marathi blog vishwa

Thursday, 26 December 2013

“दुरितांचे तिमिर जाओ..”

सुचेल तसं – लेखमालेतला या वर्षातला हा शेवटचा लेख..!

“दुरितांचे तिमिर जाओ..”
आज सकाळी CNN –HEROs हा कार्यक्रम पहात होतो. जगभरात कार्यरत असणाऱ्या खऱ्या-खुऱ्या समाजसेवकांना निवडून त्यातून CNN हे अमेरिकन च्यानेल त्यातील सर्वोत्तम माणसाना पुरस्कार देतं. या वर्षीच्या यादीत अशीच काही थोर मंडळी होती.

 डॉ. जॉर्ज हा त्यातीलच एक. कॅमरून या आफ्रिकेतील एका छोट्या देशामध्ये हा माणूस गरीब लोकांसाठी “फिरता दवाखाना” मोफत चालवतो. देशातील अनेक दुर्गम गावामधून तो फिरतो. तिथे एखाद्या टेंट मध्ये, गावातील झोपडीतून त्याची आरोग्य सेवा चालते. तिथे येण्यासाठी अनेकदा खेडूत लोकं ५० -६० किमी चालून येतात. पोटाच्या तक्रारी, डोळे, हात-पायाचे फ्राक्चर, किरकोळ शस्त्रक्रिया असं बरंच काही तो पूर्वी एकटा करे. मग हळूहळू त्याला साथीदार मिळत गेले...

तशीच एक कहाणी लौरा स्थाचेल आणि तिच्या “सोलर सुटकेस” ची. या बाईने एकदा नायजेरिया मध्ये एका सुईणीला बाळंतपण करताना पाहिले. कसे ? त्या गावाच्या पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबांना तिच एकटी तारून नेई. कधी आपल्या मोपेड वरून फिरत ही सुईण दिवसाला १२-१३ बाळंतपणे करे. कित्येक घरातूनच नव्हे, तर तिच्या त्या तात्पुरत्या “दवाखान्यात” सुद्धा लाईट बऱ्याचदा नसे. मिट्ट काळोखात ती बाई बाळंतपण करे. मग कधी एखादी आई तर कधी एखादे पोर तिथे सुविधेअभावी मारून जाई. लौराने तिला एकदा एका मेणबत्तीच्या प्रकाशात बाळंतपण करताना पाहिले, ती अंतर्बाह्य हादरली. आणि त्यातून जन्म झाला तिच्या “सोलर सुटकेस” चा.
आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने तिने छोटी सुटकेस बनवली. छोटे सोलर दिवे, एलीडी बल्ब लावून तिने अशा हजारो सुटकेस सर्वत्र वाटल्या. “WE CARE SOLAR” अशी website बनवून त्या द्वारे हे जगात सर्वात पसरवले. आज दक्षिण अमेरिका, आफ्रिका खंडातील अनेक देशात ही सुटकेस “जादूची सुटकेस” म्हणून प्रसिद्ध झालीय...

यांच्या सारखेच अजून कित्येक जण होते तिथे.. त्यांचं स्टेज वर येणं, बोलणं हे अगदी साधं होतं. आपण काही फार मोठं काम केल्याचा त्यात अभिनिवेश नव्हता, उलट अजून बरंच करायचंय पण करता येत नाही याबद्दल अपराधीपणाची जाणीव होती..!! याला म्हणतात खरं “माणूस” म्हणून जगणं..! समोरच्या लोकांच्या प्रतिक्रिया अफलातून होत्या. कुणी दाखवलेली डॉक्युमेंटरी पाहताना रडत होतं, शेकडो जण उभं राहून त्याना मानवंदना देत होते. अनेक बडे उद्योगपती जागेवरूनच देणग्या देत होते...! हे सगळं पाहताना मन भरून आलं.
आपल्या देशातही गावोगावी कार्यरत आहेत अशी माणसे. बाबा आमट्यांच्या “आनंदवना”पासून ते बोर्डी- जव्हार च्या आदिवासी पाड्यातील कार्यकर्त्यांपर्यंत, कोकणातील “पक्षिमित्र भाऊ काटदरे” पासून पुण्यातील विलास चाफेकरांची “वंचित विकास”, कोल्हापूरच्या नसिमादिदींचे “हेल्पर्स” व कल्पना तावडेंच्या झोपडपट्टीतील “ज्ञानदीप विद्यामंदिर” पर्यंत..! ही केवळ प्रातिनिधिक नावे. आपल्या राज्यात, देशात अक्षरशः हजारो खरेखुरे समाजसेवक काम करतायत. कित्येकांनी आपलं अवघं आयुष्य, स्वतःची संपत्ती, मालमत्ता हे सगळं या समाज सेवेसाठी पणाला लावलंय. मात्र  पुरेशा प्रसिद्धीच्याअभावी यातल्या अनेकांचे काम लोकांपर्यत पोचतच नाही.

रोज कोणत्या नट- नटीने काय केलं, कोणत्या पुढाऱ्याने कसं थाटात आपल्या मुलाचं लग्न लावलं, कुठे चोरी झाली, कोणत्या बुवाने कसले कसले उपद्व्याप केले, अशा अत्यंत फुटकळ पण “कॅची” असणाऱ्या बातम्या सर्वत्र पाहायला मिळतात. पण जगाच्या भल्यासाठी जे राबताहेत ते दुर्लक्षित रहातात. कित्येकदा प्रसिद्धीला हपापलेले तथाकथित समाजसेवक मात्र गौरवले जातात. पुढेमागे त्यांचं भांडं फुटलं की मग त्यांच्यापायी इतर अनेक चांगल्या संघटना देखील बदनाम होऊन जातात. आजकाल तर अनेक पुढारीच स्वतःच्या “एन जी ओ” तयार करून सरकारी अनुदानं लुटून नेतात. यामुळे खरे कार्यकर्ते दुर्लक्षित राहतात.
खेडोपाडी पैशाअभावी, वाहनाअभावी, पुरेशा माणसांअभावी तरीही सामाजिक उपक्रम सुरु आहेत. कुणी दुर्लक्षित ऐतिहासिक वारशाचे जतन करू पाहतोय, कुणी गावातील गरीब मुलांना शिकवू पाहतोय, कुणी गावातील स्वच्छतेसाठी जीवाचं रान करतोय, कुणी प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतोय, कुणी अपंगासाठी तर कुणी थकल्या-भागल्या म्हाताऱ्या माणसांसाठी झगडतोय तरी कुणी आपल्या गावातील उजाड टेकड्या पुन्हा हिरव्यागार व्हाव्यात म्हणून लढतोय...! दुर्दैवाने यातील अनेकांपर्यंत सरकारची नजरसुद्धा पोचली नाहीये. काहीवेळा सरकारी मदत मिळतेही पण त्यासाठीचे कागद तयार करेपर्यंत, विविध कचेऱ्यातून हेलपाटे मारतानाच या लोकांची जास्त दमछाक होते. केवळ लोकांच्या मनातील चांगुलपणावर विसंबून ही मंडळी दिवस-रात्र राबताहेत. या विश्वातील “दुरितांचे तिमिर जाओ” म्हणून आपला घाम गाळताहेत.

आज त्यांना आर्थिक मदत तर लागणार आहेच, पण गरज आहे कुणीतरी त्यांच्या कामात प्रत्यक्ष हातभार लावायची. कधी आपण आपल्या रोजच्या आयुष्यातील किमान एक तास, एक दिवस जरी त्यांच्यासाठी देऊ केला तरी त्याच्या मनातील ती समाजसेवेची ज्योत पुन्हा विश्वासानं तेजाळून झगमगू लागेल. अनेक गोष्टी ते आपणहून निभावत आहेतच, पण कधीतरी प्रचंड उदासी मनाला झाकोळून टाकते, हातपाय थकून जातात. घडलेल्या एखाद्या छोट्याश्या घटनेने सुद्धा मनातील ती “समाजसेवेची उर्मी” अचानक ढासळते. “सगळं मीच का करायचं? किती दिवस करायचं? कोणालाच कसं साथ द्यावी असं वाटत नाही ? कुणी मदत केली नाही तर या अश्राप मुलांचं कसं होईल??” अशा विचारानं त्यांचं मन जेंव्हा थकून जाईल, तेंव्हा आपल्या सारख्या सामान्य माणसाने पुढे केलेला मदतीचा हात त्यांच्यातील तो आत्मविश्वास पुन्हा जागृत करून दाखवेल. एखाद्या अनाथाश्रमात घालवलेला अर्धा-एक दिवस तिथल्या मुलांच्या ओठावर हसू फुलवेलच पण तिथल्या कार्यकर्त्यांच्या मनातही समाधानाची जाणीव निर्माण करेल.

आज आपल्या मध्यमवर्गापर्यंत सुखवस्तूपणा झिरपत आलाय. आपलं आयुष्य छानपणे उपभोगत असतोच, अधूनमधून हॉटेलातून जेवण, थिएटर मध्ये जाऊन सिनेमा, रीसोर्टवर राहणं, एसी गाडीतून फिरणं असं कधी ना कधी आपण मनसोक्त अनुभवतो. पण आपल्या आयुष्यातील १० टक्के भाग जरी आपण एखाद्या सेवेसाठी खर्च केला तर मिळणारे समाधान हे त्या मनोरंजनापेक्षा जास्त सुखदायक असेल. आपले जुने कपडे, दरमहा आपला एक दिवसाचा पगार, सणासुदीला अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जाऊन केलेलं खाऊ वाटप, एखाद्या रुग्णालयातील गरीब रुग्णाला केलेली औषधांची मदत, एखाद्या गरीब विद्यार्थ्यासाठी देऊ केलेला वर्षभराचा गणवेश व पुस्तकं... नव्या वर्षात प्रवेश करताना तुम्ही आनंदोत्सव जरूर साजरा करा, पण दुसऱ्याच्या आनंदासाठी असं काही करू शकलात तर ते जास्त सुंदर असेल. हे काही आपण सहज करू शकतो...किंवा असं करणे हीच खरी ईश्वरपूजा. अशा पूजेतून जगभरात “द्वेष- मत्सराऐवजी मैत्र जीवांचे जमून येओ” हीच नवीन वर्षानिमित्त सदिच्छा...!
-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

No comments:

Post a Comment