marathi blog vishwa

Saturday, 11 April 2020

अघळ पघळ मायदेव काका...

कित्येक माणसे आपल्या आसपास वावरलेली असतात. कालांतराने आपण  कुठेतरी लांब निघून जातो, कधी ती माणसेही कायमची दुरावतात. मात्र एखादी गोष्ट अशी घडते की त्यांची पट्कन आठवण होते. मायदेव काका अशांपैकी एक. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून जाताना एक माणूस अचानक “गुरुदेव दत्त..” असं जोरात म्हणाला आणि मला पट्कन मायदेव काका आठवले. “गुरुदेव दत्त..” आणि “स्वामी समर्थ” या जयघोषावर जणू त्यांचाच कॉपीराईट असावा इतकं ते त्यांच्याशी जोडलं गेलं होतं..!

“वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा..” ही ओळ बहुदा त्यांच्या सारख्या लोकांसाठीच असावी. ढगळ खाकी कपडे, गळ्यात घाम पुसायला गुंडाळलेला मोठा रुमाल, हातात सायकल आणि कपाळावरचा घाम पुसत जाणारी व्यक्ती म्हणजे मायदेव काका. समोर कुणीही असो, दिसल्याक्षणी “गुरुदेव दत्त” अशी त्यांची हाक ऐकू यायची आणि मग सुरु होई त्यांचं अखंड बोलणं. त्यांना बोलणं अत्यंत प्रिय. समोर लहान-मोठी, गरीब-श्रीमंत अशी कुणीही व्यक्ती असू दे मायदेव काका त्यांच्याशी मनसोक्त बोलत बसायचे. अवघ्या चिपळुणात सर्वांना त्यांची ही सवय माहिती. त्यामुळे कित्येक जण अनेकदा “मायदेव हल्ली कुठे दिसला नाही..” असं औपचारिकपणे न म्हणता, “ गुरुदेव दत्त कुठायत सध्या? दर्शन नाही बरेच दिवस..” असंच विचारायचे.
 अघळपघळ बोलणारे मायदेव काका गावभर सर्वत्र सुखेनैव संचार करायचे. सर्वांशी खूप बोलायचे. कुणाला ते आवडायचं...कुणी त्यांची टिंगल करायचं. त्यांनी मात्र मोकळं वागणं कधी सोडलं नाही.
मायदेव काका उर्फ चंद्रकांत मायदेव हे पंचायत समितीत शिपाई होते. चिपळुणात पागेवर आम्ही तात्या चितळेंच्या घरी राहायचो. तिथं मला आयुष्यात पहिले दोन मित्र मिळाले. एक म्हणजे बर्व्यांच्या चाळीत राहणारा वासुदेव चंद्रकांत मायदेव आणि दुसरा पलीकडे गोडसे चाळीत राहणारा मिलिंद तांबे. बालवाडीपासून आम्ही तिघे एकत्र असायचो. वासुदेव ला आम्ही सगळे कायम “माय God” या नावाने हाक मारीत असू. त्यामुळे पागेवर सर्वत्र भटकणे, विविध उत्सवात सहभागी होणे, खेळणे, पोहणे हे सगळं सुरु असे.
बर्व्यांच्या चाळीत जिन्याच्या खाली साधारण १० बाय १० च्या खोलीत मायदेव काकांचा संसार. काका-काकू आणि माझा मित्र असे तिघे तिथे राहायचे. ती लहानशी खोली अजून आठवते. एका बाजूला अंघोळ करायला लहानशी मोरी, पलीकडे एका टेबलवर gas शेगडी, पलीकडे काही डबे ठेवायला लहानसं कपाट, मध्ये दोरीवर अनेक कपडे टाकलेले, पलीकडे असलेली एक कॉट म्हणजे तिथली बेडरूम. तरी त्या खोलीत काका सुखाने राहायचे. आपलं घर लहान आहे, इतरांच्या तुलनेनं खूप नीटनेटकं नाही यामुळे खिन्न न राहता आल्यागेल्याचं छान आदरातिथ्य करायचे. आम्ही कुणी कधी घरी गेलो की, “बस रे..चहा टाकतो पट्कन..” असं म्हणून चहाच्या तयारीला लागायचे. सोबत बोलणं सुरूच असायचं. शाळेत काय सुरु आहे.. नवीन पाठांतर काय केलं वगैरे चौकशा सुरु असायच्या.
मायदेव काका मूळचे माखजन जवळील बुरुम्बाड चे. गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या काकांचे प्राथमिक शिक्षण तिथे झाले. त्यासोबत पुरुषसूक्त, श्रीसूक्त, रुद्र, सौरसूक्त, पूजाविधी आदि गोष्टीही तिथेच शिकले. पुढे कवी वा. गो. मायदेव ( गाई घरा आल्या या प्रसिध्द कवितेचे कवी) यांच्या परिचयातून त्यांना अमरावतीला नोकरी मिळाली. तिथे २-४ वर्षे राहिले. तिथंच तबला ही शिकले. मात्र माडा-पोफळीत, आंब्या-फणसात रमणारा हा कोकणी माणूस तिथं रमू शकला नाही. मग चिपळुणात दाखल झाले. पडेल ते काम करू लागले. कधी लघुरुद्र कर, कधी पूजा कर, कधी कुणासाठी काही कामं कर हे सांभाळून नोकरी देखील.
आम्ही नंतर पागेवरचे घर सोडून पंचायत समितीसमोर पाटकर चाळीत राहायला गेलो, त्यानंतर बुरूमतळीला केतकरांच्या घरात. इथे दोन्हीकडे मायदेव काका नेहमी यायचे. कुणाच्याही घरी त्यांचा सहज संचार अगदी थेट स्वैपाकघरापर्यंत असायचा.
आमच्याकडे आले की थेट आईला सांगायचे, “ वहिनी घोटभर चहा टाका हो..”.. आणि मग थेट, “काय म्हणतायत सगळे..” असं काहीबाही विचारून गप्पांना सुरुवात. बाबा असले की म्हणायचे, “ तुम्ही रुद्र वगैरे संथा घनुअण्णांकडून घेतलीये. तुमचे उच्चारही खणखणीत आहेत. तुमचं वाचन भरपूर. तुमच्याकडून नवी माहिती मिळते..वगैरे..वगैरे..” बाबांना उगीचच मोकळ्या-धाकळ्या गप्पा आवडत नाहीत हे कधीतरी त्यांच्या लक्षात आले. मग अवांतर फारस बोलायचे नाहीत. ते घरी आले की आम्हा मुलांच्या पोटात मात्र गोळा यायचा. कारण ते किंवा भार्गवकाका काळे हे नेहमी आम्हाला स्तोत्रं किंवा सुक्तांची कोडी घालायचे.
मायदेव काका देखील आल्यावर जरा वेळानं विचारायचे.. “ अमुष्यत्वत्सेवा समधीगतसारंभुजवह...” च्या पुढचं सांग पाहू.. मग आमच्या मेंदूतलं केंद्र ही ओळ कशातली हे शोधायला धडपडे. जर पट्कन “ बलात कैलासेपित्वधीवसत...” असं आम्ही पुढे म्हटलं की एकदम खूष होऊन जात. कधी महिम्न, कधी सौरसूक्त कधी रुद्र यातील काहीतरी विचारायला आवडे त्यांना. आम्हा मुलांना मात्र भीती वाटे चुकलं तर ओरडतील याची. पण ते कधी ओरडले नाहीत. त्यांचा स्वभाव मायाळू होता. स्वतःच्या आणि इतरांच्याही मुलांवर जीव होता त्यांचा. पुढे मोठं झाल्यावर देखील अनेकदा ते हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजला वगैरे आले तरी मला सांगायचे, “आमचा वासुदेव आहे ना रे नीट. करतो ना रे अभ्यास. त्याच्यावर सगळी आशा आमची. सांभाळून घ्या रे तुम्ही सगळे त्याला.” असं काहीतरी सांगून मग सगळ्या मुलांना काही खाऊ द्यायचे. कधी लाडू, कधी फरसाण, कधी चकली, कधी चिवडा... त्यांची परिस्थिती कशी हे पूर्ण माहिती होतं सगळ्यांना. त्यामुळे त्यांनी कधी काही दिलं नसतं तरी कधी राग आलाच नसता. मात्र ते कधीही रिकाम्या हाताने वावरले नाहीत. कित्येकदा रस्त्यात भेटले तरी पट्कन खिशातून चणे – शेंगदाणे काढून देत.
त्यांच्या अघळपघळ स्वभावामुळे, उगीचच प्रत्येकाशी घसट करत बोलण्यामुळे अनेकजण त्यांना नावंही ठेवत. त्यांची चेष्टा करत. मात्र त्या चेष्टेला त्यांनी कधी चिडून दुरुत्तरे केली नाहीत. कधी वादावादी केली नाही. मात्र स्वतःचा स्वभावही बदलला नाही. वासुदेवची आई अंगणवाडी सेविका होती. तिथे शाळेत शिकवायची. कधी त्याही आमच्याकडे यायच्या. आईसोबत गप्पात रमायच्या. नवऱ्याच्या तऱ्हेवाईक स्वभावाबद्दल, कधी कुठे दुखलं खुपलं असेल तर त्याबाबत सात्विक संतापानं बोलत बसायच्या. मन मोकळं करायच्या. हे असं सगळ्या संसारात असतंच. मात्र त्या दोघांचं नातं हे काही खास असायचं. दोघांचा आपल्या मुलावर प्रचंड जीव होता. आपला मुलगा मोठा व्हावा यासाठी खरंच अखंड राबले दोघंही.
त्यांना आपल्या मुलाचं मोठं होणं पाहता आलं. लहानशा त्या एक खोलीच्या संसारात या तिघांचं जगणं कसं असेल याची कल्पनाही करवत नाही. मात्र माझा मित्र हा वासुदेव उर्फ मायgod हाही वेगळाच. त्यानंही कधी जे नाही त्याबद्दल तक्रारीचा सूर काढला नाही. जे जसं मिळेल त्यात तोही मजेत राहिला. खेळ, नाटक, बासरी वाजवणे, अभ्यास या सगळ्यात मनापासून सहभागी होत राहिला. इंजिनिअर झाला. 
आपला मुलगा गुणी आहे याचा अभिमान मायदेव काकांच्या बोलण्यात नेहमीच असायचा. आज तो मुंबईत आहे. वीज कंपनीत मोठ्या पदावर आहे. तो तेंव्हा नुकता कुठे स्थिरावलेला. ते पाहून एकदिवस मग काका हे जग सोडून निघून गेले.
हल्ली माझंही चिपळूणला जाणंही कमी झालंय. कधी गेलो की रस्त्यावरून जाताना अवश्य वाटतं की कुठेतरी मायदेव काका सायकलवरून येताना दिसतील...आणि कानावर खणखणीत हाक येईल... “गुरुदेव दत्त..स्वामी समर्थ...”
 “कधी आलायस रे..घरचे सगळे कसे आहेत..?” असं विचारत नेहमीच्या पध्दतीने ते गप्पा मारायला सुरुवात करतील. बघता बघता २०-२५ मिनिटं निघून जातील. मग जाता-जाता हातावर थोडेसे चणे ठेवतील.. “ छान सुखी रहा रे सगळे..” असं सांगत सायकलवरून निघून जातील. त्या हातावरच्या चण्याना नेहमीप्रमाणे निःस्वार्थी स्नेहाचा सुगंध असेल.
दरवेळी असं वाटतं की लहानपणी पाहिलेली ही अशी माणसं अजूनही तशीच असतील..तशीच भेटत राहतील.. पण आता ते कधीच घडणार नसतं...कधीच घडणार नसतं..!
-    सुधांशु नाईक (९८३३२९९७९१), कोल्हापूर.

Sunday, 5 April 2020

तेजस्वी सुनीताबाई....

सुनीताबाई. काही मोजके साहित्यप्रेमी वगळता त्या आता जणू सर्वांच्या विस्मरणातच गेल्याहेत. मंगला गोडबोले यांच्या " सुनीताबाई" या पुस्तकानं त्यांच्याबाबतच्या विचारांना पुन्हा चालना दिली. त्यानिमित्ताने हे लेखन....

पु.ल. देशपांडे या खेळिया ची ही अर्धांगिनी. त्यांच्याइतकीच कर्तृत्ववान, त्यांच्यारखीच प्रतिभावान अन् त्यांच्यापेक्षा सामर्थ्यवानही!
सुनीताबाईंचं सामर्थ्य अनेक बाबतीत लख्ख जाणवणारं आहे. एका चांगल्या घरची ही मुलगी पुढे बेचाळीसच्या चळवळीत भूमिगत क्रांतिकारक/ कार्यकर्तीचं काम धडाक्यात अन् जबाबदारीने पार पाडते. नंतरच्या आयुष्यात जेव्हा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा मुद्दा येतो तेव्हा नया पैसा घ्यायलाही नाकारत म्हणते, " देशसेवा हे माझं कर्तव्य होतं. मी केलं. ती काय नोकरी नव्हती पेन्शन घ्यायला." खोटे दाखले जोडून जेव्हा काहीजणांकडून आयुष्यभर पेन्शन मिळवली जाते तेव्हा असं करणा-या सुनीताबाईंचं तेजस्वीपण अधिक तळपदारपणे समोर येतं. 

त्यांचा सर्वत्र संचार असाच होता हे अनेकजण सांगतात. खरंतर आम्ही जरा कुठे वयात आलो, चार गोष्टी उमगू लागल्या तेव्हा  हे दोघंही उतारवयात होते. बहुतेक सर्वच कार्यक्रम बंद झालेले. क्वचित कुठेतरी भाषणाला पु. ल. जात असायचे. आमच्या चिपळूणच्या वाचनमंदिराच्या इमारतीचा जीर्णोध्दार झाला तेव्हा पुलंनी केलेलं भाषण ऐकलेलं. तितपतच त्यांचा वावर उरलेला.

त्यामुळे माझ्या पिढीला पु.ल.- सुनीताबाई भेटले ते मुख्यत: पुस्तकांतून, आॅडियो- विडियो रेकाॅर्डिंग्ज मधूनच.
" आहे मनोहर तरी.." मधून किंवा " जीएंच्या पत्रसंवादातून" सुनीताबाई सामो-या आल्या होत्याच. तर नंतरच्या काळात सोयरे सकळ किंवा मण्यांची माळ सारख्या पुस्तकांतूनही. मात्र त्यापेक्षा जास्त ठसठशीत असं त्यांचं दर्शन जे घडलंय ते इतरांच्या लेखनातून.

***
बहुतेकांच्या लेखनात त्यांचं कठोरपण, करारीपण, बारीक बारीक तपशील पहाण्याची काटेकोर नजर व छानछोकीत न रमलेलं साधेपण जाणवतंच. त्या पलीकडे जात आपल्या नव-याला जपणारी, त्याचं कलाविश्व फुलतं रहावं म्हणून अनेक गोष्टी सांभाळणारी, प्रसंगी बदनामी स्वीकारायला तयार अशी जी खमकी स्त्री दिसते ती भन्नाट आहे. 
त्यात परत गंमत अशी की त्यांनाही प्रतिभेचं वरदान आहे, त्यांच्याही अंगी उत्तम अभिनयक्षमता आहे, त्यांच्याही लेखणीवर सरस्वतीचा वरदहस्त आहे तरीही कोणतीही ईर्षा न बाळगता, त्या स्वत:चं सगळं बाजूला सारुन नव-याला फुलू देतात. तेही पुन्हा युगायुगांच्या सोशिक स्त्रीमूर्तीसारखी न बनता..! प्रसंगी नव-याला लेखनातल्या चुका परखडपणे सुनावतात. कित्येक गोष्टी पुन्हा लिहायला उद्युक्त करतात.
नव-याच्या सवयींचे लाडकोड पुरवताना त्याच्यासोबत अनेक कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवतात. प्रसंगी कौतुकाची अपेक्षा न करता, झालेल्या कौतुकानं शेफारुन न जाता नवनिर्मितीचा ध्यास बाळगतात. 
हे सारं करताना त्यांच्यातलं गृहिणीपण कधीही सुटत नाही. म्हणूनच पैसा असो वा ओढग्रस्तीचे दिवस, त्या सगळ्या गोष्टी निगुतीनं निभावून नेतात. परत काहीही करताना तडजोड करत कसंतरी न उरकता केलेल्या प्रत्येक गोष्टीत सर्वोत्तम दर्जा जपायची अथक धडपड करतात.

***
मंगला गोडबोलेंच्या पुस्तकात या सर्व गोष्टी जाणवू देणारं मग बरंच काही दिसत रहातं. 
उदा. हे पत्र पहा.. मोहन ठाकूर हे बंधू त्यांच्या पत्रात सुनीताबाईंविषयी लिहितात, 
" माईच्या काटकसरी रहाण्याची आम्ही काहीजण खूप चेष्टा करायचो. उधळपट्टी न करण्यामागे तिचा एक उद्देशही होता. सांसारिक गरजा अधिक असल्या की मग त्या भागवण्यासाठी पैसे कमवायचे आणि ते कमवण्यासाठी काही न काही  तडजोडी करायच्या. भाईंना आपल्या आयुष्यात अशा कोणतीही तडजोड करायला लागू नये यासाठी माईच्या काटकसरी वागण्याचा खूप फायदा झाला. 
पुढे जेव्हा स्वकष्टार्जित पैसे मिळू लागले तेव्हासुध्दा जास्ती पैसे आले तर ते समाजकार्याला खर्च करावे पण स्वत:च्या गरजा विनाकारण वाढवू नये हा दोघांचाही स्वच्छ उद्देश राहिला.."

हे समाजकार्य करतानाही सुनीताबाईंनी कधी स्वत:चा उदोउदो केला नाही हे मला फार महत्वाचे वाटते. आजकाल पतीची ऐपत, त्याची पदं, त्याची प्रतिष्ठा इतकंच नव्हे तर मुलांची शाळा त्यांच्या अॅक्टिव्हिटीज याबाबत कित्येकजणी इतकी फुशारकी मारत असतात की ऐकायचा वीटच येतो. त्याचवेळी सुनीताबाईंचं हे निस्पृह वागणं मनाला भिडतं. त्या बहुतांश कार्यक्रमात कधीही स्टेजवर पुलंसोबत बसल्या नाहीत. इतकंच नव्हे तर निमंत्रण पत्रिकेतदेखील आपलं नाव येणार नाही याची दक्षता अनेकदा घेत राहिल्या. ज्या अनेक संस्थांना लाखो रुपये ' पु ल देशपांडे प्रतिष्ठान' मार्फत दिले गेले तिथे कुठेही आपलं नाव येऊ नये यासाठी सजग राहिल्या.
अपवाद काही 2, 3 संस्थांच्या वेगळ्या कार्यक्रमांचा. 
एक वेगळा प्रसंग मंगलाबाईंनी नोंदवलाय तो खरंच कौतुकास्पद. "रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलला 100 वर्षं झाल्याबद्दल त्यांनी एक वैयक्तिक धनादेश दिला. मात्र ते पैसे कोणताही वर्ग किंवा अन्य काही बांधायला नव्हे तर शाळेच्या परिसरातील मुलींच्या प्रसाधनकक्षाच्या बांधकामाला दिले. आज अनेक शहरातील बहुतेक सर्व शाळांमधली प्रसाधनगृहं ही अस्वच्छ, गलिच्छ असतातच. मात्र त्यासाठी कुणीच मदत करत नाही. सुनीताबाईंचं मोठेपण यासारख्या कृतीतून ठळकपणे नजरेत भरतं. इतकंच नव्हे तर त्यांनी मुद्दाम आपल्या देणगीचा फलक त्या प्रसाधनगृहावर लावायला सांगितला व हे पाहून आता इतरही लोक याचे अनुकरण करतील हे सूचित केले."
आपण एकट्यानं दान देऊन फार मोठा फरक पडणार नाही पण त्यामुळे इतरांच्या मनात दानाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी त्यांची धडपड असायची.

***
सुनीताबाईंचे विचार व आचार यात कधी तफावत नसायची. त्यांचे तिखट विचार त्या स्वत: आधी आचरणात आणून दाखवायच्या. अगदी देवपूजा, कर्मकांडांचंच उदाहरण घ्या ना. 
त्यांना स्वत: ला कधीच दैववाद मंजूर नव्हता. आयुष्यात कधीही त्यांनी देवपूजा केली नाही. मात्र याबाबत इतरांचे स्वातंत्र्य कधी नाकारले नाही. ' वा-यावरची वरात' च्या काळात त्यांच्याकडे गफूर नावाचा एक मदतनीस होता. प्रयोगापूर्वी नारळ फोडणे, धूपदीप करणे हे त्याला गरजेचं वाटे. त्याला सुनीताबाईंनी कधीच हरकत घेतली नाही. तसंच सहवासात आलेल्या पं. मल्लिकार्जुन मन्सूर, साधनाताई आमटे, विजया राजाध्यक्ष आदि स्नेह्यांची पूजापाठाची वेळ, त्याची साधनं हे सांभाळत राहिल्या. 
पुलंचे आजारपण असो किंवा तत्पूर्वीच्या आयुष्यातील अनेक अडचणीचे दिवस असोत त्या नेहमीच प्रयत्नवादी राहिल्या. कधीही नवसायास, पूजापाठ करत राहिल्या नाहीत. आपल्या कर्तव्यात कधीही कुचराई करत राहिल्या नाहीत.
पुलंच्या मातुश्री लक्ष्मीबाई एका पत्रात म्हणतात की, " सुनीता खंबीर आहे म्हणून भाई आहे. नाहीतर त्याची परवड झाली असती. सिनेमाच्या दिवसात भाई रात्रीचं शूटिंग करुन पहाटे चारला घरी यायचा. तेव्हा सुनीता तोवर उपाशी असायची. रात्री दोन नंतर स्वैपाक सुरु करायची, चारला नव-याला जेवायला गरमगरम वाढून मगच स्वत: जेवायला बसायची."
हे करणा-याही सुनीताबाईच असतात !
गृहिणीपण त्यांना मनापासून आवडत असे. साधी भाजी चिरतानाही त्यात नीटनेटकेपणा असे. त्यांनी वाटण केल्यानंतर पाटा वरवंटा किंवा जेवल्यानंतरचं ताट ही पहात रहावं असं असे. किचनमधली प्रत्येक वस्तू जागच्या जागीच असायच्या. अगदी तसंच प्रत्येक पदार्थाची चवदेखील. कोणत्या पदार्थात काय घालायचे याबाबत त्या नेहमीच दक्ष असायच्या. तो पदार्थ चविष्ट बनवतानाच त्या पदार्थाचं रुपही देखणं असावं यासाठी बारीक सरीक काही करत रहायच्या.

***

सुनीताबाई स्वत: स्वतंत्र प्रतिभेच्या व्यक्ती होत्या. मात्र बिजवर अशा पुलंच्यासोबत प्रेमाचा संसार सुरु केल्यावर त्यांनी पुलंमधला खेळिया फुलवत ठेवायला जणू स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला ठेवलं. डोळ्यात तेल घालून पुलंवर लक्ष ठेवलं. पुलंचे एकपात्री प्रयोग हे तसे दमछ्क करणारेच. सुनीताबाई तेव्हा पटकन् घेता येईल इतकं घोटभर पाणी घेऊन विंगेत उभ्या रहात. रंगमंचावरच्या एखाद्या गिरकीत पटकन् पुलं तिथं येऊन ते घोटभर पाणी पिऊन पुढचा खेळ रंगवत, समोर प्रेक्षकांना याचा पत्ताही लागत नसे! 
पुलंच्यात असामान्य प्रतिभा नक्कीच होती मात्र त्याचे थक्क करणारे प्रकट आविष्कार तसंच पुलंचं अष्टपैलू असं जे व्यक्तित्व आपल्यासमोर उभं राहिलं त्यामागे सुनीताबाईंच्या अथक परिश्रमांचा, पूर्वतयारीचा मोठा भाग आहे. ज्याकडे कधीच दुर्लक्ष करता येणार नाही. 

हे सांभाळताना त्यांनी त्यांच्यातली लेखिका जरुर जागवत ठेवली मात्र स्वत: ला कधी लेखिका म्हणवून घेतलं नाही. त्या नेहमीच स्वत:च्या जाणिवांविषयी लिहीत राहिल्या. निसर्ग, माणूस, पशु पक्षी, झाडं- पानं फुलं अन् अनेक अनुभवांविषयी लिहीत राहिल्या. त्या नेहमीच स्वत: ला वाचक, एक रसिक मानत राहिल्या.

***
आयुष्यभर अनेक मानसन्मान, गौरव, कौतुकसोहळे करवून घेणं त्यांना सहज शक्य होतं. मात्र त्यांनी सदैव एकटेपण स्वीकारलं. पुलंच्या निधनानंतर मोजक्या व्यक्ती सोडल्या तर बहुतेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. मात्र त्याचा त्यांना कधीच विषाद नव्हता. किंबहुना हे असंच घडणार यासाठी जणू त्यांची मानसिक तयारीच होती. 
आयुष्याच्या अखेरच्या दिवसातही त्यांनी शांतपणे सगळ्याची तयारी ठेवत स्वत: ला चार भिंतीतच ठेवलं. अखेरच्या क्षणांपर्यत त्यांच्या सोबतीला राहिली त्यांची लाडकी कविता. कवितेवर त्यांचं इतकं प्रेम की शेवटच्या काही दिवसात माणसांशी बोलणं, ओळखणं कमी झालं तरी कवितेविषयीची जाणीव लख्ख जागी राहिली. पडल्यापडल्या त्या कित्येक कविता पुटपुटत राहिल्या. कधी आरती प्रभूंची, कधी बोरकरांची, कधी मर्ढेकरांची....त्या कवितेनं त्यांची खरंच अखेरपर्यंत सोबत केली. 
एक तेजस्वी, कणखर, बाणेदार अशी स्त्री चंदनासारखी आयुष्यभर झिजत राहिली अन् शांतपणे अनंतात विलीन झाली.
आज अनेक वर्षांनी त्यांच्याविषयी वाचताना ही किती थोर बाई होती या जाणिवेनं ऊर भरुन येतो. त्यांच्या आयुष्यातील कळालंल्या, न कळालेल्या अनेक जागा मग मनात आठवत राहतात... कधी सुखावतात...कधी अस्वस्थ करतात.
- सुधांशु नाईक(९८३३२९९७९१) , कोल्हापूर. 🌿