marathi blog vishwa

Monday, 17 August 2020

एका क्रांतीवीराची कहाणी

' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहीत असलेल्या "इतिहासाच्या पोतडीतून"  या लेखमालेतील हा लेखांक ९ वा.

एका क्रांतीवीराची कहाणी..
- सुधांशु नाईक.
आज १५ ऑगस्ट . आपल्या हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी हजारो लोकांचे योगदान आहे. देवासमोर फूल अर्पण करावं इतक्या सहजतेने देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या अनेक क्रांतिवीरांच्या कहाण्या कित्येकांना आज बहुदा लक्षातही नाहीत. ज्या हजारो क्रांतिकारकांनी देशासाठी हसत हसत प्राणार्पण केले त्यातील एक नाव म्हणजे सरदार उधमसिंह.
जालियानवाला बाग हत्याकांडासाठी तत्कालीन पंजाबचा गवर्नर मायकेल ओडवायरला अद्दल घडवायचं ध्येय तब्बल २१ वर्षे उराशी ज्यांनी जपलं ते नाव म्हणजे उधमसिंह...! जाणून घेऊ त्यांच्या आयुष्याबद्दल... 

सरदार उधमसिंह. त्यांचं मूळ नाव शेर सिंह. २६ डिसेंबर १८९९ मध्ये पंजाब प्रांतात संगरुर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आणि लहान वयातच त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. ७ वर्ष वयाचा शेर सिंह आणि त्याचा भाऊ मुख्ता सिंह यांची रवानगी मग अमृतसर मधील खालसा अनाथाश्रमात झाली. पुढे शेरसिंहच नाव झालं उधम सिंह आणि मुख्ता सिंग बनला साधू सिंह. पुढे १९१७ मध्ये उधम सिंह यांचा भाऊदेखील मरण पावला आणि ते एकटे उरले. 

उधम सिंहांची मॅट्रिक परीक्षा १९१८ मध्ये झाली तेंव्हा पंजाब प्रांत क्रांतीकार्यासाठी धगधगत होता. देशप्रेमी उधमसिंह यांचं क्रांतीकार्याकडे आकर्षित होणं साहजिक होतं. ते मग गदर पार्टीत सहभागी झाले. जमेल तसं क्रांतीकारकांना मदत करू लागले. त्यातच जस्टीस रौलेट यांच्या समितीने नव्या “रौलेट अॅक्ट” ची घोषणा केली. यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली. याविरोधात कॉंग्रेसने आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनासाठी महात्मा गांधीजीनी पंजाबात यायचं ठरवलं. मात्र पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर याने बंदी आदेश काढला. तरी गाव-गाव पेटून उठलं.

पंजाबात सर्वत्र मोठी निदर्शने होत होती. अमृतसर मध्ये अनेक लोकांच्यावर गोळीबार केला गेला. शांततेनं निघालेल्या मोर्चावर गोळीबार केल्याने लोक संतापले. काही कचेऱ्या, इमारतींना आगी लावल्या गेल्या. मग पुन्हा इंग्रजांच्या तुकड्यांनी निदर्शकांवर हल्ले केले. कित्येक जखमी झाले. त्यातच सरकारने मार्शल लॉची घोषणा केली. कुणाला बाहेर पडायला बंदी केली गेली. जखमी लोकांना दवाखान्यात न्यायलादेखील बंदी केली गेली. प्रेत यात्रेत केवळ ७-८ माणसे असावीत, रात्री अंत्यविधीसाठी कुणी बाहेर पडू नये, दुपारी २ पूर्वी सर्व अंत्यविधी व्हयला हवेत असे दडपशाही करणारे विविध आदेश काढले गेले. मग जनमानस अधिक पेटून उठलं.

१३ एप्रिल हा बैसाखीचा दिवस. गुरु गोविंदसिंह यांनी खालसा पंथाची याच दिवशी स्थापना केली म्हणून सर्व शीख बांधवांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सर्व जण एकत्र येऊन प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. मात्र अमृतसर मध्ये जनरल डायर या अधिकाऱ्याने असा आदेश काढला की कुणीही घराबाहेर पडायचेच नाही. या आदेशाला गव्हर्नर ओडवायरचीही संमती होती. मात्र ब्रिटिशांना विरोध करायला आपण सर्वांनी एकत्र जमायचं असं लोकांनी ठरवलं आणि सगळे जालियनवाला बागेत एकत्र येऊ लागले.

जालियनवाला बागेची जागा तशी अडचणीची. चारही बाजूनी विविध इमारती आणि मध्ये मैदान. त्यालाही केवळ एक प्रवेशद्वार. इथं हजारो लोक जमले. आणि मग जनरल डायर ने सैनिकांची तुकडी आणून तिथे उभी केली आणि गोळीबाराचे आदेश दिले. लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता. शेकडो लोक गोळीबारात मरण पावले. गोळीबारापासून जीव वाचवायला तिथे असलेल्या एका विहिरीत अनेकांनी उड्या मारल्या. ती विहीर कोरडी होती. तेही मरण पावले. नुसत्या विहिरीतूनच दोनशे पेक्षा जास्त मृतदेह निघाले. हजारोजण जखमी झाले. त्यानंतर पुढचे २-३ दिवस पुन्हा संचारबंदी घोषित केली गेली. जखमी लोकांवर धड उपचार देखील होऊ शकले नाहीत. पंजाबसह सर्व देशातून ब्रिटिशांच्याविरुद्ध असंतोष निर्माण झाला.

त्या दिवशी तो सगळा अमानुष प्रकार उधम सिंहानी प्रत्यक्ष पहिला. ते त्यांच्या अन्य मित्रांसह तिथल्या लोकांना पाणी देण्याची सेवा करत होते. कसेबसे त्यांचे जीव वाचले. मात्र ज्या जनरल डायर आणि मायकेल ओडवायर यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. या दोघांचा वध करून मी या हत्याकांडाचा बदला घेणार अशी उधमसिंहानी प्रतिज्ञा केली..!
अनेक क्रांतीकारकांसह कार्यरत असलेल्या उधमसिंह यांच्यावर ब्रिटीशांची पाळत होतीच. एका प्रकरणात ब्रिटीशांना चकवा देऊन ते परदेशात गेले. इथे अनेक नव्या ओळखी झाल्या. परदेशातून काही हत्यारे घेऊन येण्याबाबत भगतसिंगांशी बोलणे झाले आणि उधमसिंह भारतात आले. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना ५ वर्षाचा तुरुंगवासही झाला. याच दरम्यान भगतसिंग यानाही फाशी झाली.

तुरुंगवास संपताच पुन्हा उधमसिंह युरोपात गेले. जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेण्याची प्रतिज्ञा मात्र ते अजूनही विसरले नव्हते. दरम्यानच्या काळात जनरल डायरला पक्षाघाताचा झटका आला. तो खुर्चीला खिळला आणि १९२६ मध्ये मरण पावला. उधमसिंहना त्याचं फार वाईट वाटलं. 

मात्र आता या सगळ्याचा मुख्य कर्ता करविता मायकेल ओडवायर याला मात्र सोडायचं नाही हे त्यांनी ठाम ठरवले. त्यासाठी मिळेल ते काम करायची तयारी केली. उधमसिंह यांची तिथे परिस्थिती अगदी बेताची होती. मात्र उत्तम शरीरयष्टीच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकारची कामे तिथे केली. प्रसंगी गाड्या दुरुस्त करणे, रंगकाम करणे, ड्रायव्हरच काम करणे, असं जे मिळेल ते काम उधमसिंह करत होते. मात्र सतत डोक्यात एकाच विचार होता की ओडवायरला कसं संपवायचं..!

आपल्या योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी ओडवायरकडे काही वेळा ड्रायव्हर म्हणून देखील काम केलं. मात्र तिथे त्यांनी ओडवायर वर हल्ला केला नाही. कारण त्यांना एका मोठ्या जाहीर कार्यक्रमात ओडवायरला ठार करून ब्रिटीशांना योग्य धडा शिकवायचा होता. पाहता पाहता वर्ष उलटत गेली. ओडवायरही म्हातारा झालेला. आणि ती संधी मिळाली..!

१३ मार्च १९४०. म्हणजे जालियानवाला बाग हत्याकांडानंतर तब्बल २१ वर्षांनी हा दिवस उगवला. आपल्या मनातील ज्वालामुखी इतकी वर्ष ज्यांनं जपला त्या उधमसिंह याना हवी तशी संधी आता मिळाली. लंडनमध्ये कॅकस्टन हॉल येथे एक मोठी सभा भरणार होती. या कार्यक्रमाला भारतातले विविध माजी गव्हर्नर देखील हजर राहणार होते आणि त्यात ओडवायरचा समावेश होता.

सभा सुरु झाली. विविध लोकांची भाषणं सुरु झाली. भारत मंत्री झेत्लांड यांनी शेवटी आभार प्रदर्शन केलं. आणि त्याक्षणी उधमसिंह पुढे झेपावले. ०.४५५ चं ते पिस्तुल त्यांनी समोर येऊन ओडवायरवर रोखलं. त्यांच्या डोळ्यासमोर १९१९ चं जालियनवाला बाग उभं राहिलं. असहाय्य लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. सैनिकांनी केलेला गोळीबार आणि ती अमानुष कत्तल डोळ्यासमोर उभी राहिली... त्यांनी पिस्तुलाचा नेम धरला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. ओडवायर जागेवरच आडवा झाला. उरलेल्या गोळ्या त्यांनी इतर गव्हर्नरवर झाडल्या, वंदे मातरम् चा जयघोष केला आणि हात उंचावून ते शांतपणे उभे राहिले. पोलिसांनी त्वरित त्यांना बेड्या ठोकल्या आणि पेंटविले येथील तुरुंगात नेऊन ठेवले.
उधमसिंह यांनी स्वतःच गुन्हा कबूल केलेला. त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात फारसा वेळ लागला नाही. २१ वर्ष उराशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं याच कृतकृत्य भावनेनं उधमसिंह यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली.

 एक वेगळा योगायोग म्हणजे ३१ जुलै १९०९ मध्ये एक महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यानाही इंग्रजांनी याच तुरुंगात फासावर लटकावले होते. अभिनव भारत या संघटनेचा सदस्य असलेले मदनलाल धिंग्रा हे स्वातंत्रवीर सावरकर यांचे एक आवडते सहकारी होते. त्यावेळी कर्झन वायली या अशाच एका जुलमी अधिकाऱ्यावर मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्येच एका समारंभात अशाच प्रकारे गोळ्या झाडल्या होत्या. 

जवळपास ३१ वर्षानंतर आता त्याच तुरुंगात उधमसिंह फाशीच्या तख्तावर उभे होते. त्यांच्या चेहेऱ्यावर वेदना, दुःख किंवा भीतीची अजिबात छाया नव्हती. उलट चेहेऱ्यावर होता जाज्वल्य देशाभिमान...! ३१ जुलै १९४० या दिवशी उधमसिंह हसत हसत फाशी गेले. घाबरलेल्या इंग्रजांनी त्यांचं कलेवर देखील गुरुद्वारा कमिटीकडे दिले नाही. तुरुंगाच्या आतील भागातच त्यांच्यावर अंत्यविधी उरकले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि सतत मागणी केल्यानंतर १९ जुलै १९७४ रोजी उधमसिंह यांच्या अस्थी ब्रिटीशांनी भारताकडे सुपूर्द केल्या. त्या काही दिवस जालियनवाला बाग येथे ठेवल्या गेल्या आणि नंतर मग नदीत विसर्जित केल्या गेल्या. 

आज आपण “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आनंदोत्सव” साजरे करतो, गोड-धोड खातो त्यावेळी उधमसिंह यांच्यासारख्या हजारो क्रांतीकारकांनी जे बलिदान केले त्याचीही आठवण जगवूया. एक दिवा त्यांच्यासाठी लावूया..!

जयहिंद... वंदे मातरम् ⛳️
- सुधांशु नाईक, कोल्हापूर. (९८३३२९९७९१)🌿
( शाळा - काॅलेजमध्ये शिकणा-या युवा पिढीपर्यंत अशा क्रांतीकारकांच्या जीवनकथा आपण पोचवल्या पाहिजेत असं वाटतं. त्यासाठीचा हा लहानसा प्रयत्न.)