marathi blog vishwa

Thursday, 26 December 2013

“दुरितांचे तिमिर जाओ..”

सुचेल तसं – लेखमालेतला या वर्षातला हा शेवटचा लेख..!

“दुरितांचे तिमिर जाओ..”
आज सकाळी CNN –HEROs हा कार्यक्रम पहात होतो. जगभरात कार्यरत असणाऱ्या खऱ्या-खुऱ्या समाजसेवकांना निवडून त्यातून CNN हे अमेरिकन च्यानेल त्यातील सर्वोत्तम माणसाना पुरस्कार देतं. या वर्षीच्या यादीत अशीच काही थोर मंडळी होती.

 डॉ. जॉर्ज हा त्यातीलच एक. कॅमरून या आफ्रिकेतील एका छोट्या देशामध्ये हा माणूस गरीब लोकांसाठी “फिरता दवाखाना” मोफत चालवतो. देशातील अनेक दुर्गम गावामधून तो फिरतो. तिथे एखाद्या टेंट मध्ये, गावातील झोपडीतून त्याची आरोग्य सेवा चालते. तिथे येण्यासाठी अनेकदा खेडूत लोकं ५० -६० किमी चालून येतात. पोटाच्या तक्रारी, डोळे, हात-पायाचे फ्राक्चर, किरकोळ शस्त्रक्रिया असं बरंच काही तो पूर्वी एकटा करे. मग हळूहळू त्याला साथीदार मिळत गेले...

तशीच एक कहाणी लौरा स्थाचेल आणि तिच्या “सोलर सुटकेस” ची. या बाईने एकदा नायजेरिया मध्ये एका सुईणीला बाळंतपण करताना पाहिले. कसे ? त्या गावाच्या पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबांना तिच एकटी तारून नेई. कधी आपल्या मोपेड वरून फिरत ही सुईण दिवसाला १२-१३ बाळंतपणे करे. कित्येक घरातूनच नव्हे, तर तिच्या त्या तात्पुरत्या “दवाखान्यात” सुद्धा लाईट बऱ्याचदा नसे. मिट्ट काळोखात ती बाई बाळंतपण करे. मग कधी एखादी आई तर कधी एखादे पोर तिथे सुविधेअभावी मारून जाई. लौराने तिला एकदा एका मेणबत्तीच्या प्रकाशात बाळंतपण करताना पाहिले, ती अंतर्बाह्य हादरली. आणि त्यातून जन्म झाला तिच्या “सोलर सुटकेस” चा.
आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिने छोटी सुटकेस बनवली. छोटे सोलर दिवे, एलीडी बल्ब लावून तिने अशा हजारो सुटकेस सर्वत्र वाटल्या. “WE CARE SOLAR” अशी website बनवून त्या द्वारे हे जगात सर्वात पसरवले. आज दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडातील अनेक देशात ही सुटकेस “जादूची सुटकेस” म्हणून प्रसिद्ध झालीय...

यांच्या सारखेच अजून कित्येक जण होते तिथे.. त्यांचं स्टेज वर येणं, बोलणं हे अगदी साधं होतं. आपण काही फार मोठं काम केल्याचा त्यात अभिनिवेश नव्हता, उलट अजून बरंच करायचंय पण करता येत नाही याबद्दल अपराधीपणाची जाणीव होती..!! याला म्हणतात खरं “माणूस” म्हणून जगणं..! समोरच्या लोकांच्या प्रतिक्रिया अफलातून होत्या. कुणी दाखवलेली डॉक्युमेंटरी पाहताना रडत होतं, शेकडो जण उभं राहून त्याना मानवंदना देत होते. अनेक बडे उद्योगपती जागेवरूनच देणग्या देत होते...! हे सगळं पाहताना मन भरून आलं.
आपल्या देशातही गावोगावी कार्यरत आहेत अशी माणसे. बाबा आमट्यांच्या “आनंदवना”पासून ते बोर्डी- जव्हार च्या आदिवासी पाड्यातील कार्यकर्त्यांपर्यंत, कोकणातील “पक्षिमित्र भाऊ काटदरे” पासून पुण्यातील विलास चाफेकरांची “वंचित विकास”, कोल्हापूरच्या नसिमादिदींचे “हेल्पर्स” व कल्पना तावडेंच्या झोपडपट्टीतील “ज्ञानदीप विद्यामंदिर” पर्यंत..! ही केवळ प्रातिनिधिक नावे. आपल्या राज्यात, देशात अक्षरशः हजारो खरेखुरे समाजसेवक काम करतायत. कित्येकांनी आपलं अवघं आयुष्य, स्वतःची संपत्ती, मालमत्ता हे सगळं या समाज सेवेसाठी पणाला लावलंय. मात्र  पुरेशा प्रसिद्धीच्याअभावी यातल्या अनेकांचे काम लोकांपर्यत पोचतच नाही.

रोज कोणत्या नट- नटीने काय केलं, कोणत्या पुढाऱ्याने कसं थाटात आपल्या मुलाचं लग्न लावलं, कुठे चोरी झाली, कोणत्या बुवाने कसले कसले उपद्व्याप केले, अशा अत्यंत फुटकळ पण “कॅची” असणाऱ्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळतात. पण जगाच्या भल्यासाठी जे राबताहेत ते दुर्लक्षित रहातात. कित्येकदा प्रसिद्धीला हपापलेले तथाकथित समाजसेवक मात्र गौरवले जातात. पुढेमागे त्यांचं भांडं फुटलं की मग त्यांच्यापायी इतर अनेक चांगल्या संघटना देखील बदनाम होऊन जातात. आजकाल तर अनेक पुढारीच स्वतःच्या “एन जी ओ” तयार करून सरकारी अनुदानं लुटून नेतात. यामुळे खरे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात.
खेडोपाडी पैशाअभावी, वाहनाअभावी, पुरेशा माणसांअभावी तरीही सामाजिक उपक्रम सुरु आहेत. कुणी दुर्लक्षित ऐतिहासिक वारशाचे जतन करू पाहतोय, कुणी गावातील गरीब मुलांना शिकवू पाहतोय, कुणी गावातील स्वच्छतेसाठी जीवाचं रान करतोय, कुणी प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतोय, कुणी अपंगासाठी तर कुणी थकल्या-भागल्या म्हाताऱ्या माणसांसाठी झगडतोय तरी कुणी आपल्या गावातील उजाड टेकड्या पुन्हा हिरव्यागार व्हाव्यात म्हणून लढतोय...! दुर्दैवाने यातील अनेकांपर्यंत सरकारची नजरसुद्धा पोचली नाहीये. काहीवेळा सरकारी मदत मिळतेही पण त्यासाठीचे कागद तयार करेपर्यंत, विविध कचेऱ्यातून हेलपाटे मारतानाच या लोकांची जास्त दमछाक होते. केवळ लोकांच्या मनातील चांगुलपणावर विसंबून ही मंडळी दिवस-रात्र राबताहेत. या विश्वातील “दुरितांचे तिमिर जाओ” म्हणून आपला घाम गाळताहेत.

आज त्यांना आर्थिक मदत तर लागणार आहेच, पण गरज आहे कुणीतरी त्यांच्या कामात प्रत्यक्ष हातभार लावायची. कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील किमान एक तास, एक दिवस जरी त्यांच्यासाठी देऊ केला तरी त्याच्या मनातील ती समाजसेवेची ज्योत पुन्हा विश्वासानं तेजाळून झगमगू लागेल. अनेक गोष्टी ते आपणहून निभावत आहेतच, पण कधीतरी प्रचंड उदासी मनाला झाकोळून टाकते, हातपाय थकून जातात. घडलेल्या एखाद्या छोट्याश्या घटनेने सुद्धा मनातील ती “समाजसेवेची उर्मी” अचानक ढासळते. “सगळं मीच का करायचं? किती दिवस करायचं? कोणालाच कसं साथ द्यावी असं वाटत नाही ? कुणी मदत केली नाही तर या अश्राप मुलांचं कसं होईल??” अशा विचारानं त्यांचं मन जेंव्हा थकून जाईल, तेंव्हा आपल्या सारख्या सामान्य माणसाने पुढे केलेला मदतीचा हात त्यांच्यातील तो आत्मविश्वास पुन्हा जागृत करून दाखवेल. एखाद्या अनाथाश्रमात घालवलेला अर्धा-एक दिवस तिथल्या मुलांच्या ओठावर हसू फुलवेलच पण तिथल्या कार्यकर्त्यांच्या मनातही समाधानाची जाणीव निर्माण करेल.

आज आपल्या मध्यमवर्गापर्यंत सुखवस्तूपणा झिरपत आलाय. आपलं आयुष्य छानपणे उपभोगत असतोच, अधूनमधून हॉटेलातून जेवण, थिएटर मध्ये जाऊन सिनेमा, रीसोर्टवर राहणं, एसी गाडीतून फिरणं असं कधी ना कधी आपण मनसोक्त अनुभवतो. पण आपल्या आयुष्यातील १० टक्के भाग जरी आपण एखाद्या सेवेसाठी खर्च केला तर मिळणारे समाधान हे त्या मनोरंजनापेक्षा जास्त सुखदायक असेल. आपले जुने कपडे, दरमहा आपला एक दिवसाचा पगार, सणासुदीला अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन केलेलं खाऊ वाटप, एखाद्या रुग्णालयातील गरीब रुग्णाला केलेली औषधांची मदत, एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी देऊ केलेला वर्षभराचा गणवेश व पुस्तकं... नव्या वर्षात प्रवेश करताना तुम्ही आनंदोत्सव जरूर साजरा करा, पण दुसऱ्याच्या आनंदासाठी असं काही करू शकलात तर ते जास्त सुंदर असेल. हे काही आपण सहज करू शकतो...किंवा असं करणे हीच खरी ईश्वरपूजा. अशा पूजेतून जगभरात “द्वेष- मत्सराऐवजी मैत्र जीवांचे जमून येओ” हीच नवीन वर्षानिमित्त सदिच्छा...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

Friday, 6 December 2013

एक लघुकथा - "डोळ्यात सांजवेळी.."

तो १०-१२ वर्षाचा. पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीत शाळेत जाणारा. चड्डी सुद्धा बाबांच्या जुन्या प्यांटमधून बनवलेली. तीही दोन वर्षापूर्वी. त्यात वाढत्या अंगामुळे नुकतीच केलेली उसवण स्पष्ट दिसणारी. शर्टही पिवळटलेला. त्याच्या वर्गात अनेक मोठ्या घरची मुलं. शाळेतल्या अभ्यासात तो मागे नसला तरी फार पुढेही नसायचा. ६०-६५ टक्के मार्क मिळवत पुढच्या वर्गात जाणारा. ब्राह्मण असल्याने लहानपणापसून कानावर पडलेलं सगळं तोंडपाठ झालेलं. वेगळेपण होतंच त्याच्या बोलण्यात. बोलायला लागला समोरचे ऐकत राहायचे. अर्थातच सगळ्या वक्तृत्व स्पर्धातून याचं बक्षीस निश्चित असे. रविवारी सुटीच्या दिवशी बाबांच्या सायकल वर बसून कुठे अथर्वशीर्ष, रुद्राची आवर्तने करायला जा, कधी कुठे पूजा सांगायला जा असं अर्थार्जन सुरूच होतं. त्या वयातही घर खर्चाला हातभार लावत होता तो.

अर्थात त्याचं घर म्हणजे जणू एक खुराडच. एका चाळीच्या जिन्याखालच्या अरुंद जागेत त्या कुटुंबाचा संसार. तिथेच एका कोपऱ्यात जेमतेम एक माणूस उभं राहील इतकीच मोरी. शेजारच्या कट्ट्याचा उपयोग स्वैपाकासाठी. समोरच्या बाजूला एक जुना लाकडी पलंग. एक खुर्ची आणि भिंतीवर मारलेल्या फळ्यांवर पुस्तके, धान्याचे डबे असं उरलं सुरलं सगळं. मोरीला आडोसा असावा म्हणून बांधलेल्या दोरीवर पडद्याबरोबरच तिथे टांगलेले कपडे. या जागेला घर म्हणणं हीच एक अतिशयोक्ती. पण त्यातही तो मजेत राहात असे. मित्रांच्या भल्या मोठ्या घरात वावरताना जसं त्याला अवघडल्यासारखं वाटत नसे तसं इथे राहतानाही.
 

त्या खुराड्यात राहूनसुद्धा त्याचं जग अनुभवसमृध्द होतं. बाहेरच्या आंब्याच्या झाडावर कावळे व इतर पक्षी घरटी कधी बांधतात, शेजारच्या विहिरीत मासे कुठून येतात, घरामागे असलेल्या उकिरड्यावर सापाची बिळे कुठे आहेत, त्यातले कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी आहेत, आईच्या समोर वावरल्यानं कोणत्या भाजीत हिंग घालावं आणि कोणत्या भाजीत लसूण, हे सगळं जसं त्याला माहीत होतं तसं अजाणत्या वयात आई-बापाचं “एकत्र” येणंही अचानक कळलेलं. शेजारच्या जोश्यांच्या मुलीचं पलीकडच्या मोडकांच्या मुलाशी हल्ली जास्त गुफ्तगू चालतं (गुफ्तगू शब्द ही त्यानं पहिल्यांदा वर्गात सांगितलेला) हे सुद्धा त्याला माहीत असायचं. या सगळ्याच्या जोडीला जन्मजात अंगात असलेला एक भन्नाट आत्मविश्वास, त्यामुळे तो म्हणजे एक वेगळंच रसायन. शाळा सुटल्यावरसुद्धा घरी जायची घाई न करता लायब्ररी मध्ये तासभर बसून पुस्तकं वाचणारा तो एकटाच. यातून त्याला असंख्य गोष्टी माहीत होऊन जात. अख्या वर्गाला समोर बसवून तो जेंव्हा या सगळ्यातलं काही सांगे तेंव्हा “अजि म्या ब्रह्म पाहिले...” च्या थाटात सगळे थक्क होऊन ऐकत राहात.

मैदानात क्रिकेट खेळतानासुद्धा एखादा जेंव्हा ऑफ ब्रेक टाकून समोरच्याची दांडी गुल करे, तेंव्हा कॉमेंट्री करणारा हा पट्कन म्हणून जाई “हा आमच्या शाळेचा प्रसन्ना..”.

वर्गात मात्र त्या नियमित तासाला तो कंटाळे. मग त्याचे विविध उद्योग चालत. पैज लावण्यात तर तो एक नंबर. आठवते की एकदा पैज लावून वर्गात गणिताचा तास सुरु असताना, त्याने आणि त्याच्या शेजारच्या चंद्याने आपल्या चड्ड्या काढून त्यांची अदलाबदल केली होती, कुणालाही न कळू देता..! कधी संस्कृतच्या तासाला एखादा “दधत्यंतस्तत्वमं किमपि यमिनसतत्खील्भवान” म्हणजे काय हो ?? असा प्रश्न विचारून म्याडमची दांडी गुल करे. आणि शेवटी सगळ्यांना सांगे “अरे अख्खं “महिम्न” म्हणून दाखवलं तर ही बया फीट येऊन पडेल इथंच..” अशा अनेक गंमती करताना कुणाला तो त्रास मात्र देत नसे. त्याला त्रास देणाऱ्या एखाद्या दांडगट मित्रालाही “च्यायझो, कशाला गरिबाला छळतोस..तुला काय मिळणार नाही, पाहिजे तर गणिताचा गृहपाठ करून देतो” असं म्हणे. या सगळ्यामुळे तो अख्ख्या वर्गाचा लाडका होता. गोरा, घाऱ्या डोळ्यांच्या त्याला सगळे मात्र “पोम्या” नावाने का बोलावत ते मात्र एक कोडेच होते..! हे नाव कसं पडलं ते त्यालासुद्धा ठाऊक नाही, पण त्याला त्याचं काही वाटतही नसे. शाळेत तसं त्याचं वर्गात नीट लक्ष नसे. लायब्ररीत बसून पुस्तकं वाचायला मिळवीत म्हणून तो शाळा लवकर सुटायचीच वाट पाही. या लायब्ररीतच मग रामायण घडलं...

नेहमीप्रमाणे पोम्या लायब्ररीत वाचत बसलेला. मात्र त्या दिवशी तिथे दुसऱ्या वर्गातील एक मुलगी व एक मुलगा आले होते. कपाटामागे त्यांच्या “लीला” चालू असताना याला त्याचा पत्तासुद्धा नव्हता. अचानक तिथे शाळेचा शिपाई आला. तो दुसरा मुलगा पळून गेला. ती मुलगी याच्या जवळून बाहेर पळताना शिपायाने पकडलं. आणि तिने सगळं काही याच्यावर ढकललं...!! शिपाई, शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्याला बेदम मारला. त्याचं म्हणणं कुणी ऐकून घेतलं नाही. तिथे मग त्याच्या बाबांना बोलावलं. त्यांनी तर त्याला अक्षरशः मारत मारत घरापर्यंत नेलं. गावातल्या काही प्रतिष्ठित माणसांनी मध्यस्थी केली म्हणून त्याला शाळेतून काढलं नाही. फक्त त्याला नववी “अ” तुकडीतून “ड” तुकडीत हाकलला.

आणि पोम्या बदलला. अगदी अंतर्बाह्य बदलला.

एका शांत, साध्या हरहुन्नरी मुलाचा एक “दादा” बनला. सगळ्यांना तो त्रास देऊ लागला. ज्या मुलीने त्याला फसवलं, तिलाच बापाबरोबर जात असताना त्याने एकदा रस्त्यात पकडलं, तिचे कपडे फाडले, केस कापले आणि केवळ दया म्हणून थोड्या कपड्यानिशी तिला घरी जाऊ दिलं. तर तिच्या बापाच्या तोंडावर शेण टाकले. मग मात्र पुन्हा त्याने असलं काही केलं नाही.

एकदा जेवल्यानंतर शेजारच्या मुलांना तो काही अश्लील जोक सांगताना त्याच्या बाबांनी पाहिलं, ते रागाने म्हणाले, “रांडेच्या, तुला लाज नाही वाटत रोज रात्री पोरांना जमवून असलं काही सांगायला? चल घरात आणि काही देवाचं म्हणत बस, अभ्यास करत बस..”

फट्कन तो म्हणाला, “ आणि सोबत काय तुमचा रोमान्स बघत बसू रोज? तुम्हाला लाज नाही वाटत काम करून थकलेल्या आईला रोज भोगताना?”

चिडलेला बाप जेंव्हा काठी घेऊन मरायला आला, तेंव्हा एका हातानं काठी धरून तो म्हणाला, “ बाबा, खबरदार, तुमच्या पेक्षा जास्त ताकद आहे माझ्यात आहे...हात नाही लावायचा मला.” त्या दिवसानंतर त्याचा आणि बापाचा संवाद थांबला तो कायमचा.

इतके दिवस त्याला पोम्या म्हणणारे सुद्धा आता “गोविंदा” असं नावानं हाक मारू लागले. तो गावातील बड्या दादा लोकांच्यात मिसळू लागला. इथेच त्याला नंद्या भेटला. नंद्या म्हणजे गावातला एक नामांकित गांजेकस. थेट घराच्या मागील डोंगरावर त्याने गांज्याची शेती केलेली. तिथल्या झोपडीत ठराविक वेळी सगळे गांजा फुकायला जमायचे. गोविंदा त्यात मिसळून गेला. मात्र त्याने नवी पद्धत तिथे सगळ्यांना शिकवली. गोविंदा गांजा ओढे तेही पद्धतशीरपणे.

आधी एक सिगारेट घ्यायची. तिच्यातील सगळं तंबाखू हळूहळू बाहेर काढायचा. मग त्यात गांज्याची एकदम बारीक केलेली पावडर भरायची. त्यात तो कधी लवंग घाले, कधी वेलची, कधी सुंठ...! आणि मग तिचे छान झुरके घेत बसून राही. कधी हा सगळं ऐवज चिलीमीत भरून ते गांजा ओढत बसत.

या व्यसनानं मात्र गोविंदाला आतून पोखरून काढलं. गांजा मिळवण्यासाठी पैसे हवेत. त्यासाठी तो भुरट्या चोऱ्या करू लागला. आणि एका साध्या गरीब घरातील हा मुलगा संपूर्ण कामातून गेला. मात्र हे सगळे उद्योग करताना तो बाईच्या वाटेला मात्र कधीच गेला नाही. त्याने कधी कुणाची छेड काढली नाही. मात्र समस्त स्त्री जातीचा तो तिरस्कार करे. अपवाद फक्त आईचा. तिच्यासमोर तो काही न बोलता राही. रात्री सगळे झोपले याची खात्री झाल्यावर घरी येई. आईने ताटात वाढून ठेवलेलं गारढोण अन्न बकाबका गिळून झोपी जाई. बिचारी आई पांघरुणातून अश्रू ढाळत राही. तिचं या घरात कधीच काही चालले नाही. त्या टीचभर घरात तिलासुद्धा कसली सत्ता नव्हती..!

बाप सकाळी कंपनीत निघून गेला की तीही एका हॉटेलसाठी पोळ्या करायला जायची. दिवसभर तिथे राबून ती परत संध्याकाळी घरी येई. गोविंदा दहावीत कसाबसा पास झाला होता पण अकरावीत नापास झाला आणि त्याचं शिक्षण थांबलं. गांजाडू मित्रांच्या बैठकीत तो सतत गावातील शिक्षकांना, शिक्षण पद्धतीला शिव्या देत राही. तर कधी आपल्या सुंदर आवाजात नाट्यगीते, जुनी हिंदी गाणी किंवा चक्क संस्कृत स्तोत्रं म्हणत राही. एक दिवस तिथे पोलिसांनी धाड टाकून सगळ्यांना अटक केली. आठवडाभर तुरुंगात ठेवलं त्यांना. मग बेदम मारून सोडून दिलं. इतर सगळे कुठे कुठे गायब झाले. पण गोविंदा आणि नंद्या पुन्हा आपल्या मार्गाला लागले. शेताजवळ एक “सिद्ध पुरुषाचं ठिकाण” होतं. त्या घुमटीत तिथल्या समाधीला टेकून हे दिवसभर गांजा पीत राहत. अनेकदा त्याची आई मग तिथे अर्ध-बेशुद्धीत पडलेल्या त्याला घरी घेऊन जाई.

एकदिवस तो असाच तिथे पडला होता, आणि कुणीतरी येऊन सांगितलं की त्याची आई रस्त्यात चक्कर येऊन पडलीय, आणि तिला गाडीने उडवलं. आधीच अर्धवट शुद्धीत असलेला गोविंदा ते ऐकून अधिकच सुन्नपणे बसून राहिला..जणू त्याचं आयुष्य कायमचं दूर निघून गेलं होतं त्याला एकटेपणाची शिक्षा देऊन.

आजही त्या गावाच्या गल्ल्यांतून अंगात कळकट कपडे घातलेला, दाढी वाढलेला, लाल तर्र डोळ्यांचा पण गोरापान गोविंदा जेंव्हा लडबडत जात असतो. तेंव्हा त्याच्याच वर्गात असलेले, एकेकाळी त्याचे जिवलग असलेले मित्र नजर चुकवून दूर जात असतात. कुणाकडेही लक्ष न देता तो चालत असतो.. अचानक त्याच्या तोंडातून सुरेल गाणं बाहेर येतं..

डोळ्यात सांजवेळी..आणू नकोस पाणी...त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी...”

-    सुधांशु नाईक, कतार (nsudha19@gmail.com)