marathi blog vishwa

Wednesday, 5 June 2013

आज अचानक गाठ पडे..

सुचेल तसं” लेखमालेतील हा १२वा लेख माझ्या एका ज्येष्ठ मित्रावर..!

 आजवर मला जी काही माणसे भेटली होती त्यातील एक छानसं व्यक्तिमत्व म्हणजे माझा हा मित्र..! खरं तर माझ्या बाबांपेक्षाही वयाने मोठा असलेला माणूस..पण असं काही छान मैत्र जुळलं की कोल्हापुरातील माझे ते दिवस सुरेल आठवण बनून गेले. “आज अचानक गाठ पडे...” हे गाणं आठवलं की त्या स्वरप्रेमी दोस्ताची आठवण ठरलेलीच..!

कालिदास मोहोळकर...आमचे भाऊकाका. माझी त्यांची भेट झाली तेंव्हा त्यांनी पंच्याहत्तरी पार केली होती..! माझ्या वयाच्या दुप्पटीपेक्षा जास्त वय असलेल्या या दोस्ताने मनाचा एक कोपरा व्यापून टाकला.. कायमचा..!
 
 

 २००१ मध्ये कोल्हापुरात दाखल झाल्यावर आमच्या एका नातेवाईक काकूंनी मला सांगितलं,“तुम्ही आमच्या भाऊकाकांशी ओळख करून घ्या..तुमचं छान जमेल..त्यानाही तुमच्या सारखी गाण्याची, पुस्तकांची फार आवड आहे..”

“काकू, कुठे भेटतील ते..?”

“बहुदा कुठे मैफिली वगैरे चालू असतात..तिथे भेटतील..विजय तेंडुलकरांसारखी दाढी असलेले म्हातारे गृहस्थ म्हणजे आमचे भाऊकाका..”
------
नेमकं त्यावेळी कोल्हापुरात शास्त्रीय संगीताचं “घराणा संमेलन” सुरु होतं. अवघ्या भारतातून ग्वाल्हेर, किराणा, जयपूर, इंदौर, मेवाती इ. घराण्यांचे अनेक दिग्गज कलावंत ३-४ दिवसासाठी येऊन दाखल झालेले. मी “तरुण भारत” साठी त्याचा वृत्तांत आणि मुलाखती कव्हर करत होतो. सकाळ पासून रात्री पर्यंत मैफिली ऐकतानाच ह्या “भाऊकाकाना” शोधत होतो.
एका रात्री एक तसेच दाढीवाले गृहस्थ दिसले. वर्णन जुळत होतं. गाण्याला मनमुराद दाद देत होता तो माणूस..!
मैफिलीनंतर भेटलो त्यांना..थेट गप्पा मारल्या भरपूर...शेवटी कळले आपल्याला हवा तो माणूस हा नव्हे..! हे कुणी दुसरेच.
मात्र दुसऱ्या रात्री एकदाचे ते कालिदास मोहोळकर उर्फ भाऊकाका भेटले...! आणि थेट घरातलेच झाले.
----
दुसऱ्याच दिवशी घरी हजर.
“सकाळी चालायला निघालो होतो. आज कुणाकडे जावं सुचत नव्हतं, म्हटलं तुमच्याशी नवी ओळख झालीय. तिला वाढवूया..”
बायकोनं– स्वरदा नं, चहा पोहे केले. मलाही त्या दिवशी सुट्टी होती. बसले खूप गप्पा मारत.
आमचं ते घर छोटंसं होतं. पण त्याच्याशी भाऊकाकांना काही देणं घेणं नव्हतं. पुस्तकांनी भरलेली कपाटे आणि शास्त्रीय संगीताच्या कॅसेट्स-सीडीज पाहून ते हरखले...त्यातही कुमारजी, भीमसेनजी आणि मन्सूर यांचं कलेक्शन पाहून आनंदले. एका हातात साधनाताईन्चे “समिधा” वाचायला घेत, “कुमारजींचे “भैरव के प्रकार” ऐकत म्हणाले,
“व्वा, आज हवा छान आहे आणि तुम्ही सकाळ अजून प्रसन्न केलीत..मजा आली..तुमचं घर आवडलं. मी कधीही आलो तर चालेल न??”
विचारताय काय, तुमचेच घर समजा. मला कधीही ऑफिसला जावं लागतं. त्यामुळे मी असलो नसलो तरी काही फरक पडत नाही. तुम्ही येत जा..”
आणि मग ते येत राहिले. मी नसलो की स्वरदाशी बोलत बसायचे. त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायचे. चार अनुभवाचे बोल सांगायचे. मी असलो की मात्र कधीच खाजगी काही बोलायचे नाहीत. आणि अनेकदा सांगूनही मला कधी अरे-तुरे करायचे नाहीत..मलाच ओशाळायला व्हायचं.
त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा कालखंड हैद्राबाद मध्ये गेला. तिथल्या सांस्कृतिक वर्तुळात त्यांना मानाचे स्थान असावे. त्यामुळे उतारवयात कोल्हापुरात मुलाकडे जरी राहिले असले तरी मनाने ते त्या दिवसातूनच रमायचे. त्यांना आयुष्यात कुमारजी, भीमसेन, पुलं, तेंडूलकर अशा अनेक थोर माणसांचा सहवास लाभला. त्यांनी स्वतःही कित्येक नाटकातून तिकडे हैद्राबादमध्ये कामे केली. “गिधाडे” नाटकात काम करण्यापूर्वी तेंडूलकरांनी केलेलं त्याचं वाचन त्यांच्या स्मरणात लख्ख जागं होतं. ऐकलेल्या अनेक मैफिली कानात गुंजतच होत्या. वाचलेली शेकडो पुस्तकं डोळ्यासमोर होती. या सगळ्या “श्रीमंती”ची त्यांना जी “नशा” चढली होती ती कधी उतरलीच नाही..! मात्र म्हणून नवीन कलावंताविषयी उगाचच त्यांनी टीकेचे उद्गार नाही काढले. चांगलं चित्र, चांगलं गाणं, छानसं पुस्तक, प्रवास आणि माणसांचं भेटत राहणं ही सगळी त्यांची औषधं होती ! आमच्या गप्पात ते मग त्या मंडळींच्या लाभलेल्या सहवासाबद्दल, ऐकलेल्या अनेक खाजगी मैफिलींबद्दल बोलत राहायचे. एकदा कुमारजींच्या विषयी बोलताना म्हणाले,
“कुमारजी, माणूस म्हणून फार ग्रेट होते. त्यांचं गाणंच नव्हे तर वागणं बोलणं, राहणं सगळंच वेगळे होते. एकदा मी देवासला त्यांच्याकडे राहिलो होतो. सकाळी शिळ्या चपातीला फोडणी देऊन केलेला छान नाश्ता खाऊन झाला. मग त्या दिवशी कुठेतरी मैफिलीला जायचं होतं. बहुदा बंडू भैय्यांकडे असावं. ते तयार झाले. मीही आपला साधा शिक्षक माणूस. पट्कन तयार झालो.
इतक्यात ते म्हणाले, “ मोहोळकर, कुठलं अत्तर हवं तुम्हाला?”
मी आधीच संकोचलेला. चट्कन नावही आठवेनात अत्तरांची. मग पट्कन आठवत ते दिलं एक नाव ठोकून.. ”हीना.”.
“या इकडे..” असं म्हणत त्यांनी एक कपाट उघडलं.
तिथे आत मोठ्या बुधल्यामधून अत्तरं भरलेली होती..! त्यातली हिनाची बाटली उघडली कुमारजींनी. म्हणाले..
“हात करा पुढे..”
मी आपला उपडा हात नेहमीप्रमाणे पुढे केला. त्यावर अत्यंत रागाने त्यांनी माझा हात झटकून टाकला. म्हणाले,
“अत्तर कधी असं लावतात का??”
मग त्यांनी आपल्या हाताच्या ओंजळीत ते अत्तर ओतलं, दोन्ही हात एकमेकावर चोळले बराच वेळ...आणि मग माझ्या सदऱ्याला अंगभर लावत म्हणाले...
“मोहोळकर, आयुष्यात संकोच नसतो करायचा..भरभरून जगायला शिकलं पाहिजे आपण. अत्तर असं अंगभर लाऊन जायचं.. बघा आता कसा सुरेख गंध दरवळेल तो..”
मी अंगभर संकोचलो होतो...आणि त्यापेक्षा मोहरलो होतो..! ज्यांच्याशी हात मिळवणं सुद्धा आम्हाला किंमती वाटायचं ते कुमारजी माझ्या सदऱ्याला अत्तरात अक्षरशः बुडवत होते..!! मग त्यांचंच गाणं आठवलं..मला सर्वात आवडणारे..
“निसटुनी जाई संधीचा क्षण..सदा असा संकोच नडे..आज अचानक गाठ पडे...”
कधीही कुणाची फर्माईश न स्वीकारणाऱ्या कुमारजींनी त्या दिवशी माझ्या विनंतीवरून ते गाणं म्हंटलं याचंच समाधान माझ्यासाठी लाख मोलाचं होतं...”
असे शेकडो किस्से त्यांच्या आठवणीत होते.
---
कोल्हापुरात ते रोज सकाळी ८ पासून दुपारी १२-१ पर्यंत चालत फिरायचे वयाची ८० वर्षे उलटून गेल्यावरही..! रोज  कुणाला तरी भेटून यायचे. कोल्हापुरात आधीच खूप कलावंत आहेत. कुणाकडे तरी फेरी ठरलेलीच. त्यातून कंटाळा आला की मग प्रवास सुरु. नातेवाइकांबरोबर मित्रमंडळी, विद्यार्थी सुहृद, अशा कोणाकडेही गावोगावी जात. ते ज्या विवेकवर्धिनी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले तिथल्या अनेक विद्यार्थ्यांवर त्यांचं फार प्रेम. कोण कसा मोठा झालाय, कुठे असतो इ. सगळं मग पत्र लिहून आम्हाला कळवायचे. कोणतीही चांगली गोष्ट, मग ती एखादी छान बंदिश असो वा ताटातला छानसा पदार्थ, त्याला दाद तर द्यायचेच, पण ते दुसऱ्या “समानशीले...” मित्राला कधी सांगतोय असं त्यांना व्हायचं नेहमी. समोर असले की दिलेली “व्वा, क्या बात है..” ही अशी  दाद ठरलेलीच..!
त्यांचं ते पोस्टकार्डवरच पत्रही वेगळंच. अगदी एक मिलीमीटर जागाही कधी रिकामी ठेवायचे नाहीत कार्डावर..! आमचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस न चुकता लक्षात ठेवायचे. तेंव्हा आम्ही दोघंच होतो कोल्हापुरात. मुलंही झाली नव्हती तेंव्हा. त्यामुळे गावात असले की मुद्दाम आम्हाला भेटायला यायचे. आणि नसले तर तारीख चुकणार नाही याची दक्षता घेऊन आधीच लिहिलेलं पत्र आम्हाला वेळेवर मिळायचेच..!
कधी मला आणि स्वरदाला वेगवेगळी पत्रं लिहायचे.
तिच्या पत्रात लिहायचे,
“तुझा संसार वेगळा आहे. नवराही कलंदर. त्याला इतरांच्या फुटपट्ट्यानी मोजू नको. त्याचं विश्व वेगळंच आहे. धडपड्या आहे, जिथे जाईल तिथं गोतावळा जमवेल, पण पैशाचा विचार नाही करणार. तेवढं तू सांभाळ. तू गुणी आहेसच करशील नीट संसार...” आणि मग स्वतःची काही आठवण लिहायचे.
माझ्या पत्रात इतर काही लिहून झालं की हळूच लिहायचे,
“खूप छान पत्नी मिळालीय तुम्हाला. तिला जपा. तुमचे छंद, आवडी सगळं जपा पण एक घर बांधा आधी कुठेतरी.. तुमची हक्काची जागा हवी..स्वतःची..!”
आणि आम्ही कोल्हापुरात घर बांधायचं ठरवलं. माझे आई-वडील, तिचे आईवडील सगळे होतेच सोबतीला. पण त्यांच्या इतकाच आनंद भाऊकाकांना झालेला..!
----
त्यांच्या परीचयामुळे मलाही अनेक नवी नाती जोडता आली. कोल्हापुरातील एक ज्येष्ठ गायक (आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक) विनोदजी डिग्रजकर, देवल क्लबचे श्रीकांत डिग्रजकर, प्रभाकर वर्तक, ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव अशा अनेकांशी त्यांच्यामुळेच ओळखी झाल्या, वाढल्या. एकदा कुमारजींच्या कन्या कलापिनीताई कोल्हापुरात आलेल्या. विनोद्जींच्या घरी मी त्यांची मुलाखतही घेतली. खूप गप्पा मारल्या. मग भाऊकाका तिथे आले.
“मोहोळकर काका..किती दिवसानंतर भेटताय..” असं म्हणणाऱ्या, उठून त्यांना नमस्कार करणाऱ्या कलापिनीताईना “पिना, किती मोठी झालीस गं, तुम्हाला बाबांनी पहिली तालीम दिली होती तेच आठवतंय बघ अजून मला...” असं म्हणत आशीर्वाद देणारे, कुमारजींच्या आठवणींनी गहिवरलेले प्रेमळ भाऊकाका आठवले की अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात..!
(कुमारजींच्या कन्या कलापिनीताई, विनोदजी, मी आणि भाऊकाका)
त्यांच्यामुळेच पुण्याच्या “वंचित विकास” या समाजसेवी संघटनेची आणि संस्थापक “विलासकाका चाफेकर” यांचीही  ओळख झाली. त्यांच्यावर लिहायला भाऊकाकानीच मला उद्युक्त केलं. पुढे जाऊन विलासकाकांचा जो स्नेह आजपर्यंत मिळालाय त्याला निमित्त ठरले भाऊकाका..!
----
माझ्या आग्रहाखातर त्यांनी “तरुण भारत” मध्ये “अशी माणसे..अशा आठवणी..” नावाचे सदर आणि इतर काही लेखही लिहिले. “जगातला कुठलाच माणूस फक्त चांगला नसतो, मीही त्यातलाच एक आहे..मला असं स्वीकारा..”  असे म्हणणाऱ्या त्यांना कुणाविषयी वाईट बोलताना, शिव्या देताना मी कधीच नाही पाहिलं. त्यांच्या आयुष्यातही अनेक कडवट प्रसंग आलेले. पण कधी त्यांनी त्याचा उच्चार नाही केला. उलट नेहमी म्हणायचे,
“दुःख हे आपल्या पाचवीलाच पुजलेलं असतं. त्यामुळे त्याबद्दल काय वेगळे बोलायचे..उलट आनंद देणाऱ्या गोष्टी माणसाने जास्त सांगाव्यात. आपलं दुःख उरात गाडून टाकावं..दुसऱ्याचं दुःख हलकं करावं..”
----
पुढे माझं कोल्हापूर पर्व संपलं. पुन्हा भटकंती सुरु झाली. थेट परदेशातही पोचलो...पण त्यांच्याशी संपर्क होता. मस्कत, अबुधाबीलाही त्यांची पत्रं यायची..भारतात आलो की भेट व्हायची. पुन्हा २००९ मध्ये मी भारतात परतलो. कल्याणला नवं घर घेऊन राहू लागलो. तिथल्या घरी त्यांना यायचं होतं..पण शेवटी नाहीच जमलं..नंतर त्यांची पत्नी गेल्याचं कळल्यावर भेटूनही आलो. गप्पा मारल्या. तेही थकत गेल्याचं जाणवलं.
-----
तो दिवस अजून लख्ख आठवतोय... मी पुण्यातल्या मित्राबरोबर “कास पठारावर” भटकून आलो होतो. खूप फोटो काढले होते. ती रम्य इवली इवली फुलं पाहून अक्षरशः आम्ही तहानभूक विसरलो होतो..पुण्यात परत आलो आणि निरोप मिळाला “भाऊकाकाना heart attack आलाय. ८५% blockage आहे...शक्यतो भेटून जा.”
 पुण्यातून कल्याणला न जाता थेट कोल्हापुरात पोचलो. माझे सासरे बसजवळ आले होते. त्यांच्या टू- व्हीलरवरून तसेच दवाखान्यात गेलो. “ICU मध्ये आहेत” असं कळले. एकानं त्यांचा बेड दाखवला.
अंग सुजलं होतं. नाकातोंडात नळ्या अडकवलेल्या होत्या..”काही तास काढतील” असं नर्स म्हणाली.
एवढी वाईट अवस्था असेल असं वाटलं नव्हतं. मी जवळ बसलो. विचारपूस केली. त्यांनी खुणेनं उत्तर दिली. “छान आहे” म्हणाले..
मी विचारलं, “कुमारजींचं काही ऐकणार?”
“हो..” खुणेनच हात हलवला..
“अवधूता, युगन युगन हम जोगी..” मोबाईलवर निर्गुणी भजन लावलं.
मस्त मान हलवून ते दाद देऊ लागले. ते निर्गुणी भजन संपता संपता त्यांचे डोळे भरून आले..माझा हात त्यांनी घट्ट धरून ठेवला..!
इतक्यात, नर्स म्हणाली, “त्यांचा नातू आहे इथंच..”
“नातू?? अहो, पण यांना तर फक्त नाती आहेत इथं कोल्हापुरात...मग नातू कुठून आला..?” मी विचारलं.
इतक्यात तो युवक जवळ आला. आपल्या आजोबांना आवडलेलं ते गाणं मलाही द्या म्हणाला..मी त्याला दिलंसुद्धा..
पण विचारात पडलो होतो..हा नातू कुठला?? इतक्यात नर्सनं म्हटलं, मारूळकरांजवळचे सगळे बाहेर जा..
अरे, हे तर मोहोळकर न??” मी चमकून पुन्हा विचारलं..
“छे..छे..मोहोळकर तिकडे पलीकडच्या खोलीत आहेत..!!!”
मी थक्क..!
म्हणजे इतका वेळ कुमारजींचं ऐकून मन भरून आलेले हे कुणी दुसरेच...?? माझं मलाच प्रचंड हसू आले...त्या तसल्या परिस्थितीतही...!
मग आम्ही पलीकडे गेलो. “आमचे भाऊकाका” मस्त पलंगावर बसले होते. मला पाहताच आनंदले.
“या..या. कसे आहात सगळे? तुम्हाला कुणी कळवलं? उगाच इथे अडकवून ठेवलंय हो..काही नाही झालंय..जरा श्वास घ्यायला त्रास होतोय, चक्कर करतेय म्हणून सांगितलं तर इथे अडकून ठेवलाय..”
मग मी मगासचा सगळा किस्सा सांगितला...
मस्त खळखळून हसले...म्हणाले “चला, त्यानिमित्ताने, त्या म्हाताऱ्याला कुमारजी लाभले. बिचारा आनंदाने मरेल आता, मग मलाही पुन्हा ऐकवा कुमारजी..”
मग त्यानाही कुमारजी ऐकवले. त्यांचं आवडतं “आज अचानक गाठ पडे...” ऐकवलं. त्यांचा तो मनसोक्त दाद देणारा चेहरा पाहिला. त्यांना भेटून मलाच कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..
-----
परत भेटतील का? हाच विचार करत कल्याणला परतलो. ३१ जानेवारी त्यांचा वाढदिवस. त्या दिवशी त्यांना भेटायला जायचंच असं ठरवलं...मात्र ते होणार नव्हतं. जानेवारी सुरु झाला..आणि एकदिवस कळलंच.. “भाऊकाका गेले..”
त्यांची पहिली आणि शेवटची भेट. दोन्हीवेळा माझ्याकडून चुकामूक झालेली..दोन्ही घटना आठवून पुन्हा हसू आले.. आणि हसता हसता कधी डोळे पाण्याने भरले, माझं मलाच कळलं नाही.. माझं मलाच कळलं नाही..!!
-    सुधांशु नाईक. (nsudha19@gmail.com)
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 

 

Monday, 3 June 2013

तू जिवलग..


 
 
 
 
 
 
तू वेडा... मस्त रंगात येणारा...
तू हलकट.. अगदी त्रासून सोडणारा...
तू मूर्ख ... पाहिजे तेंव्हा जवळ नसणारा...
                    तरीही तू जिवलगच....पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा ....


तू धसमुसळा... माझी पार भंबेरी उडवणारा...

तू बालिश...वेडावाकडा भरकटत जाणारा...
तू हट्टी ... मनसोक्त गोंधळ घालणारा...

                  तरीही तू हळवा...पुन्हा पुन्हा कुशीत घेत जपणारा....


तू अजागळ... हल्ली बेशिस्त झालेला...
तू उदास...  अचानक रुसणारा...
तू अथांग... सगळे अपराध पोटात घेणारा...
तू लाडका..तू माझा..माझा पाऊस..
पुन्हा पुन्हा बरसत येणारा...पुन्हा पुन्हा बरसत येणारा...
 -- -सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)