गेले २ दिवस मुंबई च्या जवळ समुद्रात नवे बेट तयार करून शिवस्मारक निर्माण करायचा मुद्दा गाजतोय..काय गरज आहे अशा स्मारकाची आणि खोट्या कळवळ्याची? आहेत ते किल्ले दुर्लक्षित, आणि समुद्रात ३-४०० कोटी खर्चू म्हणे सरकार भव्य स्मारक बांधणार..आपले शिवप्रेम दाखवण्यासाठी..!! आजकाल शिवाजी महाराजांचे नाव हे राजकारण्यांसाठी आपली पोळी भाजून घेण्याचे उत्तम साधन बनले आहे. गल्लोगल्ली शिवरायांचे पुतळे आहेत, राज्यभर त्यांच्या नावाचे रस्ते आहेत पण खरे शिवबा मात्र लोकांच्या मनात आहेत...आणि नेत्यांच्या खिशात..!!
कित्येक किल्ल्यांच्या परिसरातील जमिनी "पावरबाज" नेत्यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मालकीच्या झालेल्या आहेत, एवढेच नव्हे तर गोपाळगड, यशवंत गड आदि काही किल्ले चक्क लोकांनी आपली property बनवले आहेत आणि राजांचे शेकडो किल्ले अत्यंत दुरावस्थेत आहेत, अशा वेळी प्रत्येक किल्ला - जिथे अनेक शूर मराठी लोकांनी आपले रक्त सांडून जपला त्या किल्ल्यांचे जतन करणे जास्त आवश्यक आहे कि अशी तथाकथित स्मारके उभारून खोटे प्रेम दाखवणे ? अगदी प्रत्येक किल्ल्यासाठी १ करोड जरी खर्च केले तरी ते समुद्राच्या पाण्यात किंवा राजकारण्यांच्या खिशात जाणारे ३०० कोटी रुपये खऱ्या अर्थाने कामी येऊ शकतात. प्रत्येक किल्ला नीट जतन झाला तर तेथे पर्यटन विकसित होईल, प्रत्यक्ष सामान्य रयतेला काही छोट्या व्यवसायातून आर्थिक उत्पन्न मिळवता येईल. त्या गावातील लोक स्वावलंबी होऊ शकतील आणि याच बरोबर आपला इतिहास पुन्हा मनामनात जागवला जाईल ..पण अशी सुबुद्धी आपल्या मंत्र्यांना का होत नाही? कारण यातून त्यांना उत्पन्न मिळत नाही ना..हेच खरे कटू सत्य आहे..!!
अगदी समुद्रातच स्मारक करायचे होते, तेही मुंबई जवळ तर मग ते खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग अशा शिवरायांच्या कर्तृत्वाशी निगडीत किल्ल्यांवर का करता येत नाही सरकारला ? त्यासाठी नवा खर्च हवाच कशाला? की फक्त पुन्हा लोकांमध्ये मतभेद निर्माण करून खरे प्रश्न बाजूला थायाचे आहेत? स्मारकासाठी खरे तर खांदेरी हा जलदुर्ग सर्वोत्तम. मुंबई पासून स्पीड बोटीने तासभर अंतरावरच तर आहे..माय नाईक भंडारी यांनी अवघ्या ४ तोफा व १५० माणसांना सोबत घेऊन इंग्रजांचे बलाढ्य नौदल व सिद्धीचे क्रूर शिपाई यांचा प्रतिकार करत हा जलदुर्ग असा काही उभा केला की इंग्रजानाही आपला पराभव लंडन ला कळवावा लागला..आपल्या आयुष्याच्या अखेरीच्या दिवसात शिवरायांनी यासाठी जे काटेकोर नियोजन केले, धावपळ केली त्यामुळे या जलदुर्गावर त्यांचे स्मारक होणे ही खरी आदरांजली ठरली असती..! पण आज ह्या खांदेरी ला जायचे तर आपले सरकार परवानगी सुद्धा वेळेवर देत नाही..कोणत्याही शिवप्रेमी मराठी माणसाला इथे पटकन जाताच येत नाही..असे आपल्या सरकारचे खरे शिवप्रेम..!!
आज अनेक गिर्यारोहक संस्था, काही स्थानिक गावकरी प्रसंगी पदरमोड करून कित्येक किल्ल्यांचे जतन करायचा लहानमोठा प्रयत्न करत आहेत त्यांना जरी सरकारने बळ दिले तरी शिवरायांची अनेक खरी खुरी स्मारके देशभर उभी राहतील...एकट्या रायगडावरील वास्तू जरी सरकारने जशाच्या तशा उभ्या करून दाखवल्या तरी तेही जगविख्यात स्मारक बनू शकते..हवे तर महाराष्ट्रातील अनेक मोठे वास्तुरचनाकार त्यासाठी स्वतःहून मदतही करतील पण गरज आहे अशा खऱ्या निष्ठेची..ज्यामुळे जुने बांधकाम गडकोट जतन होतील आणि आपणही पुढच्या पिढीला ते दाखवू शकू.!
म्हणूनच प्रत्येक शिवभक्ताने सरकारच्या ह्या मुंबई समोरील तकलादू प्रकल्पाला खणखणीत विरोध करायला हवा...महाराष्ट्रातील लोक मूर्ख नाहीत आणि अजूनही त्यांच्या मनगटातील जोर पैशाच्या बळावर विकत घेता येत नाही हे एकदा ह्या सर्व राजकारण्यांना दाखवण्याची आता खरच गरज आहे असे मला वाटते..तुम्हालाही वाटत असेल तर चला शक्य त्या सर्व मार्गांनी सरकारला योग्य ते करण्यासाठी प्रवृत्त करू या..!! गडकोटांच्या जतनासाठी सरकार वर दबाव टाकूया..!
-- सुधांशू नाईक, कल्याण (०९८३३२९९७९१ /०९९३०९४४९७०)
No comments:
Post a Comment