इतिहासात रमलेली देखणी ओरछा नगरी..!
-सुधांशु नाईक
#सुधा_म्हणे...
०१/०१/२०२५
आपल्या देशातील खूप माणसं मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश पाहायला जातात. आग्रा, मथुरा, ग्वाल्हेर, झांसी, खजुराहो, भोपाळ, इंदूर, उज्जैन आदि पाहून परत येतात. मात्र झांसी – खजुराहोच्या परिसरात असलेली, बुंदेल राजपूत घराण्याचा तेजस्वी इतिहास सांगणारी,अतिशय देखण्या वास्तू आजही जपणारी ओरछा नगरी मात्र पहायचं राहून जातं. बेटवा नदीच्या काठी असलेल्या या नगरीतील भव्य वारसास्थळांनी इथला इतिहास उरात जपून ठेवला आहे. स्वातंत्र्यप्रिय बुंदेलवंशांच्या राजांनी मनापासून घडवलेली इथली वारसास्थळे पाहताना दिवस कसा संपून जातो कळतच नाही. काही दिवसांपूर्वी आवर्जून ओरछा पाहिलं होतं. त्या गौरवशाली इतिहासाचा ओळख करून देणारा हा लेख...
(रात्री केलेल्या रोषणाईने झळाळून जाणारे स्थापत्य )
ओरछाचे मूळ निर्माते राजा रुद्र प्रताप सिंह. 1530-31च्या सुमारास त्यांनी तत्कालीन परिस्थितीचा फायदा उठवत बुंदेलखंडच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने मधुकर शाह याने अफगाणी सुलतान इस्लामशहा सूरी (1550 च्या सुमारास) आणि त्या नंतर मुघल बादशहा अकबर (1550-1605) यांच्या काळात चांगला लढा दिला. त्यांच्याच कारकिर्दीत इथल्या ऐतिहासिक राजा राम मंदिराची घटना घडली. तेंव्हापासून इथला राज्यकारभार प्रभू रामचंद्र करतात असे मानले जाते. ओरछा नगरी ही रामराजाची नगरी मानली जाते आणि आजही इथल्या प्रभू रामाच्या मूर्तीला, राजा मानून पोलिसांच्या वतीने रोज “गार्ड ऑफ ऑनर” दिला जातो. एखादा चमत्कार मानावी अशीच ही घटना मुळापासून समजून घ्यायला हवी.
( रामराजा मंदिर )
तर घडलं असं की, राजा मधुकर शाह हे कृष्ण भक्त तर त्यांची पत्नी गणेशकुमारी देवी ही राम भक्त. दोघांना इथे एका भव्य मंदिराची उभारणी करायची होती, मात्र राणीसाहेबांना इथं रामाचे मंदिर हवे होते तर राजाला कृष्ण मंदिर. जर राणीने अयोध्येला स्वतः जाऊन रामाची मूर्ती आणली तरच तिच्या प्रतिष्ठापनेसाठी अनुमति देण्याचे राजाने मान्य केले. त्यातून इथे चतुर्भुज मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. काही दिवसांनी राणीसाहेब राम मूर्ती आणायला अयोध्येला गेल्या. इकडे मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू राहिले. अयोध्येत गेल्यावर त्यांनी कित्येक दिवस तपश्चर्या सुरू केली. पण रामाचे दर्शन होईना. कंटाळून शेवटी आता आपले जीवन संपवून टाकावे असं जेंव्हा त्यांनी ठरवलं तेंव्हा अखेर प्रभू रामाने दर्शन दिले आणि झालेल्या दृष्टान्तानुसार काही अटीवर तिकडे येण्याची तयारी दर्शवली.
त्यातील पहिली अट अशी होती की राणीने अयोध्येपासून ओरछा पर्यन्त अनवाणी चालत जायचे. दुसरी अट अशी होती की एकदा जिथे मूर्ती ठेवली जाईल तिथून परत मूर्ती हलवता येणार नाही आणि तिसरी अट म्हणजे ज्या ठिकाणी मूर्ती विराजमान होईल, तिथे राजा हे केवळ प्रभू राम असतील आणि त्यांच्याच नावे राज्य चालेल. राणीने तिन्ही अटी मान्य केला आणि ती रामाची मूर्ती घेऊन ओरछाकडे निघाली. राणीसरकार जेंव्हा थकून भागून ओरछाला पोचल्या तेंव्हा अतिभव्य अशा त्या चतुर्भुज मंदिराची उभारणी अंतिम टप्प्यात आली होती आणि केवळ गर्भगृहाचे काही दिवसांचे काम बाकी राहिले होते. राजा रामाची मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून राणीने आपल्याच जवळ महालात ठेवली. एकदाचे मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आणि प्रतिष्ठापनेसाठी उत्तम मुहूर्त निश्चित करण्यात आला.
जेंव्हा मंडळी राममूर्ती न्यायला राणीमहालात आली तेंव्हा आश्चर्य घडले. ती मूर्ती तिथून हलवताच येईना. कितीतरी दिवस सारे प्रयत्न झाले पण मूर्ती तिथून हलेच ना.. मग सर्वाना रामरायानी सांगितलेली अट आठवली..! अनेक प्रयत्न करूनही ती राममूर्ती तिथून हलवता आली नाही आणि त्या राणीमहालातच शेवटी राजा राम मूर्ती विराजमान झाली..! तो महाल हेच रामराजा मंदिर झाले. पुढे कित्येक काळ ते चतुर्भुज मंदिर देवाच्या मूर्तीविना तसेच पडून राहिले आणि सारे राज्य हे राणी महालात स्थापन झालेल्या राजा रामाच्या नावे सुरू राहिले. कितीदा तरी मुस्लिम आक्रमकांनी मंदिर उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले मात्र ते विफल झाले. पुढे कित्येक वर्षानी त्या भव्य चतुर्भुज मंदिरात एका लहानशा कृष्णमूर्तीची स्थापना करण्यात आली. आज ही आपण शेजारी शेजारी असलेली ही दोन्ही मंदिरे पाहतो तेंव्हा साध्या हवेलीतील रामराजा मंदिरात असलेलं चैतन्य आणि दुसरीकडे भव्यता असूनही उदासवाणी, दीनवाणी असलेली चतुर्भुज मंदिराची वास्तू आपल्याला स्तीमित करत राहते.
(अतिशय भव्य असं चतुर्भुज मंदिर )
महाराज मधुकर शाह यांच्या माघारी 1591 पासून राजा वीर सिंह देव यांच्या काळात ओरछाची, बुंदेलखंडाची खरी भरभराट झाली असं म्हणायला हरकत नाही. इथे मोठ्या किल्ल्याची निर्मिती तर झालीच पण अकबर बादशहाचा मुलगा जहांगीर याच्यासोबत त्यांनी मैत्रीचे नाते जोडले. अकबरचा सेनापती अबुल फजल जेंव्हा जहांगीरला पकडायला मोठे सैन्य घेऊन आला होता तेंव्हा वीर सिंहच्या सैन्याने उत्तम प्रतिकार करून जहांगीरचे संरक्षण केले. इतकेच नव्हे तर दख्खनचा सुभा सांभाळणारा, अकबराचा विश्वासू असा तो अबुल फजल याच युद्धात मृत्युमुखी पडला. तेंव्हापासून जहांगीर आणि वीरसिंह देव यांच्यात दोस्ती झाली जी कायम टिकली. एकदा बादशहा जहांगीरने ओरछाला भेट देण्याचे ठरवले तेंव्हा त्यासाठी एक भव्य महाल वीर सिंह यांनी बांधला.
अनेक दालने असलेला हा महाल, त्याचे देखणे स्थापत्य आपल्याला आजही खिळवून ठेवते. ओरछामधील राजवाडा असो, बुंदेलवंशीय राजांच्या समाध्या उर्फ छत्री असलेली देखणी फूल बाग असो, हा जहांगीर महाल असो, किंवा अतिशय सुबक असे लक्ष्मी नारायण मंदिर असो हे सारं निर्माण करणाऱ्या वीर सिंह यांच्या उत्तम स्थापत्यकलेची दाद द्यावीशी वाटते. हल्लीच्या 5-6 मजली इमारतीएवढी उंच, तरीही मजबूत आणि देखणी अशी बांधकामे 400 वर्षानंतर आजही खणखणीत भक्कम उभी आहेत. कित्येक दालने, ऊन आणि वारा यांचा सुयोग्य वापर करून बांधलेल्या देखण्या इमारती, बाहेरून दणकट / भक्कम दिसणाऱ्या इमारतीच्या यातील दालनात तयार केलेली उत्तम भित्तिचित्रे, म्युरल, आरसे किंवा शीशमहाल आपल्याला अक्षरश: थक्क करून टाकतात. इतकं सगळं निर्माण करताना पुन्हा ओरछा आणि बुंदेलखंडाने आपला स्वतंत्र मनोवृत्तीचा वारसाही जपला. वीर सिंह यांच्यानंतरही बुंदेलखंडाने आपलं स्वातंत्र्य टिकवायचे कायम प्रयत्न केले.
काही ठळक असे किस्से आजही सांगितले जातात त्यातच एक आहे प्रवीण रायचा किस्साही. प्रवीण राय ही एक अत्यंत सुंदर, हुशार अशी गायिका-नृत्यांगना. राजाची अत्यंत लाडकी. तिचे सौन्दर्य, नृत्यकौशल्य याची ख्याती मुघल बादशहाला कळली (काही जण इथे अकबराचा उल्लेख करतात, तर काही जहांगीरचा आणि काही शाहजहानचा). तिला आग्र्याला दरबारात घेऊन यावे असा निरोप घेऊन बादशहाचा दूत आला. आता राजासमोर पेच पडला की काय सांगावे. तेंव्हा तिनेच राजाला सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी योग्य मार्ग काढते.
ती बादशहाच्या दरबारात जाते. तिचे सौन्दर्य, तिची अदा पाहून बादशहाला भुरळ पडते. तीही चतुर असते, ती बादशहाच्या नजरेतील लालसा ओळखते. दरबारात ती मग एक गझल सादर करत नृत्य करते. त्या गजलेच्या बोलातून ती असं सुचवते की तुम्ही स्वत:ला कोण समजता, कुत्रा, भिकारी की अत्यंत खालच्या जातीतला माणूस? यापैकी तुम्ही कोण आहात की जे दुसऱ्याने उष्टावलेले अन्न खातात..? तिच्या बोलण्याचा गर्भितार्थ त्वरित बादशहाला उमजला आणि त्याने लालसा बाजूला ठेवून तिची पुन्हा सन्मानाने बुंदेलखंडाकडे पाठवणी केली. आपली लाडकी राय प्रवीण ही इतक्या स्वाभिमानाने वावरली हे राजाला समजल्यावर ती त्याची अधिकच लाडकी झाली नसती तरच नवल होतं. त्यांनी एक अतिशय सुंदर महाल तिला दिला. हा राय प्रवीण महलही पाहण्यासारखा आहे. तिथं वातावरण थंडगार राखण्यासाठी अशी काही कौशल्ये बांधकामात वापरली आहेत की ऐन उन्हाळ्यात देखील यातील तापमान किमान 10 अंशाने कमी असल्याचे नोंदले गेले आहे.
अजून एक सांगितला जाणारा किस्सा आहे तो वीर सिंह यांच्या मुलांच्या बाबतचा. वडिलांच्या माघारी राजा झुझार सिंह आणि त्यांचा भाऊ लाला हरदौल यांचा. जेंव्हा झुझार सिंह राजा झाला तेंव्हा हरदौल हा अगदी लहान होता. वडील वारलेले. त्यामुळे झुझार सिंह यांच्या राणीने त्याला आईच्या मायेने वाढवले. हरदौल अत्यंत शूर होता आणि त्याने विविध मोहिमा काढून बुंदेलखंडचे साम्राज्य वाढवायला सुरुवात केली. तो तरुण युवराज अत्यंत लोकप्रिय झाला. त्यामुळे शाहजहान बादशहा चिंतित झाला आणि औरंगजेबाला युध्द करण्यास पाठवले. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. तेंव्हा बादशहाने राजाचे कान भरत सांगितले की तुझ्या भावाचे आणि राणीचे प्रेमसंबंध आहेत आणि उद्या दोघे मिळून त्याचा काटा काढतील. लोकांमध्येही तोच जास्त प्रिय आहे. तेंव्हा त्याने त्वरित आपल्या भावाचा काटा काढावा.. ही मात्रा लागू पडली. राजाने आपल्या राणीला जाब विचारला. तिने अनेक प्रकारे सांगूनही त्याचा विश्वास बसला नाही. शेवटी पतीचे मन राखायला म्हणून तिने आपल्या लहानग्या दिराला विषाचा पेला दिला. मरता मरता त्याने सांगितले की, त्याला असं मारलं जाईल हे कळलं होतं.. मात्र जिला आईसमान मानलं तिच्यावरील आळ दूर होण्यासाठी मी मरण पत्करत आहे. यापुढेही बुंदेलखंड लढता ठेवावा आणि आपले स्वातंत्र्य राखावे. लाला हरदौल यांच्या मृत्यूनंतर त्यांचे छोटे मंदिर बांधण्यात आले. अख्ख्या बुंदेलखंडची अशी श्रद्धा आहे ही तो आपला भाऊ आहे. त्यामुळे एखाद्या घरी आजही लग्नकार्य असले की मंदिरात जाऊन त्यांना आमंत्रण देण्याचा रिवाज इथे पाळला जातो..!
( लाला हरदौल यांचं मंदिर )
ओरछा मधील किल्ला, महाल, राजाराम मंदिर, चतुर्भुज मंदिर, बेटवा नदीकिनारी असलेल्या भव्य समाध्या यासोबत इथले लक्ष्मी मंदिर आणि त्यातील भित्तिचित्रे देखील न चुकता पहावीत अशीच आहेत.
( लक्ष्मी मंदिर आणि भित्तीचित्रे )
त्या नंतरच्या काळात मात्र बुंदेले राजे आपापसात भांडत राहिले आणि त्याचा फायदा शत्रूने घेतला. औरंगजेबाच्या काळात बराचसा प्रदेश शत्रूच्या ताब्यात जाऊ लागला तेंव्हा महाराणा छत्रसालनी शत्रूविरुद्ध युद्ध छेडलं. जेंव्हा पुरेसे यश मिळेना तेंव्हा हताश छत्रसाल महाराज हे महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले. तेंव्हा महाराजांनी त्यांना त्यांच्या शूर पूर्वजांचा दाखला देत युद्धास पुन्हा प्रवृत केले. स्वतःची एक तलवार भेट दिली. त्या भेटीने प्रोत्साहित झालेल्या युवा छत्रसाल राजांनी मग औरंगजेबाशी कायम टक्कर दिली आणि बुंदेलखंड स्वतंत्र ठेवला. त्यांच्या उत्तर आयुष्यात पुन्हा जेंव्हा अटीतटीची वेळ आली तेंव्हा तेजस्वी पेशवे पहिले बाजीराव ज्यांच्या मदतीला धावून गेले ते हेच बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल यांचे राज्य होते..!
दतीया, ओरछा, पन्ना अशा भागात पसरलेले हे राज्य. छत्तरपूर येथे राजा छत्रसाल यांचे स्मारकदेखील आहे तेही अवश्य पाहण्यासारखे आहे. जसं औरंगजेबाविरुद्ध शेवटपर्यन्त महाराष्ट्र लढत राहिला तसेच बुंदेलखंड देखील.
पुढे ब्रिटिश राजवटीत मात्र पाहता पहाता सारे वैभव लयाला गेलं. दूरदृष्टी आणि उत्तम नेतृवगुण यांचा अभाव आणि आपापसातील सुंदोपसुंदी यामुळे ज्या ज्या मोठ्या राजवटी ब्रिटिशांसमोर नामोहरम झाल्या त्यात हेही राज्य सामील झालं. एक गौरवशाली इतिहास पडद्याआड गेला. दडपला गेला.
( फूल बाग येथील राजांच्या समाध्या किंवा छत्री )
आपल्याला आग्रा, दिल्ली इथल्या मुघल बादशहाचे इतिहास वारंवार शिकवले जातात मात्र स्वातंत्र्य मिळवणे आणि टिकवणे यासाठी झगडलेल्या अशा राजवटीचे इतिहास माहीत करून दिले जात नाहीत. मग आपला थोर वारसा आपल्याला कसा समजणार ? आपल्या पुढील पिढ्यांना हे सारं कसं सांगता येणार?
त्यामुळे भटकंती करत असताना झांसी पासून अवघ्या वीस बावीस किलोमीटरवर असलेल्या ओरछाला आपण आवर्जून जायला हवं. आजही टिकून असलेल्या तिथल्या बुलंद इमारती पाहायला हव्यात. तिथं आजही रोज संध्याकाळी अतिशय उत्तम असा लाईट अँड साऊंड शो होत असतो. तो न चुकता पाहायला हवा. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलेल्या त्या शूर वीरांना मानवंदना द्यायला हवी. तिथली चिमूटभर माती मस्तकी लावायला हवी. किमान एवढं तर आपण नक्कीच करू शकतो ना?
-सुधांशु नाईक,पुणे (9833299791)🌿
No comments:
Post a Comment