marathi blog vishwa

Wednesday, 8 January 2020

चैतन्यदायी उर्जा देणारं दैवी गाणं..!

आयुष्यात अनेक संकटं, कष्ट, मनस्ताप, अपमान, फसवणूक, निराशा, दु:ख आदि भावभावनांचा पावलोपावली सामना करावा लागतोच. मात्र हे सोसत जगावंच लागतं अन् त्यासाठी सतत गरज लागते कसल्यातरी उर्जेची, चैतन्याची. अगदी अशीच चैतन्यदायी उर्जा घेऊन आलेलं गाणं सादर करुन वेंकटेशकुमार यांनी कोल्हापूरच्या संगीतप्रेमींना एका दैवी गायकीची अनुभूती दिली..
शिवगंधार संस्थेने आयोजित केलेल्या  " तपस्या" या विशेष कार्यक्रमात त्यांनी तेजस्वी गाणं सादर करुन रसिकांना शब्दातीत स्वरानंद दिला.
विविध कारणांमुळे प्रत्यक्ष गायन सुरु होण्यास जवळपास दीड तासांचा वेळ लागल्यानं रसिकांमध्ये असलेली अस्वस्थता, पं. वेंकटेश कुमारांचं गाणं सुरु होताच एकदम संपुष्टात आली. 

शुध्द कल्याण रागालील " तुमबिन कौन.." या बंदिशीनं सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनावर पकड घेतली. मुळात बुवांचं गाणं धारदार. प्रत्येक स्वर गोलाईयुक्त, अचूक बाणासारखा वेध घेणारा. त्यांचं गाणं कधीही ऐकायला बसलं की असं वाटतं हे जणू यापूर्वी 2,3 तास रियाज करुन गळा तापवूनच आलेत.
 प्रत्येक स्वराची शुध्दता, तालावरची भक्कम पकड, लयीचा अचूक अंदाज पहातापहाता समोरच्याला संमोहित करुन सोडतात. किराणा घराण्याच्या परंपरेला साजेशी स्वरांची भावनाप्रधान आळवणी करतानाच ग्वाल्हेरी गायकीप्रमाणे शांत, शिस्तबध्द विस्तार करत बुवा मैफलीवर अक्षरश: राज्य करत होते. 
बोलआलाप, हुंकाराची लघु तान ( मुखबंदीप्रमाणे ), प्रत्येक आवर्तनाला विविध मात्रांवरुन उठत समेवर डौलदारपणे येताना सर्व रसिक मनात एक वेगळा आनंद फुलत होता.
मुख्य बंदिशीनंतर त्यांनी " मौंदर बाजे" ही महमदशा यांची गाजलेली चीज सादर केली. बेंगळूरच्या केशव जोशीनी त्रितालाचा दमदार ठेका, तर सतीश कोळ्ळी यांनी वेंकटेश कुमारांच्या सुरांचा मागोवा घेत जाणारी सुरेख समर्पक  संवादिनी साथ केली. बोलताना, सपाट ताना आदि सर्व वैशिष्ट्यांनी रंगलेली शुध्द कल्याणची द्रुत चीज संपली तेव्हा एका वेगळ्या आनंदानं मन प्रफुल्लित झालं होतं. 

कोणत्याही उत्तम संगीताची जादू अशीच तर असते. ती नेहमी तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यातून वेगळ्या अन् अधिक देखण्या विश्वात कुठंतरी दूर घेऊन जाते.  तिथं नसतो भेदभाव अन् द्वेष. राग, लोभ, मत्सर असलं काही काही नसतं तिथं.  असतो फक्त निरामय निरपेक्ष चिदानंद! कुठल्याही स्वरांतून मग दिसत राहतं लोभस तरीही तेजस्वी ईश्वराचं रुप... मग निराशा, दमछाक हे सारं निवळून जातं अन् पुन्हा भरभरुन जगावं असं वाटू लागतं.

वेंकटेश कुमारांच्या स्वरांतही हीच ताकद आहे. तुम्हाला त्या विश्वात नेण्याची. भरपूर दमसास, तिन्ही सप्तकातला सहज व तेज:पुंज वावर अनेक वर्षांच्या रियाजानं मनाबरहुकूम कधीही कुठेही अन् कसाही वळणारा गळा मग त्यांना स्वत: लाही गाताना खूप आनंद देत रहातो अन् तोच आनंद मग प्रेक्षागारातील प्रत्येक मनामनांपर्यंत पोचतो, सुरेख दरवळत रहातो.
नंतरच्या टप्प्यावर वेंकटेश कुमारांनी पुरंदरदासांचं प्रसिध्द असं भजन " सौभाग्यद लक्ष्मी बारम्मा" सादर केलं. देवीच्या दर्शनाला मगाशी गेलो अन् आज हे सादर करावंसं वाटलं. पहिल्यांदा हे इथं सादर करतोय असं त्यांनी कोल्हापूरकरांना आवर्जून सांगितलं. 

त्यानंतर सादर केला सोहनी. मुळात हा उत्तरांगप्रधान राग. वरच्या स्वरांवर भिरभिरत रहाणारा. वेंकटेशकुमारांच्या धारदार स्वरांना साजेसा. त्यामुळे सोहनी ऐकायला मजा आली.
 त्यानंतर जनाबाईंचा " ये गं ये गं विठाबाई" हा अभंग खूप छान पेश केला. " समझ मना.. कोई नही अपना" ही  भैरवी सादर करुन त्यांनी मैफिलीचा समारोप केला तेव्हा रसिक अक्षरश: देहभान विसरले होते! परमेश्वराशिवाय कुणीच आपलं नसतं, सगळं काही त्या निर्गुण निराकाराच्या रुपात विलीन होणारं. इथली नाती, इथली कमाई, इथलं श्रेय, इथले सन्मान- अपमान हे सारं क्षणभंगूर वाटायला लावणारी ही भावना. संपूर्ण मैफील एका स्वरभक्तीनं भारलेली. दिव्यत्वाचा अनुभव देणारी. पुन्हा आपल्या रोजच्या जगण्याकडे वळूच नये असं वाटायला लावणारी! 

मात्र रोजचं जगणं कुठं चुकलंय.. ते निभावायलाच लागतं त्यासाठी
या अशा संगीतमैफलीत जाणं गरजेचं असतं. वेंकटेश कुमारांसारख्या सच्च्या संगीतसाधकाचं गाणं तना-मनात साठवत रहाणं म्हणजे जणू आपलीच बॅटरी घासूनपुसून लख्ख करुन चार्ज करुन घेण्यासारखं!

तोच अनुभव मनात साठवत देहानं घरी परतलो मात्र मन त्या सुरांमध्येच गुंतून राहिलंय...अजूनपर्यंत..!
- सुधांशु नाईक( 9833299791)
कोल्हापूर 🌿

🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment