marathi blog vishwa

Monday, 27 May 2024

अस्वस्थ मन समजून घेता यायला हवे...!

 मना सज्जना... भाग : 26 : अस्वस्थ मन समजून घेता यायला हवे...!

सोमवार दिनांक २७/०५/२४

मंडळी, “मना सज्जना...” या लेखमालेच्या पहिल्या २५ भागात मनाच्या विविध अवस्था, मनात उमटणारे तरंग, मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या चिंता, स्वार्थ, क्रोध आदि गोष्टींबाबत जाणून घ्यायचा आपण प्रयत्न आपण जानेवारी ते मार्च दरम्यान केला. ते लेखदेखील ब्लॉगवर पुन्हा वाचता येतील. आता आपण मानसिक अस्वास्थ्याविषयी अधिक खोलवर बोलायला हवं असे मला वाटते. नेहमीच महत्वाचा असलेला समुपदेशन आणि मानसिक स्वास्थ हा विषय आगामी काळात अधिक महत्वाचा ठरणार आहे हे लक्षात घेऊन या संदर्भात लेखन करायचे ठरवले आहे. दर पंधरा दिवसांनी “मना सज्जना...” या लेखमालेतील लेख आणि अन्य वेळी “सुधा म्हणे...” या अंतर्गत काही मनापासून लिहिण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा आहे. तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रिया अवश्य कळवत राहा. तसेच ज्यांना स्वतःसाठी किंवा आपल्या परिचितांसाठी सल्ला / समुपदेशन हवे आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा ही विनंती.

वाढते मानसिक अस्वास्थ्य यावर जरा सविस्तर लिहावे असे कायमच वाटत असायचे. आज आवर्जून लिहावेसे वाटले त्यासाठी एक घटना निमित्तमात्र ठरली. माझ्या एका स्नेह्यांशी बोलताना कळले की, त्यांच्या एका परिचित व्यक्तीने बाथरूममध्ये वापरतात त्या असिडचे प्राशन केले. त्याला त्वरित अतिदक्षता विभागात हलवले आणि शेवटी त्याचा त्यातच मृत्यू झाला.

जेंव्हा अधिक माहिती समजली त्यावेळी असे लक्षात आले की त्या व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन होते. रोज थोडीतरी दारू पिल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नसे. साहजिकच त्यातून येणारे ताण तणाव त्या कुटुंबात होतेच. लहान मुले घरात असल्यामुळे त्यांच्या व्यसनाचा सर्वाना त्रास होऊ लागला. मग कुटुंबियांनी त्यांच्या मद्यपानास विरोध करायला सुरुवात केली. त्यांना अजिबात दारू मिळू द्यायची नाही याचे प्रयत्न सुरु केले. यामुळे काही सकारात्मक बदल होण्याऐवजी ती व्यक्ती अधिकाधिक अस्वस्थ होत राहिली. त्यातूनच एका अस्वस्थ क्षणी त्यांनी बाथरूममधील असिडची बाटली थेट तोंडाला लावली आणि जीव गमावला. हे का घडले यावर जेंव्हा चिंतन केले तेंव्हा असे लक्षात आले की मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार त्या व्यक्तीशी इतरांनी असे वागणे हे चुकीचे होते.

शारीरिक वा मानसिक तणावातून सुटका होण्यासाठी त्या व्यक्तीने दारूचा आधार घेतला होता. हल्ली नोकरी, व्यवसाय, गृहकर्ज, नातेसंबंध आदि गोष्टीमुळे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी ताणतणाव सोसत असते. कदाचित मौज म्हणून सुरुवातीला त्यांनी मद्यपान केले असेल मात्र पुढे त्यामुळे त्यांना बरे वाटू लागले आणि ते व्यसनात गुरफटले. जेंव्हा एखाद्याला दारू,सिगरेट,तंबाखू, अंमली पदार्थ आदि कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागते तेंव्हा त्याला त्याच गोष्टीचा आधार वाटू लागतो. ज्याक्षणी ती गोष्ट त्यांच्यापासून दुरावते तेंव्हा ते जास्त अस्वस्थ होतात. 

अशावेळी त्यांची विचारक्षमता पूर्णत: झाकोळून जाते. त्यांना खूप विचारपूर्वक हाताळावे लागते. कोणत्याही व्यसनातून अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी खूप शांतपणे पावले उचलावी लागतात. जे इथे घडले नसावे. बरेचदा असेच आपल्याला इतरत्र देखील आढळून येते. म्हणूनच अशा केसेस मध्ये समुपदेशकाचे सहभागी असणे अतिशय आवश्यक ठरते. 

या घटनेच्या संदर्भात बोलायचे तर, जेंव्हा कुटुंबातील ती व्यक्ती अस्वस्थ आहे, तिच्या व्यसनाची तीव्रता हळूहळू वाढते आहे हे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संवाद साधायला हवा होता. तुम्ही का अस्वस्थ आहात, कोणती चिंता तुम्हाला सतावत आहे, तुम्ही एकट्याने मनाला त्रास करून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण मिळून यावर उपाय शोधूया अशा प्रकारे बोलून त्यांना धीर द्यायला हवा होता. आजकाल दारू पिणे वगैरे गोष्टी कित्येक घरी सहज स्वीकारल्या जातात. मद्यपान जास्त वाढताना दिसले की मगच त्यावर जोरदार टीका सुरु होते. त्यातून मग वादावादी, भांडणे सुरु होतात. मात्र तोवर ती व्यक्ती व्यसनाधीन झालेली असते. 

घरातून विरोध झाल्यावर कित्येकदा व्यसनी माणूस सुरुवातीला चुका कबूल करतो, त्यातून बाहेर पडायचे प्रयत्नदेखील करतो मात्र पुनःपुन्हा त्यातच गुरफटत राहतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही घटना घडलेल्या असतात. अगदी बालपणीच्या घटनादेखील मनावर खोलवर आणि आजन्म टिकेल असा परिणाम करून जातात. अशावेळी घरच्यांनी त्यांना समुपदेशकाकडे न्यायला हवे. अशा व्यक्तींसोबत अधिकाधिक बोलून, त्यांचा पूर्वेइतिहास जाणून घेऊन त्यानुसार समुपदेशक आपली कृती निश्चित करतो. तसे या केसबाबत व्हायला हवे होते. 

जर या व्यक्तीने किंवा घरच्यांनी वेळेवर समुपदेशकाशी संपर्क साधला असता तर त्याने या व्यक्तीची मानसिकता, त्यांचे ताण तणाव समजून घेतले असते. त्यांना या समस्येवर मात करायला धीर दिला असता. तसेच घरच्यांशी बोलून त्यांचीही बाजू ऐकून घेतली असती. त्यानुसार काही प्राथमिक उपाय सुचवले असते ज्यायोगे त्या व्यक्तीचे मानसिक अस्वास्थ कमी करायला मदत झाली असती. घरातील वातावरण बदलायचे प्रयत्न करता आले असते. व्यसनमुक्तीसाठी कार्यरत अशा अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत त्यांची मदत घेता आली असती. एकूणच परिस्थिती जास्त गंभीर आहे असे जाणवले असते तर समुपदेशकाने प्रसंगी सायकोलॉजिस्ट किंवा डॉक्टरद्वारे औषधोपचार मिळवून देण्याची काही व्यवस्था केली असती. एक जीव वाचला असता. एक कुटुंब सावरले असते.

आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती ताण-तणाव, नैराश्य, अपयश यांचा कधी ना कधी सामना करत असते. त्यांना नेमक्या वेळी योग्य सल्ला, योग्य समुपदेशन मिळाले तर स्वतःच्या क्षमतांवरील त्यांचा ढासळता विश्वास पुन्हा अधिक दृढ व्हायला नक्की मदत मिळेल. प्रत्येक व्यक्ती सुखी- समाधानी आणि आनंदी असावी यासाठीच तर समुपदेशक काम करत राहतात. फक्त कोणताही अवघड प्रसंग आयुष्यात आल्यास, मन अस्वस्थ होत असल्यास आपण त्यांच्याकडे नि:संकोचपणे जायला हवे तरच मनाला पुन्हा स्थिर आणि स्वस्थ करणे आपल्याला सहजशक्य होईल असे मला वाटते.

-    सुधांशु नाईक,पुणे 

 (समुपदेशनासाठी संपर्क साधावयाचा असल्यास ९८३३२९९७९१/ ९०२१२५०९६३ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.)

 

Friday, 10 May 2024

गाण्यात रमलेलं घर....

 सुधा म्हणे... गाण्यात रमलेलं घर !

सुधांशु नाईक

१०/०५/२०२४. अक्षय्यतृतीया

आज अक्षय्यतृतीया. आयुष्यात सर्वाना अक्षय्य मन:स्वास्थ आणि आनंदी जगणे लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आयुष्यात रोजचे जीवन जगताना काही गोष्टी अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्याला नवे वळण मिळून जाते. कधी ते एखादे गाव असते, कधी एखादी व्यक्ती, कधी एखादी मैफल, कधी एखादे पुस्तक तर कधी एखादा प्रसंग. अशाच एखाद्या गोष्टीबद्दल सांगत पुन्हा एकदा “सुधा म्हणे..”तुमच्या भेटीला अधूनमधून येत राहील... आज मनातलं काही मनापासून सांगणार आहे एका सुरेख घराविषयी...गाण्यात रमलेल्या घराविषयी..!

भानुकुल. शब्दश: गाण्यात रमलेले घर. देवास म्हटलं की बहुश्रुत मंडळीना पं. कुमार गंधर्व यांचे नाव आठवणे स्वाभाविकच. भानुकुल हे कुमारजींनी बांधलेले घरकुल. माळव्याची भूमी ही आधीच सस्यशामल आणि हिरवाईने नटलेली. सुबह बनारस आणि शबे मालव असे म्हटलं जाते कारण इथले माळव्यातील वातावरणच तसे आहे. स्वच्छ मोकळी हवा. आणि संध्याकाळी येणाऱ्या वाऱ्याच्या प्रसन्न झुळूकेने दिवसभरचे श्रम कधीच संपून जातात. फुफ्फुसाच्या आजारपणाचे निदान झाले आणि कुमारजी या माळव्यात येऊन दाखल झाले. रामूभैय्या दाते, मुजुमदार, चिंचाळकर गुरुजी, बंडूभैय्या आदि सुहृद आसपास होतेच. तब्येतीची काळजी डॉ.देशमुख घेत होते. देवासच्या माताजी की टेकडीच्या पायथ्याला मग एक छानशी जागा मिळाली आणि कुमारजी तिथे रमले. प्रथम पत्नी भानुताई यांनी त्यांची त्या काळात फार सेवा केली. थोडेसे  बोलायला देखील जिथं परवानगी नव्हती तिथं गाणं तर अशक्यच. मात्र कुमारजींचे अथक चिंतन सुरु होते. आसपासचा परिसर बारकाईने न्याहाळणे सुरु होते. आणि जेंव्हा गाण्यासाठी डॉक्टरानी परवानगी दिली तेंव्हा स्वतःची जुनी गायकी पुसून त्यांनी नवी गायकी मांडायला सुरुवात केली.

त्या काळात ज्यांना तिथे जाता आले, त्यांना भेटता आले ती माणसे खरी भाग्यवान. वय लहान असल्यामुळे त्यांना भेटणं मला शक्य नव्हतं. खरंतर कुमारजी गेल्यावरच त्यांच्या गायकीची ओळख झाली. ते गाणे हळूहळू आवडत गेले आणि मग सतत ते ऐकायचा ध्यास लागला. हे सगळं घडलं १९९२ नंतर. त्यामुळे ते “भानुकुल” मध्ये असताना तिथे जाणे जमलेच नाही. मात्र कुमारजींच्या घराविषयी खूप काही ऐकून होतो, वाचले होते. कुमारजी आपल्या घरात कसे वावरायचे, मुकुलदा, सत्यशील जी देशपांडे, पंढरीनाथ कोल्हापुरे, वसुंधरा ताई आणि कलापिनी यांना कसे शिकवायचे याचे कितीतरी किस्से ऐकले, वाचले होते. कुमारजींनी आपल्या घराभोवती कशी बाग केली आहे, त्यांना बागकामापासून चित्रकलेपर्यंत विविध गोष्टीत खोलवर शिरून कसा आनंद घ्यायला आवडतो हे ऐकले होते.

२००२-०३ च्या सुमारास मध्य भारतात भ्रमंती करताना एकदा मी आणि माझा मित्र संदीप इंदूर-उज्जैनच्या परिसरात होतो. इतक्या जवळ आल्यावर देवासला न जाणे कसं शक्य होतं? फेब्रुवारी महिन्यातील भर दुपारी त्यांच्या घरी दाखल झालो. काही महिन्यापूर्वी कोल्हापूरमध्ये वसुंधराजीनी “शुद्ध सारंग” गायला होता. खूप सुरेख झालेली ती मैफल. त्यानंतर त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या होत्या. त्या आठवणीचे बोट धरून आम्ही घरी पोचलो. त्यावेळी वसुंधराजी आणि कलापिनीताई घरी होत्या. आमचे स्वागत केल्यावर वसुंधराजीनी आधी विचारले, जेवणाचे काय? आम्ही जेवून आलोय असं सांगितले. आम्ही हे खरं खरं सांगतोय ना याची त्यांनी खात्री करून घेतली. मग थंडगार सरबत पुढे आले. त्यांनी आणि कलापिनीताईनी मग आम्हाला सगळे घर फिरून दाखवले. गेटमधून आत आल्यावर समोरच्या पोर्चमध्ये तो सुप्रसिद्ध झोपाळा होता. जिथं कुमारजी गुणगुणत बसलेले असत. तिथून आत आले की समोरच सगळे तानपुरे नीट मांडून ठेवलेले. उजवीकडे कुमारजींची खोली. तिथं पाय ठेवताना अंगावर काटाच उभा राहिलेला.!

पद्मविभूषण अशा पं.कुमार गंधर्व यांचे ते घर. त्यांची ती गाणे शिकवत रहायची जागा. त्यांचा पलंग. ते डायनिंग टेबल जिथं त्यांच्या गप्पा रंगायच्या. तिथे बसल्यावेळी किंवा बाहेरच्या बागेत काहीतरी काम करताना कुमारजी काहीतरी गुणगुणत राहायचे आणि त्यातून नवी रचना साकार होत असे. जगण्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच वेगळी होती. ज्याविषयी अनेकांनी सांगून ठेवले आहे. पं. सत्यशीलजी देशपांडे काही काळ कुमारजींच्या घरीच गाणे शिकायला राहिले होते. ते कुमारजींचे घर आणि त्यांचा तेथील वावर याबद्दल पं. सत्यशीलजी त्यांच्या एका लेखात लिहितात, “मुंबईच्या वाळकेश्वर मधील आमच्या घराचा ceiling fan वडील वामनराव यांच्यासारखाच स्थितप्रज्ञ आणि समशीतोष्ण होता. वर्षानुवर्षे एकाच लयीत चालायचा. या ceiling fan खालीच वाढलेल्या मला दिवसाचे प्रहर, रात्रीचे प्रहर आणि ऋतूसुद्धा कुमारजींच्या मुळे प्रथम जाणवले. विविध गोष्टींचा चवीने आस्वाद घेत जगणाऱ्या अशा माणसाच्या सहवासात मी प्रथमच आलो होतो. नुसत्याच गाण्याने नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने भारून मी मुंबईला परत आलो..”

त्यावेळी परत जाताना पोर्चमधील त्या झोपाळ्यासमोर टेकलो. शांतपणे पाहत राहिलो. सतत असं वाटत राहिले की कुमारजी हळूवार झोका घेतायत. आपल्याच तंद्रीत काहीतरी गुणगुणताहेत. असं वाटलं की “सखियाss, वा घर सबसे न्यारा...” अशी ओळ कानी येईल की काय...! तिथल्या भिंतीनी काय काय पाहिलेलं. त्या वास्तूत गुंजन करून गेलेले त्यांचे ते सगळे स्वर तिथेच कायमचे फ्रीज्ड होऊन राहिले असते आणि आपल्याला सदैव ऐकता आले असते तर किती बहार आली असती असे विचार मनात पिंगा घालत असताना आम्ही त्यांचा निरोप घेतला.

मध्यंतरी पण एकदा तिथे धावती भेट झाली होती. त्यानंतर कोल्हापूर, पुणे किंवा चिपळूणच्या आसपास कधी मैफल असली की कलापिनीताई हमखास भेटायच्या. त्यांचे आणि भुवनदादाचे गाणे २०२३-२४ मध्ये कुमारजी जन्मशताब्दीच्या निमित्ताने ऐकता आले. खरंतर यंदा जानेवारी मध्येच देवासला त्यासाठी जायचे होते पण कामाच्या व्यापात जमले नाही.  

मात्र यंदा इंदूर-भोपाळ येथे माझी शिवचरित्रावर व्याख्याने होती त्यासाठी पुन्हा गेलो. फोनवर कलापिनीताईसोबत बोलणं झालं होतं. यंदा त्यांना संगीत नाटक अकॅडमीच्या पुरस्काराने मा. राष्ट्पतींच्या सन्मानित करण्यात आले. त्यानंतर प्रथमच भेटणार होतो. “तुम्ही सकाळी थेट नाश्त्यालाच या...” असं त्यांनी सांगितलेलं. मग इंदूरमधून तिकडे मला घेऊन जायला अश्विनदादा खरे सकाळीच हजर झाले.  देवासला भानुकुलच्या गेटजवळ धुंद बहरलेल्या गुलमोहर आणि अमलताशने स्वागत केलं. अत्यंत आवडती अशी ही दोन झाडे पाहून मन हरखले.

आत जाताच कलापिनीताईनी प्रसन्न स्वागत केले. भुवनदादांच्या पत्नी उत्तराजी यांनी गरमागरम नाश्ता समोर ठेवला. थोड्या वेळाने भुवनदादा पण गप्पात सामील झाले. आम्ही गप्पा मारत बसलो होतो पण मन मात्र त्या आतल्या खोलीकडे धाव घेत होते. हे उमगून जरावेळाने कलापिनीताईनी आत नेले. पुन्हा ते घर आतून पाहिले. तो हॉल,ते तानपुरे सगळं आजही अगदी निगुतीने जपलं आहे. भिंतींवर कुमारजींना मिळालेले पद्मविभूषण पासूनचे सर्व सर्व पुरस्कार नीट लावले आहेत. त्यातच आहे तो पुरस्कार जो लहानग्या त्या गाणाऱ्या मुलाला “कुमार गंधर्व” असं नाव देऊन गेलेला.

त्यांची खोली कुटुंबीयांनी एखाद्या देव्हाऱ्यासारखी जपली आहे. ते जिथं बसून सुरेख अक्षरात बंदिशी लिहायचे त्या डेस्कवर, त्यांच्या पलंगावरील उशीवर आजही रोज ताजी फुलं असतात. ते सगळं पाहताना अनेक आठवणी दाटून येतात. त्यांचे सूर कानात गुंजन करू लागतात. आपल्यासारख्या बाहेरच्या माणसाला इतक्या गोष्टी आठवत राहतात मग तिथेच बसून रोज रियाज करणाऱ्या कलापिनीताईना, भुवनदादाला तिथे कसं वाटत असेल? त्यांच्या हृदयात तर शेकडो आठवणींचा जणू पिंगाच. आपण फक्त तिथं नि:शब्द बसून राहावं. तिथं बसल्यावर  जो सुकून वाटतो तो शब्दांत कसा सांगावा? एखाद्या विशाल प्राचीन वटवृक्षाखाली जे शांत आणि शीतल वाटते तसं वाटत राहिले. गुरुजी...ss जहां बैठू वहां छाया...” कुमारजींनी गायलेल्या निर्गुणी भजनातील ही ओळच जणू जिवंत झाल्यासारखी वाटली. भानुकुल मधून त्यांचा निरोप घेऊन निघालं तरी मनातले त्यांचं गाणं सुरूच राहतं कारण आपण गाण्यात रमलेलं घर अनुभवलेलं असतं...!

-सुधांशु नाईक (९८३३२९९७९१)