marathi blog vishwa

Sunday, 17 January 2021

लायबेरियातून भाग#४ लायबेरिया तील खाणं

मंडळी, खाणं हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. वेगवेगळे चमचमीत पदार्थ भारतभर मिळत असतातच. भारतातलं पदार्थांच्या बाबतीतलं जे वैविध्य आहे ते खरंच सर्वांग सुंदर आहे. परदेशात गेल्यानंतर तेथील खाद्यसंस्कृती आपलीशी करताना जरासा तडजोड करावीच लागते. मात्र प्रत्येक देशाची प्रत्येक प्रांताची जी खाद्यसंस्कृती आहे ती अनुभवायला मला नेहमीच आवडते....
लायबेरिया, आफ्रिकेतील एका टोकावरचा देश. इथे काही प्रमाणात अमेरिकन फुड याच बरोबर पारंपरिक आफ्रिकन खाद्यसंस्कृतीही पहायला मिळते. लहानसा व गरीब देश असल्याने पिझ्झा हट, बर्गर किंग, मॅकडोनाल्ड अशा बाहेरील मोठ्या चेन इथे नाहीत. मात्र लेबनीज, अमेरिकन, आफ्रिकन खाद्य पदार्थ येथे मिळतात. बरेचसे भारतीय इथे असल्यामुळे काही मोजक्या हॉटेलात भारतीय भाज्या, बिर्याणी हेही मिळते. 
येथील आफ्रिकन अशी जी काही ही लहान-सहान हॉटेल आहेत तेथे मुख्यतः नायजेरिया, घाना , लायबेरिया या देशातलं अन्न मिळतं. यांच्या जेवणात मुख्यतः भात, चिकन, मटण, काऊ मिट किंवा बीफ चा समावेश आहे. संपूर्ण लायबेरियाला समुद्रकिनारा लाभला आहे त्याचबरोबर वाहत येणाऱ्या नद्या यामुळे मासेही ही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. मी शाकाहारी असल्याने कसावा, वांगी, बटाटे, टोमॅटो, कोबी, बीन, भोपळा यावर असतो. 
(कसावा ची पाने)
वेगवेगळ्या करीज तसंच काही पालेभाज्या येथे खायला मिळतात. ग्रीन पोटॅटो व्हेजिटेबल, तसेच कसावा हा सुरणा सारखा पदार्थ येथे भरपूर प्रमाणात खाल्ला जातो. कसावापासून साबुदाण्यासारखं स्टार्च ही करतात उत्तम कूक कसावा कुटून त्यापासून काहीना काही बनवतात. ( कसावा)
 इथे सकाळी भरपूर खाऊन लोक बाहेर पडतात आणि आणि संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान पुन्हा खातात जरं नाहीच मिळालं काहीना खायला, तर दुसऱ्या दिवशी सकाळीच खातात.
 येथे असणाऱ्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जे भारतीय, लेबनीज किंवा अन्य नागरिक आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या गेस्ट हाउसेस मध्ये जेवण मिळते. प्रत्येक ठिकाणी लोकल एखादी लायब्ररियन बाई कुक म्हणून ठेवली जाते. तिला लोक आपापल्या पद्धतीचं जेवण शिकवतात. बऱ्याच ठिकाणी असे भारतीय रहात असल्यामुळे कित्येकांना सध्या भारतीय अन्नपदार्थ माहिती झाले आहेत.
फळं मिळतात. केळी, अननस, पपया, मोसुंबी, संत्री जास्त दिसतात. इथे बहुतेक ठिकाणी आंब्याची झाडेही दिसतात, सध्या कैऱ्या मिळत आहेत.. नारळ आहेच. 
 मी जिथे राहतो तिथली कुक सुद्धा आलू पराठे डोसा कांदा भजी पुरी भाजी विविध भाज्या चपाती हे सगळं करते. एक दिवस जेव्हा मेसमध्ये कालची चपाती व भात उरलेला होता तो दुसऱ्या दिवशी फोडणी टाकून खाण्यासाठी तिला शिकवले आणि मग 'माणिक पैंजण' ही डिश तयार झाली. उरलेल्या चपाती भाताची फोडणी आपण नेहमीच घरी खातो. इथेही आम्ही खाल्ली तिलाही खायला दिली, तिला तो पदार्थ फार आवडला.
 ती म्हणाली नेहमी सगळे इथे हे हे उरलेल्या टाकून द्यायचे,  आता हेच मी माझ्या घरी पण करेन. इथे अनेकांना रोज जेवण मिळतेच असं नाही त्यामुळे हे असा अन्नपदार्थ वाचवून खाणं तिलाही पटलं.
तिच्या आसपासच्या गरीब वस्तीत देण्यासाठी म्हणून कधीकधी आम्ही तिला भात भाजी देत असतोच. नवनवे प्रकार शिकायला तिलाही आवडत आहे दोशा सोबतच्या वेगवेगळ्या चटण्या कोशिंबिरी चे प्रकार हे ती आता करते आहे.

 दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात नाताळ साजरा केला जातो ख्रिसमस पार्टी सर्वत्रच जमेल तशी लोक साजरी करतात.
येथे दारू पिण्याचे ही प्रमाण भरपूर. लोक दिवसभर काहीना काही काम करतात. मग एका प्लास्टिकच्या तसराळ्यात किंवा काचेच्या प्लेटमध्ये भात आणि चिकन/ मटन / बीफ यापैकी कसली तरी करी घेऊन जेवतात. सोबत बियर किंवा कोल्ड्रिंक. 
येथे दारू सुद्धा बरीचशी लोकल ब्रांड ची मिळते. ती कशी असते हे ते माहीत नाही, पण या लोकांना दिवसभरचा थकवा विसरायला लावते व गुंगवून टाकते इतकं नक्की.
 दोन वेळच्या अन्नासाठी लोकांना काय काय करायला लागतं हे पाहताना आपण खरंच सुखी असल्याची भावना मनात दाटून येते. पुन्हा भेटूया वेगळा काही विषय घेऊन!
सुधांशु नाईक

16 comments:

  1. लायबेरियाच्या खाद्यसंस्कृतीची छान ओळख!

    ReplyDelete
  2. सुंदर 👌, सुधांशु तुझ्या मुळे मला तिथली संस्कृती कळतीय. माझ्या सारख्या अनेक भारतीयांना बाहेर देशात जाता येत नाही. पण तूझ्या लिखाणातल्या सहजतेने मला बाहेर देशातील संस्कृती कळतीय हे ही कमी नाही.🙏

    ReplyDelete
  3. नेहमीच्या स्टाइल मध्ये मस्त लिहिला आहे हा ब्लॉग... माणिक पैंजण खूप छान...

    ReplyDelete
  4. मोमोज आणि गारी हे पण खुप पॉप्युलर खाद्यपदार्थ आहेत नायजेरिया व आसपासच्या देशांमधे. गारी कसावापासुन बनवतात. कासवाची कंद वाहत्या पाण्यात एक दोन आठवडे सडवुन नंतर कुटुन ड्राय करतात आणि मोठ्या कढईमधे रोस्ट करतात. साधारण रवा किंवा गव्हाच्या कोंड्यासदृश हे असते ते कशाही पद्धतीने खातात. नुसत्या गरम पाण्यात मिक्स करुनही खातात अथवा शिजवुन तो लगदा कुठल्याही स्ट्यु बरोबर आतात... भाजलेले प्लॅंटेन पण खायला छान लागते. रताळी आणि याम हेसुद्धा मिळते
    त्याचे चिप्स खुप टेस्टी लागतात... यु कॅन ट्राय. ते व्हेज प्रकारातले आहे..... इगुशी सुप किंवा स्ट्यु पण टेस्टी लागते. ते टरबुन वा खरबुजांच्या बियांपासून बनवतात

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद 🙏 प्लंतेन मी पाहिले. खायचा धीर झाला नव्हता. तुम्ही सांगितले, आता खाईन. रताळी मिळतातच. उकडून व खीस करून खाऊन झाली. चिप्स तर रस्त्यावर सर्वत्र लोक विकत असतात.👍

      Delete
  5. तुम्ही सुंदर लिहिले आहे

    ReplyDelete
  6. Nice to read and interesting being first hand information!!!

    ReplyDelete
  7. खूप छान उपक्रम! आणि ✍️✍️✍️✍️

    ReplyDelete