- सुधांशु नाईक
21/01/2024
कित्येक गोष्टी आपण गृहीतच धरलेल्या असतात. त्यामुळेच काही ठराविक माणसं ही जणू अजरामर आहेत असं आपल्याला वाटतं. उस्ताद झाकीर हुसेन हे असंच एक व्यक्तिमत्व. त्यामुळे त्या दिवशी एखादी वीज कोसळावी तशी अचानक बातमी आली की उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झालं आणि सगळेजण एकदम अस्वस्थ झाले. कुणालाच ती बातमी खरी वाटत नव्हती. कुणी म्हणे अजून सिरीयस आहेत, कुणी एखाद्या वृत्तवाहिनीचा आधार देऊन ते गेल्याची बातमी खरीच असल्याचं सांगत होते. अशा उलट सुलट चर्चा कितीतरी वेळ होत राहिल्या पण लाखो लोकांचं मन मात्र गोंधळून गेलं होतं. झाकीरभाई म्हणजे एक चिरतरुण, नम्र असा हसतमुख माणूस. विचक्षण श्रोत्यांपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांचा आवडता कलाकार. उस्तादजींना जाऊन 5 दिवस झाले तरी हा माणूस असा अचानक जायला नको होता असंच देशभर सर्वांना वाटत आहे त्यात मीही एक...!
( सुप्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसेन यांनी काढलेलं हे अप्रतिम रेखाचित्र )
आपण सर्वांनी लहानपणापासून टीव्हीवर झाकीरभाईना कित्येक कार्यक्रमातून पाहिलं होतं. त्यांचं तबलावादन जितकं लोभसवाणं तितकंच त्यांचं निरागस दिसणंदेखील. मिले सूर मेरा तुम्हारा... मधलं त्यांचं दर्शन, झुल्फ़ं उडवणं असो किंवा " वाह..ताज" च्या जाहिरातीमधील अदा असो... सारं फारच दिलखेचक असंच.
ज्यांना शास्त्रीय संगीत, तबला वादनातील बारकावे आदि गोष्टी फारशा माहिती नाहीत अशा सर्वसामान्य माणसांना देखील " वाह... ताज.. " म्हणणारा, निरागसपणे सुमधुर हसत राहणारा, तबल्यावर वीजेच्या चपळाईने हात चालवणारा तो जगप्रसिद्ध तबलावादक आपल्याच घरातला एक तेजतर्रार मुलगा वाटत राहिला. त्यांच्याविषयीं खूप आपुलकी वाटत राहिली. त्याचं कारण म्हणजे सर्वांच्या मनाला भुरळ घालणारं उस्तादजींचे प्रसन्न हसू आणि सदैव आदबशीर वागणं.
त्या आपुलकीमध्यें त्यांचं मुसलमान असणं कधीच आपल्या कुणालाही जाणवलं नाही कारण स्वतः झाकीरभाईंनी आपलं मुसलमान असणं कधी मिरवलं नाही, कधी कुठेही त्याचं अवास्तव प्रदर्शन केलं नाही. इथल्या मंदिरातून, विविध संगीत समारोहात देखील त्यांनी कला सादर केली आणि प्रत्येक वेळी सरस्वतीच्या साधकासारखे ते रसिकांसमोर नतमस्तक होत राहिले. समेवर येताना त्यांचं ते झुल्फ़ं उडवून मनमोहक हसणं त्यांना अगदी शोभून दिसायचं.
त्यांच्यासारखी झुल्फ़ं उडवणारी शेकडो माणसं नंतर विविध कलांच्या माध्यमातून लोकांपर्यंत येत राहिली पण झाकीरभाईंची मोहिनी काही वेगळीच होती. आबालवृद्धाना संमोहित करणारी होती..!
संगीत क्षेत्रात ज्यांचा खोलवर वावर आहे त्या लोकांनी, झाकीरभाईसारखं दिसण्याचा अट्टहास करणाऱ्या काही मंडळींना कधी मस्तीने वागताना, स्वतःसाठी खास मागण्या करताना अनुभवलं आहे. झाकीरभाई मात्र असं कधीही वागले नाहीत. कार्यक्रम ठरतानाच त्यांचं स्पष्ट सगळं सांगणं असायचं. किती वाजता कार्यक्रम, कुठं राहायचं, कसं यायचं हे सगळं त्यांनी शिस्तीत पाळलं. आपल्या वस्तू स्वतः उचलल्या. मध्यरात्री मैफल रंगवून पुन्हा पहाटे दुसऱ्या गावी जाण्यासाठी वेळ पाळली. कित्येकदा नवोदित कलाकारांना साथसंगत करताना, त्यांना रसिकाकडून मानानं वागवलं जाईल याची अकृत्रिम काळजी घेतली. त्याचबरोबर जेंव्हा ज्येष्ठ परंतु कमी प्रसिद्धी लाभलेला एखादा कलावन्त सोबत असे तेंव्हा त्यांचं मोठेपण जाणून त्यांना नेहमी आदराने वागवलं. आपल्या प्रसिद्धीपायी इतरांना दुर्लक्षित केलं जाऊ नये याची दक्षता बाळगली.
कित्येक कलाकार आपली वाद्ये, तानपुरा वगैरे इतरांना आणायला लावतात. प्रसंगी पान आणून द्या, अमुक आणून द्या अशा मागण्या करत राहतात. झाकीरभाईंनी असं कधी केलं नाही. आपलं वाद्य ही जणू सरस्वती आहे असा मान त्यांनी तबल्याला दिला. स्वरमंचावरदेखील त्यांचा वावर कायम आदबपूर्ण आणि नजाकतभरा असायचा. पुणे, कोल्हापूर, चिपळूण आदि ठिकाणी त्यांच्या काही मैफिली प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. ते स्टेजवर आले की चैतन्याची एक लहरच जणू लोकांच्यात निर्माण होत असे.
लहानपणापासून केलेल्या अथक रियाजचे महत्व ते कायम सर्वाना सांगायचे. वयाची 10 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा रियाज सुरु झालेला. वडील अल्लारखा हे सुप्रसिद्ध तबलावादक. तसेच एकेकाळी ते हिंदी चित्रपटांचे संगीतकारही होते. त्यामुळे घरात अनेक मान्यवर लोकांचा राबता. देखण्या झाकीरला त्यावेळी सिनेमांत हिरो म्हणून घेण्यासाठीही कित्येक जण तयार होते पण वडिलांनी अजिबात त्यांना तबल्यापासून दूर जाऊ दिलं नाही. आपल्या अब्बाजींबद्दल उस्तादजींच्या मनात कायमच आदरभाव आणि प्रेम होतं. आज जे काही मी घडवू शकलो त्याचं खरं श्रेय त्यांनी कायमच वडिलांना दिलं आहे.
कित्येक तास केलेल्या अथक रियाजामुळे त्यांच्या वादनात एक नजाकत आली. म्हणूनच मैफिलीत त्यांची पहिली थाप तबल्यावर उमटली की तिथून फक्त एक प्रसन्न वादळ आसमंतात भरून राही. स्टेजवर जर ते कुणाला तबलासाथ करत असतील तर त्या गायक किंवा वादकापुढे कधीच अरेरावी करत नसत. भले ती व्यक्ती त्यांच्यापेक्षा लहान असो वा मोठी. गायक किंवा वादकाने मध्ये जरा पॉज घेतला तर त्यांचा इशारा झाल्यावरच आपली कामगत दाखवून नजाकतीने असे काही समेवर येत की त्या मैफिलीची खुमारी अधिक वाढत राही.
त्यांच्या स्वतःच्या सोलो मैफिलीत देखील विविध घराण्याच्या तबलावादनातील काही महत्वाच्या गोष्टी, कायदे, उठान, बोल हे सारं नम्रपणे नमूद करत. माझंच घराणं श्रेष्ठ हा भाव त्यांच्याकडे कधीच नसायचा. तरुण गायक वादकांना प्रोत्साहन देताना भरभरून रियाज करत राहण्याचा मोलाचा सल्ला आवर्जून देत असत.
त्यांच्या मैफिलीत वीज कडाडल्याचा आवाज, घोड्यांच्या टापांचा आवाज, वाहत्या धबधब्याचा आवाज, विमानं किंवा कारचा आवाज असे कित्येक चमत्कृतीपूर्ण वादन सादर केले जाई. टाळ्यांचा मग अभूतपूर्व असा कडकडाट होत राही. हे असलं वादन, काही शास्त्रीय संगीतप्रेमी श्रोत्यांना आवडत नसलं तरी सामान्य लोकांना ते फार आवडायचं त्यामुळे त्यांच्यासाठी मी असं थोडंसं आवर्जून वाजवतो, तबल्याच्या माध्यमातून खूप काही करता येतं हे त्यांना दाखवायचा प्रयत्न करतो असं उस्तादजी म्हणायचे.
कॉल ऑफ द व्हॅली सारख्या अल्बमनी पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. रवीशंकर, उस्ताद अली अकबर खान, उस्ताद विलायत खान आणि उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसेन यांना जगप्रसिद्धी दिली. हिंदुस्थानी संगीत जगाच्या कानाकोपऱ्यात नेण्यात या कलाकारांचा सिंहाचा वाटा आहे हे कधीच विसरता येणार नाही. तबलावादनात उस्ताद अहमदजान थिरकवां, पं. सामताप्रसाद, पं. किशन महाराज, अनोखेलाल, पं. अनिंदो चटर्जी, पं. कुमार बोस असे कितीतरी दिग्गज आहेतच पण तबल्याला ग्लॅमर मिळवून दिलं ते झाकीरभाईंनीच. त्यांचं तबलावादन पाहून तबलावादनाकडे आकर्षित झालेल्या पुढील दोन तीन पिढ्यातील कितीतरी मुलं आता नावाजलेले तबलावादक बनली आहेत.
कलाकारांचा स्टेजवर वावर कसा असायला हवा याचे आदर्श ज्यांनी घालून दिले त्यात उस्ताद झाकीर हुसेन यांचं नांव कायमच अग्रगण्य असेल. त्यांच्यापूर्वीही कित्येक नामवंत तबलानवाझ होऊन गेले, यापुढेही होतील पण नम्रपणे स्वरमंचावर विराजमान होऊन तबल्यातून ताल लयीचं अनोखं विश्व निर्माण करणारे उस्तादजी स्वतःचं एक मिसाल बनून गेले यात शंका नाही. लता मंगेशकर, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, विलायत खान, शिवकुमार शर्मा असोत किंवा आता त्यांना भेटायला त्या विश्वात गेलेले झाकीरभाई असोत ही माणसं फक्त माणसं नव्हती तर ईश्वराने आपलं जगणं समृद्ध करायला पाठवलेले स्वरदूत होते असं मला वाटतं. आपल्याला अवीट आनंद देऊन जाणारे हे स्वरदूत आणि त्यांचे चिरतरूण स्वर आपल्या मनात आणि आसमंतात सदैव भरून उरलेले...! मनात सुरु राहणाऱ्या मैफिलीत कायम अचूक सम साधत राहणारे ..!
- सुधांशु नाईक (9833299791)🌿