marathi blog vishwa

Tuesday, 24 June 2014

गंमत भाषेची !

“मनापासून” या लेखमालेतील पाचवा लेख आपल्या भाषेविषयी..

मूल जन्माला आलं की लगेच भाषेची गंमत सुरु होते..! त्यातही आपली मराठी भाषा शब्दांच्या दृष्टीने फार समृद्ध आहे. हे जे मूल जन्माला येतं ना, त्याला इतर प्राण्यांच्या पिल्लासारखं लगेच काही करता येत नाही. अनेक दिवस ते परावलंबीच असतं. मात्र त्याने बोलायला सुरुवात करायच्या आधी लोक जणू आपणच आता जन्मलोय अशा थाटात “बोबडं” बोलायला सुरुवात करतात. एखादी मावशी, आत्या लगेच सुरूच करते..

“शोनुल माजं ते..अ लो लो लो..ललू नको ले..काय पायजे माज्या लाजाला...” जर त्या बाळाला त्या क्षणी बोलता आलं असतं तर ते निश्चित म्हणलं असतंच,

“ मावशे, अगं बाळ मी आहे का तू? जरा मोठ्या मानसावानी बोल की..”


पण माणसे आपल्या आपल्या पद्धतीने बोलत राहतात. आपल्या देशात तर भाषा दर ३०-४० किमीवर बदलते. कोकणातली बोली वेगळी असली तरी त्यातही “बाणकोटी, चिपळूणी, संगमेश्वरी, आगरी, मालवणी, कारवार-गोव्याची कोकणी, कोळी-मुसलमानांची उर्दू मिश्रित बोली, चित्पावन ब्राह्मणी बोली” असे अनेक सुक्ष्मभेद आहेत. कोल्हापुरी, सातारी, वऱ्हाडी, खानदेशी, पुणेरी, पंढरपुरी, नागपूर कडील विदर्भी भाषा, बेळगावी कन्नड-मिश्रित मराठी, असे आपल्या मराठीचे अनेक अनेक प्रकार. जुन्या ग्रंथातील भाषा, बखरीची भाषा हे आणि काही वेगळे प्रकार. हे सगळे प्रकार ऐकायला विलक्षण सुंदर आहेत. प्रत्येक बोलीचा ठसका अस्सल..! आणि शब्दांचे सामर्थ्य तर केवढे..आणि एका शब्दाचे किती अर्थ..! एक उदाहरणच पाहूया ना.

एखाद्या घरात सकाळी एखादा खडूस म्हातारा पूजेला बसलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की चंदनाचं “खोड” एकदम झिजून गेलंय. तो म्हणतो,

“सुनबाई, जरा चंदनाचे नवे खोड दे गं बाई. हे जुने खोड उगाळता येत नाही आता..”

सुनबाई आपल्या कामात. मुलांचे डबे, स्वैपाक, या सगळ्यात आधीच उशीर झाल्याने “करवदलेली”. धाड-धाड जात ती कपाटातले “खोड” काढून त्या सासऱ्यापुढे देते. जाताजाता हळूच पुटपुटते.. “ ही जुनी “खोडं” कधी संपणार कुणास ठाऊक...”

दूर तिथे खोबरं खवणत बसलेल्या सासूबाईंना कमी ऐकू येत असूनही हे मात्र नेमकं ऐकू येतं.. त्या तिथून पुटपुटतात,

“हिला आम्ही नकोसेच झालोय. काय हे वागणे हिचे. नाहीतरी मी म्हणालेवते चंद्याला, या मुलीत काहीतरी “खोड” काढून हिला नापसंत करूया..पण तो रुपाला भाळला होता नं तेंव्हा...!”

तेवढ्यात परसबागेत काम करत असलेला चंद्या घरात येतो, म्हणतो, “ अगं आई, आपल्या त्या जुन्या आंब्याचं काही बघायला पाहिजे. खोडाला वाळवी लागलीय आता..”

या छोट्याशा परिच्छेदातील मराठी ही “पुस्तकी सर्वसामान्य मराठी” आहे. तरीसुद्धा एक “खोड” हा शब्द किती प्रकारे वापरता येतो आणि त्यामुळे अर्थ कसे कसे बदलत जातात हे जाणवले की आपल्या भाषेच्या ताकदीचे कौतुक वाटते.


अशीच एकदा मी गंमत अनुभवली कोल्हापुरात.

सुट्टीत भावाकडे गेलो होतो. अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. तिथे नेमकी त्या दिवशी ही गर्दी. लोकांनी रांगा लावलेल्या. मी महाद्वारातून नमस्कार करून परत फिरणार इतक्यात एक काका म्हणाले,

“आवो, जाता कशापाई..या इथं पाळीत उभारायला.. १५-२० मिन्टात पोचतोय की आत..” पाळी हा शब्द “वेगळ्या” अर्थाने माहीत. त्यामुळे “पाळीत” उभं कसं राहायचं ? असं क्षणभर वाटून गेलं..!! त्यातही रात्रपाळी, कानाची पाळी हे अजूनही  वेगळे अर्थ.

ओटीत घेणे, ओटीवर घेणे याचेही वेगळे अर्थ. एखाद्या “ओटीत घेणे” म्हणजे जवळ घेणे, दत्तक घेणे असा अर्थ. बायकांच्यात “ओटी भरणे” हा अजून वेगळा अर्थ सांगणारा शब्द. तर जुन्याकाळी विशिष्ट लोकांनाच घराच्या “ओटीवर” घेतलं जाई. बाकीच्यांना बाहेर पायरीशी तरी बसावे लागे किंवा पडवीत तरी.

पडवी, ओटी, माजघर, शेजघर, स्वैपाकघर, न्हाणीघर अशा भागात तेंव्हा घर विभागलं जात असे. आताच्या वन – टू बीएच-के च्या जमान्यात तशी मोठी घर पाहायला मिळणं शहरी लोकांच्या मात्र नशिबात नाही आणि ते शब्द ही कदाचित नामशेष होऊन जातील...!

अशीच मजा “सुपारी” या शब्दाची. लग्नाची सुपारी, खायची सुपारी, एखाद्याला “मारायची” सुपारी असे किती अर्थ..!


मारणे हा शब्द सुद्धा आपण किती प्रकारे वापरतो. एखादा नव्यानं “मराठी भाषा” शिकणारा निश्चित गोंधळून जाईल अशीच परिस्थिती.

एखाद्याच्या कानफटात मारणे, तोंडात तंबाखूचा बार मारणे, थापा किंवा बाता मारणे, मस्का मारणे, गाडीला किक मारणे, झक मारणे, फोन मारणे (एखादा वेळेवर आला नाही, की पूर्वी लोकं पट्कन म्हणत, त्याला एक फोन मारून बघ..कुठं झोपलाय कुणास ठाऊक..! हल्ली सगळे “कॉल” करतात / मारतात.) “मूठ मारणे” हा शब्दप्रयोग सुद्धा दोन अर्थी वापरला जातो...!


तर काही काही शब्द असे असतात की ते उच्चारले, ऐकले की मनात एक चित्र पट्कन उभं राहतंच.
बुळबुळीत, कुळकुळीत, झळझळीत, झुळझुळीत, सुळसुळीत, गुळमुळीत, खळखळत, मळमळत, किंचाळत, कळवळत, फळफळत असे सगळे “ळ” चा प्रभाव असणारे शब्द नुसते उच्चारून पहा. तुम्हाला खात्रीच पटेल त्यांच्या प्रभावाची. “बुळबुळीत शेंबूड”, झळझळीत सूर्यप्रकाश, गुळमुळीत उत्तरं, सुळसुळीत साडी हे शब्दप्रयोग क्षणात आपल्या समोर खणखणीत चित्रं उभी करतात.

तर आपल्या भाषेतील काही शब्द असतातच भारदस्त (हाही शब्द त्यातलाच एक). लफ्फेदार, तजेलदार, रुबाबदार, तडफदार, अहंमन्य, उद्विग्न, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण, भग्नावशेष, कारुण्यगर्भ, आनंदोत्सव, वरदहस्त, शुभाशिर्वाद, सौभाग्यवती, राजमान्य, लोकमान्य, प्रज्ञावंत, श्रीमंत, विद्याविभूषित इ.. एखाद्या वाक्यात त्यांचा वापर केला तरी ते वाक्य वजनदार होऊन जातं. तशीच मजा काही क्रियापदांची.

स्टोव्हचे फरफरणे, कुत्र्याचे गुरगुरणे, गरीबाचे थरथरणे, पाय लटपटणे, फोड टरटरुन फुगणे, तापाने फणफणणे, सापाचे सरपटणे, गाईचे हंबरणे, नवरा-बायकोचे एकमेकांवर खेकसणे, अधिकाऱ्याचे दरडावणे, घोड्याचे खिंकाळणे अशी शेकडो क्रियापदांची यादी सांगता येईल. मात्र विविध प्रातांत ही क्रियापद अशीच वापरतील याची मात्र खात्री नाही हं..!

उदाहरणार्थ एखादा मुलगा जर आपल्या ग्रुपमध्ये हसत असेल तर कोल्हापूरच्या मंगळवार-बुधवार पेठेतला एखादा दोस्त पट्कन म्हणून जातो, “का रं, लई खिंकाळायलाईस...” तर एखादा वऱ्हाडी- वैदर्भी माणूस दुसऱ्याला म्हणून जातो, “काहून हासून राहिलाय वो...”

या भाषेला अजून लज्जत येते ती बोली भाषेतील वेगळेपणामुळे. लोक बोलत असताना अनेकदा लिंग, वचन या सगळ्या सगळ्यांची उलटापालट होते, शिव्यांची झणझणीत फोडणी बसते, एकच “काला” होतो, पण जे काही ऐकायला मिळते ते माझ्यासारख्या शब्दप्रेमी माणसाला सुखावते.

एखाद्या कोकणी घरात संध्याकाळी गजाली रंगलेल्या असतात. चार सहा निरुद्योगी सहजच तिथं एकत्र असतात आणि नसलेल्याचे झकास उखाळे-पाखाळे काढले जातात.
गावभर उचापत्या करणाऱ्या, सगळीकडे कामात स्वतः सहभागी होणाऱ्या कुणा “अनंतासाठी” एखादा तात्या, बोलून जातो,

तो फोदरीचा अंत्या, च्यायझो कुठे झक मारायला जात असतो कुणास ठाऊक. आपली बायको नाय सांभाळता येत धड आणि चाललाय दुसऱ्याची लग्नं लावायला..! परवा आलीवती ती तक्रार घेऊन माझ्याकडे. म्हणाली, तात्या तुम्ही तरी सांगा हो त्यांना, जरा घरात लक्ष द्या म्हणून..! तिथं त्याच्या घराचं लाईट कनेक्शन तोडलंन त्या एमेसिबी वाल्यानं, आणि हा आपला बाझवत फिरतोय गावोगावी..!”

अत्यंत घाणेरड्या शिव्या असूनही ना ऐकणाऱ्याला त्यात काही वाईट वाटतं ना बोलणाऱ्याला...! खरं म्हणजे शिव्या हे एक वेगळा आणि स्वतंत्र विषय. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे विविध भाषेतल्या शिव्या “ठराविक लैंगिकतेशी” येऊनच थांबतात. बहुदा आई-बहिणीवरून शिवी दिली की माणूस जास्त ते मनाला लाऊन घेतो, म्हणून जगभरातील सगळ्या भाषेतील शिव्या तिथेच येऊन पोचतात. एखादा कोकणी माणूस “रांडेच्या” म्हणतो, तर घाटावर “रांड्या, रांडलेका” असं म्हणतात. आणि इंग्रजीत ते थेट “bastard” होऊन जातं. एखादा मालवणी माणूस “मायझव्या” म्हणतो तर दुसरा “मादरचोद” तेच इंग्रजीत “mother-fucker” होऊन जातं.

अनेक घाणेरड्या म्हणी, वाक्यप्रयोग, शब्दप्रयोग हे शेकडो वर्षापासून समाजात प्रचलित आहेत. तर ज्या शब्दांना “घाणेरडेपण” चिकटायला हवे असे “गर्भगळीत, हतवीर्य, गलथान” इ. शब्द समाजात सर्रास वापरले जातात.

मुंबईमध्ये भाषेची तऱ्हा अजूनच निराळी. तिथे एकच अपार्टमेंटमध्ये कोकणी, वैदर्भी, खानदेशी, गुजराती, सिंधी, तमिळ असे सगळेच एकत्र. त्यामुळे भाषेची प्रचंड सरमिसळ. त्यातही इंग्रजीचं प्रस्थ भयंकर. किंबहुना इंग्रजी शब्द अधूनमधून पेरणे हे “प्रतिष्ठितपणाचे” लक्षणच...! मग मुलांच्या प्ले- एरिया जवळ बायकांच्या गप्पा रंगतात,

“ अय्या रितू, नवीन ड्रेस आहे गं हा. सो ब्युटीफुल. कसली क्युट दिसतेयस गं..! आणि काल नाही दिसलीस ती अर्शिताच्या बर्थडे पार्टीला ?”

मग ती दुसरी म्हणते, “नाय गं. मी काल एअरपोर्टवर गेली होती. स्मितु (म्हणजे तिचा नवरा अस्मित) लंडनला गेला नं बिझनेस ट्रीपला. त्याला नं मुळीच करमत नाही माझ्याशिवाय..म्हणाला मी प्लेनमध्ये बसेपर्यंत तू जवळ हवीस, पण नाही नं जाऊ देत तिथपर्यंत.. म्हणून मग किमान त्याला “सी-ऑफ” करून आले.”

तर त्याचवेळी लोकलमधून धक्के देत चढलेला “त्या पहिलीचा नवरा” दुसऱ्या धक्के देत चढणाऱ्यावर ओरडत असतो,

“दिखता नाय क्या? पाय के उपर पाय देके धक्का क्यू मारताय? एक तो खडा रय्नेको जागा नई उपरसे तुम धक्का मारता है ? हमभी डोंबिवली तक ही जायेगा, इधर डब्बा पयलेसे भरेला है..!”

एखाद्या पुणेरी, ब्राह्मणी शुद्ध बोलणाऱ्या कुटुंबात, संध्याकाळची वेळ. मैत्रिणींबरोबर आईस्क्रीम खायला मुलगी बाहेर गेलेली. अजून परतलेली नाही. दिवसभर नोकरी करून घरी परतलेल्या बापाचा त्रागा सुरु होतो. तो आपल्याच बायकोवर जाळ काढू लागतो,

“जा म्हणावं रात्र रात्र बाहेर. तुमचे लाड सगळे. एकदा तोंड काळे करून आली की समजेल. इथे आम्ही रक्त आटवून मर मर मरतोय, तुम्हाला काय त्याचं. बघावं तेंव्हा बाहेर जायचं आणि खावा आईस्क्रीमं..! कोणास ठाऊक मैत्रिणीबरोबर जातेय का कुणा मवाल्याचा हात धरून फिरतेय..”
रोज मुलाची अशीच बडबड ऐकताना चिडलेल्या त्या गृहस्थाचा म्हातारा बाप मात्र बेळगावी थाटात, विशिष्ट हेल काढत बोलून जातो, “कशाला उगाच बडबडून सोड्लायास रे. ती काय कुठे न सांगता नाही न गेली? आणि तू तरी कुठं लक्ष देऊन वाग्तोय्स म्हणतो मी? जरा घराकडं बगायचं सांगावं कशाला लागतंय रे तुला? लग्न तूच मनानं करून बसलायस न्हवं ? आपल्याच बायको-पोरांशी प्रेमानं बोलायला काय पैशे पडतात काय रे मग? बगाव तेंवा तोंड-गांड एक करून आपलं भडाभडाभडा बोलायचं म्हंजे बरं न्हवं बग..!

कोल्हापूरकडे तर “नपुसकलिंग” जास्त वापरलं जातं. नेमानं तिथे मटनपार्ट्या होतात त्यांना “रस्सा मंडळ” म्हटलं जातं. एखाद्या दिवशी एखादा भिडू दिसत नाही. मग पाटलाचा अरण्या (अरुण पाटील) म्हणून जातो, “ते रावल्या कुट  गेलय रं? कदी कुट टायमाला पोचनार नाय बग ते..! हितं आमी कवापास्न वाट बघा लागलोय, अनि ते बसलं आसल कुठतरी शेण खात..”
ते आलंय, ते गेलंय, ते बोलालंय, चालालंय, असं सगळं बोलणं. ऐन पेठेतली बाई सुद्धा शेजारणीला म्हणते, “आमचं ह्यांनी जेवा लागलेत गं, तर मन्या हगा लागलंय बग..त्यांचं आवरलं की येते मग बोलायला.”
त्याच वेळी गावाबाहेर एका झोपडीत तीन दगडांच्या चुलीवर तव्यावर भाकरी टाकली जाते. बाजूच्या गोणपाटावर नवरा अपराधीपणे मुकाट बसलेला. जगण्याच्या लढाईत थकून गेल्यानं, सगळं विसरायला दारू पिऊन आलेला. डोळ्याला पदर लाऊन बसलेल्या त्या माउलीचे शब्द मग तडतडत जातात..

“कशापायी ह्ये दारूचं लावून घेतलं मागं? दिसामाजी कायबाय मिलत होतं तेबी सगलं जाया लागलंय यापाई. पदरात दोन पोरं हायती, ती म्हातारी तिकडं मराया टेकलीया, त्याचा तरी इचार करावा म्हन्ते मी...दोन येलची भाकरी बी मिलल याचा भरोसा नाय, अनि तुमी बसलाय दारूची संगत धरून...कसं जगावं आमी?”

 


माणसाला बोलण्याचं वरदान मिळालं आणि भाषा ही आपल्या जीवनाचा भाग बनून गेली. लिहिण्या-वाचाण्यापेक्षाही बोलण्यातून  भाषा अंगी भिनते. आपली भाषा मागच्या शेकडो पिढ्यांनी घडवली, टिकवली, आपल्या परीने समृध्द केली. ते बोलत राहिले आपल्या भाषेत, म्हणूनच ती आपल्यापर्यंत पोचली. आपण भाषा अधिक समृद्ध नाही करू शकलो, तरी आपली भाषा पुढच्या पिढीकडे किमान तशीच तरी पोचवायला हवी ना? तुम्हाला काय वाटतं?

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)

-    (पुढचा लेख – “इतिहासाचा अभ्यास कशासाठी?” )

No comments:

Post a Comment