" सुचेल तसं " लेखमालेतील हा पुढचा लेख पंडित कुमार गंधर्व यांची आठवण म्हणून...
शिवपुत्र
सिद्धरामय्या कोमकलीमठ उर्फ पंडित कुमार गंधर्व..! ज्या माणसांना मी कधीही भेटलो
नाही, तरीही त्यांनी माझ्या
आयुष्यात प्रवेश केला आणि वर्षानुवर्षे ही मंडळी इथे ठाण मांडून बसली आहेत
त्यातीलच हे एक नाव !
शाळा कॉलेजच्या दिवसात डोक्यावर जुन्या हिंदी चित्रपट संगीताचं भूत सवार होतं. आमच्या बाबांच्या काळातील- थेट १९४५ पासूनची दुर्मिळ गाणी जमवणे, त्याचे संदर्भ, कात्रणे, फोटो गोळा करणे अशा उद्योगात दिवस मोठे मजेत जात होते. सोबत रेडिओ वर दिवसभर गाण्यांचा रतीब चालूच असायचा. विविध भारती, उर्दू सर्विस, रेडीओ सिलोन आणि आकाशवाणीची विविध लोकल केंद्रे इ. ठिकाणी कधी कोणता कार्यक्रम लागतो ते तोंडपाठच होतं. शास्त्रीय संगीत म्हणजे “लागा चुनरी मे दाग” टाईपची असंख्य गोड गाणी...हे समीकरण डोक्यात फिट्ट बसलेलं...त्यापलीकडे म्हणजे सगळी रडारड..! असा एक झकास गैरसमज मनात. त्यामुळे नाट्य संगीत, आणि रागदारी मैफिली यांकडे कधीही फिरकलो नाही..!
त्यामुळे मन्सूर, भीमसेन, कुमार गंधर्व आदि मंडळींशी सख्य जमायचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला पुलंच्या पुस्तकातून त्यांची व्यक्तिचित्रे तेवढी वाचली होती..पण तो आपला प्रांत नव्हे हे डोक्यात फिट्टच..!
या सगळ्याला प्रचंड धक्का बसला त्या रत्नागिरीतील एका मैफिलीमुळे..! आकाशात वीज चमकून जावी, त्या तेजस्वी प्रकाशात आपल्या ओळखीचा रोजचाच परिसर एकदम वेगळ्या प्रकारे झगमगून उठावा..आणि आपण फक्त थक्क होऊन ते पहात राहावं असं काहीसं झालं त्या दिवशी..!
पटवर्धन नावाच्या एका सुरेल गायकाची ती मराठी भावसंगीताची मैफल होती. आणि अचानक त्यांनी “सूरत पियाकी छिन बिसुराये..” आणि “लागी करजवा कटार..” सादर केलं. जाणवलं, अरेच्चा, हे काहीतरी फार वेगळच आहे. “लागा चुनरी मे” पेक्षा वरचढ आणि जास्त सुंदर आहे असा साक्षात्कार झाला..! मग हे गाणं कुणाचं वगैरे शोधाशोध.. त्यातून समजलं की ते वसंतराव देशपांडे. म्हणजे पुलंच्या पुस्तकातले ते हेच “वसंत खां..”..!
मग झपाटल्यासारखा त्यांचं कलेक्शन शोधून काढलं. अनेक नाट्यगीतप्रेमी मंडळीकडे ते मिळालंसुद्धा. आणि एक दिवस समजलं की वसंतराव सुद्धा काही दिवस कुमारजींकडे शिकत होते..!म्हणजे आपण ज्यांना “बाप” गायक समजतो त्यापेक्षा कुमारजी “बाप” गायक आहेत? तोपर्यंत कुमार गंधर्व म्हणजे “ऋणानुबंधाच्या..” आणि “सुनता है गुरु ज्ञानी” एवढंच माहित झालेलं.
मग म्हटलं बघूया..एकदा कुमारांचं काही ऐकून..नेमकं त्यावेळी माझ्या पहिल्या नोकरीतल्या पगारातून टेपरेकॉर्डर घेतलेला. मग कुमारांची “दुर्गा आणि अडाणा राग” एकत्र असलेली कॅसेट विकत घेतली. घरी आणून मोठ्या अपेक्षेने ऐकली...आणि खरं सांगतो, काही कळलंच नाही..! तिथून पुढे जवळ जवळ वर्षभर ती कॅसेट अक्षरशः पडून होती..!
इतर बहुतेक मंडळींसारखाच मीही एक.. “कुमार डोक्यावरून जातो” असं सांगत फिरत होतो. आणि मग एकदा “म्हारा रे गिरीधर गोपाल” कानी पडलं. पुन्हा चमकलो. आपण चुकतोय असं ठाम वाटून गेलं. मग एक केलं, कुमारांविषयी जे जे म्हणून प्रसिद्ध झालंय ते सगळं वाचून काढायला सुरुवात केली. रामकृष्ण बाक्रेंचा लेख, वसंत पोतदार, पंढरीनाथ कोल्हापुरे लिखित पुस्तकं, प्रत्यक्ष कुमारजींच्या चर्चा सत्रावरील “मुक्काम वाशी..” असं किती अन काहीही..त्यात कित्येक प्रतिकूल प्रतिक्रियासुद्धा.
मग “अनुपरागविलास” वाचून काढलं. या सगळ्यातून एक समजू लागलं, की कवी मनोवृत्तीच्या ह्या हळव्या माणसाने दुःखाचे पहाड कसे पचवलेत ते..! आणि धीरोदात्त बंडखोर माणसाप्रमाणे हा माणूस सगळ्यातून प्रचंड बंड करून उठलाय ! रागांच्या, घराण्यांच्या, परंपरेच्या कसल्याही भिंतींनी बंद करून टाकावं याच्या पल्याड पोचलाय...! तिथे आहे कबीराला, नाथ पंथीय साधूला जाणवलेली प्रचंड विराट पोकळी आणि आणि भरून उरणारे निखळ “शोकमग्न” सूर ! आणि मग झपाटल्यासारखं कुमारजींचं जे काही मिळेल ते गोळा करत सुटलो. अनेक जणांकडे त्यांच्याकडील खाजगी रेकॉर्डिंग द्यावं म्हणून याचना केली आणि बाजारात उपलब्ध सर्व रेकॉर्ड्स मिळविण्याची खटपट केली. पुण्यातील “अलूरकर”, डोंबिवलीचा “राहुल” ते फोर्ट मधील “ऱ्हिदम हाउस..” धुंडाळत गेलो. या सोबतीला कोल्हापूर-सांगली, मिरज आणि जिथे जिथे म्हणून जे दुकान सापडेल तिथं तिथं मिळणारी कॅसेट / सिडीज जमवत गेलो..!
एक काळ असा आला की घरात मी आलो की टेपवर फक्त कुमारांचीच रेकॉर्ड सुरु होत असे. बाकी जमवलेल्या शेकडो कॅसेट व सीडीज अक्षरशः अडगळीत पडल्या. कानामनात कायम कुमारांचं काही सुरु असायचं. पुढे कलापिनीताईंची ओळख झाली. देवासलाही जाऊन त्यांना व वसुंधरा ताईना भेटून आलो. तिथल्या टेकडीवरील मंदिरात जाऊन आलो. कलापिनी ताईंच्या काही मैफिली, “सवाई” मधील त्यांच्या गाण्यावर लिहिलंही “तरुण भारत” मध्ये. पण अजूनही खंत वाटत राहते की एकदा प्रत्यक्ष कुमारजी भेटायला हवे होते..! देवास मधल्या त्यांच्या त्या झोपाळ्यावर बसलेल्या कुमारजींच्या तोंडून काही ऐकायला पाहिजे होते..! काहीतरी हरवल्या सारखं वाटत राहतं... मग पुन्हा मी एखादी कॅसेट लावतो.. आणि मग मनामनांत भरून उरतात फक्त ते कारुण्यगर्भ सच्चे सूर..! स्वरास्वरातून ठिबकणारी ती वेदना..!
कुमारजींनी “शोक” हे टोपण नाव घेऊन बंदिशी रचल्या आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की हा करुण रस हाच कुमार-संगीताचा आत्मा आहे. त्यांनी आनंदी मूड अनेक वेळा सादर केलेतच. पण खरे कुमारजी भावतात त्या करुण रसप्रधान गायकीतून..किंवा निर्विकार निर्गुणी भजनातून.!
कधी तो शोकमग्न सूर “बिदेस जो गयो तुम, पतिया नही भेजी.. (पतिया वरची ती खास “कुमार टच” जागा..! म्हणजे शुध्द निखळ स्वरानंद..!) म्हणणारा विरहिणीचा “भवमत भैरव” असतो, तर कधी “नयन मे जल भर...” घेऊन येणारा “बिलासखानी” असतो. कधी “म्हारा रे गिरीधर “ म्हणत मीरेची आर्तता घेऊन येतो तर कधी एखाद्या कोकराची “बचाले मोरी मां” म्हणणारी व्याकूळ “मधुसुरजा” बनतो...!
साहिर असं म्हणूनच गेलाय, “है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सूर मे गाते है..!” इथे तर कुमारांचं अख्ख आयुष्य दुःख वेदना, वंचना अशा गोष्टीना ताठ कण्यानं सामोरे जात उभं राहिलेलं.
आपण सगळ्या मंडळींना
“विमा पौलिसी” विकण्यासाठी जाणारे कुमार” पासून “एक फुफ्फुस निकामी झालेले कुमार”
पर्यंत अनेक किस्से माहित असतात पण माहित नसते त्यामागे त्या व्यक्तीने झेललेली
वेदना. त्यांचं ओझं. कुमारांनी ही सगळी ओझी पेलली आणि आपल्या चाहत्यांना कधी त्याचा
मागमूस देखील लागू दिला नाही हे त्यांचं मोठेपण..! याचबरोबर त्या सगळ्या दुःखांचे
“ एकत्रीकरण” करून त्यांनी नवनिर्मिती घडवून आणली.
कुमारांचा सूर
“घाम परे..” म्हणत ऐन वैशाखातलं ते रणरणत ऊन आणि हताश शेतकरी समोर उभा करतो तर कधी
“श्याम बजाये बासूरिया...” म्हणत आपल्याला थेट गोकुळात नेऊन उभं करतो. कधी “नंद के
द्वारे भीड..” म्हणंत लगबग दाखवतो तर कधी “टेसुल बन फुले..” तून बहारदार पळस
फुलवतो. असं किती किती..! हे सगळं ऐकायला मग एक जन्म कमी आहे असं वाटू लागतं.
कुमारजी हे जसे
जन्मजात कलावंत होते तसेच सतत नव्या गोष्टींची आस घेऊन जगणारे विद्यार्थीही होते.
आणि विद्यार्थी असतानाच एक जागरूक शिक्षकही होते. म्हणूनच त्यांनी संगीतकलेचा
चौफेर अभ्यास केला. स्वतःभोवती कोणतेही कुंपण उभे न करता त्यांनी जसं नवं काही
आत्मसात केलं तसंच ते लोकांना सांगावं, त्यांनी समजून घ्यावं म्हणूनही प्रयत्न
केले. अर्थात म्हणून कुमारजी अत्यंत नर्मदिल होते असं मुळीच नव्हे. मात्र त्यांचं
संगीतातील वागणं-बोलणं खूप सरळ स्पष्ट होतं.
“माळव्यातलं
लोकसंगीत” “धूनउगम राग दर्शन” “गीत वर्षा” गीत हेमंत” सारखे सर्जनशील प्रयोग केले.
“मल्हार दर्शन” कल्याण दर्शन” सारखे राग वेगवेगळ्या angle ने उभे करून दाखवले.
प्रत्येक राग किती प्रकारे मांडता येतो, त्याचा कॅनव्हास किती मोठा आहे हे सहज
सोपं करून सागायचे प्रयत्न केले. अनेक वेळा उदंड कौतुक झालं तर अनेक प्रयोगांच्या
वाट्याला कठोर टीकाही आलीच. पण “जे जे आपणासी ठावे, ते ते दुसऱ्यासी सिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन...” असं
म्हणणाऱ्या रामदासांसारखे, कुमारजी लोकांना “संगीत” कसं शिकावं, कसं ऐकावं आणि काय
ऐकावं हे सांगत राहिले.
खरा कलावंत हा
कधीच कॉप्या करत नाही, मग फक्त संगीतात चांगली कॉपी म्हणजे चांगलं गाणं असे का ?
हे प्रश्न कुमारजींनी स्वतःला कायम विचारले आणि ते कायम नवं देत राहिले. बहुदा “मुक्काम वाशी..”च्या त्या चर्चा सत्रात कुमारजी म्हणतात, “ जर मी काल गायलेली बंदिश, तो राग आज तसाच गायलो तर माझं गाणं पुन्हा ऐकायचं कशाला? मला सतत नवे काही देता आले पाहिजे. प्रत्येक राग आणि त्यातील प्रत्येक सूर सतत काही नवं सांगत असतो, कलाकाराचा रोजचा मूड ही वेगळा असतो त्याप्रमाणे नवं काही दिलं पाहिजे. ज्या दिवशी कलावंत नवे काही देऊ शकत नाही तेंव्हा तो संपलाच..”
सततचे चिंतन, सततचा अभ्यास, डोळस भटकंती आणि सोबतीला कायम कसली ना कसली वेदना...! या सगळ्यांनी मिळून ते कुमार नामक रसायन सतत प्रयोगशील ठेवलं..! त्याहून महत्वाचं म्हणजे कुमारजींनी कायम पूर्णत्वाचा (perfection) ध्यास घेतला असं मला कायम जाणवतं. जे काही करायचं ते अप्रतिम व्हायला हवं, तिथे तडजोड आणि शोर्टकट नाहीत. मग साधा तानपुरा जुळवणे असो की एखादी बंदिश घडवणे असो, कुमारजी कायम perfect आहेत असेच जाणवते. अर्थात त्यांचे आयुष्य जवळून पाहिलेली मंडळीच याविषयी माझ्यापेक्षा जास्त भाष्य करू शकतील.
जेंव्हा माणूस आयुष्यात बरंच काही भोगतो, तेंव्हा त्या सुख-दुःखांची, अपमानाची, वेदनेची पुढची पायरीच माणसाला अध्यात्माचे दर्शन घडवते. म्हणून दुष्काळ भोगलेला एखादा “तुकाराम” बनतो तर अपमान भोगलेला एखादा “तुलसीदास”, दुःखाचे प्याले मीरेला अधिक महान बनवत जातात तर वर्षानुवर्षे अंधाराची सवय असलेला आंधळा “ सूरदास” जगाला प्रकाश देत जगून दाखवतो.
कुमारांचं अध्यात्मही स्वरांची अंगडी टोपडी घालून आलं. आणि त्यानं लोकांना “निर्गुणी भजनाच्या” स्वर्गाचे दारच उघडून दिलं. कुमारांनी करून दिलेलं कबीराचे, नाथ पंथीय साधूचे दर्शन थक्क करणारं आहे.
कालिदास मोहोळकर उर्फ भाऊकाका नावाचे माझे एक वृद्ध मित्र होते कोल्हापुरात असताना. ते ऐशीपलीकडे पोचलेले आणि मी तिशीतला. पण आमच्या मैत्रीचा समान दुवा म्हणजे वाचन आणि संगीत त्यातही विशेषतः कुमार-गायकी. माझ्या टू-व्हीलरवर बसून आम्ही फिरायचो. एकत्र जाऊन अनेक मैफिली, कार्यक्रम ऐकायचो. ते माझ्याकडे निव्वळ काहीतरी ऐकायला म्हणून येऊन राहायचे. ते पूर्वी हैदराबादला होते आणि तेंव्हापासून कुमारजींचं आणि त्यांचं सख्य. देवासला ते राहूनही आलेले. ते एकदा एका मैफिलीचा किस्सा सांगत होते,
“त्या दिवशी मैफल
मोठी जबरदस्त रंगली होती. मधुसुरजा आणि शुध्द सारंगमधून कुमारांनी ते टळटळीत
दुपारचं ऊन आणि वेदना जिवंत केली होती. समारोपाला “अवधूता..गगन घटा गहराई..” झालं.
कार्यक्रम संपला तरी सगळे स्तब्ध बसलेले..कुमारजी ही शांत. मग हळूहळू त्यांना
स्टेज मागे आणलं. डोळे तुडूंब डबडबलेले. मी फक्त त्यांचा हात हातात घेतला. क्षणात
ते ढसढसा रडू लागले.. म्हणाले.. “हा कबीर..आम्हाला संपूर्ण नागडा करून
टाकतो..त्याच्यापासून काही लपवता येत नाही. इथे उरात इतकं दुःख साठलंय की कधी
फुटून जाईन असं वाटतं मोहोळकर..! मी गातो तेंव्हा मला तुम्ही लोक समोर काय दाद
देता त्याचं फारसं भान नसतं, मीच आयुष्यात भोगलेलं काहीतरी उरातून तीव्रपणे उफाळून
येतं..कधी ते सुख-दुःखच तीव्र मध्यम बनून जातं तर कधी जीवघेणा कोमल धैवत..! आपलं
आयुष्य विसरता विसरत नाही. पण हा कबीर सगळ्याच्या पार पोचलेला. त्याचं ते
निस्संगपण अंगात भिनायला फार कष्ट पडतात हो..!”
तरीही कुमारांनी
ते अध्यात्म, ते निस्संगपण सुरातून अखंड उभं करून दाखवलं असं मला वाटतं.
कर्मकांडात, पूजापाठात अडकलेलं आपलं अध्यात्म खरं नाही हे कबीर जितक्या परखडपणे
किंवा प्रसंगी उद्दामपणे सांगतो, तसंच कुमारांचे निर्गुणी भजनही.कुमारांसारखे कलावंत ही देवाची देणगी असतेच पण त्यात त्यांचं कर्तृत्व ही आभाळाइतकं असतंच.
मे महिन्यातल्या कडक उन्हात जीव तगमगून गेलेला असतो. अशातच अचानक क्षितिजावर भराभर ढग गोळा होतात. आपल्यावर चाल करून येऊ लागतात. आयुष्यातील संकटही अशीच असतात. पण एखादा कबीर, एखादा तुकाराम पळ काढण्याऐवजी थेट त्या ढगांकडेच ताठ मानेने चालत जाऊ लागतो..आणि ते चित्र जिवंत करत जीवघेण्या स्वरात कुमारजी गात असतात,
“पच्छिम दिशा से..उलटी बादली..रुमझुम बरसे मेघा..अवधूता...गगन घटा गहराई...”
कलावंत हा कधीच
मरत नसतो. कारण त्याचा संघर्ष, त्याचं जीवन, त्याची सुखं-दुःखं ही विश्वव्यापी
असतात. “more and more you write personal, more and more it becomes universal..”
असं इंग्रजीत कुणीसं लिहून गेलं आहे. लेखकासाठी ही भावना म्हणजे तो कागद असतो,
चित्रकारासाठी त्याचे रंग बनतात तर कुमारजीसारख्या गायकासाठी आयुष्य हे रागदारी
आणि बंदिशी बनून जातात. त्याची किंमत करताच येत नाही, ती अनमोलच असते.
कलावंताचे आयुष्य
संपले तरी कलावंत आणि त्याची कला संपत नाही. एकोणनव्वद वर्षापूर्वी एप्रिल १९२४
मध्ये जन्मलेले कुमारजी म्हणूनच निस्संग स्वरात वर्षानुवर्षे गातच राहणार...
“भोला, मन
जाने...अमर मेरी काया..”
आपण फक्त भारावल्या
मनानं, भरून येणाऱ्या डोळ्यांना अडवत ऐकत राहायचं...! माझं आणि कुमारजींचं नातं हे असं आहे..त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेलं..माझ्या अखेरीपर्यंत टिकणारं...!
No comments:
Post a Comment