marathi blog vishwa

Wednesday, 26 October 2022

नदी

सहजच लिहिलेलं ..!
बरेच दिवस लेखनातून ब्रेक घेतलेला. यंदा या दीपावलीच्या आनंदक्षणातून ही एक नवीन लेखमाला.  आठवड्यातून किमान एक लेख द्यायचा प्रयत्न नक्कीच. अनेक विषय डोक्यात असतात. अनेक गोष्टी रोज जगताना दिसत राहतात. अनेक स्मरणं मनात जागा अडवून बसलेली असतात. त्यातलंच काहीतरी तुमच्यासाठी...

1. नदी
- सुधांशु नाईक.
नदी प्रथम कधी पाहिली किंवा लक्षात आली असं स्वतःलाच विचारलं. मेंदू मग आठवणींच्या बासनात शोधाशोध करू लागला. 2 आठवणी सापडल्या.
बहुदा 2 वर्षांचा असेन मी. का कसं ते आठवत नाही पण नृसिंहवाडी च्या मंदिराजवळचा घाट आठवतो. दुपारचं ऊन आठवतं,आणि मला धरून पाण्यात बुडवणारे काका आठवतात....!
ते माझे मोठे काका. ज्यांना आम्ही ' रांचींचे काका म्हणत असू, (त्यावेळी ते रांचीला नोकरीनिमित्त होते म्हणून असावं ) त्यांनी मला असं घट्ट धरून पाण्यात बुचकळायचा चंग बांधलेला. वरचं ऊन, पायाला लागलेलं थंडगार लालसर पाणी आणि रडून गोंधळ घालत असलेला मीं. काकांनी 2,4 वेळा समजावून मग शेवटी दणकण मला पाण्यात बुचकळलं.. नाका तोंडात पाणी गेलं.. जीव एकीकडे घुसमटला आणि दुसऱ्या क्षणी खूप खूप गार वाटलं. आजही अंगावर एक छान शिरशिरी उमटते हे आठवलं की.!

दुसरी आठवण ही पुन्हा एका दत्त क्षेत्राशीच संबंधित.
वय बहुदा 3,4 वर्षांचं

आमचे बाबा 1,2 वर्षातून कुठं तरी ट्रिप काढायचे. सोलापूर, उदगीर असं कुठंतरी आम्ही हिंडत असताना गाणगापूर ला पोचलेलो. कदाचित उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो असू. प्रचंड उकडत होतं. मला उकाडा अजिबात सहन होत नाही. रडून ओरडून मीं बहुदा सगळ्यांना वैताग आणला असावा.. भीमा आणि अमरजा नदयांच्या संगमाजवळ गेल्यावर बाबांनी अक्षरशः त्या गुडघाभर पाण्यात मला फेकलं. पाण्यात पडताक्षणी अंगभर जो गारवा पसरला त्याचं सुख केवळ शब्दातीत. बहुदा त्याच दौऱ्यात नांदेड च्या गुरुद्वाराजवळ पाहिलेला विशाल गोदातीर देखील अस्पष्ट आठवतोय.

कित्येक देवस्थाने, अनेक डोंगर दऱ्या, दुर्ग असं सगळं गेल्या अनेक वर्षात पाहिलं. अगदी गंगा, यमुना, नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा, भीमा, शरावती अशा किती नद्या पाहिल्या. त्यात डुंबलो. एक गोष्ट खरी की, कुठेही गेलो तरी आजही माझं पाण्यासाठी आसुसलेलं मन नदीच्या पात्राची वाट पाहत असतं.

माझ्या आयुष्यातील पाहिली 25 वर्षं चिपळूण रत्नागिरी परिसरातील. त्यामुळे शिव नदी, वाशिष्टी, गड नदी, शास्त्री, बाव नदी या नद्या नेहमीच दिसणाऱ्या. त्यात मनसोक्त पोहणं घडलंय. दरवर्षी पावसाळ्यात शिव नदीचं आणि वाशिष्टीचं पाणी गावात शिरणं हे तर घडायचंच. विविध चाळीत वगैरे असलेली तेंव्हाची आमची घरं किंवा नंतर झरीवरच स्वतःच घर हे कायम पुरापासून लांब असलं तरी पूर पाहायला जाण्यातलं अप्रूप खूप आठवतं.
लहानपणी पाणी प्रचंड आवडायचं. प्रवासात बसमधून जाताना सगळं लक्ष विविध नद्या कधी दिसतात याकडेच जास्त असायचं. कोयना, कृष्णा, पंचगंगा, हिरण्यकेशी, दूधगंगा, वेदगंगा या नद्या दरवर्षी सुट्टीत भेटायच्या. संकेश्वर जवळचा मामा, चिकोडीचे काका, सांगलीची मावशी, बिद्री बोरवड्याची किंवा गोकाक ची आत्या यांच्याकडे जाताना. प्रसंगी पाण्यात उतरणे ही व्हायचं.
मात्र पोहायला शिकलो त्याचं श्रेय चिपळूणचे आमचे तेंव्हाचे घरमालक सुरेश केतकर काका यांनाच.

बाबा, काका, इतर आते मामे भावंड उत्तम पोहणारी असली तरी पोहण्याची सुरुवात 6वी 7वीत असताना झाली.
दरवर्षी उन्हाळ्यात केतकर काका त्यांच्या मुलांसह  आम्हा दोघा भावांनाही गाडीतून घेऊन जात. सकाळी 6 वाजता वाशिष्टीचं पाणी गार असायचं. बाहेर उकडत असलं तरी पाण्यात शिरलं की मस्त वाटायचं. कसं ते माहीती नाही पण मी लगेच तरंगु लागलो होतो आणि पटकन पोहणं जमून गेलं.
तिथून मग जिथं जिथं गेलो तिथं नदीत पोहणं व्हायचंच.
मस्कत ला असताना, आमच्या बहावान कम्पनीच्या बाजूलाच एका वादीचे ( नदीला अरबी मध्यें वादी म्हणतात ) विशाल पण कोरडं पात्र आणि शेजारी ग्रँड मॉस्क. ऑफिस संपल्यावर तिथं शांत बसून राहणं बरं वाटायचं. या रिकाम्या पात्रात पाणी असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं.

2007 मध्ये ' गोनू ' नावाचं चक्रीवादळ तिथं येऊन धडकलं. त्या वादीमधून अफाट पाणी वाहून गेलं. 2 मजली ऑफिसचा खालचा मजला पूर्ण पुराच्या पाण्यात होता. सगळ्यांचे पासपोर्ट, महत्वाची कागदपत्रे सगळं नष्ट झालेलं. शहरात शेकडो कार वाहून गेल्या. अनेकांच्या घरात वेगाने पाणी घुसलं... आम्ही कित्येक दिवस सगळं मदतकार्य करत होतो. नदीच्या पुराची ही अजून एका आठवण कायमची होऊन गेली.

चिपळूणला अगदी 1980-81 पासून पूर पाहिलेले आठवतात. मात्र इतकी हानी होऊ शकते ते प्रथम कळलं 1988-89 च्या आसपास अंबा नदीचा महापूर , 2005 चा कोल्हापूर - सांगलीतील आणि 2007 मस्कत मधल्या त्या महापुरानंतर. जेंव्हा जांभूळपाड्यात अंबा नदीच्या पाण्याने धुमाकूळ घातला होता. तिथला पूर, मदतकार्य आणि रा. स्व. संघाने केलेली निरपेक्ष मदत याबाबत तेंव्हा व्हिडीओ पाहिलेला. मात्र जोवर आपण अनुभव घेत नाही तोवर बहुदा अक्कल येत नसावी आपल्याला. त्या आपत्तीमधलं गंभीरपण जाणवत नाही.
पुढं 2019 च्या कोल्हापूर मध्ये पंचगंगेच्या महापुरात तर आमचंच खूप नुकसान झालं. त्या परिस्थितीत देखील ज्यांचं सर्वस्व बुडाले अशा तीनशे - साडे तीनशे कुटुंबाना आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून काही मदत करू शकलो याचं समाधान वाटतं. खूप नुकसान झालं मात्र नदीविषयीचं आकर्षण कमी झालं नाही.

2020 मध्ये लायबेरिया आणि मग कॅमेरून या आफ्रिकन देशात आता असताना इथल्या नद्या ही पाहून झाल्या. इथली विशाल पात्रे, त्यांच्या आसपास ची अस्पर्श घनदाट जंगले हे सगळं मनाला स्तिमीत करून सोडतं.
विमानातून येताजाता जेंव्हा कॉंगो, नाईल ( ब्ल्यू आणि व्हाईट नाईल ही ) या नद्याची अति विशाल पात्रे पाहिली तेंव्हा नतमस्तक होऊन गेलो. या अशा नद्यांच्या तीरावर अनेक वस्त्या उभ्या राहिल्या असतील, कालौघात नष्ट झाल्या असतील... काही अवशेष फ़क्त इथं तिथं...
आता अमेझॉन पाहायची खूप इच्छा आहे.

संस्कारामुळे नदीला आपण माई, आई मानतो. पण खरंच आपण तसं मानतो काय हा प्रश्न स्वतःलाच अस्वस्थ करतो. आजकाल कोणत्याही गावोगावी गेलं की गटारगंगा बनलेली नदी दिसते. आपण माणूस बनून या नदीचा जीव घेतल्याची भावना विषणण करते.

जिकडे पाहावे तिकडे कारखान्यानी सोडलेलं दूषित पाणी, गावोगावच्या गटारातलं सांडपाणी खुलेआम नदीला बरबाद करत असतं आणि आपण फ़क्त स्वतःच्या तत्कालीन सुखात रममाण आहोत हेच जाणवतं.
रोज ज्या रस्त्यावरून ये जा करतो तिथलं नदीचे कळकट, उध्वस्त रूप सतत आक्रोशून विचारत राहतं, " तुम्हा लोकांना सतत पाणी दिलं, प्यायला दिलं, स्वच्छतेला दिलं...मग का रे आमचं पात्र असं नासवलत?"
अत्यंत अपराधी वाटतं. आपण जगायलाच नालायक आहोत असंच ठामपणे वाटत राहतं.

अनेक नद्या, नदीकिनारे पाहिले मात्र नर्मदा कुठंतरी मनात रुजून बसलीये. असं वाटतं की, शान्त संध्याकाळी वाहत्या नर्मदेकाठी बसावं.कसलीच मागणी नको नं कसलंच देणं नको, बस्स फ़क्त त्या चराचराचा एक क्षुद्र कण होऊन जावं कोणतीही ओळख मागं नं ठेवता...!
- सुधांशु नाईक (व्हाट्सअप नं - 9833299791)🌿