अगदी लहानपणी आजोळी जायचो संकेश्वरजवळ. तेंव्हा चिपळूण ते संकेश्वर या प्रवासात सह्याद्रीचे रांगडे रूप दिसायचे कुंभार्ली घाट संपेपर्यंत. त्यातले ते काही देखणे पर्वत म्हणजे व्याघ्रगड आणि जंगली जयगड आहेत हे खूप नंतर कळलें. पुढच्या रस्त्यात कराड जवळचा वसंतगड, संकेश्वर जवळचा हरगापूर उर्फ वल्लभगड दिसायचे. हे सगळे शिवबा राजांचे किल्ले. इतकंच कळायचं तेंव्हा. पण ते गड पहात रहावेसे वाटायचं.
पुढे शाळेच्या
ट्रीपमधून पहिल्यांदा रायगड- प्रतापगड पाहिले. तो टकमकचा सुळका, त्या दऱ्या, तो
महादरवाजा अगदी थक्क होऊन पहात राहिल्याचं अजून आठवतं. दरीच्या टोकाशी या तटबंदीचे
काम कसं केलं असेल असा प्रश्नही विचारला होता सोबतच्या बाईना..! त्यांनी उत्तर
दिलं होतं, “ते शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आहेत नं, ते काहीही करू शकतात
बरं..” आणि ते खरंच तर होतं एका अर्थाने..!
त्याच वर्षी
आई-बाबांसोबत सज्जनगडही पहिला होता. एकाच वर्षात असे तीन महत्वाचे किल्ले. आणि मग
केलेली “राजा शिव-छत्रपती” या बाबासाहेबांच्या ग्रंथाची अनेक पारायणे.
महाराष्ट्रातील शेकडो भटक्यांप्रमाणे मग तेंव्हापासून दुर्ग माझे सोबती झाले ते
कायमचेच..!
कॉलेजच्या दिवसात
केलेले ट्रेक्स , नंतर नोकरीला लागल्यावर सुट्ट्या जोडून केलेले ट्रेक्स यातून ही
ओढ अजून वाढत गेली. या सुट्टीतला ट्रेक संपवताना, थकून घरी परततानासुद्धा पुढच्या
ट्रेकचे प्लान तयार होत असायचे. मी कसाही फिरलोय. कधी ग्रुपबरोबर. कधी एकदोन
मित्रांबरोबर, कधी एकटा. फक्त नाशिक जिल्हातले काही दुर्ग, कातळ कडे चढून माथा
गाठायचे काही दुर्ग राहिलेत पहायचे. बाकी महत्वाचे दुर्ग, पाहून झालेत.
कित्येक घाटवाटा
तुडवत डोंगरातून हिंडलोय. कधी भर दुपारी, टळटळीत उन्हात धापा टाकत गड चढलोय, तर
कधी मुसळधार पावसात समोरचं काही नीट दिसत नसतानाही..! कधी ऐन थंडीत रात्र घालवलीय
कुठल्या गुहेत कुडकुडत बसून, तर कधी घालवालीय एखादी संध्याकाळ धनगराच्या
चुलाणासमोर मस्त शेकत बसून.. यातली मजा सगळ्यांना नाही समजायची. भारी रिसोर्टवर
एसी रूममध्ये रात्र घालवणे हे सुंदर असेलही, पण ऐन मुसळधार पावसाळी रात्री
रायगडाच्या धर्मशाळेत, विठ्ठल भाऊने दिलेली घोंगडी पांघरून, दरवाजे-खिडक्यातून
खोलीत घुसणारं धुकं अनुभवणं माझ्यासाठी जास्त भन्नाट आहे. घरात बसून पंख्याचा वारा
घेण्यापेक्षा बुरुजाच्या माथ्यावर उभं राहून, बेभान वारा उरात भरून घेणं मला जास्त
आवडतं. आमच्या सवयीच असल्या, त्याला कोण काय करणार ??
मात्र गेल्या काही
वर्षात हे सगळं हळूहळू उणावत चाललंय. परदेशात नोकरीला येऊन बसलोय ना..! बायको-मुली,
आई-बाप, नातेवाईक यांच्या बरोबर सह्याद्रीलासुद्धा सोडून एकटा इकडे आलोय.
“मुलांच्या भविष्यासाठी” आज काही करून ठेवावं म्हणून मनापासून काम करतोय. भरपूर
काम आहेच. सुट्टी देखील धड मिळत नाही. मात्र कधी कधी मायदेशाची ओढ, सह्याद्रीची ओढ
असह्य होते. आठवतो कर्नाळ्याचा सुळका, ते रतनगडाजवळचं अमृतेश्वराचे मंदिर,
गोरखगडाची गुहा, राजमाचीचा पाऊस, सिंधुदुर्ग चा तो दोन फांद्यांचा माड, राणीची
वेळा आणि शिवरायांच्या पाउलखुणा, तोरण्याचा टप्पा चढताना झालेली दमछाक, रानातल्या
एखाद्या आडवाटेवर कुण्या झोपडीत मिळालेलं अमृतासारखं ताक, गडावरच्या टाक्यातलं
थंडगार पाणी, विसापूरच्या भक्कम तटबंदीवर झोपून पाहिलेलं तारांगण, पावसाळ्यात
छातीपेक्षा उंच गवतातून चालत पाहिलेला माहुलीगड, आणि अशाच इतर गड-कोटांच्या
स्मरणांबरोबर लक्षात राहिलेले शेकडो अविस्मरणीय सूर्योदय आणि सूर्यास्त..!
जीव कासावीस होतो. मग
कशीतरी ८-१० दिवसाची सुट्टी काढून निघतो.
या ८-१० दिवसात किती
जणांना आणि कसं भेटायचं ? तरी किमान एकतरी दुर्गभेट करतोच. हे दिवस पट्कन फुलपाखरासारखे
उडून जातात. सध्या घरची मंडळी आहेत कोल्हापुरात. त्यामुळे तिथून निघतो पुन्हा
मुंबईला यायला. ज्यांना भेटलो नाही त्या माणसांशी किमान फोनवरून बोलणंतरी होतं. पण
माझे अनेक दुर्गसोबती तसेच राहून जातात..! त्यांना सर्वांना कसं भेटायचं ? त्यांच्याशी
कसं बोलायचं ?
कोल्हापूरहून
कराडजवळ येताना, उजवीकडचा मच्छिंद्रगड, पुढे सदाशिवगड, मग वसंतगड सामोरे येतात.
गडाजवळ लढताना धारातीर्थी पडलेले “सरसेनापती हंबीरराव आणि त्याच गडाची माहेरवाशीण.
जिनं साक्षात आलमगीर औरंगजेबाला अखंड लढवत ठेवलं ती ताराराणी” यांचं स्मरण करून
देतो हा वसंतगड. त्याना मनोमन मुजरा करून पुढे जातो साताऱ्याकडे. खिंडीच्या अलीकडे
डाव्या हाताला दिसतो सज्जनगड. “सुखालागी आरण्य सेवीत जावे...”, “ देव मस्तकी
धरावा..अवघा हलकल्लोळ करावा..महाराष्ट्र धर्म वाढवावा..” असं बजावणाऱ्या समर्थांचा.
त्यांचं काहीच न ऐकणारी, मुर्खांची सगळी लक्षणं जपणारी आम्ही माणसे.. कसं सामोरं
जायचं त्यांना? समर्थांना दुरून नमस्कार करून पुढे सटकतो, मग पट्कन अजिंक्यतारा
आडवा येतो. एकेकाळची ही मराठी सत्तेची राजधानी. आज गावोगावी, गल्लोगल्ली “शिव
पुतळे” उभे करणाऱ्या, उठता-बसता शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या तमाम “राजे”
लोकांना मात्र “शिव-शाहीचा” विसर पडलाय. किल्ल्यांचा विसर पडलाय. अजिंक्यताऱ्यासारखे
किल्ले आज शेकडो वर्षं उभे आहेत. कुठे कुठे तटबंद्या ढासळत आहेत, मात्र वयोवृद्ध
“बाजी पासलकरांसारख्या” सेनानीप्रमाणे त्यांचं मन अजूनही कणखर आहे. त्याना हवी
आहेत माणसे, त्यांचं महत्व जाणणारी. त्यांच्या “त्या दिवसांचा” सन्मान राखणारी. या
जिंवत स्मारकांच्या, बलिदानाच्या “त्या कहाण्या” पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणारी.
तिथून पुढे जाताना
उजवीकडचा पाटेश्वर, जरंडेश्वराचा डोंगर, कल्याणगड मान वर करून पाहतच असतात. जरा
पुढे जावं तर एकीकडे वैराटगड, दुसरीकडं चंदन-वंदनची जोडगोळी. आता तिथं जवळपास
पवनचक्क्या उभ्या राहिल्यात. खंबाटकीचा बोगदा ओलांडला की दिसतो, आकाशावेरी गेलेला
तो “इंद्रपर्वत – पुरंदर”. पहारेकऱ्यासारखा दूर उभा ठाकलेला. जणू म्हणत असतो
कडकपणे,
“काय राव, आस समोरून
निघून जाताना काय लाजबीज न्हाई वाटतं? इकडं यायची वाट काय इसरला का काय??”
“कशापायी रागावतोस, म्होरच्या टायमाला नक्की येतो रं बाबा..” असं मी बापुडवाण्या चेहऱ्यानं विनवतो.
“कशापायी रागावतोस, म्होरच्या टायमाला नक्की येतो रं बाबा..” असं मी बापुडवाण्या चेहऱ्यानं विनवतो.
“ जावा..जावा..सुखानं
जावा..पण म्होरच्या टायमाला आला न्हाईस तर बघच..” असं दरडावून मला पुढे जायची
परवानगी देतो.
मग येतो नसरापूर
फाटा. इथं मात्र काळीज लक्ककन हलतं. दूर तिकडे क्षितिजावर ढगात असतो राजांच्या
राजगडाचा बालेकिल्ला. मागच्या वेळी ऐन पावसाळ्यात गेलो होतो तिथं. माझ्या
भावाबरोबर. महामूर पावसात, ढगांच्या दुलईत एकुटवाणा बसला होता राजगड. अक्ख्या
गडावर एकटा म्हातारा हवालदार. चुलीपाशी शेकत बसलेला. त्याच्या डोळ्यात त्या
“भोर-संस्थानकालीन” दिवसांच्या आठवणी. तर गडाच्या मनात गेल्या चारशे वर्षांच्या
आठवणींचा पाऊस बरसलेला...!
यावेळी मात्र
राजगडला दुरून मुजरा करून पुढे निघतो, तर ऐसपैस पसरलेला सिंहगड दर्शन देतो.
इतिहासातली एक वेगळीच घटना आठवते.
मिर्झाराजेंशी तह
करताना राजांनी अर्धं राज्य वाचवायचा प्रयत्न केलेला. तहासाठी जाताना मुद्दाम आई
जिजाऊ आणि कुटुंबातील काहींना सिंहगडावर नेऊन ठेवलं. तहाच्या बैठकीत राजे बहुदा
म्हणाले असतील,
“मिर्झाजी, आमच्या
आऊसाहेब आणि मंडळी तिथे आहेत. तो गड तेवढा आमच्याकडं असू द्या.”
सिंहगडाचं महत्व
माहीत असलेले बेरकी मिर्झाराजे उत्तरले, “राजे, नाही. पाहिजे तर तुम्ही तो गड
स्वतः तिथे जाऊन आमच्या हवाली करा चार-दोन दिवसानंतर. पण गड आम्हांला हवाच.”
राजे मग तिकडे गेले.
भगवा उतरवला गेला. मोगलाईचं निशाण चढलं. तो भगवा ध्वज घेऊन गड उतरताना राग, वेदना,
दुःख सगळ्या भावना राजांच्या चेहऱ्यावर उमटल्या. ते समजून जिजाऊ म्हणाल्या,
“शिवबा, कशापाई उगा
कष्टी होता? मिर्झा तर संपूर्ण स्वराज्याचा घास गिळायला आला होता. मोठ्या चलाखीनं
तुम्ही अर्धं राज्य वाचवलं. आणि पुन्हा संधी मिळेल तेंव्हा घेऊन टाकू पुन्हा हे
गडकोट. तुम्ही शिकारीला रानात जाता. कधी पाहिलंय का वाघ-सिंहाला नीट? एखाद्या
भक्ष्यावर तुटून पडण्यापूर्वी ते चार पाउलं मागे येतात, आणि मग पुन्हा झेप घेतात.
मात्र भक्ष्यावरची नजर कधीच हलू देत नाहीत. तुम्हीही शत्रूवरची नजर काढून नका घेऊ,
फक्त वाट पहा योग्य संधीची..!
असं काही नं काही
मनात येत असतं. मग पुण्याच्या बाहेरून पुढे सरकताना मध्येच डुलकी लागते.
अचानक, “वृक्षवल्ली
आम्हा सोयरी वनचरे..” टाळ-मृदुंगाच्या साथीनं अभंग कानात ऐकू येतो. पट्कन जागा
होऊन पाहतो बाहेर तर, तुकोबांचे “भामचंद्र-भंडारा” दर्शन देऊन मागे जातात. आणि
समोर दूरवर ती सुप्रसिध्द दुर्ग चौकडी दिसू लागते.
तुंग, तिकोना, लोहगड विसापूर.
(घनगड, कोरीगड तरी मागे लपलेलेच असतात).
लोहगड-विसापूरच्या
अगदी अंगणातून पुढे सरकताना त्यांचा उदासवाणा स्वर कानी पडतो,
“अरे अरे, जरा वाईच
थांबून न्हाय का गेलास रं? टाक्यातलं पाणी पिऊन, भाकरतुकडा खाऊन तर जायचं की रं?
कधी तुला पाठवलाय का इथून आम्ही खाऊ-पिऊ न घालता? आं? मग आजच कशापायी दुरावा असा?”
“बाबानो, काय करू?
वेळ नाही रे.. जरा थांबा, १-२ वर्षानंतर मग कायमचा मायदेशी येणार आहे...मग येत
जाईन पुन्हा पैल्यासारखा..”
कशीबशी त्यांची आणि
स्वतःची समजूत घालतो. लोणावळ्याला पोचेपर्यंत मग मान वळवून वळवून मागे बघत राहतो.
नकळत डोळे पुसतो.
एव्हाना हे सगळं
पहात बसलेली, बाजूला बसलेली बायको न राहवून बोलून जाते,
“तुझी अगदी
माहेरवाशिणी सारखी तऱ्हा झालेय बघ. सासरी तर जायचेय पण माहेरातून पाय निघत
नाहीये...!”
मात्र अजून यातून
सुटका नसते. खंडाळ्या जवळ राजमाचीची दुर्गजोडी उभीच असते. मला डिवचायला..!
“ काय साहेब, निघाला
वाटतं पुन्यांदा न भेटता?? किती राबशीला? जरा आराम करावा मानसानं म्हनतो.. अवो,
घरात नसेल इश्रांती मिळत तर हिकडं यायचं नं? उंबऱ्याच्या घरातली गरम भाजी-भाकरी
खायची, श्रीवर्धनवर जाऊन सूर्योदय, मनरंजनवरून सूर्यास्त पहायचा..अगदीच काय नाय तर
पठारावर पाय मोकळे करून याचं, आगीनगाडीच्या शिट्ट्या ऐकायच्या. तेबी नको आसलं तर
तळ्याकाठी जावं, मंदिरात जाऊन निवांत गप्पा माराव्यात.. जरा मनसोक्त जगून घ्या
की.. किती आपलं तडफडत जगनार?”
“होय बाबानो, खरंय
रे तुमचं. पण या समोरच्या घाटाचं गाणं तुमाला ठावूक आहे नं “कशासाठी.. पोटासाठी..
खंडाळ्याच्या घाटासाठी...” तसं आमचं आयुष्य बाबानो. बरं असुदे, जातो आता, पुढच्या पावसाळ्यात
येतो बघा नक्की..”
निरोप घेईपर्यंत
गाडी बोगद्यातून पलीकडे जाते. खोपोलीमार्गे पनवेलकडे जाऊ लागते. मग माथेरानजवळचा
पेब, प्रबळ, इरशाळ, चंदेरी आणि डावीकडे दूरवर कर्नाळ्याचा “लिंगोबाचा डोंगुर”
दिसतो. यांना आता मुंबईच्या “फाष्ट लाईफ” ची सवय झालेली. सतत येणाऱ्या–जाणाऱ्या
कर्जत, खोपोली, कसारा लोकल. त्यांना लोंबकळत जाणारी माणसं यांना तशी सवयीची.
म्हणून ते आपले पट्कन हसऱ्या चेहऱ्यानं
“Happy journey” म्हणून जातात. त्यांना माहीत असतं, की जेव्हा कधी वेळ
मिळेल तेंव्हा माणसं येणार भेटीला. उगाच आजचा दिवस का उदास घालवा ? रस्त्यात
दिसलेल्या या “दुर्गमित्रां”शिवाय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यातले
अनेक दुर्ग.. तिथे घालवलेले सुंदर क्षण ते आठवत मी पुढे जातो. त्यांना पुन्हा
भेटायचे राहूनच जाते.
शेवटी मी या
सगळ्यांच्या सोबत रहायची इच्छा उरी दाबून कसातरी विमानतळावर पोचतो. घरच्यांचा
निरोप घेऊन आत शिरताना पायात मणामणाच्या बेड्या पडल्यासारखं वाटतं. पाय ओढत मी
बोर्डिंग पास घेतो. कसाबसा विमानात शिरतो. सीटवर जाऊन धपकन बसतो. मनातून
डोळ्यावाटे उतू जाणारं सारं काही कठोरपणे पापणीआड बंद करून टाकतो. मनात भावनांचा
कल्लोळ उठलेला. विचारांची आणि प्रश्नांची गर्दी..
“कशाला परत चाललायस परदेशात?”“मग घरच्यांच्या भविष्याची काळजी घ्यायला, पुढची तजवीज नको का करायला??”
“इथं नाहीत का नोकऱ्या मिळत? परदेशातलीच कशाला हवी?”
“चांगला पगार आहे, नवं तंत्रज्ञान पाहायला मिळते. अजून थोडी वर्षं तर जायचेय, परत येणारच आहे नं मायदेशी??”
तुकोबांच्या शब्दांत सांगायचं तर “आपुलाची वाद आपणासी..” सुरु झालेला असतो, निघालेल्या विमानासोबत..!
- सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
( पुढचा लेख – माझे जीवन“गाणे”...!)
Mast durg bhramanti zaali. Mee pan tumchya sarkhach ithe pardeshaat adkun basloy. Rajmachi chya laxman umbre chi aathvan karun dilya baddal dhanyawad. Rajmachi chya khalya madhe pendhyachya machanavar kaadhlelya raatri, holichya shikari sathi dukraanchya maage dabbe waajvat uthavlele raan, hya sarv aathvani jaagya zaalya. Hya varshichya sutti madhe ek tari trek karnaarach. Agdi pakka programme.
ReplyDelete