पंडित भीमसेन जोशी गेले..गेले कित्येक दिवस टाळावीशी वाटणारी ती बातमी शेवटी ऐकू आलीच..!! काय करणार मृत्यू कुणाला चुकलाय?? पण तरीही ज्याक्षणी बातमी ऐकली त्यावेळी डोळे भरून आले..वर्षानु वर्षे कानात गुंजणारे ते चिरंतन स्वर पुन्हा मनात रुंजी घालू लागले..डोळ्यात अश्रू जरूर होते पण मन त्या सुरांच्या सागरात आनंदाने न्हाऊ लागले..भीमसेनजी बेभान होऊन गात होते.."अवघाची संसार सुखाचा करीन ..आनंदे भरीन तिन्ही लोक.."
खरे तर भीमसेनजींचे तारुण्यातील जोशपूर्ण गाणे माझ्या वडिलांच्या काळातील..आम्हाला जेंव्हा गाणे मनात भिडू लागले कानाला उमजू लागले तेंव्हा त्यांनी जवळ जवळ सत्तरी गाठलेली...गाण्यातील तरुणाईचा जोश जरी कायम असला तरी जीवनातील सर्व सुख दुक्ख उपभोगून पंडितजी जणू एखाद्या खोल विशाल नदीसारखे शांत व तृप्त झाले होते. त्या सुरांना आता योग्य त्या ठेहरावाची जागा सापडली होती.. आणि असे जीवनातील सर्व भाव आपल्या गाण्यातून समर्थपणे व्यक्त करणारे भीमसेन जी माझ्या पिढीने ऐकले..ज्यांनी आमच्या आयुष्याला एक वेगळीच आस लावून दिली..निर्भय गंभीर आणि खणखणीत सुरांची..!!
आता आठवत नाही निश्चित कि पहिल्यांदा कधी त्यांचे गाणे ऐकले ते.. पण आठवणीच्या कप्प्यात जपलेले पहिले गाणे म्हणजे त्यांचा "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल " हा अभंग..त्यातील "नामा म्हणे मज विठ्ठल सापडला...." ऐकताना तो कर कटावरी ठेऊन वर्षानुवर्षे उभा असलेला पांडुरंग नजरेसमोर सगुण साकार होऊन प्रकट होत असे..अपार आनंदाने डोळे पाण्याने भरून येत..
अशा किती आठवणी..किती गाणी..किती मैफिली..
सुरुवातीला मला जेंव्हा जुने फिल्मी संगीत आवडे तेंव्हा "केतकी गुलाब जुही.." ने मनावर गरुड केले..मग जेंव्हा अधिकाधिक ऐकत गेलो संगीताच्या सागरात खोल खोल डुंबत गेलो तसे भीमसेनजींचा पुरिया, हिंडोल बहार,मुलतानी, रामकली, कानडा, वृन्दावनी सारंग, कलावती, यमनकल्याण, आणि तो स्वर्गीय तोडी...हे सारे जिवलग बनले.. गेली अनेक दशके सवाई गंधर्व संगीत महोत्सव अनेकांनी ऐकला..मी तर केवळ १९९५ नंतरच हा महोत्सव अनुभवू लागलो..तेंव्हा कुमारजी, वसंतराव, बेगम अख्तर आणि मल्लिकार्जुन मन्सुरांसारखे माझे लाडके दिग्गज त्या आकाशस्थ स्वराधीशाला भेटायला मार्गस्थ झालेले..त्यांचे स्वर जरी रेकॉर्ड्स मधून ऐकता येत असले तरी प्रत्यक्ष भेटण्या अनुभवण्यातील मजा काही औरच..तसे फक्त भीमसेनजीनाच अनुभवता आले. सवाई च्या निमित्ताने पुण्यात तर ऐकलेच पण चिपळूण, कोल्हापूर, कराड, सांगली-मिरज अशा अनेक ठिकाणी अगदी जवळून त्यांना ऐकले..तृप्त तृप्त होईपर्यंत ऐकले..एक दोन वेळा त्यांच्याशी चार शब्द बोलता आले..तेंव्हा जणू परमेश्वरालाच भेटल्याचा आनंद झाला होता..!!
सवाई ची सांगता करताना भीमसेन जोशी कधी येतात याची सगळ्यांप्रमाणे मीही चातकासारखी वाट पहिली..त्यांच्या तोडी, भैरव च्या वर्षावात अनेकदा चिंब चिंब भिजून गेलो..कधी हि संपू नये असे ते गाणे असे..पण शेवटी मैफल ही संपवायची असतेच ना..रागदारी चा स्वर्ग उभा करून भीमसेनजी हळूच "पिया के मिलन कि आंस.." असे म्हणत ठुमरी आळवायला घेत आणि मग "जोगीयातील" ते कारुण्य मनात आत आत झिरपत जाई. ती आस केवळ प्रियाला भेटायचीच उरत नसे..तर तो प्रत्यक्ष परमेश्वरच जणू "पिया" बनून जाई..त्या परमेश्वराला भेटण्यासाठी भीमसेनजींचे प्रत्येक स्वर अधिकाधिक तरल, हळवे बनत जात..आणि तार सप्तकातील त्या सुरावर जेंव्हा मैफिल थांबे..तेंव्हा जणू अवघा जनसमुदाय मंत्रमुग्ध असे..स्तब्ध असे..टाळ्या वाजवायचेही भान विसरलेल्या आम्हा प्रत्येकाच्या डोळ्यात केवळ अश्रू असत..अत्यानंदाचे..अवीट समाधानाचे....
आता उरल्या केवळ आठवणी..तो घन गंभीर आवाज,ती गडगडाटी तान, ते कारुण्य मधुर स्वर..चिरंतन मागे ठेऊन अण्णा आपल्यातून निघून गेलेत.. ज्याच्या मिलनाची प्रत्येक जीवाला जन्मल्यापासून ओढ असते त्या ईश्वराला भेटायला आमचा स्वरभास्कर निघून गेलाय..आणि..आणि आमच्या डोळ्यात आसू देऊन तो जोगिया केव्हाचा स्तब्ध झाला आहे...!!
-- सुधांशु नाईक, कल्याण. (९८३३२९९७९१)