marathi blog vishwa

Tuesday 24 June 2014

इतिहासाचा अभ्यास ? कशासाठी?


बरेच दिवस हा विषय डोक्यात अर्धवट तयार होता. मात्र कामाच्या प्रचंड घाई-गडबडीत शब्दबद्ध करायलाच वेळ मिळेना. शेवटी कसंतरी स्वतःच्याच उरावर बसून आता हा लेख पूर्ण केलाय. कसा वाटतो ते मात्र जरूर कळवा..

इतिहास. शाळेतील अनेक विषयांपैकी एक विषय. ५०-१०० मार्कांचा. त्यातही पुढच्या आयुष्यात, उच्च शिक्षणासाठी बहुतेकदा मदतीला न येणारा. तारखा, सन, इ.स. पूर्व आणि विविध कॅलेंडर्सच्या जंजाळात अडकलेला. त्यातही स्वतःला इतिहास संशोधक समजणाऱ्या अनेकांचे, विविध दिनांकाविषयी मतैक्यापेक्षा मतभेदच जास्त. त्यामुळे या इतिहासाविषयी शाळा-शाळांतून मुलांची नाराजीही जास्त. खरं बोलायचं तर मुलांपेक्षा पालक जरा जास्त नाराज. कित्येकांचं ठाम मत तर असे की, “हे इतिहास-भूगोल असे विषय शाळेतून शिकवायचेच कशाला? आणि शिकवायचेच असतील तर त्याचे मार्क्स कशाला देता? उगाच आमच्या मुलांची टक्केवारी कमी होते ना?”

खरंच इतिहास इतका टाकावू विषय आहे ? आपण इतिहासाकडे का दुर्लक्ष करतोय? इतिहासाचा अभ्यास कशासाठी करावा हे खरंच आम्हांला का कळत नाही ? स्पष्ट बोलायचं तर, आम्हाला सगळं कळतंय, पण वळत मात्र नाहीये...

एकदा एका शाळेत मी शिव-चरित्राविषयी ४ दिवसांची व्याख्यानमाला करत होतो. त्यातला एक दिवस. सिद्दी जौहरचा वेढा, शिवरायांचं पलायन, बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान आणि ती पावन खिंड हा विषय होता त्या दिवशी. काय मुलं रंगली होती सांगू त्या इतिहासात. काही हळव्या मुलांना तर बाजीप्रभूंचे ते बलिदान ऐकून रडूच आलं. चक्क ते शिक्षकच म्हणाले, “अहो, तुमच्या कथेत मुलं किती रंगून गेली होती. हेच आम्ही वर्गात शिकवायला गेलो तर मुलं वर्ग डोक्यावर घेतात. जरा म्हणून काही ऐकत नाहीत. एका प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत नाही.”

मग मी विचारलं, “सर, तुमचे प्रश्न कोणते? आणि तुम्ही त्यांना तो धडा नीट समजावून सांगितला का?”

ते म्हणाले, “प्रश्न तर सोपे आहेत नं, सिद्दी जौहर ने कोणत्या साली वेढा घातला? कोणत्या किल्ल्याला वेढा घातला? पन्हाळा या किल्ल्याची थोडक्यात माहिती कशी सांगाल? बाजीप्रभू देशपांडे शिवरायांना काय व का म्हणाले? पन्हाळगड व विशाळगड या दोन किल्ल्यातील अंतर किती आहे? असे काही प्रश्न आहेत. आणि एकदा वर्गात मी धडा वाचून दाखवला नं त्यांना. त्यात समजवायचे काय?”

मी डोक्याला हात लावला. आपण इतिहासात खरोखर घडलेला एक अद्भुत प्रसंग जर मुलांना नीट सांगितला नाही, तिथे घडलेल्या घटनेची, युद्धाची नकाशा बनवून जराही माहिती दिली नाही, ते ठिकाण शहराजवळ असूनही मुलांना सहलीच्या निमित्ताने दाखवले नाही तर कशी मुलं त्या इतिहासाशी समरस होणार?

 दुर्दैवाने आमच्या इतिहासाच्या पुस्तकातूनही आमच्या देशातील महान लोकांपेक्षा देशावरील आक्रमकांचाच इतिहास जास्त विस्ताराने लिहिला गेलाय. त्यामुळे या देशातील भव्य आणि महान इतिहासाशी मुलांची नाळ तुटू लागलीय. आपल्या देशातील अतिभव्य मंदिरे, अत्यंत पुरातन बंदरे, स्थापत्यकला, शिल्प-चित्र संगीत आणि नृत्य कला, प्राचीन महा-विद्यालये, एकेकाळी प्रगत असणारी विविध शास्त्रे हे अनेक पालकांना, शिक्षकानाही माहीत नाही. याच आमच्या देशात कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय गणित, खगोलशास्त्र, विज्ञान, शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र यात अनेक अचूक सिद्धांत मांडले गेले जे आजही परकीय अभ्यासक अभ्यासत आहेत आणि “ हे सगळं त्याकाळी या माणसांना कसं कळले?” या विचाराने अचंबित होताहेत.
 
मात्र हे आपल्या देशातील आजच्या अनेक पालकांनाच, शिक्षकांना जिथे माहीत नाही तिथे ते मुलांना कसं ठाऊक होणार? आजही तळपदे नावाच्या एका मराठी शास्त्रज्ञाने प्रथम विमानाचा शोध लावला हेच आम्हाला न सांगता राईट बंधूंचेच कार्य जर सांगितले गेले तर आपल्या मुलांना आपल्या देशातील अशा गोष्टींचं कौतुक कसं वाटेल? त्यांना प्रोत्साहन कसं मिळेल? त्यांना स्फूर्ती कशी मिळेल? त्यांचं देशप्रेम कसं वाढेल?

 “शिवाजीमहाराज की जय, विवेकानंद अमर रहे, बाबासाहेबांचा विजय असो, जय परशुराम, जय श्रीकृष्ण, जय श्रीराम, ” अशा घोषणा देत आपण नवा “दैववाद” जन्माला घालत आहोत. अशा घोषणा दिल्या, त्यांच्या पूजा केल्या, जागोजागी फोटो, पोस्टर्स चिकटवले, पुतळे व मंदिर बांधले म्हणजे आपलं काम झालं आता ते सगळ्यांनी जपलं पाहिजे असं म्हणत त्याच्या जोरावर काहीजण दहशतसुद्धा माजवत आहेत. समाजातून “वाईट आणि राक्षसी वृत्ती” नष्ट होण्यासाठी देवमाणसे तयार करण्याऐवजी आम्ही समाजाला पुन्हा “नवीन देव” देण्याचं कार्य इमाने-इतबारे करतोय. कर्तृत्वान व्यक्तींचे फक्त दैवतीकरण करत आहोत. इतिहासात डोकावलं तर असं सतत सुरु आहे हेच दिसतं. पण आपला इतिहास आपण शिकतो कुठं? आपल्याला नीट शिकवला कुठे जातो?

दुर्दैवाने इंग्रज काळापासून हेच सुरु आहे. भारताच्या इतिहासातील अनेक अमूल्य गोष्टी ज्या इंग्रजांनी जगासमोर आणल्या त्यांनीच ते सर्व ज्ञान भारतीयांपासून दूर ठेवले, कारण ती त्यांच्या सत्तेची गरज होती. पण मग आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तरी आपण काय केलं? काही फारसं वेगळं केलं नाही. आपल्याला सोईस्कर असा इतिहास विविध सरकारांकडून मात्र लिहिला गेला तो फक्त राजकीय फायदे तोटे पाहूनच. तरीही जेंव्हा जेंव्हा शाळा-कॉलेजच्या सहली विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात, तेंव्हा त्या मुलांचं मन मोहरून येतं. कारण शेवटी आपल्या देशाशी, आपल्या मातीशी, इथल्या प्राचीन घटनांशी, पूर्वजांशी कुठेतरी आपलं नातं असतंच. मात्र ते नातं जोडून देण्याचं काम पालकांनी आणि शिक्षकांनी करायला हवं. इथे इतिहासाचा अभ्यास कामाला येतो.

 बाकीच्या जगाचं राहूदे, आपण किमान आपल्या देशाचा विचार करू. कारण जगातील इतरांच्या तुलनेत सर्वात जुनी नागरी व्यवस्था (civilisation) आपल्या भारतात होती. गेल्या ४-५ हजार वर्षे या देशातील लोकं कशी राहात होती? त्यांच्या वेशभूषा, अन्न-संस्कृती, राहणीमान, घर व नगर बांधणीचे ज्ञान, संरक्षण व्यवस्था, उपजीविकेची साधनं, त्यांचे गुण-दोष काय होते? हे सगळं अभ्यासणं विस्मयकारक आहे.

कोणत्या काळात कोणती चांगली घटना घडली? कोणती वाईट घटना घडली, त्या-त्या वेळी आपले पूर्वज कसे वागले, त्यांनी जर योग्य निर्णय घेतले तर त्याचा त्यांना कसा फायदा झाला? त्यांच्या चुकीमुळे कशा आपत्ती आल्या? जनजीवन कसं विस्कळीत झालं? नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्या काळी कशी दक्षता घेतली गेली / किंवा दक्षता नाही घेतली गेली? कोणत्या आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केले? त्याला आपण कसे तोंड दिले? इथली पाणी संस्कृती कशी होती? इथली वन संस्कृती कशी होती? धातूंचा वापर कसा होत होता? त्याची शुद्धता कशी तपासली जात होती?  या सगळ्याचा माणूस जेंव्हा अभ्यास करतो तेंव्हा ते सगळं थोडंच फक्त मार्क्स मिळवण्यासाठी असतं का? यातून आपल्याला काहीच प्रेरणा मिळत नाही का? आपल्या पूर्वजांच्या चुका पाहताना नवीन काही शिकता येतं हे आपल्याला कळत नाही का?

 अशा इतिहासातून जरूर प्रेरणा मिळत असते. फक्त तो इतिहास कुणीतरी सोप्या भाषेत, सुसंगत पद्धतीने मांडायला हवा. कोणाच्या राग-लोभाची पर्वा न करता अत्यंत स्पष्टपणे सांगायला हवा. पुराव्यानिशी मांडायला हवा. तेंव्हा कुठे तो इतिहास केवळ एक सनावळी न उरता आपल्या मनात झिरपतो आणि मगच माणसांना प्रेरणा मिळू शकते. त्यातूनच इतिहासात अजरामर होणारे नवे व्यक्तित्व जन्माला येते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतिहास हा केवळ महापुरुषांचा, समाजात प्रतिष्ठा मिळवलेल्यांचाच नसतो. तर इतिहास सर्व सामान्य जनतेच्या कष्टांचा, सुख-दुःखांचा, पराक्रमाचा, त्यागाचा, कलंकांचा, वाईट वर्तनाचा, निसर्गापुढील हतबलतेचा, संकटातून नवीन रस्ता शोधणाऱ्यांचासुद्धा असतोच. तो सुद्धा अभ्यासाला गेला पाहिजे. दुसरी एक सर्वमान्य समजूत अशी की इतिहासाची पुनरावृत्ती होतंच असते. ज्यावेळी एखाद्या घटनेला आपल्याला सामोरे जावे लागते, त्यावेळी जर आपण इतिहास अभ्यासाला असेल, तशीच घटना आपल्याला माहिती असेल, त्या लोकांनी काय चूक किंवा बरोबर केलं हे माहीत असेल तर आपल्यालाही त्याप्रकारे चट्कन निर्णय घेता येतो. इथे इतिहास तुम्हाला अक्षरशः ‘रेडीमेड उत्तरं’ समोर आणून देत असतो. मात्र एकतर आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा आपण बेपर्वा असतो. आणि मग जेंव्हा महाभयंकर घटना घडते, तेंव्हा अशी मस्तवाल, बेपर्वा माणसे त्यात आपलं व समाजाचं जीवन धोक्यात घालतात. हे होऊ नये म्हणून इतिहासाशी सलगी करायलाच हवी.


 लहानगी, चिमुरडी मुलं सुद्धा ऐतिहासिक ठिकाणी किती रमून जातात. फक्त आपण त्यांना तिथं न्यायला हवं. सुदैवानं महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या देशात अशी लाखो ठिकाणं आहेत ज्यांचाशी कुठला ना कुठला ऐतिहासिक संदर्भ जोडला गेलाय. त्या ठिकाणाचं जतन करणं हे आपलं पहिलं कर्त्यव्य आहे. सगळ्याच गोष्टी सरकार करेल अशा नकारात्मक सवयीचीच आपल्याला सवय लागली आहे. आणि त्यामुळे मग आपोआप फक्त पोकळ वादविवाद करणं, उठसूठ “सरकार हे करत नाही, ते अधिकारी तसं करत नाहीत” अशा टीका करण्यात, तावातावाने नुसत्या गरमागरम चर्चा करण्यात आपण धन्यता मानू लागलोय. आणि आजूबाजूचा इतिहास समजावून घेण्यापेक्षा, तिथे मुलांना  घेऊन जाण्यापेक्षा, आपली मुलं चकचकीत मॉलमध्ये कृत्रिम खेळण्यांशी खेळायला पाठवण्यात आपली इतिकर्तव्यता दिसून येत आहे. अनेक घातक समजुती, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी, सामाजिक वर्तन, अंधश्रद्धा यात प्रचंड बदल होताहेत.

अंधश्रद्धांची गोष्ट घ्या. जुन्या इतिहासात पाहिलं तर दिसून येतं की गावागावातून अनेक भैरोबा, रोकडोबा, गरजाई, मरजाई इ. देवदेवता आणि त्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक भयंकर प्रथा दिसून येतात. अनेक ठिकाणी तर स्त्रीच्या नशिबी अत्यंत वाईट भोग येत ते या देवतांच्या मुळेच. त्यांच्या नैवेद्याच्या कहाण्याही भयंकर. कुणाला बोकडाचा बळी लागे तर कुणाला रेड्याचा. शेवटी सगळं जाई माणसाच्या पोटात..! मग हळूहळू जशी संतांनी समाजात जागृती घडवली तशी काही माणसे शहाणी होऊ लागली. मात्र आता पुन्हा काय चित्र दिसतंय? आम्ही नवीन बाबा, महाराज निर्माण केलेत, त्यांच्या नव्या अंधश्रद्धा आत्मसात केल्या आहेत. नवा जातीयवाद, पंथवाद उदयास आला आहे. आमची नेते मंडळी सुद्धा आजकाल विशिष्ट बाबा-महाराजांना प्रोजेक्ट करतात. विशिष्ट महापुरुषांच्या नावाने फक्त दहशतीचे राजकारण करतात आणि सगळे त्यांच्यामागे लागतात. त्यातून फक्त आपला स्वार्थ साधतात.
समाज जेंव्हा अशा देव-देवतांच्या आहारी जातो, स्व-कर्तृत्वाने मोठं होण्याची स्वप्नं पहात नाही, देश आणि समाजहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थात गुंतून जातो, परकीय गोष्टींनी भुलून जातो तेंव्हा आपण आपलं स्वातंत्र्य धोक्यात टाकत असतो हा इतिहास आहे. आणि हे पुन्हा पुन्हा सुरु आहे. मात्र आपण हे सगळं टाळून, फेकून देऊन पुढं जायला हवं. ‘या देशातील प्रत्येक व्यक्ती देश घडवू शकते’ या विश्वासाने सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला हवं. तरच एक समर्थ राष्ट्र म्हणून आपलं नकाशातील स्थान पक्कं राहू शकेल.

दुर्दैवाने “आमच्या या देशाने कुणावर कधी आक्रमणं केली नाहीत” असं छाती फुगवून सांगणारे, “आमच्या इतिहासाचं विस्मरण झाल्याने, आणि आपण त्याच त्याच चुका पुन्हा केल्याने गेल्या हजारो वर्षात परकीयांची हजारो आक्रमणं भोगली” हे कधीच आम्हांला सांगत नाहीत.

जो देश आपला इतिहास विसरतो, त्यातल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सावध व सज्ज रहात नाही, स्वतःला काळाप्रमाणे बदलून बलशाली बनवत नाही त्या देशाला स्वतंत्र राहण्याचा अधिकार टिकवता येत नाही हे एक जागतिक सत्य आहे.

आज जेंव्हा देश काही नव्या बदलांना सामोरा जात आहे, तेंव्हा आपण आपला इतिहास अभ्यासणे, व त्यातील उत्तम ते स्वतः अंगीकारणे आणि पुढच्या पिढीकडे सोपवणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही..!

-    सुधांशु नाईक (nsudha19@gmail.com)
(पुढचा लेख – “पानी..पानी रे..” )

No comments:

Post a Comment