तो १०-१२ वर्षाचा. पांढरा
शर्ट आणि खाकी चड्डीत शाळेत जाणारा. चड्डी सुद्धा बाबांच्या जुन्या प्यांटमधून
बनवलेली. तीही दोन वर्षापूर्वी. त्यात वाढत्या अंगामुळे नुकतीच केलेली उसवण स्पष्ट
दिसणारी. शर्टही पिवळटलेला. त्याच्या वर्गात अनेक मोठ्या घरची मुलं. शाळेतल्या
अभ्यासात तो मागे नसला तरी फार पुढेही नसायचा. ६०-६५ टक्के मार्क मिळवत पुढच्या
वर्गात जाणारा. ब्राह्मण असल्याने लहानपणापसून कानावर पडलेलं सगळं तोंडपाठ झालेलं.
वेगळेपण होतंच त्याच्या बोलण्यात. बोलायला लागला समोरचे ऐकत राहायचे. अर्थातच
सगळ्या वक्तृत्व स्पर्धातून याचं बक्षीस निश्चित असे. रविवारी सुटीच्या दिवशी
बाबांच्या सायकल वर बसून कुठे अथर्वशीर्ष, रुद्राची आवर्तने करायला जा, कधी कुठे
पूजा सांगायला जा असं अर्थार्जन सुरूच होतं. त्या वयातही घर खर्चाला हातभार लावत
होता तो.
अर्थात त्याचं घर म्हणजे
जणू एक खुराडच. एका चाळीच्या जिन्याखालच्या अरुंद जागेत त्या कुटुंबाचा संसार.
तिथेच एका कोपऱ्यात जेमतेम एक माणूस उभं राहील इतकीच मोरी. शेजारच्या कट्ट्याचा
उपयोग स्वैपाकासाठी. समोरच्या बाजूला एक जुना लाकडी पलंग. एक खुर्ची आणि भिंतीवर
मारलेल्या फळ्यांवर पुस्तके, धान्याचे डबे असं उरलं सुरलं सगळं. मोरीला आडोसा असावा
म्हणून बांधलेल्या दोरीवर पडद्याबरोबरच तिथे टांगलेले कपडे. या जागेला घर म्हणणं
हीच एक अतिशयोक्ती. पण त्यातही तो मजेत राहात असे. मित्रांच्या भल्या मोठ्या घरात
वावरताना जसं त्याला अवघडल्यासारखं वाटत नसे तसं इथे राहतानाही.
त्या खुराड्यात
राहूनसुद्धा त्याचं जग अनुभवसमृध्द होतं. बाहेरच्या आंब्याच्या झाडावर कावळे व इतर
पक्षी घरटी कधी बांधतात, शेजारच्या विहिरीत मासे कुठून येतात, घरामागे असलेल्या
उकिरड्यावर सापाची बिळे कुठे आहेत, त्यातले कोणते साप विषारी आणि कोणते बिनविषारी
आहेत, आईच्या समोर वावरल्यानं कोणत्या भाजीत हिंग घालावं आणि कोणत्या भाजीत लसूण,
हे सगळं जसं त्याला माहीत होतं तसं अजाणत्या वयात आई-बापाचं “एकत्र” येणंही अचानक
कळलेलं. शेजारच्या जोश्यांच्या मुलीचं पलीकडच्या मोडकांच्या मुलाशी हल्ली जास्त
गुफ्तगू चालतं (गुफ्तगू शब्द ही त्यानं पहिल्यांदा वर्गात सांगितलेला) हे सुद्धा
त्याला माहीत असायचं. या सगळ्याच्या जोडीला जन्मजात अंगात असलेला एक भन्नाट
आत्मविश्वास, त्यामुळे तो म्हणजे एक वेगळंच रसायन. शाळा सुटल्यावरसुद्धा घरी जायची
घाई न करता लायब्ररी मध्ये तासभर बसून पुस्तकं वाचणारा तो एकटाच. यातून त्याला
असंख्य गोष्टी माहीत होऊन जात. अख्या वर्गाला समोर बसवून तो जेंव्हा या सगळ्यातलं
काही सांगे तेंव्हा “अजि म्या ब्रह्म पाहिले...” च्या थाटात सगळे थक्क होऊन ऐकत
राहात.
मैदानात क्रिकेट
खेळतानासुद्धा एखादा जेंव्हा ऑफ ब्रेक टाकून समोरच्याची दांडी गुल करे, तेंव्हा
कॉमेंट्री करणारा हा पट्कन म्हणून जाई “हा आमच्या शाळेचा प्रसन्ना..”.
वर्गात मात्र त्या नियमित
तासाला तो कंटाळे. मग त्याचे विविध उद्योग चालत. पैज लावण्यात तर तो एक नंबर. आठवते
की एकदा पैज लावून वर्गात गणिताचा तास सुरु असताना, त्याने आणि त्याच्या शेजारच्या
चंद्याने आपल्या चड्ड्या काढून त्यांची अदलाबदल केली होती, कुणालाही न कळू देता..!
कधी संस्कृतच्या तासाला एखादा “दधत्यंतस्तत्वमं किमपि यमिनसतत्खील्भवान”
म्हणजे काय हो ?? असा प्रश्न विचारून म्याडमची दांडी गुल करे. आणि शेवटी सगळ्यांना
सांगे “अरे अख्खं “महिम्न” म्हणून दाखवलं तर ही बया फीट येऊन पडेल
इथंच..” अशा अनेक गंमती करताना कुणाला तो त्रास मात्र देत नसे. त्याला त्रास
देणाऱ्या एखाद्या दांडगट मित्रालाही “च्यायझो, कशाला गरिबाला छळतोस..तुला काय
मिळणार नाही, पाहिजे तर गणिताचा गृहपाठ करून देतो” असं म्हणे. या सगळ्यामुळे तो
अख्ख्या वर्गाचा लाडका होता. गोरा, घाऱ्या डोळ्यांच्या त्याला सगळे मात्र “पोम्या”
नावाने का बोलावत ते मात्र एक कोडेच होते..! हे नाव कसं पडलं ते त्यालासुद्धा ठाऊक
नाही, पण त्याला त्याचं काही वाटतही नसे. शाळेत तसं त्याचं वर्गात नीट लक्ष नसे. लायब्ररीत
बसून पुस्तकं वाचायला मिळवीत म्हणून तो शाळा लवकर सुटायचीच वाट पाही. या
लायब्ररीतच मग रामायण घडलं...
नेहमीप्रमाणे पोम्या
लायब्ररीत वाचत बसलेला. मात्र त्या दिवशी तिथे दुसऱ्या वर्गातील एक मुलगी व एक
मुलगा आले होते. कपाटामागे त्यांच्या “लीला” चालू असताना याला त्याचा पत्तासुद्धा
नव्हता. अचानक तिथे शाळेचा शिपाई आला. तो दुसरा मुलगा पळून गेला. ती मुलगी याच्या
जवळून बाहेर पळताना शिपायाने पकडलं. आणि तिने सगळं काही याच्यावर ढकललं...!!
शिपाई, शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्याला बेदम मारला. त्याचं म्हणणं कुणी ऐकून
घेतलं नाही. तिथे मग त्याच्या बाबांना बोलावलं. त्यांनी तर त्याला अक्षरशः मारत
मारत घरापर्यंत नेलं. गावातल्या काही प्रतिष्ठित माणसांनी मध्यस्थी केली म्हणून
त्याला शाळेतून काढलं नाही. फक्त त्याला नववी “अ” तुकडीतून “ड” तुकडीत हाकलला.
आणि पोम्या बदलला. अगदी
अंतर्बाह्य बदलला.
एका शांत, साध्या हरहुन्नरी
मुलाचा एक “दादा” बनला. सगळ्यांना तो त्रास देऊ लागला. ज्या मुलीने त्याला फसवलं,
तिलाच बापाबरोबर जात असताना त्याने एकदा रस्त्यात पकडलं, तिचे कपडे फाडले, केस
कापले आणि केवळ दया म्हणून थोड्या कपड्यानिशी तिला घरी जाऊ दिलं. तर तिच्या
बापाच्या तोंडावर शेण टाकले. मग मात्र पुन्हा त्याने असलं काही केलं नाही.
एकदा जेवल्यानंतर शेजारच्या
मुलांना तो काही अश्लील जोक सांगताना त्याच्या बाबांनी पाहिलं, ते रागाने म्हणाले,
“रांडेच्या, तुला लाज नाही वाटत रोज रात्री पोरांना जमवून असलं काही सांगायला? चल
घरात आणि काही देवाचं म्हणत बस, अभ्यास करत बस..”
फट्कन तो म्हणाला, “ आणि सोबत
काय तुमचा रोमान्स बघत बसू रोज? तुम्हाला लाज नाही वाटत काम करून थकलेल्या आईला
रोज भोगताना?”
चिडलेला बाप जेंव्हा काठी
घेऊन मरायला आला, तेंव्हा एका हातानं काठी धरून तो म्हणाला, “ बाबा, खबरदार,
तुमच्या पेक्षा जास्त ताकद आहे माझ्यात आहे...हात नाही लावायचा मला.” त्या
दिवसानंतर त्याचा आणि बापाचा संवाद थांबला तो कायमचा.
इतके दिवस त्याला पोम्या
म्हणणारे सुद्धा आता “गोविंदा” असं नावानं हाक मारू लागले. तो गावातील बड्या दादा
लोकांच्यात मिसळू लागला. इथेच त्याला नंद्या भेटला. नंद्या म्हणजे गावातला एक
नामांकित गांजेकस. थेट घराच्या मागील डोंगरावर त्याने गांज्याची शेती केलेली.
तिथल्या झोपडीत ठराविक वेळी सगळे गांजा फुकायला जमायचे. गोविंदा त्यात मिसळून
गेला. मात्र त्याने नवी पद्धत तिथे सगळ्यांना शिकवली. गोविंदा गांजा ओढे तेही
पद्धतशीरपणे.
आधी एक सिगारेट घ्यायची.
तिच्यातील सगळं तंबाखू हळूहळू बाहेर काढायचा. मग त्यात गांज्याची एकदम बारीक
केलेली पावडर भरायची. त्यात तो कधी लवंग घाले, कधी वेलची, कधी सुंठ...! आणि मग
तिचे छान झुरके घेत बसून राही. कधी हा सगळं ऐवज चिलीमीत भरून ते गांजा ओढत बसत.
या व्यसनानं मात्र
गोविंदाला आतून पोखरून काढलं. गांजा मिळवण्यासाठी पैसे हवेत. त्यासाठी तो भुरट्या
चोऱ्या करू लागला. आणि एका साध्या गरीब घरातील हा मुलगा संपूर्ण कामातून गेला. मात्र
हे सगळे उद्योग करताना तो बाईच्या वाटेला मात्र कधीच गेला नाही. त्याने कधी कुणाची
छेड काढली नाही. मात्र समस्त स्त्री जातीचा तो तिरस्कार करे. अपवाद फक्त आईचा.
तिच्यासमोर तो काही न बोलता राही. रात्री सगळे झोपले याची खात्री झाल्यावर घरी
येई. आईने ताटात वाढून ठेवलेलं गारढोण अन्न बकाबका गिळून झोपी जाई. बिचारी आई
पांघरुणातून अश्रू ढाळत राही. तिचं या घरात कधीच काही चालले नाही. त्या टीचभर घरात
तिलासुद्धा कसली सत्ता नव्हती..!
बाप सकाळी कंपनीत निघून
गेला की तीही एका हॉटेलसाठी पोळ्या करायला जायची. दिवसभर तिथे राबून ती परत
संध्याकाळी घरी येई. गोविंदा दहावीत कसाबसा पास झाला होता पण अकरावीत नापास झाला
आणि त्याचं शिक्षण थांबलं. गांजाडू मित्रांच्या बैठकीत तो सतत गावातील शिक्षकांना,
शिक्षण पद्धतीला शिव्या देत राही. तर कधी आपल्या सुंदर आवाजात नाट्यगीते, जुनी
हिंदी गाणी किंवा चक्क संस्कृत स्तोत्रं म्हणत राही. एक दिवस तिथे पोलिसांनी धाड
टाकून सगळ्यांना अटक केली. आठवडाभर तुरुंगात ठेवलं त्यांना. मग बेदम मारून सोडून
दिलं. इतर सगळे कुठे कुठे गायब झाले. पण गोविंदा आणि नंद्या पुन्हा आपल्या मार्गाला
लागले. शेताजवळ एक “सिद्ध पुरुषाचं ठिकाण” होतं. त्या घुमटीत तिथल्या समाधीला टेकून
हे दिवसभर गांजा पीत राहत. अनेकदा त्याची आई मग तिथे अर्ध-बेशुद्धीत पडलेल्या
त्याला घरी घेऊन जाई.
एकदिवस तो असाच तिथे पडला
होता, आणि कुणीतरी येऊन सांगितलं की त्याची आई रस्त्यात चक्कर येऊन पडलीय, आणि
तिला गाडीने उडवलं. आधीच अर्धवट शुद्धीत असलेला गोविंदा ते ऐकून अधिकच सुन्नपणे
बसून राहिला..जणू त्याचं आयुष्य कायमचं दूर निघून गेलं होतं त्याला एकटेपणाची
शिक्षा देऊन.
आजही त्या गावाच्या
गल्ल्यांतून अंगात कळकट कपडे घातलेला, दाढी वाढलेला, लाल तर्र डोळ्यांचा पण
गोरापान गोविंदा जेंव्हा लडबडत जात असतो. तेंव्हा त्याच्याच वर्गात असलेले,
एकेकाळी त्याचे जिवलग असलेले मित्र नजर चुकवून दूर जात असतात. कुणाकडेही लक्ष न देता
तो चालत असतो.. अचानक त्याच्या तोंडातून सुरेल गाणं बाहेर येतं..
“ डोळ्यात सांजवेळी..आणू
नकोस पाणी...त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी...”
No comments:
Post a Comment