marathi blog vishwa

Tuesday, 20 September 2016

इंजिनिअर डे..!

१५ सप्टेंबर च्या "इंजिनिअर डे" च्या निमित्ताने एका इंजिनिअरची ही धमाल...

आज इंजिनिअर डे! म्हटलं मस्त दिवस ढकलू.
उद्या पेपर नसल्यानं आज मिळतील तेवढे पेपर आल्याच्या चहासह चवीनं वाचू. 
मग निवांत बसून मन्सूरअण्णांचा यमनी बिलावल ऐकावा.
समोर आलेला गरमागरम नाश्ता हाणताना पुन्हा एकदा भाऊ पाध्येंचा " बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर" वाचावा...
 सावकाशपणे मुलींना आपल्या कळपात ओढून डीवीडीवर धमाल पिक्चर पहावा..
पण....
जणू या सगळ्याचा सुगावा हेरखात्यामार्फत मिळाल्यानंतर आकाशवाणी झाली, " उद्या आम्ही संपावर. सकाळी उशीरा उठणार व काही करणार नाही..."
मग....
शेवटी हाडाचा इंजिनिअर! अचानक जाहीर झालेल्या ओरलला जो कधीही निधड्या छातीनं सामोरा जातो तो अशा आव्हानांसमोर थोडंच गुडघे टेकणार??
सकाळी आपलाआपण मस्त चहा ढोसून पेपर वाचून काढले. नाश्त्याला हवेच काहीतरी म्हणून दडपे पोह्याची तयारी सुरु केली.
ट्रॉल्यांची सततची उघडझाप ऐकून आकाशवाणी झालीच.
" पोहे डावीकडच्या ट्रॉलीत आहेत, पातेलं उजवीकडे... इत्यादि इत्यादि..
" माहितेय मला, ते सगळं काढलंय, शेंगदाणे? "
" पोह्याशेजारी दिसले नाहीत वाटतं.. "
मग बारीक कांदा कसा आपल्यालाच चिरता येतो व कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून काय करावं यावरचा सेमिनार इंजिनिअरनं नवोदित मेंबर्स ना दिला.
मग तयार झालेले सुंदर पोहे सर्वांनी मनसोक्त दडपून खाल्ले. 
तरीही तांब्याभर पाणी पिऊन मग जाताजाता कुजकेपणानं लेक बोललीच, "पोहे चविष्ट होते रे, पण चार दिवसाचं तिखट बहुदा एकदम वापरलंस तू.."
नवीन काही शिकायचं तर कष्ट करायची तयारी हवी याविषयी अजून एक सेमिनार! देत त्यांच्याकडून हळूच चहाची भांडी, कपबशा, प्लेटस् विसळून घेण्यात आल्या. शेवटी प्रत्येक इंजिनिअरच्या आत एक सुपरवाइजर कम् मॅनेजर जन्मजात दडलेला असतोच!
नाश्ता संपेतो जेवणही करायला हवं हे उमगलं.
फ्रीजमधल्या भाज्यांचं आधीच पुढच्या तीन दिवसांसाठी रिझर्वेशन केलेलं. मग कपाटं शोधावी लागली.
मे महिन्यात काश्मीर ट्रीपवेळी " ह्या राजम्याला भिजवून ठेवावं लागत नाही" म्हणून हौसेनं घेतलेला राजमा अंग चोरुन बसलेला!
त्याला उचलला. बुर्जी व अंडाकरीसाठी राखून ठेवलेल्या " एव्हरेस्ट मटन मसाल्या" कडे बरेच दिवस दुर्लक्ष झालेलं. तो आज मदतीला धावून आला.
चमचमीत राजमा, भात तयार झाला पण चपात्यांचं काय?
शेवटी " तुझ्या हातच्या गरम चपात्यांची मजा न्यारीच" अशा स्तुतीवर चपात्यांचं आउटसोर्सिंग करण्यात आलं.
सोबत कांद्याची व घोसावळ्याची भजी असा चविष्ट मेनू तयार झाला. 



मधल्या वेळेत स्वत:च्या व दुस-यांच्या आंघोळीचं प्रकरण उरकण्यात आलं व अवघं कुटुंब जेवायला सज्ज झालंय...

तुम्ही पण येताय ना? सोबत आइसक्रीम घेऊन यायला विसरु नका. नाही म्हणजे तिखट लागलं जेवण तर बरं असतं ना आईस्क्रीम... 
- सुधांशु नाईक. ( nsudha19@gmail.com)

1 comment: