marathi blog vishwa

Wednesday, 25 May 2016

कोकण आणि शिवाजी महाराज

शिवाजी महाराजांचा “राजकीय कारकिर्दीतील आवडता प्रांत कोणता ?” असं जर कुणी विचारले तर निःसंशय मी उत्तर देईन की कोकण प्रांत हा शिवरायांच्या अत्यंत आवडीचा विषय होता.
शिवरायांची उपलब्ध पत्रे, पंत अमात्यांचे आज्ञापत्र, अन्य चरित्रविषयक साधने याचे वाचन करताना मला तरी असेच जाणवले. का बरे त्यांना या कोकणभूमीचे इतके महत्व वाटले असेल? हे माझ्या परीने मांडायचा केलेला हा प्रयत्न.



….. तोरणा व मुरुंबदेवाचा डोंगर शिवबा राजेंच्या ताब्यात आल्यानंतरचे ते दिवस. सळसळते युवा शिवबा तोरण्यावर उभे होते. समोर स्वच्छ आकाशातून पश्चिमेचा भाग पाहताना अचानक त्यांच्या नजरेला दूर डोंगराआडून हळूच खुणावणारा एक सुळका दिसला. राजांनी शेजारच्या दोस्ताला विचारलं त्याविषयी.
तो म्हणाला, “शिवबाराजे, अहो त्यो तर लिंगोबा किंवा लिंगाण्याचा परबत...लई मोठं गचपण हाय तिथं, कोकनात उतरणाऱ्या २-३ वाटा हैत की त्या बेचक्यात...”
कोकण म्हणताच राजांचे डोळे चमकले. निसर्गाचं ते कवतिक पाहायला उतावीळ झाले. त्यांचे कशातच लक्ष लागेना.

काही वेळात त्या अडचणीच्या डोंगर दऱ्यामधून २५-३० जणांची तुकडी सुसाट दौडत ते कवतिक पाहायला गेलीसुद्धा. झाडी-झुडपं, अजस्त्र वेली, कमरेइतक्या गवतातून वाट काढत अचानक सगळे कड्याच्या टोकावर येऊन थांबले. सरळ सुमारे २५०० फूट तुटलेल्या त्या कड्याच्या पायथ्याशी किर्र जंगल होतं. तर अगदी पट्कन उडी मारायचा मोह व्हावा अशा समोरच्या खाईपलीकडे तो लिंगाणा जमिनीपासून निघून आकाशापर्यंत उंचावला होता. निसर्गाचे ते भव्य कवतिक पाहताना राजांचे भान हरपले.

किती भव्य ते दृश्य..! सभोवती पसरलेल्या सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगर रांगा, त्यातून माथे उंचावलेली शिखरं, डोंगरातून फुफाटत वाहणाऱ्या ओढे-नाल्यांनी बनवलेल्या घळी, कड्यांच्या पोटातून उतरणाऱ्या इवल्याश्या वाटा, दूर तळातून वाहणाऱ्या नद्यांची पात्रे, स्तिमित होऊन शिवबा ते सारं पाहत राहिले....!

पहिल्या प्रथम त्यांच्या मनात विचार आला की क्षितिजावरील त्या दूर डोंगरांपलीकडे असलेल्या समुद्रापर्यंत कोकणातलं हे सारं आपल्या स्वराज्यात कायमस्वरूपी हवं. मग कितीही मोठ्या शत्रूला सहज अंगावर घेऊ शकतो आपण...”


कोकणपट्टी. हा तसं पाहिलं तर एक अडचणीचा चिंचोळा पट्टा. सह्याद्रीच्या अक्राळ विक्राळ डोंगररांगेच्या माथ्यापासून ते समुद्रापर्यंत सुमारे ४० किलोमीटर रुंदीचा हा पट्टा. थेट डहाणू तलासरी पासून गोव्यापर्यंतचा. त्यातूनच लहान मोठे डोंगर अधे मध्ये उभे. मात्र या सगळ्या पट्ट्यात सह्याद्री अफाट वेगळेपण देऊन जातो. उंच पर्वत रांगांमुळे इथे दरवर्षी सुमारे ३-४००० मिलिमीटर पाऊस पडतो. त्यातच फोफावलेली सदाहरित व पानगळीची जंगले. साधारण वर्षाचे ८-१० महिने वाहणाऱ्या नद्या, बारमाही भरलेल्या खाड्या, मोक्याच्या ठिकाणी बंदरे, तिथून सुरु असलेला देशो-देशीचा व्यापार, आल्या परिस्थितीशी धीराने सामना करणारी मेहनती लोकं. नारळ, पोफळी, आंबा, काजू, मीठ, भात, नाचणी, वरी अशा उपयुक्त व किंमत मिळवून देणाऱ्या गोष्टींची निर्मिती करणारा हा कोकण प्रांत.
म्हणूनच तर कोकण प्रांताला एके ठिकाणी शिवराय “नवनिधी” असेही म्हणून जातात..!

हा कोकण प्रांत शिवरायांच्या गरुडासारख्या नजरेतून सुटला असता तरच ते नवल होतं. वयाच्या १४-१५ व्या वर्षी राजांच्या खटाटोपाला सुरुवात झाली. रोहिडा, तोरणा, राजगड उभे राहू लागले स्वराज्यासाठी. मगाशी सुरुवातीला माझ्या कल्पनेतला प्रसंग सांगितला तसं कदाचित कधीतरी शिवबा त्या “रायलिंगच्या पठारावर” नक्कीच उभे राहिले असतील. समोरच्या दरीतून उंचावलेला लिंगाणा सुळका, पल्याडचा रायरी, त्यापलीकडचे कोकणदिव्यासारखे डोंगर-सुळके, त्यातल्या अनघड वाटा, व या साऱ्यांचे रक्षण लाभलेला तो कोकणी प्रांत. आजही आपण भारावून तो नजारा पाहतो, तर राजांची अवस्था काय त्याहून वेगळी असणार?


सुरुवातीच्या काळातील हे काही किल्ले घेतल्यानंतर लगेचच उत्तर व मध्य कोकण ताब्यात घ्यायला राजे साधारण एकाच वेळी आतुरलेले दिसतात.
म्हणूनच जरा काही सैन्य व रसद हाताशी तयार झाल्या-झाल्या राजांनी मोहिमा उघडल्या त्या जावळीच्या खोऱ्यात व कल्याण-भिवंडीकडे. हे काही सोपं होते का? तर मुळीच नाही. जावळीचे खोरे हे वाई प्रांताला लागून. वाई प्रांत धिप्पाड व बलदंड अफझलखान याची सुभेदारी. जावळीतील चंद्रराव मोरे यांच्या माघारी ते खोरं जणू आपलंच असा त्याचा जणू ठाम समज. तर कल्याण-भिवंडी ते जुन्नर हा सगळा व्यापारी दृष्ट्या मोलाचा वव मोक्याचा प्रांत थेट युवराज औरंगजेब याच्या ताब्यात.
शिवारायांशिवाय दुसरा कुणी असता तर त्याने हे धाडस कदापि केले नसते. राजानी मात्र धडाक्यात जावळीवर आक्रमण केले आणि कल्याण भिवंडीवर सुद्धा. १६५०-१६५९ या काळात अवघ्या पंचविशीत असलेला हा कोवळा युवक सोबत्यांच्या साथीने किती जीवावरचे धाडस करत होता याची कल्पनासुद्धा थरार निर्माण करते. ज्या दोघांची कीर्ती संपूर्ण हिंदुस्तानभर पसरलीय त्यांना थेट ललकारून शिवराय स्वराज्य वाढवू लागले ते कोकणात..!
“एका लहान चिंचोळ्या अवघड किनारपट्टी प्रांतासाठी किती का अट्टाहास ? कशाला त्या कोकणाकडे एवढे लक्ष द्यायला हवे?” असं नक्कीच त्यांना काही थोरामोठ्यांनी सुनावले असेलच (जसं आपल्या राज्यकर्त्यांनी १९४७ ते १९९० पर्यत कोकणाकडे दुर्लक्षच केले होते तसेच..!)
मात्र त्या कोवळ्या युवकाचे, त्याच्या मार्गदर्शक व सोबती मंडळींचे नियोजन पक्के होते.
जावळीचे खोरे जिंकताच तिथले पूर्वीपासूनचे किल्ले हाती लागले. रायरी, चंद्रगड, मंगळगड इ.  सभोवतीचा परिसर हातात येताच स्वराज्याची सीमा सागराच्या जवळ पोचली. अफझलखानाची आदिलशाही, मोगल यांच्यासोबत राजांना नवा व ताज्या दमाचा शत्रू लाभला- सिद्दी..! इंग्रज, पोर्तुगीज इ. मंडळी कुरबुर करायला होतीच.
वयाच्या पंचविशीत जिथे आज अनेक मुलांना राज्यातील गावेसुद्धा माहित नसतात तिथे हा युवक दुसऱ्या प्रांताला आपल्या राज्यात सामील करायला उतावीळ झाला होता..!

तसंच नुसतं नवे प्रांत जिंकून आपण मोठे होत नाही याचे भान शिवरायांना व त्यांच्या टीमला होतेच. नवा प्रांत हाती येताच त्याच्या सुरक्षेसाठी प्रतापगडची उभारणी सुरु झाली. संपूर्ण पट्ट्यात रहदारीचे व माल-वाहतुकीचे १५-२० मुख्य घाट व इतर काही कमी वापरातील घाट-वाटा होत्या. त्याच्या रक्षणासाठी काही पूर्वीचे किल्ले होतेच. त्यांची डागडुजी व नव्या किल्ल्यांची निर्मिती सुरु झाली. कल्याण पासून रत्नागिरी राजापूर पर्यंतचा प्रांत ताब्यात यावा, व आल्यानंतर हातातून कधीच निसटू नये यासाठी अथक परिश्रम सुरु झाले. अलिबाग, चौल या पट्ट्यापासून ते विजयदुर्ग बंदरापर्यंत विविध बंदरांच्या रक्षणासाठी फौजा धाऊ लागल्या.
मात्र या पट्ट्यात दुहेरी युद्ध करावे लागणार होते. डोंगरी युद्धात मावळे तरबेज होतेच पण त्यांना मर्यादा पडत समुद्राच्या / खाडीच्या.
सिद्दीसारखा शत्रू हा पराभव समोर दिसताच पट्कन खाड्या-समुद्रातून पलायन करे व मावळ्यांना हात चोळत मागे फिरावे लागे. पुन्हा त्याने अचानक हल्ला करताच पुन्हा गडबडीने धावून जावे लागे. सुरुवातीच्या काही संघर्षातून मग महाराजांना क्रांतिकारी कल्पना सुचली. ती म्हणजे आपलं आरमार, नौदल असावं याची.!

काही जण हल्ली सांगतात की भारतातील पहिले आरमार हे शिवाजी महाराजांचे. ते तितके खरे नव्हे. राजांच्या पूर्वी सातवाहन, गुप्त, विजयनगर, कदंब, चालुक्य, पुलकेशी, तामिळनाडू प्रांतातील चोला व पांड्य आदि राजवटींच्या काळात आपल्याकडे उत्तम नौकानयन होते. म्हणूनच तर भारतीय लोक प्राचीन काळी थायलंड, कंबोडिया, मलेशिया आदि प्रांतात गेले होते. मात्र १२९६ पासून उत्तरेतून मुस्लीम आक्रमक भारतावर ज्या क्रूरपणे तुटून पडले त्यानंतर त्याच्यासमोर सर्व काही थंड होऊन गेलं. बहामनी सुलतान, मोगल, बहामनी राजवटीतून निर्माण झालेल्या आदिलशाही, निजामशाही सारख्या राजवटीनी मग सागरी बंदरांवर सुद्धा आपले वर्चस्व निर्माण केले. दाभोळ बंदर तर आदिलशाहीचे खास बंदर. व्यापाराबरोबर हाज यात्रेसाठी सुद्धा मंडळी इथूनच रवाना होत असायची.
या सगळ्यांनी मग स्थानिक कोकणी जनतेला फार फार लुबाडून घेतलं. त्यांचं पीक उध्वस्त करायचं. असेल ते सारं लुटून न्यायचं. १०-१२ वर्षापासूनच्या सर्वाना गुलाम म्हणून राबवायचं, स्त्रियांवर दिसेल तिथं अत्याचार करायचे यात अवघी कोकणपट्टी भरडून निघत होती. आपल्याच हक्काच्या जागेत गुलामगिरीचे जिणे त्यांच्या नशिबी आले होते.

हे सारं बदलायला सुरुवात केली शिवाजी राजांनी. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी स्वतः स्वराज्याचे नौदल / आरमार उभं करायला सुरुवात केली ती कल्याणच्या बंदरात. उल्हास नदीकिनारी असलेले कल्याण व पनवेल पर्यंतचा प्रांत स्वराज्यात नुकताच आला होता. पनवेलच्या मागे उभा असलेला बलदंड मुरंजन दुर्ग “प्रबळगड” म्हणून स्वराज्यात दाखल करून घेतला गेला. त्याचे लहान मोठे जोडीदारही पाठोपाठ स्वराज्यात आले. बोर घाटातली श्रीवर्धन- मनरंजनची दुर्गजोडी स्वराज्यात आली. त्यांच्यासोबत अन्य गडकोटही ह्या नव्या उपद्व्यापाला संरक्षण पुरवू लागले. पोर्तुगीज मंडळी आधीच राजांच्या घोड्दौडीने धसकून गेलेली. त्यांची योग्य ती नाकेबंदी झाल्यामुळे त्यांनी मुकाट्याने मग काही नाव बांधणारे तंत्रज्ञ शिवरायांना दिले.

नौदलाच्या ताफ्यात नव्या नव्या नौका, गलबते, शस्त्र सामग्री सामील करून घेण्याचा उद्योग मग अखंड चालूच राहिला. नौदलाच्या मजबुतीसाठी किनाऱ्यावर नवे जलदुर्ग विकसित होऊ लागले.

अफझलखान, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान यांच्यासह अन्य सरदारांच्या स्वाऱ्या झाल्या तरी कोकणातील उद्योंगात कधी खंड पडला नाही. राजांनी कधीच तिकडे दुर्लक्ष केले नाही.

सिंधुसागरातील मुरूडच्या किनाऱ्यावर दिमाखात उभ्या असलेल्या “जंजिरे मेहरूब” ने शिवरायांना सतत सतर्क ठेवलं. स्वतःच्या व अन्य सेनानीच्या मोहिमातून जलदुर्ग जिंकून तिथल्या सिद्दीला कायमचं पराभूत करणे शक्य होईना म्हटल्यावर शिवरायांनी नवी खेळी केली. त्या परिसरात कित्येक गड-जलदुर्गांची साखळी तयार करून त्याची कोंडी केली. ज्या सागरी किनाऱ्यावर पूर्वी मराठी नौकांना पोर्तुगीज परवाना लागत असे, तिथे १०-१५ वर्षात मराठी झेंडा असलेली गलबते तोऱ्यात संचार करू लागली. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, रत्नदुर्ग, पद्मदुर्ग, खांदेरी, गोपाळगड, हिंमतगड अशा बलदंड दुर्गानी खाड्या, सागरकिनारे संरक्षित केले. मग प्रसंगी मराठी आरमाराने  सिद्दी, इंग्रज व पोर्तुगीज यांनाही आपल्या अंकुशाखाली ठेवले. संपूर्ण व्यापार आपल्या ताब्यात घेतला.

कोकणच्या सुरक्षेचे काम समाधानकारक झाल्यावर इतर प्रांतासारखेच शिवरायांनी महसूल गोळा करण्याला महत्व दिले. लोकांच्या जीवनाचा अभ्यास केला. कोकणातील कित्येक गावात जमिनी पाडून होत्या. त्या कसायला कुणी तयार नव्हते. त्या जमिनी मेहनती शेतकऱ्यांना दिल्या. सारा वसुली वस्तू-रूपाने सुरु केली. कोकणात ज्या नारळ-सुपारीला जास्त भाव मिळत नाही, ती येथे खरेदी करून घाटावर चढ्या दराने विक्री करायचे धोरण अवलंबले. यामुळे शेतकऱ्यांना मोबदलाही मिळू लागला व अधिक दराने विक्री केल्याने नफा होऊ लागला.
वाटेतील रस्ते, घाट याठिकाणी चौक्या लावून जकातीची व सुरक्षेची व्यवस्था केली.
नुसतं इतकंच करून स्वराज्याचे शिलेदार गप्प बसले नाहीत. एका कागदपत्रात तर अशी नोंद आहे की राजांनी तळकोकणात मोहिमेला जाताना आपला जुना साथीदार तानाजी मालुसरे यांना चिपळूण-संगमेश्वर परिसरातील रस्ते व घाट दुरुस्त करायचे, रुंद करायचेच काम दिले होते...!

राजांनी जी शेकडो पत्रं लिहिली त्यातील काहीच उपलब्ध आहेत. सुदैवाने कोकणातील घडामोडींबाबत त्यात जास्त पत्रे दिसतात. कुडाळच्या सुभेदाराला त्यांनी लिहिलेल्या एका पत्रात मिठाचा मामला समोर येतो. कोकणातील मीठ जास्त खपावे, बारदेशातील पोर्तुगीजांच्या प्रांतातील मिठापेक्षा आपले मीठ स्वस्त उपलब्ध व्हावे म्हणून राजे सुभेदाराला त्यांच्या मिठावर “चढ्या दराने जकात लावायचे आदेश” देतात. यामुळे साहजिकच आपले मीठ स्वस्त होऊन जाते.

राजांनी वापरलेली ही साधी व्यापारी नीती पुढच्या काळात आपल्या अन्य राज्यकर्त्यांना स्वातंत्र्यानंतर सुद्धा वापरावीशी वाटली नाही.

मिर्झा राजे जयसिंह यांची स्वारी, माघार घ्यावी लागल्याने झालेला तह यातून सुद्धा राजांनी कोकणातील जास्तीत जास्त प्रांत आपल्याकडेच कसा राहील यासाठी मुत्सद्दीपण पणाला लावलेले दिसते. त्यावेळची धामधूम, नंतर आग्र्याची नजरकैद या सगळ्यातून सुद्धा राजांच्या माघारी जिजाबाईसाहेब सर्व कोकणावर लक्ष ठेवून असल्याचे दिसते. राजांचे याच काळातले एक पत्र सिंधुदुर्गची उभारणी होत असतानाचे आहे. त्यात बांधकामाविषयीच्या बारीक बारीक सूचना देताना म्हटलं आहे की, “ चुन्यात, वाळूत भेसळ होणार नाही याची दक्षता घ्या. वाळू धुऊन घ्या. इंग्रजांशी व्यापार करताना सावध राहा. मजुरांना पुरेशी मजुरी द्या.”


तसंच एक पत्र आहे शिवरायांच्या शेवटच्या ५ वर्षाच्या काळातलं. मुरुड-जंजिरा ताब्यात येत नाही हे दिसल्यावर समोर समुद्रातील खडकावर पद्मदुर्गचे बांधकाम सुरु झालेलं तेंव्हा. त्यासाठी सैनिकी सुरक्षा तर मिळाली पण त्या तुकडीला रसद पुरवठा करणाऱ्या प्रभावळीच्या जिवाजी सुभेदाराने ढिलाई दाखवली. त्याला लिहिलेले कडक पत्र उपलब्ध आहे.
एकूण पत्राचा सूर पहाता तो बहुदा शत्रूला सामील होण्याच्या स्थितीत असावा असे वाटते. राजे लिहितात त्यातील काही ओळी अशा आहेत, “पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी उभी केली आहे. त्याची मदत व्हावी, पाणी, फाटी आदिकरून सामान बेगीने पावावे ते नाही. पद्मदुर्गी तेथे हबशी फौजा चौफेर जेर करत असतील, आणि तुम्ही आरमारास मदत न खोळंबा करा. एवढी हरामखोरी तुम्ही कराल त्यावर साहेब रिझतील काय? ऐशा चाकरास ठीकठाक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? मोरोपन्तांचे पोटास पावोन आरमार घेऊन पद्मादुर्गाचे मदतीस राहणे. याउपरी बोभाटा जालीयावर तुमचा मुलाहिजा करणार नाही...”

या पत्राप्रमाणेच दुसरे पत्र आहे कोकणातील चिपळूणजवळ दळवटणे गावात असलेल्या सैन्य-छावणीच्या प्रमुखाला लिहिलेले. येथे शिवरायांच्या सैन्याची मोठी छावणी असे. राज्याभिषेकापूर्वी या छावणीला दिलेली भेट कागदपत्रातून नोंदली आहे. तसेच तिथल्या प्रमुखाला लिहिलेलं पत्र खूप प्रसिद्ध झाले आहे. घोड्यांची वैरण, दाणा-पाणी, सैन्याची रसद याची काळजी कशी घ्यावी, आसपासच्या गावातील रयतेला जराही त्रास देऊ नये इ. सूचनांची जंत्रीच या पत्रात पाहायला मिळते.
किती बारकाईने स्वराज्याचे काम सुरु असे व त्यात कोकणातील राज्यकारण कसे प्राधान्याने येई याचे ठोस पुरावे म्हणजे ही पत्रे..!

कोकणावर राजांचे प्रेम होतेच पण विश्वास होता तिथल्या दुर्गमतेवर. म्हणूनच अडचणीच्या काळात सर्जेराव जेधे यांच्या सारख्या शिलेदाराला प्रसंगी “घाटाखाली कुटुंब कबिला शिफ्ट करून सुरक्षित ठेवण्याचे” आदेश देणारे शिवबा राजे अन्य एका पत्रात दिसतात.
चारी दिशांची सुरक्षा, व्यापार, दुर्गम घाटवाटा, जंगलं, काटक व अचाट सहनशक्ती लाभलेली माणसे यासोबत राजांना इथले अफाट निसर्गसौंदर्य भुरळ घाले. म्हणूनच एका कागदपत्रात राजे रायगडहून बाणकोट परीसरात समुद्रस्नानाला गेल्याचा मनोहारी उल्लेख आढळतो..!

पश्चिमेकडे जवळ असलेला समुद्र, परिसरातील दुर्गम डोंगर-रांगा, सरळ उठवलेला उंच कातळी पहाड, माथ्यावरील विस्त्रीर्ण पठार असे “स्पेसिफिकेशन” जेंव्हा राजधानीसाठी तयार होत होते तेंव्हा म्हणूनच जे दोन गड निवडले गेले ते सुधागड व रायगड कोकणातील होते हे मुद्दाम अधोरेखित करायला हवे.


स्वराज्य जसे विस्तारत गेले तसे राजे गोवा प्रांत ताब्यात आणायला आसुसलेले दिसतात. गोवा व मुंबई हस्तगत करायचे त्यांचे मनसुबे त्यांच्या हयातीत जरी पूर्ण झाले नाहीत तरी इंग्रज व पोर्तुगीज यांना त्यांनी जबरदस्त शह दिला. गोव्याच्या सीमा बंदिस्त करायला पारगड, महादेवगड, मनोहर- मनसंतोषगड, रांगणा, इ. गडकोटांची साखळी निर्माण केली. मुंबईचीही अशीच नाकेबंदी केली. त्यांच्या माघारी शाम्भूराजेनीही त्यांचे धोरण इतक्या कठोरपणे राबवले की पोर्तुगीज एका पत्रात म्हणून गेले की “शिवाजी राजांच्या पेक्षा संभाजी राजे जास्त भयंकर आहेत...!”
देशाच्या संरक्षणात सागरी किनारा सुरक्षित असावा हे आपल्या शिवरायांचे धोरण मात्र स्वातंत्र्योत्तर काळात विस्मृतीत गेले. विविध दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या काही वर्षात आता सरकार कोकणाकडे डोळे उघडून पाहायला सुरुवात करते आहे. त्यातही प्रदूषणाने इथल्या निसर्गाला अजून डागाळत आहे. मात्र शिवकालाचा जर योग्य अभ्यास केला गेला तर या कोकणाचा अजूनही “नवनिधी” म्हणून उपयोग होऊ शकतो हे नक्कीच समजू शकते.

स्वराज्याचा व शिवकालोत्तर स्वातंत्र्ययुद्धांचा इतिहास पाहिला तरी कोकणाने दिलेले योगदान नक्कीच लक्षात येते. बहुदा म्हणूनच ही स्वातंत्र्यप्रिय भूमी शिवरायांच्या मर्मबंधातली ठेव बनून गेली असावी. अखेरच्या दिवसात उभ्या हिंदुस्तानात स्वराज्य विस्तारायचे ध्येय बाळगताना, जालन्यापर्यंत घोडदौड करताना विश्रांतीसाठी राजे नेहमीच रायगड व किनाऱ्याच्या प्रदेशाला आठवत राहिले. जंजिरा, गोवा स्वराज्यात यावेत म्हणून धडपडत राहिले.


कोकणातून वर घाटावर चढत गेलेल्या प्राचीन नाणेघाटाच्या परिसरात शिवनेरीवर जन्मलेल्या या थोर राजाने शेवटी प्रिय अशा या कोकणातील दुर्गम व बलाढ्य अश्या रायगडावर शेवटचा श्वास घेतला हाही योगायोगच म्हणावा लागेल....! 

-         -  सुधांशु नाईक. ( +९१ ९८३३२९९७९१, ईमेल – nsudha19@gmail.com)