"सुचेल तसं
" लेखमालेतील हा पुढचा लेख..!
इंद्र हा एकेकाळी आर्यांचा राजा होता. आणि प्राचीन भारतावर (तेंव्हा इथे
"भारत" हे नाव नव्हते) स्वाऱ्या करणाऱ्यात तो आघाडीवर असे. असे इतिहास
सांगतो. नंतर त्याला देवत्व दिले गेले असावे. मात्र भारतीय साहित्यात पुराण काळापासून इंद्र ह्या “देवांच्या राजाचे”उल्लेख आहेत. आणि देवांचा राजा असूनही त्याचे चित्रण मात्र अत्यंत सामान्य माणसाप्रमाणे
केले आहे. इंद्र हा नेहमी विविध विकाराने
ग्रस्त (काम, मत्सर, लोभ इ.), तसेच त्याच्या ताफ्यात असणाऱ्या अप्सरा वेळोवेळी
वापरून घेणे ह्याचेही अनेक उल्लेख आहेत.
परवा सहज मनात विचार आला, एकूणच सामान्य माणसाप्रमाणे वागणारा इंद्र देवांचा राजा का मानला गेला ? मग असं वाटायला लागले की तो देवांचा राजा ही एक कल्पना असावी.
"इंद्रियांचा राजा तो इंद्र " असे समीकरण मांडले तर मात्र बरीच कोडी
पटापट सुटू लागतात.
मानवी मन हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या मधेच अडकलेले असते. हे खरे तर गुणच..
पण अतिरेकाने षडरिपू बनतात. मग प्रत्येक रिपुसाठी विशिष्ट इंद्रिये आणि त्यांना
"योग्य" वेळी कार्यरत करणारी ती भावना म्हणजेच त्या "इंद्राची
खेळी"..! असेच अपेक्षित असेल का त्यावेळच्या ऋषी-मुनींना
ज्यांनी इंद्र ही संकल्पना
निर्माण केली?
एकदा इंद्र ही व्यक्तिरेखा तयार झाल्यावर मग त्याच्या शेकडो कहाण्या रचल्या
गेल्या...सर्वांचा मतितार्थ एकच होता, कुणी
जास्त साधक बनू लागला की इंद्राचे खेळ सुरु होतात आणि षडरीपुंच्या तावडीत बिचारा
साधक पुन्हा गुरफटून जातो..! अर्थातच साधनेच्या, समाजकार्याच्या मार्गावरील व्यक्तीसाठीच हा जास्त मोठा धोका असतो कारण तो
अर्धा पल्ला पार करून आलेला असतो...आणि पुढच्या पाऊलावर अडखळलेला असतो..!
या षडरिपूतून बाहेर पाडण्यासाठी
अभ्यास करायचा, साधना करायची ती शिवतत्वाची..! आपले व आपल्यावर
अवलंबून असणाऱ्या लोकांचे चांगल्या मार्गाने पालनपोषण करून टप्प्याटप्प्याने
संसारातून मुक्त होत शिवतत्वाकडे वाटचाल करणे हाच जीवनक्रम. आणि मग इथेच हे इंद्र
महाराज आपले काम चोख करू लागतात...आपल्याला शिव-तत्वापासून दूर ठेवण्यासाठी..!
थोडक्यात काय तर इंद्र म्हणजे
आपणच तर नव्हे..?
मगाशी मी काम क्रोधादिकांचा गुण
म्हणून उल्लेख केलाय.कारण त्या गोष्टी सर्वसामान्य आयुष्यासाठी आवश्यकच
आहेत..अर्थात विशिष्ट प्रमाणात..! ज्या क्षणी त्याचा अतिरेक होऊ लागतो तेंव्हा
मनातले शिवतत्व क्षीण होऊन मनातील सैतान जागा होऊ लागतो..छोट्या मुलाचेच उदाहरण
घ्या ना. त्याला कायम कशाचा तरी "मोह" होत असतो, त्याला पाहिजे त्या वेळी एखादी गोष्ट मिळत नाही मग त्याच्यातील
"क्रोध" वाढतो, कधी त्याचे खेळणे दुसऱ्याने घेतले
कि"मत्सर" वाढतो. "मद" आणि "काम" ह्या थोड्या
नंतरच्या आयुष्यातील गोष्टी.
जी माणसे लहानपणापासून खरोखरच
चांगली असतात त्यांच्या बाबतील या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात म्हणून आपल्याकडील
वस्तूबाबत ते कधीच Possessive नसतात. ह्या सहा गुणांचा अतिरेक झाला कि ते षडरिपू बनतात हे अशा मंडळीना माहित असते आणि म्हणून आपल्यातील शिव तत्व वाढवत नेत ते संतत्व आणि त्यानंतर देवत्वाला पोचतात. या लोकांना स्वर्गसुखाची अपेक्षा नसते कारण स्वर्ग सुख म्हणजे काय तर पुन्हा आपल्या इंद्रियांना तृप्त करणारे ठिकाण...! वेगळे काही नव्हे..! म्हणूनच यांना अपेक्षा असते ती मोक्षाची, मुक्तीची..!
मुक्ती म्हणजे काय… तर संपूर्ण जीवन समाजासाठी सत्कारणी लावून खऱ्या अर्थाने अजरामर होणे...! आपल्याला मिळालेलं आयुष्य हे उगाच नाही तर आपण ह्या सृष्टीचा उत्कर्ष आणि समाजाची उन्नती करण्यासाठी मिळालेलं आहे याची जाणीव कायम मनात ठेवणे, सृष्टीतील प्रत्येक घटकासाठी काही न काही कार्य करणे म्हणजेच मुक्ती. तोच खरा माणूसधर्म.
काही मंडळी ह्या मार्गावर मोठ्या वेगाने चालून येतात मग अचानक कुठेतरी गडबड होते आणि त्यांच्या मनातील तो "इंद्र" विजयी होतो मग एखादा चांगला पोचलेला विश्वामित्र, दुर्वास किंवा पराशर यांसारखा ऋषी, जसा ह्या षडरिपूच्या जाळ्यात अडकून पडतो तसे देशोदेशीचे अनेक थोर थोर राजे महाराजेही. सगळे मग स्वतःची खरी प्रगती खुंटवून घेतात. अर्थात असे होणे यात अपमानास्पद किंवा वाईट काहीच नाही. मात्र तीच चूक पुन्हा
पुन्हा होत राहिली तर मात्र तो चक्रव्यूह भेदणे कठीण होऊन बसते.
म्हणूनच या
"इंद्राला "डोईजड होऊ न देण्यासाठी साधना करायची..आणि साधने साठी एकांत
वगैरेपेक्षा मनाशी संवाद जास्त आवश्यक आहे. असं आपलं योगविज्ञान सांगते. अगदी सोप्या भाषेत आणि तेही तुकाराम महाराजांच्या शब्दात
सांगायचे तर;
तुका म्हणे होय मनासी संवाद..I
आपुलासी वाद आपणासी...II
“मन वढाय” म्हणणारी बहिणाई असो की मानस
शास्त्राचा पाया असा "सांख्ययोग" निर्माण करणारे कपिल मुनी असोत, प्रत्येकाला हे ठामपणे उमगले होतेच. म्हणूनच "योगशास्त्राचा "
महामेरू असे पतंजलीऋषी देखील मनावर “कंट्रोल” प्रस्थापित करण्यासाठी वारंवार विविध सूचना करत
राहतात..!व्यास मुनींच्या महाभारतातील आपल्या सगळ्यांचा लाडका कृष्ण गीतेमध्ये हेच
दोन्ही योग पुन्हा आपल्या मनावर ठसवतो. सगळ्यांचे म्हणणे एकच..."इंद्रियांवर
विजय मिळवा.."
या सगळ्यांना हे उमगले होते..मग
आपल्याला ते का समजत नाही. किंबहुना कळते पण वळत नाही अशीच अवस्था..! मग तुमचे
लक्ष विचलित करणे त्या “इंद्राला” सोपेच जाणार ना?? तेंव्हा असे होऊ नये म्हणून काय
करावे ..यावर एका ओळीत भाष्य करणारे पुन्हा ते तुकारामच आठवतात;
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश I नित्य नवा दिस जागृतीचा II
आज "तुकाराम गाथा" आम्ही आमच्या रक्तात भिनवायाची गरज असताना लोक
एकमेकाचे रक्त काढण्याची भाषा करत आहेत. जमीन पिकवायच्या ऐवजी जमिनी विकताहेत.
पाणी आणि वने तर आता औषधापुरतीच उरताहेत. देव्हाऱ्यात बसवलेले तुकोबाच आज जिथे
सर्वकाही हताशपणे पहात आहेत तिथे म्या पामराने या उपरी काय लिहावे ???
No comments:
Post a Comment