marathi blog vishwa

Thursday, 24 September 2020

जादूची पेटी - किस्सा 2 : कोरोनाग्रस्ताच्या मनातलं भीतीचं सावट

सध्याच्या परिस्थितीतच नव्हे तर इतर वेळीदेखील आपल्या ताणतणावांचा निचरा व्हावा यासाठी विविध प्रकारे बोलतं व्हावं याच उद्देशानं, तुमच्या मनातील दडपणं, भीती, चिंता, समस्येबाबत मोकळं होणं ह्यासाठी #जादूचीपेटी ही संकल्पना लोकांसमोर आणलीये. लोकांनी आपले प्रश्न मोकळेपणानं आम्हाला कळवावेत, संवाद साधावा, मन मोकळं करावं या आवाहनाला छान प्रतिसाद मिळतोय.
असाच एक संवाद.. एका कोविडग्रस्त पेशंटसोबतचा...
 ( अर्थातच नावं बदलून..)
#जादूचीपेटी #02

सुधांशुदादा, नमस्कार. मी जितेंद्र बोलतोय. कोल्हापुरातूनच. तुम्हाला वेळ आहे का जरा..मला थोडं बोलायचंय.
नमस्कार जितेंद्र. बोला.. मनमोकळं बोला. 
दादा, मला स्वत: कोरोना झालेला. गेल्या महिन्यात. सरकारी दवाखान्यात 15 दिवस अॅडमिट होतो. शेजारी काही पेशंट रोज मरत होते. माझ्या आईवडिलांचाही काही महिन्यापूर्वी अन्य आजारानं मृत्यू झालाय. माझा मोठा भाऊ दुर्घर रोगानं ग्रस्त होता.. तोही नुकताच गेला सर... गल्लीत, भागातही काही लोक मेले...मला प्रचंड भीती वाटतीये. मीही आता मरणार असं वाटतंय.. एका खोलीत बसून राहिलोय काही दिवस.. काय सुचत नाहीये.. खूप भीती वाटतीये. बाहेर गेलं की मला लगेच मरण येईल असं वाटतंय...नोकरीवरही इतक्यात येऊ शकत नाही असं कळवलंय. रात्री झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही सध्या...

कोविडकाळात लोक किती भयभीत झालेत याचं हे उदाहरणच जणू. 
मी त्याच्याशी जरावेळ बोलत बसलो अवांतर काही. अजून अविवाहित आहे तो. एका संस्थेत नोकरी करतो. वाचनाची आवड आहे. देवाधर्मावर श्रध्दा आहे. दत्तमंदिरात जात होता नियमित. व्यसनही नाही.. असा एक हा सरळमार्गी युवक. अचानक आलेल्या संकटांनी एकदम भयव्याकुळ झालेला. मोठ्या भावाची मुलं शाळेत, काॅलेजात जातायत. घरी वहिनी सांभाळतेय बाकी सारं...

त्याच्याशी जनरल गप्पा मारल्यावर म्हटलं, " मित्रा जितेंद्र, मरण येईल म्हणून बाहेर जायचं नाही असं काही करु नको. तुला मरणच येणार असेल तर घरात बसल्याबसल्या देखील येऊ शकतं. जेव्हा मरण येणार तेव्हा येऊ दे. ते नशिबात असतं तेव्हा होईलच. पण त्या भीतीनं आजचा दिवस फुकट नको घालवूस. रोजचा दिवस आनंदी कसा जावा, रोज हातून नवं काही काम घडावं यासाठी सगळं जग प्रयत्न करत असतं. तूही करत होतासच की असं काही. 
सध्या या 6,8 महिन्यात आलेल्या जीवघेण्या दु:खानं तू गडबडून गेलायस. हे साहजिक आहे. अरे भलीभली माणसंदेखील अशा प्रसंगी व्यसनाधीन होतात किंवा निराशेनं आत्महत्याही करतात. तुला किमान तुझा प्रश्न समजतोय. तू विचार करतोयस त्यावर हेही मोठं आहे. आता तू रिकामा बसू नको अजिबात. म्हणतात ना रिकामं मन हे सैतानाचं.. तू मनाला गुंतवलं पाहिजे कशात तरी...

" बरोबर बोलताय दादा तुम्ही...पण नेमकं मी आता काय करु? काही सुचत नाहीये.."

" जितेंद्र, तू म्हणालास ना तुला वाचायची आवड आहे. जुनी गाणी ऐकायला आवडतात. दत्तमंदिरात जायला आवडतं. कोणती पुस्तकं आहेत का घरी तुझ्या? त्यातलं एखादं पुस्तक निवड. तुला बाहेर फिरायला जायला आवडतं तर सध्या गावाजवळच्या टेकडीवर सकाळी व संध्याकाळी चालत चालत जा. तिथे पुस्तक घेऊन जा. 2 तास वाचत बस. बरं वाटलं की घरी ये.घरी पुतण्यांसोबत गप्पा मार. त्यांनाही वडिलांच्या माघारी एकटेपण वाटत असेल. पत्ते, बुध्दिबळ, कॅरम असं काही खेळा. देवळात जाऊन काही प्रार्थना म्हणत बस.. पण मनाला एकटं सोडू नकोस. तुला कधीही अस्वस्थ वाटलं तर जवळचे कुणी मित्र असतील त्यांना किंवा मला काॅल कर...तू एक चांगला मुलगा आहेस असं तुझ्याशी बोलताना जाणवतंय. तू नक्की या परिस्थितीवर मात करशील बघ...बेस्ट लक.. "

बरं दादा.. प्रयत्न करतो.. तुम्हाला कळवेन मी. करेन फोन परत.. 

#
काल संध्याकाळी त्याचा फोन आला. 
" दादा, तुम्ही सांगितलेलं ऐकलं परवा. मग कपाटात शोधलं तर युगंधर हे पुस्तक दिसलं. दादानं आणलेलं. ते घेऊन मी बाहेर पडलो. दिवसभर गावाबाहेरच्या टेकडीवर वाचत बसलो. भगवान कृष्णाच्या चरित्रात रमून गेलो. मग घरी परतलो. गाणी ऐकली. देवापुढे दिवा लावून संध्याकाळी छान पूजा केली. वहिनीशी बोलत बसलो खूप वेळ. तीही खूप टेन्शनमध्ये होती. 
कालही सकाळी व संध्याकाळी चालत चालत फिरुन आलो. पुतण्यांना सोबत नेलेलं. बाहेरचा प्रसन्न निसर्ग पाहून कुठाय कोरोना असंच वाटलं. उगीचच आपण फार घाबरलोय असं वाटलं. कित्येक लोक रस्त्यावर भाजी वगैरे विकत होते. त्यांच्या नोक-या गेल्यात. त्यांच्यापेक्षा आपलं बरं.. किमान नोकरी तरी आहे हाताशी असं वाटलं बघा. आॅफिसच्या सायबाना काॅल करुन सांगितलं की मी 16 तारखेपासूनच नोकरीवर येतोय... उद्या सकाळी कामावर जातोच मी. तेवढंच कामात मन रमलं की बरं वाटेल.. घरासाठी मला उभं राहायचंय दादा..."

" व्वा जितेंद्र.. कौतुक वाटतं तुझं. इतक्या लवकर तुझं तुला समजलंय सारं. स्वत: ची जबाबदारी तुला कळतीये याचा आनंद वाटतोय मला. तुला खूप खूप शुभेच्छा.. बाहेर फिरताना स्वत:ची काळजी घे. मास्क वगैरे नीट वापर. तुझी जी औषधं सुरुयत ती न चुकता घेत रहा...."
आज सकाळी परत त्याचा फोन आला. दत्त भिक्षालिंग मंदिरात नमस्कार करुन पुढे कामावर जाताना मला फोन केला. तुमच्याशी दोन दिवस तास तासभर बोललो अन् खरंच मन मोकळं झालं. काल रात्री झोपेची गोळी न घेता शांत झोप लागली. आता एकदा तुम्हाला प्रत्यक्ष भेटूनही जाईन. नमस्कार दादा.."

###
निव्वळ मनमोकळं बोललं की इतकं छान काही घडू शकतं हे जाणवून आज मलाच खूप आनंद झालाय. कालच्या दै. सकाळ मध्ये हे एक सुंदर आर्टिकल आलंय. आनंदी जगणं का गरजेचे हे सांगणारं. सर्वांनी अवश्य वाचावं असं.
तुमच्यापैकी कुणाला काही मनातलं कुणाशी बोलता येत नसेल तर अवश्य आपल्याशी संपर्क साधा. तुमच्या परिचितांत कुणाला समुपदेशन हवं असेल तर अवश्य ही माहिती, ही पोस्ट त्यांच्यापर्यंत पोचवावी ही विनंती. 

#जादूचीपेटी ची किल्ली म्हणजे  आमचा नंबर  9833299791 व इमेल आयडी आहे nsudha19@gmail.com 

संपर्क व काॅलवर बोलायला कोणतीही फी नाही.
मंडळी, मनमोकळं बोलत राहूया. आनंदी राहूया..!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर(९८३३२९९७९१)🌿

जादूची पेटी- किस्सा 1 : लाॅकडाऊन अन् आर्थिक अडचण

मंडळी, सध्याच्या धूसर वातावरणात मनावरचं मळभ हटवायला बोलतं व्हा, माझ्याशी संवाद साधायला कधीही काॅल, मेसेज करा असं सांगितल्यावर सर्वदूरवरुन विविध मेसेजेसचा , काॅल्स चा वर्षाव झाला. तुमच्या मनातील चिंता दूर करायला आमची #जादूचीपेटी अवश्य वापरा हे आवाहन अनेकांना मात्र नक्की आवडलंय.
अनेकांसह मलाही वाटलेलं की लोकांना प्रश्न आहेत, लहानसे किरकोळ किंवा मोठे गंभीरही. पण शक्यतो लोक विविध काॅम्प्लेक्सेस मुळे बोलायला धजावत नाहीत. कुणाला त्यात न्यूनगंड वाटतो, तर कुणाला खरं सांगून स्वत:चं आभासी चित्र उघड कसं करायचं असंही वाटतं. कुणाच्यात बोलायचं धाडस नसतं तर कुणाला इतकं भरुन आलेलं असतं की बोलायला शब्दच सापडत नाहीत...मात्र काहीजणांनी खरंच काॅल केला. 
त्यातील तुलनेनं साधं, हलकंसं उदाहरण आज सांगतो. त्यांना कसं लगेच बरं वाटलं याविषयी...कोविड पेशंट असलेल्यांच्या एका गंभीर प्रश्नाबद्दल जी एका व्यक्तीशी चर्चा झाली त्याबद्दल उद्या सांगेन.
#जादूचीपेटी  कहाणी क्र #01
 ( कहाण्या सांगताना सर्वांची नावं व स्थळंही बदलूनच सांगणार आहे. त्यामुळे गोपनीयतेचा भंग अजिबात होऊ देणार नाही.)
तर काल सकाळीच काॅल आला एक. त्यांचं नाव निलीमा आहे असं समजूया.

निलिमा : सर, नमस्कार. तुमची पोस्ट सोशलमिडियात पाहिली व लगेच बोलावसं वाटलं. मला माझ्या मिस्टरांबद्दल बोलायचंय. ते गेले 2 महिने माझ्याशी जवळपास बोलतच नाहीत हो.
' नमस्कार. काय करतात तुमचे मिस्टर.. तुम्हीही नोकरी वगैरे करता का?. अाणि सर नका हो म्हणू.. सुधांशु म्हणा फक्त...
' अहो आमचा व्यवसाय आहे. दुकान आहे इंडस्ट्रियल मटेरियल्सचं. 3,4 महिने बंद होतं. आॅगस्टपासून पुन्हा हळूहळू सुरु केलंय.
' धंदा सध्या होत नाही, आर्थिक अडचण आहे असं काही बोलले का ते तुम्हाला यावर आपण नंतर बोलू. आधी मला सांगा, घरी त्यांचं एकंदरीत वागणं कसं असतं नेहमी, घरी कोणकोण असता तुम्ही, तुमची जराशी माहिती...वगैरे.'

त्या बोलू लागल्या;
' सुधांशु सर, ते खूप शिस्तीचे आहेत. एकदम सगळं नीटनेटकं, जागच्याजागी लागतं त्यांना. रोजच्या वेळाही ठरलेल्या असतात..
घरी आम्ही दोघं व माझा इंजिनियरिंगचा मुलगा. सासूसासरे वारलेत. घरी जवळची अशी कुणी नातेवाईक मंडळी नाहीत फारशी. माझी नणंद असते याच गावात पण असं खूप रोज बोलणं वगैरे नसतंय. माझे भाऊ व वहिनी नाशिकला असतात. इथं मनमोकळं कुणाशी बोलावं असं खूप जवळचं कुणी नाहीये. मीही रिकाम्या वेळेत शाळेतील मुलांचे गणित इंग्रजीचे क्लासेस घ्यायचे, उगीच हौस म्हणून पण सध्या बंद आहे सगळंच.. एकदम सगळं थांबल्यासारखं झालंय हो...

' होय खरंय. तुम्हाला मिस्टरांचं वागणं अचानक खटकायला लागलं की हे असं अधूनमधून अबोला वगैरे असतं घरी.'

' तसे ते कमी बोलतात. चिडत वगैरे नाही कधी. सकाळी लवकर उठून आपलं आवरणं, देवपूजा वगैरे करुन नाश्ता करुन दुकानात जातात. दुपारी बहुदा घरी येत नाहीत कुणाला तरी डबा आणायला घरी पाठवतात. संध्याकाळी 7,8 पर्यंत येतात घरी. मग टीव्ही, बातम्या, व्हाटसअप असतं. कधी बोलतात कधी नाही. पण या 2 महिन्यात ते गप्प गप्प झालेत. मुलाशीही फारसं बोलले नाहीयेत. परवा मी काही म्हणायला गेले तर फाडकन् म्हणाले जीव द्यायला हवा म्हणजे सुटू सगळेच...' 

मला भीती वाटू लागलीये हो असं म्हणत त्या रडू लागल्या. त्यांचा आवेग ओसरु दिला. जरासा इतर काही बोललो. मग म्हटलं;
" हे पहा निलिमा, आज तुम्ही तुमची सगळी कामं लवकर आवरुन ठेवा. ते आले की प्रसन्नपणे त्यांना सामोरं जा. चहा नाश्ता वगैरे हवं तर तुम्ही द्यालच पण जरा शेजारी हात हाती घेऊन बसा. आईच्या मायेनं विचारपूस करा... तुम्ही त्यांची बायको आहातच.. जरासा आज आई व्हायचा प्रयत्न करुन पहा.
 जमल्यास कुठंतरी बाहेर जाऊन या. गाडीतून जा, मंदिरात जायला आवडत असेल तर तसं जा किंवा नुसतंच एकत्र बाहेर जोडीनं चालून या... जे काही सहज वेगळं बोलता येईल ते बोला.. त्यांना बाहेर भेळ वगैरे आवडत असेल तर खिलवा...मग येऊन जेवण...त्यांना आज तुमच्यातील आई किती प्रेमळ आहे हे दिसेल यासाठी जे जमेल ते करा. कारण पुरुषाला नेहमी बाई हवी असतेच हो पण त्यापेक्षा जास्त अनेकदा त्याला आई हवी असते, पॅम्पर करणारी..माया करणारी... आधार देणारी. त्यांना सांगा की त्यांच्या अडचणीत तुम्ही सदैव सोबत आहात...हा एक प्रयत्न करा.. मग उद्या बोलू परत आपण...गुडलक👍.

##
मी आपलं त्याक्षणी पटकन् जे मनापासून सुचलं ते सांगितलं. त्यांना कितपत पटलं, त्या करतील का याचा खरंच अंदाज आला नाही. आज साधारण 10.30 च्या दरम्यान त्यांचा काॅल आलाच... आवाजातला बदलच सांगत होता की त्यांचा ताण हलका झालाय...

#
" सुधांशुसर, गुडमाॅर्निंग. तुमचे खरंच मनापासून धन्यवाद हो. काल संध्याकाळी त्यांच्याजवळ बसले. मायेनं विचारपूस केली. नंतर त्यांच्यासह मी बाहेर पडले. इथलं गणपतीमंदिर प्रसिध्द आहे. सध्या बंद असलं तरी परिसरात जाऊन बसता येतं. बरं वाटतं. आम्ही चालत चालत गेलो. तिथे मग बसलेलो. कसल्या टेन्शनमध्ये आहात, मला नाही का सांगणार? काहीही अडचण असली तर सांगा आपण दोघं मिळून लढूया. तुम्ही एकटं नाही हे बोलले. 
मग म्हणाले की ज्यांना मटेरियल दिलंय 6 महिन्यांपूर्वी त्यांचे पैसे आले नाहीयेत. आपण ज्यांच्याकडून घ्यायचो ते, त्यानं तगादा लावलाय. त्याचीही अडचण, याचीही अडचण, माझीही अडचण... कुठून कोण कसे पैसे देणार??मग आम्ही त्या व्यक्तीला काॅल केला. त्यांना मी स्वत: सांगितलं की साहेब आम्ही तुमचे पैसे बुडवणार नाही यावर विश्वास ठेवा. त्या पार्टीकडून आले की नक्की देऊ. तुमचा विश्वास बसत नसेल तर घरी या. माझे दागिने तुम्ही घ्या. तारण म्हणून... नंतर परत द्या. 
त्या साहेबांनी लगेच सांगितलंय की बहेनजी दागिने नही चाहिये लेकीन 1-2 महिने में पैसे मिल जाने के लिए कुछ करना होगा... मै भी मुश्कीलमें हू. मग हप्तानं काही पैसे देता येतील का याबाबत तिन्ही पार्टी एकमेकांशी बोललो. खरंच खूप हलकं झाल्यासारखं वाटलं.
हे म्हणाले, मी सगळ्यांशी बोलतोय पण कुणी मानायलाच तयार नव्हतं. तू एकदम दागिन्यांचा विषय कशाला काढलास? त्यांनी दागिने मागितले असते तर...
मी म्हटलं अहो दिले असते की. तुम्ही सगळं पार पाडायला, पुन्हा मिळवायला खंबीर असताना मी का दागिन्याच्या मोहात अडकू... कितीतरी दिवसांनी यांचा चेहरा छान प्रसन्न वाटला मला...

घरी आलो. छान जेवलो. रात्री एखाद्या लहान मुलासारखे  मला मिठी मारुन शांत झोपले ते कुशीत शिरुन. कितीतरी वेळ थोपटत बसले मी.. खरंच बरं वाटलं. सकाळी रोज मुलगा जाॅगिंगला जातो तर आज त्याला म्हणाले, मीही येतो रे तुझ्यासह. जरा चालून येऊ. तू धावू नको आज. गप्पा मारत चालून येऊ. येताना मस्त गरमगरम भजी घेऊन आले आज... लेक ही म्हणाला आई बाबा आज किती फ्रेश दिसताहेत गं... असेच मस्त वाटतात बाबा नेहमी...!

" खरंच सुधांशु सर, तुमच्याशी बोलले हा योगायोगच. पण एकदम सगळं स्वच्छ झाल्यागत वाटलं पहा. यापुढेही अधूनमधून  बोलत राहीन हं मी. तुम्ही हवंतर चार्ज घ्या माझ्याकडून.. 

" निलिमाजी, अहो मी निमित्तमात्रच हो. सगळं तुम्हीच तर केलंत. हे असंच असतं. मन मोकळं झालं की आपोआप नवं काही सुचतं. मार्ग सापडतात. म्हणून बोललं पाहिजे. मनाचं आभाळ स्वच्छ राहिलं पाहिजे. आता तुमच्या ह्यांची आई बनला ना, असं कधीतरी करावं लागतं हे लक्षात ठेवा. पण म्हणून सतत आईपण नका हं दाखवू. नाहीतर यांनी ' बायको' सारखंही प्रेम करावं म्हणून वेगळं काऊन्सिलिंग करावं लागेल आम्हाला...'

निलिमा खळखळून हसल्या... ' तुमची फी...'
' छे, हो, साध्या एक दोन काॅल्स ना कसली आलीये फी. हाती फोन आहे, जेव्हा वेळ मिळंल तेव्हा बोलत रहायचं. तुम्हाला छान वाटलं हीच आमची फी. मात्र जर काही प्रसंगी प्रत्यक्ष भेट, चर्चासत्र, काऊन्सिलिंग, ट्रीटमेंट असं काही गरजेचं वाटलं तर नक्की आम्ही फी घेऊच.मात्र मनातल्या चिंता, टेन्शन्स, भीती, राग, हे सगळं आमच्या #जादूच्यापेटीत टाकायला काहीच चार्ज नाही. तुम्ही असंच इतरांनाही अवश्य सांगा काॅल करायला. आम्ही त्यांच्याशी बोलायला नेहमीच तयार आहोत..!

##

मंडळी, निलिमाताईंना एकदोन काॅलवर काही मिनिटं बोलून छान वाटलं. त्यांनाच त्यांचा मार्ग सहज दिसू लागला. नातेसंबंध घट्ट झाल्यासारखं वाटलं त्यांना.
हीच तर गंमत आहे. तुमच्यासाठीही आहे  आपली #जादूचीपेटी. यात टाकून द्या तुमचे प्रश्न, चिंता...
तुम्हाला किंवा तुमच्या मित्रमंडळीत कुणाला मनस्वास्थ हरवल्यासारखं वाटतंय का? तसं वाटत असेल तर अवश्य आम्हाला काॅल करा 9833299791 या नंबरवर. व्हाटसअप काॅल, मेसेजेसही चालतील. किंवा बोलायचं कसं असं वाटत असेल तर nsudha19@gmail.com  यावर मला इमेल पाठवा. 

जे कोरोना संकटातून जातायत, घरात वगैरे आजारपण सोसतायत त्यांनीही मानसिक आधार हवा असल्यास काॅल करावा ही विनंती.

नि:संकोचपणे मनमोकळं बोलत राहूया!
- तुमचाच 
सुधांशु नाईक, कोल्हापूर ( 9833299791)🌿
( सध्या आत्महत्यांच्या प्रमाणात जी वाढ झालीये त्याबद्दलच्या बातमीचं कात्रण अवश्य पहा. लोकांनी मनमोकळा संवाद साधला तर नक्कीच आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊ शकतं. म्हणून सुखसंवाद अत्यावश्यकच. इतरांशीही ही पोस्ट अवश्य शेयर करा!)

Saturday, 19 September 2020

आणि आम्ही कोरोनामुक्त झालो....

✒️
 आणि डाॅ चव्हाण यांच्या सहकार्यानं आम्ही कोरोनामुक्त झालो...
- सुधांशु नाईक.

30 तारखेला स्वरदाला अंगदुखी व ताप आला. तर 1 सप्टेंबरला मलाही तेच. लगेच आमच्याच बिल्डिंगमध्ये रहाणारे आमचे शेजारी व अत्यंत मनमिळावू असे डाॅ. कुणाल चव्हाण यांचा सल्ला घेतला. 
ते कोतोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आहेत अन् नागाळा पार्कात अनेक रुग्णांना मार्गदर्शन करतात. गेले 6 महिने ते अनेक कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. त्यांना गृह विलगीकरणात ( home isolation) ठेवून उत्तम उपचार करुन बरं करत आहेत.

त्यांनी लगेच दोघांना औषधोपचार सुरु केले. त्यात मुख्यत: पॅरॅसिटिमाॅल, अॅन्टिबायटिक्स, सी विटॅमिन हे होतंच. तसेच लगेच स्वॅब टेस्ट व HRCT टेस्ट करायला लावली. माझा स्कोर 1/ 40 तर स्वरदाचा 11/40 होता.

मग त्वरीत विविध औषधं देत  15 दिवसांचा कोविड निवारण असा औषधांचा कोर्स सुरु केला. रक्ततपासणी करायला सांगून रक्त गोठण्याचे, गुठळी होण्याचे प्रमाण, किडनी व लीव्हर चं कार्य याबाबतचे पॅरॅमिटर्स तपासून घेतले व त्यानुसार औषधं सुरु केली.
स्वरदाला वास येणे व चव नाही हहीही लक्षणं दिसू लागली. मला त्यामानानं घसादुखी व अशक्तपणा वगळता अन्य काही त्रास नव्हता. ताप 2 दिवसांनंतर परत आलाच नाही.

तरीही दर 3 तासांनी आॅक्सिजन लेव्हल, ताप चेक करणे हे सुरु होतं. डाॅक्टर सतत फोनवरुन संपर्क ठेवत होते. स्वत: येऊन भेटून जात होते. स्वरदाच्या फुफ्फुसातील सुमारे 28 टक्के इन्फेक्शन लक्षात घेऊन सलाईनमधून काही इंजेक्शनचाही कोर्स त्यांनी सुरु केलेला. तसेच शरीरात किल केलेल्या व्हायरसचा निचरा होणे, अशक्तपणा कमी होणे, मेंदू किंवा हृदयावर ताण न येणे यासाठी विविध चौकशा सतत ते करत होते. जुलाब होणे, चक्कर येणे वगैरे काही लक्षणं मधूनच दिसली की लगेच त्यावर विचार करुन औषधं देत होते.

पहिल्या 8 दिवसातच आम्हाला पूर्ण फरक पडला. अशक्तपणा वगळता कोणताही त्रास नव्हता.

तरीही रोजचे डाॅक्टरांचे 2 फोन कधीही चुकले नाहीत. अधूनमधून ते येऊन भेटून जात होतेच.
 घरात दोन्ही मुली व 74 वर्षाच्या  वयस्कर सासूबाईंच्या स्वॅब टेस्ट सुदैवाने निगेटिव्ह होत्या. आम्ही त्वरीत स्वत:चे विलगीकरण केले व डाॅ. चव्हाण यांनी त्वरीत व सर्व अचूक उपाययोजना सुरु केल्याने आम्ही सहीसलामत कोविडमुक्त झालो आहोत.

यापूर्वीदेखील आमची आई, सासू व सासरे यांच्या जीवघेण्या आजारपणात कधीही पैसे न घेता डाॅक्टरांनी मनापासून मदत करत शेजारधर्म निभावला होताच. यावेळी आम्हालाही त्यांनी या गंभीर आजारातून इतक्या सहजपणे बाहेर काढले आहे की आता कोरोना या शब्दाची, रोगाची अजिबात भीती वाटत नाही. आपण योग्य दक्षता घेतली, त्वरीत योग्य उपचार केले तर नक्कीच आपण या रोगावर सहज मात करु शकतो हे स्वानुभवातून शिकायला मिळाले.
याच काळात घरात बसून असल्याने कंटाळा आला होता. मग विविध कोरोनाग्रस्तांना धीर देणे, मार्गदर्शन करणे, तसंच ज्यांना अन्य मानसिक ताणतणाव आहेत त्यांचं फोनवरुन समुपदेशन करणे हा उपक्रम सुरु केला. विविध कोरोनाग्रस्तांना रेफरन्स दिल्यावर आमचे डाॅ. चव्हाणदेखील त्यांच्याशी बोलायचे. त्यांना धीर देत होते. सर्वांच्यात जनजागृती व्हावी तसेच सर्वांना वेळेत योग्य उपचार मिळावेत यासाठी गेले 6 महिने डाॅ. चव्हाण यांनी आमच्यासह ज्या शेकडो पेशंटस् ना मदत केलीये त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

आम्ही घरात आयसोलेट झालो तरी आपलं " खमंग" तिथल्या मावशी व दादांनी सुरु ठेवलं. सगळीकडे जेवणाची पार्सल्स पोचवताना आम्हालाही घरी तिन्ही वेळा नाश्ता जेवण वेळेत पोचवलं. 
आमच्या बिल्डिंगमधील विविध शेजा-यांनी रोज विचारपूस केली. औषधं आणून देणे काही बाहेरचं काम असल्यास करुन देणे अशी मदत केली याबद्दल या सर्वांचे जितके आभार मानावेत तितके कमीच आहेत.
ज्या व्यक्तींना कोरोना झालाय त्यांना किंवा ज्यांच्या मनात भीती आहे त्यांनी आमच्या डाॅ. कुणाल चव्हाण यांच्याशी 9405277901 या नंबरवर अवस्य संपर्क साधावा. ते योग्य उपचार व मार्गदर्शन करतील याचा विश्वास बाळगावा.
गेल्या 5 वर्षात घरात सतत कुणाचं ना कुणाचं लहानमोठं आजारपण सुरुच होतं तरी अनेक उपक्रम आम्ही हिरीरीने करतोच आहोत. आता कोरोनाही घरात हिंडून गेलाय, यापुढे नवीन कोणता आजार कुठेही येऊ नये हीच सदिच्छा व्यक्त करत पुनश्च कामाला सुरुवात करतो!
- सुधांशु नाईक, कोल्हापूर (9833299791)🌿

🙏🏼

Monday, 17 August 2020

एका क्रांतीवीराची कहाणी

' जगावेगळं' या पेजसाठी मी लिहीत असलेल्या "इतिहासाच्या पोतडीतून"  या लेखमालेतील हा लेखांक ९ वा.

एका क्रांतीवीराची कहाणी..
- सुधांशु नाईक.
आज १५ ऑगस्ट . आपल्या हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यासाठी हजारो लोकांचे योगदान आहे. देवासमोर फूल अर्पण करावं इतक्या सहजतेने देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या अनेक क्रांतिवीरांच्या कहाण्या कित्येकांना आज बहुदा लक्षातही नाहीत. ज्या हजारो क्रांतिकारकांनी देशासाठी हसत हसत प्राणार्पण केले त्यातील एक नाव म्हणजे सरदार उधमसिंह.
जालियानवाला बाग हत्याकांडासाठी तत्कालीन पंजाबचा गवर्नर मायकेल ओडवायरला अद्दल घडवायचं ध्येय तब्बल २१ वर्षे उराशी ज्यांनी जपलं ते नाव म्हणजे उधमसिंह...! जाणून घेऊ त्यांच्या आयुष्याबद्दल... 

सरदार उधमसिंह. त्यांचं मूळ नाव शेर सिंह. २६ डिसेंबर १८९९ मध्ये पंजाब प्रांतात संगरुर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. आणि लहान वयातच त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. ७ वर्ष वयाचा शेर सिंह आणि त्याचा भाऊ मुख्ता सिंह यांची रवानगी मग अमृतसर मधील खालसा अनाथाश्रमात झाली. पुढे शेरसिंहच नाव झालं उधम सिंह आणि मुख्ता सिंग बनला साधू सिंह. पुढे १९१७ मध्ये उधम सिंह यांचा भाऊदेखील मरण पावला आणि ते एकटे उरले. 

उधम सिंहांची मॅट्रिक परीक्षा १९१८ मध्ये झाली तेंव्हा पंजाब प्रांत क्रांतीकार्यासाठी धगधगत होता. देशप्रेमी उधमसिंह यांचं क्रांतीकार्याकडे आकर्षित होणं साहजिक होतं. ते मग गदर पार्टीत सहभागी झाले. जमेल तसं क्रांतीकारकांना मदत करू लागले. त्यातच जस्टीस रौलेट यांच्या समितीने नव्या “रौलेट अॅक्ट” ची घोषणा केली. यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली. याविरोधात कॉंग्रेसने आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनासाठी महात्मा गांधीजीनी पंजाबात यायचं ठरवलं. मात्र पंजाबचा गव्हर्नर मायकेल ओडवायर याने बंदी आदेश काढला. तरी गाव-गाव पेटून उठलं.

पंजाबात सर्वत्र मोठी निदर्शने होत होती. अमृतसर मध्ये अनेक लोकांच्यावर गोळीबार केला गेला. शांततेनं निघालेल्या मोर्चावर गोळीबार केल्याने लोक संतापले. काही कचेऱ्या, इमारतींना आगी लावल्या गेल्या. मग पुन्हा इंग्रजांच्या तुकड्यांनी निदर्शकांवर हल्ले केले. कित्येक जखमी झाले. त्यातच सरकारने मार्शल लॉची घोषणा केली. कुणाला बाहेर पडायला बंदी केली गेली. जखमी लोकांना दवाखान्यात न्यायलादेखील बंदी केली गेली. प्रेत यात्रेत केवळ ७-८ माणसे असावीत, रात्री अंत्यविधीसाठी कुणी बाहेर पडू नये, दुपारी २ पूर्वी सर्व अंत्यविधी व्हयला हवेत असे दडपशाही करणारे विविध आदेश काढले गेले. मग जनमानस अधिक पेटून उठलं.

१३ एप्रिल हा बैसाखीचा दिवस. गुरु गोविंदसिंह यांनी खालसा पंथाची याच दिवशी स्थापना केली म्हणून सर्व शीख बांधवांसाठी हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी सर्व जण एकत्र येऊन प्रार्थना करतात, एकमेकांना शुभेच्छा देतात. मात्र अमृतसर मध्ये जनरल डायर या अधिकाऱ्याने असा आदेश काढला की कुणीही घराबाहेर पडायचेच नाही. या आदेशाला गव्हर्नर ओडवायरचीही संमती होती. मात्र ब्रिटिशांना विरोध करायला आपण सर्वांनी एकत्र जमायचं असं लोकांनी ठरवलं आणि सगळे जालियनवाला बागेत एकत्र येऊ लागले.

जालियनवाला बागेची जागा तशी अडचणीची. चारही बाजूनी विविध इमारती आणि मध्ये मैदान. त्यालाही केवळ एक प्रवेशद्वार. इथं हजारो लोक जमले. आणि मग जनरल डायर ने सैनिकांची तुकडी आणून तिथे उभी केली आणि गोळीबाराचे आदेश दिले. लहान-मोठा, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करता. शेकडो लोक गोळीबारात मरण पावले. गोळीबारापासून जीव वाचवायला तिथे असलेल्या एका विहिरीत अनेकांनी उड्या मारल्या. ती विहीर कोरडी होती. तेही मरण पावले. नुसत्या विहिरीतूनच दोनशे पेक्षा जास्त मृतदेह निघाले. हजारोजण जखमी झाले. त्यानंतर पुढचे २-३ दिवस पुन्हा संचारबंदी घोषित केली गेली. जखमी लोकांवर धड उपचार देखील होऊ शकले नाहीत. पंजाबसह सर्व देशातून ब्रिटिशांच्याविरुद्ध असंतोष निर्माण झाला.

त्या दिवशी तो सगळा अमानुष प्रकार उधम सिंहानी प्रत्यक्ष पहिला. ते त्यांच्या अन्य मित्रांसह तिथल्या लोकांना पाणी देण्याची सेवा करत होते. कसेबसे त्यांचे जीव वाचले. मात्र ज्या जनरल डायर आणि मायकेल ओडवायर यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. या दोघांचा वध करून मी या हत्याकांडाचा बदला घेणार अशी उधमसिंहानी प्रतिज्ञा केली..!
अनेक क्रांतीकारकांसह कार्यरत असलेल्या उधमसिंह यांच्यावर ब्रिटीशांची पाळत होतीच. एका प्रकरणात ब्रिटीशांना चकवा देऊन ते परदेशात गेले. इथे अनेक नव्या ओळखी झाल्या. परदेशातून काही हत्यारे घेऊन येण्याबाबत भगतसिंगांशी बोलणे झाले आणि उधमसिंह भारतात आले. विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्यांना ५ वर्षाचा तुरुंगवासही झाला. याच दरम्यान भगतसिंग यानाही फाशी झाली.

तुरुंगवास संपताच पुन्हा उधमसिंह युरोपात गेले. जालियनवाला बाग हत्याकांडचा बदला घेण्याची प्रतिज्ञा मात्र ते अजूनही विसरले नव्हते. दरम्यानच्या काळात जनरल डायरला पक्षाघाताचा झटका आला. तो खुर्चीला खिळला आणि १९२६ मध्ये मरण पावला. उधमसिंहना त्याचं फार वाईट वाटलं. 

मात्र आता या सगळ्याचा मुख्य कर्ता करविता मायकेल ओडवायर याला मात्र सोडायचं नाही हे त्यांनी ठाम ठरवले. त्यासाठी मिळेल ते काम करायची तयारी केली. उधमसिंह यांची तिथे परिस्थिती अगदी बेताची होती. मात्र उत्तम शरीरयष्टीच्या जोरावर त्यांनी अनेक प्रकारची कामे तिथे केली. प्रसंगी गाड्या दुरुस्त करणे, रंगकाम करणे, ड्रायव्हरच काम करणे, असं जे मिळेल ते काम उधमसिंह करत होते. मात्र सतत डोक्यात एकाच विचार होता की ओडवायरला कसं संपवायचं..!

आपल्या योजनेचा एक भाग म्हणून त्यांनी ओडवायरकडे काही वेळा ड्रायव्हर म्हणून देखील काम केलं. मात्र तिथे त्यांनी ओडवायर वर हल्ला केला नाही. कारण त्यांना एका मोठ्या जाहीर कार्यक्रमात ओडवायरला ठार करून ब्रिटीशांना योग्य धडा शिकवायचा होता. पाहता पाहता वर्ष उलटत गेली. ओडवायरही म्हातारा झालेला. आणि ती संधी मिळाली..!

१३ मार्च १९४०. म्हणजे जालियानवाला बाग हत्याकांडानंतर तब्बल २१ वर्षांनी हा दिवस उगवला. आपल्या मनातील ज्वालामुखी इतकी वर्ष ज्यांनं जपला त्या उधमसिंह याना हवी तशी संधी आता मिळाली. लंडनमध्ये कॅकस्टन हॉल येथे एक मोठी सभा भरणार होती. या कार्यक्रमाला भारतातले विविध माजी गव्हर्नर देखील हजर राहणार होते आणि त्यात ओडवायरचा समावेश होता.

सभा सुरु झाली. विविध लोकांची भाषणं सुरु झाली. भारत मंत्री झेत्लांड यांनी शेवटी आभार प्रदर्शन केलं. आणि त्याक्षणी उधमसिंह पुढे झेपावले. ०.४५५ चं ते पिस्तुल त्यांनी समोर येऊन ओडवायरवर रोखलं. त्यांच्या डोळ्यासमोर १९१९ चं जालियनवाला बाग उभं राहिलं. असहाय्य लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. सैनिकांनी केलेला गोळीबार आणि ती अमानुष कत्तल डोळ्यासमोर उभी राहिली... त्यांनी पिस्तुलाचा नेम धरला आणि धाड धाड गोळ्या झाडल्या. ओडवायर जागेवरच आडवा झाला. उरलेल्या गोळ्या त्यांनी इतर गव्हर्नरवर झाडल्या, वंदे मातरम् चा जयघोष केला आणि हात उंचावून ते शांतपणे उभे राहिले. पोलिसांनी त्वरित त्यांना बेड्या ठोकल्या आणि पेंटविले येथील तुरुंगात नेऊन ठेवले.
उधमसिंह यांनी स्वतःच गुन्हा कबूल केलेला. त्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात फारसा वेळ लागला नाही. २१ वर्ष उराशी जपलेलं स्वप्न पूर्ण झालं याच कृतकृत्य भावनेनं उधमसिंह यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली.

 एक वेगळा योगायोग म्हणजे ३१ जुलै १९०९ मध्ये एक महान क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यानाही इंग्रजांनी याच तुरुंगात फासावर लटकावले होते. अभिनव भारत या संघटनेचा सदस्य असलेले मदनलाल धिंग्रा हे स्वातंत्रवीर सावरकर यांचे एक आवडते सहकारी होते. त्यावेळी कर्झन वायली या अशाच एका जुलमी अधिकाऱ्यावर मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्येच एका समारंभात अशाच प्रकारे गोळ्या झाडल्या होत्या. 

जवळपास ३१ वर्षानंतर आता त्याच तुरुंगात उधमसिंह फाशीच्या तख्तावर उभे होते. त्यांच्या चेहेऱ्यावर वेदना, दुःख किंवा भीतीची अजिबात छाया नव्हती. उलट चेहेऱ्यावर होता जाज्वल्य देशाभिमान...! ३१ जुलै १९४० या दिवशी उधमसिंह हसत हसत फाशी गेले. घाबरलेल्या इंग्रजांनी त्यांचं कलेवर देखील गुरुद्वारा कमिटीकडे दिले नाही. तुरुंगाच्या आतील भागातच त्यांच्यावर अंत्यविधी उरकले गेले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि सतत मागणी केल्यानंतर १९ जुलै १९७४ रोजी उधमसिंह यांच्या अस्थी ब्रिटीशांनी भारताकडे सुपूर्द केल्या. त्या काही दिवस जालियनवाला बाग येथे ठेवल्या गेल्या आणि नंतर मग नदीत विसर्जित केल्या गेल्या. 

आज आपण “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आनंदोत्सव” साजरे करतो, गोड-धोड खातो त्यावेळी उधमसिंह यांच्यासारख्या हजारो क्रांतीकारकांनी जे बलिदान केले त्याचीही आठवण जगवूया. एक दिवा त्यांच्यासाठी लावूया..!

जयहिंद... वंदे मातरम् ⛳️
- सुधांशु नाईक, कोल्हापूर. (९८३३२९९७९१)🌿
( शाळा - काॅलेजमध्ये शिकणा-या युवा पिढीपर्यंत अशा क्रांतीकारकांच्या जीवनकथा आपण पोचवल्या पाहिजेत असं वाटतं. त्यासाठीचा हा लहानसा प्रयत्न.)