marathi blog vishwa

Saturday, 11 June 2011

मी रायगड आणि "तो" दिवस...!!

मी रायगड...अर्थातच शिवाजी महाराजांचा रायगड.. तणस, रासीवटा, नंदादीप, रायरी अशी पूर्वीची अनेक नावे माझीच..पण १६२६ मध्ये जावळीच्या चंद्रराव मोरे याचा पाठलाग करत  एक कोवळा तेजस्वी युवक माझ्याजवळ प्रथम आला आणि आम्ही दोघेही एकमेकांच्या चक्क प्रेमातच पडलो...उन्मत्त आणि बेईमान अशा चंद्रराव ला त्याने संपवलेच पण तेंव्हाच उजाड ओसाड पण दुर्गम अशा मला..एका टेहळणी सारख्या नाक्याला त्याने "गड" बनवले..तोच ..तोच..तुमचा माझा लाडका राजा..आपला शिवाजी राजा होता तो..!! त्याची मित्रमंडळी तेंव्हा त्याला "शिवबा राजे" म्हणत तर " धाकले राजे "अशा नावाने त्याच्याबरोबरची वृद्ध मंडळी त्याला बोलावत..!

तेंव्हा पासून अनेक वर्षे मी शिवशाहीचा अविभाज्य भाग बनलो..मुळातच माझ्या आजूबाजूचा प्रदेश तसा दुर्गम..नैसर्गिक डोंगर व कड्यांनी भरलेला..तरी राजांनी आबाजी सोनदेव, मोरोपंत या त्यांच्या सहकारी मंडळीना कामाला लाऊन मला गडाचे छान रूप दिले. पुढच्या काळात तर अवघी कोंकण पट्टी राजांच्या ताब्यात आली..नवे दुर्ग, जलदुर्ग उभे राहिले..त्या सगळ्याच्या केंद्रस्थानी मीच होतो. अनेक कारखाने माझ्याच अंगाखांद्यावर दिवसरात्र कार्यरत असायचे..कसा सगळा कामाचा गलबला असे. आळशी, कामचोर माणूस तर दिसायचाही नाही आणि प्रत्येकाला जणू नशा चढलेली..कसली तर "स्वराज्य" निर्माण करायची..!! प्रत्येक घरातला माणूस जणू मीच शिवाजी राजा आहे अशा थाटात काम करायचा..लढाईत तर असा तळपायचा की शत्रूची पळता भुई व्हायची..!! मग माझ्या अंगावर मूठभर मांस चढायचे..किती वर्ष या अशा दिवसांचीच वाट पहिली होती मी आणि या सह्याद्री ने..!!
शेकडो वर्षापासून माझ्यासारख्या पर्वतांनी आणि इथल्या मातीने स्वराज्याचा ध्यास घेतला होता..प्राचीन काळी असणारे वैभव पुन्हा पुन्हा आठवले होते..मधल्या काळात बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज अशा अनेकांचे इथल्या लोकांवर झालेले अत्याचार पाहून तर आमची झोपच उडाली होती..रोज इथल्या लेकीसुनाची अब्रू आमच्या समोर लुटली जात असताना आम्ही सगळे पर्वत हताशपणे डोळे मिटून मनातल्या मनात आक्रोश करत होतो..त्या शंभू महादेवाला हजार वेळा साकडे घालत होतो..पुन्हा एकदा अवतार तरी घेरे किंवा पुन्हा एक मोठा प्रलय घडवून आण..सगळे काही नष्ट कर. आम्हांला आता हे सगळे नाही सोसवत रोज पाहायला..!!
आणि मग याच डोंगर रांगामधून "हर हर महादेव" ची गर्जना होऊ लागली.. इथल्या इवल्याशा गवताच्या पात्यालाही समजून गेले की आला ..आला.. तो पहा..आपल्या शंभू महादेवाने घेतलेला अवतार..!! तोच तो आपला शिवबा राजा..!! प्रत्येक घर, प्रत्येक गाव प्रत्येक सुभा.. स्वातंत्र्याचा आणि सुराज्याचा पुन्हा अनुभव घेऊ लागले..राजांचे सगळे काम कसे देखणे व नेटके असे..कुणी काय करायचे कसे करायचे..याची अगदी चोख व्यवस्था राजे व त्यांच्या जिवलग यांनी केलेली..कुठेही गडबड नाही..घोटाळा नाही..आणि हलगर्जीपणा तर छे..छे.! त्याचा विचार सुद्धा करायचा नाही..कारण मग नेहमी देखण्या वाटणारया राजांचे कडवे कठोर रुपडे सगळ्यांना हादरवून जायचे..!! गैरशिस्त, अन्याय, यांना शिवराज्यात जागाच नव्हती..!!

आणि एक दिवस अचानक ती बातमी आली..!! राजे मोगलांच्या तावडीतून सुटून आल्यानंतर काही दिवस शांत होते..जणू वादळ येण्या आधीचीच शांतता..!! सगळी घडी एकदा नीट बसवल्यावर मग राजे असे काही तुटून पडले मोगलांवर..अवघ्या सहा महिन्यात पुन्हा स्वराज्य पूर्वीपेक्षा जास्त विस्तारले..पण शत्रूचे आक्रमण थेट राजगडाजवळ आलेले अनुभवल्याने राजे नवीन राजधानी शोधत होते..!! एक दिवस अचानक राजे इथे आले..अवघा गड न्याहाळला..अगदी चाहु बाजूनी हिंडून हिंडून बारकाईने न्याहाळला..दिवसा पहिला..रात्री पहिला..आणि राजांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.."तख्तास जागा हाच गड करावा..!", राजे बोलिले..आणि अंग अंगभर रोमांच फुलले माझ्या....डोळ्यात पाणी दाटले..वाटले माझ्या आयुष्याचे सार्थक झाले..!!

दूर आग्न्येयेकडे उभा तो राजगड कसा अवघा उदास उदास झाला होता..गेली कित्येक वर्ष ज्या राजाने मनसोक्त प्रेम केले तो राजा दुसरीकडे जायचे ठरवून आला  होता..! पण त्याला म्हटले..अरे नाराज नको होऊस..तुझा लाडका राजा माझाही जिवलग आहेच..मी ठेवेन त्याला सुखरूप..जपेन..फुलासारखा..मी मरेपर्यंत कुणी सुद्धा त्याला हिरावून नाही नेवू शकणार..!

राजे रायगडी जाणार समजल्यावर एकच धांदल उडाली..सिंधुदुर्गाचे बांधकाम उरकून आलेला हिरोजी इंदुलकर आणि त्याचे कुशल कारागीर यांची लगबग सुरु झाली..राजांची राजधानी..मग ती जगात सर्वोत्कृष्ट बनली पाहिजे ना..!! देखणे महाद्वार, नगरपेठ, प्रधानांची घरे, पाण्यासाठी तलाव, आवश्यक तेथे भक्कम तटबंदी..आणि राजांसाठी खासा वाडा सगळे काही बनू लागले..मध्ये मध्ये राजे स्वत देखील काम न्याहाळून गेले..सांगून गेले की माझ्या राहत्या घरावर खर्च जास्त नका करू ..पण गडाचा बंदोबस्त, जिजाऊ मासाहेबांचा पाचाडचा वाडा, आणि कारखाना विभाग मात्र नेटका व्हायलाच  हवा...!! या आमच्या राजांना नेहमीच स्वतःपेक्षा दुसऱ्याची जास्त काळजी..!!  हिरोजी व मंडळीनी देखणे काम केले..तेही लवकर..!! मग एकदिवस महाराज आणि कुटुंब कबिला दाखल झाला..गडावर एक आदरयुक्त भीतीचे वातावरण निर्माण झाले..एखादा साधा  माणूस घरासमोरचा  केर सुद्धा सतत काढत बसे..ना जाणो राजे इकडे गडफेरी ला आले तर..!! अशी भीती..अन तशीच ओढ..रोज राजे दिसावेत म्हणून. अशी मज्जा...!

पण राजे आणि त्यांची धावपळ सततची..जरा म्हणून विश्रांती नसायची..!! आणि एक दिवस जिजाऊ साहेब आणि मंत्रीलोक यांची काही खलबते सुरु झाली..एक गोरा ब्राह्मण ही त्यांच्याबरोबर असायचा..आणि बातमी कळलीच.." राजांचा राज्याभिषेक करायचा..!". अवघ्या मावळ्यांच्या मनात आनंदाला भरते आले.."आमचा लाडका शिवबा राजा..आता खराखुरा राजा होणार..अगदी दिल्लीच्या बादशहा पेक्षा मोठा..!!" प्रत्येक जण हेच म्हणू लागला..मग काय गडावर पुन्हा गडबड सुरु..!! कुठून कुठून लोक आले..प्रत्येक जण रिकाम्या हाती कसा येणार ? मग कुणी धान्य आणले..कुणी मीठ, कुणी कापड..कुणी तर चक्क जंगलातला मध..!! ज्याला जे जे जमले ते प्रेमाने राजासाठी घेऊन आले लोक..नेहमी स्वतः खूप मोठा असल्याचा तोरा मिरवणारा..नाक वर करून चालणारा..गोरा इंग्रज देखील आला..कारण राजांनी त्याची अशी जिरवली होती कित्येकदा...समुद्रावर आपलीच सत्ता समजून राहताना त्याला राजांनी चांगली अद्दल घडवली होती..!!

आणि तो दिवस उगवला..ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी..शालिवाहन शके १५९६..आनंदनाम संवत्सर....!! माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस..!! गडावरच्या तोफांनी अवघ्या जगाला अभिमानाने सांगितले.."शिवाजी राजे..छत्रपती झाले..सिंहासनाधीश झाले..!!" काय तो सोहळा..काय ती मिरवणूक..केवढे देखणे ते सिंहासन..आणि केवढे ते प्रेम..लोकांचे राजावर..आणि राजाचे लोकांवर...!!! थरथरत्या हाताने मासाहेबानी देखील आपल्या शिवबाला मुजरा केला..आणि आम्हा सर्वांचे डोळे आनंदाश्रूनी डबडबून आले...राजांनी कडकडून आईला मिठी मारली..! ती भारावलेली आई आणि आईचे स्वप्न साकार करणारा तो शूर वीर पुत्र आम्ही याची देही याची डोळा पहिला...!! आयुष्याचे सार्थक झाले..!!

 आज इतकी वर्षे निघून गेली..खूप चढउतार पहिले नंतर..खरे सांगायचे तर त्या दिवसानंतर थोडे उतारच जास्त..मातुश्री गेल्या..मग शंभू राजांचे बंड..सोयराबाईन्चे आणि इतरांचे राजकारण...जणू काही दुःखाचे ढगच दाटून आले होते..त्यातच..तो तीव्र आघात...अचानक ओढवलेले आजारपण काय ..आणि राजे गेले सुद्धा..अजून विश्वास नाही बसत..त्या काही दिवसांवर..!! तिथून मग पुढचे किती आणि काय लिहू....??

मोगलानी , इंग्रजांनी वर्षानु वर्षे जपलेला राग..मग माझ्यावर काढला..सगळं  सगळं गेलं..आता उरलेत..फक्त काही अवशेष...!! तेही ढासळत आहेत..वेगाने..पण कुणाला आहे त्याचे सोयर सुतक ?? जिथे स्वराज्यासाठी लोकांनी घाम आणि रक्त सांडले...तिथे आता..फुटतात दारूच्या बाटल्या..!! जिथे अवघ्या राष्ट्राने मस्तक झुकवावे तिथे लोक झोकांड्या देत काय काय करतात..!! सांगायला ही लाज वाटते मला..!!

पुन्हा १९४७ ला स्वातंत्र्य तर जरूर मिळाले..पण स्वराज्याची मात्र रयाच गेली..आज तर कायदे फक्त पुस्तकात उरलेत..माणसे पुन्हा भांडू लागली आहेत..जाती जाती वरून..प्रांता प्रांता वरून...!! अरे, ज्या देशात  शिवाजी, थोरला बाजीराव, चाणक्य, आदि महान माणसांनी एकजुटीने राष्ट्र घडवले..तिथे माणसे राष्ट्रधर्म आणि माणुसकी विसरतातच कशी??

खरच पुन्हा पुन्हा वाटते..हे गडकोट स्मारके व्हावीत राष्ट्रभक्तीची..!! आणि इथल्या युवा पिढीने स्वप्न पहावीत..जग जिंकून माणुसकीचे साम्राज्य घडविण्याची..!! कारण ती ताकत फक्त याच मातीत आहे..!! म्हणून तुमचा लाडका रायगड तुम्हाला विनंती करतोय ..प्रत्येकाने आठवा  तो दिवस.माझ्यासारखाच..."शिव राज्याभिषेकाचा..!"..जो देईल तुम्हाला स्फूर्ती..मनात अभिमान आणि मनगटात शक्ती..!!
जास्त काय लिहू..??
----सुधांशू नाईक, कल्याण. (०९८३३२९९७९१)

No comments:

Post a Comment