marathi blog vishwa

Thursday, 13 February 2014

काली घटा छाये मोरा जिया तरसाये...

१४ फेब्रुवारी – Valentine Day. विदेशी पद्धतीनुसार, प्रेम साजरा करण्याचा दिवस. म्हणूनच ही “प्रेम”ळ भावकथा, “मनापासून” या लेखमालेतील हा दुसरा लेख - रसिकहो, तुमच्यासाठी.

 
 
तालुक्याचं एक छोटं गाव. सुमारे ३० वर्षापूर्वी तिथं तो आणि ती राहायचे. त्याचे वडील डोळ्यांचे डॉक्टर. दर आठवड्यात या गावाबरोबर जिल्ह्यातील महत्वाच्या गावीसुद्धा भेट देऊन तिथल्या पेशंटला बरे करणारे. तर तिचे वडील सरकारी खात्यात कारकून. त्याचा एक टुमदार बंगला. त्याच्या आजोबांनी बांधलेला. तिचं घर त्यांच्या बंगल्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असलेल्या “बापटांच्या त्या चाळीत” ३ नंबरचे. त्याच्या घरी येणारी माणसे उच्च व उच्च मध्यमवर्गीय प्रकारची. घरात तो व त्याच्या मोठ्या भावाला, आईबाबांना सेपरेट बेडरूम आणि बाथरूम. तर तिच्या चाळीत टिपिकल चाळीचं वातावरण. दोन खोल्यांच्या घरात दाटीवाटीने राहणं, शेजारच्या घरातून कधी वाटीभर डाळीचं पीठ उसनं आणणे, रात्री जागून कॅरम खेळणे अशा असंख्य गोष्टींपासून ते संडाससाठी डालड्याचे डबे वापरून लायनीत उभे राहण्यापर्यंत. ती दोघं कधी एकत्र येतील अशी शक्यता सुद्धा नव्हती. पण ते घडलं.

नववीला असताना शाळेत क्रिकेटचा खेळ अगदी रंगात आलेला. मैदानात तो चांगला फलंदाज म्हणून प्रसिद्ध. शाळा सुरु होण्यापूर्वीच रोजच मुलं खेळायला यायची. तसाच खेळ सुरु होता. तो ब्याटिंग करत होता. आणि त्याने मारलेला एक जोरदार फटका, मैदानाच्या कोपऱ्यातून शाळेत येत असलेल्या तिच्या तोंडावर फाडकन बसला. अगदी थेट डोळ्यावरच. ती खाली कोसळली. काही क्षण ती बेशुद्ध. सगळी मुलं गोळा झाली. काही पळून गेले. तो मात्र तिथेच थांबला. कुणीतरी तिच्या तोंडावर पाणी मारलं. ती शुद्धीवर आली. डोळ्याजवळून रक्त येत होतं.

पट्कन तो म्हणाला, “माझे बाबा डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि आज इथे गावातच असतील, तिला नेऊया तिकडे.” कुणीतरी रिक्षा आणली. शाळेतला घडशी शिपाई, तो आणि एक मित्र तिला घेऊन गेले. त्याच्या बाबांनी तपासलं. सुदैवाने जखम वरवरची,पापणीला झाली होती. त्यांनी ड्रेसिंग केलं. मग औषधं दिली. म्हणाले, “तीन दिवसांनी पुन्हा एकदा मला डोळा दाखवून जा.” मग लेकाला म्हणाले, “जारे, तिला नीट घरी पोचवून ये.” तो सोबत तिच्या घरी गेला. घरी तिची आई होती.

“काकू, तुमच्या मुलीच्या डोळ्याला थोडं लागलंय, मी क्रिकेट खेळताना मारलेला फटका लागला. मी बाबांच्या दवाखान्यातून तिला औषधपाणी करून आणलंय. आता काळजी करायचं काही कारण नाही. मात्र माझी चूक होती. मला माफ कर...” शेवटचं वाक्य तिला उद्देशून होतं. पट्कन तो निघून गेलासुद्धा.

सगळं काही इतकं फटाफट घडत गेलं, की मग तिच्या लक्षात आले की, डॉक्टर काकांशी थोडं बोलण्याव्यतिरिक्त एवढा वेळ ती त्याच्याशी आणि तो तिच्याशी बोललेही नव्हते...!

०-०-०-

ती पुन्हा त्यांच्या दवाखान्यात डोळा दाखवायला गेली, तेंव्हा तो बाहेर त्यांच्या भल्या थोरल्या अल्सेशिअन कुत्र्याला – जिमीला आंघोळ घालत होता, अगदी साबण लाऊन..! ती पहातच राहिली. त्यांच्या चाळीतल्या छोट्याशा मोरीत आंघोळ ही उरकायची गोष्ट होती, तर इथे एक कुत्रासुद्धा मस्त मजेत आंघोळीचे सुख अनुभवत होता.!

त्याचं लक्ष गेलं तिच्याकडे. जिमीला साखळीने उन्हात एका ठिकाणी बांधून तो तिच्याजवळ आला.

“कसा आहे डोळा ? आणि तू नववी ब मध्ये आहेस नं? त्या दिवशी मला कळलं. मी नववी अ मध्ये आहे.”

“डोळा आता बरा आहे. तुला कुत्र्याची भीती नाई वाटत?”

“याची, आमच्या जिमीची ? अगं फार प्रेमळ आहे तो. अगदी तोंडात हात दिला नं तरी नाही चावणार, पण फक्त ओळखीच्या माणसांना... ये तुझी ओळख करून देतो.”

तो तिला जिमीजवळ घेऊन गेला. तिचा हात हातात घेऊन त्यानं जिमीच्या मस्तकावरून फिरवला. त्यानं आपलं ओलं नाक तिच्या हाताला लावलं. हुंगून वास घेतला. हळूच खरखरत्या जिभेनं हात चाटला. तिनं पट्कन हात काढून घेतला..

“ई, कसं ओलं ओलं नाक आहे याचं..!”

“अगं कुत्राची सवय असते ती. आता तुझा वास, स्पर्श तो कधीच विसरणार नाही बघ. फार हुशार असतात ते. बरं चल तुला घरात नेतो. बाबा आहेतच. ते बघतील तुझा डोळा..”

बाबा, त्याची आई, तो सगळेच मग तिच्याशी गप्पा मारत बसले. मग त्याची आई त्यांच्या साठी खायला काही आणायला गेली. त्या घराची ती मुख्य खोलीसुद्धा त्यांच्या चाळीतील २ घरांइतकी होती..! तिथला तो जुना लाकडी सोफासेट, झुंबर, रेडीओ, टेप रेकॉर्डर आणि टीवी ती पहातच राहिली.

“अय्या, तुमच्याकडे टीवी आहे? रामायण लागतं का रे रविवारी.”

“हो नं. आणि छायागीत, चित्रहार सुद्धा लागतो., तू येशील रामायण बघायला?”

“बघते, बाबांना विचारून. रविवारी ते घरी असतात नं, मग आम्ही सगळे सकाळी शेजारच्या नदीवर पोहायला जातो. तुला येतं पोहायला ?”

असं काही अन कितीतरी ते बोलत राहिले. घरी परतताना तिला उगाच पिसासारखं हळुवार तरंगत आल्यासारखं वाटत राहिलं...!
 
 
०-०-०-

दोन कुटुंबांना या दोघांनी एकत्र आणलं. तिचे बाबा जरी सरकारी खात्यात असले तरी गावातील क्रीडा स्पर्धातून स्वतः भाग घेत. नियोजनात सहभागी होत. क्रिकेट, कबड्डी, पोहणे यात त्यांना खूप रस होता. त्यामुळे त्यांचा तसाही परिचय होता. पण या दोन मुलांमुळे दोन्ही घर जवळ आली. त्याचं घर मोठं असल्यानं मग तीही दहावीच्या अभ्यासाला त्याच्याकडे थांबू लागली. आईने तिलाही स्वैपाक शिकवला होता. मग कधीतरी ती त्याच्या आईला स्वैपाकात मदत करे. त्याच्या आईला खूप कौतुक वाटे तिचं..! एवढ्याशा वयात किती समजूतदार आहे, किती नीटनेटकी आहे..असं म्हणून ती कौतुक करे. तिला खूप बरं वाटे.

त्याच्या घरातील टेप रेकॉर्डर वर गाण्यांच्या कॅसेट्स लाऊन दोघं अभ्यास करत बसायची. एकाबाजूला लता, आशा, रफी, मुकेश, किशोर गात असताना ते घरभर भरून राहिलेले सूर त्यांच्या मनात रुंजी घालायचे.

तिला आशाचं गाणं आवडे. अगदी फार मनापासून.

“जब चली ठंडी हवा..” , “काली घटा छाये मोरा जिया तरसाये..” वो हसीन दर्द दे दो..” “आओ, हुजूर तुमको सितारो मे ले चलू..” “झुमका गिरा रे...” “जाईये आप कहा जायेंगे...” या अशा मधाळ गाण्यांनी मनात तिच्या भावनांची कारंजी थुई थुई उडायची. अधे मध्ये होणारे त्याचे नकळत स्पर्श अंगावर एक वेगळेच रोमांच फुलवत. अवघं आयुष्य असं त्याच्या सोबत घालवावं वाटून जाई. त्यांच्या घरातून तिचं पाऊल बाहेर पडायला तयारच होत नसे...मग कुठेतरी मनात वाटे, “ते कुठे आपण कुठे? हा असा विचार करणं बरं नव्हे..” आणि नेमकं त्यावेळी आशाचा घायाळ सूर म्हणून जाई... “चैन से हमको कभी आपने जीने न दिया..” उदास मनाची कशीतरी समजूत काढत ती घरी परते. मनातलं ते हळवं, तरल असं काही त्याला कसं सांगावं, त्यालाही असं वाटत असेल का? अशा प्रश्नांच्या फेऱ्यात गुंतून जाई. दुसऱ्या दिवसाची वाट पहात.

त्याची अवस्था काही वेगळी नव्हती. रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर दोघं घरी जात. त्याच्याच घरी खाऊन पुन्हा अभ्यासाला बसत. मग रात्री ७ वाजता ती आपल्या घरी जाई.

सगळ्या वर्गातली मुलं त्याला तिच्यावरून चिडवत. त्याला वरवर राग येई. पण मनातून तो खूप सुखावे. कधीही मनापासून अभ्यास न करणारा तो हल्ली छान अभ्यास करे. अभ्यास, खेळ, विविध स्पर्धा, अशा सगळ्या ठिकाणी त्याचं नाव चमकत होतं. “आपण सगळं असं छान केलं की मग तिलाही आनंद होईल” या विचाराने, तिच्या नजरेत ते काही “खूप भारी” भाव दिसावेत म्हणून तो खूप मेहनत घेत होता.

प्रत्येक परीक्षेपूर्वी , स्पर्धेपूर्वी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या तरी, “बेस्टलक रे, तू छान यशस्वी हो..” असं तिनं सांगताच त्याच्या मनाला एक वेगळीच उभारी मिळे.

तिच्या छोट्या छोट्या गोष्टी तो लक्षात ठेवी. तिला “केशरी” रंग आवडतो म्हणून शाळेव्यतिरिक्त त्या रंगाचे शर्ट, टी शर्ट वापरे. तिला आवडतात म्हणून घरातल्या बागेतली मोगऱ्याची फुलं त्याच्या अभ्यासाच्या खोलीत आणून ठेवी. त्याला किशोरची गाणी आवडत असूनही टेपवर तिच्यासाठी “आशाच्या” कॅसेट्स लावे. त्याला खूप वाटायचं तिला सांगावं सिनेमातल्या सारखं.. “तू मला खूप खूप आवडतेस..” मात्र आपण तिला काही असं बोललो, आणि ती रागावली तर ? चिडून निघून गेली तर ? कायमची दुरावली तर? या भीतीने तोही मनातलं सगळं मनात ठेऊन वागत राही.

ते दिवस त्यांच्यासाठी जणू मखमली, रेशमी मुलायम असे काहीतरी होते..!
 

दहावीची परीक्षा झाली. तिला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते. त्याच्या बाबांसारखं आपणही डॉक्टर व्हायचं हे तिचं स्वप्न. तर त्याला सायन्स मध्ये जास्त रस. पुढच्या शिक्षणासाठी ती पुण्याला काकांच्याकडे जाणार होती. तर तो मुंबईला....

जायच्या आदल्या दिवशी ती त्याला, त्याच्या घरच्यांना भेटायला घरी आली. तो घरी नव्हता. त्याची आई म्हणाली, “अगं तो तिकडे गावदेवीला गेलाय सायकलने. मंदिर, मागचा डोंगर, तिथलं कुंड, झरा, नदी, सगळं एकदा जाण्यापूर्वी बघून येतो असं म्हणत होता. तो पण सगळ्यांना सोडून, या परिसराला सोडून जायच्या भावनेने गडबडलाय, सांगत नाही मला, पण कळतं गं.. शेवटी आई आहे मी त्याची, आता तुम्ही दोघही गाव सोडून जाणार, आम्हाला पण करमणार नाही बघ आता...”

काकूंशी थोडं काहीबाही बोलून तीही पट्कन बाहेर पडली. थेट सायकल दामटत निघाली, अर्थातच मंदिराकडे.

मंदिरामागच्या टेकडीवरून त्यानं तिला येताना पाहिलं. तिथूनच जोरात हाळी दिली,

“देवीचं दर्शन घेऊन ये गं इकडे..”

ती दर्शन घेऊन मग टेकडी चढून वर गेली. तिथल्या एका विस्तीर्ण कातळावर तो बसला होता.

समोर दूरवर पसरलेले डोंगर, मधूनच वाहत गेलेली नदी, नदीच्या दो-बाजूस असलेली शेतं, गावाच्या जवळच्या भागात असलेली माडा-पोफळीची झाडं...सगळं सगळं कसं मनात साठवून घेत होता...!

ती जवळ आली. पाहिलं तर त्याचे डोळे पाण्यानं भरलेले.

रडक्या आवाजात तो म्हणाला, “नाही जायचं मला मुंबईला, हे सगळं सोडून..! कशाला शिकायचं तिकडे दूर जाऊन ? इथे पण आहेच न सोय पुढच्या शिक्षणाची? माझी मित्रमंडळी, ही माझी जन्मभूमी दुरावणार असेल तर...का जायचं? इथली माणसं, इथे घालवलेलं बालपण, हे डोंगर, ही नदी, माझा जिमी आणि अर्थातच तू..! कसं राहू मी या सगळ्याशिवाय? ”

तिलाही भरून आलं. काय बोलणार होती ती ? त्याच्या बाजूला बसत त्याचा हात हातात घेऊन हळुवार थोपटत म्हणाली, “वेड्या, हे विसरायला कुणी सांगितलं तुला? जपून ठेव नं सगळं मनाच्या तळाशी. घरच्या ट्रंकेत माझी आई, ठेवणीतली पैठणी जपून ठेवते नं अगदी तसं...! जेंव्हा तिथं मुंबईत कधी चिडशील, कंटाळशील, उदास होशील, तेंव्हा हेच सगळं आठव. तुला बरं वाटेल. आणि आपण पुढे कधी कुठे जाऊ, काय करू हे थोडंच सगळ्यांना माहीत असतं ? पण तुला मोठा संशोधक व्हायचंय तर हे सोसलं पाहिजे रे. “टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही” असं आपले पटवर्धन सर नेहमी सांगतात ते विसरलास काय? शेवटी देवाच्या मनात जे असेल ते होईलच. तू कशाला इतकं मनाला लाऊन घेतोस? तू मोठा हो. तुला असं आभाळाएवढं मोठं झालेलं पहायचंय मला ! आणि आपण कधी विसरू शकतो का हे सगळं?”


तेवढ्यात आकाशात ढग भरून आले, आणि नेमकं त्याच वेळी पलीकडे दूर एका घरातील रेडिओवर लागलेलं आशाचं  गाणं आकाशात उंच पसरत गेलं... “काली घटा छाये, मोरा जिया तरसाये..ऐसे मे कही कोई मिल जाये..” तो दिवस, ते क्षण, मग दोघांच्याही मनात कायमचे रुजून गेले.

००-००-००-

सुरुवातीचे काही महिने दोघांनी एकमेकांना भरपूर पत्रे लिहिली. सुट्टीत घरी आले- भेटले की दोघं तासंतास गप्पा मारत बसत. आपल्या आपल्या कॉलेजमधल्या गमतीजमती सांगत. जसजसे दिवस गेले तसे हळू हळू दोघे आपल्या आपल्या विश्वात मग पार बुडून गेले.. त्या उमलत्या वयात अनुभवलं ते कोवळं प्रेम, ती निरपेक्ष, निस्वार्थी भावना कायमच त्यांनी उराशी जपली...

आज इतक्या वर्षानंतर दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्यरत आहेत. तो औषधाच्या मोठ्या  कंपनीत संशोधक म्हणून काम करतो, तर ती उत्कृष्ट सर्जन म्हणून स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत असते. जेंव्हा जेंव्हा आभाळ भरून येतं तेंव्हा तेंव्हा “काली घटा छाये..” हे गाणं त्यांच्या सीडी प्लेअरवर लागतं. तिचं मन हळुवार होतं, त्याला आठवू लागतं. तेंव्हा ती पुण्यात तिच्या घरात असते आणि तो दिल्लीत त्याच्या घरात असतो इतकंच...!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

(पुढचा लेख – “माझे दुर्ग सोबती..” )

2 comments: