा त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा. अनेक लोक आपले अनुभव, आपलं खाजगी आयुष्य लोकांपासून लपवून ठेवतात. त्यांचे वेगवेगळे चेहरे असतात. तसं गोनीदांनी बहुदा कधीच केलं नाही. उलट गोनीदा त्यांचं नेहमीचं भावूक रूप कधी लपवत / लाजवत फिरले नाहीत. त्यांच्यावर अनेकांनी लिहिलंय. त्यात समवयस्क आहेत, त्यांचं आयुष्य जवळून पाहणारे आहेत. त्यापैकी काही जणांनी त्यांच्या भावूक, उत्कट वागण्याबद्दल किंचित टीकेने व उपहासाने लिहिलंय. पण त्यांचं ते “अचानक भरून येण, गदगदून येणे” हे नक्कीच खरं होतं हेही नमूद केलंय. लहानशा वाऱ्याच्या झोताने जशी बकुळीची फुले अलगद जमिनीवर उतरावीत तसं ते गदगदून येणे असायचे. मनातला आवेग लपवायला राजकारणी मन लागते, ते गोनीदांच्याकडे नव्हतेच.

“जो अतीव, अवर्णनीय अनुभव मी घेतलाय, तो दुसऱ्यानीही घ्यावा” ही त्यांची भावना मोठीच. त्यातूनच ते अनेकांना महाराष्ट्र दाखवत हिंडले. मोठमोठे अधिकारी, लेखक, कलावंत याच्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गड-कोट दाखवले. या गड-कोटाचं जतन व्हावं, तिथलं सारं काही नोंदवून ठेवावं यासाठी त्यांनी जीवापाड कष्ट घेतले. अनेक दुर्गांचे नकाशे बनवले. विविध अवशेषांची नोंद केली. सरकारदरबारी खेटे मारून छायाचित्रण, वृत्तांकन करून ठेवण्यासाठी नया पैशाचीही अपेक्षा न करता रक्त आटवले. कारण या सगळ्याविषयी त्यांना फार ममत्व होते. जेंव्हा एखादा माणूस “काय पाहायचं त्या गडावर. नुसते दगड-धोंडे तर आहेत” असं म्हणे, तेंव्हा त्याच ठिकाणाचा इतिहास ते आपल्या वाणीने जिवंत करत. बलिदानाची जाणीव ठेवणं हे आपलं कर्त्यव्य या भावनेने त्या स्थळांच्या जपणुकीसाठी तळमळत.

लेखांव्यतिरिक्त नाटक, नृत्य-नाटिका या प्रकारात त्या काळी काही प्रयोग करण्यात त्यांनी जे योगदान दिले ते विशेष उल्लेख करण्यासारखं. विजया मेहता, रोहिणी भाटे यासारख्या कलावंतांसोबत त्यांनी जे केलं ते त्या वेळी काळापुढचे. तसेच त्यांच्या “कादंबरी वाचन” प्रकाराबाबत. मराठीत “कथाकथन” खूपच लोकप्रिय होते पण भावोत्कट कादंबरीचे वाचन हा नवाच प्रकार त्यांनी सुरु केला व त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबीयांनी तो नेटकेपणाने चालू ठेवलाय.

सध्या सर्वत्र दुर्ग-संवर्धनाची कामे भटकंती करणारी अनेक मंडळी करताहेत. याचाही खरा पाया घातला तो गोनीदांनी. त्याकाळी तर आजच्या इतक्या सोयीसुविधा नव्हत्या. तरीही युवकांचे जथ्थे घेऊन हा “तरणा म्हातारा” गडावरची स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची, तलावांची स्वच्छता अशी कामे करायचा. गड परिसरात राहणाऱ्या आदिवासी, गरीब लोकांना आपल्या परीने जमेल तशी कर्तव्यभावनेने मदत करत राहायचा. त्याची कसलीही वाच्यता न करता.

गोनिदांवर संतांचं गारुड. शेकडो ग्रंथ मुखोद्गत. त्यातून मग कृतज्ञता म्हणून त्यांनी संतांवर लिहिलं. थोर व्यक्तींवर लिहिलं. गोनीदांनी स्वतः लिहिल्याप्रमाणे “लिहिणं ही त्यावेळची गरज होती”. पण म्हणून भाराभर लिहूनही त्यातली गुणवत्ता कुठे उणावत नाही हे त्यांच्यातील लेखकाचे मोठेपण. नाही म्हणायला कधी कधी एखाद्या पुस्तकात जाणवतं की इतरांच्या लेखनाचे उतारे जरा जास्त दिसताहेत. हा जर दोष असेल तर तो त्यांच्या स्वभावाचा, किंवा त्यांच्यावर जगण्याने केलेल्या संस्कारांचा असावा. कारण त्याची जडणघडण झाली ती संत साहित्यावर. ज्ञानोबा, तुकोबा, रामदास याचं लेखन विविध संदर्भांवर / दाखल्यांवर भर देणारं. समोरील अज्ञानी जनांनी शहाणे व्हावे या कळकळीतून निर्माण झालेलं. तसेच तत्कालीन कीर्तन, प्रवचन आदि ठिकाणी सुद्धा विविध संतांचे, पुराणांचे दाखले देण्यावर भर असायचा. तेच संस्कार नकळत गोनीदांनी उचलले असावेत असं मला वाटते.

गोनीदांचे नुसते पाठांतर होते असे नव्हे तर शेकडो अभंग, पदरचना, ते सुरेल गात असंत. त्यातूनच त्यांच्या व हृदयनाथ मंगेशकरांच्या कल्पनेतून एक अद्भुत प्रयोग साकारला “ भगवतगीतेचा लताच्या स्वरांनी सजलेले दोन अध्याय, ज्ञानेश्वर माऊली व अभंग तुकयाचे” या ध्वनिमुद्रिका. गोनीदांचे मंगेशकर कुटुंबियांसमवेत घरगुती संबंध. सगळे मंगेशकर गोनीदांच्या लेखनावर फिदा होतेच. गोनीदांच्या “जैत रे जैत” या कादंबरीवर या कुटुंबाने सिनेमा काढलेला. एकदा मुंबईतील त्यांच्या घरी गोनीदा ज्ञानेश्वरांच्या विराण्या ऐकवत होते. त्यातील गोडवा सगळ्यांनाच भावला. मग हृदयनाथांनी ते लताच्या आवाजात करण्याचं ठरवले. सहकार्याला गोनीदा होतेच.

मग तो प्रकल्प सिद्धीस गेला व आजही लतादीदींच्या आवाजातील त्या विराण्या, ते अभंग ऐकणं हा आपल्यासाठी एक आनंदाचा ठेवाच आहे. गीतेतील अध्याय रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडीओची उपलब्धता, लतादीदींची अन्य रेकॉर्डिंग यातून अवघा ८-१० दिवसांचा वेळ मिळालेला. त्यात ते जमवायचं म्हणजे कठीण गोष्ट. मात्र गोनीदांनी दीदींना रोज कित्येक तास संथा दिली. प्रत्येक उच्चार घासून पुसून बसवून घेतला. लतादीदीनी मेहनत घेतली व एक सुंदर रेकॉर्डिंग रसिकांना लाभले.

गोनीदांच्या मित्रपरिवारात हजारो जण. तिथे आर्थिक परिस्थिती, प्रतिष्ठा, समाजातील स्थान या गोष्टी गौण होत्या. कोणताही गाजावाजा न करता ते अनेक रुढींचे निर्मूलन स्वतः करत. राजमाचीचा खंड्बा उंबरे, रायगडावरील आवकीरकर, राजगडावरील भिकुले पासून अनेक लहान मोठ्या घरातील थेट स्वैपाकघरापर्यंत त्यांचा संचार होता. वैभव वा दारिद्रयापेक्षा लोकांच्या मनातील श्रीमंती त्यांना जास्त भावणारी होती. अशा शेकडो लोकांशी त्यांचे जे मैत्र जुळले ते त्यांच्या माघारी कुटुंबीयासोबतही टिकले आहे.
ज्यांना गोनीदांचा प्रत्यक्ष सहवास लाभला नाही अशा कित्येकांना त्यांचा सहवास मिळाला तो त्यांच्या पत्रातून. गावोगावी, देशोदेशीच्या हजारो लोकांशी अप्पांची पत्र-मैत्री. लहानशा पोस्ट कार्डावरील देखण्या अक्षरातील यातील कित्येकांनी अप्पांची स्वतःला आलेली १-२ पत्रेसुद्धा किती मनापासून जपली आहेत. ते पाहिले की हा अकृत्रिम स्नेहबंध पाहून मन भरून येते.


त्यांच्यासोबत ज्यांनी भटकंती सुरु केली तेही आज साठीच्या घरात किंवा त्यापलीकडे पोचलेत. त्यांनीही नवे भटके घडवलेत. “आपल्या अप्पांची” विचारधारा पुढे चालवलीय. अप्पांना जाऊनही आज जवळपास २० वर्षे होत आली पण आजही “अप्पांच्या” आठवणीने त्यांची मने फुलून येतात.

साहित्य व दुर्गप्रेम यांचा मेळ घालत गेली काही वर्षे “गोनीदा प्रेमी” “दुर्ग साहित्य संमेलन” उत्साहाने आयोजित करतात. त्याव्यतिरिक्त विविध संघटना दुर्ग-संवर्धनाचे काम करताहेत. गोनीदांचे साहित्य नव्या पिढीलाही भुरळ घालत आहे हे खूप आशादायक चित्र आहे.

ज्या माणसाने या देशातील मातीवर जीवापाड प्रेम केले त्याची आठवण ठेवत सर्व लोकांनी या विविध कामात खारीचा वाटा उचलणे यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट ती काय?

गोनीदांच्या साहित्याच्या छायेत सदैव राहण्यासारखे सुख नाही हेच खरं. आता अधिक काही न सांगता थांबतोच. अप्पांच्याच भाषेत सांगायचं तर...

इति तुमचाच सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)