मना सज्जना... भाग : 26 : अस्वस्थ मन समजून घेता यायला हवे...!
सोमवार दिनांक २७/०५/२४
मंडळी,
“मना सज्जना...” या लेखमालेच्या पहिल्या २५ भागात मनाच्या विविध अवस्था, मनात
उमटणारे तरंग, मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या चिंता, स्वार्थ, क्रोध आदि गोष्टींबाबत
जाणून घ्यायचा आपण प्रयत्न आपण जानेवारी ते मार्च दरम्यान केला. ते लेखदेखील
ब्लॉगवर पुन्हा वाचता येतील. आता आपण मानसिक अस्वास्थ्याविषयी अधिक खोलवर बोलायला
हवं असे मला वाटते. नेहमीच महत्वाचा असलेला समुपदेशन आणि मानसिक स्वास्थ हा विषय आगामी
काळात अधिक महत्वाचा ठरणार आहे हे लक्षात घेऊन या संदर्भात लेखन करायचे ठरवले आहे.
दर पंधरा दिवसांनी “मना सज्जना...” या लेखमालेतील लेख आणि अन्य वेळी “सुधा म्हणे...”
या अंतर्गत काही मनापासून लिहिण्याचा प्रयत्न असेल. तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा
आहे. तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रिया अवश्य कळवत राहा. तसेच ज्यांना स्वतःसाठी
किंवा आपल्या परिचितांसाठी सल्ला / समुपदेशन हवे आहे त्यांनी अवश्य संपर्क साधावा
ही विनंती.
वाढते मानसिक अस्वास्थ्य यावर जरा सविस्तर लिहावे असे कायमच वाटत असायचे. आज आवर्जून लिहावेसे वाटले त्यासाठी एक घटना निमित्तमात्र ठरली. माझ्या एका स्नेह्यांशी बोलताना कळले की, त्यांच्या एका परिचित व्यक्तीने बाथरूममध्ये वापरतात त्या असिडचे प्राशन केले. त्याला त्वरित अतिदक्षता विभागात हलवले आणि शेवटी त्याचा त्यातच मृत्यू झाला.
जेंव्हा अधिक माहिती
समजली त्यावेळी असे लक्षात आले की त्या व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन होते. रोज थोडीतरी
दारू पिल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नसे. साहजिकच त्यातून येणारे ताण तणाव त्या
कुटुंबात होतेच. लहान मुले घरात असल्यामुळे त्यांच्या व्यसनाचा सर्वाना त्रास होऊ
लागला. मग कुटुंबियांनी त्यांच्या मद्यपानास विरोध करायला सुरुवात केली. त्यांना
अजिबात दारू मिळू द्यायची नाही याचे प्रयत्न सुरु केले. यामुळे काही सकारात्मक बदल
होण्याऐवजी ती व्यक्ती अधिकाधिक अस्वस्थ होत राहिली. त्यातूनच एका अस्वस्थ क्षणी
त्यांनी बाथरूममधील असिडची बाटली थेट तोंडाला लावली आणि जीव गमावला. हे का घडले
यावर जेंव्हा चिंतन केले तेंव्हा असे लक्षात आले की मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार
त्या व्यक्तीशी इतरांनी असे वागणे हे चुकीचे होते.
शारीरिक वा मानसिक तणावातून सुटका होण्यासाठी त्या व्यक्तीने दारूचा आधार घेतला होता. हल्ली नोकरी, व्यवसाय, गृहकर्ज, नातेसंबंध आदि गोष्टीमुळे प्रत्येक व्यक्ती कुठेतरी ताणतणाव सोसत असते. कदाचित मौज म्हणून सुरुवातीला त्यांनी मद्यपान केले असेल मात्र पुढे त्यामुळे त्यांना बरे वाटू लागले आणि ते व्यसनात गुरफटले. जेंव्हा एखाद्याला दारू,सिगरेट,तंबाखू, अंमली पदार्थ आदि कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागते तेंव्हा त्याला त्याच गोष्टीचा आधार वाटू लागतो. ज्याक्षणी ती गोष्ट त्यांच्यापासून दुरावते तेंव्हा ते जास्त अस्वस्थ होतात.
अशावेळी त्यांची विचारक्षमता पूर्णत: झाकोळून जाते. त्यांना खूप विचारपूर्वक हाताळावे लागते. कोणत्याही व्यसनातून अशा व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी खूप शांतपणे पावले उचलावी लागतात. जे इथे घडले नसावे. बरेचदा असेच आपल्याला इतरत्र देखील आढळून येते. म्हणूनच अशा केसेस मध्ये समुपदेशकाचे सहभागी असणे अतिशय आवश्यक ठरते.
या घटनेच्या संदर्भात बोलायचे तर, जेंव्हा कुटुंबातील ती व्यक्ती अस्वस्थ आहे, तिच्या व्यसनाची तीव्रता हळूहळू वाढते आहे हे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संवाद साधायला हवा होता. तुम्ही का अस्वस्थ आहात, कोणती चिंता तुम्हाला सतावत आहे, तुम्ही एकट्याने मनाला त्रास करून घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण मिळून यावर उपाय शोधूया अशा प्रकारे बोलून त्यांना धीर द्यायला हवा होता. आजकाल दारू पिणे वगैरे गोष्टी कित्येक घरी सहज स्वीकारल्या जातात. मद्यपान जास्त वाढताना दिसले की मगच त्यावर जोरदार टीका सुरु होते. त्यातून मग वादावादी, भांडणे सुरु होतात. मात्र तोवर ती व्यक्ती व्यसनाधीन झालेली असते.
घरातून विरोध झाल्यावर कित्येकदा व्यसनी माणूस सुरुवातीला चुका कबूल करतो, त्यातून बाहेर पडायचे प्रयत्नदेखील करतो मात्र पुनःपुन्हा त्यातच गुरफटत राहतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही घटना घडलेल्या असतात. अगदी बालपणीच्या घटनादेखील मनावर खोलवर आणि आजन्म टिकेल असा परिणाम करून जातात. अशावेळी घरच्यांनी त्यांना समुपदेशकाकडे न्यायला हवे. अशा व्यक्तींसोबत अधिकाधिक बोलून, त्यांचा पूर्वेइतिहास जाणून घेऊन त्यानुसार समुपदेशक आपली कृती निश्चित करतो. तसे या केसबाबत व्हायला हवे होते.
जर या व्यक्तीने किंवा घरच्यांनी वेळेवर समुपदेशकाशी संपर्क साधला असता तर त्याने या व्यक्तीची मानसिकता, त्यांचे ताण तणाव समजून घेतले असते. त्यांना या समस्येवर मात करायला धीर दिला असता. तसेच घरच्यांशी बोलून त्यांचीही बाजू ऐकून घेतली असती. त्यानुसार काही प्राथमिक उपाय सुचवले असते ज्यायोगे त्या व्यक्तीचे मानसिक अस्वास्थ कमी करायला मदत झाली असती. घरातील वातावरण बदलायचे प्रयत्न करता आले असते. व्यसनमुक्तीसाठी कार्यरत अशा अनेक संस्था सध्या कार्यरत आहेत त्यांची मदत घेता आली असती. एकूणच परिस्थिती जास्त गंभीर आहे असे जाणवले असते तर समुपदेशकाने प्रसंगी सायकोलॉजिस्ट किंवा डॉक्टरद्वारे औषधोपचार मिळवून देण्याची काही व्यवस्था केली असती. एक जीव वाचला असता. एक कुटुंब सावरले असते.
आजच्या धकाधकीच्या
जीवनात प्रत्येक व्यक्ती ताण-तणाव, नैराश्य, अपयश यांचा कधी ना कधी सामना करत
असते. त्यांना नेमक्या वेळी योग्य सल्ला, योग्य समुपदेशन मिळाले तर स्वतःच्या
क्षमतांवरील त्यांचा ढासळता विश्वास पुन्हा अधिक दृढ व्हायला नक्की मदत मिळेल. प्रत्येक
व्यक्ती सुखी- समाधानी आणि आनंदी असावी यासाठीच तर समुपदेशक काम करत राहतात. फक्त कोणताही
अवघड प्रसंग आयुष्यात आल्यास, मन अस्वस्थ होत असल्यास आपण त्यांच्याकडे नि:संकोचपणे
जायला हवे तरच मनाला पुन्हा स्थिर आणि स्वस्थ करणे आपल्याला सहजशक्य होईल असे मला
वाटते.
- सुधांशु नाईक,पुणे
(समुपदेशनासाठी संपर्क साधावयाचा असल्यास ९८३३२९९७९१/ ९०२१२५०९६३ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.)
No comments:
Post a Comment