marathi blog vishwa

Saturday, 11 January 2025

केकी मूस यांचे घर..!

#सुधा_म्हणे...
11 जानेवारी 2025
केकी मूस यांचे घर..!
सौंदर्यपारखी कलावंताच्या स्मृति जपणारी एक अनोखी वास्तू.
जगात हजारो तऱ्हेची माणसं. कुणी निसर्गातील सौंदर्य शोधणारी तर कुणी माणसातील सौंदर्य शोधणारी. त्यात पुन्हा त्यांना असलेली कलेची ओढही वेगवेगळी. कुणाला चित्रकला भुरळ घालते तर कुणाला शिल्पकला. कुणाच्या ओठी अलगद कविता उमलते तरी कुणा मुखी संगीत. सगळ्यांनाच सगळं काही करता येणं अवघड. पण काही कलावंत वेगळेच. त्यांना एकाचवेळी अनेक कला साध्य झालेल्या असतात कारण त्यांना सौंदर्य शोधणारी नजर लाभलेली असते. जेंव्हा एखाद्या जातिवंत कलाकाराला सौंदर्याची नजर लाभते तेंव्हा त्याचा जिथं जिथं परिसस्पर्श होतो त्या त्या गोष्टी तेजानं झळाळून उठतात. केकी मूस हे असेच एक, सौंदर्यपारखी नजर लाभलेले, विविध कलागुणांनी समृद्ध असे कलावंत होते. चाळीसगावमध्यें त्यांच्याच अनोख्या वास्तूत उभं असलेलं कलादालन आजही त्यांच्या अजोड कलाकृती जपत दिमाखाने उभं आहे. त्याविषयीचा आजचा हा लेख...
केकी मूस म्हटलं की बहुतांश लोकांना चाळीसगावच्या स्टेशनवर रेल्वेने येणाऱ्या प्रेयसीची एक दोन नव्हे तर कित्येक वर्षं रोज वाट पाहणारा, तिच्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन थांबणारा, रोज रात्री पंजाब मेल येऊन गेल्यानंतर मगच जेवणारा एक लोभसवाणा प्रियकर आठवतो. 
जिच्यावर प्रेम केलं ती आपली न होता दुसऱ्याशी लग्न करून सुखी संसार करत आहे हे ठाऊक असूनही आपली भावना जपणारा, निष्ठावंत प्रेमिक इतकीच केकी मूस यांची ओळख नाहीये तर आपल्या कलेने जगभरातील रसिकांना स्तिमित करणारा कलावंत ही त्यांची खरी ओळख आहे आणि तीच गोष्ट अधिकाधिक लोकांना माहिती असायला हवी. त्यांच्या कलेचं त्यादृष्टीने अवलोकन व्हायला हवं, मूल्यमापन व्हायला हवं.
            ( केकी मूस यांचं घर)

अलग हम सबसे रहते है
मिसाले तार तांबुरा 
जरा छेडने सें मिलते है
मिलालो जिस का जी चाहे....
असं स्वतःविषयीं म्हणणारं हे कलंदर व्यक्तिमत्व. केकी मूस उर्फ कैखुसरो माणेकजी मूस. 02 ऑक्टोबर 1912 ला जन्मलेले. आई त्यांना लाडाने केकी म्हणत असे आणि तीच त्यांची कायमची ओळख होऊन गेली. वयाच्या 9 व्या वर्षापासून लहानगा केकी छान छान चित्र काढत असे. आपण कलाकार व्हायचे त्यांनी तेंव्हापासून ठरवलेले. चाळीसगाव मध्ये वडिलांचा सोडा वॉटर फॅक्टरी आणि दारूचा व्यवसाय. पण केकीना त्यात कधीही रस नव्हता. मुंबईतील विल्सन कॉलेजात त्यांचं शिक्षण झाल्यावर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथेही आपल्या कलाकारी वृत्तीने जगत राहिले. तिथं त्यांनी चार वर्षात कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यासोबत फोटोग्राफीचा अभ्यासदेखील केला. तिथून ते अमेरिका, जपान, रशिया,स्विस आदि देशात प्रवास करत राहिले. अनेक कलाकारांना भेटून मग 1938 मध्ये ते भारतात परतले. मुंबईत ते शिक्षण घेत असताना निलोफर मोदी या मुलीशी मैत्री झाली. तिच्याशी लग्न करायला ते तयार होते पण तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता कारण केकी त्यावेळी कलंदर आयुष्य जगत होते आणि निलोफरचं कुटुंब त्यांच्यापेक्षा खूपच श्रीमंत होते. शेवटी आपण आईवडिलांच्या सोबत राहायचं आणि एका कलाकाराचे आयुष्यच जगायचे असं ठरवून केकी जे 1938-39 मध्ये चाळीसगाव येथे परतले ते पुन्हा कधीही गांव सोडून बाहेर गेले नाहीत. (अपवाद: आईच्या अन्त्यसंस्कारासाठी फक्त एकदा ते गावाबाहेर संभाजी नगर येथे गेले होते.) त्यांच्या प्रेयसीने त्यांना वचन दिले होते की एकदिवस ती चाळीसगाव येथे रात्रीच्या पंजाब मेलने येईल आणि त्यांच्यासोबत जेवण घेईल. तेंव्हापासून दररोज पंजाब मेल चाळीसगावमधून पुढे गेल्यावर तिची वाट पाहून मग ते आयुष्यभर जेवण घेत राहिले अगदी 31 डिसेंबर 1989 या त्यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत..! 
     (डॉ.सामंत यांच्यासोबत मी आणि स्नेही आरती परांजपे )

केकी मूस यांचा हा वर उल्लेखलेला इतिहास आता सर्वाना ठाऊक झालेला असाच. मात्र 1940 च्या दशकात चाळीसगाव सारख्या छोट्याशा गावात राहून त्यांनी जी अफाट कलासाधना केली ती त्यांची खरी ओळख आहे असं मला वाटतं. खास निसर्ग सौन्दर्य किंवा उत्तम व्यक्ती पाहण्यासाठी कित्येक चित्रकार / शिल्पकार देशोदेशी हिंडत राहतात. तिथलं सौन्दर्य आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकट करत राहतात. केकींचे वेगळेपण हे की त्यांना आसपासच्या असंख्य गोष्टीत सौन्दर्य दिसायचे. कागद, पाने, झाडाची वाळलेली फांदी, वृत्तपत्रातील कात्रणे अशा कित्येक लहानमोठ्या गोष्टींचा वापर करत त्यांनी चित्रं रंगवली. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये शिल्प घडवली. हे सारं काम जगभर वाखाणलं गेलं. त्या छोटयाशा गावात राहून त्यांनी सतारवादन आत्मसात केलं. इतकेच नव्हे तर पत्र्याचे डबे, कळशी अशा वस्तूंचा वापर करत स्वतः त्यांनी सतार तयारदेखील केली जी आजही तिथल्या कलादालनात पाहता येते. तिच्या तारा छेडता येतात..! 
कित्येक देखण्या वस्तूंचा त्यांनी सुरेख असा संग्रह केला आणि त्या वस्तू नीटनेटक्या राहतील याची दक्षताही घेतली. त्यांच्या अद्वितीय प्रतिभेच्या किती गोष्टी सांगाव्यात तितक्या कमीच आहेत. आपण या कलादालनात येतो तेंव्हा तिथे आवर्जून लोकाना सर्व माहिती सांगणारे डॉ. कमलाकर सामंत एकेक किस्से जेंव्हा सांगू लागतात तेंव्हा केकी मूस यांच्या प्रतिभेच्या त्या दर्शनाने दर्शक अगदी स्तीमित होऊन जातात. 
केकी मूस यांनी रंगवलेली निसर्गचित्रे, 3d चित्रे, म्युरल, मान्यवर व्यक्तींचे पोर्ट्रेट फोटोग्राफस्, असा अवघा खजिनाच आपल्यासमोर खुला होतो. केकी मूस खूप क्वचित आपल्या घरातून बाहेर पडून आसपासच्या परिसरात गेले होते. एकदा जेंव्हा फोटोग्राफीसाठी ते खास बाहेर गेले होते त्यावेळी टिपलेलं एक क्षणचित्र मला फार आवडणारं असंच आहे. एक घोडेस्वार एका घोड्याला घेऊन जाताना वाटेत लहानसा ओढा आहे. घोडा त्यातील पाणी प्यायला वाकला आणि सवयीने घोड्याने त्यावेळी एक पाय हलकेच वर उचलला. ज्या क्षणी घोडा तो पाय हलकेच वर उचलतो तेंव्हा त्याभोवती पाण्यात सुरेख तरंग निर्माण होतात, घोड्याच्या त्या टापेभोवती पाणी काही वेगळंच उसळते. अवघ्या अर्ध्या सेकंदांत घडणारी ही गोष्ट केकी यांनी इतकी अचूक टिपलीये की आपल्या तोंडून पटकन वाहवा उमटते. तो क्षण टिपण्यासाठी केकी यांनी तब्बल 40 वेळा रिटेक करायला लावले होते ही माहिती तोवर डॉ. सामंत आपल्याला देतात आणि एकेक फोटो टिपणं ही कशी तपश्चर्या असते हे आपल्याला उमगून जातं. 
केकी मूस म्हटलं की सर्वाना आठवतात त्यांची टेबल टॉप फोटोग्राफीची क्षणचित्रे. सर्वाधिक लक्षवेधी अशी ती क्षणचित्रे. त्या प्रत्येक फोटोच्या निर्मितीच्या कथाही थक्क करायला लावणाऱ्या. 
तिथल्या या कलाकृतींचे फोटो घेता येत नाहीत तरी या ब्लॉगसाठी एक दोन फोटो डॉ. सामंत आणि केकी मूस फौंडेशननी घेऊ दिले. त्यातील एका फोटोची कॅप्शन आहे “विंटर” म्हणजे हिवाळा. (सोबत हे चित्र जोडलं आहे.) त्यासाठी केकी यांनी एका टेबलवर आधी काळं मीठ पसरले..आणि त्यावर खडूची भुकटी पसरवली. बाहेर पडलेल्या दोन काटक्या दो बाजूनी उभ्या केल्या आणि कार्डबोर्ड पासून तयार केलेली एक छोटीशी झोपडी तिथं ठेवून दिली ज्यामुळे एक उत्तम दृश्य तयार झाले आणि त्या सगळ्याला हिवाळ्यातील दिवसाची अनुभूती देण्यासाठी त्यांनी या सगळ्यामागे एक दुधी रंगाची काच ठेवली आणि काचेपलीकडे दिवा... त्यानंतर वरुन या सगळ्या मांडणीचा एक देखणा फोटो घेतला. त्या फोटोवर स्वतःच्या अतिशय देखण्या हस्ताक्षरात केकीनी लिहिलं आहे, “ If winter comes, can spring is far behind?” कलाकाराकडे सौन्दर्यदृष्टी असणे म्हणजे काय त्याचे हे उत्तम उदाहरण..!
 
कलाकार जेंव्हा एखादी कला निर्माण करतो तेंव्हा त्यामागे त्याचे काही ठोस विचार असतात, त्याच्या काही धारणा असतात. सामान्य नजरेने एखादी गोष्ट पाहिली तर ती फक्त सुंदर वाटते पण कदाचित आपल्याला त्यातील गहन आशय उमगत नाही. मात्र कलाकाराची मनोभूमिका जाणून घेतली तर त्या कलाकृतीमागील गहन अर्थ विस्मयकारक वाटत राहतो. 14 ऑगस्ट 1947 अशी कॅप्शन दिलेलं क्षणचित्र सहज पाहिलं तर चटकन काहीच उलगडा होत नाही. (सोबत हे चित्र जोडलं आहे.) एक सुंदर संध्याकाळ, पाण्यातले तरंग इतकंच दिसतं. मात्र केकीनी त्यासाठी फार वेगळा विचार केला होता. ज्यांच्या राज्यावरील सूर्य कधी मावळत नसे असं म्हटलं जाई त्या इंग्रजांचे भारतावरील राज्य ज्या दिवशी संपले, तो दिवस जेंव्हा मावळला तीच ही वेळ. तोच हा सूर्यास्त जो केकीनी चित्रित करून ठेवला. त्यांची ही मनोभूमिका जेंव्हा कळते तेंव्हा एक कलावंत किती वेगळा विचार करतो हे उमगतं. मनोमन आपण त्यांना दाद देत राहतो. 
ओरिगामी हा जपानी कलाप्रकार. कागदाच्या घड्या घालत त्यातून विविध आकार सहजतेने निर्माण करून दाखवणारा. आपल्या मराठी माणसांना तर अनिलबाबा अवचट यांच्यामुळे ओरिगामी बऱ्यापैकी माहिती झाली असं म्हणायला हरकत नाही. मात्र केकी मूस यांच्या कलादालनात ओरिगामीच्या सुमारे दोन अडीच हजार कलाकृती आहेत. तीच तऱ्हा काष्ठशिल्पांची. कितीतरी देखणी काष्ठशिल्पे त्यांनी तयार केली. हे सारं पाहिलं की त्यांच्याविषयीचा आदर अधिक दुणावतो. कसं असेल या कलावंताचं मन ? कोणते विचार करत असतील ते दिवसभर? सतत नवनवीन संकल्पना सुचत कशा असतील त्यांना? हाताशी असलेल्या मोजक्या वस्तूंचा वापर करत त्या कल्पना प्रत्यक्षात आणायला त्यांनी कशी धडपड केली असेल ? असे प्रश्न मनात पिंगा घालतात.
एखादी कलाकृती पूर्ण होईपर्यन्त कोणताही कलाकार अत्यंत अस्वस्थ असतो. मग तो लेखक असेल, चित्रकार असेल किंवा संगीतकार. ते अस्वस्थपण समजून घेणारा साथीदार सोबत असेल तर कलाकाराचे आयुष्य सुखद होते अन्यथा कित्येक कलावंत नैराश्य, व्यसन यांचे बळी ठरतात. त्या अस्वस्थपणातून जेंव्हा एखादी कलाकृती निर्माण होते तेंव्हा तो कलाकार शांत होतो. पण ही प्रोसेस फार जीवघेणी अशीच. इथं सदैव एकटेपण सोबत असलेल्या केकीनी कलाकृती पूर्ण होत असतानाचे क्षण कसे घालवले असतील हा विचारही मनाला सतावत राहतो. आणि मग आठवतो त्यांना जेंव्हा बेल्जियम फाईन आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले त्या फोटोचा किस्सा. 
“The witch of chalisgaon”. अनेक वर्ष केकीना जे पदक हुलकावणी देत होते ते ज्या फोटोमुळे मिळाले तेच हे पोर्ट्रेट. टेबल टॉप फोटोग्राफीमध्ये जे. ऊनवाला हे त्याकाळी दिग्गज मानले जात. त्यांच्याकडून केकी ही फोटोग्राफी शिकले होते. त्यामुळे टेबल टॉप फोटोग्राफी असो की पोर्ट्रेट फोटोग्राफ, प्रत्येक स्पर्धेत मुंबईत राहणारे हे ऊनवाला पदक जिंकून जायचे. एकदातरी त्यांना मागे टाकून आपण हे पदक जिंकलं पाहिजे असं केकीना वाटे. बेल्जियमच्या या स्पर्धेची घोषणा झाली आणि केकी त्यासाठी विषय, मॉडेल शोधू लागले. 
त्या एवढ्याशा चाळीसगावात कुठं त्यांना चांगली चांगली मॉडेल्स दिसणार? स्पर्धेसाठी फोटो पाठवयाचा दिवस अगदी जवळ आला. त्यांच्यासोबत राहणाऱ्या आईला शेवटी ते म्हणाले की उद्या कोणत्याही परिस्थितीत फोटो मिळायला हवा. आणि तसेच घडले. एक आदिवासी किंवा खेडूत अशी अत्यंत वृद्ध स्त्री लाकडांची मोळी घेऊन जात होती. केकी सकाळी त्यांचे ते मोठे असे ओले केस सुकवायला घराबाहेर उभे होते. तिला ते डॉक्टर वाटले. ती त्यांना औषध विचारू लागली. क्षणात केकींच्या लक्षात आले की त्यांना हीच स्त्री एक उत्तम मॉडेल म्हणून वापरता येईल. मग त्यांनी तिचे कित्येक फोटो घेतले. चार आण्याच्या मोळीसाठी तिला त्याकाळी तब्बल पाच रुपये दिले आणि स्वतःला डार्करूम मध्ये कोंडून घेतलं ते दुसऱ्या दिवसापर्यन्त. त्यातून आईने निवडलेला फोटो त्यांनी स्पर्धेत पाठवून दिला आणि ते सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर कितीतरी पदके, प्रशस्तीपत्रके असं खूप काही त्यांनी आयुष्यभर कमवले. शिवपार्वती, वात्सल्य अशी कितीतरी देखणी छायाचित्रे पाहताना आपण अगदी गुंग होऊन जातो. इतकंच नव्हे तर वाचनाच्या आवडीतून घरातच सुमारे चार-पाच हजार पुस्तकांनी सुसज्ज असे ग्रंथालय आणि उत्तमोत्तम संगीत ऐकण्याच्या आवडीतून विविध प्रकारच्या कॅसेट आणि ग्रामोफोन रेकॉर्डस्चा संग्रह केला. अनेक थोर व्यक्तींशी मैत्री जोडली मात्र आपलं गांव कधीही सोडलं नाही. असे मनस्वी होते केकी मूस..! 
घराच्या बाजूलाच त्यांची समाधी आहे. नुकत्याच तिथे दिलेल्या भेटीत हे घर कितीतरी वर्षानी पुन्हा पाहिले. डॉ. कमलाकर सामंत यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या. त्यांच्याकडून खूप कथा ऐकत बसलो. त्या समाधीपाशी आम्ही नतमस्तक झालो. 
तिथं नतमस्तक होताना, त्यांच्या आत्मवृत्तातील लेखनाची शेजारी लावलेली पोस्टर्स पहाताना, आपल्या डोळ्यांसमोर त्यांच्या आयुष्यातील घटना तरळत राहतात. आपल्या कलेशी अतूट निष्ठा ठेऊन जगणारी अशी कलंदर माणसं त्यांच्या कलाकृतींमधून अजरामर होऊन जातात, आपल्याला वेगळं जगण्यासाठी सदैव स्फूर्ती देत राहतात.
- सुधांशु नाईक (9833299791)
पुणे.🌿


Wednesday, 1 January 2025

इतिहासात रमलेली देखणी ओरछा नगरी..!


इतिहासात रमलेली देखणी ओरछा नगरी..!

-सुधांशु नाईक

#सुधा_म्हणे...

०१/०१/२०२५ 

आपल्या देशातील खूप माणसं मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश पाहायला जातात. आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, झांसी, खजुराहो, भोपाळ, इंदूर, उज्जैन आदि पाहून परत येतात. मात्र झांसी – खजुराहोच्या परिसरात असलेली, बुंदेल राजपूत घराण्याचा तेजस्वी इतिहास सांगणारी,अतिशय देखण्या वास्तू आजही जपणारी ओरछा नगरी मात्र पहायचं राहून जातं. बेटवा नदीच्या काठी असलेल्या या नगरीतील भव्य वारसास्थळांनी इथला इतिहास उरात जपून ठेवला आहे. स्वातंत्र्यप्रिय बुंदेलवंशांच्या राजांनी मनापासून घडवलेली इथली वारसास्थळे पाहताना दिवस कसा संपून जातो कळतच नाही. काही दिवसांपूर्वी आवर्जून ओरछा पाहिलं होतं. त्या गौरवशाली इतिहासाचा ओळख करून देणारा हा लेख... 

(रात्री केलेल्या रोषणाईने झळाळून जाणारे स्थापत्य )

ओरछाचे मूळ निर्माते राजा रुद्र प्रताप सिंह. 1530-31च्या सुमारास त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत बुंदेलखंडच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने मधुकर शाह याने अफगाणी सुलतान इस्लामशहा सूरी (1550 च्या सुमारास) आणि त्या नंतर मुघल बादशहा अकबर (1550-1605) यांच्या काळात चांगला लढा दिला. त्यांच्याच कारकिर्दीत इथल्या ऐतिहासिक राजा राम मंदिराची घटना घडली. तेंव्हापासून इथला राज्यकारभार प्रभू रामचंद्र करतात असे मानले जाते. ओरछा नगरी ही रामराजाची नगरी मानली जाते आणि आजही इथल्या प्रभू रामाच्या मूर्तीला, राजा मानून पोलिसांच्या वतीने रोज “गार्ड ऑफ ऑनर” दिला जातो. एखादा चमत्कार मानावी अशीच ही घटना मुळापासून समजून घ्यायला हवी. 

            ( रामराजा मंदिर )

तर घडलं असं की, राजा मधुकर शाह हे कृष्ण भक्त तर त्यांची पत्नी गणेशकुमारी देवी ही राम भक्त. दोघांना इथे एका भव्य मंदिराची उभारणी करायची होती, मात्र राणीसाहेबांना इथं रामाचे मंदिर हवे होते तर राजाला कृष्ण मंदिर. जर राणीने अयोध्येला स्वतः जाऊन रामाची मूर्ती आणली तरच  तिच्या प्रतिष्ठापनेसाठी अनुमति देण्याचे राजाने मान्य केले. त्यातून इथे चतुर्भुज मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. काही दिवसांनी राणीसाहेब राम मूर्ती आणायला अयोध्येला गेल्या. इकडे मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू राहिले. अयोध्येत गेल्यावर त्यांनी कित्येक दिवस तपश्चर्या सुरू केली. पण रामाचे दर्शन होईना. कंटाळून शेवटी आता आपले जीवन संपवून टाकावे असं जेंव्हा त्यांनी ठरवलं तेंव्हा अखेर प्रभू रामाने दर्शन दिले आणि झालेल्या दृष्टान्तानुसार काही अटीवर तिकडे येण्याची तयारी दर्शवली.

 त्यातील पहिली अट अशी होती की राणीने अयोध्येपासून ओरछा पर्यन्त अनवाणी चालत जायचे. दुसरी अट अशी होती की एकदा जिथे मूर्ती ठेवली जाईल तिथून परत मूर्ती हलवता येणार नाही आणि तिसरी अट म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती विराजमान होईल, तिथे राजा हे केवळ प्रभू राम असतील आणि त्यांच्याच नावे राज्य चालेल. राणीने तिन्ही अटी मान्य केला आणि ती रामाची मूर्ती घेऊन ओरछाकडे निघाली. राणीसरकार जेंव्हा थकून भागून ओरछाला पोचल्या तेंव्हा अतिभव्य अशा त्या चतुर्भुज मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आली होती आणि केवळ गर्भगृहाचे काही दिवसांचे काम बाकी राहिले होते. राजा रामाची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून राणीने आपल्याच जवळ महालात ठेवली. एकदाचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि प्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला. 

जेंव्हा मंडळी राममूर्ती न्यायला राणीमहालात आली तेंव्हा आश्चर्य घडले. ती मूर्ती तिथून हलवताच येईना. कितीतरी दिवस सारे प्रयत्न झाले पण मूर्ती तिथून हलेच ना.. मग सर्वाना रामरायानी सांगितलेली अट आठवली..! अनेक प्रयत्न करूनही ती राममूर्ती तिथून हलवता आली नाही आणि त्या राणीमहालातच शेवटी राजा राम मूर्ती विराजमान झाली..! तो महाल हेच रामराजा मंदिर झाले. पुढे कित्येक काळ ते चतुर्भुज मंदिर देवाच्या मूर्तीविना तसेच पडून राहिले आणि सारे राज्य हे राणी महालात स्थापन झालेल्या राजा रामाच्या नावे सुरू राहिले. कितीदा तरी मुस्लिम आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले मात्र ते विफल झाले. पुढे कित्येक वर्षानी त्या भव्य चतुर्भुज मंदिरात एका लहानशा कृष्णमूर्तीची स्थापना करण्यात आली.  आज ही आपण शेजारी शेजारी असलेली ही दोन्ही मंदिरे पाहतो तेंव्हा साध्या हवेलीतील रामराजा मंदिरात असलेलं चैतन्य आणि दुसरीकडे भव्यता असूनही उदासवाणी, दीनवाणी असलेली चतुर्भुज मंदिराची वास्तू आपल्याला स्तीमित करत राहते. 

          

          (अतिशय भव्य असं चतुर्भुज मंदिर )

महाराज मधुकर शाह यांच्या माघारी 1591 पासून राजा वीर सिंह देव यांच्या काळात ओरछाची, बुंदेलखंडाची खरी भरभराट झाली असं म्हणायला हरकत नाही. इथे मोठ्या किल्ल्याची निर्मिती तर झालीच पण अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर याच्यासोबत त्यांनी मैत्रीचे नाते जोडले. अकबरचा सेनापती अबुल फजल जेंव्हा जहांगीरला पकडायला मोठे सैन्य घेऊन आला होता तेंव्हा वीर सिंहच्या सैन्याने उत्तम प्रतिकार करून जहांगीरचे संरक्षण केले. इतकेच नव्हे तर दख्खनचा सुभा सांभाळणारा, अकबराचा विश्वासू असा तो अबुल फजल याच युद्धात मृत्युमुखी पडला. तेंव्हापासून जहांगीर आणि वीरसिंह देव यांच्यात दोस्ती झाली जी कायम टिकली. एकदा बादशहा जहांगीरने ओरछाला भेट देण्याचे ठरवले तेंव्हा त्यासाठी एक भव्य महाल वीर सिंह यांनी बांधला. 


अनेक दालने असलेला हा महाल, त्याचे देखणे स्थापत्य आपल्याला आजही खिळवून ठेवते. ओरछामधील राजवाडा असो, बुंदेलवंशीय राजांच्या समाध्या उर्फ छत्री असलेली देखणी फूल बाग असो, हा जहांगीर महाल असो, किंवा अतिशय सुबक असे लक्ष्मी नारायण मंदिर असो हे सारं निर्माण करणाऱ्या वीर सिंह यांच्या उत्तम स्थापत्यकलेची दाद द्यावीशी वाटते. हल्लीच्या 5-6 मजली इमारतीएवढी उंच, तरीही मजबूत आणि देखणी अशी बांधकामे 400 वर्षानंतर आजही खणखणीत भक्कम उभी आहेत. कित्येक दालने, ऊन आणि वारा यांचा सुयोग्य वापर करून बांधलेल्या देखण्या इमारती, बाहेरून दणकट / भक्कम दिसणाऱ्या इमारतीच्या यातील दालनात तयार केलेली उत्तम भित्तिचित्रे, म्युरल, आरसे किंवा शीशमहाल आपल्याला अक्षरश: थक्क करून टाकतात. इतकं सगळं निर्माण करताना पुन्हा ओरछा आणि बुंदेलखंडाने आपला स्वतंत्र मनोवृत्तीचा वारसाही जपला. वीर सिंह यांच्यानंतरही बुंदेलखंडाने आपलं स्वातंत्र्य टिकवायचे कायम प्रयत्न केले. 

काही ठळक असे किस्से आजही सांगितले जातात त्यातच एक आहे प्रवीण रायचा किस्साही. प्रवीण राय ही एक अत्यंत सुंदर, हुशार अशी गायिका-नृत्यांगना. राजाची अत्यंत लाडकी. तिचे सौन्दर्य, नृत्यकौशल्य याची ख्याती मुघल बादशहाला कळली (काही जण इथे अकबराचा उल्लेख करतात, तर काही जहांगीरचा आणि काही शाहजहानचा). तिला आग्र्याला दरबारात घेऊन यावे असा निरोप घेऊन बादशहाचा दूत आला. आता राजासमोर पेच पडला की काय सांगावे. तेंव्हा तिनेच राजाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी योग्य मार्ग काढते. 

ती बादशहाच्या दरबारात जाते. तिचे सौन्दर्य, तिची अदा पाहून बादशहाला भुरळ पडते. तीही चतुर असते, ती बादशहाच्या नजरेतील लालसा ओळखते. दरबारात ती मग एक गझल सादर करत नृत्य करते. त्या गजलेच्या बोलातून ती असं सुचवते की तुम्ही स्वत:ला कोण समजता, कुत्रा, भिकारी की अत्यंत खालच्या जातीतला माणूस? यापैकी तुम्ही कोण आहात की जे दुसऱ्याने उष्टावलेले अन्न खातात..? तिच्या बोलण्याचा गर्भितार्थ त्वरित बादशहाला उमजला आणि त्याने लालसा बाजूला ठेवून तिची पुन्हा सन्मानाने बुंदेलखंडाकडे पाठवणी केली. आपली लाडकी राय प्रवीण ही इतक्या स्वाभिमानाने वावरली हे राजाला समजल्यावर ती त्याची अधिकच लाडकी झाली नसती तरच नवल होतं. त्यांनी एक अतिशय सुंदर महाल तिला दिला. हा राय प्रवीण महलही पाहण्यासारखा आहे. तिथं वातावरण थंडगार राखण्यासाठी अशी काही कौशल्ये बांधकामात वापरली आहेत की ऐन उन्हाळ्यात देखील यातील तापमान किमान 10 अंशाने कमी असल्याचे नोंदले गेले आहे. 


अजून एक सांगितला जाणारा किस्सा आहे तो वीर सिंह यांच्या मुलांच्या बाबतचा. वडिलांच्या माघारी राजा झुझार सिंह आणि त्यांचा भाऊ लाला हरदौल यांचा. जेंव्हा झुझार सिंह राजा झाला तेंव्हा हरदौल हा अगदी लहान होता. वडील वारलेले. त्यामुळे झुझार सिंह यांच्या राणीने त्याला आईच्या मायेने वाढवले. हरदौल अत्यंत शूर होता आणि त्याने विविध मोहिमा काढून बुंदेलखंडचे साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. तो तरुण युवराज अत्यंत लोकप्रिय झाला. त्यामुळे शाहजहान बादशहा चिंतित झाला आणि औरंगजेबाला युध्द करण्यास पाठवले. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. तेंव्हा बादशहाने राजाचे कान भरत सांगितले की  तुझ्या भावाचे आणि राणीचे प्रेमसंबंध आहेत आणि उद्या दोघे मिळून त्याचा काटा काढतील. लोकांमध्येही तोच जास्त प्रिय आहे. तेंव्हा त्याने त्वरित आपल्या भावाचा काटा काढावा.. ही मात्रा लागू पडली. राजाने आपल्या राणीला जाब विचारला. तिने अनेक प्रकारे सांगूनही त्याचा विश्वास बसला नाही. शेवटी पतीचे मन राखायला म्हणून तिने आपल्या लहानग्या दिराला विषाचा पेला दिला. मरता मरता त्याने सांगितले की, त्याला असं मारलं जाईल हे कळलं होतं.. मात्र जिला आईसमान मानलं तिच्यावरील आळ दूर होण्यासाठी मी मरण पत्करत आहे. यापुढेही बुंदेलखंड लढता ठेवावा आणि आपले स्वातंत्र्य राखावे. लाला हरदौल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे छोटे मंदिर बांधण्यात आले. अख्ख्या बुंदेलखंडची अशी श्रद्धा आहे ही तो आपला भाऊ आहे. त्यामुळे एखाद्या घरी आजही लग्नकार्य असले की मंदिरात जाऊन त्यांना आमंत्रण देण्याचा रिवाज इथे पाळला जातो..! 

    ( लाला हरदौल यांचं मंदिर )

ओरछा मधील किल्ला, महाल, राजाराम मंदिर, चतुर्भुज मंदिर, बेटवा नदीकिनारी असलेल्या भव्य समाध्या यासोबत इथले लक्ष्मी मंदिर आणि त्यातील भित्तिचित्रे देखील न चुकता पहावीत अशीच आहेत. 





      ( लक्ष्मी मंदिर  आणि भित्तीचित्रे )

त्या नंतरच्या काळात मात्र बुंदेले राजे आपापसात भांडत राहिले आणि त्याचा फायदा शत्रूने घेतला. औरंगजेबाच्या काळात बराचसा प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाऊ लागला तेंव्हा महाराणा छत्रसालनी शत्रूविरुद्ध युद्ध छेडलं. जेंव्हा पुरेसे यश मिळेना तेंव्हा हताश छत्रसाल महाराज हे महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले. तेंव्हा महाराजांनी त्यांना त्यांच्या शूर पूर्वजांचा दाखला देत युद्धास पुन्हा प्रवृत केले. स्वतःची एक तलवार भेट दिली. त्या भेटीने प्रोत्साहित झालेल्या युवा छत्रसाल राजांनी मग औरंगजेबाशी कायम टक्कर दिली आणि बुंदेलखंड स्वतंत्र ठेवला. त्यांच्या उत्तर आयुष्यात पुन्हा जेंव्हा अटीतटीची वेळ आली तेंव्हा तेजस्वी पेशवे पहिले बाजीराव ज्यांच्या मदतीला धावून गेले ते हेच बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल यांचे राज्य होते..!

दतीया, ओरछा, पन्ना अशा भागात पसरलेले हे राज्य. छत्तरपूर येथे राजा छत्रसाल यांचे स्मारकदेखील आहे तेही अवश्य पाहण्यासारखे आहे. जसं औरंगजेबाविरुद्ध शेवटपर्यन्त महाराष्ट्र लढत राहिला तसेच बुंदेलखंड देखील. 

पुढे ब्रिटिश राजवटीत मात्र पाहता पहाता सारे वैभव लयाला गेलं. दूरदृष्टी आणि उत्तम नेतृवगुण यांचा अभाव आणि आपापसातील सुंदोपसुंदी यामुळे ज्या ज्या मोठ्या राजवटी ब्रिटिशांसमोर नामोहरम झाल्या त्यात हेही राज्य सामील झालं. एक गौरवशाली इतिहास पडद्याआड गेला. दडपला गेला. 



  ( फूल बाग येथील राजांच्या समाध्या किंवा छत्री )

आपल्याला आग्रा, दिल्ली इथल्या मुघल बादशहाचे इतिहास वारंवार शिकवले जातात मात्र स्वातंत्र्य मिळवणे आणि टिकवणे यासाठी झगडलेल्या अशा राजवटीचे इतिहास माहीत करून दिले जात नाहीत. मग आपला थोर वारसा आपल्याला कसा समजणार ? आपल्या पुढील पिढ्यांना हे सारं कसं सांगता येणार? 

त्यामुळे भटकंती करत असताना झांसी पासून अवघ्या वीस बावीस किलोमीटरवर असलेल्या ओरछाला आपण आवर्जून जायला हवं. आजही टिकून असलेल्या तिथल्या बुलंद इमारती पाहायला हव्यात. तिथं आजही रोज संध्याकाळी अतिशय उत्तम असा लाईट अँड साऊंड शो होत असतो. तो न चुकता पाहायला हवा. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलेल्या त्या शूर वीरांना मानवंदना द्यायला हवी. तिथली चिमूटभर माती मस्तकी लावायला हवी. किमान एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना? 

-सुधांशु नाईक,पुणे (9833299791)🌿