marathi blog vishwa

Sunday, 2 July 2017

विलक्षण स्वरानंद देणारं संवादिनी वादन

संकेश्वर इथल्या संगीत महोत्सवात पं रामभाऊ विजापुरे यांचे पट्टशिष्य सुधांशु कुलकर्णी यांच्या संवादिनीवादनाने एक विलक्षण स्वरानंदात रसिकांना भान विसरायला लावले.

वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पुण्यतिथी, दादा नाईक स्मृतिदिन आणि रामभाऊ विजापुरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने २४ जूनच्या संध्याकाळी संकेश्वर येथे कलांजली व अॅकेडमी आॅफ म्युझिक तर्फे संगीत महोत्सव साजरा झाला, त्यात त्यांनी पुत्र सारंग कुलकर्णीसोबत सहवादन केले.
या महोत्सवाचे यंदा ४४ वे वर्ष होते. इतकी वर्षं हा महोत्सव संकेश्वरमध्ये सुंदरप्रकारे आयोजित करत रहाणे यासाठी दादा नाईक कुटुंबिय व कलांजली परिवाराचे कौतुक करायला हवे.
कालच्या मैफलीची सुरुवात सुधांशु व रोहिणी कुलकर्णी यांची शिष्या सुलक्षणा मल्ल्या हिच्या ख्यालगायनाने झाली. राग भीमपलास सारखा प्रचंड मोठा कॅनव्हास असणारा राग तिने संयमाने सादर केला. " अब तो बडी देर.." ही पारंपरिक चीज विलंबितात सादर करताना गमगरेसा, गमपमगम गमगरेसा, गमपनीसांसां आदि आलापातून भीमपलास रागाचं सौंदर्य ठळकपणे मांडलं. त्यानंतर एक उत्तम तराणा तिने सादर केला. या तराण्याची मांडणी सारंग कुलकर्णी यांनी केली होती. तिच्या गायनाला अंगद देसाई यांनी सुरेख तबलासाथ तर सारंग यांनी हार्मोनियम संगत केली.
त्यानंतरच्या सत्रात अंगद देसाई यांच्या एकल तबलावादनाने सर्व रसिकांना भरभरुन आनंद दिला. कायदा, रेला, चक्रधार यांची पेशकश करताना उस्ताद निजामुद्दिन खाॅं यांनी बनवलेले बोल त्यांनी सुबकपणे सादर केले. तबलावादन करताना आदळाआपट न करता सहजपणे व सौंदर्य खुलवत तबला कसा वाजवता येतो याचा जणू त्यांनी वस्तुपाठच सादर केला. त्यांना सारंग कुलकर्णी यांनी समर्पक लेहेरा साथ दिली.
यानंतरच्या सत्रात अॅकेडमी आॅफ म्युझिक,बेळगांव यांच्या विद्यार्थीवर्गाने भक्तीगीतं, नाट्यगीतं व भावगीतांची लहानशी प्रसन्न मैफल सादर केली.

आजच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना स्टेज मिळवून देणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांना नेटके सादरीकरण करायला प्रोत्साहन देणे याबद्दल सुधांशु व रोहिणी कुलकर्णी यांचे मनापासून कौतुक करायला हवे.

खेळ मांडियेला, आम्हा नकळे ज्ञान, ऋतु हिरवा, तू तर चाफेकळी, नाही पुण्याची मोजणी, अंग अंग तव अनंग, सांज ये गोकुळी, सजणा पुन्हा स्मरशील ना आदि गीतांना रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. रसिकांच्या आग्रहाखातर " कमले कमलिनी" हे महालक्ष्मीचं कानडी भजनही सादर करण्यात आले.
संगीत महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात सुधांशु कुलकर्णी व पुत्र सारंग कुलकर्णी यांनी संवादिनी सहवादन पेश करुन मैफल एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली.
राग मारुबिहागची " रसिया हो न जा" ही खास पारंपरिक चीज त्यांनी अशी काही मांडली की रसिक श्रोते त्या स्वरानंदात भान हरपून गेले. शांतपणे प्रत्येक स्वरावर होणारा ठेहराव, सहज येणारी मींड, बोलआलापांनी सजलेली लयबध्द मांडणी अतीव आनंद देऊन गेली. रामभाऊ विजापुरे मास्तरांचे संवादिनीवादन ही एक आगळीवेगळी गोष्ट. ती नजाकत, ते देखणेपण फार कमी ठिकाणी पहायला मिळते. त्यांचे शिष्य सुधांशु व पुढील पिढीचा प्रतिनिधी सारंग कुलकर्णी तो वारसा समर्थपणे पुढे नेताहेत हे पाहून आनंद वाटतो.

वाद्यसंगीताच्या मैफिलीत तबलासाथ कशी असावी हे पुन्हा एकदा अंगद देसाई यांनी दाखवून दिले. मैफल संपवताना रामभाऊंची खासियत असलेले " दे हाता शरणागता.." हे नाट्यपद सादर करुन या संगीत महोत्सवाची सांगता झाली. अशा सुरेल मैफिली आपल्या आयुष्यात सुखाचे अविस्मरणीय क्षण निर्माण करतात याबद्दल आयोजक व कलावंतांचे आपण ऋणी आहोत अशी भावना उपस्थित श्रोत्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला समस्त नाईक कुटुंबिय, विलास कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, अनंत घोटगाळकर, पीडी देशपांडे, सुचित्रा मोर्डेकर तसेच खास सोलापूरहून आलेले सिध्दराम म्हेत्रे आदि मान्यवर रसिक उपस्थित होते.
- सुधांशु नाईक ( 9833299791)
🌿🌿🌿🌿

No comments:

Post a Comment