marathi blog vishwa

Saturday, 24 September 2016

एक भन्नाट दिवस- स्वरवेड्या माणसासोबत...!

एकेकाळी शंकर-जयकिशन यांच्यासोबत वावरलेल्या, त्यांच्यासाठी व्हायलीन वादन करणाऱ्या नंदूजीचा मुलगा श्रेया घोषाल वगैरे सुप्रसिध्द कलावंतांसोबत सध्या गिटार वादनासाठी जात असतो. लाखो रुपये कमावतो. अशावेळी घरात आम्हा ४-५ जणांसमोर नंदूजी आपल्या विश्वात आम्हाला मनसोक्त हिंडवून आणत होते..!
मोठ-मोठ्या शो मधून हजारो रुपये मानधन सहज मिळवणारा हा थोर माणूस साध्या कपड्यात बसून आमच्यासमोर स्वरमहाल उभा करत होता..!
 --------*******----------
माझा जुना मित्र संदीप आगवेकर रफीसाहेबांच्या गाण्याचे कार्यक्रम सर्वत्र करत असतो. सध्या जरा नव्या संकल्पना घेऊन वाटचाल सुरु आहे. त्या सांगीतिक कार्यक्रमात निवेदनाची लहानशी जबाबदारी पार पाडायची होती म्हणून नुकतंच पुण्याला गेलो होतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट झाली एका मनस्वी स्वरवेड्या माणसासोबत. त्यांचं नाव नंदू चवाथे. तेही या कार्यक्रमात सोलो व्हायलीन वादन करणार होते.
आज सत्तरी पार केलेले नंदू सर १९६२ पासून शंकर-जयकिशन यांच्या वाद्यवृंदात व्हायोलिन वाजवत. नंतर ओ. पी. नय्यर, पंचमदा बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल इ. अन्य संगीतकारांकडेही त्यांनी व्हायोलिन वादन केलं आहे. मात्र खरी भक्ती शंकर-जयकिशन यांच्यावरच.

अर्थात शंकर-जयकिशन यांनी केलेलं काम तसेच मोठे आहे. बरेचसे चित्रपट रसिक ज्या पंचम उर्फ आर. डी. बर्मन यांना वाद्यवृंदाचा बादशहा मानतात, ते पंचम शंकर-जयकिशन यांना मानत. यातच सारं आले.
 अशा दिग्गज माणसासोबत राहण्याचे, वावरण्याचे व त्यांना जवळून पाहण्याचे प्रसंग सर्वसामान्यांच्या वाट्याला फारसे येत नाहीत. त्यामुळे या दृष्टीने नंदू सरांसारखी माणसे भाग्यवानच ! आणि त्यांचा सलग दोन दिवस संपूर्ण सहवास लाभणे हे आमचे भाग्य.
नंदू सरांना प्रश्न विचारावे लागतच नाहीत. ते अजूनही मनाने तो संगीताचा सुवर्णमयी काळ जगतच असतात. आपणच हळूच त्यात शिरकाव करून घ्यायचा असतो, त्यांच्या माध्यमातून. माझा मित्र संदीपच्या घरी आम्हा सर्वांना नंदूजीचा सहवास लाभला. खूप गप्पा मारता आल्या.


ते सतत सांगत होते आम्हाला दत्ताराम, साबेस्टीयन, मित्रा, इनौक डयनियल, रामलाल इत्यादी मंडळींच्या अनेक कथा. कितीतरी त्यांच्या संगीतनिष्ठेच्या. कितीतरी खाजगी गोष्टी सुद्धा. शंकरजी व जयकिशन यांचं त्यांच्या कामातलं मोठेपण सांगताना भारावून जात होते. त्याचबरोबर त्यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टीमुळे किती भावनिक त्रास सहन करावे लागले, याचमुळे जयकिशन यांचा कसा अकाली मृत्यू झाला हे सांगताना हळवे होत होते.
प्रत्येक कलावंताचे मान-अपमान, अहंकार, असूया हे सारं टोकदारच असते. त्या टोकदार भावनांमध्ये कधी तो कलाकार होरपळून जातो तर कधी दुसरे होरपळतात. मात्र स्वभावाला औषध नसते हेच खरं..! असे अनेक किस्से ऐकताना आम्ही गुंग होऊन गेलो.

१९६२ पासून नंदू सर शंकर जयकिशन यांच्यासह अन्य लोकांकडे काम करायचे. शंकरजी हे तर त्यांच्यासाठी जणू दैवतासमान. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे शंकर-जयकिशन यांचा विश्वास संपादन केलेला..
एका चित्रपटाचे संगीत बनत होते तेंव्हाचा एक किस्सा नंदूजी सांगत होते..

“बहुदा तो ‘ दिल तेरा दिवाना’ हा चित्रपट असावा. ६-७ दिवस झाले तरी मनासारखं काम जमेना. मेहमूद व शम्मी कपूर यांच्यावर चित्रित होणारं एक गाणं हा वेगळा प्रयोग होता. “धडकने लगता है मेरा दिल तेरे नाम से..” ही स्वर-रचना जशी हवी तशी बनत नव्हती. त्यामुळे शंकरजी अस्वस्थ होते. त्या दिवशी संध्याकाळी अचानक ते सारं जमून आलं. मग दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग करायचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी आली की शंकरजी यांची आई जी तिकडे आंध्रप्रदेश मध्ये रहायची, त्यांचं निधन झालंय. मग जयकिशन यांनी रेकॉर्डिंग रद्द केल्याचं आम्हा सर्व वादकांना कळवलं.
जरा वेळानं शंकरजी स्टुडीओमध्ये आले. कसलीच तयारी नाही हे पाहून अत्यंत रागावले. पुन्हा सगळ्यांना एकत्र केलं गेलं. रेकॉर्डिंग पार पडल्यानंतर मग शंकरजी यांनी माझ्या हातात पैसे दिले व मला गावी पाठवून दिलं. शंकर व जयकिशन यांच्यात सुप्त स्पर्धा असायचीच. पण त्यात कटुता नसे. जे काही चांगलं निर्माण होई ते स्वीकारले जाई.
याच सिनेमाच्या त्या टायटल गाण्याविषयी पण एक गंमत आहे.. “ धडकने लगता है.. हे गाणं शंकरजी यांनी बनवलेलं. तर दिल तेरा दिवाना है सनम... हे जयकिशन यांनी रचलेलं. मात्र तेंव्हा स्टुडीओमध्ये हे “दिल तेरा दिवाना” काही रंगतदार वाटत नव्हतं. त्यात तो जोश दिसेना. अचानक जयकिशन पुढे आले आणि त्यांनी एक सुधारणा सुचवली. त्यानुसार “बिजली गिराके आंप खुद बिजली से डर गये...” हा उंच आवाजातील रफीने गायलेला तुकडा गाण्याच्या सुरुवातीला घेतला गेला. त्यामुळे सारं वातावरणच बदलून गेलं. ते गाणं बाकीच्या गाण्यांच्या तुलनेत कुठल्याकुठे पुढे गेलं..!”


असे किस्से नंदुजींच्या तोंडून ऐकताना आम्हाला अजून एक दुर्मिळ भाग्य लाभलं. ते म्हणजे प्रत्येक किश्श्यानंतर ती ती गाणी ते व्हायलीनवर वाजवून दाखवत होते. स्वतः नंदू जी सुद्धा गरीब परिस्थितीतून पुढे येत मोठे कलावंत म्हणून त्यांच्या क्षेत्रात ओळखले जातात.
एकेकाळी शंकर-जयकिशन सोबत वावरलेल्या, त्यांच्यासाठी व्हायलीन वादन करणाऱ्या नंदूजीचा मुलगा श्रेया घोषाल वगैरे सुप्रसिध्द कलावंतांसोबत सध्या गिटार वादनासाठी जात असतो. लाखो रुपये कमावतो. अशावेळी आम्हा ४-५ जणांसमोर नंदूजी आपल्या विश्वात आम्हाला मनसोक्त हिंडवून आणत होते..! मोठ-मोठ्या शो मधून हजारो रुपये मानधन सहज मिळवणारा हा थोर माणूस घरच्या साध्या कपड्यात बसून आमच्यासमोर स्वरमहाल उभा करत होता..!

 सहज सी. रामचंद्र यांच्या संगीताचा विषय निघाला. मग नंदू सर व्हायलीन घेऊन सरसावले. “ओ चांद जहा वो जाये..”, “ राधा ना बोले ना बोले ना बोले रे...”, “अचलम..चापलम..” “ धीरे से आजा रे अखियन मे...” अशी एक से एक गाणी ऐकवू लागले. सकाळची वेळ. समोर खुर्चीत आम्ही बनियनवर बसलेलो. त्यांना अधूनमधून गाण्याच्या ओळी आमच्या भसाड्या आवाजात ऐकवत...! आज या वयातही त्यांचा हात जराही कापत नाही. गाण्याचे बोल तर जसेच्या तसे वाजतातच, पण इंटरल्यूड म्युझिक सुद्धा जसेच्या तसे स्मरणात आहे, व तसेच वाद्यातून उमटते हे पाहून आम्हीच थक्क होत होतो..!
सकाळी साडेसहा ते नऊ अशी अडीच तास रंगलेली ही घरगुती मैफिल संपूच नये असंच वाटत होतं.
 अखेर त्यांचे पाय धरले..! शेवटी एवढा आनंद त्यांनी दिला त्याची काय भरपाई करणार आपण?? लाखो रुपये देऊनही न मिळणारा आनंद त्यांनी भरभरून वाटला होता..!!

पट्कन उचलून मिठीत घेत ते मात्र साधेपणाने म्हणाले, “व्वा..आज छान रियाझ झाला. तुम्ही सगळे मनापासून ऐकत होतात, मलाही खूप दिवसानंतर मजा आली वाजवायला..!” इतकं सच्चेपण.

 प्रत्येक कलावंताचा एक काळ असतो. तेंव्हा ते शिखरावर असतात. मात्र जेंव्हा तो काळ संपतो, तेंव्हा त्या झगमगाटी विश्वापासून दूर राहणं अनेकांना झेपत नाही. मग सुरु होतो व्यसनांचा सिलसिला. त्याला नंदूजी अपवाद आहेत. चित्रपटासाठी वाजवायचं कमी झाल्यावर त्यांनी अनेक खाजगी मैफिली केल्या. कित्येक वाद्यवृंदातून वाजवलं मात्र कधीही डोक्यात हवा जाऊ दिली नाही. आपल्या कलेवर नितांत प्रेम करताना मोठ्या झालेल्या अन्य कलावंताबाबत असूया बाळगली नाही. आज फार मोठे मानले गेलेल्या अनेक कलावंताना त्यांनी स्वतःहून शंकर-जयकिशन, पंचम, ओ पी., प्यारेलाल इत्यादी मंडळींकडे कामाला लावले. त्यांना ब्रेक मिळवून दिला. त्याबद्दल कोणतेही मोठेपण नंदूजी मिरवत नाहीतच पण त्याचबरोबर जी मंडळी कृतघ्नपणे त्यांचं योगदान विसरली त्यांना नावंही ठेवत नाहीत. आजही नवोदित कलावंताला उत्फूर्तपणे प्रतिसाद देतात आणि त्यांना स्टेज मिळावे म्हणून प्रयत्नही करतात.

आपल्या आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही वेदना देऊन जातात तर काही धडे शिकवून जातात. नंदूजीसारखी माणसे मात्र आपल्याला आयुष्य कसं जगावं याचा आदर्श देऊन जातात. निरंतर स्मरणात राहणारे असे सुवर्णक्षण देऊन जातात की त्यांना चिरंजीव सुरांचे कोंदण लाभलेलं असतं..!

-सुधांशु नाईक (9833299791, nsudha19@gmail.com)

Tuesday, 20 September 2016

इंजिनिअर डे..!

१५ सप्टेंबर च्या "इंजिनिअर डे" च्या निमित्ताने एका इंजिनिअरची ही धमाल...

आज इंजिनिअर डे! म्हटलं मस्त दिवस ढकलू.
उद्या पेपर नसल्यानं आज मिळतील तेवढे पेपर आल्याच्या चहासह चवीनं वाचू. 
मग निवांत बसून मन्सूरअण्णांचा यमनी बिलावल ऐकावा.
समोर आलेला गरमागरम नाश्ता हाणताना पुन्हा एकदा भाऊ पाध्येंचा " बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" वाचावा...
 सावकाशपणे मुलींना आपल्या कळपात ओढून डीवीडीवर धमाल पिक्चर पहावा..
पण....
जणू या सगळ्याचा सुगावा हेरखात्यामार्फत मिळाल्यानंतर आकाशवाणी झाली, " उद्या आम्ही संपावर. सकाळी उशीरा उठणार व काही करणार नाही..."
मग....
शेवटी हाडाचा इंजिनिअर! अचानक जाहीर झालेल्या ओरलला जो कधीही निधड्या छातीनं सामोरा जातो तो अशा आव्हानांसमोर थोडंच गुडघे टेकणार??
सकाळी आपलाआपण मस्त चहा ढोसून पेपर वाचून काढले. नाश्त्याला हवेच काहीतरी म्हणून दडपे पोह्याची तयारी सुरु केली.
ट्रॉल्यांची सततची उघडझाप ऐकून आकाशवाणी झालीच.
" पोहे डावीकडच्या ट्रॉलीत आहेत, पातेलं उजवीकडे... इत्यादि इत्यादि..
" माहितेय मला, ते सगळं काढलंय, शेंगदाणे? "
" पोह्याशेजारी दिसले नाहीत वाटतं.. "
मग बारीक कांदा कसा आपल्यालाच चिरता येतो व कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून काय करावं यावरचा सेमिनार इंजिनिअरनं नवोदित मेंबर्स ना दिला.
मग तयार झालेले सुंदर पोहे सर्वांनी मनसोक्त दडपून खाल्ले. 
तरीही तांब्याभर पाणी पिऊन मग जाताजाता कुजकेपणानं लेक बोललीच, "पोहे चविष्ट होते रे, पण चार दिवसाचं तिखट बहुदा एकदम वापरलंस तू.."
नवीन काही शिकायचं तर कष्ट करायची तयारी हवी याविषयी अजून एक सेमिनार! देत त्यांच्याकडून हळूच चहाची भांडी, कपबशा, प्लेटस् विसळून घेण्यात आल्या. शेवटी प्रत्येक इंजिनिअरच्या आत एक सुपरवाइजर कम् मॅनेजर जन्मजात दडलेला असतोच!
नाश्ता संपेतो जेवणही करायला हवं हे उमगलं.
फ्रीजमधल्या भाज्यांचं आधीच पुढच्या तीन दिवसांसाठी रिझर्वेशन केलेलं. मग कपाटं शोधावी लागली.
मे महिन्यात काश्मीर ट्रीपवेळी " ह्या राजम्याला भिजवून ठेवावं लागत नाही" म्हणून हौसेनं घेतलेला राजमा अंग चोरुन बसलेला!
त्याला उचलला. बुर्जी व अंडाकरीसाठी राखून ठेवलेल्या " एव्हरेस्ट मटन मसाल्या" कडे बरेच दिवस दुर्लक्ष झालेलं. तो आज मदतीला धावून आला.
चमचमीत राजमा, भात तयार झाला पण चपात्यांचं काय?
शेवटी " तुझ्या हातच्या गरम चपात्यांची मजा न्यारीच" अशा स्तुतीवर चपात्यांचं आउटसोर्सिंग करण्यात आलं.
सोबत कांद्याची व घोसावळ्याची भजी असा चविष्ट मेनू तयार झाला. 



मधल्या वेळेत स्वत:च्या व दुस-यांच्या आंघोळीचं प्रकरण उरकण्यात आलं व अवघं कुटुंब जेवायला सज्ज झालंय...

तुम्ही पण येताय ना? सोबत आइसक्रीम घेऊन यायला विसरु नका. नाही म्हणजे तिखट लागलं जेवण तर बरं असतं ना आईस्क्रीम... 
- सुधांशु नाईक. ( nsudha19@gmail.com)