आज हे सोबतचे छायाचित्र पहिले. टीव्हीवर
बातमीसुद्धा पाहिली. लोक ज्याकडे तमाशा म्हणून पाहत होते, त्या या गोष्टीने मात्र
मला कासावीस केलं. गेले कित्येक महिने लिहायला जराही वेळ मिळाला नव्हता. आज
लिहिण्याची उर्मी अनावर झालीच त्याला हे चित्र कारणीभूत ठरलं.
काय आहे ही बातमी? म्हटलं तर साधीच. राजस्थान
मधल्या एका गावात तहानेने व्याकुळलेला एक बिबट्या आला. त्याने एका घागरीतलं पाणी
प्यायला त्यात तोंड घातले. मग त्यातच त्याचे तोंड अडकून पडले.
अगदी पंचतंत्राच्या गोष्टीत शोभेल अशीच ही
कहाणी.
पण मग ती गावातली माणसे कशी वागली? त्यांनी
त्याला पट्कन मोकळं केलं का?
आणि तिथेच तर खरा प्रश्न आहे.
जो माणूस स्वतःला विश्वातील सर्वात बुद्धिमान
प्राणी समजतो त्या माणसाने त्या बिबट्याला त्या बिकट अवस्थेतून सोडवायला चक्क
सहा-सात तास घेतले. काय करत होती ही माणसे मग?
ती गोष्ट घडल्याक्षणी सगळ्यात प्रथम माणसांनी
आपले मोबाईल सरसावले. किती तरी जण जमले. कुणी फोटो काढतोय. कुणी वीडीओ शुटींग
करतोय. कुणी त्या बिबट्याच्या असहायतेचा फायदा घेऊन त्याला काठीने टोचतोय. तर कुणी
त्या बिचाऱ्याची शेपटी धरून ओढतोय. काय चाललंय हे???
खरंच आपण माणूस म्हणून उरलोय की आपलं सगळं
माणूसपणच विसरलोय? ज्या प्राण्यांची घरं असलेली ती जंगलं आम्ही वेगानं नष्ट करत सुटलोय, त्या
प्राण्यांची काळजी घ्यावी अशी बुद्धी का होत नाही आम्हाला? खरंच आमच्यात माणूसपण
उरलं आहे का?
या घटनेवेळी अपेक्षित होतं काय तर पट्कन
माणसांनी त्या बिबट्याला हुशारीने मोकळे करून एखाद्या घरात कोंडून ठेवणे व नंतर वन
विभागाद्वारे त्याला योग्य तिथे जंगलात सोडणे. अगदीच ते नाही जमलं तर वन-विभागाच्या
लोकांना पट्कन बोलावून आणणे. मात्र त्या ठिकाणी वन-खात्याची माणसे यायलाच जणू सहा
तास लागले. या कालावधीत ते भांबावलेले व तहानलेले जनावर मरून गेले असते तरी
आम्हाला काय त्याचे? समजा त्या जनावराच्या जागी एखादा धुळीनं माखलेला गरीब माणूस असता
तर काय केलं आम्ही? का चोर म्हणून त्यालाही मारून टाकलं असतं? पण आम्हाला काय त्याचं
? आमची तर करमणूक झाली नं? मस्त सोशल मिडियावर लाइव्ह अपडेट्स टाकता आले, आणि काय
पाहिजे?
त्याच बरोबर बिबट्या पाण्याच्या शोधात घरात का
घुसला त्याबद्दल विचार करणे आवश्यक होतं. ही बातमी दाखवणाऱ्या मिडियानेही अशा काही गोष्टींचा
उहापोह करायला हवा होता.
उदाहरणार्थ गावाबाहेर पाणवठे का असू नयेत? तिथे
आसपासच्या प्राणीमात्रांना घोटभर पुरेल इतकं पाणी कसं जमा करता येईल याबाबत गावकरी
मंडळी काय करू शकतात?. तसेच गावात प्राणी येऊ नयेत यासाठी काय करायला हवंय? आज
आपली ही प्राणीसंपदा सुद्धा अस्तंगत होते आहे. त्याच्या संवर्धनासाठी काय उपाय
करायला हवेत? असं काही चर्चेतून किंवा विशेष फीचर्स मधून सांगायला हवं होतं. त्यासाठी
स्वतः पुढाकार घ्यायला हवा होता. मात्र ते झालं नाही. किंवा कुणी केलं असल्यास
माझ्यातरी नजरेस आले नाही.
आज माणसांनी सगळीकडे कब्जा केलाय. जंगलं उध्वस्त
होत आहेत. पाणीसाठे नष्ट होत आहेत. कुठेतरी कोकण व घाटमाथ्याजवळची धरणे तेवढी
भरलेली. ती देखील अजून ४-५ महिन्यासाठीच. त्यातील पाणीसुद्धा आम्ही बंद पाईपातून
शहरात आणणार. पुन्हा त्या पाण्यावर अनेकांचे हक्क. मग त्यावरून भांडणं व राजकारणाचे
आखाडे रंगणार. एवढं झाल्यावर सुद्धा ते पाणी जास्त करून सर्व धनदांडगे, कारखाने
यांनाच मिळणार. गरिबांना कशाला लागतंय पाणी? आणि गरिबांनाच जिथे पाणी मिळेनासं
झालंय तिथे हे जंगलातले प्राणी म्हणजे “किस झाड की पत्ती”. त्यातही या गरीब बिचाऱ्या प्राण्यांना ना अशा
गोष्टींविरुद्ध आवाज उठवता येत ना सार्वजनिक नळावर जाऊन आपल्या घरातली भांडी भरून आणून
ठेवता येत..! टँकर वगैरे तर दूरच्या गोष्टी. काय करतील बिचारी जनावरं?
या वर्षी सर्वत्र दुष्काळाची विषण्ण छाया आहे.
पण तरीही असं वाटतंय की भविष्यात काय वाढून ठेवलं आहे त्याचा अजून पुरता अंदाज
आलेला नाहीये. पावसाच्या पाण्यासारखी अत्यंत मौल्यवान गोष्ट नीट जपून वापरायची
अक्कल कधी येणार आहे आपल्याला?
सगळे मिडियातले लोक किंवा अन्य मोठे राजकारणी
तावातावाने फक्त सांगणार की “तिसरे महायुद्ध हे
पाण्यासाठीच घडणार आहे...”. अरे पण ते घडू नये
म्हणून तुम्ही काय करताय?
आपले ते थोर “पाणीवाले बाबा” राजेंद्र सिंहजी गेली अनेक वर्षे कंठशोष करतायत की महाराष्ट्रात्तील
परिस्थिती भयानक आहे. इथे इतका पाऊस पडूनही जलसंधारण झाले नाहीये. अजूनही होत
नाहीये. धरणांच्या मागे लागू नका. लहान लहान गाव पातळीवर कामं करून पाणी अडवा.
राजेंद्रसिंहजी प्रमाणेच अण्णा हजारे, पोपटराव पवार अशासारखी मंडळी, काही ठराविक
गावातून खरंच कार्यरत असणारी अनेक माणसे, संस्था यांच्याव्यतिरिक्त बाकी आपण सगळे
काय करतो आहोत ?? की अगदी दुष्काळाची सावली आपल्या उंबरठ्यावर पडेपर्यंत आम्हाला
जाग येणारच नाहीये?
इकडे तिकडे पाहिलं तर असं दिसतंय की आम्ही सगळे
मस्त आपापल्या कामात, उत्सवी मौजमजेत किंवा मोबाईलमध्येच गुंतलो आहोत. आपल्या
वागण्याला बेफिकीरीबरोबरच “जे काही करायचे ते
फक्त सरकारने करावं, आम्ही कर भरतोय ना??” अशा उद्दामपणाचीही थोडीशी झाक नक्कीच आहे.
मात्र याच महाराष्ट्रात “गाव करील ते राव काय करील?” अशी म्हण जन्माला आली होती हे बहुदा आजची पिढी विसरली असावी.
त्यात त्यांचा काय दोष म्हणा? आम्ही त्यांना हल्ली मराठी शिकवतच नाही नं? मराठीतून
शिक्षण म्हणजे कसं “आउटडेटेड” वाटतं नं??
इथे प्यायला पाणी नाहीये, शेतीला पाणी नाहीये,
प्राणी-पक्षी यांना पाणी नाहीये तरी आमच्या जीवनात काही फरक पडणार आहे का? आम्ही पाणी
कमी वापरायचे काही उपाय आपापल्या घरी अमलात आणणार का? आपल्या घरात, सोसायट्यामधून
काही करणार का? काही अपवाद वगळता कुणी असं काही मनावर घेऊन करत नाहीये .
उलट “त्या अमक्या तमक्या मोठ्या बिल्डींगवाल्यांना /त्यांच्या
स्विमीग पूलला पाणी मिळतंय, त्या पंचतारांकित हॉटेलला टबबाथ साठी पाणी मिळतंय मग
मीच का काटकसर करायची?” अशीच वृत्ती अनेक ठिकाणी दिसून येतेय.
आपल्या मस्तीतून, मिडियाच्या व सोशल मिडियाच्या
आभासी दुनियेतून सगळ्यांना खडबडून बाहेर काढण्यासाठी काहीतरी चरचरीत घडायला हवंय हेच खरं.
No comments:
Post a Comment