- सुधांशु नाईक
आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे इथली बहुसंख्य माणसं रोजचा दिवस नवा असल्याच्या विचारानं जगतात. जसं जंगलातले प्राणी भविष्यासाठी खूप मोठी तरतूद करत नाहीत. शक्यतो आजच्यापुरती किंवा जास्तीत जास्त पुढच्या 3,4 दिवसांपुरतीच बेगमी करुन ठेवतात ना तसं वाटतं मला यांचं आयुष्य पाहून.
मुळात रोज सकाळी उठणे, आपापली आंघोळ वगैरे प्रातर्विधी आवरणे यातही फारशी घाईगडबड दिसत नाही. बहुतेक घरांतून भरपूर माणसं असतात. अनेक घरांघरांतून एका पुरुषासोबत 2 किंवा जास्त बायका व त्यांची मुलं असा सगळा गोतावळा एकत्र नांदत असतो. घरातील मुख्य स्त्रियांसोबत मुलीही कामं करताना दिसतात. अगदी लहान भावंडाना आंघोळ घालण्यापासून स्वैपाक किंवा रस्त्यावर काही वस्तूंची विक्री यात मुलींचा सहभाग जाणवतो. फोटोतील ही मुलगीच पहा ना, आंघोळ नको म्हणून रडणा-या लहानग्या भावाला किती समजूत घालून छान आंघोळ घालतेय ते...
अशी दृश्यं लहानपणी किंवा माझ्या अनेक भागातल्या, गडकोटांच्या भटकंतीत पाहिलीयत. धनगरवाडे, आदिवासी पाडे यांच्याजवळ किंवा ग्रामीण भारतात अशी दृश्यं खूपदा दिसतातच.
पण परदेशी भूमीवर जेव्हा असं पहायला मिळतं तेव्हा एक माणूसपणाची नाळ चटकन् जुळून येते. इथूनतिथून माणूस कसा एकसारखा हे जाणवतं. मग भाषा, प्रांत, रंग, धर्म हे लहानमोठे भेद जाणवेनासे होतात. मनाला खूप बरं वाटत रहातं !
तसंही एकंदरीत लायबेरियात बालकामगारांचं प्रमाण खूप असल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर इथं बालवेश्यांचं प्रमाणही खूप जास्त असल्याचं युनो च्या काही रिपोर्टमधून पूर्वी नोंदलं गेलेलं. सध्या बालवेश्या, बलात्कार व बालकामगार या तीन गंभीर समस्यांविषयी इथं ब-याच प्रमाणात प्रबोधन सुरु असल्याचं दिसतं. अमिताभच्या पिंक या सिनेमात जसं " नो मिन्स नो.." यावर भर देत कथानक रचलं गेलं होतं तसंच " नो मिन्स नो... स्टाॅप रेप" अशा प्रकारची पोस्टर्स ब-याच वस्तीत लावल्याचं पहायला मिळतं.
पुरुष एकतर चांगल्या प्रकारची नोकरी- उद्योग करणारा, रस्त्यांवर काही सटरफटर वस्तू विकणारा किंवा पूर्ण घरात बसणारा अशा दोन तीन प्रकारात दिसतोय. घर सांभाळण्यासोबत काही ना काही वस्तूंची विक्री करताना बहुतेक ठिकाणी मात्र बायकाच जास्त दिसतात.
दिवसभर बहुसंख्य स्त्रीपुरुष हे घरासमोर निवांत बसलेले आढळतात. अनेकांनी घराच्या पडवीतच शेड वगैरे तात्पुरतं काहीतरी उभं केलंय. तिथं काही खाणं किंवा बियरसाठी बसायची व्यवस्था केलेली असते. झोपडीवजा हाॅटेल असं त्याला म्हणू शकतो आपण. बहुतेक पुरुष मंडळी तिथं बसून गप्पा मारताना आढळतात. त्यातही सध्या सर्वत्र चर्चा निवडणुकांची आहे.
या आठवड्यात इथं निवडणुका पार पडल्या. त्याचा निकाल येत्या 3-4 दिवसात अपेक्षित आहे. मात्र निवडणुका मुख्यत: भ्रष्टाचाराला विरोध, स्थानिकांना विविध ठिकाणी प्राधान्य, दोन देशांचं नागरिकत्व ( जसं भारत व अमेरिकेचे नागरिक असणा-या व्यक्तीला आपल्याकडे विरोध केला जात होता. तर काहींचा अशा दुहेरी नागरिकत्वाला पाठिंबा होता तसंच) आदि गोष्टींवर मुख्यत: चर्चा पहायला मिळाली.
आपापल्या पक्षांपेक्षा निवडून आलेल्या सिनेटर्सनी देशाचा आधी विचार करावा व विविध सोयीसुविधा निर्माण कराव्यात याकडे बहुतेकांचा कल दिसला त्यामुळे यंदा सत्तांतर होईल असा कित्येकांचा अंदाज आहे.
इथं साधारणत: एप्रिल ते ऑक्टोबर/ नोव्हेंबर या काळात धुंवाधार पाऊस पडत असतो. तर इतर काळात तुलनेनं कोरडं हवामान असतं. मात्र या कोरड्या ऋतूतही बरेचदा अचानक ढग दाटून येतात व तास दोन तास पावसाची एखादी मुसळधार सर येऊन जाते.
इथली माती बहुतेक ठिकाणी कोकणासारखीच मुरमाड आहे, त्यामुळे पाणी लगेच वाहून जातं. निंबासारखी जी जरा दूरवरची राज्यं आहेत तिथं डोंगर आहेत, नद्या तिकडून वाहत येतात.
एका मासिकातील हे पर्वताचं प्रकाशचित्र.
मात्र खाडीकाठ व समुद्रकिनारा सर्वत्र असल्यानं अनेक ठिकाणी पाणथळीचे, दलदलीचे भूभागही आहेत. बरेचठिकाणी 25,30 फूट खोदलं की पाणी लागतं. त्यामुळे अनेक घराघराजवळच्या ठिकाणी लहान लहान विहिरी दिसतात. आपल्याकडे जसं लहान गावात 3,4 ठिकाणी बोअरचे हातपंप असतात तसे हातपंप अनेक वस्तीत आहेत. ज्यांची आर्थिक बाजू जरा भक्कम आहे तिथं मोटर बसवून पाणी घरात आणलं आहे. मात्र बहुसंख्य ठिकाणी नळपाणी योजना अस्तित्वातच नाही.
लायबेरियामध्ये जवळपास 15, 16 वेगवेगळ्या जमातींचे प्रदेश आहेत. गिओ, मानो, पेले, बासा, वाय, क्रू, मॅन्डिगो, किस्सी, बेले, मान्डे, क्र्यान आदि वंशाचे लोक आहेत. त्यांच्या स्वत:च्या भाषा आहेत. त्या भाषांनाही या वंशांची किंवा जमातीची नावं आहेत. या इतक्या भाषा एका लहानशा देशात अजूनही बोलल्या जातात याचं आनंदाश्चर्य वाटतं. या विविध भाषा वापरात असल्या तरी मुख्यत: इंग्रजी हीच व्यवहारातील भाषा आहे. तसेच अमेरिकन डाॅलर हेच मुख्य चलन. लायबेरियन डाॅलरच्या जीर्ण नोटाही भरपूर प्रमाणात वापरात आहेतच. बाजारात तुम्ही अमेरिकन डाॅलर देऊन त्या बदल्यात सहजासहजी लायबेरियन डाॅलर कुणाकडूनही घेऊ शकता. शाॅपिंग मार्केट मध्येही डाॅलर दिल्यास उरलेले पैसे लायबेरियन डाॅलरच्या करन्सीत परत दिले जातात. साधारण 1 अमेरिकी डाॅलरचा भाव 150 ते 160 लायबेरियन डाॅलर इतका आहे. सध्या निवडणुकीचं वातावरण, सत्तांतराची शक्यता या सगळ्यामुळे आम्ही मंडळी कुठं फारसं बाहेर पडत नाही. आमच्या साईटस् वरील कामापुरत्या फे-या सोडल्या तर ऑफिस ते गेस्टहाऊस असं सुरु आहे.
जेव्हा संधी मिळेल तेव्हा शहरापासून दूरच्या जंगली भागात जाण्याची इच्छा मात्र तोवर मनातच दडपून ठेवावी लागणार आहे...!
- सुधांशु नाईक ( nsudha19@gmail.com)🌿