marathi blog vishwa

Thursday, 9 May 2013

भातुकलीच्या खेळामधले...


सुचेल तसं ही लेखमाला सुरु केली आणि आजवर लेखांना सर्वांनी छान प्रतिसाद दिला. त्याच लेखमालेतील हा पुढचा अकरावा लेख म्हणजे एक दीर्घकथा.
----------
तो आणि ती. एकाच ऑफिस मध्ये काम करायचे. तसे एकमेकांना परिचित. पण खरी ओळख ऑफिस मध्येच झालेली. तसं पाहिलं तर दोघांची कामे वेगळी वेगळी. दोघांची क्युबिकल सुद्धा जरा दूरच. पण झाली दोस्ती. ग्रुपमध्ये एकत्र गप्पा होत असंत.
तो जरा जास्त बेधडक. कुणाची पर्वा न करता आपल्या मस्तीत आणि तंद्रीत जगणारा. अमाप उत्साही. त्याला अनेक गोष्टीत रस आणि पूर्ण निर्व्यसनी. तो घराबाहेर, गावाबाहेर भटकत राहणारा. ती थोडी गंभीर. शांत शांत. किंचित उदास सुद्धा. आपण आणि आपलं काम इतकंच पाहणारी. ऑफिस व्यतिरिक्तचा वेळ घरात घालवताना कधीमध्ये मैत्रिणीत रमलेली.

एक दिवस तो चहाचा कप घेऊन आपल्या डेस्ककडे निघाला होता. वाटेत तिच्याकडे लक्ष गेलं. खिडकीबाहेर दूर कुठेतरी नजर लावून ती गप्प गप्प एकटीच बसलेली.

ए, कसला विचार करतेयस? आणि अशी उदास का? काही प्रॉब्लेम ?

अचानक जवळ त्याचा आवाज ऐकून ती चपापली. उसनं हसत म्हणाली;
छे रे, कुठं काय? जरा कंटाळा आलावता इतकंच.

माझ्यापासून कशाला लपवतेयस. सांगायचं नसलं तर राहू दे..

अरे, चिडतोस काय असा ? आणि मी काय सगळ्यांना सांगत फिरु का, पाहायला आलेल्या अजून एका मुलाने काल मला नाकारलं म्हणून? तुम्हा मुलांना काय जातं रें फट्कन “नाही” म्हणून मुलगी नापसंत करायला. तेही चांगला महिनाभर वेळ घेऊन. गरजवंताला अक्कल नसते ना? आणि उत्तर दिलं तेही कधी तर दहा वेळा माझ्या बाबांनी त्यांना उत्तर द्या म्हणून विनवलं तेंव्हा !

अगं, इतकं काय मनाला लावून घेतेयस ? एक नाही म्हणाला तर उद्या दुसरा येईल. त्याचं नशीब वाईट असं समज ना..

येईल ना दुसरा मुलगा, पण त्या नकाराचं ओझं तुला कसं कळणार? अशा लोकांना खरी अपेक्षा असते पैशांची. मात्र तोंडदेखलं सांगायचं काय तर म्हणे मुलीची उंची कमी आहे, तिचं शिक्षण जास्त आहे...असं काही थातुरमातुर! तुम्हाला माहिती कळवली होती तेंव्हा कळली नव्हती का उंची ?? जाऊ दे रे.. आम्हा मुलींची दुःखं तुम्हाला काय कळणार? आयुष्यातलं सुख नाहीतरी कधी मिळालं नव्हतंच..कशाला उगाच अपेक्षा?

रागाने ती पुन्हा आपल्या कॉम्पुटरकडे वळली. तोही निघून गेला..
काही दिवस असेच गेले. ती पुन्हा मोकळेपणाने बोलू वागू लागली.

एक दिवस अचानक तो तिच्याकडे आला. तिच्याशी बोलत बसला. म्हणाला;
मला तुला एक प्रश्न विचारायचाय? चालेल का विचारलं तर?

अरे विचार ना? उगीच प्रस्तावना कशाला?
नाही गं, जरा वेगळा प्रश्न आहे. तू “हो” असं उत्तर देणार असशील तरच विचारेन..

अरे वा , ही काय जबरदस्ती? काहीच माहिती नाही आणि मी हो का म्हणून म्हणायचं?

तिची शेजारची मैत्रीणसुद्धा अर्थपूर्ण हसत म्हणाली,” अगं, त्यात काय विचार करायचा? हो म्हणून टाक.”
तू गप गं. तुला काय माहीत.. हा प्राणी काय शहाणा थोडाच आहे ? मागेल १० हजार रुपये..आणि का तर म्हणे कुण्या संस्थेला दान देऊया म्हणून..”

ठीक आहे. जातो मी..तुझा नाही ना भरवसा माझ्यावर..
आणि ताडताड उठून तो गेला सुद्धा.. “अरे थांब, ऐक तर माझं..” तिचं वाक्य पूर्ण व्ह्यायचीसुद्धा वाट न बघता.

तेव्हढ्यात तिच्याकडेही कुणीतरी काम घेऊन आले आणि तीही कामात गुरफटली. सगळं विसरूनच गेली.
संध्याकाळी चहा पिताना तिच्या लक्षात आलं की तो कुठे दिसत नाहीये. तिने त्याच्या शेजारच्या सहकाऱ्याजवळ जात चौकशी केली..

घरी काम आहे असं सांगून गेलाय दुपारीच तो..
ती गप्प आपल्या जागेवर परतली. नंतर दोन दिवस तो आलाच नाही ऑफिस मध्ये. मग रविवारची सुट्टी. थेट सोमवारी दोघं ऑफिसच्या दारातच सकाळी भेटले.

गुड मॉर्निंग, अरे कुठे गायब झाला होतास? कुणाला काही सांगितलं पण नाहीस?

“तुला कशाला हव्यात चौकश्या?” मी कुठेही जाईन. तुझी परवानगी घ्यायला पाहिजे काय?उगाच कटकट करू नको.” त्याचं  फट्कन कडवट बोलणं.

“अरे, भारीच आहेस रे..तू अचानक गायब झालास. कोणालाच काही ठाऊक नाही. काळजी वाटली म्हणून विचारलं तर एवढा का चिडतोयस. जाऊ दे. सकाळ सकाळी कशाला उगाच मूड खराब करूया..

मी कुठे करतोय तुझा मूड खराब? मी आपला निघालो होतो माझं काम करायला..

बरे बाबा. मीच चुकले..जा आता नीट शांत होऊन. नीट काम कर जरा. नाहीतर उगाच चिडचिड करत बसशील?
हो न, जणू काय मला अक्कल नाही, कुणावर चिडायचं कुणावर नाही, समजत नाही..असंच न?

तो निघून गेला.
काही तासाने चहाचा कप घेऊन ती त्याच्याकडे गेली. सोबत डब्यातलं छान थालीपीठ. त्याला आवडतं हे माहिती असल्यामुळेच..!

हे घे. आज मी स्वतः करून आणलंय..

नकोय मला. भूक नाहीये.

तू किती वेडा आहेस रे..चिडका बिब्बा कुठला..बोल नं काय झालंय? का असा वागतोयस?

मला प्रश्न नकोयत. द्यायचं असलं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.

“ओह हो..म्हणजे स्वारी म्हणून चिडली आहे तर..!” आता कुठे तिच्या डोक्यात प्रकाश पडला..!
 
तरी त्याची जरा खेचावी म्हणून ती म्हणाली, पण हिंट दे ना काहीतरी.. किंवा विषयाचा रेफरन्स? काय विचारणार आहेस ते..

माझ्यावर भरवसा असेल तर ..”हो” म्हण..नाहीतर गेलीस उडत..!

गेलीस उडत काय? ही काय बोलायची पद्धत? ठीक आहे बाबा..”हो”.

असं नको. मनापासून म्हण.

म्हणजे मनापासून आणि मनाविरुद्धचं “हो” काही वेगळ असतं का? तुझं पण आपलं कायतरीच..
अर्थात वेगळच आहे.. समजा तुला भूक नाहीये, आणि घरात कुणी म्हणालं, चल पट्कन जेवायला. तर तू कशी मनाविरुद्ध हो म्हणतेस, म्हणतेस ना? तेच जर दुपारच्या उन्हात मुलं खेळत असताना, तो “गारेगार” वाला रस्त्यावरून जात असतो. मुलांचं सगळं लक्ष त्याच्याकडे असतं...पण त्यांना आईस्क्रीम नाही घेता येत. इतक्यात घरातला एखादा काका अचानक विचारतो, “मुलांनो, पाहिजे का आईस्क्रीम? मग मुलं जसं “हो” म्हणतात ना ते खरं “हो” मनापासूनचं.

किती छान बोलतोस रे तू.. असं म्हणत पट्कन तिनं त्याचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात डोळे रोखून पाहत म्हणाली..”तुझ्या प्रश्नाचं उत्तर “हो...!”

एखाद्या पावसाळी संध्याकाळी त्या क्षीण उजेडात रानातलं एखादं झाड काजव्यांनी झगमगून उठावं तसा क्षणात त्याचा चेहरा उजळला.

खरंच सांगतेयस ना ? अगदी मनापासून..? नंतर शब्द नाहीस न बदलणार?
अगदी अगदी मनापासून. आता तरी सांग काय हवंय ते..

येत्या वीकएन्डला सकाळी ७ वाजता घराजवळ तयार राहा. एके ठिकाणी जायचंय आपल्याला.

बाळा, मी सुटीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत उठत नाही हे माहीत नाही का तुला? मग मी कशी येईन ?

मग उठ ना सकाळी ६ वाजता. त्यात काय विशेष? काहीच अवघड नाहीये. आणि तू आताच म्हणालीयस “हो” म्हणून..! आता सगळं ऐकणार आहेस माझं.

म्हणजे आता मी सकाळी कधी उठावं, काय करावं हे तू डिक्ट्टेट करणार की काय? पण कुठे जायचंय ते तर सांग न?

ते आताच नाही सांगणार. एक दिवस आधी सांगेन. आणि जर या वीकेन्डला नाही जमलं तर पुढच्या वीकेन्डला जावं लागेल.

ए उगाच सस्पेन्स नको रे, मला आठवडाभर विचार करावा लागेल..

म्हणून तर मुद्दाम आता सांगतोय ना..बघू तू किती विचार करू शकतेस ते..

नंतर रोज ती त्याला विचारत राहिली. पण तो निगरगट्टपणे न सांगता गप्प राहिला. शुक्रवारी प्रचंड पाऊस कोसळला. बऱ्याच जणांनी दांडी मारली. मात्र ऑफिसमध्ये येताच तो उत्साहाने निथळत आला..

जायचं आपण निश्चित..उद्या...आपल्या बरोबर आणखी ३-४ जण असतील. रविवारी दुपारी परत यायचं.
अरे पण आता तरी सांग कुठे जायचंय?

एका अप्रतिम ट्रेकला नेणारेय मी तुला..इथल्या जवळच्याच गडावर.. तिथला निसर्ग मुसळधार पावसातच पाहण्यासारखा आहे. ते पाहिलंस ना मग समजेल तुला खरा आनंद कसा मिळतो ते. नीट शिकशील मग जगायला..

ए हिरो, मला काही ते डोंगरातून चालणंबिलणं नाही हं जमणार..

एक शब्द बोलू नकोस. तू “हो” म्हणाली आहेस. तुला माझं ऐकावं लागेलच. आणि तुला काही होणार नाही याची जबाबदारी माझी.

शेवटी तिची पूर्ण संमती घेऊन आणि तिला सोबत घ्यायच्या वस्तूंची यादी देऊन तो निघून गेला. तिनं जेंव्हा मैत्रीणीना व घरी सांगितलं तेंव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आयुष्यात पहिल्यांदा ती कुठे तरी असं काही फिरायला निघाली होती; तीही एकटी..! मैत्रिणीने तर चेष्टाच केली.. “ हं..तिथं बहुदा एक नवी जोडी लग्नाच्या मांडवातून जायला तयार होणार..!”

मात्र तसं काही होणार नाही याची खात्री बाळगत ती रात्री झोपून गेली आणि कुणीही न उठवता पहिल्यांदा आपणहून उठली सकाळी सहा वाजता !

ठरल्याप्रमाणे तो आणि त्याचे ३ मित्र आणि त्यांची एक ट्रेकवाली मैत्रीण सोबत आले. सगळे मिळून गडवाटेवर निघाले.

त्याने त्या सोबतच्या मैत्रिणी कडे “तिला” सोपवलं आणि आपण सगळ्यात पुढे चालू लागला. तिला अस्सा राग आला त्याचा.
पण ती मैत्रीण म्हणाली,
तो असाच आहे. तो नेहमीच सगळ्यात पुढे चालत जायचा प्रयत्न करतो. येऊ शकणारे सगळे धोके आपण पहिल्यांदा  अंगावर घ्यावेत असं वाटतं त्याला. आणि त्याला कोणाच्या मागून तर चालताच येत नाही. एकदोनदा मस्त धपकन पडला होता तो..

अगं, पण इथे माझी तुम्हा कुणाशी ओळख नाही. हा मला स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन आला आणि आता बघ थेट माझी जबाबदारी तुझ्यावर ढकलून कसा पुढे गेलाय तो..
इतक्यात पुढून त्याची हाक ऐकू आली. “सगळे लवकर या..इथं.पट्कन..धावत धावत..

तिथे जाऊन पाहतात तो समोर सापाच्या एका जोडीचं प्रणयनृत्य सुरु होतं आणि हा जवळून त्याचे फोटो काढत होता...!
थक्क होऊन ती सगळीजण पुढचे १५-२० मिनिटं ते दृश्य पाहत राहिले. मग दोन्ही साप निघून गेल्यावर तो म्हणाला;

कोकणी भाषेत यांना दिवड म्हणतात. पाण्यातला तो पाणदिवड. मी गेली १० वर्षं भटकतोय डोंगरातून. पण आज पहिल्यांदा हे असं पाहायला मिळालं..याचं क्रेडीट “तिला”..तिचा पायगुण छान आहे. आज असंच आपल्याला नवनवे काही पाहायला मिळणार..!

थोडे पुढे जातात तोवर सगळीकडून अंधारून आलं. आणि धो धो पाऊस कोसळू लागला. रेनकोट काढून घालेपर्यंत सगळे निम्मे भिजून गेले होते. तो मात्र चिंब भिजत बिना रेनकोटचा पुढे चालत होता.

अधून मधून हे पहा, ते पहा, जरा विश्रांती घ्या, काहीतरी खाऊन घ्या असं करत करत त्यांनी जवळ जवळ २-३ तास तंगडतोड केली. कितीतरी नवी रानफुलं, बुरशी फुलं (ज्याला आपण कुत्राची छत्री म्हणतो..!) तो सगळ्यांना दाखवत होता. प्रत्येक चांगली गोष्ट दुसऱ्याला दाखवायचा त्याचा हा नेहमीचा आटापिटा. मग दूरवर गडाचा बुरुज दिसू लागला. ते एका पठारावर पोचले होते आणि समोर तो उंच बुरुज आकाशात घुसलेला होता.

पाऊस थांबल्याने आकाश स्वच्छ झालं होतं. दूरवरून ढग आणि धुकं हळू हळू आसमंत वेढत पुढे सरकत होतं. तो तिथल्या दरीच्या काठी एका दगडावर बसून एकटक त्या गडाकडे पहात होता..समाधी लागल्यासारखा..!
थंडगार हवा, सर्वत्र पसरलेले हिरवाईचे गालिचे, गड ज्या डोंगरावर होता तिथून पाझरणारे शेकडो छोटे निर्झर, निळं सावळं 

आकाश आणि एका झाडाखाली दूर नजर लावून बसलेला तो. तीही समाधी लागल्यासारखी पाहत राहिली त्याच्याकडे..!
आणि तिला कविता सुचली. धावत ती त्याच्याकडे गेली त्याला कवितेचा मुखडा ऐकवू लागली...

निळ्या नभात धुक्याचं हळुवार पसरणं , हिरव्या गवतावर दवबिंदुचं थरथरणं
भान विसरून पाहताना हे सारं, माझं त्यात विरघळून जाणं...

आयुष्यात कधी भोगलेच नव्हते आनंदाचे असे क्षण.. होती फक्त वेदना आणि नुसते व्रण
                        अनुभवताना ही रम्य वेळा, इथेच यावं मजला मरण...

लहान मुलासारखी तिची अधीरता, तो निर्व्याज आनंद पाहून तो सुखावला. त्याने फक्त “शेवटचे शब्द बदल” म्हणून दुसरे शब्द सुचवले;
अनुभवण्या आनंद असा, पुन्हा पुन्हा मिळावं मला जीवन..

बघ, किती छान वाटतंय न इथं. आपला देश खरंच खूप सुंदर आहे. इथे जन्म मिळायला भाग्य लागतं. दुर्दैवाने आपण आपल्या जीवनातून निसर्गाला वगळून टाकत पुढे धावतोय. थकतो, हरतो, हताश होतो. पण असं घराबाहेर पडलं ना की मग पुन्हा जगण्याला उभारी येते..पुन्हा पुन्हा जगावंसं वाटू लागतं.

बोलत बोलत ते सगळे गड माथ्यावर पोचले. एव्हाना पाऊस पूर्ण थांबला होता. आणि छान सूर्यप्रकाशात गडावरचे अवशेष वेगळ्याच तजेल्याने लकाकत होते. मग जेवताना तो खूप बोलत राहिला. गडाचा इतिहास, इथं जवळपास झालेली  युध्द असं खूप काही.

तिला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं की याला हे सगळं कसं काय माहीत? आणि याला असं कायकाय माहीत आहे हेच तिला नव्याने कळत होतं. जगात किती नव्या गोष्टी अनुभवत आयुष्याचा “मझा” घेता येतो हे उमगत होतं.
रात्री सगळे जण गुहेत जेवून गप्पा मारत बसले. त्यानं त्याच्या काही कविता मेणबत्तीच्या उजेडात वाचून दाखवल्या. त्याच्या मित्रानं “अंतू बर्वा” सादर करून सगळ्यांना मनमुराद हसवलं. मग ती दुसरी मैत्रीण गाऊ लागली;

कुछ ना कहो..कुछ भी ना कहो..
क्या कहना है, क्या सुनना है, सबको पता है,

समय का ये पल थमसा गया है..और इस पल में कोई नही है
बस एक मै हुं बस एक तुम हो..!!

त्या भावविभोर वातावरणात तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या हातात गुंफले गेले होते..

रात्री मग गुहेतल्या एका कोपऱ्यात मुलं आणि दुसऱ्या कोपऱ्यात त्या दोघींनी आपली अंथरूणं टाकली. मेणबत्तीच्या उजेडात थकलेले सगळे हळूहळू झोपेच्या आधीन झाले. ती दूर पलीकडे शांत झोपलेल्या त्याच्याकडे कितीतरी वेळ समाधानाने पाहत होती...

दुसऱ्या दिवशी परतताना वाटेत त्यानं सगळ्यांना एका आडवाटेवर नेलं.

कुठे नेतोयस रे सगळ्यांना?
मित्राच्या प्रश्नावर तो म्हणाला; “फक्त १५ मिनिटं चालायचय. एक भारी गंमत दाखवतो..”

पुढे जंगल दाट होत गेलं. झाडाझुडपातून वाट काढत ते पुढे गेले आणि एका वळणावर समोर ते अद्भुत दृश्य होतं.
एक भलामोठा धबधबा, कड्याच्या टोकावरून दोन तीन हजार फूट खालच्या दरीत कोसळत होता. तो नाद, हिरवाई च्या पार्श्वभूमी वर तो स्वच्छ धबधबा, ते निळे सावळे डोंगर आणि निःशब्द शांतता..!


सगळे जण स्तंभित होऊन ते सुंदर पण रौद्र रूप पाहत राहिले. बऱ्याच वेळाने भानावर येत तो म्हणाला,
बघ, तो पाण्याच्या प्रवाह, खालच्या दरीत कोसळायच हे माहीत असूनही कसं मनसोक्त जगतोय. आयुष्यात दुःख, मरण सर्वांनाच येणार आहे. पण त्याला हसत हसत सामोरं गेलं तरच असे पाहणारे कौतुक करतात. आणि म्हणूनच आयुष्याचा प्रत्येक क्षण मनसोक्त जग. किमान एकतरी छंदात स्वतःला गुंतवून घे.कसलीही अपेक्षा न ठेवता..!

तिने त्याचे हात हातात घेतले.
ती म्हणाली; “तुझे कसे आभार मानू? मी आयुष्याला फार कंटाळले होते रे . पण आज तू मला अजून पुढे किती तरी दिवस पुरेल इतकी उर्जा मिळवून दिलीस. इतके दिवस तू खूप काही सांगायचास, पण मी कधी मनापासून ऐकलंच नव्हतं. आता मी बदलेन स्वतःला..” आणि ती हात सोडवून घेत पुन्हा त्याच्या बरोबर चालू लागली.

ती बदलली. खूप बदलली. पुस्तकं वाचू लागली. गाणी ऐकू लागली. अगदी घरात काम करणाऱ्या मोलकरणीशी सुद्धा प्रेमाने वागू लागली.
तिच्यातला बदल सगळ्यांना जाणवला. एखादं कोमेजून जाणारे रोपटे अचानक पुन्हा बहरू लागावं तशी बदलली ती.

तो मात्र तसाच होता. आपल्याच्या मस्तीत..आपल्याच तंद्रीत. नाही म्हणायला हल्ली नवी कविता सुचली तर तिच्याशी शेअर करत होता. नेहमी एकलकोंडा राहणारा तो आता फक्त मनसोक्त बोलत होता.
----------------

मध्ये थोडे दिवस गेले. एकदा तो तिच्या टेबलजवळ येऊन बसला होता. काहीच न बोलता. खूप अस्वस्थ होता.
कसला विचार करतोयस? उगाच घुम्यासारखा बसू नकोस. पट्कन बोल बघू.

उद्या घरातून पळून जायचं ठरवतोय...
काय? अरे मूर्ख आहेस का तू? एवढा दुनियेला शहाणपणा शिकवत फिरतोस, आणि असं कसं मुर्खासारखा बोलतोयस तू?

मग काय करू? उद्या मला दाखवायला मुलगी आणणार आहेत. मला नाही करायचं लग्न. सांगितलं तरी ऐकत नाहीत घरातले. मी असा वेडा आहे, स्वच्छंदी..भटका..माझ्याने संसार नाही होणार नीट. कशाला उगाच एखाद्या मुलीचं आयुष्य माझ्यासाठी बरबाद करू? आणि आजवर मी कुणालाच “नाही” म्हणू शकलो नाही. नशिबाने आधी मुलींनीच मला नाकारलं होतं नोकरी चांगली नाही म्हणून..! त्यापेक्षा मी उद्या पहाटे कुठेतरी पळून गडावर जातो. मग येईन रात्री परत..
हे बघ, तुला माझी शपथ आहे..तू उद्या कुठेही जाणार नाहीस घराबाहेर..अरे, एकतर आता त्या मुलीला घरी बोलावलेय न.. मग तिच्या मनाचा तरी विचार कर ना..ती बिचारी किती स्वप्न उराशी बाळगून तुमच्या घरी येणार. आणि दिसणार काय तर नवरा होऊ शकेल तो मुलगा चक्क घरातून पळून गेलाय..काय वाटेल तिला? ते काही नाही. तू उद्या घरीच थांबशील. आणि तू कुठे गेला नाहीस याची खात्री करून घ्यायला मी फोन करेन..

प्लीज शपथ नको गं घालूस..मला जाऊ दे..
मुळीच नाही..आणि जास्त विचार करू नको. मुलगी चांगली असली तर तुझं भलंच होईल ना?

त्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती. तेच घडलं. चक्क मुलीनं त्याला पसंत केलं. लग्न ४ महिन्यांनी करायचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी सुट्टी असूनही दोघे ऑफिसमध्ये जाणार होते. दोघांचीही नेमकी कामे होती म्हणून. शक्यतो तो कधी जायचा नाही सुट्टीच्या दिवशी ऑफिसला. पण त्याचा साहेबच येणार होता, मग त्याचा नाईलाज झाला. काम उरकून मग तो तिला भेटायला तिच्या डेस्ककडे गेला. अत्यंत आनंदाने ती त्याचं अभिनंदन करताना त्याचे डोळे मात्र पाण्याने भरले.

ए, अरे रडतोस काय? इतके दिवस एकटा भटकत होतास? आता छान जोडीदार मिळेल न तुला?? मग..
“तू मला फसवू नकोस. उगाच आनंद झाल्याचं नको दाखवूस. तुझं माझ्यावर प्रेम आहे हे मला माहीत आहे. मलाही तू आवडली होतीस..पण माझ्या नशिबात नाही कुणाचं निखळ प्रेम. म्हणून मीच तुला थोड्या अंतरावर ठेवत राहिलोय आजपर्यंत..”

हसता हसता तिचे डोळेही पाण्याने भरले. स्वतःला सावरत ती म्हणाली,
“माहितेय ते मला. आणि तुझ्यावर प्रेम आहे म्हणूनच तुझं भलं होत असेल तर मी का आनंद साजरा करू नये ? आज तुझ्यामुळे मला आयुष्याचा अर्थ जाणवला. मी पुन्हा भरभरून जगायला शिकतेय. एका ट्रेकग्रुप बरोबर ४-५ ट्रेक सुद्धा केले. किती पुस्तकं वाचली गेल्या ४-५ महिन्यात. हे सगळं आनंददायी आहे हे ठाऊक होतं पण कळत नव्हतं रे. ते तुझ्यामुळे समजलं. आणि तू किती बदललायस ते तुलाही कळतय का? हल्ली तू ऑफिस मध्ये सगळ्यांना किमान गुड मॉर्निंग म्हणत जातोस..पूर्वी कोणाकडे पहायचाही नाहीस. कुणाला काही मदत लागली तर धावत जातोसच, पण हल्ली इतरांशी चार शब्द प्रेमाने बोलतोस सुद्धा..! आता फक्त एक गोष्ट मागते तुझ्याकडे..पुढचे चार महिने तू पूर्वी सारखाच वागत राहा..तुझं लग्न होईपर्यंत..! दादरच्या प्लाट्फोर्मवर जशा वेस्टर्न आणि सेन्ट्रल रेल्वे जवळ येतात ना..तसंच आपलं आयुष्यही..पुन्हा आपापल्या मार्गानं जाताना क्षणभरासाठी एकत्र आलेली आपण दोघं...”

हे चक्क तू बोलतेयस..?
तुझ्या संगतीचा परिणाम..म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला..वाण नाही पण गुण लागला..” आणि ती प्रसन्नपणे हसली..आणि पट्कन पुढे होत त्यानं तिचा हात हातात घेत त्याचं चुंबन घेतलं.

मी फक्त इतकंच देऊ शकतो तुला..तू केलेल्या निर्व्याज प्रेमाची परतफेड नाही करता येणार मला..” पुन्हा त्याचे डोळे पाण्याने भरले...
ए वेडू, गप, वेडा कुठला.. डोळे पूस आधी. परतफेडीची कसली भाषा करतोयस.. उलट मीच तुझी खूप ऋणी आहे. तू खूप मोठा माणूस होशील इतकं मला निश्चित ठाऊक आहे. फक्त तू निसर्गावर जसं प्रेम करतोस न तसं माणसांवरही प्रेम कर. आणि महत्वाचं म्हणजे मला विसरून जा या चार महिन्यानंतर. या चार महिन्यात आपण दोघेही एकमेकांशिवाय रहायची सवय करून घेऊ हळूहळू..कठीण आहे..पण जमवूया..नाहीतरी आपलं सगळंच वेगळं होतं. न तू कधी मला प्रपोज केलंस न मी तुला..कारण एखाद्यावर प्रेम आहे हे कधी सांगावं लागतं का?? ते समजावं लागतं. आणि ते तुला मला समजलं होतंच. आपल्याला हेही माहीत होतं की आपण काही तासांचे सोबती आहोत, मग तूच सांगतोस तसं ते चार तास आपण मजेत घालवले याचा आनंद नको का मानायला..? अर्थात हे सगळं कठीण आहे रे खूप ..खूप..पण तू जो आत्मविश्वास दिलायस ना त्याच्या बळावर मी सावरेन स्वतःला....”

आणि त्याच्या ओठी फक्त गाण्याचे बोल आले;
तिला विचारी राजा का हे जीव असे जोडावे, का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी केविलवाणी...अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..!

भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत दोघेजण हातात हात गुंफून बसून राहिले..किती तरी वेळ..

(टीप:- ही काल्पनिक कहाणी कुणाला स्वतःची वाटल्यास तो एक सुंदर योगायोग समजावा ही विनंती.)
- सुधांशु ाईक, (nsudha19@gmail.com)


1 comment: