marathi blog vishwa

Friday 8 March 2013

स्मरण ..जागतिक महिला दिन व समर्थ रामदासांचे...!


नुकतीच समर्थ रामदासांचे स्मरण करत दासनवमी साजरी झाली....! आणि आज ८ मार्च हा जागतिक महिला दिन. ह्या दोन गोष्टीचा संबंध जोडत जोडत हा लेख सुचत गेलाय...

समर्थ रामदास म्हणजे कडकडीत ब्रह्मचारी व्यक्तिमत्व. त्यांच्या सारख्याच ब्रह्मचारी अशा हनुमंताचे ते उपासक. "हनुमंत आमुची शक्ती I हनुमंत आमुची भक्ती" असे त्यांनीच लिहून ठेवले आहे. तर ब्रह्मचारी व बलवान असे आराध्य दैवत. मात्र त्याला नमस्कार करायला, शनिवारी उपवास करणाऱ्या मात्र शेकडो महिला..! असे का ? या विचारांच्या आंदोलनातून मग "सुचेल तसं"चा हा सहावा लेख लिहू लागलो...

हनुमंत हा महाराष्ट्रात व त्यानंतर भारतातील अन्य प्रांतात देऊळ बनवून स्वतंत्र प्रस्थापित केलेला देव बनला याला समर्थ निश्चितच काही अंशी कारणीभूत आहेत. इतिहासाचा अभ्यास करताना इ.स.१६०० पूर्वीची मारुती मन्दिरे फार कमी आढळतात. प्राचीन राम मंदिरातील जागेतच बहुतेक ठिकाणी हनुमंत "रामाचा दास" अश्या पोझ मध्ये उभा केलेला आढळतो. मात्र त्याला "वीर मारुती" किंवा "प्रताप मारुती" अशा स्वरुपात स्वतंत्र मंदिरात स्थानापन्न करणारे पहिले समर्थ रामदासच ..! गावोगावी तरुण माणसे प्राप्त परिस्थितीने हताश होऊन गेलेली पाहून, हतबल झालेली पाहून पराक्रमाची पूजा करणारे रामदासस्वामी व्यथित होत होते आणि यातूनच जन्म झाला हनुमंताची उपासना लोकांना शिकवण्याचा..

त्याकाळची मंडळी देवभोळी होती. "जे काही होते त्याला देवच कारणीभूत आपण पामर त्यापुढे काय करणार?" असेच विचार करणारे. त्यातच महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या तमाम सुलतान मंडळीनी "आम्हीच तुमचा परमेश्वर" अशी द्वाही सर्वत्र फिरवलेली. समाजातील महत्वाचे असे ब्राह्मण व क्षत्रिय दोघेही त्या सुलतानाच्या सेवेत..मग बाकी दैन्यावस्थेतील जाती जमातीचे आयुष्य म्हणजे जणू पोतेरे झाले यात नवल ते काय?? असा सर्व समाज हतवीर्य होऊन गेलेला..या समाजाच्या मनात पुन्हा विचारांचे, आत्मविश्वासाचे स्फुल्लिंग चेतवणे हे खरेच एक अवघड काम..पण जे अशा अवघड कामांनाच हात घालून कार्य करतात तेच मोठे होतात..! समर्थ रामदासस्वामी त्यापैकीच एक होते..

घरदार सोडल्यावर स्वतःच्या बळावर तपोसाधना , विद्याभ्यास पूर्ण केलेल्या त्या तेजस्वी "नारायणाचा" "समर्थ रामदास" बनायला मुख्य कारण ठरली ती त्यांनी देशभर केलेली भ्रमंती. अर्थात ते पर्यटन वा मनोरंजन मुळीच नव्हते. गावोगावी रामदासस्वामी जात. तिथल्या लोकांत मिसळत. कीर्तन -प्रवचन करत. आणि तेजस्वी अश्या रामाच्या / हनुमंताच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत. गावात जो काही २-४ दिवस मुक्काम असे त्यात प्रत्येक दिवशी भल्या पहाटे उठून हजारो सूर्यनमस्कार घालत. गावातल्या मुलांना , युवकांना तसे करायला प्रवृत्त करत. गावागावात एकी निर्माण व्हावी म्हणून युवकांना एकत्र करत. त्यांना बलोपासनेचे महत्व सांगत. आणि एकदा का त्यांच्या मनात ठिणगी पेटली की मारुती मंदिराची स्थापना करून रोज तिथे बलोपासना केली जाईल याची आखणी करत. गावांच्या समूहावर देखरेख करायला विशिष्ट भागातून मठाची स्थापना करत. एक गाव झाले की दुसरे ..एक भाग झाला की दुसरा..असे करत करत रामदासस्वामीनी भारतभर तब्बल ११०० मठांचे जाळे निर्माण केले..हजारो मारुती मंदिरांची उभारणी केली, तेही संपूर्ण देशावर परकीयांचे वर्चस्व आणि धर्मावर त्यांचे अतिक्रमण होत असताना..!! गावागावातून शिवमंदिरे, देवीची मंदिरे उध्वस्त होत असताना ही नवी मंदिरे उभी करताना समर्थ रामदासस्वामी व त्यांच्या सहकाऱ्यांना किती त्रास सहन करावे लागले असतील याची इतिहासात दुर्दैवाने कुठेच नोंद उपलब्ध नाही.

गावागावातून हे सगळे कार्य उभे करताना रामदासस्वामी स्वतःला मात्र कुठेच देवत्व घेताना दिसत नाहीत. ते कायम दिसतात ते आचार्याच्या भूमिकेत..! त्यांच्या शब्दात सांगायचे तर वृत्ती कशी ..तर

“जितुके आपणासी ठावे I तितुके हळूहळू सिकवावे I शहाणे करून सोडावे I सकळ जन II”

जेवायचे तेही भिक्षा मागून.. ही भिक्षा मागताना तोंडाने काय म्हणावे या जाणीवेतून मग जन्म झाला श्लोकांचा.. ! भिक्षामिसे संबंध येणार तो अंधाऱ्या कोपऱ्यात चुलीजवळ स्वैपाक करणाऱ्या गृहिणी बरोबर. त्या बिचाऱ्या स्त्रीचे हाल तर अतिवाईट. शिक्षण नाहीच, अनेक रूढी व परंपरांचा भर सहायचा, सगळ्यांचेच ऐकत जगताना किंमत मात्र एखाद्या वस्तू इतकीही नाहीच..! मग अशा स्त्रीच्या मनापर्यंत पोचणारे ते श्लोक एक अगदी साध्या भाषेतील असावेत दुसरे म्हणजे रोजच्या जगण्यावर भाष्य करणारे व प्रसंगी मार्गदर्शन करणारे असावेत या जाणीवेतून ते "मनाचे श्लोक" जन्मले. आणि पाहता पाहता "जनाचे श्लोक" बनले..!

"मना सांग पा रावणा काय झाले  I अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले I

म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी I  बळे लागला काळ हा पाठीलागी I I

अश्या श्लोकातून परस्त्रीला त्रास देण्याविषयी भाष्य असो किंवा,

देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी I मन सज्जना हेचि क्रिया धरावी I

मन चंदनाचेपरी त्वा झिजावे I परी अंतरी सज्जना नीववावे I I

असे प्रेमळ उपदेशाचे सांगणे असो दे.. समर्थ रामदासस्वामी गावोगावच्या महिला वर्गातही लोकप्रिय होत गेले. भिक्षा मागायला येणारा हा बुवा काही वेगळाच आहे हे त्यांच्या मनावर ठसले. आणि मग बलोपासनेसाठी जेंव्हा समर्थ मुलांना व युवकांना आवाहन करीत तेंव्हा हाच महिलावर्ग कदाचित त्यांना साथ देत असावा. आपल्या घरातील उगाच उंडारत फिरणाऱ्या मुलाला समर्थांकडे पाठवून देत त्यांनी जणू समाजकारणालाच हातभार लावला..! रोज अंथरुणात लोळत पडणारी मुले जेंव्हा भल्या पहाटे उठून सूर्यनमस्कार घालू लागली, व्यायामशाळेत घाम गाळू लागली तेंव्हा समर्थांचा उद्देश सफल होऊ लागला..!! याच बरोबर मारुती दर्शनाचे निमित्त साधून महिलांना घराबाहेर पडण्यास एक निमित्त मिळाले. त्याकाळी मारुती मंदिराजवळच व्यायामशाळा असे. त्यामुळे आईबरोबर आलेल्या लहानग्या मुलाला तिथे चाललेल्या मल्लखांब ,कुस्ती, अन्य व्यायामप्रकाराबाबत कुतूहल निर्माण होणे साहजिकच होते. त्यातूनच तो मुलगाही तिथे खेचला जाई. आणि आपलं मूल काही चांगलं करू पहातंय याचे आईलाही समाधान मिळे. म्हणूनच बहुदा महिला आणि मारुतीचे एक नवे नाते निर्माण झाले असावे..!..!

याहीपुढे जाऊन समर्थांनी महिला वर्गाला कीर्तनातून उपदेश केला. कदाचित समर्थ असे म्हणाले असतील, " मायबहिणीनो, मुलाला जन्म देणे हे तुमच्या नशिबी आहेच मग जन्मणारे मूल हे हनुमंता प्रमाणे, राम-कृष्णाप्रमाणे बलवान व तेजस्वी व्हावे यासाठी तुम्हीच लक्ष दिले पाहिजे. आज समाज आपले तेज विसरून गेला आहे तो पुन्हा जागृत करणे हे तुमच्या हातात आहे. तुम्ही प्रत्यक्ष दुर्गेचा अंश आहात.आणि जेंव्हा जेंव्हा महिषासुर माजतात तेंव्हा दुर्गेलाच प्रसंगी शस्त्र हाती घ्यावे लागते...! तेंव्हा तुम्ही स्वतः आधी तेजस्वी बना आणि तुमच्या पुत्रालाही मग तेजस्वी बनवा.. !!" गावोगावच्या महिलांनी मग समर्थांना जर मदत केली नसती तरच नवल होते. महिलांनी त्यांचा सहभाग दिला नसता तर कदाचित समर्थांचे कार्य एवढे मोठे बनू शकले नसते हे निखळ सत्य आहे..!! समर्थ रामदासस्वामीनी महिलांना आपल्या कार्यात सक्रीय सहभाग घ्यायला प्रवृत्त केलेच पण त्यांना मानाची जागाही दिली.

त्याही पुढे जाऊन समर्थांनी जी गोष्ट केली ती तर त्या काळाच्या दृष्टीने खरोखरच क्रांतिकारी होती. काय केले समर्थांनी ? तर त्याकाळी अत्यंत खडतर जीवन जगणाऱ्या विधवेला पुन्हा प्रतिष्ठा मिळण्यासाठी केलेली कृती. एक तर मुलींची लहानपणी लग्ने होत. आणि सतत काही साथी वा आजारपणात जर त्यांचा नवरा मेला की मग आयुष्याचा जणू नरक बनून जाई. समर्थ रामदासांनी अशा विधवा स्त्रीला चक्क आपल्या शिष्य परिवारात घेतले.!! त्याकाळी याविरुद्ध किती गदारोळ झाला असेल आणि समर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांना किती छळ सोसावे लागले असतील याची कल्पनाच करवत नाही..!

मात्र "समर्थाचिया सेवका वक्र पाहे I असा सर्व भूमंडळी कोण आहे II" असे मानणारे समर्थ रामदास या सगळ्यांना पुरून उरले. त्यांच्या शिष्या झालेल्या या महिलांना त्यांनी थेट मठ सांभाळण्याची जबाबदारी देऊन टाकली. अक्काबाई, वेणाबाई अशा त्यांच्या शिष्यांनी ज्याप्रकारे उत्तम व्यवस्थापन करून दाखवले त्यामुळे समाजाचे मतपरिवर्तन होण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले..!

आजच्या आधुनिक व विज्ञानमयी काळातही स्त्रियांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात तर समर्थ रामदासांच्याकाळी असणारी अवस्था निश्चितच भयावह असणार. म्हणूनच ही कृती जगावेगळी होती असे म्हणावयास हवे. जगभरात आज गर्भ संस्कारापासून पुत्र संस्काराचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत जे बहुतांशी महिला वर्गाच्या हातात असतात. आणि कोणतीही स्त्री ही आधी एक आई असते त्यामुळे तिचे निसर्गतः कर्तव्य कोणते तर समाजाला तेजस्वी संतती द्यावी. हेच करण्यासाठी बहुदा समर्थ रामदास स्वामींनी हनुमंत भक्तीची वाट महिला वर्गाला दाखवली असावी. याच वाटेवरून अनेकांनी मार्गक्रमण केले असेल, ज्यामुळे तत्कालीन शिवछत्रपतींच्या राज्याला शेकडो मावळे मिळाले असतील असे मानायला हरकत नाही. आजपर्यंत महिला जी मारुती उपासना करतात त्याचे मूळ बहुदा या समर्थ रामदासस्वामींच्या शिकवणुकीत असावे असे मला वाटते.

म्हणूनच राष्ट्रहिताचे तेजस्वी विचार, "कष्टेवीण फळ नाही I कष्टेवीण राज्य नाही " असा प्रयत्नवाद समाजात रुजवणारे समर्थ रामदास आणि त्यांच्या कार्याला ज्यांनी पाठिंबा दिला अशा अनामिक शेकडो मायबहिणीना जागतिक महिलादिनाचे निमित्त साधत मनापासून नमस्कार..!!

---- सुधांशु नाईक, बहारीन (nsudha19@gmail.com)

3 comments:

  1. खूपच छान लिहिले आहे. अगदी मनापासून आवडले. असेच लिहित रहा.
    जय जय रघुवीर समर्थ

    ReplyDelete
  2. Mast lihile aahe. mala khup aavadle.
    जय जय रघुवीर समर्थ

    ReplyDelete
  3. सुंदर लिखाण आहे आवडले असेच लिहित जा.

    ReplyDelete