“रोजच आयुष्य जगताना संसारी बाईची तारांबळ होते.
दुसऱ्याच्या सुखाचे क्षण वेचताना स्वतःकडे तिचं दुर्लक्ष होतं. कधीकधी सगळं काही
नकोसं वाटू लागतं. तरीही तिला सुट्टी क्वचितच मिळते आणि तिची एनर्जी कायम इतरांसाठीच खर्च होत राहते....”
पहाटेचे ५.४० वाजले. मोबाईलमधील घड्याळाचा गजर
झाला. डोळ्यातील झोप आवरत ती उठून बसली. उठून बसतानाच पाठीतून सरसरत कळ गेली
मस्तकापर्यंत. काल उशिरा दमून झोपताना पाठीला क्रीम/बाम लावायचं विसरलेलं आता
पुन्हा जाणवलं. आज रात्री तरी याच्याकडून लावून घेऊ असं म्हणत तिनं विस्कटलेले केस
नीट बांधले. बाजूला घोरत असलेल्या “त्या”च्या अंगावरचं पांघरूण नीट केलं. क्षणभर
वाटलं तिला, “त्याच्या” कुशीत शिरावं. पण... दिवसभरातील पुढल्या कामाची लिस्ट
आठवली.
स्वतःच्या इच्छेविरुद्ध ती उठली. गिझर चालू
केला. तोंडात ब्रश ठेऊनच बाहेर आली. दूधवाला नुकतीच दुधाची पिशवी ठेऊन गेला होता.
ते घेऊन घरात आली. तोंड धुवून मोठ्या लेकाला उठवायला मुलांच्या खोलीत शिरली.
रात्री अभ्यास केल्यावर तसाच पसारा करून दोन्ही
मुलं झोपून गेली होती. तिने ती सगळी पुस्तकं नीट आवरून टेबलावर ठेवली. थोरल्याचा सकाळी
७.३० चा क्लास. त्याआधी त्याचं व धाकटीची स्कूलबस पावणे नऊ वाजता येणार. त्याआधी
तिचं आवरलं पाहिजे. त्याप्रमाणे तिची गणितं सुरु रोज व्हायची. लेकाला उठवलं.
त्याला तिथल्या बाथरूममध्ये ढकलून मग किचनमध्ये आली. दुधाच्या पिशवीतलं दूध
पातेलीत ओतलं. ती पिशवी धुवून स्वच्छ करून ठेवली. मग घराचा केर काढला. नंतर ती बाथरूममध्ये
शिरली. बाथरूम मध्ये शिरता शिरता तिच्या मनात विचार आलाच. “पूर्वी छोट्या घरात
राहायचो तर एकच बाथरूम सगळ्यात मिळून वाटून घ्यावी लागे. आपला नंबर लागेपर्यंत
शरीरेच्छा सुद्धा दडपावी लागे. आता किमान सकाळी बाथरूममध्ये तरी शांतपणा मिळतो हे
ही नसे थोडके..!”
जरा वेळाने आवरून ती बाहेर आली. दूध गरम करायला
ठेवलं. काल रात्रीच निवडून, कापून ठेवलेली भाजी फ्रीजमधून बाहेर काढली. ती कुकरला
लावली. चपातीची कणिक मळून ठेवली. मग देवापुढं दिवा-उदबत्ती लावली. एव्हाना मुलगा
आंघोळ उरकून आला. मग त्याला चहा लाडू आणि चिवडा असं काही खायला दिलं. भरभर आवरून
तो कॉलेजला गेला. मग बेडरूम मध्ये जाऊन “त्याला” उठवलं. काल रात्री तो उशिरा
टूरवरून आलेला. त्यामुळे जरा जास्त थकलेला. “तरी आजच्या मिटींगसाठी जायला पाहिजेच
ऑफिसला” असं म्हणणाऱ्या त्याच्याशी बोलत असतानाच तिनं छोटीला उठवून तिचं आवरायला
सुरुवात केली. तिला सगळं नीट, पटपट नाही आवरता येत. सारखं मागे लागून सांगून करून घ्यावं
लागतं. नाहीतर मग उशीर होतो. स्कूलबसवाला मामा चिडून कधी तसाच निघून जातो. तसं आज नको
व्हायला म्हणून तिच्या मागे मागे लागतं सगळं आवरून झालं. छोटीसाठी पट्कन तिनं २
चपात्या केल्या. डबा भरून ठेवला. तिला सकाळी फक्त होर्लीक्स घातलेलं दूध आवडतं. पण
ते नेमकं संपलंय, आणि काल संध्याकाळी गडबडीत दुसरी बाटली आणायची राहून गेली हे आता
लक्षात आलं. मग छोटीची कशीबशी समजूत काढली. आज “बाबासोबत मी पण चहा पिणार,
sandvich खाणार” या अटीवर छोटीने तह मंजूर केला. इतक्यात तो आला आंघोळ करून. तिनं
तोपर्यंत त्याचे कपडे, सॉक्स, टाय सगळं नीट जागेवर आहे नं हे नजरेनं पाहून घेतलं.
शक्यतो तो रात्रीच सगळं नीट पाहून ठेवतो, पण काल रात्री उशिरा टूरवरून आला होता
नं...!
तिनं त्याना ब्रेड-ओम्लेट दिलं. एकीकडे छोटीशी
बोलत, एकीकडे हातात पेपर घेऊन तो बसला
चहा-नाश्ता करत.
छोटीचा चहा-नाश्ता संपेतो स्कूल बस आलीच. “चल
गं, बूट घाल पट्कन. मामा जातील हं निघून.” असं सांगत तिचं दप्तर आपल्या खांद्याला
लावून एका हातानं तिला जरा ओढतच ती लिफ्टमधून खाली गेली. तिला सोडून परत घरी आली. “हुश्श..”
करत दोन मिनिटं बसून राहिली.
एव्हाना “तो” ऑफिसला जायला तयार झालेला.
“आज मला कदाचित उशीर होईल हं घरी यायला.
परवाच्या कॉन्फरन्सचं ट्रायल प्रेझेन्टेशन करायचंय आज. तेंव्हा तुम्ही माझी
जेवायला वाट नका पाहू, मी उशिरा येऊन जेवेन.”
“अरे, किती दगदग करून घेतोस, जरा वेळच्या वेळी
येत जा नं घरी. आठवड्यात शक्यतो एकही संध्याकाळी घरी नसतोस तू. हल्ली रोज तुझं
उशिरा येणं त्यांना नाही रे सहन होत.. मुलं आठवण काढतात रे नेहमीच संध्याकाळी
अभ्यास करताना, जेवताना..”
“काय करू मग? नोकरी सोडून घरी बसू? माहितेय नं
तुला बाहेरच्या जगात कसली जीवघेणी स्पर्धा चाललीये ती. एकदा आत शिरलं की मध्येच
थांबता येत नाही. त्या लोकलमध्ये कसं आपण गर्दीच्या लोंढ्याबरोबर ढकलले जातो तसं
जात राहायचं फक्त. आणि नोकरी सोडून काय करू? हे घराचं लोन कसं फेडायचं? भावनेच्या
आहारी जाऊन कसं चालेल एवढं साधं कसं समजत नाही तुम्हा बायकांना??”
“असं टोकाला जाऊन काय बोल्तोयस? आणि मी पण छोटी
नोकरी करून हातभार लावतेयच नं? तसं तुझ्यावाचून काही अडत नाही मुलांचं, पण त्यांच्या
मनानं एकदा विचार करून बघ इतकंच म्हटलं मी..”
आता उगाच शब्दाला शब्द वाढवत बसलो तर उगाच
दिवसभर मन कल्लोळत राहील हे समजून दोघांनी तो विषय बंद केला. तो म्हणाला, “तुला मी
सोडू जाताजाता की तू नंतर जाणार स्कूटीवरून?”
त्याचा डबा त्याच्या हातात देत ती म्हणाली, “तू
जा पुढे. मी नंतर येईन. माझी मैत्रीण, ती कालिंदी पण येणार आहे आज. कालच सुट्टीवरून
आलीय ती परत.”
तो निघून गेला. अचानक समोरच्या कोपऱ्यात लक्ष
गेलं तिचं. तिथे नटराजाची ४ फुट उंच मूर्ती होती. तिच्यावर कोळीष्टकं जमली होती. (ती ओडिसी नृत्य करायची तेंव्हा तिला एका
कार्यक्रमात ही मूर्ती भेट मिळालेली. एकेकाळी चांगल्या समीक्षकांनी तिला गौरवलेलं.
पण “त्याच्या” प्रेमात पडली. लग्न झालं आणि या संसारात ती गळयाइतकी बुडून गेली.
जेंव्हा पैसे कमवायला काही करायची गरज निर्माण झाली तेंव्हाही तिला नृत्य आठवलंच
नाही..! तिनं तिच्या कॉमर्सशी संबंधित अकौंटंटची नोकरी तेंव्हा पत्करली.)
गेले आठवडाभर कामवाली बाई आलेली नाही. घरात
सगळीकडे पसारा झालाय. कितीतरी गोष्टी कराव्याश्या वाटतायत पण वेळ पुरतच नाहीये.
गेल्या काही वर्षातलं जगणं आठवलं. “त्या” च्या कर्तबगारीमुळे त्याला मोठ-मोठ्या ऑफर्स
येत गेल्या. नोकरीत तो उच्च पदाला पोचला. सुरुवातीला वन बीएचके, मग टू बीएचके,
गेल्या २ वर्षापूर्वी घेतलेलं हे थ्री-बीएचकेचं घर, गाडी, घरातील वस्तू यातच
सुख-समाधान मानत बसलो. ज्या अपार्टमेंट मध्ये राहायचं तिथल्या इतरांप्रमाणे आपण
प्रत्येक वस्तूच्या मागे लागायचं. कारण सगळ्याजणींच्यात चर्चा चाले नं. मग ते
हप्ते, त्यासाठी दोघांना हवी अधिक पगाराची नोकरी...सगळं मेलं दुष्टचक्रच हे.. कसं
आपण अडकलो?
अचानक तिला जाणवलं, कामावर जायची वेळ होत आलीये.
चपाती-भाजीचे चार घास गडबडीत तिनं पोटात ढकलले. स्वतःचा डबा सोबत घेतला. दुपारी मुलगा
घरी येईल त्याच्यासाठी टेबलवर जेवण झाकून ठेवलं.
सगळीकडचे लाईट बंद केले. दरवाजा लॉक करून ती
बाहेर पडली.
मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वीच ट्राफिक. त्रासून
त्यातूनच वाट काढत निघाली. वाटेत कालिंदीला पिकअप करून ऑफिसला कशीबशी वेळेत पोचली
ती. लेटमार्क अगदी थोडक्यासाठी वाचवला तिनं.
आपल्या टेबलावर येऊन बसली. पण काहीच करावंसं
वाटेना. विलक्षण मानसिक थकवा आला तिला. गेले काही दिवस आयुष्यात एक उदास पोकळी
निर्माण झाल्यासारखं उगाच वाटत होतं. आज तर सगळं नकोसं वाटू लागलंय. किती
आयुष्याची फरफट करायची? धड मुलांशी बोलायला वेळ मिळत नाही, नवऱ्याची सोबत मिळत
नाही आणि मिळाली की ती अगदी “तेवढ्या”पुरती. गेल्या ५-१० वर्षात सगळं झपाट्यानं
बदललं खरं. पण आयुष्य का आणि कसं यंत्रवत झालं? एकेकाळी “त्याच्या”सोबत कॉलेज व
नंतर नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात छोट्याछोट्या गोष्टीत किती आनंद शोधायचो आपण.
“युवा मंचद्वारे आजूबाजूच्या वाईट घटनांच्या निषेधार्थ रस्त्यावर शांततामय
निदर्शनं करायचो आपण. मग आता का आपल्याला आनंदाचे क्षण का सापडत नाहीयेत? का आपल्याला
समस्या दिसत नाहीयेत? आता कशाचंच काही कसं वाटेना झालंय? कशाला माणूस म्हणायचं
स्वतःला? काय करतो आपण, मनसोक्त माणसासारखे जगायला? प्रश्न...प्रश्न..प्रश्न. या
प्रश्नांनी तिचं डोकं भंडावून सोडलं.
इतक्यात बॉसने तिला बोलावल्याचा निरोप आला. ती
समोरच्या क्युबिकलकडे गेली.
“ दोन दिवसानंतर हेड ऑफिसमध्ये ऑडीट असणार आहे. त्यासाठी
तुम्ही या ऑफिसचे सर्व फायनान्शियल डिटेल्स, इतर रिपोर्टस नीट तयार करून आजच तिकडे पाठवून द्या..” बॉसने
सांगितलं. मग ती पूर्ण कामात बुडून गेली. दुपारचा डबासुद्धा तिनं तिथं टेबलावरच
संपवला.
मध्येच मुलाला फोन करून तो घरी आल्याची खात्री
करून घेतली. मुलीच्या शाळेत फोन केला. तिच्या प्रगतीची चौकशी केली. या सगळ्या खरंतर
तिच्या रोजच्या दिवसभरातील गोष्टी. पण अशा सगळ्याचाच आज तिला मनस्वी तिटकारा आला.
एका भयंकर न्युनगंडानं तिचं मन झाकोळून गेलं. येत्या १-२ दिवसात हे वर्ष संपून
जाईल. कितीही समस्या असल्या समाजात, तरी ३१ डिसेंबर जोरात पार्ट्या होतील सगळीकडे.
मग पुन्हा नवीन वर्ष सुरु होईल. लोकं अशीच डोळे मिटून धावत राहणार.पण आपल्या आयुष्याचं
काय? ते असंच राहणार की.. शी..काय झालंय आपल्या आयुष्याचं हे? तिला प्रथमच
स्वतःचीच घृणा वाटू लागली.
संध्याकाळी घरी परतताना वाटेत तिनं स्कूटी सर्विसिंगला
दिली. त्याला सकाळी ९ पर्यंत ती घरी आणून द्यायला सांगितलं. आणि मग ती चालत चालत
येऊ लागली. आज नवरा घरी उशिरा येणार, इथून पुढे जाऊन स्वैपाक करायचा, तो रात्री
उशिरा जेवल्यावर मग कधीतरी झोप मिळणार असा विचार करत चालताना तिला अधिकच थकवा आला.
पण करणार काय ? घरात आणायच्या वस्तूंची यादी आठवली. वाटेत त्या वस्तू, दुसऱ्या
दिवसासाठी भाजी, मुलीचं होर्लीक्स असं काही काही घेत-घेत परत येताना तिला जरा
उशीरच झाला. घरी येऊन पहाते तर आज नवरा चक्क तिच्या आधीच आला होता..!
मुलांना काही खायला देऊन त्यानं खेळायला पाठवलं
होतं. आणि तो स्वतः संध्याकाळी मस्त “राजमा मसाला” बनवायच्या तयारीला लागला होता.
ती सोफ्यावर बसली. हातातल्या पिशव्या तशाच
ठेवल्या. तो जवळ आला. म्हणाला “दमलीस ना?”.
आणि ती कोसळली. अक्षरशः गदगदून रडूच आलं तिला.
तो गडबडला. त्यानं तिला जवळ घेतलं.
“अगं, काय झालं? कुणी काही बोललं का? ऑफिसमध्ये
काही झालं का? गप,गप..रडू नको. डोळे पूस बघू आधी. हे पाणी पी...”
भावनावेग संपून गेल्यावर ती सावरली.
“नाही रे. कुणी काहीच नाही बोललं. मलाच सगळं नकोसं
वाटू लागलंय. किती तारांबळ करून घ्यायची रे आपण.. किती बेकार बनलंय रे हे रोजचं
जगणं. एका छताखाली राहतो आपण म्हणून फक्त कुटुंब म्हणायचं का? महागाई वाढलीय, गरजा
वाढल्याहेत हे सगळं खरं. पण आपण या सगळ्यात अमाप वेगानं वाहून चाललोय असं वाटू
लागलंय. आणि इतके दिवस प्रवाहासोबत जातोय असं वाटत होतं. पण आता वाटतंय आपण या
प्रवाहाच्या वेगाने भरकटत तर नाही न? भयानक वेगानं दुसरीकडंच कुठं पोचू असं वाटू
लागलंय. धीर सुटलाय आणि दमलेय मी आता... फक्त माझंच नव्हे तर तुझंही हल्लीच वागणं
असं आहे हे जाणवलंय का तुला? भीती वाटतेय रे आता सगळ्याची...” तिला पुढं काही
बोलताच येईना.
त्यानं शांतपणे तिला कुशीत घेतलं. म्हणाला, “हो
गं, जाणवलंय मला हे केंव्हाच. पण म्हणून काय करूया? सगळं सोडून कुठं जायचं? कसं
राहायचं? या प्रवाहात वाहतोय आपण हे खरंच. पण धीर का सोडायचा? आणि धीर सोडला तर
आपणच बुडून जाण्याची भीती आहे गं. त्यापेक्षा डोकं शांत ठेऊ. या वाहताना सोबतचे काठ
दिसत राहतात दोन्ही बाजूचे. एखादं उत्तम ठिकाण सापडेल नं आपल्याला. तिथं सावकाशपणे
बाजूला यायचं. पण तोपर्यंत प्रवाहाला आपल्यावर शिरजोर होऊन नाही द्यायचं. सगळं ठीक
होणारेय. काही काळजी करू नकोस.. उठ, तोंड धुऊन ये स्वच्छ. मी भाजी आणि कोशिंबीर
करतो. तू आज मस्त पराठे कर. इतक्यात मुलं येतीलच...”
तो असं म्हणेपर्यंत मुलं आलीच. “आई...” म्हणत
तिला बिलगली.
“बाबा, यावर्षी ३१ डिसेंबरला काय करणारेय आपण,
आपण कुठं पार्टीला जायचं?” मुलानं विचारलं.
“यावर्षी नो पार्टी. आपण ट्रीपला जाणार सगळे. उद्या
रात्री निघायचं. मस्त जंगल भ्रमंतीला. मी आज रिझर्वेशन करूनच आलोय. आणि “हिच्या”
बॉसला गपचूप पटवून मी सुट्टी पण मंजूर करून घेतलीय. सरप्राईज आहे ना? त्यामुळे आता
आपण चार दिवस जंगलात मस्त तंबूत राहायचं. अगदी मोबाईलची रेंजसुद्धा नाही अशा
ठिकाणी.” ती आश्चर्यानं त्याच्याकडं पहात राहिली...!
तो पुढं म्हणाला, “ या निसर्ग भ्रमंतीने आपण
नवीन वर्षाची वेगळीच सुरुवात करायची. आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी नवीन वर्षाचा
संकल्प पण सुचवणार आहे. तोही बघा तुम्हाला आवडेल, पण नीट करायचं हं सगळं. या
हिरोला टेनिस खेळायला आणि नाटकात काम करायला आवडतं ना, मग त्याने त्यापैकी एक
काहीतरी शिकायला सुरु करायचं. छोटीला ओरिगामी आणि इकेबाना पुष्पसजावट करायला आवडते,
तर तिने आता जपानी भाषा पण शिकायला सुरुवात करायची. इथे आपल्या गावात नुकतेच
जपानी, जर्मन व फ्रेंच भाषा शिकायची सोय झालीय त्याचा फायदा घ्यायचा. आणि आमच्या
बायकोने पुन्हा “ओडिसी” नृत्याचा सराव-अभ्यास सुरु करायचा आणि या वर्षअखेरीपर्यंत
नोकरीतून हळूहळू बाहेर पडायचं. करणार नं तुम्ही सगळे ?”
“ आम्ही करू रे...पण बाबा तू काय करणारेयस ते का नाही सांगितलंस ?”
“माझं काम सुरूच राहणारेय. आणि आज मला २ चांगले
सहाय्यक अधिकारी मिळालेत. त्यामुळे मी आता रोज लवकर घरी येणार आणि रात्रीची
भाजी-आमटी मी करणार आणि तुमच्या सोबत थोडा जास्त वेळ घालवणार...!”
“हेय्य..” मुलं आनंदानं चित्कारली. उत्साहानं
घरातलं वातावरण बदलून गेलं.
पट्कन ती उठून निघाली.
“कुठं चाललीस गं आई” मुलीनं विचारलं.
“ट्रीपची तयारी नको का करायला.. हा तुमचा बाबा,
अगदी शेवटच्या क्षणी सांगणार. कधी भरायचं सामान सगळं?”
जेवण, सामानाची बांधाबांध, मग भांडी आवरणे हे सारं
होईपर्यंत उशीर झालाच. मुलांना जंगलात राहिलेल्या जिम कॉर्बेटची गोष्ट सांगता
सांगता तोही तसाच झोपून गेला. जरा वेळाने ती झोपायला आली. अंथरुणावर बसली न आठवलं
की मुलांच्या कानटोप्या, सॉक्स हे सारं भरायचं राहिलं. परत उठली. कपाटातील त्या
वस्तू शोधून काढून सामानात ठेवल्या. मग झोपयला आली.
लाईट बंद करून झोपताना पाठीतून कळ आलीच.
“सगळ्याच्या नादात आजही दुखण्याकडे पाहायचं राहूनच
गेलंय, उद्या सकाळी तरी याच्याकडून पाठीला क्रीम लावून घ्यायला हवं...” मिटल्या
डोळ्यांनी झोपेच्या अधीन होताना हाच विचार तिच्या मनात पुन्हा येऊन गेला..!
Khupch chan
ReplyDeleteआपले मत अत्यंत योग्य आहे
Deleteछान लिहिताय.
ReplyDeleteसुंदर....... निःशब्द करणारं......
ReplyDelete